Skip to main content

पेशंटला कोविड वॉर्ड मधे ठेवल्यानंतर नातेवाईकांनी लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी

*पेशंटला कोविड वॉर्ड मधे ठेवल्यानंतर नातेवाईकांनी लक्षात ठेवण्याच्या काही महत्वाच्या गोष्टी*

दवाखाना कितीही मोठा असला म्हणजे त्यातला नर्सिंग स्टाफ तत्पर असेलच असं नाही. काही दिवसापूर्वी एका जवळच्या नातेवाईकाला कोवीड वॉर्ड मधे ठेवण्याचा अनुभव आला. त्या अनुभवातून लक्षात आलेल्या काही गोष्टी खाली नमूद करत आहे.

*1.* प्रत्येक पेशंटसाठी स्टाफ कडे एक फाईल असते. त्या फाईलमधे बरेच वेगवेगळे कागदपत्र असतात. त्यातले काही डॉक्युमेंट्स पेशंटच्या रोजच्या नियमित तपासणी साठी असतात. यावर पेशंटची सही सुद्धा घेतलेली असते. हे रिपोर्ट नर्स किंवा अटेंडिंग डॉक्टर भरतात. पेशंटची रिकवरी बघण्यासाठी वरिष्ठ डॉक्टर यांना सुद्धा ही फाईल कामी येते.

*2.* या फाईलचा उपयोग इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी सुद्धा होत असतो. इन्शुरन्स क्लेम पास होण्यासाठी पेशंटची रोजची तपासणी व्यवस्थित रित्या या फाईल मधे लिहिलेली असावी लागते. (टेंप्रेचर, ब्लड प्रेशर, ऑक्सीमिटर रीडिंग, रक्तातील साखरेचे प्रमाण, वगैरे वगैरे)

*3.* हॉस्पिटलचा स्टाफ या फाईल मधे "चुकीचे" / "नॉर्मल वाटणारे" आकडे लिहिण्याची शक्यता असते. पेशंटला भेट न देताही हे आकडे फाईलमधे लिहिले जाऊ शकतात.

*4.* मला हे बघून आश्चर्य वाटले की कोविड वार्डमधे रुग्णांचे तापमान डोक्याला हात लावून नर्स तपासात होत्या. जेव्हा नर्सला याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी सांगितले "आम्हाला हातानेच कळतं, मशीन ची गरज नाही". याचा अर्थ तेच हात पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पेशंटच्या कपाळाला लावले जातात. हे कितपत सुरक्षित आहे?

*5.* ब्लड प्रेशर, तापमान, ऑक्सिजन लेव्हल दिवसातून एकदा (किंवा शून्य वेळा!) तपासली जात होती. पण फाईलमधे मात्र दिवसातून बऱ्याच वेळच्या रीडिंग लिहिलेल्या होत्या. इतरही काही ब्लड टेस्ट करण्यासाठी रुग्णाला स्वतःहुन सांगावे लागत होते.

ब्लड प्रेशर मोजण्याचीची दोन यंत्रे सुरवातीला नादुरुस्त होती. स्टाफला कंप्लेंट केल्यानंतर त्यांनी चालणारी यंत्रे आणून रीडिंग घेतली. त्याआधी स्टाफ त्यांच्या मनानेच रीडिंग फाईल मधे लिहीत होते.

*6.* सलाईन - सहसा नॉन-कोविड पेशंटच्या रूममधे त्याचे नातेवाईक स्टाफला बोलावून सांगतात की सलाईन संपले आहे. पण कोविड वॉर्डमधे रुग्णाला स्वतःहूनच नर्सला बोलावण्याची पाळी कधी कधी येते. काही वेळा पेशंटला झोप लागलेली असेल तर सलाईन संपल्यावर सुद्धा हातावर तसेच राहू शकते. त्यामुळे तिथल्या स्टाफने तत्पर असणे आवश्यक आहे.

*7.* त्याच वॉर्ड मधे अजून एक पेशंट (ज्यांना ऑक्सीजन चा मास्क लावला होता) त्यांच्या फाईल मधे ऑक्सीजन लेव्हल सुरुवातीपासून 98% लिहिली होती (जी की प्रत्यक्षात 86% होती). जर हा सगळा प्रकार इन्शुरन्स कंपनीला कळाला तर त्या पेशंटचा क्लेम नाकारण्यात येऊ शकतो. बरं इन्शुरन्स चं जाऊ द्या, डॉक्टरांना सुद्धा योग्य रित्या उपचार देण्यासाठी बरोबर रीडिंग लिहिणे आवश्यक असते.

वरील परिस्थिती पाहता मी खालील सल्ले देऊ इच्छितो.

*सल्ला 1)* पेशंटची अवस्था चांगली असेल तर त्यांनी स्वतःहुन स्टाफ ला बोलावून बरोबर रीडिंग घेतली की नाही हे तपासले पाहिजे. जर स्टाफ दुर्लक्ष करत असेल तर रुग्णाने त्वरित नातेवाईकांनी फोनवरून सांगितले पाहिजे.

*सल्ला 2)* जर चांगली व्यवस्था नसल्यास, रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि स्टाफ बरोबर नियमित बोलले पाहिजे. मोठ्या आवाजात बोलून उपयोग नाही, योग्य रीतीने आपली तक्रार मांडल्यावर तिचे निवारण होण्याची शक्यता जास्त असते.

*सल्ला 3)* पेशंटने / पेशंटच्या नातेवाईकांनी पेशंटच्या फाईल चे फोटो नियमित रित्या, दर 2 दिवसांनी घेत राहिले पाहिजे. म्हणजे काही त्रुटी असल्यास लगेच ध्यानात येईल. स्टाफला मागितल्यावर ही फाईल त्वरित मिळते (इन्शुरन्स साठी पाहिजे, असं कारण स्टाफला सांगावे).

*सल्ला 4)* फक्त जास्त पैसे मोजून पेशंटबद्दल बिनधास्त राहू नये. आपणही तत्पर असावे.

टिप - लेख स्वानुभवातून लिहिला आहे.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

प्रभुदेसाई Mon, 05/04/2021 - 07:42

आपण चुकून घाई घाईने पेशंटला वेड्यांच्या इस्पितळात किंवा लॉज मध्ये दाखल केले असणार .
अश्या जागांबद्दल कुठे तक्रार करता येत बाही का? हे म्हणजे बादशहा मधल्या जॉनी लिवर प्रसंगाची आठवण देणारे आहे. अश्या ठिकाणाहून पेशंट सुखरूप घरी परत येतात याचा अर्थ जगात अजून परमेश्वर आहे !

'न'वी बाजू Mon, 05/04/2021 - 07:57

In reply to by प्रभुदेसाई

अश्या ठिकाणाहून पेशंट सुखरूप घरी परत येतात याचा अर्थ जगात अजून परमेश्वर आहे !

"अजून" बोले तो? म्हणजे, (सध्या आहे, परंतु) पुढेमागे तो नसूही शकतो काय?

Law of Conservation of God अशी काही चीज मांडली नाही काय अद्याप कोणी?

Space bar Mon, 05/04/2021 - 09:21

In reply to by प्रभुदेसाई

मी डॉक्टरांसाठी तक्रारीचे पत्र लिहिले होते. परंतु मला असा सल्ला देण्यात आला की उगाच नसत्या तक्रारी केल्या तर प्रायव्हेट हॉस्पिटल आमच्या पेशंटला "दुसरीकडे जागा पहा" असं सांगतील किंवा पुढे कधी emergency असल्यास बेड नाकारतील.

म्हणून मी डॉक्टरांना या सगळ्या प्रकारची तोंडी कल्पना दिली. ते म्हणाले "मी बघतो".

बाकी हे हॉस्पिटल बरेच मोठे आहे, चार चार इमारती असलेले. इथले सगळे Covid वॉर्ड 100% फुल आहेत लोकांच्या रांगा लागल्या आहेत , आमच्या पेशंटला दाखल करा म्हणून.

मला वाटतं की Covid वॉर्ड मधे केवळ नर्स आणि डॉक्टर यांना प्रवेश असल्यामुळे आणि सध्या इतर कामाचा ताण असल्यामुळे असे प्रकार घडत असावेत.

'न'वी बाजू Mon, 05/04/2021 - 08:06

@अबापट:

काय हो, हे साहेब बघा काय म्हणताहेत. हे खरेच असे असते काय?

(नाही म्हणजे, तुम्ही या विषयातले माहीतगार. गेला बाजार आमच्या तुलनेत तरी. म्हणून तुम्हाला विचारतोय.)

कोव्हिड रुग्णालयांत/वॉर्डांत ही असली SOP खरोखरच असते काय हो? (की उगाच आपले सीझन आहे म्हणून काहीही?)

अबापट Mon, 05/04/2021 - 09:08

In reply to by 'न'वी बाजू

काय न बा शेठ, खेचताय राव.
,माझ्या बघण्यात तर अशी SOP नाही.

पण माझ्या बघण्यात नाही म्हणजे जगात कुठेच नाही असं म्हणण्याचा उद्दामपणा कसा करू ?
कवठे महांकाळ मधली हॉस्पिटल कशी असतील कुणी सांगावे ?
त्यांचा सल्ला क्र चार हा योग्य वाटला, विशेषतः ममव वर्गाकरिता.
बाकी यांनी एवढी माहिती घेऊन त्या हॉस्पिटलवर खटला का भरला नाही हे कळेना.