Skip to main content

आरोग्यपूर्ण वृद्धत्व

सत्तरी पार केलेल्या वृद्धांच्या बरोबरीच्या संवादातील पहिला प्रश्न “आपण कसे आहात?”... हा असतो व संवादाचा शेवट “तब्येतीचा काळजी घ्या.” या वाक्याने होत असते. कारण वृद्धत्व नेहमीच त्रासदायक असते. वृद्ध व्यक्ती आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी योग्य प्रकारे घेत नसल्यास कुटुंबाला व पर्यायाने समाजाला श्रम, वेळ व पैशाच्या स्वरूपात फार मोठी किंमत द्यावी लागते. वृद्धालासुद्धा आपले जिणे नको नकोसे वाटू लागते. अनेक वृद्धांना 80 हे वय एक अभेद्य भिंत वाटू लागते.
लोकसंख्येच्या अभ्यासकांच्या मते भारतातील पुरुषांचे 70 वर्षे व स्त्रियांचे 73 वर्षे सरासरी आयुष्य (average life) आहे. साधारणपणे निवृत्तीवेतनासारखे दरमहा उत्पन्नावर जगणारा मध्यम वर्गातील व पैशाची काळजी नसणारा श्रींमंत वर्गातील वृद्ध कदाचित या सरासरी आयुष्यापेक्षा 85-90 वर्षापर्यंत जगत असावा. म्हणजे 72-75 वर्षे वयापासून मृत्युसमयापर्यंतचा आयुष्य जगणारा हा वर्ग इतर सामान्यांपेक्षा साधारणपणे 10-15 वर्षे जास्त जगत असावा. याचाच अर्थ कमीत कमी रोगोपचार करून घेत असलेल्या, आहार-विहाराबाबत कमीत कमी जाचक अटी असलेल्या व थोड्या- फार प्रमाणात बुद्धी शाबूत असलेल्या (व बुद्धीभ्रंश न झालेल्या!) या वर्गातील वृद्धाचे आरोग्यपूर्ण आयुष्य (healthy life) मृत्युसमयीच्या वयापेक्षा 5-10 वर्षाने कमी असेल. या वर्गातील वृद्धांचासुद्धा शेवटी शेवटी वेगवेगळ्या व्याधीने त्रस्त व त्यासाठी डॉक्टरी उपाय, हॉस्पिटलला चकरा मारणे, आयसीयूमध्ये मुक्काम करणे, वेगवेगळ्या आकारांच्या व रंगाच्या गोळ्यांचे नियमित सेवन करणे व शेवटचे 2-4 दिवस व्हेंटिलेटरवर व शेवटी मल्टीऑर्गन फेल्युअर वा कारोनरी अरेस्ट या डेथ सर्टिफिकेटवरील कारणाने हॉस्पिटलच्या बेडवर आयुष्याचा अंत होतो. इच्छामरण वा दयामरण दुरापास्त असलेल्या या देशातले हे वृद्ध नेत्रदान, अवयवदान, देहदान इत्यादी काही तरी करून या जगावरून नामशेष होतात.
वृद्धत्वाच्या समस्यांचा अभ्यास करणाऱ्या जपान येथील मनोविकार तज्ञ, हिदेकी वादा (Hideki Wada) यांचे अलीकडेच "80-Year-Old Wall" या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले असून काही महिन्यातच त्याच्या 5 लाख प्रतींची विक्री झालेली आहे. कदाचित आतापर्यंत जपानमध्येच 10 लाख प्रतींची विक्री झाली असेल. 61 वर्षाचे हे तज्ञ गेली 35 वर्षे मानसोपचार करत असून 6 हजारपेक्षा जास्त रुग्णावर त्यानी उपचार केले आहेत. 80 वर्षानंतरचे आरोग्यदायी जीवन कसे जगावे याबद्दलची माहिती देणारे हे पुस्तक आहे.
डॉ. वादा यांच्या मते बहुतेक वृद्धांची एक(मेव) तक्रार असते, ती म्हणजे झोप न येणे. त्यामुळे या वृद्धांना नेहमी झोपेच्या गोळ्या घ्यावे लागतात. डॉ. वादा यांना यात काही तक्रार करण्यासारखे आहे, असे वाटत नाही. त्यांच्या मते वृद्धत्वातील निद्रानाश वा कमी झोप हा काही रोगच होऊ शकत नाही. निद्रानाशामुळे माणूस मरतो यावर डॉक्टरांचा विश्वास नाही. त्यामुळे वृद्ध केव्हाही झोपू शकतात, केव्हाही उठू शकतात. समाजाने वृद्धांना दिलेला हा एक विशेषाधिकार आहे. व त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी घेणे जरूरीचे आहे.
वृद्धाची अजून एक तक्रार कोलेस्टेरॉलची वाढ याविषयी असते. परंतु यातही तक्रार करण्यासारखे काही नाही. काही प्रमाणात ती वाढली तरी काळजी करण्यासारखे त्यात काही नाही. कारण शरीरातील रोगनिरोधक शक्तीच्या पेशींच्या वाढीसाठी कोलेस्टेरॉल फायदेशीर ठरते. रोग निरोधक शक्तीच्या पेशीमधील वाढ वृद्धांच्यातील कॅन्सर पेशींच्या वाढीला रोखतात व वृद्धांना कॅन्सरच्या धोक्यापासून सुरक्षित ठेऊ शकतात. याचप्रमाणे पुरुषातील काही हार्मोन्समध्ये कोलेस्टेरॉल असतो. कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाल्यास पुरुषांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचप्रमाणे उच्च रक्तदाबाच्या (हाय ब्लड प्रेशरच्या) तक्रारीतसुद्धा काही अर्थ नाही. 50-60 वर्षापूर्वी बहुतेक जणांना योग्य आहार मिळत नव्हते. एका अर्थाने ते कुपोषित (malnourished) होते. त्यामुळे रक्तदाबाची पातळी 150च्या जवळपास गेल्यावर रक्तवाहिन्या फुटत/बिघडत होत्या. व त्यावर डॉक्टरी उपचारांची गरज भासत होती. परंतु आताच्या काळात कुपोषितांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी झालेली आहे. व त्यातही मध्यम/श्रीमंत वर्गाला तर याची झळही पोचत नाही. त्यामुळे जरी रक्तदाब अगदी 200 पर्यंत पोचला तरी रक्तवाहिन्या फुटण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
डॉ. वादा यांनी वयाच्या 80 वर्षानंतरसुद्धा निरोगी जीवन जगण्यासाठी वृद्धांसाठी काही सूचना दिल्या आहेतः
1. रोज चालत रहा.
2. थोडेसे जरी अस्वस्थ वाटल्यास दीर्घ श्वासोच्छ्वास करा.
3. थकल्यासारखे वाटेपर्यंत रोज काही वेळ व्यायाम करा.
4. (एसीचा वापर करत असल्यास) उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या.
5. तुमच्या चलनवलनातील सातत्यासाठी डायपरचा वापर करणे केव्हाही चांगले.
6. चांगल्यापैकी चावून व चघळून खाल्यामुळे तुमचे शरीर व मेंदू चांगल्यापैकी काम करतील.
7. चेहरा आठवतो, नाव आठवत नाही वा नाव आठवते, चेहरा आठवत नाही अशा प्रकारच्या स्मृतीपटलावरील लपाछुपीचा खेळ हा वृद्धत्वाशी निगडित नसून मेंदूचा वापर कमी होत असल्यामुळे होतो.
8. मुळात एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधं घेण्याची गरज नसते.
9. मुद्दामहून रक्तदाबाची (व शर्कराची) पातळी कमी करण्याची आवश्यकता नाही.
10. एकटेच राहणे म्हणजे एकाकीपण नव्हे. हा काळ आरामासाठी वापरण्यातच मजा असते.
11. आळशीपणात वेळ घालविण्यात अपराधीपणा वाटून घेऊ नये.
12. कुठलेही वाहन चालविण्याचा अट्टाहास करू नये. वाहन परवान्याची नूतनीकरणसुद्धा करू नये.
13. तुम्हाला जे काम आवडते तेच तेवढे करावे. न आवडणारे काम करण्याच्या फंदात पडू नये.
14. या वयातसुद्धा लैंगिकतेतून आनंद मिळत असल्यास कामजीवन अनुभविण्यात गैर काही नाही.
15. चोवीस तास घरात बसणे टाळावे. काहीही झाले तरी काही वेळ घराबाहेर पडणे गरजेचे आहे.
16. मुळात या वयात चवीच्या ग्रंथी (टेस्ट बड) नीटपणे काम करत नसल्यामुळे काहीही खावेसे वाटत नाही व खाल्ले तरी चवीपुरतेच खाल्ले जाते. त्यामुळे काय आवडते ते खाणे यात गैर काही नाही. थोडेसे पोट सुटले तरी त्याची काळजी करत बसू नये.
17. कुठलीही गोष्ट काळजीपूर्वक व मन लावून करावे. जे जमत नाही त्याच्या मागे लागू नये.
18. ज्यांच्याशी तुमचे जमत नाही त्यांना कसे टाळता येईल याकडे लक्ष द्यावे.
19. टीव्हीसमोर बसून वेळ घालणे टाळावे.
20. प्रत्येक समस्येला उत्तर असते यावर भरवसा ठेवावा. अडचणीच्या वेळी काहीना काही मार्ग नक्कीच सापडेल.
21. हे खावे, ते खाऊ नये याला काही अर्थ नाही. जे पचते ते - काहीही असले तरी - खायला हरकत नसावी. फक्त आपल्या शरीरावर कुठल्याही प्रकारचे प्रयोग करणे टाळावे.
22. स्नानगृहातील वेळ 10 मिनिटापेक्षा जास्त नसावे.
23. अस्थमा, सांधेदुखी, स्मृतीभ्रंश (Dementia) सारख्या क्रॉनिक रोगाशी चार हात करत बसण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व मान्य करत त्यापासूनच्या वेदना कसे कमी होतील याकडे लक्ष द्यावे.
24. झोप येत नसली तरी बळजबरीने झोपणे टाळावे.
25. समाधान देणारे काम करत राहिल्यामुळे मेंदू तरतरीत राहतो.
26. जे काही तुम्हाला सांगावेसे वाटते ते सांगून मोकळे व्हावे. उगीच आडपडदा ठेवणे वा त्याची काळजी करणे टाळावे.
27. एखादा फॅमिली डॉक्टर असणे केव्हाही चांगले.
28. ‘खडूस म्हातारा’ असे कुणी तुम्हाला म्हणत असल्यास त्याचा राग मानू नये. खडूस म्हातारा असण्यात काहीही वाईट नाही.
29. काही वेळा सौम्य शब्द वापरणे केव्हाही चांगले.
30. स्मृतीभ्रंश हे तुमच्या आयुष्यातील शेवटचा टप्पा असल्यामुळे तो आनंदाने स्वीकारावा.
31. काही तरी नवीन शिकण्याच्या प्रयत्नात असावे. तसे न केल्यास तुम्ही आणखी जास्त म्हातारे व्हाल.
32. या वयात कुठलेही गौरव वा मोठे म्हणवून घेण्याच्या मागे लागू नये. आयुष्यभरात जे काही तुम्ही मिळविले ते पुरेपूर आहे.
33. भोळेपणा असणे वा भोळसट असे म्हणवून घेणे हा वृद्धाप्याकडे झुकलेल्यांचा विशेषाधिकार आहे.
34. काही वेळा जास्त गुंतागुंतीच्या गोष्टी गंमतीशीर असू शकतात.
35. ज्या गोष्टीत तुम्हाला आनंद व समाधान मिळते ते करणे केव्हाही चांगले.
36. दुसऱ्यांचे भले व्हावे अशा गोष्टी करत रहावे.
37. आजचा दिवस समाधानाने जगावे.
38. जास्तीत जास्त दिवस जगणार आहे या आशेवर भरवसा असू दे.
39. केव्हाही सकारात्मक विचार करत असावे.
40. श्वासोच्छ्वास सुलभ असू दे.
41. जीवन जगण्यासाठीचे नियम तुमच्या हितासाठीच आहेत.
42. सर्व गोष्टींचा शांत मनाने स्वीकार करावे.
43. आनंदी व्यक्तिमत्व सर्वांना आवडते.
44. तुम्ही हसलात तर जग तुमच्याबरोबर हसते.
45. तुम्ही स्वतःहून कुठलीही जबाबदारी स्वीकारू नये.
46. कुठल्याही गोष्टीत फाजिल उत्साह दाखवू नये.
47. कुठेही भावनिक गुंतवणूक करू नये.
48. तुमच्यामुळे काहीही अडत नाही, हे लक्षात ठेवूनच सर्व व्यवहार करावा.
49. जग बदलण्याच्या फंदात पडू नये. तुम्ही इतके दिवस काय केले आहे ती शिदोरी पुरेशी आहे.
जगभरातील वेगवेगळ्या संस्कृतीत चांगले जीवन जगण्यासाठी यापेक्षा वेगळे नियम वा वेगळ्या सूचना असू शकतील. परंतु त्या सूचनासुद्धा वरील सूचनापेक्षा फार वेगळ्या नसतील.
सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आनंदी व समाधानी असण्यातच जीवनाचा सार्थकपणा असेल.
त्यामुळे वरील सूचना पाळण्याचा प्रयत्न करून बघायला काही हरकत नसावी.

(टिग्रे हेराल्ड यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद)

'न'वी बाजू Sat, 12/07/2025 - 22:04

49. जग बदलण्याच्या फंदात पडू नये. तुम्ही इतके दिवस काय केले आहे ती शिदोरी पुरेशी आहे.

मग तुम्ही इथे वारंवार लेख कशासाठी पाडता?

(Why don’t you practise what you preach, I guess is my question.)

48. तुमच्यामुळे काहीही अडत नाही, हे लक्षात ठेवूनच सर्व व्यवहार करावा.

नेमके!

44. तुम्ही हसलात तर जग तुमच्याबरोबर हसते.

तुमच्याबरोबर हसते, की तुम्हाला हसते… सूक्ष्म फरक आहे, परंतु… कोणाला फरक पडतो?

28. ‘खडूस म्हातारा’ असे कुणी तुम्हाला म्हणत असल्यास त्याचा राग मानू नये. खडूस म्हातारा असण्यात काहीही वाईट नाही.

हम्म्म्म्… ‘खडूस म्हातारा’बद्दल एक वेळ ठीक असेलही. (‘लोचट, पकाऊ थेरडा’बद्दल काय?)

23. अस्थमा, सांधेदुखी, स्मृतीभ्रंश (Dimentia) सारख्या क्रॉनिक रोगाशी चार हात करत बसण्यापेक्षा त्यांचे अस्तित्व मान्य करत त्यापासूनच्या वेदना कसे कमी होतील याकडे लक्ष द्यावे.

असल्या गंभीर भासणाऱ्या लेखात Dementiaचे स्पेलिंग तुमच्यासारखा सुशिक्षित भासणारा गृहस्थ चुकवेल, असे वाटले नव्हते. परंतु… चालायचेच! (‘हल्ली काय, वाटेल ती लोकं…’ वगैरे वगैरे.)

14. या वयातसुद्धा लैंगिकतेतून आनंद मिळत असल्यास कामजीवन अनुभविण्यात गैर काही नाही.

माफ करा, परंतु, तुमच्या कामजीवनात (आणि/किंवा त्याच्या अभावात) मला यत्किंचितही रस नाही. (आणि, इथे कोणाला असेल, असे वाटतही नाही.) सबब, काय करायचे ते करा (किंवा करू नका), परंतु, मेहरबानी करून त्याची वाच्यता वा चर्चा इथे करू नका, इतकेच माफक मागणे आहे.

9. मुद्दामहून रक्तदाबाची (व शर्कराची) पातळी कमी करण्याची आवश्यकता नाही.

म्हणजे? उच्च रक्तदाबाचा अथवा मधुमेहाचा विकार असेल, तर त्याबद्दल काहीही करू नये? याचा प्रचार-प्रसार तुम्ही करताय? कोठे गेले तुमचे अंधश्रद्धानिर्मूलन?

(‘खडूस म्हातारा’ सोडा. ‘भोंदू बाबा’ कसे वाटते?)

5. तुमच्या चलनवलनातील सातत्यासाठी डायपरचा वापर करणे केव्हाही चांगले.

हे पटण्यासारखे आहे. फक्त, तो डायपर कोठे लावावा? तोंडाला, की कळफलकाला?

बाकी,

14. या वयातसुद्धा लैंगिकतेतून आनंद मिळत असल्यास कामजीवन अनुभविण्यात गैर काही नाही.

आणि,

40. श्वासोच्छ्वास सुलभ असू दे.

हे काहीसे परस्परविरोधी नव्हे काय?

(शिवाय, “It takes two to tango, त्याचे काय?” असे विचारणार होतो, परंतु, (आधी म्हटल्याप्रमाणे) तुमच्या कामजीवनात मला यत्किंचितही रस नसल्याकारणारणाने, तो मुद्दा सोडून देऊ.)


हिडेकी वाडा (Hideki Wada)

हिदेकी वादा. (जपानीत ‘ड’ नाही.)


(टिग्रे हेराल्ड यांच्या लेखाचा स्वैर अनुवाद)

थोडक्यात, हे (नेहमीप्रमाणे) व्हॉट्सअॅप फॉर्वर्ड आहे तर!

चालू द्या.


(अतिअवांतर: ‘प्रभाकर नानावटी’ आणि ‘विवेक पटाईत’ या दोन आयडींच्या लिखाणांत मला विशेष (significant) फरक जाणवत नाही. दोघेही प्रचारकी (भले प्रचाराचे विषय वेगळे असोत.) तथा अत्यंत रटाळ लिहितात, दोघेही मराठीचे खून पाडतात… चालायचेच.)

अहिरावण Sun, 13/07/2025 - 10:56

In reply to by 'न'वी बाजू

>>>‘प्रभाकर नानावटी’ आणि ‘विवेक पटाईत’ या दोन आयडींच्या लिखाणांत मला विशेष (significant) फरक जाणवत नाही. दोघेही प्रचारकी (भले प्रचाराचे विषय वेगळे असोत.) तथा अत्यंत रटाळ लिहितात, दोघेही मराठीचे खून पाडतात… चालायचेच.

सहमत. (काय दिवस आलेत की नबाशी सहमत व्हावे लागले... दुर्देव म्हणतात ते हेच. चालायचेच.)

तर एकंदरीत प्रतिसाद सुद्धा नेमका.

कदाचित नानावटी हे एक खत्रुड म्हातारा म्हणून घरच्यांनी टीळा लावून सोडला असावा... (त्यात घरच्यांचा दोष नाहीच) ती मळमळ आणि तडफड एकंदरीत जगाबद्दलचे नकारात्मक विचार यामुळे नानावटी असले भुक्कड लेखन पाडत असावेत.

तरुणपणी जरा जगाशी प्रेमाने, सहानुभुतीने कसे जगावे हे त्यांच्या पालकांनी शिकवले नसावे. चालायचेच.

तिरशिंगराव Sun, 13/07/2025 - 11:57

८० गाठायला अजून वेळ आहे. त्यामुळे या सुचना सध्या तरी मला लागु नाहीत.