Skip to main content

Pagglait

उत्तर भारतीय समाजमन आणि कुटुंब व्यवस्था याबद्दल महाराष्ट्रीय मनात एक अढी आणि संशय असतो. तिथे खरोखर चांगले बदल होत आहेत का, लोकांची मानसिकता बदलते आहे का, मुली-स्त्रिया बातम्यांच्यात ऐकतो तितक्या अजूनही असुरक्षित आहेत का इत्यादि प्रश्न मनात असतात. कामानिमित्त गेली काही वर्षे ' तिकडे ' बरेचदा जाणं झाल्याने आणि सुशिक्षित का असेनात परंतु बाकी समस्त पुरुष असलेल्या टीमचा भाग असल्यामुळे मनावर कायम दडपण असतं, हे अनुभवाने समजलं आहे. पुरुषी नजरा, तरीही सामोरा समोर अदबीने बोलणं, नावापुढे ' जी ' वगैरे लावलं जाणं परंतु संध्याकाळी ह्याच लोकां बरोबर ' फॉर्मल डिनरला ' एकटीने जाणं टाळणं याची सवय करून घ्यावी लागते. महाराष्ट्रात सगळं काही अलबेल आहे असं मुळीच नाही, परंतु मोठ्या शहरात तरी ठेच लागेल असे अनुभव रोज येत नाहीत.
उत्तर भारतात घडणाऱ्या खर्या अथवा काही अंशी काल्पनिक गोष्टीवर बेतलेले सिनेमे बघणं हे अत्यंत क्लेशदायी असू शकतं हे उड़ता पंजाब, NH10, तलवार वगैरे बघताना उमजलं होतंच. पण बधाई हो, थप्पड असे सिनेमे पाहताना किंचित आशा सुद्धा वाटली होती. तर या यादीत नव्याने भर पडली Pagglait नावाच्या सिनेमाची. Netflix exclusive असल्याने भाषा इंग्रजी परंतु वातावरण आणि गोष्ट उत्तर भारतीय. सुरवातीला इंग्रजी संवाद ऐकून कसंसं झालं. पण मग सिनेमाने लक्ष बांधून ठेवलं. अवघ्या पाच महिन्यांत विधवा झालेल्या तरूण सुशिक्षित मुलीची गोष्ट. तिच्या सासर- माहेरचे लोक, तिची (मुस्लिम) मैत्रिण, तिच्या नवर्‍याची आधीची प्रेमिका आणि ती स्वतः हे सगळे या एका घटनेला कसे सामोरे जातात हे अतिशय बारकाईने दाखवलं आहे. त्या तेरा दिवसांत ह्या नवथर मुलीला होणारी स्वत्वाची जाणिव आणि जाचक नात्यांचे (यात तिचे स्वतःचे आई वडीलही आले) आणि पैशापोटी दाखविलेल्या बेगडी प्रेमाचे पाश तोडून ती कशी पुढे निघून जाते याची मनोहारी गोष्ट आहे. शेवट काहीसा तिला देवीत्व बहाल करणारा असला तरी तितका टोचत नाही. कारण तिच्या सासर्‍याचा चांगुलपणा नाकारण्याजोगा नसतोच. मात्र उत्तर भारतीय म्हणजे अगदी कानपूर परिसरात अशी गोष्ट प्रत्यक्षात घडू शकेल हे अजूनही अविश्वासनिय वाटतं. कदाचित बंगलोर -पुणे- मुंबईत हे होऊ शकेल (चु भू दे घे) . सान्या मल्होत्राने उत्तम काम केलं आहे. कुठेही बटबटीत न करता बनवलेला सिनेमा छान वाटला.

समीक्षेचा विषय निवडा

'न'वी बाजू Tue, 06/04/2021 - 06:53

चित्रपटाच्या नावाचा उच्चार कसा करायचा?

shantadurga Tue, 06/04/2021 - 18:03

In reply to by 'न'वी बाजू

सिनेमाच्या सुरवातीला लिहिल्या प्रमाणे 'पगलैट'.

तारारमपम...पम् Tue, 13/04/2021 - 01:22

बरेच दिवस बघू म्हणून लिस्टित होता. शनिवारी पहिला, छानच आहे. शेवट थोडा तरी टोचला नाही तर हिंदी पिक्चर कसा!

Netflix original सिनेमे बाय default इंग्लिश मध्ये सुरू होतात. Settings बदलून ऑडियो हिंदी करावा लागतो.