Skip to main content

शेजारच्या काकू ठरल्या 'संध्यानंद - पर्सन ऑफ द ईअर'

मराठी संकेतस्थळांच्या जीवघेण्या बुलेटीन बोर्ड स्पर्धेत सतत पंधरा पंधरवडे स्थान मिळाल्याने शेजारच्या काकूंना मानाचा 'संध्यानंद पर्सन ऑफ द ईअर' हा पुरस्कार जाहीर झाला आहे. रोख एक लाख डोजकॉईन्स, सन्मानचिन्ह आणि पुणेरी पैठणी असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे. काकूंना हा पुरस्कार लवकरच पॉलो अ‍ॅल्टो ग्रामपंचायत कार्यालयात श्री. अभिजीत बिचकूले ह्यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. आपल्याला पुरस्कार जाहीर झाला आहे ह्याची काल संध्याकाळपर्यंत काकूंना कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. उद्या शनीवार, सगळ्यांना चांगला नाश्ता मिळावा म्हणून काकू फेसबुकवर वाचलेल्या पायनॅपल आप्प्यांच्या रेसीपीची पुर्वतयारी करीत होत्या. ही तयारी करीत असतांना फेसबुकच्याच अ‍ॅडमध्ये पाहिलेले एका झटक्यात अननसाची साल काढणारे यंत्रही काकू पहिल्यांदाच वापरीत होत्या. ह्या यंत्राने साल निघण्यासाठी लागणारा मोठा अननस मात्र काकूंकडे उपलब्ध नव्हता. यंत्रावर दोन अननसाचे तुकडे होण्याऐवजी तो फुटून त्यातुन इतस्तः ज्युस निघाल्याने तो ज्युस काकूंनी एका भांड्यात जमा केला आणि इंजिअनरींग करणार्‍या आपल्या पोटभाडेकरुंना दिला. शुक्रवारी संध्याकाळी आयाताच पायनॅपल ज्युस मिळाल्याने तो पुणेरी डायकेरी ह्या कॉकटेलसदृष्य पदार्थात वापरता येईल का ह्यविषयी हे पोटभाडेकरु विचार करीत असतांनाच काकूंच्या पुरस्काराची बातमी ट्यार्पी-माझा ह्या चॅनेलवर झळकू लागली आणि काकूंना आकाश ठेंगणे झाले. काकूंच्या शहरात गुरुत्वाकर्षणाचे प्रमाण जास्त असल्याने काकूंच्या चेहर्‍यावरचा आनंद अधिकच ओसंडून वहात असल्याचे आमचा वार्ताहर कळवितो.

ह्यापुर्वी संध्यानंद पर्सन ऑफ द ईअरचे मानकरी ठरलेले श्रीरंग कणेकर, निमीष काणे, पराग झेंडुफुले, आणि कविता जोशी ह्यांनी काकूंचे अभिनंदन केले आहे. हा पुरस्कार काकूंना मिळाल्याने आधीच्या पुरस्कारविजेत्यांनाही समाधान वाटत असून ह्यावर्षी तरी ह्या पुरस्काराची माध्यमे दखल घेतील आणि तसे झाल्यास आधी पुरस्कार मिळविणार्‍यांनाही चॅनेलवर बाईट द्यायला मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

एक मनमिळावू व्यक्तीमत्व म्हणून शेजारच्या काकू आपल्या शेजारच्या कॉलनीत बर्‍याच प्रसिद्ध आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी काकू ह्या उत्तम सायकलपटू होत्या आणि स्लो सायकल स्पर्धेत सतत तीन वर्षे द्वितीय वा तृतीय स्थान मिळवित होत्या. कालांतराने सायकल चालविण्यासाठी लागणारे शरीर कालबाह्य झाल्याने काकूंनी मोठ्या जिद्दीने गुलाबी रंगाची हिरो होंडा अ‍ॅक्टीवा चालविणे शिकून घेतले. तेंव्हापासून त्या अ‍ॅक्टीवाचा वापर करुन शहराच्या कानाकोपर्‍यात रांगोळ्या काढीत हिंडत असतात. शहराच्या दक्षिणेला सत्यनारायण असो की उत्तरेला बारसे वा पुर्वेला वाङ् निश्चय ह्या सर्व ठिकाणी काकूंच्या हातचीच रांगोळी असते. त्यांच्या ह्या रांगोळीच्या सेवाकार्याची ख्याती दूरवर पसरल्यानेच त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे असे सेविका समितीच्या मुख्य उपसचीव तारामती खोकले ह्यांनी म्हटले आहे.

हा पुरस्कार मिळाल्याचे आपल्याला प्रंचड समाधान असुन ह्यापुढेही हे जग आपली अशीच दखल घेत राहील असे विधान काकूंनी कंदवार्ताशी बोलतांना केले. ह्या पुरस्कारानंतर आपल्यावरची जबाबदारी निश्चितच वाढली असुन लवकरच येउ घातलेल्या 'देख तुनी बायकू कशी नाची राह्यनी' ह्या गाण्यावर बनविलेल्या इन्स्टाग्राम रिल्सला सगळ्यांनी लाईक करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

काकूंचे शिक्षण खुप जास्त झालेले असुन मायएसक्युएलच्या साठवणक्षमतेची मर्यादा लक्षात घेता त्यांच्या सर्व पदव्या ह्या वृत्तात न जोडता आल्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 23/10/2021 - 14:12

:ड

Rajesh188 Mon, 25/10/2021 - 16:08

लोक आता हुशार , स्व बुध्दी नी विचार करणारी आहेत.
तेव्हा कोणताच propganda चालवणाऱ्या पोस्ट करू नका.एक तर कोणी वाचणार नाही त्या मुळे विषम विचारी लोकांकडे ते विचार पसरणार नाहीत.
लोक दुर्लक्ष करतील
जे वाचतील ते फक्त सम विचारी असतील त्यांनी वाचलं काय आणि नाही वाचलं काय.
काही फरक पडत नाही.
असे लिखाण करा ज्यांनी विरोधी विचाराच्या लोकांचे पण मत परिवर्तन होईल..

राहुल बनसोडे Wed, 27/10/2021 - 16:55

In reply to by Rajesh188

अजुन थोडा थोडा प्रतिसाद येतोच आहे. मला इतका जास्त प्रतिसाद अजिबात अपेक्षित नव्हता. ह्या पोस्टची किमान १७६० वाचने झाल्याशिवाय आता काय थांबत नाही. आणि पुढच्या वेळेला समविचारी लोकांसाठीच लिहतो म्हणजे मग कुणी वाचण्याचा काही संबधच नाही. चलिये, आंतर्जाल को वणक्कम.