Skip to main content

"तिच्याबरोबर, पुन्हा एकदा!"

तशी ती मूळचीच सुंदर, साठीला कातडीही नाजूक ,
पारदर्शक, केशसांभाराला पैशाचा रुबाब, एक सोन्याची
नाजूक बांगडी अतिनाजूक मनगटावर रुळणारी.
'अरे , कधी आलास ?' तिचे जुने लोभस हसू विचारते.
"अं , दहा मिनिटं .." मी म्हणतो. ("दहा वर्षांसारखी वाटली
मला!" हे माझ्याशीच!'. )

"भारतात कधी आलास? " ("का गेलो" हे विचार ग !).
"किती दिवस आहेस?" (तू परत भेटणार आहेस थोडीच?).
"मुलं काय म्हणतात? (एकच आहे गं , "मुलं " नाहीत मला...)
(इंग्रजीत स्मॉल टॉक म्हणतात याला. तो जमत नाही मला,
ती माझी इंटेन्सिटी पूर्वी क्यूट वाटायची तुला,
असो!). "अनिल कसा आहे? " विचारलं तर
चक्क सरळ उत्तर देशील त्याचं . राहू दे!

या सर्वापेक्षा वाईन प्यावी. "काय तुझी ती आवडती
वाईन मागवू? वेळ आहे ना तुला? "
"तशी आता पक्की संसारी ना रे मी! पण तू भेटलायस .
मागव, मागव. तुझं लिहिणं काय म्हणतंय हल्ली?"
(ही आता एक नवी कविता होईल!).

वाईनच्या सुवर्णकाळात "तिच्याकडे" रोखून पहाणे
हा अपराध ठरेल. वेट्रेसच्या पार्श्वभागाकडे टक
लावल्यास नॉर्मल पुरुष म्हणून माफी मिळेल.
"हो पुस्तक येऊ घातलंय ना माझं. म्हणजे तिकडे अमेरिकेत!".
"मस्त! काँग्रॅच्युलेशन्स!" (नको, शेक हॅन्ड नको! आधीच
वाईन चढतेय तिच्यायला!).

सर्व पुरुषजातीचे बंधुत्व सिद्ध करणारा मुतारीचा
चकचकीत वास. थोडे अडखळणे. परतीला
तिच्या "ठीक आहेस ना रे?' ला मंद हसत हात वर करणे!
तिच्या आवडीच्या पुलावाची शिते काट्याने चाळवणे .

तिच्या टॅक्सीला वर केलेला हात प्रयत्नपूर्वक खाली
घेतो. ती तुझ्या वर्गातली असली तरी तुझ्या "क्लासमधली " कधीच
नव्हती.
असाच सुखात आहेस हे लक्षात घे!
xxx

पर्स्पेक्टिव्ह Tue, 26/04/2022 - 22:27

वाइन... विमेन... क्लास...

आय मीन, क्लास आहे कविता. घोटाघोटाने रिचवली. भारी चढली आहे. ओल्ड वाइनसारखीच.

प्रभुदेसाई Wed, 27/04/2022 - 19:35

ती तुझ्या वर्गातली असली तरी तुझ्या "क्लासमधली " कधीच
नव्हती>>>
कविता/ ( किंवा जे काय आहे ते )आवडली/ आवडले हे पण सांगायला पाहिजे काय?