Skip to main content

असंच पाहिजे त्यांना!

२०२४च्या अमेरिकी निवडणुकीमध्ये ट्रंप निवडून येण्याआधी कमला हॅरीसबद्दल मला एक भारतीय-अमेरिकी शेजारीण म्हणाली होती : “पण तिची धोरणं काय आहेत हे मला माहीत नाही”. “सहा वेळा दिवाळखोरी जाहीर करणं; बलात्कार करणं; ३४ स्वतंत्र गुन्हे सिद्ध होण्याएवढे पुरावे सोडणं; ही तिची धोरणं नसावीत”, असं मला म्हणायचं होतं. पण म्हणाले नाही ते बरं झालं. 

 

हल्लीच एक व्हिएतनामी मैत्रीण म्हणत होती, “ट्रंपसारखा इसम शेजारी म्हणूनही मला नको आहे. माझ्या परिसरात कुठेही असला माणूस असलेला मला आवडणार नाही. लोक अशा माणसाला मत देऊन राष्ट्राध्यक्ष कसा काय बनवतात हे मला समजत नाही.” ती एवढ्या पोटतिडकीनं बोलत होती की मी तेव्हा गाडी चालवत नसते तर तिचा हात हातात घेऊन तिच्या संतापात सहभागी झाले असते.

 

भारतीय शेजारणीबरोबरचा संवाद झाल्यानंतर काही महिन्यांनी तात्या निवडोनि आला. आणि या सगळ्याशी काहीच संबंध नसलेल्या एका संवादादरम्यान या शेजारणीच्या नवऱ्यानं आम्हां दोघांना, इतर काही भारतीय शेजाऱ्यांच्या बरोबर, घरी चहापाण्यासाठी बोलावलं. त्या शेजाऱ्यांकडे जाताजाता वरची गोष्ट मी बऱ्या अर्ध्याला सांगितली आणि वर ही मल्लीनाथीही केली : “तोंड बंद ठेवणं फायद्याचं असतं; नैतिकता वगैरे काही नसतं.” “तुलाच फेसबुक आणि लोकसत्ता वगैरे कुठेकुठे लिहीत सुटण्याची खाज असते”, असं त्यावर तोही म्हणू शकला असता, पण नाही म्हणाला.

 

बरा अर्धा म्हणजे better half. अर्धांग. हे विशेषनाम नाही.

 

“सोमवारी संध्याकाळी बोलावलंय त्यांनी. साधारणपणे लोक विकेण्डला भेटतात,” बरा अर्धा म्हणाला. त्यावर मी म्हणाले, “आपल्याला स्वयंपाक न करता जेवण मिळणार आहे; नंतर भांडी घासायला लागणार नाहीयेत. सोमवार काय आणि शनिवार काय!” आम्ही तिकडे पोहोचलो तर इतर पाहुणे आले नव्हते. 

 

अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना (illegal immigrants) सैन्याच्या विमानांमधून, बेड्या वगैरे घालून त्यांच्या मूळ देशांत पाठवायला ट्रंपनं तेव्हा नुकतीच सुरुवात केली होती. काही दिवस आधीच काही भारतीयांचा नंबर लागला होता. सरकारी कर्मचारी कमी करण्याचं नाजूक काम कोरीवकामाच्या सुरीनं करण्याजागी इलॉन मस्कनं त्यावर चेनसॉ चालवायला घेतली होती. 

 

आम्ही दोघं दिवाणखान्यात बसलो. शेजारणीचे आई-वडील आणि शेजारीण-शेजारी दोघंही तिथे होते. थोड्या वेळात आणखी एक जोडपं आलं. मग त्या तिघी स्वयंपाकघरात गेल्या. मी खूप तन्मयतेनं शेजारीण-वडलांचं म्हणणं ऐकत होते. “अमेरिकेनं किती पैसा खर्च केला चंद्रावर जायला, उलट भारतानं किती स्वस्तात चांद्रयान पाठवलं,” असं काका म्हणत होते. १९६९ साली जेव्हा चंद्रावर दोन माणसं उतरली तेव्हा कंप्युटर किती महाग असतील आणि त्यांची क्षमता माझ्या तीन वर्षं जुन्या फोनएवढीही नसेल; किंमत वगैरे तर बोलायलाच नको, असा विचार मी केला. व्हॉटसॅप युनिव्हर्सिटीत शिकणाऱ्या आजी-आजोबा वयाच्या पिढीशी वाद घालण्याची हिंमत माझ्याकडे नाही.

 

मला स्वयंपाकघरातून बोलावणं आलं. “कुठे त्या बाप्यांमध्ये बसतेस? ये इथे!” माझी सुटका केल्याचा सात्त्विक आनंद एका पाहुणीच्या चेहऱ्यावर सहज दिसत होता. तीही चांगला स्वयंपाक करते; तिला नकार कसा द्यायचा!

 

चहापाण्याच्या नावाखाली जेवण झाल्यानंतर मात्र सगळ्यांनी एकत्र बसायला कुणाचाही विरोध नव्हता. मगाशी माझी सुटका करणारीनंच विषय काढला. “मला ट्रंपची सगळी मतं पटली नाहीत तरी काही धोरणं पटतात.” कुठलं धोरण, हे विचारावं लागलं नाहीच. “ट्रंपनं बेकायदेशीरपणे देशात आलेल्या लोकांना परत पाठवलं हे बरंच केलं. आपण इथे एवढे कष्ट करून आलो आहोत, किती मेहनत घेतली तेव्हा आम्हांला ग्रीन कार्ड मिळालं, हे तुम्हांला सगळ्यांना माहीत आहेच. आणि हे लोक असेच चोरीमारी करून इथे येतात. यातून आपलीही किंमत कमी नाही का होत? आपल्या कष्टांना काही किंमतच नाही का? ह्या लोकांपायी सगळे अमेरिकी लोक आपल्याकडे संशयित नजरेनं बघतील, असं कसं चालेल?”

 

“तुला ऑफिसात किंवा आणखी कुठे कुणी काही म्हणालं का?”

“नाही गं. पण आपलेच देशबांधव ना हे! सगळीकडे लाज काढतात!” 

“फेसबुकवर कुणाशी तरी वाद घालत होते म्हणून बातमी चांगली लक्षात राहिली होती. ट्रंपनं सुरुवातीच्या दिवसांत जितके बेकायदेशीर स्थलांतरित देशाबाहेर पाठवले आहेत, त्यापेक्षा जास्त बायडननं पाठवले होते. पण बायडननं त्याचा  गाजावाजा केला नाही. मुख्य म्हणजे ज्या अपमानास्पद पद्धतीनं ह्या लोकांना देशाबाहेर काढलं आहे ते पाहता त्यांना प्यादी म्हणून फक्त वापरलं आहे हे स्पष्ट लक्षात येतं. अमेरिकेत किती भारतीय नागरिक बेकायदेशीर पद्धतीनं आले असतील? ते काय फक्त एक विमानभर एवढेच असणार आहेत का? या लोकांची चूक आहे का नाही, हा मुद्दा निराळा आहे. हे लोक आपल्यासारखेच आहेत. ना त्यांच्याकडे कुठल्या प्रकारची सत्ता आहे, ना आपल्याकडे. तूच म्हणालीस ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी तुला किती कष्ट पडले. तेव्हा आणि आताही तुझ्याकडे कुठल्या प्रकारची मुखत्यारी आहे, एजन्सी आहे? कर तर भरावा लागतो, पण मताधिकार मात्र नाही; म्हणजे आपल्याकडे कुठल्याही प्रकारची सत्ता नाहीये.”

 

“हो, पण म्हणून बेकायदेशीरपणे कुठल्याही देशात घुसण्याचं समर्थन करता येणार नाही.”

“ते कुणीही करत नाहीच आहे! प्रश्न असा आहे की या लोकांना असं वागवावं का? गुन्हेगारांनाही किमान माणुसकी दाखवावी, असे कायदे भारतात आणि इथेही आहेत; तशा रीतीही आहेत. एरवी ‘वॉर रुकवा दी’ची जाहिरात करणाऱ्यांना असं म्हणता येत नाही का, की या भारतीय नागरिकांना असं अपमानास्पद पद्धतीनं, बेड्या वगैरे घालून भारतात पाठवलंत तर खबरदार? घरच्यांशी पटत नसेल, किंवा भांडणही झालं असेल, पण बाहेरच्यांनी त्यांना कसंही वागवलेलं घरच्यांनी केवळ त्यापायी चालवून घ्यावं का? दोन्ही बाजूंच्या सत्ताधाऱ्यांना या माणसांबद्दल काही पडलेली आहे, असं मला वाटत नाही. मला राग आहे तो या दुष्टपणाचा. गुन्हेगारांना शिक्षा देताना असा दुष्टपणा बाळगणं ही काही भारतीय संस्कृती नाही. धार्मिक वाङ्‌मय तर तुम्ही लोकच माझ्यापेक्षा जास्त वाचत असणार. आतासुद्धा तुम्ही सगळ्या भारतीय कपडे घालून आल्या आहात. मी टीशर्ट-शॉर्ट्स घालून आल्ये. रीतभात मला जरा कमीच समजते, नाही का?”

 

हे जे सगळे लोक ट्रंपनं गाजावाजा करून अमेरिकेबाहेर हाकलले त्यांत कुणीही गोरे नव्हते. सगळे लॅटिन अमेरिकी किंवा भारतीय. म्हणजे ब्राऊन कातडीचे. हा वंशवाद आहे, वगैरे म्हणायची संधीही मला मिळाली नाही. जेवढे बेकायदेशीर भारतीय अमेरिकेत आहेत, साधारण तितकेच चिनीही आहेत; पण त्यांना चीनमध्ये परत पाठवण्याचा तमाशा ट्रंपनं केला नाही. चीनची अर्थव्यवस्था मोठी का भारताची?

 

मध्यंतरी एक बातमी होती; ग्रीन कार्डावर असणाऱ्या वयस्कर भारतीयांना ग्रीन कार्डं परत देण्याची सक्ती केली गेली. बातमी जबाबदार वर्तमानपत्रांमध्ये होती. आता अमेरिकेचा नागरिक असणाऱ्या एका पुणेरी इसमानं “ही बातमी काही खरी वाटत नाही”, अशी टिप्पणी केली होती. याचे आई-वडील आता जिवंत नाहीत.

 

थोड्या वेळानं गप्पांचा विषय बदलला. आजच्या पिढीतल्या मुलांना काही कष्ट न करताच सगळं हवं असतं का नाही; हा विषय सुरू झाला. पंचविशीच्या चार मुलांबरोबर मी काम करते. त्यावरून संपूर्ण पिढीबद्दल मत बनवणं मला जमत नाही.

 

ट्रंप निवडून आला त्याच आठवड्यातली गोष्ट. आणखी एक शेजारीण निवडणुकांचे निकाल बघून हताश झाली होती. मी तिला म्हणाले, “तुला याचा त्रास का होतो, हे मला समजतंय. पण त्रास करून घेऊन काय फायदा? त्यातून काय मिळणार आहे? मला निकाल लागले त्या दिवशी सकाळी त्रास झाला थोडा. मग मी विचार केला, ट्रंप करून करून काय वाकडं करू शकणार माझं? फार तर मला भारतात परत जावं लागेल. ठीक आहे. मी जाम शिकल्ये. सध्याचा हॉट टॉपिक एआय या विषयात मला आता काही वर्षांचा अनुभव आहे. भारतातही या कौशल्याला मागणी आहे. शिवाय मी शहरात वाढले; माझ्याकडे पैसा आहे. थोडी गैरसोय होईल; पण माझी काही अन्नान्नदशा होणार नाहीये. मग मी त्याचा त्रास कशाला करून घेऊ?”

 

“ज्या लोकांना ट्रंपच्या धोरणांचा खरा फटका बसणार आहे, ते लोक एवढे सुस्थित नाहीत. ते लोक आपल्यासारखे प्रिव्हिलेज्ड, लब्धप्रतिष्ठित नाहीत. भारतात एल साल्व्हाडोरसारख्या गँगची सत्ता नाही; गाझासारखी युद्धपरिस्थिती नाही; व्हेनेझुएलासारखी यादवी नाही. मला वाईट वाटतं ते या देशांमधून ज्यांना पळून यावं लागतं त्यांच्यासाठी. ज्या गरीब अमेरिकी लोकांचं आयुष्य ट्रंपच्या मनमानीमुळे कायमचं आणि खूप बदलून जाणार आहे, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं… त्या हिशोबात मला भारतात जावं लागणं हा फर्स्ट वर्ल्ड प्रॉब्लेम झाला. उंचे लोक उंचे प्रॉब्लेम!” माझी पोटतिडीक जरा जास्तच झाली बहुतेक.

 

ती गांभीर्यानं म्हणाली, “तसं तर काय, उद्या काहीही होऊ शकतं. आपला अपघातही होऊ शकतो!”

 

मी दीर्घ श्वास घेतला. मी अजूनही भारतीय नागरिकच आहे. त्यामुळे मला अमेरिकेत राजकीय पक्षांना, उमेदवारांना देणगी देता येत नाही अमेरिकी झाले तरीही मी निवडणुकांसाठी पैसे देईन का, याबद्दल मला शंकाच वाटते. मी तिला म्हणाले, “तू ‘द अनियन’ वाचतेस का? कधी तरी उघड त्यांची वेबसाईट. मी त्यांना पैसे दिले आहेत. सध्याच्या दिवसांत मला चक्रम विनोदांचाच आसरा वाटतो. म्हणून मी त्यांना पैसे दिले. ते सगळ्यांची टिंगल करतात.” ‘द अनियन’वरचा हा माझा सगळ्यात आवडता लेख – Idiotic Tree Keeps Trying To Plant Seeds On Sidewalk. ही लिंक नंतर मी तिलाही पाठवली.

 

‘द अनियन’ला मी पैसे दिले तेव्हा त्यांनी मला जे पान दाखवलं ते मी माझ्या काही मित्रमैत्रिणींच्या  व्हॉटसॅप ग्रूपात ढकललं. त्यावर त्यांनी माझ्यावर स्तुतिसुमनं उधळली. त्यांतलं एक होतं – वाहवा, याचा अर्थ तुमचं क्रेडिट कार्ड सुरू आहे तर!

 

या गटातल्या लोकांशी राजकारणाबद्दल चर्चा कमीच होते. सगळ्यांची मतं थोड्याफार फरकानं एकसारखीच आहेत. ही चार वर्षं आम्ही एकमेकांना फार तर बातम्यांच्या लिंका पाठवू. आणि बाकीचा वेळ जोक, मीम, बागकाम, स्वयंपाक, व्यक्तिगत आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी वगैरे एकमेकांना सांगू. आमच्यातले काही अमेरिकेत, काही भारतात, तर काही युरोपात आहेत. काही अमेरिकी नागरिक आहेत; काही नाहीत. अमेरिकेत यायचं असेल तर आता फोनमध्ये, लॅपटॉपवर काय आहे याची तपासणी होऊ शकते. जे अमेरिकी नागरिक नाहीत, त्यांनी फोनचा पासवर्ड द्यायला नकार दिला तर त्यांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो. तर त्यासंदर्भात काय खबरदारी घेता येईल, याची आम्ही चर्चा केली. #फर्स्टवर्ल्डप्रॉब्लेम

 

एरवी बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करणाऱ्या कस्टम एन्फोर्समेंट एजन्सीनं अमेरिकेतल्या जॉर्जिया राज्यातून फ्लोरिडा राज्यात जाणाऱ्या हुआन कार्लोस लोपेझ-गोमेझला तो अमेरिकी नागरिक असूनही अटक केली; हुआन हिस्पॅनिक – ब्राऊन वर्णाचा आहे. आणि अशा किती तरी अमेरिकी नागरिकांना गुन्हेगार किंवा बेकायदेशीर स्थलांतरित असल्यासारखं वागवल्याच्या बातम्या आता वर्तमानपत्रांमधून येत आहेत; अमेरिकेतल्या भारतीयांमध्ये मात्र भारतातून येणाऱ्या डाळी आणि कडधान्यं ट्रंपच्या टॅरिफमुळे आता महाग होणार यांपलीकडे चर्चा कानांवर येत नाहीत.

 

गाझातलं युद्ध थांबावं, अशी जाहीर भूमिका घेणाऱ्या आणि अमेरिकेत व्हिजावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे व्हिजा रद्द केल्याच्या बातम्या येत आहेत. त्यात काही भारतीय विद्यार्थीही सापडले. माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या भारतीयांनी या विषयावर मतप्रदर्शन केल्याचं मी कधीही बघितलेलं नाही. अगदी अमेरिकी नागरिक असणाऱ्यांनीही. मित्रमैत्रिणींची मतं मला माहीत आहेत. आतापावेतो इथे हजारभर शब्द लिहून झालेत, तरीही अजूनही या विषयाबद्दलची माझी मतं मी स्पष्टपणे मांडलेली नाहीत. 

 

“हे विद्यार्थी शिकायला येतात. शिक्षण सोडून बाकीचे उद्योग करायला का जातात? शिक्षण किती महाग आहे इथे!” अशी वाक्यं मी भारतीयांच्या तोंडी ऐकली आहेत. पहिली दोन वाक्यं ट्रंपची गृहसुरक्षा मंत्री क्रिस्ती नोमसुद्धा म्हणते आणि टीव्हीवर त्याची जाहिरातही दिसते.

 

मी शिकायला परदेशात गेले तेव्हा दारू प्यायला शिकले. हे माझ्याकडूनच समजल्यावर माझ्या मराठी शेजाऱ्यापाजाऱ्यांनी लगेच गमतीशीर चेहरे केले होते. Youth is wasted on the young, असं म्हणतात. मी त्यांतलीच एक.

 

तोंड बंद ठेवणं फायद्याचं असतं. जेव्हा अंगाशी येतं तेव्हा नैतिकता त्यातून वाचवू शकत नाही. बेकायदेशीररीत्या अमेरिकेत आलेल्या लोकांना परत पाठवल्याबद्दल  अमेरिकेत राहणारे मध्यमवयीन, सुस्थित, चांगल्या घरातले भारतीय आनंद व्यक्त करत होते. आता या व्हिजा रद्द झालेल्या भारतीयांबद्दल, त्यांना ज्या दुष्टपणानं वागवलं जात आहे त्याबद्दल ते काही म्हणत नाहीयेत. गाझा वगैरे विषय त्यांच्यात लोणचं-मिरचीइतपतही तोंडी लावायला नसतात. कधीच नसतात. 

 

ट्रंप कितीही दुष्टपणे वागला तरीही तो लोकसत्ता वाचण्याची शक्यता कमीच! आणि माझे बहुतेकसे भारतीय शेजारीपाजारीही अमराठी. म्हणून लोकसत्ताच्या संपादकांच्या मागणीनुसार मी निर्भीडपणानं लेख पाठवला. त्यांच्या कात्रीतून उरलेला भागही इथे प्रकाशित करत आहे. तात्या लोकसत्ता वाचणार नाही, आणि ऐसी तर नाहीच नाही!

मारवा Mon, 28/04/2025 - 07:49

लेखातील बरेच मुद्दे पटले आणि माहितीत भर ही पडली.
पण
विशेषतः भारतीय बेकायदा स्थलांतरितांना विषयी जी तुमची अपेक्षा आहे ते काही पटले नाही.

1
विशेषतः भारतातून अमेरिकेत बेकायदा नुसता प्रवेश करण्यासाठी जी किमान रक्कम लागते प्रवासाची,एजंटची, चोर कागद पत्रांची ती किमान काही लाखांत तरी असावी. (चूकभूलं देणे घेणे ) त्यानंतर जे किमान knowledge पातळी aani किमान धाडस पातळी ती ही बरीच लागते. हे सर्व धनगुण संपन्न व्यक्ती ज्या धडाडी आणि पैसा लावून तिथे जातात त्या तितक्या भांडवलावरणीते भारतात किमान काही तरी व्यवसाय करू शकतात. भारत अगदी नालायक देश आहे असे जरी मानले तरी त्यांची एकूण क्षमता त्यांना किमान रोजगार संधी इथे देऊ शकते.

2
हे सर्व माहीत असूनही जाणीवपूर्वक बेकायदा प्रवेश करणारी प्रौढ व्यक्ती त्या देशाचा सरळ सरळ कायदा व इतर सर्व पायदळी तुडवत प्रवेश करते. कर भरणे वगैरे तर जाऊ द्या त्या देशाच्या सुरक्षेला स्वातंत्र्याला कधीही धोका निर्माण करू शकते.
3
त्यांना बेड्या घालून पाठवले हा अपमान आहे इतका किमान अपमान गुन्हेगाराचा झाला विमानातून पाठवून तर तो अत्यावश्यक नाही का ? मग नेमकी काय अपेक्षा आहे ? तुम्ही गुन्हेगार संदर्भात किमान कायदे दोन्ही देशात आहेत म्हणतात अमेरिकेत असतील त्याशिवाय कदाचितं तसे करणार नाहीत. किमान कोणी अमेरिकेत कायदा नसताना केले तर आक्षेप नोंदवला असता भारतात खात्रीपूर्वक सांगतो तुम्हीही पहिले असतील अगदी भारतात चोर जर असेल.अगदी साधा कोर्टात वगैरे न्यायचे व एक ठिकाणाहून दुसरी कडे तर.मूलभूत बेडी, दोर बांधून वगैरे नेले जाते. तर कायद्यात सुद्धां ही provision आहे.
4
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतात ही news बऱ्यापैकी बघितली गेली चर्चेत आली या निमित्ताने dunki रूट बद्दल चर्चा झाली त्यांचे इंग्लिश स्पीकिंग क्लास वगैरे तो सिनेमा चर्चेत आला .आणि अनेकांचे किती लाख बुडाले या नादात. तसेच अनेक जण अगदी काही दिवसात च कसे पकडले गेले आणि परत पाठवले गेले यांच्या ही सविस्तर news चालल्या. बायडेन च्या काळात हे न केल्याने जनजागृती कमी झाली तेव्हा हे अधिक भडकपणे समोर आले असते तर आताच्या lot मधील किमान काही युवकांनी हा नाद ही मृगजळ सोडले असते आपले भांडवल श्रम. सार्थकी लावले असते.
याने भविष्यात जे या मृगजळ मागे धावू पाहतील त्यांना किमान कुठेतरी आळा बसेल ही किती चांगली गोष्ट आहे. असे तरुण बेकायदेशीर मार्गात जितकी मेहनत पैसा धाडस ओततात ते सर्व किमान भारतात राहून काही न काही छोटा मोठा व्यवसाय नोकरी सन्मानाने करतील.किमान बेकायदा कामे करून आपल्या कडची अगोदरच असलेली तुटपुंजी संसाधने वाया तर घालवणार नाहीत.
हे विमानातून बेडी घालत परत येणे , ही सर्व भांडवल मेहनत गमावून बसलेले पाहणे हा मार्ग कसा निष्फळ आहे याची जाणीव होणे किती चांगले आहे..याने जायचेच असेल तर कायदेशीर मार्गाने कसे जाता येईल याची ही प्रेरणा उत्सुत्कता वाढेल.
उलट छान शाल.श्रीफळ माळ घालून परत पाठवले तर हा तुमच्या मैत्रिणी सारख्या प्रामाणिक कायदा पळणाऱ्या लोकांचा सर्वात मोठा अपमान नाही का ?
आपल्या गुन्ह्याची काही तर फळ मिळाली पाहिजेत की नकोत ?

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 29/04/2025 - 07:01

In reply to by मारवा

कायदेशीररित्या अमेरिकेत आलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचं शिक्षण सोडून भलते चाळे करू नयेत.

'न'वी बाजू Thu, 01/05/2025 - 17:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्री. मारवा यांनी मांडलेल्या आर्ग्युमेंटांचा अनेक मुद्द्यांवरून सविस्तर प्रतिवाद करणे शक्य आहे. (यथाशक्ति आणि मुख्य म्हणजे यथावकाश तो मी कदाचित करीनही.)

मात्र, अमेरिकेत कायदेशीररीत्या आलेल्या विद्यार्थ्यांना दिल्या गेलेल्या वागणुकीच्या संदर्भात त्यांनी अवाक्षरही काढलेले नाही, ही बाब लक्षात घेता, आपला प्रस्तुत प्रतिवाद हा आत्यंतिक अस्थानी वाटत नाही काय?

असो चालायचेच.

मारवा Thu, 01/05/2025 - 17:52

In reply to by 'न'वी बाजू

विदयार्थी मुद्दा अतिशय महत्वाचा होता. माझ्याकडून तो पूर्णपणे सुटला. याला माझा उतावळेपणा कारणीभूत आहे यात शंका नाही.

1
जे विद्यार्थी कायदेशीररित्या अमेरिकेत आले त्यांना केवळ आपल्या पसंत नसलेल्या पॅलेस्टाईन देशा च्या समर्थनार्थ भूमिका घेतली म्हणून असे हाकलणे ,धमकावणे, कारवाई करणे हे आत्यंतिक चुकीचे असेच आहे. याचा जितका निषेध करावा तितका कमीच आहे.
2
जे काही अल्पशी.माहिती.अमेरिकन मूल्यांविषयी आहे त्याच्या तर हे सर्वथा विरुद्धच आहे किमान अमेरिकन मूल्यांचे अभिमान बाळगणारे तरी याचे समर्थन करणार नाही.
3
हॉवर्ड विद्यापीठाने ट्रम्प यांच्या मनमानी, बळजबरी, दबाव विरोधात जी स्वाभिमानाने व काय शिकवावे हे तुम्ही आम्हाला शिकवू नका हे जे म्हटले ते अत्यंत योग्य असेच आहे.
3
भारतातील एकही विद्यापीठामध्ये अशी ताकत कधीच दिसून येत नाही. विद्यार्थी एक एकटे किंवा काही सरकार विरोधी राजकीय विद्यार्थी संघटना जे सरकार विरोधी बोलतात ते वेगळे. आणि एकूण संपूर्ण प्रशासनाने जशी हॉवर्ड च्या हिंमत दाखवली ती वेगळे आहे. यात खरे सामर्थ्य हे त्या विद्यापीठा च्या आर्थिक स्वावलंबतेने येते हे महत्वाचे आहे. भारतांतील विद्यापीठे अशी आर्थिक स्वावलंबी झाली तर असे होऊ शकेल.कदाचित.
श्री न बा चूक दाखविण्यासाठी धन्यवाद.

विदयार्थी मुद्दा अतिशय महत्वाचा होता. माझ्याकडून तो पूर्णपणे सुटला. याला माझा उतावळेपणा कारणीभूत आहे यात शंका नाही.

प्रश्न तो नाही. आणि, माझा रोख त्याकडे नव्हता. लेखातल्या कोठल्या मुद्द्यांचा परामर्श घ्यायचा, नि कोठले मुद्दे ऑप्शनला टाकायचे, हे अखेरीस आपले स्वातंत्र्य आहे, तथा, प्रत्येक प्रतिसादकाने लेखातील प्रत्येक मुद्द्याचा परामर्श घेतलाच पाहिजे, असेही प्रत्येक प्रतिसादकावर बंधन नसावे. झालेच तर, प्रत्येकच मुद्द्याचा परामर्श न घेण्यामागे अनेक वैध कारणे असू शकतात, हेदेखील मला समजते. (शिवाय, एखाद्या मुद्द्याचा परामर्श आपण आता जरी नाही घेतलात, तरी पुढेमागे (वाटले तर) आपण तो घेऊ शकताच (जसा आपण वरील उपप्रतिसादात घेतला आहे) (किंवा, न वाटल्यास तेव्हाही सोडू शकता), हाही भाग आहेच. आणि, ते सर्वस्वी आपले स्वातंत्र्य आहे.) त्यामुळे, विद्यार्थ्यांच्या मुद्द्यावर आपण काहीही मतप्रदर्शन केले नाहीत, हा आपला प्रमाद समजण्याची (अथवा त्याला काही ulterior motive चिकटविण्याची) गरज निदान मला तरी भासत नाही. तर ते एक असो.

माझा मुद्दा पूर्णपणे वेगळा होता. बोले तो, आपल्या मूळ प्रतिसादात आपण काही मुद्दे मांडलेले आहेत. (ते मला पटलेले नाहीत, आणि त्यातील बहुतांश (किंवा कदाचित सगळ्याच; चूभूद्याघ्या.) मुद्द्यांचा खंडनात्मक सविस्तर प्रतिवाद करता येऊ शकेल, असे मला वाटते. आणि, सवड झाल्यास, तसा तो मी कदाचित करीनही. परंतु, तोही पूर्णपणे वेगळा मुद्दा.) मात्र, लेखिकेच्या त्यावरील प्रतिप्रतिसादात, आपण मांडलेल्या कोठल्याही मुद्द्याबद्दल चकार शब्दही न काढता (पुन्हा, जे लेखिकेचे स्वातंत्र्य आहे), आपण मांडलेल्या भलत्याच कोठल्यातरी मुद्द्यास धरून प्रतिवाद करण्यात येत आहे, असा (निदान) माझा (तरी) ग्रह झाला, जे मला (१) अतार्किक, (२) आत्यंतिक अस्थानी, तथा (३) (बहुधा अनवधानाने; चूभूद्याघ्या.) भोज्याबदलाचा (मराठीत: गोलपोस्ट हलविण्याचा) प्रकार वाटला, एतदर्थ माझा प्रतिसादप्रपंच.

तस्मात्,

श्री न बा चूक दाखविण्यासाठी धन्यवाद.

संबंधित प्रतिसादात माझा रोख एक तर आपल्याप्रति नसल्याकारणाने, आणि त्यातूनसुद्धा त्यामागील माझा उद्देश कोणाची चूक दाखविण्याचा जर असलाच, तर तो आपली चूक दाखविण्याचा नसून लेखिकेच्या काउंटरआर्ग्युमेंटाच्या दिशेमधील चूक दाखविण्याचा असल्याकारणाने, आपले आभार मी तूर्तास स्वीकारू शकत वा इच्छीत नाही. (पुढेमागे आपल्या आर्ग्युमेंटाचा जेव्हा प्रतिवाद करेन, तेव्हा आपले आभार स्वीकारण्याचा विचार कदाचित करता येईल. तेव्हाचे तेव्हा पाहून घेऊ.)

असो.

मारवा Sat, 03/05/2025 - 09:07

In reply to by 'न'वी बाजू

तुम्ही जे म्हणालात ते सर्व पटले. तुमची काटेकोर मांडणी नेहमीच आवडते.
मला चुक का वाटली ते सांगतो.
कारण जेव्हा मी बेकायदेशीर रीत्या आलेल्यांच्या संदर्भात टीका करत होतो आणि ट्रंप यांची भुमिका योग्य ठरवत होतो.
त्याच वेळेस तेच ट्रंप कायदेशीररीत्या आलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चुकीचे धोरण वापरत आहेत हा मुद्दा महत्वाचा आहे.
कारण तो ट्रंप यांची नाण्याची दुसरी बाजु दर्शवत होता. आणि सध्या मी स्थलांतरींताचे नाणे या मुद्द्यावर बोलत होतो.
तर त्या नाण्याची दुसरी बाजु बघणे हे अगत्याचे ठरते. ( तुम्ही म्हणता ते ऑप्शनला टाकण्याचे स्वातंत्र्य अगदी योग्यच आहे पण इथे नविन नाणे नसुन या मी प्रतिसादास निवडलेल्या नाण्याचीच दुसरी बाजु होती )
कारण तो मुद्दा याच नाण्याची दुसरी बाजु आहे ( ट्रंप याचे या स्पेसीफिक संदर्भातील धोरण ) नवी बाजु नव्हे.
विद्यार्थी संदर्भातील ट्रंपच्या कारवायामुळे
१- ट्रंप यांचे बेकायदेशीर स्थलांतरींताविषयी चे धोरण सुद्धा प्रश्नांकित होते किंवा वादाच्या भोवर्‍यात येते आणि ते रास्तच आहे.
( लागा चुनरीमे दाग )
२- यावर भाष्य केले नाही भुमिका स्पष्ट केली नाही तर ते सिलेक्टीव्ह विरोध या सदरात येते. किंवा मुग गिळुन गप्प सारखे.
३- मी स्वतः यावर मौन बाळगले तर विद्यार्थी संदभातील ट्रंप यांची भुमिका योग्यच आहे असे मी समजतो असे वाटु शकते.
आणि तुमच्या प्रतिसादामुळे माझे त्याकडे लक्ष वेधले गेले आणि म्हणुन मी त्याचा खुलासा केला.
आणि माझ्या निवडलेल्या नाण्यावरील दुसर्या बाजुवर माझे मत स्पष्ट करुन माझी भुमिका पुर्ण केली.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/05/2025 - 05:28

In reply to by 'न'वी बाजू

'न'बा, तुमचा प्रतिसाद खोचकपणे लिहिलेला आहे, असं मी गृहीत धरत आहे.

अनेक भारतीय अमेरिकेत बेकायदेशीररीत्या आले याबद्दल कंठशोष करणारे लोक, कायदेशीररीत्या आलेल्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ‌वागणुकीबद्दल - तेही करूणा, सहानुभूती बाळगल्याबद्दल मिळणाऱ्या वागणुकीबद्दल - चकार शब्द काढत नाहीत, याबद्दल हजार-पंधराशे शब्द लिहिल्यावर पुन्हा मारवा यांनी तीच टेप लावल्यावर मी आणखी काय लिहिणार. म्हणून खोचकपणा केला.

सुधीर Wed, 30/04/2025 - 12:29

मार्क कार्निचे बोल...

“As I’ve been warning for months, America wants our land, our resources, our water,” he said in a speech in Ottawa. “President Trump is trying to break us, so he can own us. That will never happen.”

 थोडक्यात फर्स्ट वर्ल्ड काय थर्ड वर्ल्ड काय, यूएस, कॅनडाच्या निवडणूकांचे निकाल पाहिले तर लोकं भावनेच्या (अनाठयी भीती) आधारावर व्होटींग करतात असेच म्हणावे लागेल. ट्रंपच्या धोरणामुळे वा वक्तव्यामुळे कॅनडामध्ये कालच्या निवडणूकीत लिबरल पार्टीला फायदा झाला. अँन्टीइनकम्बसी, क्षमतेपेक्षा जास्त इमिग्रेशन्स, कोमेजलेली अर्थव्यवस्था अशा बर्‍याच मुद्द्यावर कन्सरवेटीव्ह बाजी मारू शकले असते. पण कनेडीअन अस्मितेवर व्होटींग झालं अशा स्वरूपाच्या बातम्या आहेत त्यामुळे निसटत्या फरकाने लिबरल पार्टी पुन्हा एकदा सत्तेत आली. आतापर्यंत मी तर असंच समजून चालत होतो की कॅनडा आणि यूस थोडेफार फ्रेंच, स्पॅनिश बोलणारे इकडे-तिकडे अधिक असतील पण एकंदर संस्कृती एकच तर आहे, सरकारी भाषा एकच आहे, मग युरोपिअन युनिअन सारखं लेबर आणि कॅपटील अजून फ्रीली मूव्ह होत असेल तर एकत्र येण्यात तोटा काय आहे (राज्यकर्त्यांचा सोडून). ५१वं राज्य असं न म्हणता नॉर्थ अमेरीकन ब्लॉक असं म्हटलं असतं तर फरक पडला असता का? अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह भाग वेगवेगळे राहीले असते. नाहीतरी अर्थे कनेडीअन कलाकार यूएस मध्येच जास्त दिसतात. मग कॅनडा-आणि यूएस युरोपिअन युनिअन सारखे एकत्र येण्यात काय हरकत आहे? कोणी कॅनडात स्थायिक झालेले या 'कनेडीअन अस्मितेवर'/कॅनडाच्या निवडणूकीच्या निकालावर प्रकाश टाकू शकतील काय?

पुंबा Tue, 06/05/2025 - 12:56

अदिति व नबा हे खरेच मानवतावादी लोक आहेत परंतु तुमच्या गाझाच्या समर्थनात काढलेल्या मोर्चांना फक्त नैतिक पाठिंबा देऊ शकतात(यात अदिति किंवा नबांचा अवमान करण्याचा हेतू नाही). प्रत्यक्षात जेव्हा ट्रम्प तुम्हाला ढुंगणावर लाथ मारून हाकलून देईल तेव्हा कोणीही काहीही करू शकणार नाहीत. तेव्हा भरमसाठ पैसे देऊन गेला आहात तर फक्त शिका. तिथे तुमचे अधिकार मर्यादित आहेत हे लक्षात ठेवा. काय विरोध करायचाय तो नागरिकांना करू द्या.

विवेक पटाईत Sat, 17/05/2025 - 07:35

1. जगात भारतीय विद्यापीठ जेवढे स्वतंत्र आहेत तेवढे दुसरी कडे असण्याची संभावना नाही. जेएनयू थेट राजधानीत भारत तेरे तुकडे होंगे नारे लागू शकतात. सरकार काहीही करत नाही. दुसरी कडे हे संभव नाही.
2.पलेस्टाइन आतंकींचे समर्थन करणे म्हणजे जेहादचे समर्थन करणे. फक्त अशिक्षित आणि मानसिक विकृत व्यक्तिच ते करू शकतात. अश्यांना देशांत आश्रय देणेच मूर्खपणा.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 26/05/2025 - 03:08

तात्याच्या मागण्यांसामोर कोलंबिया विद्यापीठानं मान झुकवली; पण हार्वर्डनं मान झुकवली नाही. आता हार्वर्डमध्ये शिकणाऱ्या सगळ्या परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिजे तात्यानं रद्द केले आहेत. बेल्जियमच्या राजघराण्यातली, आणि पुढची राणी असणारी एलिझाबेथही यात सापडली आहे. (एपी न्यूजची बातमी.)

याचं मूळ कारण हार्वर्डच्या विद्यार्थ्यांनी गाझाच्या बाजूनं केलेली निदर्शनं आणि विद्यापीठानं या विद्यार्थ्यांचं पुरेसं दमन न करणं. ज्यूविरोध हे तात्याचं हत्यार झालं आहे. (मला कळलं, हे तुला कळल्याचं मला कळलं - इतपत विचित्रपणा यात आहे.) 

या सगळ्या प्रकारात अनेक विद्यार्थ्यांचा काहीही संबंधही नसेल; पण ते भरडले जात असणार. माणसांना प्यादी म्हणून वापरण्यात आणि त्यांच्याशी दुष्टपणे वागण्यात तात्याचा हात किती लोक धरू शकतील, याबद्दल शंका वाटते.

अवांतर - २०२०-२१ सालांत माझ्याबरोबर हार्वर्डमधल्या काही विद्यार्थिनी काम करत होत्या, इंटर्न म्हणून. काही अमेरिकी नागरिक, काही बाहेरून आलेल्या. अत्यंत हुशार आणि कष्टाळू मुली आहेत या. या मुलींमुळे अननुभवी, तरुण लोकांकडून माझ्या अपेक्षा फार जास्त असतात, असं हल्लीच माझा एक माजी बॉस मला म्हणाला. मी तक्रार करत होते ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून माझ्याबरोबर काम, नोकरी करणाऱ्या लोकांची!