पाव्हणा
पोलीसात असणारा एक लांबचा पाव्हणा , दोनेक वर्षापूर्वी रिटायर्ड झाला. श्रीरंग सुभाणा साळवे. मा.पो.उपनिरीक्षक अशी पाटी त्याच्या घरावर झोकात झळतेय. रिटायर्ड व्हायच्या काही दिवस आधी हा बढतीने पोलीस उपनिरीक्षक झाला. हा वस्तीत राह्यला कधीच नव्हता. पण पाहुण्या रावळ्यांना अधेमधे भेटायला यायचा. हा आमचा लांबचा पाव्हणा जेव्हा जेव्हा वस्तीत यायचा, तेव्हा हा खरेच लांबचा वाटायचा. कायम आदबशीर शिस्तबद्ध अंतर . शेणानं सारवलेल्या भुईवर बुट न काढता , अंथरलेल्या चटई, चादरी, किँवा पोत्याचं चवाळं याकडे नाईलाज को क्या ईलाज या धारणेतून बघत बुटासहीत मांडी घालून बसणारा हा बहाद्दर ! बढती मिळाली आणि याच्या सामाजिक परात्मतेला पारावार उरला नाही. चेष्टा वाटेल , पण आईबाप देखील याने शेजार्यात जमा केले. ते खंगुन खंगुन शेजार्याँचंच मरण मेले. हा दारुने सुजलेला , पैशाने माजलेला , माणूसघाणा म्हणून गाजलेला, नामवंत असामी. जाती जमातीत, पाव्हण्या रावळ्यात, दोस्त मंडळीत उठ बसं करताना हा कायम बेफिकिर , अवघडलेला. आपण कुणीतरी भलतेच वेगळे , झग्यातून जन्म पावलेले , आणि हे काय करतोय ? कुणाला जयभिम /नमस्कार घालतोय ? का ? कशासाठी ? यांना माझी जरब वाटू नये ? असल्या प्रश्नांच्या जंजाळात हा कायम. स्वतःहून कुणाला ओळख देणं म्हणजे याच्यासाठी डूब मरणे के बराबर. हा वस्तीत फार यायचा नाही. पण आलाच तर दरवेळी मला एक प्रश्न नेमानं विचारणार , कुठलं काँलेज ? कुठली साईड ? माझं ठरलेलं उत्तर. आंबेडकर काँलेज आर्ट् साईड. हा आईबापादेखत तुच्छतापूर्वक मला सुनवायचा , फाल्तु साईड ! नोकरी मिळत नाही. बी ए झालेले गटार काढतात. वगैरे वगैरे.. आईबाप खचून आणि अवघडून याचा पाहूणचार करायचे.पत्र्याच्या घरात लै गरम होतं असं चारदा म्हणून हा निघून जायचा.वस्तीत शिकणार्या पोरांच्या आईबापांना खचवूनच ! समोरच्याला मान देत , अपमान करण्याची याची स्टाईल फार जिव्हारी लागणारी. हा कधीतरी भलताच खूश होऊन , गरीब पावण्याच्या घरी जाऊन त्याच्या घरी जेवण्याची ईच्छा व्यक्त करायचा. ईच्छा व्यक्त केलेलं घर मोठा मनुषी जेवाय आहे म्हणुन लगबगीने हालू लागायचं. हालत्या घराला थांबवून हा घरधन्याला विचारायचा आरं बापू जेवाय काय करणार ? गरीब घरधनी विचारात पडायचा. पण हा फारवेळ त्याला विचारात पडू द्यायचा नाही. खिशातून शंभराच्या चारसहा नोटा काढून. नकु नकु म्हणनार्या गरीब बापूरावच्या हातात जरबेनं कोँबून हा मटन, दारु आणायला सांगायचा. आणलेला सरंजाम हरखुन पाह्यचा. मग हा चवीने प्यायचा, चवीने खायचा . आणि गरीब पावण्याला देखील पाजायचा. लाल टिर्या होईपर्यँत स्वतःच कौतुक करुन घ्यायचा. तृप्त होऊन तिथून निघायचा. दुसर्याच क्षणाला , तिसर्याने केलेल्या चहाच्या आग्रहाला नकार देत , बापूरावच्या घरी मटन खाल्लं असं सांगायचा. त्याला वाटं लावायला आलेल्या बापूरावच्या बायको पोरासमोर तो चहाचा आग्रह धरणार्या इसमाबरोबर चर्चा करायचा. चर्चेत प्रश्न विचारायचा . उत्तर दिलंच पाहिजे या हुकमी स्वरात ! बापूरावला तरी बकर्याचं कवा भेटायचं ? हालगाट आणि जाबाडाचंच कवर खावं त्यानं ? म्हणुन बेत केल्ता झालं. असं म्हणुन प्रश्नार्थक मुद्रेनं पाह्यचा. बापूरावनी खाल्लेल्या त्याच्या पैशाच्या मटनाचा रगतघास करुन , बापूरावच्या बायको पोरांना जहरी लाज आणून , मटन दारुतून उरलेले पैसे वस्तीतल्या लहान पोरात वाटून हा राक्षसी कृतज्ञतेने हसून खूप खूप फुगायचा. मटन खाल्लेलं कुटुंब गुदमरुन जावं इतका !
हा कुणाच्या लग्नात आला कि लोकांच्या गराड्यात उभा राहून गोरगरीब समाज, भिकारचोट लोक, सुधारणा नाही, बाबासाहेबांचं तत्त्व , दारुचा परिणाम , सोरटचा नाद हे आणि या सदृश बरेचसे शब्द
वाक्या- वाक्यात कोँबत, वस्तीतल्या लोकांना आणि लग्नघरच्या नव्या पावण्यांना पार भंजाळून टाकतो. मंडपात मानाने टाँवेल टोपी घेतो. पान खातो आणि बुलेटवर बसून डाग डाग डाग डाग... करीत निघून जातो. याची बायको याला चळाचळा कापते. याच्यातला अधिकारी तिला कायम चिरडत आलाय. भेटाय आलेल्या सख्ख्या भावाला ही ती जेवायचा आग्रह करू शकत नाही. तरी त्यात हा पोलीसात आहे म्हणुन बरं. हा बराच काळ बाहेर असतो. हा जेवढा काळ बाहेर थांबतो तेवढा काळ माणुसकी याच्या घरात नांदते. हा घरात आला कि ती लाथ घालून हाकललेल्या निराधार बाईसारखी उंबर्याबाहेर पडते. याच्याकडे जाऊन आलेले पाव्हणे रावळे, यार मैतर याचा विषय निघाला कि तोँड कडूझर करतात.
हे असंच याचं वर्षानुवर्ष चाललं. माणुसकी याच्या घरी स्थिरावलीच नाही. मुली मोठ्या झाल्या , लग्नाला आल्या, याचे आईबाप कधीच मरण पावले. आणि हा बघता बघता रिटायर्ड झाला. दाबून जमवलेल्या पैशाचं , समाधानाचं कौतुक करवून घेत हा चिक्कार फिरला.दमला.आणि अवघड वळणावर थांबला. चित्र बदललं !
दोन्ही मुली अर्धवट शिक्षण सोडलेल्या, मस्तीत वाढलेल्या , अहंकारानं घडलेल्या. खूप खूप बिघडलेल्या. दिसायला बर्यापैकी सामान्य. सध्या लग्नासाठी उमेदवार म्हणुन सज्ज आहेत. यांचं कुठंच लग्न जमत नाही. बापाची ख्याती सर्वदूर पावण्या रावळ्यात पसरलीय . ' बाप तशी लेक आणि खानवाटी एक ' या जबरी दहशती उक्तीने यांच्या पासून पुरूष उमेदवार बरेच लांब आहेत. मुलीँच्या वागणूकीची सुपरा झलक एका मयतीत वस्तीने पाह्यली. पोरींच्या हातातल्या बिसलरी बाटल्या , मोबाईलवरचं बोलणं , टाँप आणि जीन्स मधलं अंतर, उघडी बेँबाटं छ्या ! वस्ती दंग झाली. मेल्या माणसाला क्षणभर विसरली आणि त्यांच्या भावी भविष्याची काळजी, वस्तीने चुटपूटती का होईना पण लगेच वाहिली.त्या बापाला मयतीच्या प्रगतीशील घडामोडीचा ताजा अहवाल , म्हणजे करंट अपडेट्स देत होत्या. रनिँग काँमेँट्रीच्या धर्तीवर. कोण आलय , कुणाची वाट पाहणं चालू आहे , साधारण प्रोग्रँम किती वाजता आटोपेल. वगैरे वगैरे.. आता या पोरी वैतागल्यात नवरा पाह्यजेल ! पण जुळेना कुठे. आणि समाजा पासून तुटलेला यांचा बाप दिवाना झालाय. यानं याच्यातला अधिकारी मारला. नुस्ता बाप उरला. खुलेआम प्राँपर्टी जाहिर करु लागलाय ह्यो . माझे जे जावई होतील त्यांचं लै लै भलं होईल असा डांगोरा पिटू लागलाय. येता जाता कुणालाही जयभिम घालू लागलाय. चहापानावर मुबलक पैसा खर्च करु लागलाय. मरणा तोरणाच्या आमंत्रणाची वाट बघू लागलाय. सुखात दुप्पट सुखाने , आणि दुःखात तिप्पट दुःखाने सामील होऊ लागलाय. पावण्या रावळ्यात सलगी वाढवायचे लै प्रकार करु लागलाय. आता वस्तीत जातोय पण सारवलेल्या भुई राहिल्या नाहित म्हणुन कष्टी होतोय. म्हाडानं फरशीची सोय केली नाहीतर यानं सलगीचं उट्ट काढलं अस्तं. सारवल्या भुईवर बैठक मांडली असती. तेलचटणी खाल्ली अस्ती. गरम होतंय हे उद्गार गिळले असते. पण याच्या हातून हे निसटलं. बापूराव आता बकरं नाही पण चिकन खाऊ शकतो. आणि हा मात्र दुःख ही गिळू शकत नाही. याचे सगळेच चान्स गेलेत. हा अडाणचोट हिरवट दत्तुबप्पाला स्वतः जयभिम घालतो. भिमा आबाला तंबाखू मागतो. कुणालाच कुठली साईड विचारत नाही. हा बाबासाहेब, चळवळ, सुधारणा हे शब्द विसरला. हा भेटंल त्याला खाऊ घालाय बघतो. मटन चारणं मजी लै भारी या छापात व्हेज वाल्याला नाँनव्हेजचा आग्रह धरतो. अपेक्षा एकच बाहेर याच्या विषयी बरं बोलावं. ह्याला जातीनं जागा दावली. हा दोन दिवसापूर्वी कालेजवर आला. मोप कौतुक केलं शिक्षणाचं नोकरीचं. घरी यायचा जोरदार आग्रह करीत घरी घेऊन गेला. लै गप्पा मारल्या पण विषय वळवता आला नाही. शेवटी निघताना म्हटला. सोनीला एखादं वळकीचं स्थळ बघ तुझा एखादा दोस्त ! मी हसलो आहे म्हटलं . फाल्तू साईडनी शिकल्याला दोस्त आहे. चालेल का ? थेट विचारलं. त्याच्यातला हारलेला बाप हारलेलंच हास्य हासला. मला जाम गिल्टी वाटलं. समाजापासून तुटलेली स्वतःची नाळ जोडण्याची त्याच्यातल्या बापाची धडपड मला अस्वस्थ करुन गेली. घरातनं बाहेर पडताना बरं वाटलं. मी मलाच विचारलं काय कारण ? चटकन आठवलं आत्मविश्वासानं वावरलेली त्याची बायको आणि मुक्कामी थांबलेली माणुसकी...
दमदार व्यक्तिरेखाटन - थोडक्या
दमदार व्यक्तिरेखाटन - थोडक्या पण कणखर फराट्यांमध्ये साकारलेलं. जातीचा ताण भल्याभल्यांचे पीळ मऊ पाडतो याचं छान चित्रण आहे. 'जयभिम महात्म्य' मध्ये बरोब्बर उलटं होताना दिसतं. त्यात जातीची बंधनं प्रेमाच्या जाणीवेने सैलावतात. या दोन परस्परविरोधी चित्रणांतून माणसावर होणारा जातीचा परिणाम जास्त उठून दिसतो.
लेखनात दुसरी बाजू ही दिसावी
लेखन चांगले आहे, म्हणजे खिळवून ठेवते. पण सतीश्भाऊ तुम्ही सर्व गोष्टी तुमच्या एका च चश्म्यातून बघुन लिहीता. तुम्ही दोन्ही बाजूनी लिहिले पाहिजे.
तुमच्या पाव्हण्याची पण काही मत असतील, किंवा तो जसे वागत होता त्याला काही कारणे असतील त्याच्याकडे.
आणि लोकांनी पण तो जेंव्हा पोलिसात होता तेंव्हा का नाही त्याला वाळित टाकले?
तसेच, जर मुली च पसंत नसतील ( चांगल्या नसतील तर )तर गोष्ट वेगळी आहे पण हा माणुस सासरा असण्यात काय नुकसान आहे?
!
दरवेळी काय वेगळं लिहायचं.. छान म्हणायलाही शब्दांच्या मर्यादा पडतात