Skip to main content

मी वसंतराव

Mi vasantrao
मी वसंतराव हा चित्रपट मी काल पाहिला. गाणी/ संगीत इत्यादी विषय माझे वैयक्तिक वीक पॉईंट्स असल्याने मी स्वतःच ठरवून बघायला गेलो .

माझी  पत्नी व  एक दाम्पत्य अशी तीन चांगल्या घरातील लोकं बरोबर असल्याने मी चित्रपट सुरु असताना अगदी काही म्हणजे काही बोललो नाही. 

नोकरी सोडल्यानंतर कट्यार काळजात घुसली सुरु होईपर्यंत वसंतरावांच्यावर इतकी अडचणीची  परिस्थिती होती हे या चित्रपटामुळे कळलं .त्या काळात  शास्त्रीय संगीत क्षेत्रातील पुण्यातील प्रस्थापित टोळीने त्यांना खूप त्रास दिला असं दाखवलय . कोण असतील  ही मंडळी ? यातील AIR पुणे मध्ये कोण होते ?

जाणकारांनी  इथे  याविषयी माहिती द्यावी . 

चित्रपटात संगीत  ठासून भरलेले असल्यामुळे भरपूर चांगली सांगीतिक करमणूक आहे. 
पण पण .. वसंतराव हा विषय असल्याने म्हणा किंवा राहुल देशपांडे असेच गात असावेत म्हणून म्हणा पण .. वरवरच्या उथळ ताना  आणि क्वचित अगदी बेसूर नाही तरी  कणसूर   फार आहे राहुल बुवांच्या  गाण्यात.
( मित्रवर्य असूनही महेश काळे यांना यात घेतले नाही यामुळे राहुलबुवा अभिनंदनास पात्र ठरतात  )

त्याच्या तुलनेत रशीद खान,आनंद भाटे (आणि एका छोट्या लावणी पुरती अगदी उर्मिला   धनगर  )आणि काही इतर गायक अगदी उजवे गायन केल्याने  उठून दिसतात.त्यांचे गायन ऐकायला तरी चित्रपट बघावा नक्की . 

राहुल देशपांडे यांचा चेहरा फारसा फोटोजेनिक नाही हा त्यांचा दोष नाही. नाटकात खपून जाते. 
परंतु असे दिसणाऱ्या माणसाने जिथे फार क्लोजअप घेतले जाऊ शकतात अशा माध्यमात केवळ नातू एवढ्या क्वालिफिकेशन वर काम करावे का ? (गावे इथपर्यंत कदाचित ठीक)
दिसायलाही तो फारसा वसंत रावांसारखा नाही.
तो पडद्यावर आला नसता तर बरे झाले असते असं वाटतं.

जब्बार पटेल यांचा कुठलाही पिक्चर असला की प्याकेज मधे रमेश मेढेकर, सुरेश बसाळे, नंदू पोळ आणि तो लागू (ते लागू नाहीत , तो लागू) असत

त्याप्रमाणे इथे धर्माधिकारी असल्यामुळे फास्टर वाघ, चिरपुटकर, सारंग साठे, राजवाडे ही नाटक कुंपणी भा डि पा गॅंग प्याकेज डील मधे आली आहे असं वाटतं.

अजून कीस पाडत नाही.

चित्रपटात पुल देशपांडे वसंतरावांना घेऊन एका बहुधा तमाशातील वृद्ध स्त्री कलाकाराकडे जातात असे दाखवले आहे ..
त्या कलाकार कोण आहेत (मूळ पण आणि मुख्य म्हणजे या सिनेमात कुणी काम केलंय ते ?)
त्या बाई बॉस आहेत. (she is riot ) 
खल्लास पाच मिनिटे काम आहे.
 
तसा बरा आहे चित्रपट. 
म्हणजे याहून खूप वाईट करता आला असता . 
तसा न केल्याबद्दल टीमचे अभिनंदन !!!चित्रपट  खुपच्च आवडलेल्या मंडळींनी राग मानू नये.
मूळचा सदाशिव पेठेत कधी वास्तव्यास असलेला पुणेकर जेव्हा ' बरा ' म्हणतो , त्याचा भावार्थ  चांगला असा घ्यावा 
 गाण्यात रस असलेल्यांनी जरूर बघावा.हा रिव्ह्यू पॉझिटिव्ह रिव्ह्यू समजावा.

समीक्षेचा विषय निवडा

लंपन Wed, 06/04/2022 - 19:50

एकदम सहमत.

खांसाहेबांचा रोल त्यांच्या जीवनातला गेम चेंजर होता हे ठिके. पण त्या पत्राशी तयार होणारी जवळीक वैगेरे काही दाखवले नाहीये, अचानकच त्या पात्रात त्यांची खूप भावनिक गुंतवणूक होती असे प्रेक्षकांवर टाकले आहे.

अस्वल Wed, 06/04/2022 - 20:14

रिव्ह्यू आवडला.

अजून कीस पाडत नाही.

पाडा, पाडा!
-------------------------------------------------
गाण्यात इंट्रेश्ट फारसा नसल्याने चित्रपट बघीनसं वाटत नाही

'न'वी बाजू Wed, 06/04/2022 - 20:42

In reply to by अस्वल

रिव्ह्यू आवडला.

अजून कीस पाडत नाही.

पाडा, पाडा!

+१.

-------------------------------------------------

गाण्यात इंट्रेश्ट फारसा नसल्याने चित्रपट बघीनसं वाटत नाही

गाण्यात इंट्रेश्ट नाहीच, असे म्हणवत नाही, परंतु, तितकाही (बोले तो, फाइट मारून पिच्चर पाहण्याइतका) नाही, त्यामुळे (संधी मिळाली असता) चित्रपट पाहिला असता वा नसता, ते सांगवत नाही. परंतु आता, (हे परीक्षण वाचल्यानंतर) परीक्षण validate करण्याकरिता का होईना, परंतु (संधी मिळाल्यास, अर्थात) चित्रपट पाहण्याची शक्यता (कणभर का होईना, परंतु) वाढली आहे.

असो चालायचेच.

==========

मूळचा सदाशिव पेठी पुणेकर जेव्हा ' बरा ' म्हणतो , त्याचा भावार्थ चांगला असा घ्यावा

Absolutely!

******************************

कोणीसे म्हटले आहे: "Tell a man there are 300 billion stars in the universe and he'll believe you. Tell him a bench has wet paint on it and he'll have to touch it to be sure."१अ

१अ नोंद: उद्धृतातील पुरुषप्रधान भाषा मूळ उद्धृताबरहुकूम.

सई केसकर Wed, 06/04/2022 - 21:29

पुण्यातल्या पेठी लोकांचा पेठाभिमान, रुपलीची कॉफी, वैशालीचा डोसा, श्रेयसची थाळी - सगळं ओरे आहे.

वि.सू
पेठाभिमानवाला टोमणा बापटाना नाही.

सई केसकर Wed, 06/04/2022 - 21:31

शोधून काढा.

'न'वी बाजू Wed, 06/04/2022 - 21:36

In reply to by सई केसकर

मराठी की इंग्रजी? (देवनागरी की रोमन? (स्पेलिंग?))

नेव्हर माइंड... क्लू लागला.

(बाकी, उपरोल्लेखित सर्वच कशाला, खुद्द पुणे ओव्हररेटेड आहे, म्हटलेत, तरीसुद्धा (एक भूतपूर्व पुणेकर या नात्याने) (निदान) मला (तरी) काहीही वाटणार नाही. (बोले तो, जग आमच्याविषयी काय म्हणते, याची पर्वा आम्ही पुणेकर कधीपासून करू लागलो?))

बाकी चालू द्या.

'न'वी बाजू Wed, 06/04/2022 - 22:29

In reply to by 'न'वी बाजू

(बोले तो, जग आमच्याविषयी काय म्हणते, याची पर्वा आम्ही पुणेकर कधीपासून करू लागलो?)

बाकी, आम्ही पुणेकर, आणि आम्ही अमेरिकन, यांच्यात हे एक भले मोठे समाईक लक्षण आहे, हे निरीक्षण या निमित्ताने येथे नोंदवू इच्छितो.

अमुक Wed, 06/04/2022 - 23:20

चित्रपटात पुल देशपांडे वसंतरावांना घेऊन एका बहुधा तमाशातील वृद्ध स्त्री कलाकाराकडे जातात असे दाखवले आहे ..
त्या कलाकार कोण आहेत (मूळ पण आणि मुख्य म्हणजे या सिनेमात कुणी काम केलंय ते ?)

...... तुम्ही म्हणत आहात त्या बाई 'पुनव रातीचा' गाण्यातल्या का?
असल्यास त्यांचं नाव शकुंतला नगरकर. त्यांच्या थोरवीविषयी थोडी अधिक माहिती इथे सापडेल. उमेश कुलकर्णींच्या 'हायवे : एक Selfie आरपार' चित्रपटातही त्या होत्या.
मी चित्रपट पाहिलेला नाही त्यामुळे त्यांनी कोणाची भूमिका केली आहे त्याबाबत कल्पना नाही. यूट्यूबफितीखाली एका व्यक्तीने सुलोचना चव्हाणांचा उल्लेख केला आहे. पण वसंतराव/ पुलंची ह्या प्रसंगातली दाखवलेली वयं पाहता ते शक्य वाटत नाही. सुलोचनाबाई प्रत्यक्षात त्या दोघांपेक्षा बारा-तेरा वर्षांनी लहान आहेत.

तिरशिंगराव Thu, 07/04/2022 - 06:59

प्रथमत: आधी मूळ वसंतराव देशपांडे यांच्या गायकीबद्दलच मला फार आपुलकी नाही. त्यांचं गाणं बुद्धीचं गाणं होतं, त्यांच्या प्रज्ञेने अनेकवेळा स्तिमित व्हायला झालं आहे. त्यांचा मारवा, ठुमऱ्या आणि सुगम संगीतातली अनेक गाणी खूपच आवडतात. पण तरीही, त्यांची सबंध मैफिल ऐकणं हे काही मला कधी जमलं नाही. याला कारण त्यांची गायकी. तो थरथरणारा आणि अनेक तानांमध्ये कणसूर वाटणारा सूर कधी पटला नाही. किराणा घराण्याच्या दिग्गज गायकांनी लावलेले ते स्वर्गीय सूर ऐकून जशी आमची ब्रह्मानंदी टाळी लागते तशी यांच्या मैफिलीत कधी लागली नाही. राहुल त्यांचीच गायकी गातो. असो, प्रत्येकाची आवडनिवड. तर गायकीबद्दलच फारशी आत्मीयता नसल्याने त्यांच्या वैय्यक्तिक जीवनासाठी काही मी हा चित्रपट बघेन असे वाटत नाही.
परीक्षण आवडले.

अमित.कुलकर्णी Thu, 07/04/2022 - 10:44

In reply to by तिरशिंगराव

मूळ लेख आणि वरच्या प्रतिसादात आलेल्या वसंतरावांच्या गायनाबद्दलच्या मताशी संपूर्ण सहमती.
फास्टर वाघ दीनानाथरावांच्या भूमिकेत अतिशय विचित्र/ विसंगत वाटले.
रिव्ह्यू आवडला, सिनेमा जसा असेल असे वाटले होते तसाच दिसतो आहे - म्हणून बघण्याची इच्छा नाही.
(याउलट, "कौन प्रवीण तांबे" ला प्रत्युत्तर म्हणून कोणी "मी प्रवीण तांबे" असा सिनेमा काढला तर तर तो नक्की बघू)

धर्मराजमुटके Thu, 07/04/2022 - 17:34

युटुब वर प्रोमोज पाहिले पण घेई छंद व्यतिरिक्त इतर गाण्यांचा मनाने छंद घेतला नाही.