Skip to main content

गणपती दर्शनाच्या निमंत्रणामुळे शेजारचे काका संतप्त

बंगळुरु, १० सप्टेंबर.

शेजारचे काका आपल्या नास्तिक असण्याबद्दल अत्यंत जागरुक आहेत. काकांच्या बायकोला मराठी शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून गणपती दर्शनाचं आमंत्रण आल्याचं त्यांनी काकांना सांगितलं. काका तेव्हापासून अत्यंत संतप्त झाले आहेत. "त्यांना आपल्या ... आपल्या भावनांची कदर नाहीये. म्हणजे आपल्याला भावना नाहीत, हे आपल्याला माहीत आहे. पण हे त्यांना माहीत नाहीये. आपल्या भावना त्यांच्यापेक्षा निराळ्या आहेत याची त्यांना जाणीवच नाहीये. मला नंबर दे त्या सगळ्यांचे! मी त्यांना रिचर्ड डॉकिन्सच्या वाढदिवसाच्या मीटपलाच बोलावतो."

गणपती डॉकिन्स dawkins ganapati

आपल्या बायकोच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून काकांनी आणखी माहिती पुरवली. "आधी फक्त अमेरिकेतच असे मीट-अप - मीटप व्हायचे. आता करोनाकाळात सगळीकडे नास्तिकांचे मीटप्स सुरू झालेले आहेत. रिचर्ड डॉकिन्सच्या वाढदिवसाला सगळ्यांत मोठा मीटप भरतो. जगभरातले सगळे नास्तिक त्यासाठी एकत्र येतात. या सगळ्यांना त्या मीटपचं आमंत्रण देतो, आणि तिकडे घेऊन जातो. मग बघू या सगळ्या $#$%^&*( आस्तिकांच्या भावना!"

"मी त्यांना आधीच नकार कळवला आहे. मी त्यांना सांगितलं की मला गर्दीची भीती वाटते; आणि गणपतीमुळे ही भीती कमी होणार नाही. त्या लोकांनी इंग्लिशमध्ये मेसेज पाठवला म्हणून मी अगोराफोबिया हा शब्द वापरून टाकला आहे. आता या लोकांना हा शब्द माहीत होता का नाही, हे मला कसं कळणार..."

काकांनी काकूंचं स्वगत अर्ध्यावरच तोडून पुन्हा बोलायला सुरुवात केली. "पण इथे कर्नाटकात मोदक कसे मिळणार? इथे कुठली मराठी दुकानं आहेत का? तुला काही माहिती आहे का?"

काकांना या प्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं समजलं नाही. काकांच्या नावाचा अर्थ 'गणपतीचं नाव आहे' असा सांगितल्याची आठवण त्यांच्या बायकोनं करून दिली. आणि "मोदक नसतील तर केक खाऊ", म्हणत काकांचा मूड बदलण्याचा क्षीण प्रयत्नही केला.

Rajesh188 Sun, 12/09/2021 - 00:54

ईद,ख्रिसमस,बौध्द जयंती च आमंत्रण कोणी देत नाही का.?

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 12/09/2021 - 03:17

In reply to by Rajesh188

शेजारचे काका मराठी मध्यमवर्गीय (उच्चवर्णीय) आहेत. त्यांचं सगळं मित्रमंडळ, शेजारपाजार, सगळंच त्यांच्यासारखंच आहे. फक्त काका नास्तिक आहेत; बाकीचे नाहीयेत.

मनीषा Mon, 20/09/2021 - 10:50

दर्शनाचे निमंत्रण? हे काय चाललं आहे?
आमच्या काळी असे काही नसायचे. सुखकर्ता, दु:खहर्ता असे शब्दं कानी आले, टाळ्या, झांजा वाजू लागल्या की लोकं हातातील कामे सोडून धावायची. असली निमंत्रणाची फॅडं नव्हती तेव्हा. आमच्या काळी तर.... .. जाऊ दे.

आणि काकूंना उकडीचे मोदक करता येत नव्हते वाटतं घरच्या घरी.. ? केक वर भागवणार म्हणे..