Skip to main content

मराठी ग्रंथव्यवहार आणि तंत्रनिरक्षरता


मराठी वर्णमाला

आंतरजालाची (इंटरनेट) सुरुवातीची वर्षं मराठीसाठी फारशी बरी नव्हती. मराठी मजकूर अगदी मोजक्या संकेतस्थळांवर (वेबसाईट) वाचायला मिळे. त्यासाठीही आधी फाँट डाउनलोड करावा लागे. (कारण प्रत्येक संकेतस्थळ आपापला फाँट वापरे आणि आपल्या संगणकावर तो इन्स्टॉल केल्याशिवाय मजकूर वाचता येत नसे.) साधारण २००३पासून मराठीसाठी युनिकोड फाँट आले आणि मराठी आंतरजालावर क्रांती झाली. युनिकोड केवळ मराठीच नव्हे, तर जगभरातल्या भाषांच्या डिजिटल वापरासाठीचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं प्रमाण आहे. विशिष्ट फाँट इन्स्टॉल केला तरच मजकूर दिसेल वगैरे भानगडी इथे नाहीत, हा या प्रमाणीकरणाचा वाचकाला जाणवणारा प्रत्यक्ष फायदा आहे. ज्याप्रमाणे जगभरात कुणीही टाईप केलेला इंग्रजी मजकूर आपल्याला आंतरजालावर सहज वाचता येतो, त्याप्रमाणेच युनिकोड वापरून टाईप केलेला मराठी मजकूरही वाचता येतो.

मराठी युनिकोडमध्ये टाईप करण्याची सोय देणारी काही संकेतस्थळं ह्या काळात लोकप्रिय झाली. त्याच सुमाराला मायक्रोसॉफ्टनं आपल्या ‘विंडोज एक्सपी’ या प्रणालीत (आणि त्यानंतरच्या सर्व विंडोज आवृत्तींमध्ये) युनिकोडची सोय दिली. ॲपलनंही ही सोय दिली. त्यामुळे संगणकावर केवळ मराठीत नव्हे, तर विविध भारतीय भाषांत टंकणं शक्य झालं. ह्या सोयीमुळे आंतरजालाशी न जोडलेल्या संगणकावरही मराठीत टाइप करता येऊ लागलं. आता तर बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सवरही मराठीत टाईप करता येतं. ते वापरून व्हॉट्सॲप, फेसबुक, इमेल, अशा सगळ्या ठिकाणी मराठीत मजकूर लिहिता येतो, आणि मोबाईल, संगणक, टॅबलेट वगैरे विविध यंत्रं वापरून जगभरात कुणालाही तो वाचता येतो. मराठीत गूगल सर्चही करता येतो. भारत सरकारच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या संगणकीकरणाचा एक भाग म्हणून आता सरकारी संकेतस्थळंही मोठ्या प्रमाणावर युनिकोडमध्ये भारतीय भाषांत माहिती उपलब्ध करून देतात. हा सगळा गेल्या वीसेक वर्षांतला डिजिटल मराठीचा प्रवास आहे. पण ह्या सगळ्याचा मराठी ग्रंथव्यवहाराशी काय संबंध?

प्रकाशन व्यवसायात पूर्वीची छापखान्यातली खिळेजुळणी जाऊन संगणक आले. त्यानंतर डेस्कटॉप पब्लिशिंग (डीटीपी) हा शब्द रुळला. मराठीत सुरुवातीला युनिकोड नसल्यामुळे त्यासाठी वेगवेगळे फाँट्स वापरले जाऊ लागले. त्यामुळेच, जेव्हा वृत्तपत्रांनी छापील पेपरमधला मजकूर आंतरजालावर द्यायला सुरुवात केली तेव्हा तो वाचण्यासाठी फाँट डाउनलोड करावा लागे. डीटीपीसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी विकसित केलेली काही सॉफ्टवेअर वापरली जाऊ लागली. ज्याप्रमाणे मायक्रोसॉफ्टनं काळाची गरज ओळखून युनिकोड मजकुराची सुविधा दिली, त्याप्रमाणे डीटीपी सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्यांनीही ती दिली. आज हे सगळं खरं तर इतकं सोपं झालं आहे, की घरच्याघरी संपूर्ण पुस्तक टाईप करून, त्याची मांडणी करून ते स्वतःच प्रकाशित करणंदेखील विशेष कठीण नाही.

मात्र, गेल्या वीस वर्षांत काळ बदलला आहे हे मराठी प्रकाशन व्यवसायाला मान्य आहे का, असा प्रश्न उपस्थित व्हावा, असे काही अनुभव मला आले. मला आलेले व्यक्तिगत अनुभव सार्वत्रिक असतीलच असं नाही. किंबहुना, मराठी प्रकाशन व्यवसायानं कात टाकली असेल आणि माझे अनुभव आता प्रातिनिधिक नसून कालबाह्य झालेले आहेत अशी वस्तुस्थिती असेल, तर मला आनंदच होईल.

गेल्या वर्षीची गोष्ट : एका विख्यात प्रकाशनगृहातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या एका पुस्तकाची प्रुफं माझ्यापाशी काही कारणानं आली होती. ती वाचतावाचता माझ्या लक्षात आलं की सबंध पुस्तकात दुहेरी अवतरण चिन्हं (“ आणि ”) वापरण्याऐवजी दोन एकेरी अवतरण चिन्हं वापरण्यात आली आहेत (‘‘ आणि ’’). दुहेरी अवतरण चिन्हांपेक्षा अधिक जागा व्यापत असल्यामुळे ती वेगळी दिसत होती. ह्याविषयी विचारणा केल्यानंतर मला जे कळलं ते धक्कादायक होतं. त्या प्रकाशनाची सर्व पुस्तकं जो फाँट (युनिकोड नसलेला) वापरून छापली जात होती त्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्हच नव्हतं! त्यामुळे ते प्रकाशन नेहमीच (म्हणजे सर्वच पुस्तकांसाठी) दोन एकेरी अवतरण चिन्हं वापरत होतं. मला ती पुस्तकं दाखवली गेली. ते खरंच होतं. मराठी प्रकाशन व्यवसायात हा फाँट अतिशय लोकप्रिय आहे आणि अनेक प्रकाशनगृहांत तो वापरला जातो, असंही मला सांगण्यात आलं. त्यानंतर मला हा चाळाच लागला. ग्रंथालयांत, पुस्तक प्रदर्शनात, कुणाच्या घरात – कुठेही गेलो की समोर दिसेल ते मराठी पुस्तक उघडून मी त्यात दुहेरी अवतरण चिन्हं शोधायचो. निरीक्षणाअंती निष्कर्ष निघाला : कित्येक मराठी पुस्तकांमध्ये दुहेरी अवतरण चिन्हांऐवजी दोन एकेरी चिन्हंच वापरलेली असतात!

ह्याचा युनिकोडशी काय संबंध? तर, युनिकोड प्रमाण असल्यामुळे त्यात वेगवेगळ्या चिन्हांसाठी ठराविक कोड असतात, आणि जगातल्या यच्चयावत, म्हणजे सर्वच्या सर्व युनिकोड फाँट्सवर हे कोड पाळणं बंधनकारक असतं. त्यामुळेच नव्या फाँटची निर्मिती करताना तीन प्रकारच्या दुहेरी अवतरण चिन्हांसाठी तजवीज करावी लागते : १. " (युनिकोड : 0022) हे चिन्ह काही वेळा वाक्यांशाच्या दोन्ही बाजूंना वापरलं जातं; २. वाक्यांशाच्या सुरुवातीला वापरण्यासाठी “ (युनिकोड : 201C); आणि ३. शेवटी वापरण्यासाठी ” (युनिकोड : 201D). युनिकोड नसलेल्या फाँटमध्ये प्रमाणीकरण नाही, त्यामुळे हे बंधनकारक नाही. काही चिन्हांची तजवीज न करणारे अप्रमाणित फाँट अर्थातच तयार केले जाऊ शकतात, पण अनेक नवनवीन प्रमाणित फाँट उपलब्ध होत असतानाही मराठीतल्या प्रतिष्ठित प्रकाशनगृहांचं वर्षानुवर्षं तेच ते अपुरे फाँट वापरत राहणं आणि त्यासाठी अशा तडजोडी करत राहणं धक्कादायक वाटतं.

एखाद्या प्रकाशनगृहाला हवा तो फाँट वापरत राहायचं स्वातंत्र्य असायलाच हवं असा मुद्दा कुणी उपस्थित करू शकेल, आणि एका पातळीवर तो बरोबरच आहे. मात्र, प्रत्यक्षात ह्यामुळे काय अडचणी येऊ शकतात? अप्रमाणित फाँट निर्माण करणाऱ्या काही संस्था अधिकाधिक पैसे मिळवण्यासाठी वापरकर्त्यांवर अनेक बंधनं घालतात. उदाहरणार्थ, ज्यावर फाँट वापरायचा आहे, अशा प्रत्येक संगणकासाठी ते वेगळा परवाना देतात. त्याचे पैसे भरून त्या त्या संगणकावर तो फाँट कार्यरत करावा लागतो. इतर कोणत्याही संगणकावर तो वापरायचा झाला, तर त्याचे वेगळे पैसे भरावे लागतात. त्यामुळे असा फाँट वापरायचा झाला, तर अक्षरजुळणीचं काम विशिष्ट संगणकांवरच करता येतं. याउलट युनिकोड प्रमाण असल्याचा फायदा असा असतो की तुम्ही कोणत्याही संगणकावर (किंवा मोबाईलवर किंवा टॅबलेटवरही) कोणत्याही फाँटमध्ये मजकूर टाइप करू शकता, आणि प्रत्यक्ष छपाईपूर्वी सगळा मजकूर हव्या त्या फाँटमध्ये बदलून घेऊ शकता. अप्रमाणित फाँट निर्माण करणाऱ्या काही संस्थाही अशी फाँट बदलण्याची सुविधा देतात, मात्र प्रत्यक्षात मजकूर एका फाँटमधून दुसऱ्या फाँटमध्ये बदलला असता काही अक्षरं (उदा. जोडाक्षरं) भलतीच दिसू लागतात, आणि मग ते सगळं दुरुस्त करत बसावं लागतं.

शिवाय, अशा मर्यादांमुळे लोकांना एकत्र काम करण्यात अडचणी येऊ शकतात. युनिकोड वापरून एकत्र काम करणं सुलभ जातं. उदा. गूगल डॉक्स, किंवा तत्सम क्लाऊड सेवा वापरून जर मजकूर शेअर केला, तर जगभरात कुठेही बसलेले लोक एकाच मजकुरावर काम करू शकतात. अशा प्रणालींमध्ये संपादनासाठीही वेगळ्या सोयी असतात. गूगल डॉक्युमेंटमध्ये संपादक लेखकाला काही सुधारणा किंवा दुरुस्त्या सुचवू शकतात, प्रश्न विचारू शकतात; लेखक तिथल्या तिथे त्या दुरुस्त्या मंजूर किंवा नामंजूर करू शकतो, प्रश्नांना उत्तरं देऊ शकतो – त्या कामासाठी एका ऑफिसात तर नव्हेच, एका देशातही असण्याची गरज नाही. हे एकविसावं शतक आहे. जगभरात आता अशा पद्धतीनं काम केलं जातं. आणि हे सगळं विनामूल्य उपलब्ध आहे. तुम्ही हट्टानं अप्रमाणित प्रणाली वापरत राहिलात तर तुम्हाला अधिक स्वातंत्र्य मिळतं, की तुमच्यावर मर्यादा अधिक येतात?

ह्या अप्रमाणित फाँट्ससोबत त्यांचे विशिष्ट कळपाटही (कीबोर्ड) असतात. कोणती कळ (इंग्रजीतली ‘की’) दाबली तर कोणतं अक्षर/काना/मात्रा/चिन्ह उमटेल हे प्रत्येक कळपाटानुसार बदलतं. त्यामुळे हे कळपाट शिकून घ्यावे लागतात. याउलट, युनिकोडमध्ये टाईप करताना लोक आपल्या पसंतीचा कळपाट किंवा टंकनपद्धत वापरू शकतात. आताच्या काळात बरेच लोक गूगल/विंडोज फोनेटिक कळपाट वापरतात; इनस्क्रिप्टसारखे इतर पर्यायही आहेत. तुम्ही मराठीत बोलाल ते टाईप करण्याची सोयही (‘स्पीच टू टेक्स्ट’) आता गूगलनं संगणकावर आणि अँड्रॉइड फोनवर दिली आहे. तुम्हाला हातानं लिहिणं सोयीचं जात असेल तर ‘गूगल हँडरायटिंग इनपुट’ सुविधा वापरून हस्ताक्षरानुसार मजकूर टाईप होईल, अशीही सुविधा उपलब्ध आहे. शिवाय ‘ओसीआर’ तंत्र वापरून कागदावर छापलेलं स्कॅन करून तो मजकूर टाईप होईल, अशीही सोय उपलब्ध आहे. ह्यातली प्रत्येक सुविधा पूर्णतः निर्दोष आहे असं नाही, पण त्यात झपाट्यानं सुधारणा होत आहेत. आणि अर्थात, हे सगळं विनामूल्य उपलब्ध आहे. पण हे सगळं केवळ युनिकोडमध्ये होतं! कारण? ते प्रमाण आहे. पुन्हा एकदा, आपण एकविसाव्या शतकात आहोत!

जगभरातलं साहित्य आता इ-बुक्समार्फत उपलब्ध होतं आहे. मात्र, इथेही मराठी ग्रंथव्यवहार मागे पडतो. आज पुस्तकांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेलं ॲमेझॉन स्वतःहून इ-बुक प्रकाशनासाठी प्रोत्साहनार्थ सोयी देते. (त्यात त्यांचा स्वार्थ आहे, पण म्हणून त्यांची सुविधा टाकाऊ ठरत नाही.) ‘किंडल डायरेक्ट पब्लिशिंग’ या नावानं ही सोय पूर्णतः मोफत उपलब्ध आहे. ॲमेझॉनवर तुमचा राग असेल तर इतर विनामूल्य प्रणालीही उपलब्ध आहेत. तुमच्या पुस्तकाची वर्ड फाईल किंवा पीडीएफ तयार केलीत, तर अशा प्रणाली वापरून त्याचं इ-बुक तयार करणं अतिशय सोपं आहे. आणि इ-बुक म्हणजे पीडीएफ नव्हे; तर तुम्ही पुस्तक ज्या यंत्रावर, ज्या आकाराच्या पडद्यावर वाचत असता त्यानुसार, आणि तुमच्या सोयीच्या फाँटच्या आकारानुसार पानांवरचा मजकूर आपोआप कमी-जास्त करून तुम्हाला चांगला वाचनानुभव देणारं इ-पुस्तक. अर्थात, हे नीट करता येण्यासाठी मजकूर युनिकोडात असणं पुन्हा एकदा आवश्यक, कारण एकच, युनिकोड प्रमाण आहे.

बदलत्या तंत्रज्ञानानुसार अद्ययावत न झाल्यामुळे किंवा तंत्रज्ञानाची भीती बाळगल्यामुळे लोकांची कशी फसवणूक होते हेदेखील पाहायला मिळतं. साहित्य संमेलनाच्या काही महिने आधी एक जाहिरात दिसली होती. ‘मराठीत (म्हणजेच युनिकोडमध्ये) टाईप केलेला मजकूर द्या; त्याचं इ-बुक आगामी साहित्य संमेलनात विक्रीसाठी तयार करून मिळेल’ अशी ती जाहिरात होती. चौकशी केल्यावर असं कळलं की ह्या सोयीसाठी ३०-३५ रुपये प्रतिशब्द रक्कम आकारली जात होती! म्हणजे जी गोष्ट पूर्णतः फुकटात, घरच्या घरी करता येते, त्यासाठी एवढी रक्कम आकारली जात होती; थोडक्यात, मराठी लेखक-प्रकाशक तंत्रकुशल नाहीत, हे ओळखून त्याचा गैरफायदा उठवण्याचा हा प्रयत्न होता. त्याला यश कितपत मिळालं ह्याची कल्पना नाही, पण बाजारपेठेत अशी सेवा उपलब्ध असणं मराठी ग्रंथव्यवहाराची तंत्रनिरक्षरता दाखवून देतं.

सतत अद्ययावत होत राहणं हा डिजिटल तंत्रज्ञानाचा एक अपरिहार्य गुणधर्म असतो. अधिकाधिक क्षमतेची नवनवी यंत्रं बाजारपेठेत सतत दाखल होत असतात. विंडोज किंवा डीटीपीची सॉफ्टवेअर्सही सतत अद्ययावत होत राहतात. ग्राहकांना नव्या गोष्टींची भुरळ घालण्याचा भाग सोडला तरीही नवी यंत्रं अधिक जलद चालतात, सॉफ्टवेअरच्या नव्या आवृत्त्यांमध्ये पूर्वीच्या चुका दुरुस्त करून नव्या सोयी दिलेल्या असतात, हे मान्य करावंच लागेल. त्यामुळे काही वर्षांतच आधीची यंत्रणा आणि प्रणाली कालबाह्य होते. इथेही प्रकाशन व्यवसाय मागे पडलेला दिसतो. अनेकदा मोठमोठ्या व्यावसायिक संस्थांकडची यंत्रं कालबाह्य असतात. अख्ख्या पुस्तकाची त्यातल्या चित्रांसह मांडणी करण्यासाठी जेव्हा अशी यंत्रणा वापरली जाते, तेव्हा ती हळू चालते. त्यात वेळ जातो. अनेकदा विंडोज किंवा डीटीपी सॉफ्टवेअरची आवृत्तीही अनधिकृत (पायरेटेड) असते. ती अद्ययावत होत नाही. त्यामुळे नवनव्या सुविधा त्यात उपलब्ध होत नाहीत, किंवा जुन्या त्रुटींमुळे (‘बग’) अडचणी येतात. कार्यक्षमतेवर किंवा कामाच्या दर्जावर ह्यातल्या कशाचाही परिणाम होत नाही, असा दावा कुणी करत असेल तर ते स्वातंत्र्य त्यांना अर्थातच आहे!

अशा पुष्कळ गोष्टी सांगता येतील, पण मूळ मुद्दा साधा आहे : जग बदलतं आहे; वाचकांच्या नवनव्या पिढ्या जगात दाखल होत आहेत; मराठी वाचकवर्ग आता जगभर विखुरला आहे. जगभरातल्या इतर भाषांत प्रकाशन व्यवसायाला जे तंत्रज्ञान आणि ज्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत, त्याच मराठी प्रकाशन व्यवसायालाही उपलब्ध होऊ शकतात. जगभरातले मराठीभाषक इतर भाषांमधल्या पुस्तकांच्या बाबतीत ज्या गोष्टींची अपेक्षा ठेवतात, त्या मराठी ग्रंथव्यवहारातूनही त्यांना अपेक्षित नसतील का? त्या मिळाल्या तर मराठी ग्रंथव्यवहाराला त्याचा फायदा होणार नाही का? मराठी साहित्याला भवितव्य नाही, अशी रड नेहमी ऐकू येते, पण मराठी साहित्यव्यवहार पुरेसा भविष्याभिमुख आहे का, असा प्रश्नही अधूनमधून विचारला जायला हवा.

———
पूर्वप्रकाशन : सजग, अंक ५, जुलै-सप्टेंबर २०२२.

'न'वी बाजू Wed, 30/11/2022 - 09:39

सर्वप्रथम, अतिशय चांगला लेख. (काय दिवस आलेत, इ.इ.)

अप्रमाणित फाँट निर्माण करणाऱ्या काही संस्थाही अशी फाँट बदलण्याची सुविधा देतात, मात्र प्रत्यक्षात मजकूर एका फाँटमधून दुसऱ्या फाँटमध्ये बदलला असता काही अक्षरं (उदा. जोडाक्षरं) भलतीच दिसू लागतात, आणि मग ते सगळं दुरुस्त करत बसावं लागतं.

आणखी एक प्रकार मराठी वृत्तपत्रांच्या जालआवृत्त्यांतून पाहिलेला आहे. संपूर्ण परिच्छेद मराठीतून – देवनागरीतून – असतो, नि मधलेच एखादे वाक्य किंवा एखादा वाक्प्रचार इंग्रजीतून – त्यातही रोमन लिपीतून – असतो. (यात काही गैर आहेच, असा दावा नाही. ते प्रसंगोचित अर्थातच असू शकते. मुद्दा तो नाही.) मात्र, अशा परिस्थितीत, जेवढ्या भागात रोमन लिपीतून मजकूर अपेक्षित आहे, तेवढ्या भागापुरता फाँट बदलण्याचे हटकून विसरले जाते. आणि मग तेवढ्या भागात अगम्य (आणि अतिशय दुर्वाच्य!) अशी देवनागरी अक्षरे उमटतात.

मला वाटते, याही प्रकाराचे युनिकोडित फाँट वापरून निराकरण होऊ शकावे, नाही काय? एकच युनिकोडित फाँट रोमन तथा देवनागरी दोन्हीं प्रकारची अक्षरे एकसमयावच्छेदेकरून हाताळू शकावा, जेणेकरुन मध्येच फाँट बदलण्याची आवश्यकता भासू नये (नि म्हणूनच फाँट बदलण्यास विसरण्याची भानगडसुद्धा उद्भवू नये).

गेल्या वर्षीची गोष्ट : एका विख्यात प्रकाशनगृहातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या एका पुस्तकाची प्रुफं माझ्यापाशी काही कारणानं आली होती. ती वाचतावाचता माझ्या लक्षात आलं की सबंध पुस्तकात दुहेरी अवतरण चिन्हं (“ आणि ”) वापरण्याऐवजी दोन एकेरी अवतरण चिन्हं वापरण्यात आली आहेत (‘‘ आणि ’’). दुहेरी अवतरण चिन्हांपेक्षा अधिक जागा व्यापत असल्यामुळे ती वेगळी दिसत होती. ह्याविषयी विचारणा केल्यानंतर मला जे कळलं ते धक्कादायक होतं. त्या प्रकाशनाची सर्व पुस्तकं जो फाँट (युनिकोड नसलेला) वापरून छापली जात होती त्यामध्ये दुहेरी अवतरण चिन्हच नव्हतं! त्यामुळे ते प्रकाशन नेहमीच (म्हणजे सर्वच पुस्तकांसाठी) दोन एकेरी अवतरण चिन्हं वापरत होतं. मला ती पुस्तकं दाखवली गेली. ते खरंच होतं. मराठी प्रकाशन व्यवसायात हा फाँट अतिशय लोकप्रिय आहे आणि अनेक प्रकाशनगृहांत तो वापरला जातो, असंही मला सांगण्यात आलं.

नक्की याच्याशीच संबंधित आहे की नाही, कल्पना नाही, परंतु, या निमित्ताने एक निरीक्षण तथा शंका मांडू इच्छितो.

चिं. वि. जोशी यांची अनेक पुस्तके काँटिनेंटल प्रकाशनाने वेळोवेळी प्रकाशित केलेली आहेत. पैकी एका पुस्तकाची तत्कालीन अद्यतन छापील आवृत्ती माझ्या लहानपणी माझ्या संग्रही होती. त्या काळात – १९७०च्या दशकात – अर्थात डीटीपी हा प्रकारच (निदान भारतात तरी) प्रचलित नसल्याकारणाने, पुस्तकाची छपाई खिळेजुळवणी मार्गानेच झालेली असावी, हे उघड आहे. या आवृत्तीची छपाई बऱ्यापैकी निर्दोष होती, असे आठवते.

पुढे ही आवृत्ती (माझ्या तत्कालीन संग्रहातील जवळपास सर्वच पुस्तकांप्रमाणे) गहाळ झाली. म्हटल्यावर, त्यानंतर अनेक दशकांनी, केवळ नॉस्टाल्जिया के वास्ते म्हणून, मी हे पुस्तक दोनतीन वर्षांपूर्वी ‘बुकगंगा’वरून मागवून घेतले. याही खेपेस छापीलच आवृत्ती, तीदेखील काँटिनेंटल प्रकाशनानेच (परंतु अलिकडे) प्रकाशित केलेली.

आता, आजकाल या पुस्तकांच्या छपाईकरिता कोणती पद्धत वापरतात, याबद्दल मला कल्पना नाही, परंतु, या वेळच्या छपाईत एक चमत्कारिक गोष्ट माझ्या निरीक्षणात आली. पुस्तकातील अनेक प्रकरणांच्या शीर्षकांपुढे काहीही कारण नसताना ‘ह्न ह्न’ अशी (आणि बहुतकरून हीच!) अक्षरे दोनदोनदा छापली गेली आहेत. (जमल्यास पुढेमागे याचा फोटो डकवीन.)

हे नक्की का होत असावे? याचा डीटीपी/बिगरयुनिकोड फाँट/कोठल्यातरी भलत्याच कॅरेकटरचे अथवा कॅरेक्टरांचे (उदा.: दंड (।) अथवा दुहेरी दंड (॥)?) भलतेच सब्स्टिट्यूशन यांपैकी कशाशी संबंध असावा काय?

जयदीप चिपलकट्टी Wed, 30/11/2022 - 10:06

या विषयात मी कच्चा आहे, पण तरीही माझा अंदाज सांगतो. तंत्रनिरक्षरता हे कारण नसून लक्षण असावं. मराठी प्रकाशनात जर पैसा बरा असता तर तांत्रिक बाजू सुधारण्याचं काम आदम स्मिथच्या अदृश्य करकमलांनी कदाचित आपसूक करून टाकलं असतं.

उदाहरणार्थ, एलकुंचवारांच्या एका भाषणातला तपशील मला (अर्धवट) आठवतो आहे. त्यांच्या नाटकाच्या पुस्तकाची एक आवृत्ती अकराशेची असते, आणि ती संपायला पाचदहा वर्षं लागतात असं काहीसं ते म्हणाले होते. पुस्तकाची किंमत शंभर-सव्वाशे रुपये समजू. याचा अर्थ संपूर्ण आवृत्तीची दर्शनी किंमत लाख-दीड लाख झाली. आयटीत स्थिरावलेल्या माणसाचा एका महिन्याचा पगार ह्यापेक्षा जास्त असेल. यातच लेखक, प्रकाशक, वितरक, टाईपसेटर्स, कागद पुरवणारे ह्या सगळ्यांचा वाटा आला. समजा माझा अंदाज चुकला असेल आणि हा आकडा दोन लाख असेल तरी तोही फार नाहीच. पुस्तक यापेक्षा जास्त पानांचं असेल (उदा. अनेक नाटकांचा संग्रह किंवा कादंबरी असेल) तर किंमत जास्त हे मान्य, पण बाकीचे खर्चही वाढतील.

सारांश असा की या व्यवसायात (विशेषत: हाय-एन्ड मार्केटमध्ये) पैसा अगदीच बेताचा असावा. हे जर खरं असेल तर प्रकाशकांत स्पर्धा फार नसणार: म्हणजे नाटक मला द्या, मला द्या म्हणत एलकुंचवारांच्या दारी प्रकाशकांची रीघ लागली आहे असं होत नसणार, किंवा पुस्तकाची छपाई उत्तम पाहिजे, अवतरणचिन्हं चुकीची वापराल तर मी दुसऱ्या प्रकाशकाकडे जाईन असं म्हणण्याची मोकळीकही एलकुंचवारांना नसणार. (नाटक छापताना अवतरणचिन्हं क्वचित वापरावी लागतात, पण ते एक असो.) तेव्हा मग तांत्रिक बाजू जशी असेल तशी खपवून घेणं आलं: लेखकानेही आणि वाचकानेही.

अर्थात माझं निदान बरोबर आहे का हे जास्त माहितगार माणूसच सांगू शकेल.

अस्वल Wed, 30/11/2022 - 10:19

In reply to by जयदीप चिपलकट्टी

अगदी.
मराठीत एक आवृत्ती अजूनही 1000 ची निघते असं ऐकिवात आहे- आणि आजकाल म्हणे ऑन डिमांड पब्लिशिंगमूळे ही संख्या गुलदस्त्यातच राहते, कदाचित आणखीही कमी असेल.

मराठी पुस्तकाच्या लाख प्रती खपल्या - ही प्रचंड मोठी बातमी होते असे निरीक्षण आहे.
त्यामुळे प्रकाशन हा आतबट्ट्याचा व्यवहार असावा आणि जमेल तिथे शॉर्टकट मारून पुस्तक प्रसिद्धी होत असावी असा सौशय.
चिंज - तुम्हाला ह्याबद्दल माहिती आहे का?

अस्वल Wed, 30/11/2022 - 10:15

दिले आहेत - सावकाश पुढे लिहीतो.
---------------------------------------

हा एक कयास आहे - जाणकार वगैरे नाही.
एखादं नवं तंत्र स्वीकारण्यासाठी काही आर्थिक परतावा आवश्यक असायला पाहिजे.

नवे युनिकोड फाँट कितीही चांगले असले तरी जुने फाँट नाकारून नवे स्विकारले तर प्रकाशकांना काही आर्थिक फायदा आहे का?

बुकगंगा सारखे नवे उद्योग पुस्तकं प्रकाशित करतात असं दिसतं - कदाचित असे नवीन सुरू झालेले आणि इंटरनेटशी अधिक संलग्न उद्योग युनिकोड फाँट/इ-

/ऑडिओ बुक ह्या प्रकारांवर आणखी लक्ष देतील.

ह्या सगळ्याउप्पर मराठी प्रकाशनामागचे आर्थिक गणित - ह्या विषयावर कुणीतरी सविस्तर लिहायला पाहिजे. फे.बु वगैरे वर अर्धवट त्रोटक माहिती मिळाली त्यावरून असा अंदाज आहे की मराठी पुस्तक प्रकाशन हा प्रकार फारसा फायद्याचा नाही.

चिंतातुर जंतू Thu, 01/12/2022 - 08:07

In reply to by अस्वल

फे.बु वगैरे वर अर्धवट त्रोटक माहिती मिळाली त्यावरून असा अंदाज आहे की मराठी पुस्तक प्रकाशन हा प्रकार फारसा फायद्याचा नाही.

एक-दोन गोष्टी लक्षात घ्या :

  • मराठी प्रकाशन व्यवसायाच्या बळावर कुणी टाटा-अंबानी होत नाही, हे खरंच आहे.
  • मात्र, 'आमचा धंदा फारसा चालत नाही' असं रडगाणं गात गाठीशी बऱ्यापैकी पैसा जमवून बसणं मराठी माणूस सातत्यानं करत असतो. प्रकाशक त्याला अपवाद नाहीत. ;-)
  • फायदा मिळवण्याचे विविध मार्ग आहेत आणि यशस्वी प्रकाशक ते जोमात पत्करतात. उदा. शैक्षणिक पुस्तकं काढणं, शासकीय प्रकल्पांत किंवा विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट पुस्तकं काढणं (कारण त्यांच्या बल्क आॅर्डरी मिळतात), बहुखपाऊ लेखकांचे मरणोत्तर हक्क मिळवणं, पायरसी होणाऱ्या इंग्रजी पुस्तकांची भाषांतरं काढणं वगैरे.

अस्वल Thu, 01/12/2022 - 10:29

In reply to by चिंतातुर जंतू

, '

आमचा धंदा फारसा चालत नाही' असं रडगाणं गात गाठीशी बऱ्यापैकी पैसा जमवून बसणं मराठी माणूस सातत्यानं करत असतो. प्रकाशक त्याला अपवाद नाहीत.

लोल हे शक्य आहेच.
यशस्वी प्रकाशक-
येस, असं असावं आणि मराठीतले काही प्रकाशक तरी कालानुरूप बदलले असावेत हीच इच्छा आहे :)

बुकगंगासारख्यांकडे किती प्रकारची पुस्तकं किती संख्येने विकली जातात वगैरेचा मजबूत विदा असणारे, तोही वापरून बरंच काही करता येईल.

चिंतातुर जंतू Thu, 01/12/2022 - 17:01

In reply to by अस्वल

यशस्वी प्रकाशक- येस, असं असावं आणि मराठीतले काही प्रकाशक तरी कालानुरूप बदलले असावेत हीच इच्छा आहे

काही प्रकाशक कालानुरूप बदलले, पण म्हणजे नक्की काय, याविषयी मतभेद होऊ शकतात. उदा. आता अनेक प्रकाशकांच्या वेबसाईटवरूनच पुस्तकं मागवता येतात. त्यांनी नियमित ग्राहकांचा डेटा गोळा करून त्यांचे व्हॉट्सॲप ग्रूप वगैरेही केले आहेत. किंवा त्यांच्या बुक क्लबचं वार्षिक सदस्यत्व भरून वर्षभर सवलत मिळवता येते. जीपे वगैरे चालतं. कोणत्या तरी लेखकाचा वाढदिवस, महिला दिन वगैरे निमित्तानंही सवलती मिळतात.

हजारांची आवृत्ती खपणं वगैरे गोष्टी आता विशेष महत्त्वाच्या नाहीत, कारण अनेकांनी 'प्रिंट आॅन डिमांड' मॉडेल स्वीकारलं आहे. म्हणजे शंभर-दोनशेची आवृत्ती गरजेनुसार काढून विकली जाते. उदा. एखाद्या आउट आॅफ प्रिंट पुस्तकाच्या शंभरेक प्रती खपतील असं चिन्ह लेखकाला/प्रकाशकाला दिसलं तर तेवढ्या छापल्या (आणि विकल्याही) जातात. पण हे सगळं परस्पर होऊन जातं. म्हणजे बाजारात पुस्तक येतच नाही. बरेचसे लेखक खाजगीत सांगतात की त्यांच्या पुस्तकांच्या खपाविषयी त्यांचे प्रकाशक खरं सांगत नसावेत आणि रॉयल्टी कमी देत असावेत असा त्यांना संशय असतो. :-) बाकी इथे बरीचशी चर्चा साहित्यिक पुस्तकांबद्दल चालली आहे, पण यशस्वी प्रकाशक नेहमी काही सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबड्या बाळगून असतात. ती पुस्तकं भरपूर खपवून नफा कमवला जातो, आणि साहित्यिक मूल्य वगैरे असणाऱ्या पुस्तकांना पुरस्कार वगैरे मिळवून प्रतिष्ठा कमवली जाते. दोन गोष्टींत गल्लत करू नये.

बुकगंगासारख्यांकडे किती प्रकारची पुस्तकं किती संख्येने विकली जातात वगैरेचा मजबूत विदा असणारे, तोही वापरून बरंच काही करता येईल.

वर दिलेल्या (आणि इतर) कारणांमुळे पुस्तकविक्रेत्यांकडचा डेटा आता पुरेसा नाही. किंबहुना, प्रकाशकांना जे भरभक्कम कमिशन पुस्तकविक्रेत्यांना (ॲमेझॉनही त्यात आलं) द्यावं लागतं त्यामुळे अनेक यशस्वी प्रकाशक वेगवेगळ्या मार्गांनी डायरेक्ट पुस्तकं खपवतात. :-)

अस्वल Thu, 01/12/2022 - 23:54

In reply to by चिंतातुर जंतू

हे म्हणजे peer to peer model कडे जाणारं वाटतंय.

म्हणजे शंभर-दोनशेची आवृत्ती गरजेनुसार काढून विकली जाते. उदा. एखाद्या आउट आॅफ प्रिंट पुस्तकाच्या शंभरेक प्रती खपतील असं चिन्ह लेखकाला/प्रकाशकाला दिसलं तर तेवढ्या छापल्या (आणि विकल्याही) जातात. पण हे सगळं परस्पर होऊन जातं. म्हणजे बाजारात पुस्तक येतच नाही

हा प्रकार एका अर्थी चांगला आहे- गरज तेवढाच पुरवठा तत्वावर जर हवी ती पुस्तकं खात्रीशीर पद्धतीने मिळू लागली तर वाचक-प्रकाशक दोहोंना फायदा.

अमेरिकेत पब्लिक लायब्ररीत "request a book" प्रकार आहे - लायब्ररीत नसलेल्या पण हव्या असलेल्या पुस्तकाची नोंद करायची आणि मग लायब्ररी ते उपलब्ध करून देते.
थोडंफार तसंच - तंत्रज्ञान आणखी पुढे गेलं तर असे key discovery points तयार होऊ शकतील (बुक क्लब/ ग्रुप वगैरे) जिथून सिग्नल मिळाले की प्रती वाचकांना मिळायची डायरेक्त सोय.

शंका निरसनासाठी धन्यवाद!

पुंबा Thu, 01/12/2022 - 09:19

In reply to by अस्वल

स्टोरीटेलमुळे मराठी किंवा एकूणच देशी भाषातल्या ऑडिओ बुक्सना बरे दिवस आलेत. तरीही वाचणाऱ्या लोकांचा दर्जा सुधारता येईल.
काय वाट्टेल ते होईल हे पुलंचे पुस्तक दिग्पाल लांजेकरांनी वाचले आहे. बऱ्याच चुका आहेत पण त्यांच्या आवाजातल्या इनोसन्समुळे आशय खुप छान पोहोचतो.

चिंतातुर जंतू Wed, 30/11/2022 - 10:43

जेवढ्या भागात रोमन लिपीतून मजकूर अपेक्षित आहे, तेवढ्या भागापुरता फाँट बदलण्याचे हटकून विसरले जाते. आणि मग तेवढ्या भागात अगम्य (आणि अतिशय दुर्वाच्य!) अशी देवनागरी अक्षरे उमटतात. मला वाटते, याही प्रकाराचे युनिकोडित फाँट वापरून निराकरण होऊ शकावे, नाही काय? एकच युनिकोडित फाँट रोमन तथा देवनागरी दोन्हीं प्रकारची अक्षरे एकसमयावच्छेदेकरून हाताळू शकावा, जेणेकरुन मध्येच फाँट बदलण्याची आवश्यकता भासू नये (नि म्हणूनच फाँट बदलण्यास विसरण्याची भानगडसुद्धा उद्भवू नये).

पुस्तकातील अनेक प्रकरणांच्या शीर्षकांपुढे काहीही कारण नसताना ‘ह्न ह्न’ अशी (आणि बहुतकरून हीच!) अक्षरे दोनदोनदा छापली गेली आहेत.

ह्या दोनही गोष्टी केवळ युनिकोड फाँट वापरत नसल्यामुळे होणारे प्रकार आहेत.

पुस्तकाची छपाई उत्तम पाहिजे, अवतरणचिन्हं चुकीची वापराल तर मी दुसऱ्या प्रकाशकाकडे जाईन असं म्हणण्याची मोकळीकही एलकुंचवारांना नसणार.

ही मोकळीक त्यांना नक्कीच आहे. इथे नाव घेणे उचित नाही, पण माझ्या पुस्तकाचा फाँट, मांडणी, छपाई, सजावट मला हवी तशीच व्हायला हवी अशी मागणी करणारे लेखक आणि ती पूर्ण करणारे प्रकाशक अस्तित्वात आहेत.

मराठी प्रकाशनात (इंग्रजीच्या मानाने) पैसा कमी असतो ही बाब खरी आहे. मात्र, त्याबरोबर इतर अनेक गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. उदा.

  • तंत्रकुशल माणसं अतिशय कमी पैशांत उपलब्ध होत राहतात. अनेक प्रकाशनगृहांत प्रत्यक्ष संगणकावर बसून काम करणारी माणसं फार मोठ्या पगारावर काम करत नाहीत. त्यामुळे हौसेपोटी आपलं पुस्तक टाईप आणि सेट करून घेऊन स्वप्रकाशित करणंही विशेष महाग राहिलेलं नाही. किंवा
  • एकदा युनिकोडमध्ये पुस्तक सेट केलं की (विशेषतः मजकूर पुष्कळ आणि चित्रं कमी असलेल्या पुस्तकांचं) इ-बुक करणं अतिशय सोपं आहे. हे केलं तर परदेशातले, परप्रांतातले वाचक ती पुस्तकं घेतील. त्यातून विशेष गुंतवणूक न करता विक्री वाढू शकेल.

अशा इतरही अनेक गोष्टी सांगता येतील. विविध युक्त्या वापरून प्रकाशन व्यवसाय बऱ्यापैकी नफ्यात चालवणारे प्रकाशक आताही आहेत. त्यामुळे पैसा कमी वगैरे गोष्टी प्रत्येक प्रकाशकाला सारख्याच लागू होत नाहीत.

चिमणराव Wed, 30/11/2022 - 12:37

प्रकाशन व्यवसाय हा एका व्यक्तीने उभारून स्थिरस्थावर केल्यावर तो मुलांच्या, नातवंडांच्या,नातेवाईकांच्या हातात गेल्यावर नऊ भागीदार आणि तेरा मते घुसल्यावर काय होणार? "माझ्या भाच्यालाच हे काम द्या,तो आइटी
झालाय" असंही होतं असेल आणि त्याची क्षमता घासून पुसून बाहेरच्या कुणाशी तुलना करून पाहायचा मुद्दा बादच ठरत असेल.

किंवा कधी जुने मालक असताना मुलांना नवीन तंत्रज्ञान त्यांच्या गळी उतरवणे ही जमत नसेल. "मी एवढा धंदा उभा केला आणि तू मला काय शिकवतोस?"

थोडक्यात हे असंच चालेल.

मराठी वाचक किती आणि ते कोणते विषय वाचतात ही नाडी ओळखल्यानेच प्रकाशक पुढे आले.

shantadurga Wed, 30/11/2022 - 15:32

या लेखामुळे मराठी पुस्तकं वाचताना वेळोवेळी खटकणाऱ्या गोष्टींमागची कारणे समजली. मराठी पुस्तकांखेरीज लोकप्रिय दिवाळी अंक डिजिटल स्वरूपात उपलब्ध नसणे ही अनेक वाचकांची  हळहळ आहे. परंतु सुधारणा न होण्यामागे आर्थिक कारणं किती किंवा अनिच्छा आणि तंत्रनिरक्षरता किती हे त्या व्यवसायातील लोकच नीट सांगू शकतील. डिजिटल स्वरूपात पुस्तकं आल्याने खरंतर पुस्तकांचा खप वाढू शकेल. 

जयदीप चिपलकट्टी Wed, 30/11/2022 - 22:11

मुद्रितशोधन + डिजिटल टाइपसेटिंगच्या खाचाखोचा + अॉनलाईन मार्केटिंग असं सगळं सांभाळणारी एक ‘बूटीक’ कन्सल्टिंग फर्म काढावी अशी मी चिंजंना विनंती करतो. आम्ही परागंदा मंडळी पैसे गुंतवायला तयार आहोत.

‘अब्राह्मणे बाळबोध अक्षर // कळफलकावर टंकावे सुंदर’ असं बोधवाक्य तयार आहे.

---

बिटकॉइनजी बाळा Wed, 30/11/2022 - 23:02

हा लेख वाचायचा होता परंतु सजग उपलब्ध झाला नाही तेव्हा वाट पाहावी लागली.
या निमित्ताने अजून एक गोष्ट निदर्शनास आणून देतो.
मराठी आणि हिंदी भाषिकांची संख्या प्रचंड असून देखील सहज उपलब्ध असणाऱ्या युनिकोड टंकांची संख्या खूपच कमी आहे.
हे टंक लिपीनुसार असतात आणि युनिकोड नियमसुद्धा एका लिपीसाठी लिहिलेले असतात. त्यामुळे किमानपरिपूर्ण देवनागरी टंकांची संख्या वापरकर्त्या संख्येचा उपयोग पाहता भरपूर असायला हवी. पण तसे दिसत नाही. स्मार्टफोनमुळे त्यातल्या त्यात त्यांना सुगीचे दिवस आहेत हेच म्हणायचे. तरीही येत्या काळात आवर्जून देवनागरी (प्रकाशित पुस्तकं) वाचतील अश्या मुलांची संख्या लक्षात घेता फारशी आशा वाटत नाही.

हे देखील चिपलकट्टींनी सुचवल्यानुसार मार्केटवर अवलंबून असावे.

ई-पुस्तकांची पायरसी कितीही कमी प्रमाणात झाली तरी त्याने मुळातच यथातथा खप असलेल्या प्रकाशनव्यवसायाला तोटाच होण्याची शक्यता जास्त आहे. त्यापेक्षा छापील पुस्तक काढणे हा व्यवसायाने मार्केट रेट्याने नैसर्गिकरित्या स्वीकारलेला मार्ग असावा.

जेव्हा पुस्तकाची विक्री प्रचंड आहे तेव्हाच प्रकाशक इप्रत काढण्याचा विचार करतात असे दिसते. उदा. रावण : राजा राक्षसांचा हे पुस्तकाच्या लाखभर/किंवा अधिक प्रती खपल्यावर किंडल एडिशन आलेली दिसतीय. (माझ्या वै. अनुभवानुसार हे उदा. देतो आहे)

चिंज ज्या परप्रांतीय, परदेशी वाचकांचा विचार करत आहेत त्यांच्याबद्दल काही मराठीपुरता सांख्यिकी विदा आहे का? समजा, कालकल्लोळ हे अरुण खोपकरांचे मराठी पुस्तक किंडलवर सहज वाचता येईल असे केले. किती लोक हे पुस्तक किंडलवर मराठीतून आवर्जून वाचू इच्छितात? त्यांचा आणि पारंपारिक वाचकांचा रेशो किती असेल?

चिंतातुर जंतू Wed, 30/11/2022 - 23:33

In reply to by बिटकॉइनजी बाळा

मराठी आणि हिंदी भाषिकांची संख्या प्रचंड असून देखील सहज उपलब्ध असणाऱ्या युनिकोड टंकांची संख्या खूपच कमी आहे.

सहज उपलब्ध म्हणजे काय?

ही यादी समग्र नाही.

परप्रांतीय, परदेशी वाचकांबद्दल सांख्यिकी विदा वगैरे : माझ्यापाशी विदा नाही. खरं तर हे टॅप न केलेलं मार्केट आहे. हल्लीहल्लीच प्रकाशनसंस्था सोशल मीडियावरून प्रसिद्धी वगैरे थोड्या गांभीर्यानं घेऊ लागले आहेत. योग्य रीतीनं मार्केट केलं तर पुस्तकं ऑनलाईन विकता येतात हे त्यांना कोव्हिडमुळे समजू लागलं. तसंच काही काळानं इ-बुक्सचं होईल असं वाटतं. बाकी कालकल्लोळ किंडलवर सहज वाचता येईल असं केलं तर मार्केट किती हा वेगळा मुद्दा आहे.

मी-52 Thu, 01/12/2022 - 12:14

युनिकोड फाँट मधिल (“ ”) दुसऱ्या फाँट मध्ये परिवर्तन (conversion) होत नाहीत. अंक इंग्रजित असतिल तरच परिवर्तन होतात. अनेकदा युनिकोड फाँट मध्ये कर्सर उलटा चालतो एडीट करता येत नाही.

चिंतातुर जंतू Thu, 01/12/2022 - 16:45

In reply to by मी-52

युनिकोड फाँट मधिल (“ ”) दुसऱ्या फाँट मध्ये परिवर्तन (conversion) होत नाहीत. अंक इंग्रजित असतिल तरच परिवर्तन होतात.

युनिकोडमध्ये ही चिन्हे आणि अंक वगैरे प्रमाणित आहेत. त्यामुळे चिन्हे आणि अंक वगैरेंना एका युनिकोड फाँटमधून दुसऱ्यात किंवा देवनागरीतून इंग्रजीत कन्व्हर्ट करताना अडचण नसते. अडचण ही दुसऱ्या अप्रमाणित फाँटमध्ये असते. तिथे अप्रमाणित कोड वापरून ही चिन्हे बनवली असतात किंवा मी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे काही फाँट्समध्ये ती चिन्हेच नसतात. त्यामुळे कोणत्याही फाँटमधून (म्हणजे इंग्रजी/रोमनही) अप्रमाणित फाँटमध्ये जाताना ही अडचण येते.

अनेकदा युनिकोड फाँट मध्ये कर्सर उलटा चालतो एडीट करता येत नाही.

हे सॉफ्टवेअरवर अवलंबून असते; फाँटवर नव्हे. वर्ड, कोरल, इनडिझाईन वगैरे नेहमी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये युनिकोड व्यवस्थित चालते.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 08/12/2022 - 04:26

In reply to by मी-52

चालेल की. पण माझ्याकडे फक्त युनिकोड टंक आहेत.

Sanhita.जोशी@जीमेल

मला दोन आठवड्यांनी थोडी फुरसत असेल, हे वापरून बघायला.

मी-52 Thu, 01/12/2022 - 19:15

हे सॉफ्टवेअरवर अवलंबून असते; फाँटवर नव्हे. वर्ड, कोरल, इनडिझाईन वगैरे नेहमी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये युनिकोड व्यवस्थित चालते. .....
नाही चालत.मि गेलि 27 वर्षे प्रिंटीग व्यवसायात आहे म्हणजे मि बहुधा तंत्रनिरक्षर नसेन.
त्यात आम्हि प्रमाणित सॉफ्टवेअर वापरतो. म्हणजे लायसन सह तरिही युनिकोड फाँट मधिल (“ ”) दुसऱ्या फाँट मध्ये परिवर्तन (conversion) होत नाहीत. अंक इंग्रजित असतिल तरच परिवर्तन होतात.

मी-52 Thu, 01/12/2022 - 19:37

कोणतं सॉफ्टवेअर? वर्ड -2010
ईनडीझाईन 2020 क्लाउड.

आकृती परिवर्तन/ आणि टंकन

युनिकोड मंगल/ मुक्ता

कोणती व्हर्जन?
दुसरा फाँट कोणता? आकृती योगनी/प्रिया

चिंतातुर जंतू Sun, 04/12/2022 - 08:31

In reply to by मी-52

माझ्या माहितीनुसार आकृती युनिकोड नाही. त्यामुळे conversion करताना काहीच गॅरंटी नाही. युनिकोड फाँट प्रमाणित असतात, पण इतर नसतात. त्यासाठीच मग वेगळे कन्व्हर्टर लिहावे लागतात.

मी-52 Sun, 04/12/2022 - 13:21

In reply to by चिंतातुर जंतू

माझ्या माहितीनुसार आकृती युनिकोड नाही. एकदम बरोबर. साहेब त्या बरोबर कन्व्हर्टर सुध्दा येतो. युनिकोड नसलेल्या फाँट मध्ये (आता लायसन्स सॉफ्टवेअरचे फाँट प्रमाणित नसितल तर....) युनिकोड फाँट कन्व्हर्ट करायला. असो तरीही ह्या समस्या खुप आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 04/12/2022 - 23:45

In reply to by मी-52

यात वर्ड, कोरल, फोटोशॉप किंवा इतर कुठलंही सॉफ्टवेअर असण्या-नसण्याचा प्रश्न नाही. प्रश्न कन्व्हर्जन करणाऱ्या सॉफ्टवेअरचा असणार.

मी गृहीत धरत्ये की आकृती युनिकोड नाही तर आस्की टंक असणार. आस्की ते युनिकोड हे मॅपिंग चुकलेलं असेल तर टंक बदलताना अडचणी येणारच.

मी-52 Mon, 05/12/2022 - 18:21

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी गृहीत धरत्ये की आकृती युनिकोड नाही तर आस्की टंक असणार.... हो. प्रश्न कन्व्हर्ट करण्याचा आहे. कीत्येक पुस्तक (प्रिंटीगच्या व्यवसायात मॅटर) आहे. ते उलट सुलट कन्व्हर्ट करण्यासाठी म्हणजे आधिच्या फाँट मधून युनिकोड किंवा उलट. त्याचे कारण अनेक शब्द- जोड शब्द युनिकोड मध्ये निट येत नाहीत.
असो धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 08/12/2022 - 04:29

In reply to by मी-52

कुठले शब्द युनिकोडात येत नाहीत? मला लॅपटाॅपावरून काय वाट्टेल ते टंकता येतं देवनागरीत. (नबा, लगेच पोलिश आणि फ्रेंच शब्द आणू नका.)

चिंतातुर जंतू Mon, 05/12/2022 - 00:07

In reply to by मी-52

ह्या समस्या खूप आहेत हे खरेच आहे. हा दोष अप्रमाणित फाँट तयार करणाऱ्या लोकांचा आहे. असे Licensed software तयार करून ते विकणाऱ्या लोकांचा आहे. युनिकोड फाँट वापरणे हा यावर उपाय ठरावा.

Rajesh188 Fri, 02/12/2022 - 13:43

Elon mask ..

पैसे च्या जोरावर वेडा झालेला व्यक्ती l.
त्याला युरोपियन देशांनी दम दिला आहे.
सर्व नियम पाळा नाही तर २७ देशात ट्विटर ban केले जाईल.
संपत्ती च्या जोरावर हुकूमशाही वृत्ती बाळगणाऱ्या लोकांवर सर्व देशांनी नियंत्रण ठेवले पाहिजे.

'न'वी बाजू Sun, 04/12/2022 - 09:25

In reply to by Rajesh188

प्रस्तुत प्रतिसादाचा प्रस्तुत धाग्याच्या विषयाशी नक्की संबंध कळू शकला नाही. परंतु, चालायचेच.