Skip to main content

‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ ऑझी ऑसबॉर्न

Ozzy Osbourne

जगभरातल्या लाखो चाहत्यांचा लाडका, हेवी मेटल संगीताचा अनभिषिक्त सम्राट ‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ ऑझी ऑसबॉर्न याचं ७६व्या वर्षी निधन झालं आहे. 

१९४८ साली बर्मिंगहॅमच्या कष्टकरी कुटुंबात जन्मलेल्या ऑझीने आपल्या जीवनात मोठे चढ-उतार पाहिले. शाळेत अभ्यासात फार उत्सुक नसलेला ऑझी बांधकाम मजूर आणि प्लंबर म्हणूनही काम करायचा. चोरीमुळे तो सहा आठवडे तुरुंगातदेखील होता. 

ब्लॅक सॅबाथ आणि हेवी मेटलचा उदय 

ऑझी आणि इतर तिघांनी मिळून १९६८ मध्ये ‘ब्लॅक सॅबाथ’ या बँडची स्थापना केली. १९७०च्या दशकात संगीतात अनेक नवनवीन प्रयोग होत होते. तेव्हा ‘ब्लॅक सॅबाथ’ने आपल्या डार्क गाण्यांनी, हेवी गिटार रिफ्सनी आणि ऑझीच्या अनोख्या गायकीने एक क्रांती घडवली. त्यांनी 'हेवी मेटल' या संगीत प्रकाराला जन्म दिला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यांच्या ‘पॅरानॉइड’ (Paranoid), ‘आयर्न मॅन’ (Iron Man), ‘वॉर पिग्स’ (War Pigs) यांसारख्या गाण्यांनी जगभरातील तरुणाईला वेड लावले. त्यांचे संगीत केवळ आवाज नव्हते, तर ते त्या काळातील सामाजिक असंतोष आणि भीतीचे प्रतिबिंब होते. युद्ध, समाजाची काळी बाजू आणि मानवी भावनांची खोली त्यांच्या संगीतातून प्रकट झाली. त्यांच्या संगीताची गुणवत्ता ही केवळ आवाजाच्या तीव्रतेत नव्हती, तर त्यात एक प्रकारची भावनिक खोली होती जी श्रोत्यांना खेचून घेत असे. 

ऑझीचा रंगमंचावरचा वावरही अफलातून होता. त्याचा सर्वात गाजलेला प्रसंग म्हणजे त्याने एका जिवंत वटवाघळाचे डोके स्टेजवर चावले! हा प्रसंग अजूनही रॉक आणि मेटल रसिकांमध्ये चवीने चघळला जातो. त्याच्यामध्ये एक प्रकारचा बेफिकीरपणा आणि बंडखोरपणा होता, जो त्याच्या चाहत्यांना खूप आवडायचा. 

अनेक ग्रॅमी नामांकनं आणि पुरस्कार, ‘रॉक अँड रोल हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश अशा अनेक प्रकारे त्याचं योगदान सन्मानित झालं. ‘निर्वाणा’ ‘मेटॅलिका’ असे अनेक बँड ऑझीचा आणि ‘ब्लॅक सॅबाथ’चा प्रभाव मान्य करतात. 

काही गाजलेली गाणी

पॅरानॉइड’ - गिटार रिफसाठी गाजलेलं गाणं. हेवी मेटल म्हणजे काय याची जणू व्याख्याच!  

वॉर पिग्स’ - युद्धविरोधी गाणं  

आयर्न मॅन’ - यातली गिटर रिफ एखादा आयर्न मॅन चालत असावा अशी वाजते. सायन्स फिक्शनवरून प्रेरित.  

क्रेझी ट्रेन’ - दारू आणि ड्रग्जच्या अतिसेवनामुळे १९७९ मध्ये ऑझीला बँडमधून काढून टाकण्यात आलं. त्यानंतरची त्याची सोलो सिंगल.  

मि. क्रोली’ - इंग्लिश ऑकल्टिस्ट ॲलिस्टर क्रोलीवरून प्रेरित सोलो सिंगल.  

मामा आय ॲम कमिंग होम’ - बॅलड  

नो मोअर टीअर्स’ - सीरियल किलरबद्दलचं गाणं  

संगीताच्या पलीकडे ऑझीने “द ऑस्बॉर्न्स” (The Osbournes) नावाच्या रिॲलिटी शोमधून जगाला आपले वेगळे, घरगुती रूप दाखवले. हा ‘प्रिन्स ऑफ डार्कनेस’ प्रत्यक्षात एक प्रेमळ कुटुंबप्रमुख आणि सामान्य माणूसही आहे हे त्यातून जगाला दिसले. कुटुंबासोबतच्या त्या कार्यक्रमामुळे त्याला नव्या पिढीसाठीसुद्धा लोकप्रियतेच्या शिखरावर पोचवले. 

ऑझीच्या संगीताने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली आणि त्याचे व्यक्तिमत्त्व नेहमीच चर्चेत राहिले. त्याच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे, पण त्याचे संगीत आणि त्याच्या आठवणी लाखोंच्या मनात जिवंत राहतील.