Skip to main content

जेव्हा अदम्य ऐसी

जेव्हा अदम्य ऐसी
निद्रा कवेत घेते
आकाशभाषितांना
ध्वनिचित्ररूप येते

अंधार भिनत जाता
भवताल स्तब्ध होते
संवेदनांस अवघ्या
व्यापून शून्य उरते

दिग्बंध सैल होती
तर्कास काम नुरते
कालौघ थांबतो अन्
आभास सत्य होते

अज्ञातशा स्वरांचा
अनुनाद ऐकू येतो
एकेक जाणिवेचा
अस्पष्ट बिंदू होतो

निद्रा अशी कृृृृपाळू
अंकी तिच्या मी क्लांत
मी शून्य एरवी, पण
निद्रेत मी अनंत

'न'वी बाजू Sun, 23/01/2022 - 03:04

‘ऐसी’ अदम्य आहे - चेक. बरोबर आहे. आहे खरे अदम्य.

मात्र, ‘ऐसी’ साक्षात निद्रादेवीबरोबर (तिला कवेत घेऊन वगैरे) झोपते, ही संकल्पना जितकी रम्य, तितकीच थोर आहे.

(नाही म्हणजे, लहान मुले सहसा टेडी बेअरला कवेत घेऊन झोपतात. म्हणजे मग त्यांना चांगली झोप लागते. इथे डायरेक्ट निद्रादेवीला कवेत घेऊन झोपायचे, बोले तो… अंमळ स्ट्राँग डोस होतो, नाही?

याचा अर्थ, एक तर ‘ऐसी’चे निद्रानाशाचे दुखणे फारच बळकट असले पाहिजे; किंवा मग ‘ऐसी’ वयात आले, म्हणायचे.)

—————

(असो. जोक्स अपार्ट, कविता छान आहे. आवडली.)

तिरशिंगराव Mon, 24/01/2022 - 07:34

In reply to by 'न'वी बाजू

जेंव्हा अगम्य ऐसी
रसिकास संभ्रमिते
तेंव्हा नवीन बाजू
ही दृश्यमान होते|