Skip to main content

'झुंड' आणि काही आठवणी

मी पाहिला.

आज खरं तर पाहाण्यासारखी मनस्थिती नव्हती. तरी ॲालरेडी बुकिंग होतं म्हणून पाहिला. डॉक्युमेंटरीसारखा वाटला. बराच खेचलाय असंही वाटलं. आता संपेल, आता संपेल असं वाटतानाही सिनेमा चालूच राहातो आणि अगदी स्पाइसजेटची जाहिरात करायला विमानाच्या आतलं अनावश्यक शूटिंग चाललंय म्हणून वैतागही आला.

तरी, हा सिनेमा मला मनाच्या तळात हलवून गेला.

झुंड चित्रपटालं दृश्य

माझ्या बहिणीचं सासर नागपूरच्या अशा झोपडपट्टीतच आहे. लग्न ब्यूरोमधून ठरलं, मुलगा रीजनल कॉलेजातून बीटेक, मग आयआयटीत एमटेक करून पीएचडी करत होता. त्यामुळे घरातून एवढी सहज परवानगी नसूनही तिने लग्न केलं त्याच्याशी. अगदी त्या सिनेमात झोपडपट्टीत एकदोन चोरट्या माडीची घरं दिसतात तसं सासर आहे तिचं. लग्नानंतर प्रथमच अशी वस्ती तिने आणि आम्हीही पाहिली.

पण सगळी मुलं उच्चशिक्षित आहेत.

आता तिचा नवराही आधी सिंगापूर आणि आता कुठे युरोपात बॅंकिंगमध्ये आहे. तिचा दीर ॲास्ट्रेलियात पेडिॲट्रीशियन आहे.

त्यांनी परदेशी जाताना अगदी अशीच भावना व्यक्त केली होती, एक भिंत ओलांडल्याची.

आमचं लहानपणही गावातल्या एका टिपिकल पूर्वी महार पण आता नवबौद्ध झालेल्या वाडीत गेलंय. मात्र मोठी माणसं अगदी स्ट्रिक्ट होती. सिनेमात दाखवलंय तशी आंबेडकर जयंतीला दारू पिऊन/न पिता सैराट नाचणारी नव्हती. आंबेडकर जयंती/बुद्ध जयंती/धम्मचक्रपरिवर्तन दिनी स्ट्रिक्टली समाजाची गाणी/भीमगीतं/भक्तिगीतं स्पीकरवर असत. जयंतीला जिल्ह्याच्या ठिकाणी मेळावे असत आणि तेही प्रचंड शिस्तीत असत.

नंतर आमच्या मेडिकलच्या ॲडमिशनच्या वेळी मुंबईत एका लांबच्या काकांकडे जाऊन राहिले. काकांचं चेंबूरमध्ये वन बेडरूमचं का होईना, पण चांगलं घर होतं. मात्र मुख्य घर गोवंडीत. तिथे पहिल्यांदा झोपडपट्टीचा तो घाणेरडा वास, शहरी जातभाऊंची ती गलिच्छ स्थिती, स्वच्छ पण लहानशी घरं आणि त्या घराबाहेरचे प्रचंड घाणीचे डोंगर पाहिले.

एमबीबीएसला ॲडमिशन झाल्यानंतर सुरुवातीला घरची आठवण यायची. मला एकटं वाटू नये म्हणून माझ्या एका काकीचे भाऊ, जे आम्हालाही मामासारखेच जवळचे होते, ते केव्हातरी त्यांच्या घरी घेऊन जायचे. त्यांचं घर म्हणजे कुलाब्याच्या सफाई कामगारांच्या चाळी. ऐन साउथ बाॅम्बेत राहाणाऱ्या, सगळ्या मुंबईला स्वच्छ करणाऱ्या या लोकांच्या चाळी मात्र अत्यंत गलिच्छ होत्या.

एकेका दीड खणाच्या खोलीत चारपाच कुटुंबं. पिढ्यानपिढ्या घर सोडायचं नाही, म्हणून त्याच त्या कामाला चिकटत राहाणारी नवीन पिढी, चाळीच्या गेटमधून आत पाऊल टाकताच घाणीने भरलेलं ते मोठं पटांगण. घरात अडचण होते म्हणून नवीन लग्न झालेल्या जोडप्याला सोडून त्याच पटांगणात रात्री झोपणारे लोक पहिल्यांदा पाहिले.

बहुतेक तरुण मुलांचं बेंजो पार्टी काढायचं स्वप्न असायचं. प्रत्येक जण सकाळी उठल्यावर चाय आणि मस्कापाव खाऊन बेंजोची प्रॅक्टिस करायला जायचा.

मी गेल्यावर ‘आमची डॉक्टर होणारी भाची’ असं कौतुक करून मामालोक सगळ्यांना भेटायला बोलवायचे. बायका खास बघायला यायच्या.

या चाळीतल्या नातलगांतून मात्र कुणी ती भिंत ओलांडून पुढे आलं नाही.

माझ्यानंतर चेंबूरच्या त्या काकांना आपल्या मुलींना डॉक्टर करायची फार इच्छा होती. मात्र मुलींना पुरेसे मार्क्स मिळाले नाहीत. तरी अगदी जिद्दीने त्यांनी युक्रेनला ठेवून मुलीला डॉक्टर केलं. परत येऊन डीएनबी दिल्यावरच भारतात प्रॅक्टिस करता येते. मात्र घरात आणि नात्यात सतत हिच्यावर किती पैसे उधळायचे, अशी चर्चा चालू असायची. भारतात येऊन प्रॅक्टिस करायला परीक्षा द्यावीच लागते हे लोकांच्या लक्षातच यायचं नाही. ‘तिकडे फेल झाली, म्हणून आता घरात बसून इकडे परीक्षा देतेय, किती पैसा खाणार बापाचा कुणास ठाऊक!’ असं लोक बोलायचे. शेवटी एका सकाळी तिने फास लावून घेऊन जीव दिला.

आता तिचा भाऊ इंग्लंडात पायलट आहे. त्याने ही भिंत ओलांडली.

दुसरी एक अशीच बकाल वस्ती कामाठीपुऱ्याच्या अगदी जवळ. तीही बहुदा सफाई कामगारांची. तिच्यात एक लांबची बहीण राहायची.

माझ्या सख्ख्या बहिणीला प्रोजेक्टसाठी एकदा मुंबईत एकदोन दिवस राहायचं होतं. तेव्हा ती या बहिणीकडे राहिली. तशीच गलिच्छ वस्ती. समोरच कामाठीपुरा. एका खोलीत तीन बिऱ्हाडं.

एक जोडपं कॉटवर, एक कॉटच्या खाली आणि एक गॅलरीत.
या बहिणीने आणि तिच्या कुटुंबाने मात्र दोन दिवस कॉमन व्हरांड्यात झोपून माझ्या बहिणीची सोय केली होती.
या कुटुंबातल्या कोणीही ही भिंत ओलांडली नाही.

माझ्या सख्ख्या वहिनीचं घरही भोसरीत झोपडपट्टीतच.
तशीच आजूबाजूला चिखल असलेली वस्ती.
बारावीनंतर पार्टटाईम जॉब करत वहिनीने इंजीनियरींग पूर्ण केलं.
इतकी गरीब की पुण्याच्या एवढ्या जवळ राहूनही तिला नाटक पाहाणं म्हणजे काय माहीत नव्हतं.
लग्नानंतर आमच्याबरोबर पहिल्यांदा नाटक पाहिलं तिने, त्या वेळी खरीखरी माणसं रंगमंचावर असतात याचं तिला भारीच आश्चर्य वाटलं होतं.

तीच आता मोठ्या आयटी कंपन्यांत जॉब करते. कामासाठी कधी इंग्लंडात, कधी जर्मनीत, चारपाच महिने एकटी राहाते.
तीसुद्धा पहिल्यांदा परदेशी गेली तेव्हा तिला ही भिंत ओलांडल्याची फीलिंग आली होती.

आमच्या लहानपणी घरी पिण्याच्या पाण्याची बोंब असायची. माझ्या शहरातल्या मैत्रिणी मार्चपासून परीक्षेच्या तयारीला लागायच्या तेव्हा मी आणि माझी बहीण शाळेतून घरी गेल्यावर डोंगर उतरून डोक्यावर हंडा आणि काखेत एक कळशी घेऊन पाणी भरायचो. ती विहीर आटली की गुरवांच्या विहिरीवरून त्यांच्या शेतात पाणी जायचं त्या पंपाचं पाणी घेऊन यायचो. त्यांच्याकडे एक पाणी प्यायची विहीर होती, तिच्यातलं पाणी न्यायची त्यांनी परवानगीही दिली होती. पण त्याच विहिरीवरून सुतार समाजाच्या बायकाही उन्हाळ्यात पाणी न्यायच्या. त्यातल्या एकीने मला ‘कशाला गं ही विहीरपण विटाळता?’ असं सर्वांसमक्ष ओरडून माझी बारावीची परीक्षेच्या वेळीच प्रचंड मानसिक उलथापालथ केली होती.
चिडचीड झालेली.

शेवटी मी आणि बहीण डोंगराच्या कपारीत, स्मशानाच्या बाजूला असलेल्या डुऱ्यावरून त्याच्या मरतुकड्या धारेने खड्ड्यात पडणारे पाणी वाटीवाटी जमवून भरायला सुरुवात केली.

आठवड्याचे कपडे बांबूच्या हाऱ्यात भरून लांब नदीवर दर रविवारी धुवायला न्यायचो. आम्ही सगळे घरातले मिळून, आईबाबा मुलं, कपडे धुवायचो दोनतीन टोपल्या.

तेव्हा मजा यायची म्हणा. पण तेव्हा माझ्या मैत्रिणी कुठे हॉबी क्लास कर, कुठे टीव्हीवरचे कार्टून्स बघ असं करत असायच्या.

काही वर्षांपूर्वी परदेशात मुबलक पाण्यात वॉटर राईड्स केल्या तेव्हा बहीण म्हणाली, ‘ताई, कधी वाटलं होतं, आपण विमानातून इतक्या लांब केवळ फिरायला म्हणून येऊ आणि इतक्या पाण्यात खेळू!’

तेव्हाही एक भिंतच ओलांडली होती.

मंजुळेचा सिनेमा मला सिनेमा म्हणून आवडला नाही. पण असं आतपर्यंत ढवळून गेला. मी किंवा माझ्या नातेवाईकांनी तोडलेल्या अशा सगळ्या भिंतींची आठवण करून गेला, काही दुर्दैवी नातेवाईक ती भिंत तोडू शकले नाहीत, त्यांचीही दुःखद आठवण करून देऊन गेला.

Node read time
4 minutes

ललित लेखनाचा प्रकार

4 minutes

म्रिन Mon, 07/03/2022 - 21:49

हे कधीच थेट अनुभवलेलं नाही. दुरून पाहिलेल्या आहेत या वस्त्या पूर्वी. पण वाचून अंगावर काटा आला आणि फार अस्वस्थ वाटायला लागलं.

अस्वल Tue, 08/03/2022 - 00:08

उत्तम लेख (काही भाग वाचून खरंच वाईट वाटलं)
आपल्याला काहीच माहीत नसतं आणि तरीही आपण किती सहज लोकांवर काहीही ताशेरे ओढतो?
मला वाटतं जी.एंनी कुठेतरी उधृत केलंय - "never judge people but try to understand where they are coming from"
हे किती खरं आहे?

'न'वी बाजू Tue, 08/03/2022 - 09:39

In reply to by अस्वल

("झुंड" पाहिलेला नाही, पाहण्याची शक्यताही - for reasons unrelated to the movie itself - बरीच कमी आहे, त्यामुळे, त्या चित्रपटाच्या संदर्भात as such या लेखाची लिंक माझ्या डोक्यात लागणे अशक्य आहे. परंतु, एक स्वतंत्र लेख या नात्याने अत्यंत चांगला लेख.)

आपल्याला काहीच माहीत नसतं आणि तरीही आपण किती सहज लोकांवर काहीही ताशेरे ओढतो?

"never judge people but try to understand where they are coming from"

अगदी!

साती Tue, 08/03/2022 - 00:17

हे इथं आणल्याबद्दल धन्यवाद अदिती.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/03/2022 - 07:42

In reply to by साती

साती, हे मी फेसबुकवर वाचलं आणि काय म्हणावं समजलं नाही. अजूनही नाही.

वर अस्वल म्हणतो तसं मी एकेकाळी लोकांना काय-काय नावं ठेवली आहेत. आता मी त्या लहान मुलीला माफ केलं आहे.

जर-तरला काही अर्थ नसतो. पण तरीही राहूनराहून मनात विचार येत राहतो. मी शहरात, शिकलेल्या, ब्राह्मणांच्या घरात जन्माला आले तेव्हा आता आहे तिथे पोहोचले. नाही तर मला ती भिंत ओलांडता आली असती का? या विचारानं तरी मीपणा गळेल का! माझ्यासाठी, व्यक्तिगत पातळीवर म्हणून मला हे महत्त्वाचं वाटलं. बाकी समानतेचं सामाजिक मूल्य वगैरे आपल्या समाजात मोठ्यानं म्हणायची गरज आहे, पण सोय फार आहे असं फेसबुकवरच्या बाकीच्या लाथाळ्या बघून वाटत नाही.

'न'वी बाजू Tue, 08/03/2022 - 09:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी शहरात, शिकलेल्या, ब्राह्मणांच्या घरात जन्माला आले तेव्हा आता आहे तिथे पोहोचले. नाही तर मला ती भिंत ओलांडता आली असती का?

एक कुतूहल: तुम्ही नक्की कोठली भिंत ओलांडलीत, असा तुमचा दावा आहे?

(नाही, Don't take it personally. तुमच्या achievementबद्दल (जी काही असेल ती) मला काहीही म्हणायचे नाही. ती थोर असेलही कदाचित (तुम्ही नक्की कशाचा उलेख करता आहात, याची यत्किंचितही कल्पना नसल्याकारणाने, ती थोर आहे की नाही, हे ठरविण्याचा कोणताही मार्ग मजजवळ नाही, परंतु, बहुधा थोर असावीच.); परंतु... ती achievement जर तुम्ही तुमच्या privilegeमुळे करू शकलात (किंवा, त्या achievementमध्ये तुमच्या privilegeचा फार मोठा हातभार होता) असा जर तुमचा दावा असेल (आणि, त्या दाव्यात तथ्य नसण्याचे काहीच कारण मला दिसत नाही.), तर... तर मग, 'तुम्ही भिंत ओलांडलीत', या दाव्याला कितपत अर्थ आहे?

'भिंत ओलांडणे' यात मुळात 'भिंतीच्या एका बाजूहून दुसऱ्या बाजूकडे जाणे' - मग ते भले भिंत चढून असो, भिंत फोडून असो, भिंतीखालून भुयार खोदून असो, वा लांबच्या वळणाने भिंतीस circumvent करून असो - आणि ते उल्लेखनीय ठरण्यासाठी ती भिंत आणि तिच्या उल्लंघनाचे संभाव्य मार्ग दुस्तर असणे (ती भिंत हा मार्गातला अत्यंत दुर्गम अडथळा असणे), एवढे किमान अभिप्रेत नाही काय? भिंतीच्या एकाच बाजूस राहून पुढे जाणे - अगदी खूप पुढे जाणेसुद्धा - हे, कितीही creditable असले, तरी, 'भिंत ओलांडणे' कसे काय होऊ शकते?

(थोडक्यात, achievement आणि breaking a barrier यांच्यात गल्लत होते आहे काय?)

पाहा विचार करून.)

- (भिंत चालविलेला, परंतु कोठलीही भिंत कधीही न ओलांडलेला) 'न'वी बाजू.

----------

सातीच्या लेखातील उदाहरणे मात्र मी नि:शंकपणे भिंत ओलांडण्याचे दाखले म्हणून घेऊ शकेन.

|
|

वर अस्वल म्हणतो तसं मी एकेकाळी लोकांना काय-काय नावं ठेवली आहेत. आता मी त्या लहान मुलीला माफ केलं आहे.

हे चांगले आहे. :D म्हणजे, self-confession अधिक self-absolution... कॅथलिकांच्या वरताण प्रकार आहे हा! QED - Quite Easily Done.

- (स्वत:ला नेहमीच माफ करणारा) 'न'वी बाजू.

('लहान मुलगी', म्हणे!)

'न'वी बाजू Tue, 08/03/2022 - 03:36

तरी अगदी जिद्दीने त्यांनी युक्रेनला ठेवून मुलीला डॉक्टर केलं. परत येऊन डीएनबी दिल्यावरच भारतात प्रॅक्टिस करता येते. मात्र घरात आणि नात्यात सतत हिच्यावर किती पैसे उधळायचे, अशी चर्चा चालू असायची. भारतात येऊन प्रॅक्टिस करायला परीक्षा द्यावीच लागते हे लोकांच्या लक्षातच यायचं नाही. ‘तिकडे फेल झाली, म्हणून आता घरात बसून इकडे परीक्षा देतेय, किती पैसा खाणार बापाचा कुणास ठाऊक!’ असं लोक बोलायचे. शेवटी एका सकाळी तिने फास लावून घेऊन जीव दिला.

अत्यंत दुर्दैवी, संतापजनक!

आपल्या समाजात, , घेणे नाही, देणे नाही, माहिती नाही, तरी तिऱ्हाइतावर (विशेषेकरून आपल्याच गणगोतातल्या तिऱ्हाइतावर) वाटेल तसे ताशेरे (खास करून पाठीमागून, परंतु ऐकू येईल अशा बेताने) ओढण्याची वृत्ती जरा जास्तच आहे. याला धत्तुऱ्यावर बसवून दुर्लक्ष करायला शिकावे लागते, अन्यथा (काहीही दोष नसताना) आपल्यालाच त्रास होतो. दुर्दैवाने, प्रत्येकालाच ते जमते, असे नाही, नि मग परिणामी अशी उदाहरणे दिसतात.

दुसऱ्याची रेघ पुसल्याने आपली रेघ मोठी होत नाही. (किंवा, आपली नसलेली रेघ काढलीही जात नाही.) तरीही, (दुसऱ्याची रेघ) पुसणारे असतातच, नि पुसतातच. (Basic human jealousy!) किंवा, निव्वळ बोलायचे म्हणून बोलणारे असतात. (नि दोन्हीं तोंडांनी बोलतात.) असे नमुने जेव्हा गोतावळ्यात, जवळच्याच समाजात सापडतात (नि सामान्यत: सापडतातच!), तेव्हा, त्यांना टाळणे नेहमीच शक्य होत नाही, त्यामुळे, त्याचा जास्तच त्रास होतो, नि, आपण त्यांना कोणत्याही प्रकारे स्पष्टीकरण देणे लागत नसलो, तरी, आपल्याच मनात उगाच गंड निर्माण होतो. (Close-knit विस्तृत परिवारांत, समाजांत हे बहुधा अधिक प्रमाणात होत असावे.) यातून टिकण्यासाठी अत्यंत कोडगे असावे लागते, किंवा अत्यंत कोडगे बनावे लागते, नि स्वत:शी ठाम राहावे लागते. दुर्दैवाने, हे ज्ञान उपजत नसते. आणि, 'समाजाची भीड' नावाचा प्रकार (मानत असल्यास) जीवघेणा ठरू शकतो.

असो. आणखी काय बोलायचे याच्यावर!

----------

याचा अर्थ हवा तसा लावून घ्यावा; यामागील तथ्यात त्याने विशेष फरक पडू नये. तरीसुद्धा, perhaps (the lack of) it is more or less universal, but, minding one's own business is not a particularly Indian trait.

'झुंड'मध्ये म्हणा, पाहिजे तर. फारसा फरक नाही.

येसबंद Tue, 08/03/2022 - 09:35

सिनेमा आवडू शकतो, नावडू शकतो. पण तो डॉक्युमेंटरी सारखा वाटणे हा नवीन प्रकार दिसतो. फॅण्ड्रीबाबत अशी प्रतिक्रिया आली असती तर ते समज्ण्यासारखे होते. हा सिनेमा नवीन भाषा सांगतोय. अनुराग कश्यप सुद्धा म्हणाला कि जे शिकलो ते कमी आहे. पुन्हा पहिल्या वर्गात जाऊन नव्याने सिनेमा शिकण्याची गरज आहे. हा सिनेमा प्रस्थापित सौंदर्यशास्त्राच्या व्याख्यांना छेद देतो. प्रस्थापित मांडणीला छेद देतो. कदाचित आकलन कमी पडत असेल. किंवा मी अशा अशा समाजातून येते पण मी फार भावुक नाही हे दाखवण्याचा हातचा राखून प्रयत्न करत सुरूवात करायची असेल. पण सुरूवातीलाच मिठाचा खडा लागयासारखे झाले.

'न'वी बाजू Tue, 08/03/2022 - 18:49

कोपरापासून धन्यवाद? ;-)

Rajesh188 Tue, 08/03/2022 - 13:52

झोपपट्टीतील लोक ही सार्वजनिक जागेत अतिक्रमण करणारी लोक असतात.
हे ठीक समजू..पण ही लोक कचरा स्वतः पसरवतात.
घरातील कचरा कचरा कुंडीत न टाकता फक्त घरा बाहेर फेकतात .
हे सत्य आहे
अनधिकृत असून पण सरकार वीज ,पाणी पुरवठा करते
पण त्याची ह्यांना किंमत नसते
नळ असेच चालू असतात पाणी असेच वाहत असतें
आम्ही ठरवून पैज लावायची की.
ह्या buliding खाली खूप कचरा असणार.
खिडकीतून सरळ खाली टाकलेला.
आणि ते सत्य च निघायचे.
लेखात bdd chali च उल्लेख आहे .
तेथील रहिवासी घरातील कचरा सरळ खिडकी मधून खाली टाकतात
त्या मुळे त्याला जबाबदार तेच नागरिक आहेतं

साती Tue, 08/03/2022 - 18:28

In reply to by Rajesh188

अतिक्रमणाचा मुद्दा बरोबर.
पण सिनेमाचा किंवा लिहिण्याचा विषय तो नाहीये.
पूर्वी “भाडे केलहुलडोजर पे बैठे किराये के टट्टू” ची जाहिरात बघताना किंवा झोपडपट्टी उठवायला विरोध करणारे मिथुनपट पहातानाही हे अतिक्रमण असताना असे ग्लोरिफिकेशन कसे करू शकतात असाच विचार मनात यायचा.
नंतर या सगळ्यामागच्या सामाजिक कारणांची, श्रीमंत वस्ती आजुबाजूला कशी झोपडपट्टी वाढवते याच्या समाजशास्त्रीय कारणांची माहिती झाली. पण अतिक्रमण ते अतिक्रमणच.
मी उल्लेख केलेली गोवंडी झोपटपट्टी एक डंपिंग ग्राऊंडवरचं अतिक्रमण आहे. तिथे कचरा असणं साहजिक आहे.
आमच्या एका नातेवाईकांच्या कार्याला आम्ही तिथेच पुढे एका झोपडपट्टीत गेलो होतो, ती झोपडी चक्क एका पाईपलाईनवर अतिक्रमण आहे.
नेमका तो पाईप त्या दिवशी फुटला, सगळ्या पंगतीच्या जेवणात पाणी गेलं.
बिडीडी चाळीतल्या घाणीबद्दलही सहमत.
जे लोक मुंबईची घाण स्वच्छ करतात त्यांना स्वतःच्या बिल्डींगचे आवार स्वच्छ ठेवावे असं का वाटत नसेल हा प्रश्नच आहे.
मी लिहिलेली परिस्थिती १९९६-९७ ची आहे. आता ते कसे रहातात माहित नाही.
माझे मामाही रिटायर होऊन गावी आले रहायला.
जे कुटुंबातले सदस्य तिथे रहातात(ते ही मामाच, त्यांच्याशी फार संबंध नाही)
पण आवार स्वच्छ ठेवायचे असते ही कन्सेप्टच त्यांना माहित नाही.
माझीच गंमत सांगते, गावी आमच्याकडे पूर्वी जमीन असे, ती आठपंधरा दिवसांनी सारवत असू. नंतर साध्यातली फरशी घातली. पण हॅास्टेलला रहायला जाईपर्यॅत या फरशीला डेली पोछा करायचा असतो, हे मला माहित नव्हतं. आम्ही आठपंधरा दिवसांनी एकदा धुवून काढायचो फरशी. झाडू दिवसातून दोनदा मारायचो मात्र.
झाडू पुढे पोछा असतो आणि तो डेली करतात हेच मला वयाच्या कितव्यातरी वर्षांपर्यंत माहित नव्हतं.
बाकी कचरा गोळा करणाऱ्या गाड्या रेग्युलर सुरू होईपर्यॅत अगदी मध्येमवर्गीय बिल्डींग्जमध्येही/पांढरपेशांच्या चाळीतही कचरा गॅलरीतून खाली टाकायचा किॅवा बाजूच्या रिकाम्या प्लॅाटमध्ये टाकायचा किंवा सार्वजनिक कचराकुंडीत न टाकता तिच्या भोवती टाकायचा हे प्रकार चालत असत.
अजूनही चालतात.

सिनेमाचा विषय, ही त्यांनीच ओढवून घेतलेली परिस्थिती आहे की लादलेली हा नसून या परिस्थितीतूनही ते बाहेर कसे येतात हा आहे.
माझ्या फेबुपोस्टचा विषय माझ्या माहितीतले काही लोक या परिस्थितीतून बाहेर येऊ शकले की शकले नाहीत यांच्या आठवणी जागवणे हा आहे.

'न'वी बाजू Tue, 08/03/2022 - 19:03

In reply to by Rajesh188

लेखात bdd chali च उल्लेख आहे .
तेथील रहिवासी घरातील कचरा सरळ खिडकी मधून खाली टाकतात
त्या मुळे त्याला जबाबदार तेच नागरिक आहेतं

सर्वप्रथम, बीडीडी चाळींचा उल्लेख लेखात मला तरी कोठे आढळला नाही. शिवाय, बीडीडी चाळी ही सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून बांधलेली अनधिकृत बांधकामे असण्याबद्दल साशंक आहे.

परंतु, ते असो. हे तुलनेने दुय्यम मुद्दे आहेत.

गिरगावात जगन्नाथाच्या चाळीत (पांढरपेशांच्या वस्तीत!) राहणारी माझी (ब्राह्मण!) आजीसुद्धा अनेकदा घरातला कचरा, केसाचे गुंते, मेलेले उंदीर, नि काय नि काय, ग्यालरीतून थेट खाली चाळीसमोरच्या पटांगणात फेकून देत असे. (तरी बरे, चाळीशेजारीच कचराकुंडी होती!) घर स्वच्छ असल्याशी मतलब, आजूबाजूच्या परिसराचे काय वाटेल ते का होईना! मुंबईत चाळीत होती, तोवर ठीक होते; तेथे सगळेच तसलेच. (तसेही, Not in my backyard, ergo, not my headache.) परंतु पुढे पुण्यास आमच्याकडे आमच्या (तत्कालीन) फ्लॅटमध्ये येऊन राहायला लागल्यावरसुद्धा परिपाठ सोडला नाही, म्हटल्यावर, अडचण येऊ लागली. (हो, तळमजल्यावर राहणारे लोक बोंबलत यायचे!) झापून सवय मोडावी लागली.

(आणि वर पुढे कधीतरी, मी सपत्नीक पुण्याला गेलेलो असताना, माझ्या बायकोला आमच्या (अब्राह्मण) शेजाऱ्यांचे हळदीकुंकवाचे की कसले तरी सहज बोलावणे आले होते, त्यांच्याकडे ती जाऊन आल्यावर, तिला “त्यांचे घर स्वच्छ होते का ग?” म्हणून विचारलेन् होतेनीत्. The audacity!)

(पु.लं.च्या ‘बटाट्याच्या चाळी’तसुद्धा, “चाळीला घाणीचे वावडे नव्हते. मात्र, कोणाच्या घरातून कोणती घाण पडावी, याबद्दल तिचे काही निश्चित असे संकेत होते. अण्णा पावश्यांच्या घरातून जेव्हा अंड्याची टरफले बाहेर पडली, तेव्हा चाळ शहारली.” असे कायसेसे वर्णन तुम्ही वाचले असेलच. पुस्तक तूर्तास माझ्या हाताशी नाही, त्यामुळे, शब्द नेमके नाहीत, परंतु… You get the idea.)

असो. आमच्या आजीचे सोडा. ती बोलूनचालून हिंदू/भारतीय. तिच्या स्वच्छतेबद्दलच्या (पारंपरिक) कल्पना तितपतच. आमच्या अमेरिकेतसुद्धा, सत्तरच्या दशकापर्यंत वगैरे, मोटारीतला कचरा खिडकीतून बाहेर थेट हायवेवर फेकण्याचा प्रकार सर्रास चालत असे, असे ऐकून आहे. कडक कायदे (निदान हायवेवर तरी कचरा फेकल्यास हजार डॉलर दंड, वगैरे) करून आळा घालावा लागला. (आता प्रकार बराच आटोक्यात आहे.) परंतु अजूनही, आमच्या दक्षिण संयुक्त संस्थानांतील गौरवर्णीयांत (१) तंबाखू खाऊन जागच्या जागी पचाककन् थुंकणे, आणि (२) (खेळाच्या सार्वजनिक स्टेडियममध्ये वगैरे) शेंगदाणे खाऊन टरफलांचा जागच्या जागी कचरा करणे हे प्रकार सर्रास चालतात. (शेंगदाणे खाऊन फोलपटांचा कचरा करणे ही टिळकांच्या वर्गबंधूंचीच – जेसुद्धा बहुतांशी ब्राह्मण/उच्चवर्णीय तथा जरा बऱ्या आर्थिक परिस्थितीतले असावेत, अशी मला शंका आहे – खासियत होती, असे मानण्याचे काहीही कारण नाही.)

सांगण्याचा मतलब, घाण करणे ही कोणत्याही जातीची/धर्माची/वर्णाची/राष्ट्राची/आर्थिक वर्गाची मक्तेदारी नव्हे. ही एक सार्वत्रिक मानवी वृत्ती आहे.

बाकी चालू द्या.

साती Tue, 08/03/2022 - 18:08

धन्यवाद.
हा लेख मूळात ऐसीसाठी लिहिलेला नाही. किंवा माझं असं असं आहे हो, हे सांगण्यासाछीही लिहिलेला नाही.
माझ्या फेसबुक वॅालवर लिहिला होता, तो अदितीने इथे आणलाय.
फेसबुकवर मला सगळेच ओळखतात. मी कुठल्या समाजातून आले, सध्या काय करते, दररोज काय करते हे ही फेबुवर अधुनमधून लिहित असते. ऐसीवर आणि फेबुवर असणाऱ्या मित्रमैत्रीणी नेहमीच ते वाचत असतात. दहाबारा वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. त्यामुळे हे केवळ स्फुट आहे.
सिनेमा पाहिला , मला काय वाटलं इतकंच आहे त्या लेखात.
कुठलाही अभिनिवेश नाही. कधी मी अमक्या हॅाटेलात खाल्लं , मग मला कशी आईने केलेली तीच डिश आठवली असं काही घरगुती लिहावं तशी ही घरगुती पोस्ट होती. मलाही इतकी शेअर वगैरे झाली, इतके लाईक वगैरे मिळाले याचं आश्चर्यच वाटलं. मी किती भावुक आहे, म्हणजे खरंतर नाही हे इथे बहुतेकांना माहितच आहे.
जितक्या हाईपने सिनेमा पहायला गेलो होतो, त्या प्रकारात आम्हाला आवडला नाही. मुलं तर चल चल , कधी संपणार असं करून वैतागत होती.
सैराट पाहिल्यावर डोक्यातून दोन तीन दिवस सैराट गेला नव्हता तसं झालं नाही.
बाकी सिनेमाचं परीक्षण करणं, सिनेमाची भाषा ओळखणं वगैरे माझ्या आकलनाच्या कक्षेत येत नाही. सिनेमा आवडतो, किंवा नावडतो किंवा बरा वाटतो एवढंच सामान्य प्रेक्षक म्हणून सांगू शकते.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 08/03/2022 - 23:04

In reply to by साती

साती, तू हे 'हे असं होतं, आणि हे असं आहे' अशा तटस्थतेनं लिहिल्यामुळेच मला लेख आणखी आवडला. तुझ्या बोलण्यात कधीही व्हिक्टिम काँप्लेक्स नसतो, कारण तुला मुळातच तो नसावा. तो गंड घेऊन लिहिणारे लोक इथेही दिसतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं पण त्यांच्या गंडातून आलेल्या बोलण्याकडे नाही, असं मी माझ्यापुरतं ठरवलेलं आहे. तुझे प्रतिसादही तसेच आहेत.

हे मुद्दाम लिहिण्याचं कारण, मीच तो लेख इथे आणलाय. मला तुझ्या लेखनातला हा भाग जवळचा वाटतो.

Rajesh188 Tue, 08/03/2022 - 20:34

हे मात्र 100% खरे आहे.
रेल्वे नी प्रवास करताना अनुभवलेली दृश्य.
कॉलेज ची मुल मुली पण सार्वजनिक स्वच्छतेच नियम पाळत नाहीत.
चप्पल, बुट घातलेले पाय सरळ समोर च्या सीट वर ठेवतात.
चिप्स किंवा बाकी खाण्याच्या पदार्थाचे वेष्टन सरळ ट्रेन मध्येच फेकून देतात
हे काही मला सहन होत नाही म्हणून अनेकदा मी वादविवाद पण केले आहेतं.
पण सॉरी चूक झाली असे काही कोणी बोलत नाही.

दुसरी घटना
माझे ऑफिस मलबार हील ल होते तेव्हा चालत चर्नी रोड वरून jsycho.
मला नेहमी एक मुलगी कुत्रा फिरवताना दिसायची.
कपड्या वरून उच्च आर्थिक वर्गातील च असावी.
पण कुत्र्याने रस्त्यावर संडास केली तर ती लगेच ती gloves घालून उचलायची.आणि स्वतः जवळ असलेल्या प्लास्टिक पिशवीत ती शी भरून कचऱ्याच्या डब्यात च टाकायची.
खूप कौतुक वाटायचे त्या मुली चे .
अशी अनेक उदाहरणे आहेत.
त्या वरून तरी हेच मत आहे
सार्वजनिक स्वच्छता राखणे ह्याची जाणीव .लिंग विरहित,शिक्षण विरहित,आर्थिक स्थिती विरहित असते

Rajesh188 Wed, 09/03/2022 - 13:03

नागराज हे समाजातील विविध प्रश्न सिनेमाच्या माध्यमातून समाजा पुढे मांडतात.
मग तो सैराट असू किंवा फॅन्ड्री किंवा बाकी त्यांचे बाकी सिनेमे.
असे सिनेमे हे reality शी जवळ जाणारे अस्तात
त्या मध्ये चकाचक पना नसतो
सुंदर नखरेल हेरॉईन नसते.
आलिशान जीवन पद्धती नसते
सत्य जे काळजाला टोचते तेच त्यांच्या सिनेमात असते.
आणि असे सिनेमा काढून रिस्क घेणे ही खूप
मोठी कामगिरी असतें
गरीब असू किंवा अती गरीब ह्यांना स्वप्नात राहण्याची सवय असते.
ऐश आराम हे त्यांचे स्वप्न असते.
त्या मुळे ते असे सिनेमे बघत नाहीत
खऱ्या आयुष्यात पण गरिबी आणि सिनेमा पण गरिबी च
माझे ह्या विषयी एक मत आहे
.
लता मुकेश, रफी ह्यांची गाणी रात्री निवांत वातावरणात. स्वतःच्या खोलीत शांत पने ऐकण्यात जी मज्जा आहे जो आनंद आहे तो बाकी ठिकाणी किंवा बाकी वेळी नाहीं
त्या प्रमाणे नागराज ह्यांचे सिनेमे थिएटर पेक्षा टीवी वर निवांत वेळी बघण्यात च खरी मज्जा आहे

सई केसकर Sun, 13/03/2022 - 07:24

काल बघितला. दुसऱ्या भागात जरा कंटाळा आला. पण तरीही खूप आवडला. सुरुवातीच्या १०-१५ मिनिटात येणाऱ्या काही फ्रेम्स सुंदर आहेत. मध्येच चित्रपट डॉक्युमेंट्रीसारखा होतो. तो प्रयोग मला आवडला.
चित्रपट बघताना या लेखाची अनेकदा आठवण आली.