Skip to main content

सिंधुआज्जी आणि वाघाची शिकार

सिंधुआज्जींनी आपल्या हातातलं पुस्तक आरामखुर्चीलगतच्या टेबलवर ठेवलं, आणि समाधानाचा सुस्कारा सोडला.

 

"किती छान लिहिलंय कॉर्बेटनं! आणि अनुवादही फक्कड जमलाय," आरामखुर्चीवर डोलत त्या म्हणाल्या.

 

"कोणतं पुस्तक वाचताय?" मी कुतूहलाने विचारलं.

 

"कुमाऊंचे नरभक्षक. परवा रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता वाचून संपवलं."

 

"चित्ते नरभक्षक असतात?" मी आश्चर्याने विचारलं. "मी जॉय अँडरसनच्या पिप्पा पुस्तकात वाचलं होतं की चित्ते माणसांवर हल्ला करत नाहीत म्हणून."

 

"रुद्रप्रयागचा नरभक्षक चित्ता हे पुस्तक बिबळ्याबद्दल आहे. चित्ता हा शब्द चुकून योजला गेला असावा."

 

"आणि कुमाऊंचे नरभक्षकसुद्धा बिबळ्याबद्दल आहे का?"

 

"त्यात वाघ आणि बिबळे दोघांच्याही शिकारीचे लेख आहेत. आणि पुस्तकाचं नावही चपखल आहे - चांगला श्लेष साधलाय."

 

"म्हणजे?" मी न उमजून विचारलं.

 

"आता बघ - वाघ आणि बिबळे मार्जारवर्गीय प्राणी आहेत. आपलं नेहमीचं भक्ष्य खाण्याऐवजी माणसांना खाणं हे कुकर्म करणारे वाघबिबळे म्हणजे कु-माऊ झाले ना!" सिंधुआज्जी गगनभेदी स्मितहास्य करू लागल्या. मीसुद्धा माफक हसलो.

 

जरा विचार करून मी म्हणालो, "जिम कॉर्बेट, केनेथ अँडरसन, आपले लालू दुर्वे, व्यंकटेश माडगूळकर, मारोतराव चितमपल्ली अशांनी जंगलं किती जवळून पहिली असतील ना? वाघाच्या किंवा बिबट्याच्या मागावर जंगलात जाणं हे किती चित्तथरारक असेल. आता मुळात जंगलंच कमी झालीत, प्राणी कमी झाले, आणि जंगलात जाण्याबद्दल निर्बंध आलेत. तसा थरार कोणाला अनुभवायला मिळणार?"

 

"खरंय तुझं. पण आपण वाचन तर करू शकतोच की!" सिंधुआज्जी म्हणाल्या, आणि धोत्र्याचा चहा करायला किचनमध्ये गेल्या. मी चित्त्याच्या (किंवा बिबळ्याच्या) चपळाईने पटकन पळ काढला.

 

कॉर्बेटच्या पुस्तकांनी प्रेरित झालेल्या सिंधुआज्जी पुढील बरेच दिवस शिकारकथांचाच खुराक घेत होत्या. कधी आरामखुर्चीत बसून पुस्तकं वाच, कधी बाकीची कामं करताना ऑडिओ बुक्स ऐक, कधी अशुलियन परशू परजत मुखोद्गत झालेल्या आवडत्या परिच्छेदांची उजळणी कर, असं एकूण चाललं होतं.

 

आणि अचानक एके दिवशी टॅब्लेटवरचं ई-वर्तमानपत्र नाचवत सिंधुआज्जी म्हणाल्या, "ही बातमी वाचलीस का? टायगर सफारीमधून वाघ फरार - राष्ट्रीय उद्यानातील रहिवाशांना सावधगिरीची सूचना."

 

"आपल्या नॅशनल पार्कात?" मी अचंबित होऊन विचारलं. आता, आमच्या शहरातलं नॅशनल पार्क म्हणजे शहराचं फुफ्फुस आणि वैभव दोन्ही होतं. (जंगलांचं एक बरं आहे - दुसऱ्या कोणत्याही प्रकारच्या वैभवाला फुफ्फुस म्हटलं तर कोणाच्यातरी भावना दुखावतील; ती अडचण जंगलांना नाही.) प्रभातफेऱ्या करणारे लोक, पक्षीनिरीक्षण करणारे निसर्गप्रेमी, साधे पर्यटक, युगुलं, पाकीटमार असे बऱ्याच तऱ्हांचे लोक नॅशनल पार्कात जातात. त्याशिवाय, पार्कातील पाड्यांमध्ये राहणारे स्थानिक रहिवासी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटचे कर्मचारी यांचा तर तोच अधिवास आहे. तिथल्या बिबळ्यांसमवेत सहजीवनाची माणसांना (आणि माणसांसमवेत सहजीवनाची बिबळ्यांना) सवय आहे, पण वाघ? बिबळ्याच्या चारसहा पट वजनदार, शूर आणि रौद्र जनावर ते!

 

"आपण बरोब्बर पंचेचाळीस मिनिटांत निघतोय. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसरनं बोलावलंय आपल्याला," सिंधुआज्जी म्हणाल्या, आणि मी अधिकच अचंबित झालो.

 

सिंधुआज्जींच्या घड्याळात पावणेनऊचा ठोका पडला तेव्हा आम्ही घराचं कुलूप लावत होतो. लँटर्नहेडने - म्हणजे सिंधुआज्जींच्या ड्रायव्हरने - त्यांची बेन्टली चाळीसच्या वेगमर्यादेत भरधाव सोडली, आणि आम्ही रमत गमत नॅशनल पार्कला पोहोचलो. प्रवासात सिंधुआज्जी परीक्षेला चाललेल्या अभ्यासू विद्यार्थिनीप्रमाणे हिरवे आणि गुलाबी हायलायटर घेऊन आपल्या नोट्सची पुन्हापुन्हा उजळणी करत होत्या, त्यामुळे त्यांच्याशी काही बोलता आलं नाही.

 

फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ऑफिसरने आमचे स्वागत केलं. (तत्पूर्वी, नॅशनल पार्कचे पार्किंग चार्जेस ऐकून लँटर्नहेड कुरकुरला होता आणि त्याने पार्कबाहेर रस्त्यावर गाडी पार्क करायचा प्रस्ताव मांडला होता; पण सिंधुआज्जींनी त्याला गाडी पार्कच्या पार्किंगमध्येच पार्क करून आपल्यासोबत येण्यास सांगितलं होतं.)

 

"तुम्ही ऑस्ट्रेलियातल्या मोकाट म्हशींचा कसा बंदोबस्त केला आणि भारतात कांगारूंचं पुनरुच्चाटन कसं केलं याची वदंता प्रसिद्ध आहे," फॉ. डि. चे ऑ. म्हणाले.

 

एरवी सिंधुआज्जींनी त्याच्या वाक्यातील चुकांचा समाचार घेतला असता, पण आता त्यांना गायब झालेला वाघच दिसत होता. (म्हणजे, दिसत नव्हता. दिसत असता तर त्याला गायब झालेला म्हटलं नसतं.)

 

"वाघ कसा पोबारित झाला?" फॉ. डि. च्या ऑ. ला थांबवत सिंधुआज्जींनी विचारले.

 

"तुमच्या त्या कार्यबाहुल्यामुळेच इथे प्राप्त परिस्थितीत तुम्हाला पाचावर धारण करण्याचा निर्णय मी घेतला. तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटशी लग्नाळू नसूनदेखील." सिंधुआज्जींच्या व्यत्ययाला न जुमानता फॉ. डि. च्या ऑ. नी आपला मुद्दा पूर्ण केला. (ते पूर्वायुष्यात कॉलेजच्या वादविवाद चमूत असावेत.)

 

मी आणि लँटर्नहेड सिंधुआज्जींकडे बघू लागलो. "कामगिरी म्हणायचंय त्यांना; आणि पाचारण; आणि संलग्न," सिंधुआज्जी पुटपुटल्या.

 

"चला, आपण टायगर सफारीकडे जाऊ," असं म्हणत सिंधुआज्जी उठून उभ्या राहिल्या. फॉ. डि. च्या ऑ. नादेखील नाईलाजानं उठावं लागलं.

 

"मी काय म्हणतो, मी थोडा कार्यबहुल आहे. माझा सहचारी रमेश येईल तुमच्यासमवेत." एक क्षण विचार करून परत आपल्या गुबगुबीत खुर्चीत बसत फॉ. डि. चे ऑ. म्हणाले. "तुम्हाला बोलवायची कल्पनादेखील त्याचीच."

 

कोपऱ्यात उभ्या असलेल्या एका तरुण ऑफिसरने मान तुकवली, आणि तो आमच्यासोबत फॉ. डि. च्या ऑ. च्या ऑ. बाहेर पडला. "सहकारीसहकारी म्हणायचंय त्यांना," रमेश पुटपुटला. त्याच्या जीपमध्ये स्थानापन्न होऊन आम्ही टायगर सफारीच्या गेटपाशी पोहोचलो.

 

रमेश सांगू लागला, "इथे दोन गेट आहेत. दोन्ही गेट बंद असली की त्यांच्यामध्ये मोठ्या पिंजऱ्यासारखी चांगली प्रशस्त पण बंदिस्त जागा असते. बस बाहेरून आत येताना आधी बाहेरचं गेट दुरून उघडलं जातं. दोन गेटमधील जागेत बस येऊन थांबते, मग बाहेरचं गेट बंद होतं. त्यानंतर एकजण त्या जागेची तपासणी करतो, आणि आतलं गेट दुरून उघडतो, मग बस आत जाते, आणि त्यानंतर आतलं गेट बंद होतं."

 

"एक मिनिट - त्या जागेची तपासणी कशी होते?" मी विचारलं.

 

"बाहेरच्या गेटवर सीसीटीव्ही कॅमेरा आहे. त्याद्वारे दुरून - म्हणजे आमच्या ऑफिसच्या कंट्रोल रूममधून - निरीक्षण केलं जातं."

 

"अच्छा. पुढे सांगा."

 

"बस बाहेर येताना हीच प्रक्रिया उलट्या क्रमाने होते. आधी आतलं गेट उघडतं. बस मधल्या जागेत येऊन थांबते. मग आतलं गेट बंद होतं, आणि नंतरच बाहेरचं गेट उघडतं."

 

"मग वाघ कसा पळाला?" सिंधुआज्जी मुद्द्यावर आल्या.

 

"तेच कळत नाहीये. वातावरणनिर्मिती करण्यासाठी म्हणून दोन गेटमधल्या जागेत पक्का रस्ता न करता माती ठेवलीय. तिथे वाघाच्या पावलांचे ठसे दिसले नाहीत. आणि सफारीच्या कुंपणाबाहेर पडायला दुसरा मार्गच नाहीये."

 

"समजलं. बरं, वाघ फरार झाला आहे हे कधी आणि कसं कळलं?"

 

"सफारीची बस थांबली तेव्हा ड्रायव्हरला रस्त्यालगत वाघ दिसला. त्याने - म्हणजे ड्रायव्हरनेवाघाने नव्हे प्रसंगावधान राखून बसचे दरवाजे बंद ठेवले म्हणून बरं, नाहीतर बाका प्रसंग ओढवला असता!"

 

लँटर्नहेडच्या चेहऱ्यावर स्मितहास्य पसरलं. कोणत्याही संदर्भात कोणत्याही ड्रायव्हरची वाखाणणी झाली तर त्याला आनंद होत असे. त्याला मत्सर या भावनेचा स्पर्शही होत नसे - कदाचित मत्सर ही भावना फक्त Homo Sapiens मध्येच निर्माण झाली असावी. (चाणाक्ष वाचकांनी जाणले असेलच, की Lanternhead हा त्याच्या प्रजातीच्या नावाचा इंग्रजीतील anagram होता.)

 

सिंधुआज्जीही हसल्या. "ती बस कोठे आहे?" त्यांनी विचारले.

 

"इथे जवळच आहे," रमेशने उत्तर दिले आणि आम्ही चालत बसकडे निघालो.

 

"बसच्या मागच्या बंपरवर ओरखडे दिसतात का बघा," सिंधुआज्जींनी सूचना केली. आणि खरोखरच, तिथे वाघाच्या पंजाचे खोल ओरखडे दिलेत होते.

 

"सिंधुआज्जी, तुम्ही ग्रेट आहात. तुम्हाला कसं कळलं?" रमेशने विचारलं.

 

"साधं आहे. दुसरा कोणता मार्ग नाही म्हणजे वाघ गेटमधूनच बाहेर आला असणार. आता सीसीटीव्हीत तो का दिसला नाही? आतलं गेट उघडण्याची वाट बघत बस थांबली होती तेव्हा वाघाने बसच्या मागच्या बंपरवर उडी मारली असावी. शेवटच्या सीटवर धक्के बसतात म्हणून कोणी प्रवासी तिथे शक्यतो बसत नाहीत; त्यामुळे वाघाच्या उडीचा धक्का कोणाला जाणवला नसेल. बस सुरू झाली तेव्हा वाघ सीसीटीव्हीत दिसला नाही, कारण कॅमेरा फक्त बाहेरच्या गेटवर आहे - बाहेरून कोणी चोरून आत जात नाही ना हे पाहण्यासाठी. आतून चोरून कोण बाहेर जाईल असा विचारही कोणी केला नसेल." सिंधुआज्जी विजयी मुद्रेने म्हणाल्या.

 

"चला, हे कोडं तर सुटलं. मग आता वाघाचा शोध कसा घ्यायचा?" रमेशने विचारलं.

 

"मला थोडा विचार करू द्या. आणि काही सामुग्री आणावी लागेल, काही पूर्वतयारी करावी लागेल. मला मेन गेटपाशी सोडा, मी थोड्या वेळात परतेन."

 

मेन गेटपाशी पोचल्यावर माझ्याकडे वळून सिंधुआज्जी म्हणाल्या, "दहा किलो मटण घेऊन ये, आणि इथे आल्यावर त्याचे लहान लहान तुकडे करून घे. बाकीची तयारी मी करते."

 

बाजारातून मटण घेऊन, कावळ्यांचा आणि कुत्र्यांचा ससेमिरा चकवत मी पुन्हा नॅशनल पार्कला पोहोचलो. रमेशच्या मदतीने मटणाचे लहान तुकडे केले, आणि डीप फ्रीझरमध्ये ठेऊन दिले. थोड्या वेळाने सिंधुआज्जींचा मेसेज आला - त्यांनी मला आणि रमेशला मटण घेऊन बोलावले होते आणि त्या जागेचे अक्षांश-रेखांश दिले होते. सुमारे दीड किलोमीटर चालत आम्ही तिथे पोहाचलो.

 

सिंधुआज्जी दबक्या आवाजात सांगू लागल्या -

 

"मचाण बांधायचं म्हणजे आवाज होणार, आणि अनावश्यक वृक्षतोड होणार. त्यापेक्षा इथे आधीपासूनच असलेलं ट्री हाऊस वापरायचं मी ठरवलंय. ते पहा, त्या झाडाच्या फांद्यांमध्ये कसं लपलंय ते!

 

आता इथे पहा - ट्री हाऊसपासून वायव्येला तीस यार्ड अंतरावर हा मोठा खड्डा होताच. आम्ही त्याची लांबी, रुंदी, आणि खोली थोडी वाढवली. त्यावर फांद्या आणि पानांचं आवरण पसरून खड्डा झाकला. वाघ त्यावर आला की खड्ड्यात पडेल."

 

"पण सिंधुआज्जी, वाघ इथे येईल याची काय खात्री?" रमेशनं विचारलं.

 

"म्हणून तर मी मटण मागवून घेतलंय. आता तुम्ही आणि लँटर्नहेड मटणाचे तुकडे सफारी बसच्या स्टॉपपासून इथपर्यंत टप्प्याटप्प्प्याने टाकून या - अगदी हॅन्सेल आणि ग्रेटेलच्या गोष्टीसारखे. त्यांचा माग घेत वाघ इथे येईल. आणि इथे आला की त्याला पळून जायला किंवा लपायला जागा नाही. इथे दोन्ही बाजूंना ऱ्होडोडोडोडेन्डोड्रॉनची खूप झुडपं आहेत, त्यांच्या हिरव्या आणि गुलाबी पार्श्वभूमीवर वाघाचे शेंदरी-काळे पट्टे उठून दिसतील."

 

हे मात्र खरं होतं. ऱ्होडोडेंड्रॉनची झुडपं सिंधुआज्जींच्या हायलाईटेड नोट्ससारखी हिरवी आणि गुलाबी दिसत होती. पण मला एक शंका होती. "पण तो आल्या पावली परत फिरला तर?"

 

"तसं होणार नाही. तुम्ही आणि लँटर्नहेड फक्त किलोभर मटणाचे तुकडे रस्त्यात टाकून या. बाकीचे नऊ किलो मटण घेऊन माझा सहकारी इथे झाडाखाली बसला असेल."

 

"म्हणजे?" मी भयचकित मुद्रेने विचारलं. कॉर्बेट वगैरे शिकारी लोक वाघ किंवा बिबळ्याला आमिष म्हणून झाडाखाली बैल, बकरा, रेडा बांधायचे हे मला ठाऊक होतं. पण मटण घेऊन झाडाखाली स्वतः बसायचं हे मात्र मला अमान्य होतं.

 

"घाबरू नकोस. वाघाला तुल्यबळ असा सहकारी म्हणतेय मी!" सिंधुआज्जी म्हणाल्या, आणि माझ्या जीवात जीव आला.

 

रमेशकडे तराजू नव्हता, पण रद्दी विकत घेणारे लोक वापरतात तसा ताणकाटा होता. "सुमारे ९.८ न्यूटन!" रमेशने मटण कापडी बायोडिग्रेडेबल पिशवीत ठेवले आणि तो आणि लँटर्नहेड कामगिरीवर निघाले.

 

"चला, लवकर झाडावर चढूया," सिंधुआज्जी म्हणाल्या आणि आम्ही ट्री हाऊसमध्ये जाऊन बसलो. मऊ उशा, थंड लेमोनेडने भरलेला आईसबॉक्स, ताजे नवलकोल, ओरिओ बिस्किटे असा जामानिमा सिंधुआज्जींनी करून ठेवला होता.

 

"पंधरा हेक्टोमीटर चालण्यासाठी रमेश आणि लँटर्नहेडला सुमारे पंधरा मिनिटं लागतील. मटणाचे तुकडे ठेवण्यासाठी वाकावं लागेल त्यामुळे पाच मिनिटं वाढवू. त्या तुकड्यांचा माग घेत इथे येण्यासाठी वाघाला पंधरा मिनिटं लागतील. म्हणजे सुमारे पस्तीस मिनिटांत वाघ इथे पोचेल." सिंधुआज्जींनी आकडेमोड केली, आणि मग लेमोनेड पीत त्या गाणे गुणगुणू लागल्या - "सिंधु अँड फ्रेंड्स इन अ ट्री, एच यू एन टी आय एन जी"

 

तीस मिनिटं झाली. सिंधुआज्जींनी पाठवलेला ड्रोन वाघाच्या मार्गाचे थेट प्रक्षेपण ट्री हाऊसमधल्या ७० इंची टीव्हीवर करत होता. वाघ पाचेक मिनिटांत पोचणार हे कळलं तेव्हा सिंधुआज्जींनी घुबडाच्या आवाजात शीळ वाजवली, आणि ट्री हाऊसमागच्या झुडुपांतून अचानक स्लॉथ्या अवतीर्ण झाला. ट्री हाऊस आणि झाकलेला खड्डा यांमधील जागेत डुलतडुलत येऊन तो बसला, आणि नऊ किलो मटणापैकी जमेल तेवढ्याचा फन्ना उडवू लागला.

 

काही मिनिटांतच समोरच्या रानवाटेतून वाघ आला. स्लॉथ्याला पाहून - किंवा मटण पाहून - तो जिभल्या चाटत पुढे येऊ लागला. बिचारा अगदी शांत होता - डरकाळ्या फोडणं वगैरे सोडाच, पण त्याची चर्याही मैत्रीपूर्ण आणि निरुपद्रवी होती. त्याने काही पावलं टाकली आणि अचानक तो खड्ड्यात पडला.

 

"सिंधुआज्जी, वाघ पडल्याचा आवाजही नाही आला. किती खोल खड्डा खणलाय तुम्ही?" मी विचारलं आणि अचानक मी भयचकित झालो. मला शिकारकथांमधली वर्णनं आठवली - लोखंडी सापळ्यामध्ये पाय अडकून जबर जायबंदी झालेला बिबळ्या, लाकडी किंवा लोखंडी टोकदार काठ्यांवर सुळी गेलेला वाघ! बापरे! सिंधुआज्जी असं काही करणार नाहीत हे खरंतर मला ठाऊक होतं, पण त्या क्षणी मात्र मी नीट विचार करू शकत नव्हतो.

 

ट्री हाऊस मधून मी खाली उडी मारली आणि धावतच खड्ड्यापाशी गेलो. आत वाकून पाहिलं, तर खाली अख्खा खड्डा भरून मऊ रुईची गादी होती, गुलाबी ट्रेमध्ये मटणाचे लुसलुशीत तुकडे होते, हिरव्या तसराळ्यात थंडगार पाणी होतं, कार्डबोर्डचे मोठे बॉक्स होते, आणि वाघोबा निळ्याशार लोकरीचा मोठ्ठा गुंडा पंजाने खेचत उलगडत होता.

 

"बघितलीत लँटर्नहेडची करामतगुंफा सजवायचा कित्ती अनुभव आहे त्याला," सिंधुआज्जी अभिमानाने म्हणाल्या. त्यांच्यासोबतच आलेल्या स्लॉथ्याने उदार मनाने सुमारे पाच किलो मटण वाघासाठी खड्ड्यात टाकले. थोड्या वेळाने रमेश आणि लँटर्नहेडदेखील पोहोचले. तोवर मी ट्री हाऊसमध्ये जाऊन लेमोनेड, नवलकोल, ओरिओ बिस्किटे वगैरे घेऊन आलो.

 

थंडगार वाऱ्याची झुळूक वाहत होती. त्या झुळुकीवर सभोवतालची झाडे डोलत होती. झाडाच्या पानापानांतून पक्ष्यांची सुश्राव्य किलबिल ऐकू येत होती. वसंतातल्या फुलापानांचा गंध चहूकडे दरवळत होता. सभोवताली बहरलेल्या ऱ्होडोडेंड्रॉनची गुलाबी फुले आणि डोंगरउतारावर फुललेल्या कारवीची निळीजांभळी फुले यांनी आसमंताला एक आगळे सौंदर्य प्राप्त झाले होते. वाघोबा मजेत खात-खेळत होता. स्लॉथ्या खेळत नव्हता, पण आनंदाने मटण चघळत होता. नवलकोल क्रंची होते, ओरिओ बिस्किटे मधुर होती, लेमोनेड थंडगार होते. लँटर्नहेडने समाधानाचा सुस्कारा सोडला आणि तो स्वप्नील स्वरात  म्हणाला - "God's in his heaven— All's right with the world!”

Node read time
8 minutes
8 minutes

'न'वी बाजू Fri, 14/03/2025 - 22:35

फक्त, एकच शंका:

लँटर्नहेडने समाधानाचा सुस्कारा सोडला आणि तो स्वप्नील स्वरात म्हणाला - "God's in his heaven— All's right with the world!”

लँटर्नहेड-लोकांमध्ये ईश्वरसंकल्पना होती?