हिवाळ्यातल्या पाकृ
हिवाळ्यात मिळणारी लिंबं, मिरच्या आणि आवळे यांमुळे लोणची घालावीशी वाटतात, आणि थोडी थोडी का होईना ती मी दरवर्षी घालतेच. आंब्याचं लोणचं घरात फार खपत नाही आणि मुंबईच्या हवेला फ्रिजच्या बाहेर ते टिकतही नाही. त्यामुळे ते कधीतरी थोडंसं विकत आणते. गेल्या आठवड्यात हे पदार्थ केले.
खाराच्या मिरच्या
लिंबाचं लोणचं
गाजरहलवा
लसूण लाल मिरची ठेचा
मुखवास (हा काही हिवाळी नव्हे, पण केला होता म्हणून पाकृ देते आहे)
खाराच्या मिरच्या 'हमखास पाकसिद्धी' या पुस्तकात आहेत तशा. त्या भन्नाट चविष्ट होतात, अनेक वर्षांचा अनुभव आहे. पाव किलाे मिरच्या चिरून घ्यायच्या. छोट्या कढल्यात एक चमचा तेलावर एक चमचा मेथीदाणे आणि नंतर २ चमचे हिंग पूड भाजून घ्यायची. एक वाटी लिंबाचा रस घ्यायचा. पाव वाटी मोहरीची डाळ, हळद, आणि थोडा लिंबाचा रस असं मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं. मग त्यात उकळून गार केलेलं पाणी थोडं थोडं करत घालत फेसून घ्यायचं मिक्सरमध्येच. हलकी झाली की हे मिश्रण मिरच्यांच्या फोडींवर घालायचं. त्यात उरलेला लिंबाचा रस, अर्धी वाटी मीठ, मेथीहिंग, घालून कालवायचं. मग अर्धी वाटी तेल गरम करून गार झाल्यावर ओतायचं. नीट कालवायचं. आठेक दिवस तरी रोज कालवावं लागतं. यात लिंबू, मीठ नंतर वाढवता येतं. इतकंच काय खार जास्त झाला तर मिरच्यांचे तुकडेही वाढवता येतात. मी सहसा छोटी बाटली रोज वापराला बाहेर ठेवते, बाकी फ्रिजात. वापरायला काढताना पुन्हा हवं असल्यास तेल घालता येतं. आमच्याकडे ही मिरची इतर लोणच्यांपेक्षा जास्त खपते. डोसा, धिरडी, थालिपीठ, ब्रेड टोस्ट कशावरही आवडतं.
लिंबाच्या लोणच्याचा जरा जुगाड केला आहे. खाराच्या मिरच्यांसाठी लिंबं पिळून झाली होती, सालं टाकून द्यायला जिवावर आलं. मग त्यातल्या बिया काढल्या, थोड्या बारीक फोडी केल्या. आणखी तीनचार रस असलेली लिंबं पण बिया काढून त्यात घातली. सातआठ हिरव्या मिरच्या आणि या लिंबाच्या फोडी सगळं मिक्सरला वाटलं. अगदी बारीक नाही केलं. तीन आवळे आणि बोटभर ओली हळद होती, तीही किसून यात घातली. मीठ साखर घालून नीट कालवून उन्हात ठेवलंय. हे मुरलं की एकदम ट्टाॅक्क लागतं.
गाजरं किसली, छोट्या कुकरला थोड्या तुपावर परतून एक वाफ काढली. मग त्यात खवा घातला. तो मिसळल्यानंतर साखर घालून थोडा आळवला. थोडेसे काजू घातले.
मुखवाससाठी एक वाटी बडीशोप, अर्धी वाटी तीळ, पाव वाटी ओवा आणि घरात होत्या तेवढ्या भोपळ्याच्या सोलून वाळवलेल्या बिया एका ताटात घेतल्या. काळं मीठ घातलं चवीनुसार. दोन लिंबं पिळली आणि सगळं हाताने नीट कालवून पसरवून दोन तास ठेवलं. मग कढईत भाजून घेतलं. मी हाच मुखवास, गुलकंद आणि विड्याची पानं घालून तांबूलही करते.
ठेच्यासाठी चार ताज्या लाल मिरच्या चिरून घेतल्या. साधारण त्याच्याएवढाच लसूण, थोडं जिरं घालून सगळं मिक्सरला फिरवलं. मग त्यात मीठ, दोन लिंबांचा रस घातला. वर तेलात मोहरी, मेथीदाणे फोडणी करून गार झाल्यावर ओतून कालवून फ्रिजात टाकला. मला इतका ठेचा वर्षभर पुरतो कारण तिखटाचं प्रमाण आमच्या जेवणात फारच कमी असतं.
:)
"शहाजीचा मुलगा शिवाजी याने मावळे गोळा करून मोगलांचा काटा काढला आणि हिंदूंचे राज्य स्थापले" एवढ्या एका वाक्यात दामले मास्तरांनी सगळा मराठ्यांचा इतिहास गुंडाळून टाकला होता म्हणतात. 'गाजराचा हलवा' या (उगाचंच) लाडावलेल्या पदार्थाची त्याच चालीवर सांगितलेली पा.कृ. पाहून मजा वाटली.
गाजर हलव्या मधे आक्रोड (शक्य
गाजर हलव्या मधे आक्रोड (शक्य तितके बारीक तुकडे केलेले) आणि थोडे (लहान आणि पिवळसर रंग असलेले) बेदाणे छान लागतात.
दुध आटवतानाच (खवा करण्यासाठी) त्यात किसलेली गाजरे घातली तर हलव्याची चव वेगळीच लागते. अर्थात अशाप्रकारे हलवा करायला वेळही खूप लागतो. अगदी पटकन नाही करता येत.
तुमची झटपट पाकृ छान आहे.
चार मिरच्यांचा ठेचा वर्षभर पुरतो?
पूर्ण वर्षभर टिकतो का? कि टिकविण्यासाठी अजून काही वापरता?
ट्टाॅक्क
.