Skip to main content

ती नव-भांडवलवादी ‘पुरुष’ बनली.

लता मंगेशकर एक वर्षापूर्वी गेल्या तेव्हा त्या ९२ वर्षांच्या होत्या. प्रथितयश, श्रीमंत आणि अत्यंत लोकप्रियही. त्यांच्या अंत्यविधीला उपस्थितांची यादी बघितली; प्रस्थापित आणि समाजमाध्यमांवर त्यांच्याबद्दल आलेल्या बातम्या आणि लेखन बघितलं हे सहज दिसत होतं. असंच एक चित्र मला व्हॉट्सॅपवर आलं. बॉलिवुडच्या संगीतातल्या प्रसिद्ध पुरुषांच्या कोंडाळ्यात किशोर कुमार त्यांना सामावून घेत आहे, असं हे चित्र. त्या चित्राच्या जोडीला माझ्या रुचीविपरित, गोडगुलाबी भाषेत काही वर्णनंही होती. लता मंगेशकर गेल्यावर दोन दिवसांत धनमंजिरी साठे यांनी लिहिलेला लेख इंडियन एक्सप्रेसनं छापला होता – लता मंगेशकरांचं एकटेपण (The original title – The solitude of Lata Mangeshkar).

लता मंगेशकरांचा मृत्यु

लता मंगेशकर एकट्या का होत्या? ह्या चित्रात आणि त्याबरोबर आलेल्या शाब्दिक वर्णनांत इतर स्त्रिया का नाहीत? इतर पार्श्वगायिका कुठे गेल्या?

माझं शिक्षण विज्ञानक्षेत्रात झालं आणि मी तंत्रज्ञानक्षेत्रात काम करते; आणि दोन्ही ठिकाणी स्त्रियांची संख्या खूप कमी आहे म्हणून मी प्रश्न विचारते; तर हाच प्रश्न पार्श्वगायनाबद्दल का विचारू नये!

साठेंच्या लेखात लता मंगेशकर आपल्या घरातली एकटी कमावती व्यक्ती असूनही उपाशी राहायच्या असा उल्लेख आहे; कुठल्याही पुरुषाला असं उपाशी राहायला लागत नसे; किंवा लताबाई पुरुषी क्षेत्रात कशा एकट्या होत्या असे उल्लेख आहेत. मला हे चित्र थोडं निराळं दिसतं. मी शहरी, उच्चवर्णीय, सुखवस्तू घरात जन्माला आले आणि वयात येईस्तोवर भारताची अर्थव्यवस्था खुली व्हायला लागली होती. लता मंगेशकर त्यांच्या तरुण वयात गायलेल्या गाण्यांसाठी प्रसिद्ध होत्या; त्यात अनेक गाण्यांत गरीब, परिस्थितीनं पिचलेल्या स्त्रिया दिसायच्या; ह्या स्त्रियांच्या आयुष्यातला कुणी पुरुष हरवल्यामुळे, गेल्यामुळे त्यांची दुर्दशा झालेली आहे, अशी ती गाणी होती. 'उन को ये शिकायत है', 'ये शाम की तनहाईयां', 'रसिक बलमा' वगैरे. दुःखाचे प्रकार निराळे, पण दुःखच. ह्या गाण्यांतल्या सगळ्या बायकांना स्वतंत्र असं स्थान नाही, त्या कुणाच्या तरी कुणी तरी आहेत – relative being. त्यांना स्वतःचं स्थान नाही. कुणाची आई, प्रेमिका, कुणी तरी. ह्या स्त्रिया लता मंगेशकरांसारख्या कमावत्या नाहीत. त्या स्वतःचा मार्ग स्वतः निवडणाऱ्या, ठरवणाऱ्या वगैरे नाहीत.

सिमोन दि बोव्हार या स्त्रीवादी तत्त्ववेत्तीनं 'द सेकंड सेक्स' या पुस्तकात 'relative being' (कुणाची तरी नातेवाईक) ही संकल्पना मांडली. स्वतः सिमोन एका मुलाखतीत म्हणते की मी बहुतांशी पुरुषांचं आयुष्य जगले – लग्न केलं नाही, मला मुलं नाहीत; आणि माझ्याकडे तत्त्वज्ञानातली पदवी आहे. ती पुढे म्हणते, माझ्या काळात इतक्या कमी स्त्रिया तत्त्वज्ञानासारख्या उच्चभ्रू विषयात पदव्या मिळवत होत्या की पुरुषांनी माझं स्वागतच केलं. पुढच्या काळात जेव्हा मोठ्या प्रमाणावर स्त्रिया असे विषय शिकायला लागल्या तेव्हा पुरुषांना स्त्रियांची भीती वाटायला लागली. (मलाही असाच काहीसा अनुभव आहे; विज्ञान-संशोधनात खूप कमी स्त्रिया आहेत आणि ह्या व्यवसायात फार कमी पैसा आहे. संशोधनक्षेत्रातले पुरुष माझ्याशी नेहमीच चांगुलपणानं वागले; पण समानतेचा विषय समाजमाध्यमांवर काढला की किती गोंधळ माजतो ते फक्त बघायचं!)

लताबाईंचं स्वागत कितपत झालं याची मला फारशी कल्पना नाही; पण अगदी मोजक्यांपैकी त्या एक होत्या. शिवाय आपल्याला इतर काही किस्से माहीत असतातच, “कंबख्त, कभी बेसुरी नही होती”; किंवा दिलीप कुमार त्यांना आपली बहीण मानत असे (कदाचित लताबाई उर्दू शिकल्यानंतर झालं असेल). त्यांची सांगितिक कला आणि तेव्हाच्या बॉलिवुडची भाषा – उर्दू – शिकण्यामागचे कष्ट नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. पण ह्या काही किश्श्यांमधून त्यांचं काही अंशी स्वागत झालं, असं मानायला जागा आहे. सिमोन दि बोव्हार स्वतःच्या पुरुषी आयुष्याबद्दल जे म्हणते, तेच बहुतांशी लता मंगेशकरांनाही लागू पडतं. एकदा पुरुषी आयुष्य आणि सत्ता मिळवल्यानंतर आपली सत्ता इतरांवर गाजवून आणखी सत्ता, पैसा आणि लोकप्रियता कमावायला लता मंगेशकरांनी मागेपुढे बघितलं नाही. लता मंगेशकर क्षुद्र, राजकीय आणि आणखी एक सत्ताधारी 'पुरुष' बनल्या. (आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांतही सिमोन दी बोव्हार युरोपमधल्या स्त्रीवाद्यांसाठी पैसे कमावण्यासाठी काम करत होती.)

सत्ताधारी होण्याच्या मार्गावर लता मंगेशकरांनी सिनेमातल्या गरीब, दुःखी, अबलांसाठी गाणी गायली; अशी पात्रं ज्यांना समाजाकडून सहानुभूतीची गरज होती. पार्श्वगायन म्हणजे आजच्या सिंगल्ससारखं किंवा पाश्चात्त्य जगातल्या अल्बमांसारखं नाही. समजा जोनी मिचेलचं गाणं, तर गाण्याचे शब्द, संगीत आणि गायन सगळं तिचंच असणार. (तिला एका अल्बमसाठी सुचवलं गेलं की अल्बम पूर्ण करायला आणखी गाणं लिही. तिनं चाबरटपणा करून गाणं लिहिलं - You turn me on, I am a radio.) पार्श्वसंगीतात अनेक लोकांचा हातभार असतो; सिनेमात गाण्यासाठी योग्य जागा लिहिणारे, गाण्याचे शब्द लिहिणारे, संगीतकार, शिवाय पडद्यावर दिसणारे, पडद्यामागे या सगळ्यावर काम करणारे, वगैरे. जेव्हा या गाण्यांसाठी रॉयल्टीचा प्रश्न आला तेव्हा मर्यादित लोकांनाच ती मिळावी अशी मागणी लताबाईंनी केली; आणि फक्त मर्यादित लोकांनाच रॉयल्टी मिळायला मोहम्मद रफींनी विरोध केला. लताबाईंच्या मते मर्यादित लोकांचाच गाण्यांच्या यशात हातभार असतो.

२०१९मध्ये लोकप्रिय झालेली रानू मोंडल आठवते? दोन वेळचं जेवण ज्या बाईला परवडत नव्हतं ती बाई अचानक इंटरनेट, सोशल मिडीयावर गाण्यामुळे (घटकाभर) लोकप्रिय झाली. लता मंगेशकरांनी त्याच रानू मोंडलबद्दल खवचट ट्वीट केलं होतं. अबला, दुःखी, गरीब स्त्रीपात्रांसाठी गाणी म्हणणाऱ्या लता मंगेशकरांना त्या नक्की काय गात होत्या हे समजत होतं का?

१९८०च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत, जेव्हा लता मंगेशकर साठीच्या आसपास पोहोचल्या, तोवर मंगेशकरांशी नातं नसणाऱ्या पार्श्वगायिका पुढे आल्याचं दिसत नाही. तोवर त्यांनीही 'आ जाने जा' वगैरे आयटम साँग्ज गायली होती. सुमन कल्याणपूर, आशा भोसले यांना खूप गाणी का मिळाली नाहीत याबद्दल बरंच गॉसिप चघळलं गेलं आहे; मात्र त्याबद्दल बोलायला आता लता मंगेशकर नसल्यामुळे तो विषय सोडून दिलेलाच बरा.

लता मंगेशकर काय किंवा कोणीही काय, नाही समजल्या भावना तर काय बिघडतं असं कुणाला म्हणायचं असेल तर थोडा अर्थशास्त्राचा विचार करू. मी स्त्री आहे म्हणून मी स्त्रीवादी नाही; तर समाजाची अर्धी बुद्धी, कौशल्य, बळ फुकट जाऊ नये म्हणून मी स्त्रीवादी आहे. अधिक स्पर्धा आली की आणखी प्रगती होते. ती स्पर्धा तयार होण्यासाठी समान संधींची गरज असते. जेव्हा कुणी उच्चासनावरची एक व्यक्ती आपली सत्ता वापरून इतरांना बाजूला ठेवायचा प्रयत्न करते तेव्हा स्पर्धा आणि पर्यायानं प्रगती मागे राहतात. दुसऱ्या बाजूनं, उत्क्रांती-मानसशास्त्र असं सांगतं की स्त्रियांमध्ये, आणि स्त्रीकेंद्रित समाजांमध्ये एकमेकांबरोबर काम करायचं, निकोप स्पर्धेतून प्रगती घडवून आणायची अशी रचना दिसते. जेव्हा एखादी दुर्घटना घडते तेव्हा असे समाज त्यातून लवकर सावरतात. पारंपरिक विचार हवा असेल तर ओपन सोर्स प्रोग्रॅमर्समध्ये एक आफ्रिकन म्हण प्रचलित आहे – तुम्हाला वेगात जायचं असेल तर एकटे जा; खूप पुढे जायचं असेल तर एकत्र राहा. असं एकमेकांबरोबर काम करण्यामुळे पार्श्वसंगीतातही काही चांगले प्रयोग घडू शकतील बहुतेक! (कुणाला १९८०च्या दशकातलं संगीत आठवून भीती, शिसारीयुक्त काटा येतो का?)

१९९०च्या शतकाच्या सुरुवातीला भारताची अर्थव्यवस्था खुली झाली. जागतिकीकरणाच्या जोडीला अनेक नवीन, हरहुन्नरी संगीतकार, गायक-गायिका पुढे आले. त्या काळात पुढे आलेला ए. आर. रहमानतर जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे. रहमानच्या संगीताचा बाजच पूर्ण निराळा होता. सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांसारखे गुणी लोक रियालिटी शोजमुळे प्रसिद्ध झाले. विशेषतः या दोघांना पार्श्वगायनातली गंमत समजली – वेगवगळ्या माणसांसाठी आवाज देताना गाण्याची धाटणी, आपला आवाजही बदलायचा हे या दोघांनी सुरू केलं. (शाहरूख खान प्रत्येक सिनेमात शाहरूख खानच असतो; तेच लता मंगेशकरांबद्दलही म्हणता येईल.) समोर पडद्यावर दिसणाऱ्या पात्राला साजेसा आवाज ऐकू न येणं या दोघांच्या गाण्यांत फार दिसत नाही. या दोघांनी पाश्चात्त्य, इंग्रजी संगीत ऐकून त्यानुसार आपल्या पार्श्वगायनात प्रयोगही केले. स्नेहा खानवलकरनं किती तरी, निरनिराळ्या स्थानिक संगीताचा आवाज तिच्या गाण्यांमध्ये वापरला. हे प्रयोग आवडले का नावडले याबद्दल आपापली मतं असणारच; मात्र १९९०च्या नंतर बॉलिवुडी पार्श्वगायनवाल्या संगीतात खूप नावीन्य, वैविध्य आलं. कारण, खूप लोकांबरोबर काम करणं! कोलॅबोरेशन.

आपण नवभांडवलवादी जगात राहतो; यात जी व्यक्ती यशस्वी तीच हुशार, मेहनती आणि यशासाठी आवश्यक असणारे सगळे गुण त्या व्यक्तीत असतात असं मानायचा प्रघात आहे. आपल्या सामाजिक परिस्थितीमुळे आपण यशस्वी झालो हे मान्य करण्याची आवश्यकता अजिबात नसते. उदाहरणार्थ, या नवभांडवलवादी जगात मी शहरी, उच्चवर्णीय, उच्चजातीत आणि शिकलेल्या, सुखवस्तू आईवडलांच्या घरातात जन्माला आले हे सांगायची, मान्य करायची गरज नसते; माझ्या अशा लब्धप्रतिष्ठित पार्श्वभूमीमुळे मला खूप शिकण्याच्या आणि यशासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक संधी मिळाल्या; असा विचार करायची काहीही गरज नाही. मला मिळालेल्या संधींचं मी सोनं केलं, एवढंच बघणं पुरतं. अशाच प्रकारची विधानं लता मंगेशकरांच्या मृत्युनंतर मला समाजमाध्यमांवर दिसली. त्या यशस्वी होत्या; त्यांच्याकडे सत्ता होती; आणि त्यांनी खूप पैसे मिळवले.

यात उठून दिसणारी गोष्ट अशी की लता मंगेशकर या नवभांडवलवादी विचारसरणीसंदर्भात काळाच्या पुढे होत्या. आता जे हिणकस, टाकाऊ समजलं जातं तशी विचारसरणी त्यांनी खूप आधीच आत्मसात केली होती. काळाच्या पुढचे विचार मांडणाऱ्या, द्रष्ट्या लोकांना आपापल्या काळात समाजाचा रोष पत्करावा लागतो. ह्या रोषाची तीव्रता निरनिराळी असेल. लता मंगेशकरांकडे सामाजिक पत असण्यापलीकडे फार काही नसताना त्यांनी खूप कष्ट केले; आपलं दुःख आणि एकटेपणा यांतून आणखी लोकप्रियता मिळवली; त्यातून सत्ता मिळवली आणि ती मागचापुढचा कसलाही विचार न करता वापरली जेव्हा भारतात मध्यमवर्गीय, समाजवादी लोकांचा, विचारांचा प्रभाव होता आणि जागतिकीकरण होण्यासाठी काही दशकं बाकी होती. त्या तेव्हाच नवभांडवलवादी 'पुरुष' बनल्या होत्या.

लता मंगेशकरांचा एकटेपणा त्यांच्या मृत्युपर्यंत, ९२ वर्षं टिकला; कारण त्यांनीच तो मार्ग निवडला होता.

मनीषा Mon, 06/02/2023 - 13:27

बॉलिवुडच्या संगीतातल्या प्रसिद्ध पुरुषांच्या कोंडाळ्यात किशोर कुमार त्यांना सामावून घेत आहे, असं हे चित्र

चित्राचा जो अर्थ तुम्ही सांगितला त्यानमुळे ते चित्र हास्यास्पद वाटते आहे.

अबला, दुःखी, गरीब स्त्रीपात्रांसाठी गाणी म्हणणाऱ्या लता मंगेशकरांना त्या नक्की काय गात होत्या हे समजत होतं का?

तुमच्या मते काय समजायला हवे होते?

आता जे गलिच्छ, टाकाऊ समजलं जातं तशी विचारसरणी त्यांनी खूप आधीच आत्मसात केली होती.

ती गलिच्छ विचारसरणी नक्की काय आहे ते तरी सांगा.

पार्श्वसंगीतात अनेक लोकांचा हातभार असतो; सिनेमात गाण्यासाठी योग्य जागा लिहिणारे, गाण्याचे शब्द लिहिणारे, संगीतकार, शिवाय पडद्यावर दिसणारे, पडद्यामागे या सगळ्यावर काम करणारे, वगैरे. जेव्हा या गाण्यांसाठी रॉयल्टीचा प्रश्न आला तेव्हा मर्यादित लोकांनाच ती मिळावी अशी मागणी लताबाईंनी केली; आणि फक्त मर्यादित लोकांनाच रॉयल्टी मिळायला मोहम्मद रफींनी विरोध केला. लताबाईंच्या मते मर्यादित लोकांचाच गाण्यांच्या यशात हातभार असतो.

हे अंमळ जरा वेगळे असावे असे वाटते. गायक कलाकारांनासुद्धा रॉयल्टी मिळावी असे त्यांचे म्हणणे होते.

चित्रपटाकरता गीत गाणे हा त्यांचा व्यवसाय होता. व्यवसायात यशस्वी होण्याकरता सगळेच प्रयत्न करतात. त्या जेव्हा या क्षेत्रात नविन होत्या तेव्हा त्यांनाही त्याचा अनुभव घ्यावा लागलाच होता की...

असो ..

बिटकॉइनजी बाळा Mon, 06/02/2023 - 16:43

विचार करायला लावणारा लेख आहे खरे.

एक तक्रार: शीर्षक पुरेसे खेचक, खळबळजनक नाही. लता मंगेशकर कश्या झाल्या 'अशा' 'पुरुष', वाचून व्हाल थक्क! असं काहीसे पाहिजे होते!

मला वाटते की लेखातले विचार जरी विचार करायला लावणारे असले तरी त्यातला स्त्रीवादी झुकाव अस्थानी आहे आणि कालसुसंगत नाही. मला वाटतं की त्यांचा स्वभावच असा आतल्या गाठीचा डॉमिनेटिंग, वर्चस्ववादी झाला असावा. त्याला कारणं बहुदा दारिद्र्य, अस्थैर्य, लहान वयातल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या असाव्यात. सतत पावित्र्य, शुचिता, आपण काहीतरी दैवी करतोय ही समाजाने लादलेली किंवा स्वत:हून समजून घेतलेली भूमिका सांभाळत/वठवत इतर समाजापेक्षा जास्तप्रमाणात उंडगी असणाऱ्या फिल्म इंडस्ट्रीत चिवटपणे टिकून राहून एकहाती साम्राज्य उभे करणे हे काही हळुवार मनाच्या, पवित्र हृदयाच्या, कलंदर व्यक्तीचे काम नाही. पक्की व्यवहारी, हिशोबी वगैरे बाई असणार. तुम्ही म्हणता तसं 'आता जे गलिच्छ, टाकाऊ समजलं जातं तशी विचारसरणी त्यांनी खूप आधीच आत्मसात केली होती' हे बरोबरच आहे. परंतु ते पुरुषी वर्चस्वाचं व्यवच्छेदक लक्षण आहे याबाबत मी साशंक आहे. तुम्ही फक्त वर्चस्वाला पुरुषी म्हणताहात, पण चिवट, हिशोबी, सावध आणि व्यवहारी असणे हे तर मला भारतीय संदर्भात खास स्त्रैण गुण वाटतात.

वडीलांच्या शास्त्रीय पवित्र लिगॅसीला पुरणार नाही किंवा फिल्मी संगीताला (क्वचित नाईलाजाने?) वाहून दिलेले आयुष्य यांचा गिल्ट मग सावरकरांची गाणी करणे, आध्यात्मिक गाणी करणे, धाकट्या भावाला क्रियटिव्ह मोकळीक देणे अश्या गोष्टींनी प्रकट झालेला आहे असं मला वाटतं. त्यातही प्रचंड पैसा असला (गुलशन कुमार आठवा) तरी या प्रकारच्या संगीताचा आणि फिल्मी संगीताचा रेशो बरोबर सांभाळला आहे बाईंनी. मला खटकतं ते त्यांनी त्यांच्या बहिणींना कर्ब करायचा प्रयत्न केला हे. त्यातल्या त्यात बंडखोर असणारी आशा मात्र तिच्या गुणांनी झळकली. पण इतर बहिणींना मात्र उघडपणे बोलून दाखवावं इतपत कर्ब केलेलं दिसतंय.

अर्थात लताबाई किंवा मंगेशकर कुटुंब हा एक फेनॉमेनॉन आहे. म्हणजे चोप्रा, कपूर या घराण्यांपेक्षा वेगळा फेनॉमेनॉन आहे. पुंबा म्हणतो तसं एन्जॉय!

पुंबा Tue, 07/02/2023 - 05:16

In reply to by बिटकॉइनजी बाळा

प्रतिसाद आवडला.
कबीर, मीरा, ज्ञानेश्वर, तुकाराम, उमर खय्याम, गालिब, कुसुमाग्रज, ग्रेस ह्यांच्या कविता लोकाभिमुख केल्या. हे काही फार पैसे मिळवून देणारं काम नव्हतं.

पर्णीका Mon, 06/02/2023 - 17:16

लेख आवडला आणि त्यावरची नील लोमस ह्यांची प्रतिक्रिया पटली. माझ्याहि मते इतरांनि पुढे येउ नये ह्यासाठी प्रयत्न करण मग त्या सख्ख्या बहिणि असोत किंवा इतर गायिका, ह्यांच्या मागे त्यांचा मुळ स्वभाव आणि ह्या क्शेत्रातलि जीवघेणि स्पर्धा ह्यांचा एकत्रित परिणाम असावा. स्त्रीमुक्ति आणि इतर तत्सम बाबिंशि त्याचा काहि संबंध नसावा.
सामान्यपणे एकत्रित प्रयत्न कुठल्याहि ध्येयासाठी परिणामकारक ठरतात ह्या मुद्द्याशि सहमत, पण तात्कालिक यश हे ध्येय आणि त्यासाठि जीवघेणि स्पर्धा हे वास्तव असणाऱ्या ह्या व्यवसायात त्यांनि असे प्रयत्न करुन नक्कि काय बदल झाले असत ते समजत नाहि. कारण लेखात उल्लेख केलाय त्याप्रमाणे गाण हे गीतकार, संगीत्कार, वादक आणि गायक ह्यांच्या एकत्रित प्रयत्नांच फळ असते. समजा लता मंगेशकर ह्या व्यक्तिने चार अजुन गायिकांना गाण्यासाठी आडकाठि केलि नसति तर त्यांनि त्या प्रमाणात कमि गाणि गायली असती आणि संधि मिळालेल्या गायिकांपैकि ज्यांचा आवाज लोकप्रिय झाला असता त्या टिकुन राहिल्या असत्या बाकिच्या एकेक दोन दोन गाणि गाउन विस्मृतित गेल्या असत्या. अशि एकाधिकारशाहि न राबवुन सुध्दा पुरुष गायकांमध्ये किशोर कुमार, मुहंमद रफि, मुकेश आणि मन्ना डे हे चारच गायक खर्या अर्थाने बराच काळ टिकुन होते. बाकिचे आले आणि गेले.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/02/2023 - 21:24

In reply to by पर्णीका

मी रोज उठून कोड लिहिते, यात स्त्रीवादाचा काहीही संबंध नसतो. मी आजूबाजूच्या लोकांना मला समजलंय ते शिकवण्याचा प्रयत्न करते यातही स्त्रीवादाचा काही संबंध नसतो. तीच गोष्ट, मी मैत्रिणींबरोबर गप्पा हाणताना लागू असते. मी जेव्हा कुणाला मदत करते किंवा कुणाबद्दल वाईट बोलते तेव्हाही स्त्रीवाद वगैरे विचार करत नाही.

मात्र या आणि अशा सगळ्या कृतींची स्त्रीवादी समीक्षा करता येते.

स्त्रीमुक्ती असा शब्द जेव्हा जोरात होता, तेव्हा जन्माला आलेले लोक आता साधारण पन्नाशीच्या आसपास असावेत. स्त्रीमुक्ती वगैरे शब्द वापरणारं, तसं वाटणारं वाङ्‌मय मला व्यक्तिशः जरा जुनं वाटतं.

चार आणि एक यांत संख्यात्मक फरक आहे. गणितात हे सिद्ध करून दाखवता येतं. एकेश्वरवादी धर्म आणि बहुईश्वरवादी धर्म यांतला फरकही निराळा सांगता येईल. चार निराळ्या कंपन्या एका क्षेत्रात असणं आणि एकाच मोन्सांटोची दादागिरी चालणं यांत फरक असतो. नादाल-फेडरर-मरे-जोकोविच असे चार खेळाडू असणं आणि एकच सरीना विल्यम्स असणं यांत फरक असतो. (अवांतर - ती सरीना विल्यम्स व्यक्तिगत आयुष्यात वंशवाद सहन करते आणि गोड व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. फेडररचा दिलदारपणाही लोकांना माहीत असतो; मरेच्या स्त्रीवादी वर्तनाच्या बातम्याही छापून येतात.)

वामन देशमुख Mon, 06/02/2023 - 19:08

बाकी लता मंगेशकर यांच्यावर चिखल फेक करण्याच्या नादात जात-पात,साम्यवाद, स्त्रीवाद असे सगळेच विषय आलेत!

---

खूपच विनोदी लिखाण! अजून येऊ द्या!

वामन देशमुख Mon, 06/02/2023 - 19:12
ती स्पर्धा तयार होण्यासाठी समान संधींची गरज असते.

या मुद्द्याशी अगदी सहमत आहे. भारतातल्या जाती आधारित आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील अनेक स्त्री-पुरुषांना समान संधी मिळत नाही व शासकीय पातळीवरील भेदभावाचा सामना करावा लागतो. हे आरक्षण काढून टाकले तर त्या सर्वांना समान संधी मिळेल आणि मग त्या अर्ध्या समाज घटकाची देखील प्रगती होईल.

'न'वी बाजू Mon, 06/02/2023 - 20:00

In reply to by वामन देशमुख

लता मंगेशकर या खुल्या प्रवर्गातील नसल्याकारणाने त्यांना संधी मिळाली, आणि शासकीय पातळीवरील भेदभावास त्यामुळे त्यांना तोंड द्यावे लागले नाही, हे नव्यानेच ऐकतोय.

(नाही म्हणजे, लता मंगेशकर या खुल्या प्रवर्गातील नसतीलही कदाचित -- मला माहीत नाही, आणि देणेघेणेही नाही -- परंतु, (नसल्याच तर) (केवळ) या बाबीस त्यांच्या यशाचे श्रेय देणे हे अंमळ ओढूनताणून वाटत नाही काय? (बामणी/उच्चप्रवर्गीय जळजळ?))

वामन देशमुख Tue, 07/02/2023 - 16:57

In reply to by 'न'वी बाजू

ती स्पर्धा तयार होण्यासाठी समान संधींची गरज असते.

धागा लेखिकेचे हे वाक्य आणि माझा वरील प्रतिसाद लता मंगेशकर बद्दल नाही. इन जनरल समान संधी ची गरज असते असा तो संदर्भ आहे त्यात ओढून-ताणून अवर्ण-सवर्ण असं काहीही नाही.

तिरशिंगराव Mon, 06/02/2023 - 22:12

या जगांत् दोनच प्रकारची माणसं असावीत. संगीताचा कान असलेली आणि तो काही प्रमाणात असलेली वा अजिबात नसलेली. लताचा सुरेल आवाज, झेप आणि शब्द व त्यातील भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य, हे ज्यांना नीट ओळखता आले त्यांना अजुनही लता आणि इतर गायिका यांच्यात फार फरक दिसतो. (ही तुलना फक्त लाईट आणि सुगम संगीत यावरच आधारित आहे, शास्त्रीय गायकांबरोबर नाही) तर तो फरक त्यावेळच्या संगीतकारांनाही कानाला जाणवतच असणार. बॉलिवुडमध्ये त्याकाळात फक्त मेरिटलाच महत्व होतं. लताच्या आवाजाचा अजिबात वापर न करणाऱ्या ओपीला देखील तिच्या असामान्य आवाजाच्या देणगीची कल्पना होती. आज वाणी जयराम गेल्यानंतर, प्रत्येक ठिकाणी तिच्या 'बोल रे पपीहरा' या गाण्याचा स्तुतीपर उल्लेख वाचतो. तेंव्हा मनांत येते की त्यातल्या, ' इक मन तरसे इक मन प्या s s सा ' ही ओळ ऐकताना आमच्या कानावर, कल्हई करताना भांड्याच्या तळाला जसे कथीलाचे चरे ओढतात, तशी स्थिती प्रत्येक वेळेस होते. याची कल्पना संगीताचा कान नसलेल्या लोकांना कशी येणार ? तर असो. एन्जॉय !!!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 06/02/2023 - 22:17

In reply to by तिरशिंगराव

संगीताचा कान फक्त मलाच्च असतो; आणि बाकीचे करतात (ती इतरांना आवडली तरीही) कल्हई - ओक्के! ह्याव अ गुड डे. :-)

'न'वी बाजू Sun, 12/02/2023 - 08:46

In reply to by तिरशिंगराव

लताचा सुरेल आवाज, झेप आणि शब्द व त्यातील भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य

सुरेल आवाज... ठीक. शब्द व त्यातील भावना व्यक्त करण्याचे सामर्थ्य... हेही ठीक. झेप... अं...

...जुन्या काळातले के. एल. सहगल किंवा तत्सम गायक जे एका अत्यंत खालच्या पटटीत गायचे, त्या पट्टीत गायला लताला बापजन्मी जमले असते, असे वाटत नाही. (याबद्दल अर्थात मी तिला दोष देणार नाही, परंतु) त्या एक विशिष्ट अतिशय वरच्या (किनऱ्या?) पट्टीबाहेर तिची झेप फारशी नसावी. (उलटपक्षी, तितकी वरची पट्टी हाताळू शकणारे बाकी फारसे कोणी नसावे.)

(सांगण्याचा मतलब, 'झेपे'च्या मुद्द्याबद्दल काहीसा असहमत आहे.)

बाकी, 'लता किंचाळते' हा मतप्रवाह (मी व्यक्तिश: त्याच्याशी असहमत असलो, तरी) आजकालचा नसावा.

- के. एल. सहगलव्यतिरिक्त आयुष्यात दुसरे काहीही न आवडलेल्या माझ्या आजोबांचे लताबद्दल अगदी असेच मत (आणि नेमक्या याच शब्दांत) होते. (नाही म्हणायला, त्यांना त्या मानाने आशा भोसले आवडायची. (तीही, एकट्या 'शूरा मी वंदिले'च्या भांडवलावर.))

- मी इयत्ता पहिलीत होतो, ते वर्ष १९७१ होते. (लताबाई तोपर्यंत तरी बऱ्यापैकी सुश्राव्य गात असे.) त्या काळी आम्ही मुले एक 'रेडियो-रेडियो'चा खेळ खेळीत असू. बोले तो, एक मुलगा दुसऱ्या मुलाच्या हातावर 'रेडियो' बनवीत असे. मग तर्जनीपासून एकएक बोट करीत 'हे रेडियोचे बटण, ही रेडियोची डायल, हे रेडियोचे "स्टेशन"', वगैरे वगैरे करीत करंगळीपर्यंत पोहोचले, की 'आणि लता मंगेशकर गातेऽऽऽऽऽऽ' म्हणून त्या मुलाची करंगळी जोरदार पिळायची.

पक्षी: ऑन/ऑफ/व्हॉल्यूमवाला नॉब.

पक्षी: ट्यूनिंग नॉब.

त्या काळात लता मंगेशकर रेडियोवर बऱ्यापैकी ubiquitous असे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------

त्यातल्या, ' इक मन तरसे इक मन प्या s s सा ' ही ओळ ऐकताना आमच्या कानावर, कल्हई करताना भांड्याच्या तळाला जसे कथीलाचे चरे ओढतात, तशी स्थिती प्रत्येक वेळेस होते.

वाणी जयरामचे 'बोले रे पपीहरा' ऐकताना असे काही मला कधी जाणवले नव्हते. अर्थात, मला संगीताचा कान आहे, असा काही माझा दावा नाही. त्यामुळे, ते ठीकच आहे.

मात्र:

- ते 'कोयल कूऽऽके कूऽऽके' वगैरे गाताना लताचा आवाज जो चिरकतो, तो मात्र मला असह्य होतो.

- फारा वर्षांपूर्वी एकदा ऑफिसातून आम्ही काही सहकर्मी लंचटाईममध्ये जेवायला चाललेलो होतो. घोळक्यातील बहुतांश मंडळी देशी असल्यामुळे गाडीत लताच्या जुन्या गाण्यांची कॅसेट लावलेली होती. घोळक्यात एकच (काहीसा खोडसाळ) पांढरा मनुष्य होता. ते 'आयेगा आनेवाला'चे सुरुवातीचे बोल ऐकून त्याची प्रतिक्रिया: 'या बाईला जबरदस्त, असह्य प्रसूतिवेदना होत आहेत काय?'

असो चालायचेच.

तिरशिंगराव Mon, 13/02/2023 - 07:16

In reply to by 'न'वी बाजू

सर्वप्रथम, माझे संगीतातले अज्ञान मी प्रकटपणे मांडले याबद्दल क्षमा मागतो. ऐसीवर इतके हुशार, धुरंधर, व्यासंगी सदस्य असताना, तिथे एकदम, मलाच्च संगीताचा कान आहे वगैरे म्हणणे, हा पोरकटपणाच झाला. त्यासाठी भविष्यात योग्य ती काळजी घेईनच. लताचा स्वभाव व वागणे आणि तिच्यात असलेली कला, या दोन संपूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत, असे मी समजतो. तरीही, ऐसीतल्या मान्यवरांनी माझे ते नतद्रष्ट कान टोचले याबद्दल त्यांचे आभार.

अतिशहाणा Mon, 06/02/2023 - 23:29

वर्तमानपत्रात राजकीय मंडळी एकमेकांना टोमणे मारताना उदा. "जीतेंद्र आव्हाढांचे मानसिक संतुलन बिघडले आहे" अशी प्रतिक्रिया देतात, तशी वाक्यरचना वापरण्याचा मोह अनावर होतोय. काहीही लिहिलंय.

लता मंगेशकरांकडे सामाजिक पत असण्यापलीकडे फार काही नसताना त्यांनी खूप कष्ट केले; आपलं दुःख आणि एकटेपणा यांतून आणखी लोकप्रियता मिळवली; त्यातून सत्ता मिळवली आणि ती मागचापुढचा कसलाही विचार न करता वापरली जेव्हा भारतात मध्यमवर्गीय, समाजवादी लोकांचा, विचारांचा प्रभाव होता आणि जागतिकीकरण होण्यासाठी काही दशकं बाकी होती. त्या तेव्हाच नवभांडवलवादी 'पुरुष' बनल्या होत्या.

हे तर उच्च आहे. पुरुष होणं ही एक शिवी आहे हे आता कळतंय.

काहीही लिहायचंच झालं तर माझंही (काहीही मत) आहे की लताबाई या स्त्रीवादी होत्या आणि पुरुषांचा तिरस्कार करत होत्या त्यामुळे त्यांनी विवाह केला नाही. येऊद्या पुढचा लेख 'ती स्त्री-मुक्तीची उद्गाती बनली' त्याचा शेवट करताना किशोर, रफी, तलत, कुमार, उदित, मन्ना, विनोद, एसपी वगैरे पुरुषांच्या मांदियाळीत स्त्रीवादाचा खणखणीत हुंकार म्हणजे लता!

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/02/2023 - 00:16

In reply to by अतिशहाणा

अवतरणात लिहिलेला शब्द नेहमीपेक्षा निराळ्या अर्थानं वापरला जातो; असा लिहिण्या-वाचण्याचा मराठीत प्रघात आहे. फ्रेंच-इंग्लिशमध्ये असे शब्द लिहिताना पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये लिहितात.

वामन देशमुख Tue, 07/02/2023 - 20:08

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवतरणात लिहिलेला शब्द नेहमीपेक्षा निराळ्या अर्थानं वापरला जातो

इथे 'पुरुष'चा कोणता निराळा अर्थ अपेक्षित आहे?

अस्वल Tue, 07/02/2023 - 00:20

जाणकारांना ह्याबद्द्ल पुष्कळच ठाउक आहे तेव्हा माझा प्रतिसाद कदाचित कायच्या काय असेल पण तरीही -

(८० सालानंतरची लताबाईंची गाणी मला ऐकवत नाहीत पण ५०-६० साली त्यांनी गायलेल्या गाण्यांमुळे माझ्या चिंधी आयुष्यातले काही क्षण सुसह्यच नव्हे तर आनंदाचे झालेत हे मी कधीही विसरणार नाही - तेव्हा माझ्यासारख्या औरंगजेबालाही लताबाईंबद्दल एक गायिका म्हणून अपार आदर आणि माया आहे. )

लताबाई पुरुषी वर्चस्वाच्या काळात त्यांच्या व्यवसायाच्या शिखरावर पोचल्या. जेव्हा "गायिका" ह्या शब्दाला वाईट वास होता आणि चित्रपटाशी निगडीत असणाऱ्या स्त्रियांना अतिशय हेटाळणीपूर्वक लेखलं जाई अशा काळात लताबाईंनी घेतलेली झेप अक्षरश: थक्क करणारी आहे ह्यात वाद नसावा.
.
वैयक्तिक आयुष्यात लताबाई "स्वातंत्र्य, समता, बंधुता" ह्यांचा पुरस्कार करतील आणि इतर स्त्रियांनाही पुढे घेऊन जातील ही अपेक्षा त्यांच्याकडून असणं सहाजिक आहे -पण भारतात असं होत नाही. (इतर काही "कर" आडनावी मंडळीही इथे डोळ्यांपुढे चमकून जावीत!)

शेवटी -
त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं काही मला ठाउक नाही. पेडर रोडचा उड्डाणपूल- हिंदुत्वाविषयी ममता - थोडा संशयी स्वभाव- इतर गायिकांना मागे ठेवण्यात त्यांचा वाटा इ/इ/इ लिहिलं गेलंय. अमेरिकेत जश्या मोठ्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी चवीने उघड करून पैसे कमावले जातात तितपत भारत विक्रिप्रेमी नाही. तेव्हा भारतात मोठ्यांच्या वैयक्तिक अंगाबद्दल केलेलं लिखाण नेहेमीच नाक मुरडून पाहिलं जातं.

त्यामुळे हे सगळं लताबाईंच्या हयातीत लिहिलं गेलं असतं तर मला आवडलं असतं - पण आता त्यांच्या पश्चात हे अस्थानी वाटतं आहे -
ओसाड मोकळ्या रंगमंचाकडे बघून नाटकावर टीका केल्यासारखं.

.

'न'वी बाजू Tue, 07/02/2023 - 02:02

In reply to by अस्वल

वैयक्तिक आयुष्यात लताबाई "स्वातंत्र्य, समता, बंधुता" ह्यांचा पुरस्कार करतील आणि इतर स्त्रियांनाही पुढे घेऊन जातील ही अपेक्षा त्यांच्याकडून असणं सहाजिक आहे

वैयक्तिक आयुष्यात लताबाईंनी "स्वातंत्र्य, समता, बंधुता" ह्यांचा पुरस्कार नक्की काय म्हणून करावा? आणि इतर स्त्रियांनाही पुढे घेऊन काय म्हणून जावे? अशी अपेक्षा त्यांच्याकडून नक्की काय म्हणून असावी?

पण भारतात असं होत नाही.

नक्की कोठे होते?

(इतर काही "कर" आडनावी मंडळीही इथे डोळ्यांपुढे चमकून जावीत!)

ही कोण मंडळी बुवा?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/02/2023 - 02:50

In reply to by 'न'वी बाजू

कुणी-काय-कसं वागावं याचं हे प्रिस्क्रिप्शन नाही. वर्णन आहे. आणि लेखाचा रोख सुरुवातीच्या परिच्छेदात वर्णन केलेल्या, लिंक दिलेल्या प्रतिक्रियेकडे आहे.

बिटकॉइनजी बाळा Tue, 07/02/2023 - 03:28

In reply to by 'न'वी बाजू

एक गाव एक म्हसोबा ही चळवळ गावागावात पसरत होती. खूपच धामधुमीचा काळ होता तो. नुकतीच आणिबाणि उठली होती. भारतीय लोकशाहीवर आलेले भयाण मळभ दूर झालेले होते. एका अनियतकालिकात वारलीपाड्यातल्या समस्या वाचून झपाटून गेलेला हृदयनाथ एक वर्ष तसल्या पाड्यात राहून आला होता. वारल्यांचे संगीत शिकून ते मूलनिवासी अनाघ्रात संगीत जगासमोर आणायची खूप चाह होती त्याला. जब्बार नावाचा मित्रही त्याच्या आयुष्यात आलेला नव्हता. आणि आज या पारासमोर रणरणत्या उन्हात हे पाचजण लोक गोळा व्हायची वाट पाहत बसले होते. कुणीतरी त्यांना फुटक्या कपात चहा आणि खवट सुकी भेळ आणून दिली. पाचजणांत ती त्यांनी मनापासून वाटून खाल्ली. खाताना उषा म्हणाली "ताई यातल्या तेलाने माझी गगनभेदी किंकाळी सुद्धा ओशट होऊन त्या मुर्दाड सरकारला ती ऐकू आली नाहीतर?" कॉम्रेड लताच्या डोळ्यात टचकन पाणी आले. सायंकाळ होत आली तसे दिवसभर राबराबून रोहयो वर गेलेले लोक अनवाणी परतु लागले. हृदयनाथाने संबळाला हात घातला. आशाने डफ धरला. मीनेने एक आरोळी दिली - "ऐका हो ऐकाssss".. e

"आलीया पार्टी लोकानची, दिल्लीची अवदसा टळली की हो टळली?
क्रांतीची मशाल आणली आम्ही पाचांनी, बातमी कळली का हो कळली?"

अंधार पडताच काही बायका हागणदारीकडे सवयीने पळू लागल्या तेव्हा प्रेक्षक बायकांनी त्यांची टमरेले काढून घेतली आणि त्यांना प्रबोधनला बसवले. एका मागून एक गीते तारस्वरांत गात प्रबोधनाचा उत्सव केला. घशाला कोरड पडली. हृदयनाथ डफ, संबळ वाजवून वाजवून शुद्ध हरपून पडला. त्याला कुणीतरी भानावर आणले. शेवटचे गाणे चालू होते. हुंडाबळीतनंतर गप्पी मासे पाळायचे गाणे सगळ्यांना आवडते हे त्यांना सरावाने ठाऊक होते. कॉम्रेड लताने शेवटचे गाणे सादर केले..बायाबापड्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

कंदिलाच्या प्रकाशात मग बापुड्या मजूरांनी आणलेला भाकरतुकडा सगळ्यांनी गोड मानून खाल्ला. चांदण्याची वाकळ ओढून; रात्रीची बस आली नाही म्हणून; पाची भावंडे तिथल्याच एका शेतकऱ्याच्या कडब्यावर बघता बघता झोपून गेली.

अस्वल Tue, 07/02/2023 - 05:47

In reply to by 'न'वी बाजू

स्वातंत्र्य-समता-बंधुता थोडा जोक झाला हो, मला लेख वाचून असं वाटलं की अशी अपेक्षा आहे की -
स्वत: हाल अपेष्टा सोसून पुढे आल्यावर लताबाईंनी इतर स्त्रियांना मदत करावी (उ.दा इतर गायिका ज्या स्वकर्तृत्वावर पुढे येऊ पहात आहेत)
भारतात हे कदाचित मर्यादित प्रमाणातच होतं असावं विशेषत: जाती वगैरेंनी आणलेल्या मर्यादांंमुळे. म्हणजे मी माझ्या जाती-पोटजातीतल्या लोकांचाच विचार करीन (मुळात करणार असेन तर)

इतरकर - तेंडुलकर, गावसकर, शूमाकर,प्रभाकर - ह्या मंडळींनी समाजासाठी काही केल्याचं ऐकलंय का तुम्ही?

पुंबा Tue, 07/02/2023 - 05:10

एक छोटीशी मुलगी, जिच्या बापाने तिला थोडं गाणं शिकवलं असेल तितकंच, ते सोडून काहीच मोठं डबोलं तिच्यासाठी सोडून गेला नव्हता. ना तिला कुठल्या गुरूने पदरात घेतलं, ना कुठल्या जुन्या स्नेह्याने मदत केली. पाठची चार भावंडे आणि ऐश्वर्यात वाढलेली आणि आताची दैन्यावस्था न सोसवणारी आई यांना सांभाळण्यासाठी बाहेर पडते. ना शिक्षण झालेलं ना कुणी मोठं वडिलधारं पाठीवर हात ठेवायला. अश्या परिस्थितीत सिनेमा लाइनीत आलेल्या मुलींना गळाला लावायला असंख्य डोमकावळे तयारच असायचे. तरीही निर्धाराने बाहेर पडते, कोल्हापुर, पुणे, मुंबई अशी बिर्हाडं थाटत केवळ गोड आवाज एवढ्याच भांडवलावर कामे मिळवते, संगीतकारांच्या तऱ्हा सहन करत प्रचंड मेहनतीच्या बळावर पार्श्वसंगित या उमलत्या विधेत नवनवीन अविष्काराने आपले वेगळे स्थान निर्माण करते. विचार करा, किती लोकांचे किती विचित्र अनुभव आले असतील. शिवाय पैसे चोख मोजून घेते, उगाच नम्रतेचा आव आणून संगीतकारांचे वाट्टेल ते नखरे सहन करत नाही आणि एकटीच्या बळावर पिक्चरच्या पिक्चर गाजवते म्हणून इंडस्ट्रीत बदनाम केले गेले. अश्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहताना किती ग्लास सिलिंग्ज तोडावी लागली असतील. रफीबरोबरचा रॉयल्टीचा वाद हे तर त्यांच्या भारतीय पार्श्वगायनाच्या क्षेत्रातले त्यांचे फार मोठे योगदान आहे. अश्या धडका घेण्यासाठी जीगरा लागतो. पंजाबी लॉबीचा वरचष्मा असणाऱ्या बॉलीवूडमध्ये मराठी त्यात आणखी मुलगी आणि वर तोंड करून बोलणारी, किती लोक टपले असतील तिला संपवायला. तिला स्पर्धा सहन होत नसे म्हणताना कुणी तरी तिला शेंदूर खाऊ घालून आवाज घालवायचा कट केला होता हेदेखिल आठवावे.
अर्थात माणूस म्हटले की डावेउजवे असणारच पण इथे उगाच झोडपायचे म्हणून लिहिल्यासारखे वाटते. अदिति, थोड्या सहृदयतेने पहा, तुमची मते बदलतील नक्की.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 07/02/2023 - 07:29

In reply to by पुंबा

अदिति, थोड्या सहृदयतेने पहा, तुमची मते बदलतील नक्की.

ओक्के! आज ६ फेब्रुवारी १९७१ असेल तर जरूर माझी मतं वेगळी आहेत.

सर्व_संचारी Tue, 07/02/2023 - 11:13

मूळ लेख वाचला आणि इतर अनेक प्रतिक्रियादेखील वाचल्या. लेख जरा उगाच लिहिल्यासारखा वाटतो, म्हणजे आता सहा फेब्रुवारी आलाच आहे, पहिलं पुण्यस्मरण आहेच तर चला लताबाई आणि नव-भांडवलवादी पुरुष वगैरे शीर्षक देऊन काहीतरी खरडूयात. एकतर अशा प्रकारचं लिखाण ( एका अर्थाने स्त्रीवादी दृष्टिकोनातून त्यांच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा)  त्यांच्या हयातीत लिहिलं असतं तर ठीक होतं हे पहिल्यांदा जाणवलं. फेबुवरीलही काही प्रतिक्रिया वाचल्या त्यातून जाणवलेला असं की काही दशकं गाजवलेल्या स्त्रीच्या गायनकलेबद्दल लेखिकेला काही घेणंदेणं नाही असं ती स्पष्ट म्हणते, लता मंगेशकर चार्टर्ड अकाउंटंट असत्या तरी अशाच प्रकारची 'चिकित्सा' केली असती असं अदिती यांचं म्हणणं आहे. मग आज हयात असलेल्या एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्या जीवनाची समीक्षा करा ना - काय ते स्त्रीवादी , नवपुरुषवादी, नवभांडवलवादी, ओल्डफॅशनवादी दृष्टिकोनातून !  मुळात लेख वाचल्यावर ज्या गोष्टी जाणवतात त्या लिहिणं नेहमीच जमतं असं नाही. म्हणून नील लोमस आणि अस्वल यांचे आभार. त्यांच्या प्रतिक्रिया संयत आणि योग्य वाटतात. मलादेखील सत्तरच्या दशकांपर्यंतच्याच लताबाई आवडतात ( मला संगीताचा कान आहे की नाही माहित नाही !). त्यांनी शास्त्रीय गायन केलं नाही याबद्दल मला फार वाईट वाटतं. त्यांच्या कुठल्याशा मालकौंसच्या ख्यालाची छोटी क्लिप आहे. ती ऐकून तर ही खंत आणखीच गडद होते. असो ! 

असो ! काळाचा अक्ष पुढे जात राहतो आणि त्यावर अशा बारीकसारीक हलक्या लाटा येतच राहतात. लेखिकेला धन्यवाद अशासाठी की आता लताबाईंचा स्वर ऐकतो :) 

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/02/2023 - 08:05

In reply to by सर्व_संचारी

ह्या विचारांच्या गप्पा गेली बरीच वर्षं मी मित्रमैत्रिणींशी मारल्या होत्या. ठोस काही लिहिलं नव्हतं; तेवढं महत्त्व देण्याची गरज वाटली नव्हती.

गेल्या वर्षी फेब्रुवारीत, धनमंजिरी साठेंचा लेख वाचून सदर लेख आधी इंग्लिशमध्ये लिहिला. ते काम साधारण आठवडाभर सुरू होतं. मग लेख काही मित्रमैत्रिणींना वाचायला पाठवला; बहुतेक मराठी लोक आणि एक अभारतीय मैत्रीण. त्यांच्या सूचनांनुसार मूळ इंग्लिश लेखात बदलही केले. हे आणखी आठवडाभर सुरू होतं. मी नेमका तेव्हाच नोकरीचा राजीनामा दिला होता. (आणि ह्या टाईमस्टँपची खात्री करण्यासाठी गूगल डॉकात व्हर्जन हिस्टरीही बघितली.)

लेखाच्या संदर्भात पुरुष हा शब्द अवतरणात हवा, असं सुचवणारा मित्रच आहे.

मराठीत भाषांतर जरा गडबडीत केलंय खरं.

वर लिहिल्याप्रमाणे, लेखाचा रोख धनमंजिरी साठेंसारखा विचार करणाऱ्या लोकांकडे आहे, जे लता मंगेशकरांना स्त्री म्हणून जरा जास्त डिस्काऊंट देतात; किंवा तत्सम काही विचार इथेही दिसत आहेतच, त्यांच्याकडे लेखाचा रोख आहे.

१९७० हा उल्लेख लता मंगेशकरांच्या आवाजासाठी नाही. (त्या गेल्या तेव्हा लोकांनी त्यांची जुन्या गाण्यांच्या लिंका शेअर केल्या. मी सहन न होऊन बंद केल्या. मला एवढ्या वरच्या पट्टीतला आवाज ऐकून आता त्रास होतो. काहींना नसेल होत.)

१९७० म्हणजे तोवर त्या साधारण तरुण होत्या. १९७०मध्ये चाळीशी आली. तोवर त्या पैसे, सत्ता वगैरे मिळवून स्थिरस्थावर झालेल्या असाव्यात. मीही साधारण त्याच वयाची आहे आता. लोक आचरटपणे काहीही बोलतात त्याचा माझ्या ढिम्म परिणाम होत नाही; काही परिणाम व्हायचाच तर कंटाळा येतो, म्हणून मी पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करते. माझ्या मर्यादा मी स्वीकारून मी बऱ्यापैकी समाधानी वगैरे असते. माझ्या मैत्रिणींमध्ये अशा स्त्रिया आहेत. तसं काही लता मंगेशकरांच्या आयुष्यात दिसतं का, असा विचार मी करत होते.

असा विचार करण्यामागचं मुख्य कारण इथे अनेकांनी लिहिलेलं आहे. लहानपणी जगलेलं खडतर आयुष्य. माझ्या लहानपणीही आजूबाजूच्या इतर बऱ्याच लोकांच्या तुलनेत किंचित खाचखळगे होते; आणि त्याचा व्हिक्टिम काँप्लेक्स मी अनेक वर्षं बाळगला. आता तो उरलेला नाही. साधारण विसेक वर्षं मी तो बोजा बाळगला असेल. त्यावरून आठवतात त्या अमेरिकेतल्या दुसऱ्या पिढीतल्या पॉर्नविरोधी स्त्रीवादी - त्यांनाही व्हिक्टिम काँप्लेक्स होता असं विश्लेषण वाचनात आलं आहे. हा बोजा बाळगणारी माणसं फार दिलदार नसावीत; बोजा बाळगून होते तेव्हा मी स्वतः आजच्याएवढी दिलदार निश्चितच नव्हते. म्हणून रानू मोंडल आठवली. सुगंधा मिश्रानं केलेल्या मिमिक्रीचीही आठवण झाली.

दिलदारपणावरून सुनिधी चौहानही आठवली. फारा वर्षांपूर्वी जेव्हा सुनिधी चौहान आघाडीची गायिका होती तेव्हा ८ मार्चला एका कार्यक्रमात तिला बोलावलं होतं. गाण्याचा कार्यक्रम होता आणि त्यात तिच्या जोडीला होती अर्जुन पुरस्कार विजेती सुनीता रानी. सुनीता रानीला गाण्यात फार गती नसावी, असा तेव्हा माझा समज झाला. त्या दोघी गाताना सुनीता रानीचा आवाज ऐकू येतच नव्हता, तोंड हलताना दिसत होतं. त्यांचं गाणं म्हणून झाल्यावर सुनिधी चौहान म्हणाली की, सुनीता रानीचा आवाज अगदी खर्जातला आहे, त्यामुळे गाताना मला खालच्या नोट्स सहज ऐकू येत होत्या आणि तो फारच छान अनुभव होता.

लहानपणी, तरुण वयात कष्ट केले हे नाकारण्याचा प्रश्न येतच नाही. पण माणूस म्हणून किती मोठ्या झाल्या? तर फार काही हातात येत नाही. मग लहानपणीच्या गोडगोड आठवणी तेवढ्या काढायच्या, हे पूर्ण चित्र नाही. हा डिस्नेचा सिनेमा झाला.

आणि अनपेक्षितरीत्या व्यक्तीपूजा बघायला मिळाली; मला गॉसिपमध्ये रस नाही हे स्वच्छ लिहूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रतिक्रिया आल्या. विशेषतः अनभ्यस्त, आणि पुरुषमंडळींनी (आता अवतरणं नाहीत बरं) फार करमणूक केली; ती मात्र अगदी अपेक्षित होती.

Rajesh188 Tue, 07/02/2023 - 12:34

लता दीदी च्या आवाजात जादू आहे.(आवाजाची वारंवारता,ध्वनी चे परिणाम हे सर्व विषय बाजूला ठेवून)

त्यांचे गाणे मनाला भिडते.अंगावर काटा उभा राहतो.

त्याच त्यांच्या दैवी देणगी मुळे त्या यशस्वी झाल्या.
बाकी गायकी हा पण व्यवसाय च आहे. प्रतिस्पर्धी निर्माण च होवू नयेत किंवा जे आहेत त्यांचे अस्तित्व संपावे.
असे प्रयत्न सर्व च व्यवसायिक करतात.
तसे प्रयत्न लता मंगेशकर नी पण केले असणार.
पण तो विषय वेगळा आहे.
सर्व सरकारी कर भरणे,स्वतःचा प्रभाव दाघवून स्वतःचा फायदा करून .
जसे विदेशी गाड्यावर च कर माफ करून घेणे.
असले उद्योग कोणी करत असेल तर तो व्यक्ती अयोग्य आहे.

समाजाला काय मदत केली हा प्रश्न गैर वाजवी आहे

shantadurga Tue, 07/02/2023 - 16:11

तेरा वर्षांची मुलगी वडिलांच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबासाठी पैसे मिळावायाला एकटी घराबाहेर पडते, ती जबाबदारी सर्वस्वी एकटी निभावते आणि प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊनही एकटी राहाते यात पुष्कळ सुसंगती आहे.

वामन देशमुख Tue, 07/02/2023 - 17:05

हं...

ती नव-भांडवलवादी पुरुष बनली

१. "ती सराईत दरोडेखोर बनली" या चालीवरचे हे वाक्य आहे की काय?

२. नव-भांडवलवादी, जून-भांडवलवादी, भांडवलवादी, भांडवलवादी-प्रो, भांडवलवादी-मॅक्स, भांडवलवादी-मॅक्स-प्रो-अल्ट्रा... हे किंवा यासारखे इतर काहीही (कायदेशीर) बनण्यात किंवा असण्यात काय चूक आहे?

३. पुरुष, स्त्री, लिंगनिरपेक्ष (किंवा योनीनिरपेक्ष (स्त्री वादी?))... हे किंवा यासारखे इतर काहीही (कायदेशीर) बनण्यात किंवा असण्यात काय चूक आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/02/2023 - 07:37

वाचक आणि प्रतिसादकांचे आभार. विशेषतः, लेखातले मुद्दे समजून न घेता ते मुद्दे सिद्ध करणाऱ्या प्रतिसादकांचे विशेष आभार. आता आणखी कुणाला माझी सवंग करमणूक करायची असेल तर जरूर करा. मी त्याला प्रतिसाद देणार नाही.

वामन देशमुख Sat, 11/02/2023 - 14:16

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मी आहेच रणछोड.

शतशः सहमत

चिवडा खाणार?

नुसता चिवडा नाही, किमान दोन पेग्ज तरी हवेत सोबत या विकांताला.

---

अवांतर: चिडकू मुलींना* चिडवायला मस्त मजा येते बरं!

---

चिडकू मुलींना* हे केवळ एक स्त्रीवादी (माझं गृहीतक) स्त्रीशी (हेही माझं गृहीतक) संवादताना वापरलेलं प्लेसहोल्डर आहे; चिडकू मुलींना / चिडकू मुलांना / चिडकू इतरांना असं सर्व त्यात अंतर्भूत आहे असं समजा.

अस्वल Wed, 08/02/2023 - 23:11

In reply to by विवेक पटाईत

तुम्ही लेख काय लिहिला हे वाचता तरी का पटाईत काका?
म्हणजे कमॉन, तुम्हाला खरंच हा लेख वाचून जर पहिली प्रतिक्रिया हीच द्यावीशी वाटत असेल तर प्लीज काळजी घ्या.

विवेक पटाईत Sat, 11/02/2023 - 18:46

In reply to by अस्वल

असे आहे.between the lines. हा प्रकार मला निदान जास्त कळतो. मूळ समस्या काय आहे हे पटकन कळते तिच्यावर कितीही शब्दांचे थर चढवले असतील तरीही.

'न'वी बाजू Sat, 11/02/2023 - 20:23

In reply to by विवेक पटाईत

लेख गंडलेला आहे किंवा नाही, याबद्दल दुमत असू शकेलही. परंतु, लता मंगेशकर या मोदीसमर्थक असल्यामुळे त्यांची निंदा करण्यास्तव हा लेख लिहिलेला आहे, हा निव्वळ जावईशोध आहे. (आम्हीदेखील लेख between the linesच वाचला, परंतु, निदान आम्हाला तरी असे काही जाणवले नाही ब्वॉ.)

Don’t be a one-trick pony, पटाईतकाका! (नाही म्हणजे, तुमचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य मान्यच आहे, नि त्या अ.व्य.स्वा.त one-trick pony असण्याच्या स्वा.चासुद्धा समावेश होतोच; परंतु, वाचकाला (पक्षी: तुमच्या होतकरू ग्राहकाला) ते कंटाळवाणे होऊ शकते, इतकेच.)

त्यापेक्षा, आमच्या वुड्डहौससाहेबाच्या जीव्ह्ज़चे पात्र करते, त्याप्रमाणे, तुम्ही Psychology of the Individualचा विचार का करीत नाही? बोले तो, (हा लेख गंडलेला आहे, असे गृहीत धरल्यास,) लेखिका स्त्रीवादी आहे, त्यामुळे विषय (ओढूनताणून) स्त्रीवादाच्या परिप्रेक्ष्यात (आणि परिभाषेत) आणण्याचा तिने प्रयत्न केलेला आहे (थोडक्यात, लेखिकेचे one-trick ponyism?), आणि म्हणून लेख गंडलेला आहे, असे काहीसे अॅनालिलिस, वगैरे?

——————————

तळटीपा:

पक्षी, हा लेख गंडलेला नाही, असे लेखिकेचे मत असणे साहजिक आहे. (किंबहुना, स्वाभाविक आहे, असेही म्हणता येईल. (चूभूद्याघ्या.)) मात्र, इतरांचे (विशेषेकरून (असलेच, तर१अ) वाचकांचे) तसे मत असूही शकेल वा नसूही शकेल.

१अ या लेखास असंख्य प्रतिसाद आहेत, ही बाब येथे जमेस धरता येणार नाही. लेखावर प्रतिसाद पाडण्याकरिता (भले लेख itself ‘पाडलेला’ असो वा नसो) लेख (संपूर्ण वा between the lines) वाचलेला असणे ही पूर्वावश्यकता नाही.

हो, आख्खा वाचायला नाहीतर इतका पेशन्स कोणाजवळ आहे?

ही आमची one-trick ponyगिरी समजायची तर समजा, हवे तर. (कारण तशी ती आहेच.) इन एनी केस, आम्ही इथे वुड्डहौससाहेबाला विकायला बसलेलो नाही. (कारण, एक तर, वुड्डहौससाहेबाच्या हयातीत – आणि त्याच्या मृत्यूनंतरसुद्धा अनेक वर्षांपर्यंत – त्याचा पुष्कळ खप झाला. त्यामुळे, वुड्डहौससाहेबाला (अथवा त्याच्या मृतात्म्याला) अधिक खपाची गरज आहेच, असे नाही. दुसरी गोष्ट, वुड्डहौससाहेब ही हर एक के बस की बात नाही, हे (सच्चे वुड्डहौसप्रेमी म्हणून) आम्ही जाणतो. वुड्डहौससाहेबाची चव नसलेल्यापुढे वुड्डहौससाहेब वाचून ‘कालच्या गोंधळ बरा होता’ म्हणण्याची पाळी आणून वुड्डहौससाहेबाची लेव्हल खाली आणण्याचा आमचा इरादा नाही.) असो.

वुड्डहौससाहेबाची जीव्ह्ज़/बर्टी वूस्टर मालिका ही खरे तर (त्याच्या इतर औटपुटच्या तुलनेत) मीडियोकर, कदाचित काहीशी रटाळसुद्धा आहे.४अ मात्र, कशाच्या अॅनालिसिसकरिता कधी कशाचा कसा उपयोग होऊ शकेल, ते सांगवत नाही. चालायचेच.

४अ बोले तो, वुड्डहौससाहेबाच्या पहिल्या इयत्तेतीलच वाचकाला साजेशी. (दुर्दैवाने, बहुसंख्य भारतीयांना (माहीत असलीच, तर) तेवढी एकच मालिका (बहुधा ऐकून) माहीत असते. परंतु ते असो.)

'न'वी बाजू Sun, 12/02/2023 - 02:42

In reply to by अस्वल

Not a word less, not a word more!

मार्मिक! (माझी श्रेणिप्रदानव्यवस्था बंद पडलेली आहे (आणि/किंवा बंद पाडण्यात आलेली आहे), म्हणून शब्दांनीच ही पोच.)

Rajesh188 Wed, 08/02/2023 - 13:29

हुशार लोक कोणाची समर्थक नसतात.
( आणि प्रतेक यशस्वी व्यक्ती कोणत्या ही क्षेत्रातील हा हुशार च असतो).

ती व्यक्ती फक्त सत्ता धारी लोकांचीच समर्थक असते
मग ते राजकीय सत्ता धारी असू किंवा बाकी.
आणि हे सिंपल सूत्र आदिती मॅडम ला नक्कीच माहीत आहे.
Lata जी मोदी च्या समर्थक होत्या म्हणून त्यांनी हा लेख लिहला नाही.
एक वेगळी बाजू मांडायचा त्यांनी प्रयत्न केला आहे.
पेडर रोड च उड्डाण पूल काँग्रेस सरकार नी थांबवला होता लता जी नी विरोध केल्या मुळे.
तेव्हा काँग्रेस सत्तेत होती हुशार लोक काँग्रेस चे समर्थक होते.
त्या मुळे समर्थक हा शब्द च स्थिती सापेक्ष आहे.
सर्वांना माहीत आहे

आता हुशार शब्दाचा अर्थ brilliant हा नक्कीच नाही.
खूप स्वार्थी असा हुशार ह्या शब्दाचा इथे अर्थ आहे

जयदीप चिपलकट्टी Wed, 08/02/2023 - 23:27

मी: Why did Lata Mangeshkar become a neo-capitalist 'male'?

चॅ: Lata Mangeshkar did not become a neo-capitalist "male." This statement is incorrect and misleading. Lata Mangeshkar is a female Indian playback singer who has been widely regarded as one of the greatest voices in Indian classical and film music. She has never been associated with neo-capitalism or any change in gender identity.

मा.मख: माझ्या मते मूळ प्रश्नाचा निवाडा झालेला आहे. पण मी ‘पुरुष’ असं एकेरी अवतरणात लिहिलेलं असताना चॅ. ने त्याचं दुहेरी अवतरण केलं. ह्या सगळ्या विषयात महत्वाचा मुद्दा (कुठे असलाच तर) तो आहे.

----

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/02/2023 - 00:02

In reply to by जयदीप चिपलकट्टी

मी आधीच लिहिलं होतं, Male असं लिहून बघा आता! बाईनं सांगितलं म्हणून आणि तुम्हाला माझ्या लोकप्रियतेचा दुस्वास वाटतो म्हणून तुम्ही माझ्याकडे लक्ष देत नाही!

जयदीप चिपलकट्टी Thu, 09/02/2023 - 00:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे घ्या. ‘कॅपिटॅलिस्ट’मधला ’सी’ पण कॅपिटल काढला आहे.

मी: Why did Lata Mangeshkar become a neo-Capitalist 'Male'?

चॅ: Lata Mangeshkar did not become a neo-Capitalist 'Male.' Lata Mangeshkar is a renowned Indian singer and music composer. She has been referred to as the "Nightingale of India" due to her contributions to Indian music. There is no evidence or information to suggest that she became a neo-Capitalist 'Male.' This appears to be a mistake or a misinterpretation.

नायटिंगेल हा पक्षी ‘पुरुष’ असू शकतो का हा प्रश्न तुम्हालाच सोडवावा लागेल.

---

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/02/2023 - 04:47

In reply to by जयदीप चिपलकट्टी

हे पाहा, आता तुम्ही आधीच्या चुकीची भरपाई म्हणून जादापणा करत दुसऱ्या टोकाला गेला आहात. इंग्रजीत एक तर अवतरणं वापरा किंवा पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये लिहा. तुम्ही हे दोन्ही वापरल्यावर त्याचं मराठी भाषांतर/लिप्यंतर कसं करणार?

नायटिंगेल हा पक्षी जर खरंच पक्षी असेल तर तो लैंगिक पुनरुत्पादन करणारा असणार. म्हणजे त्यांच्यातही पुरुष असणार. म्हणजे पुरुषसत्ता आलीच. म्हणजे 'पुरुष' आलेच. सोप्पंय.

त्यातून मराठीत तो पक्षी असतो. म्हणजे व्याकरणी पुरुष आले. पुरुष आले की 'पुरुष' येणारच. एवढं सोपंय ते! ते काय ते क्विड प्रो क्वो का हेन्स द प्रूफ म्हणतात ते हेच!

. स्वारगेटला स्वारही नाही आणि गेटही नाही, वगैरे.

'न'वी बाजू Thu, 09/02/2023 - 07:13

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नायटिंगेल हा पक्षी जर खरंच पक्षी असेल तर तो लैंगिक पुनरुत्पादन करणारा असणार.

हे लॉजिक अंमळ गंडलेले वाटते. लता मंगेशकरांना लोक ‘भारताच्या नाइटिंगेल’ म्हणत. परंतु, याचा अर्थ लोक त्यांच्यावर पक्षी असण्याचा आणि/किंवा लैंगिक पुनरुत्पादनाचा (अप्रत्यक्षपणे) आरोप करत, असा खचितच घेता येऊ नये. (हेच फ्लॉरेन्स नाइटिंगेलबद्दल, किंवा फॉर्दॅट्मॅटर मिलानीज़ नाइटिंगेल बियांका कास्ताफियोरे यांच्या संदर्भातसुद्धा.)

ते काय ते क्विड प्रो क्वो का हेन्स द प्रूफ म्हणतात ते हेच!

:D

रिडक्शियो अॅड अॅब्सर्डम. (की अॅब्सर्डुम. तेच ते.)

बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 09/02/2023 - 19:55

In reply to by 'न'वी बाजू

लता मंगेशकरांना लोक ‘भारताच्या नाइटिंगेल’ म्हणत.

म्हणजे त्यांचं नाव भारताच्या आणि आडनाव नायटिंगेल? तुमचंच लॉजिक चालत नाहीये!

रिडक्शियो अॅड अॅब्सर्डम. (की अॅब्सर्डुम. तेच ते.)

थँक्यू. :ड

बाकी चालू देणार!

चिमणराव Thu, 09/02/2023 - 17:23

लताबद्दल या फिल्म उद्योगातले किंवा मनोरंजन उद्योगातले म्हणू लोक काय बोलतात यांचा विचार केला पाहिजे. पण मोठी तोडीस तोड लोकं फार क्वचितच तोंड उघडतात, उगाच धंदा आणि वैयक्तिक मतं यांची भेसळ करत नाहीत.
असो.
(जे लिहिलं गेलेलं नाही पण खाजगीत बोललं जातं ते फार वेगळं आहे.)

सुरेंद्रनारायण हत्ती Sun, 12/02/2023 - 21:02

जल्ला मुळातला लेख आणि प्रतिक्रिया यापैकी काहीही कळलं नाही.

आम्ही आपले पुख्खे झोडणे आणि कोणाचीही पर्वा न करता दिसेल त्याला पायदळी तुडविणे एवढ्यापुरतेच.