ठकीशी संवाद : नाटकाचा अनुभव
अलीकडेच (खरं तर काही महिन्यांपूर्वी) ठकीशी संवाद बघण्यात आलं. नाटक बघणे, कळणे ह्यामध्ये पुष्कळच कमी पडत असल्याची जाणीव झाली. त्यास कारण पुढील गोष्टी:
1 नाटकातले सुटे सुटे शब्द कळले. वाक्ये कळली नाहीत. अर्थ नीटसा लागला नाही.
2 दोन चार वर्षे ललित कला केंद्र अन काही वर्षे NSD Delhi अन सोबतीला FTII मधले कोर्सेस केले तर कदाचित नाटक समजलं असतं
3 समांतर नाटकाची अशी एक धाटणी, शैली असते. त्यातली काही लक्षणे ह्यात होती. अगदी ठळक होती. (Luck by chance सिनेमात नायकाचा स्पर्धक, द्वेष्टा ज्या शैलीत वावरतो, ती. किंवा "तुघलक" , "अंधा युग" ही हिंदी नाटके ज्या प्रकारे सादर केली जाणं अपेक्षित आहे ती. त्यातली काही लक्षणे ह्यात होती. (पण जरा mild. सोसवेल इतपत.)
4.1 पुरुषोत्तम करंडक ते झी मराठीच्या दिर्घन्क स्पर्धेत एक ढाचा तयार झालाय. तो मात्र जसाच्या तसा होता. त्या ढच्याचे निर्मिकच 70sमधले आळेकर किंवा आळेकरी टीम असावी. (म्हणजे त्यांनी काही ठरवून केले नसावे. पण त्यांच्या प्रभावामुळे आपोआप तसे होत गेले असणार. प्रत्येक पुढची बॅच आधीच्या गोष्टी बघत, स्वतःच्या नकळत करत गेली असणार.)
4.2 साचा कुठला? तर दोन अगम्य पात्रे येण्याचा. त्यास नाव गाव नसण्याचा. एक तर त्यातून आडून आडून वर्ग-वर्ण सुचवलेला असतो किंवा रँडम यांत्रिक" , खलाशी" " स्पॉटबॉय असं काहीतरी. जीएंनी दारुच्या नशेत तर्राट एकांकिका लिहायला घेतली अन "शिकारी" टाइप कथा समोर असेल, तर जे काय होईल तसं काहीतरी.
4.3 ह्या साच्यात "घडत" काहीही नाही. बेसिकली नाराजी अन शेरेबाजी असते. अग्रलेखात असावी तशी. आता चला जरा अंतर्मुख (किंवा "अंतर्मुर्ख" ) होऊया म्हणत काही लोकांना अशा ठिकाणी जायला आवडतं. जरा जास्त शिकलेली जरा जास्त पैसा असलेली सुखवस्तू वस्तू लोक अशा ठिकाणी जातात. ह्यात कोण असते? प्राध्यापक डॉक्टर बड्या कंपनीतले बडे पदाधिकारी इत्यादी. पण एकदमच अल्ट्रा प्रो मॅक्स श्रीमंत किंवा क मव अन त्याखालचे दारिद्री लोक हे बघायला येत नसावेत. ह्यांची एकूण दरडोई संपत्ती पन्नास लाख ते पाच पन्नास कोटींच्या घरात असावी. त्याखालाचे येत नाहीत फारसे. वरचेही नाहीत.
5 नाटक आठवते तसे :
नाटकातलं म्हातारा पात्र (सुव्रत) हे रा ग गडकरी (गोविंदग्रज) ते दिवाकर via वर्तक तापकीर गल्ली असा प्रवास करत नुमवीत जातं. तिथं विजय तेंडुलकर गद्रे अशी लिंक लागत एकमेकांना एकमेकांचे कडदोरे (करदोटा) पास करत जातात तांबड्या पाकिटात. मित्रांचे करदोटे बघून ह्यातला एकेक जण गहिवरतो. साखळीतला शेवटचा म्हातारा करदोटा कुणाला न देताच मरतो. सस्पेन्स थ्रिलर सिनेमात खलनायक खून करताना उघड झाल्यावर हावभाव करतो तसे हावभाव करत देखणी गिरीजा ओक फडके गुंडाळत तोंडावर मास्क लावून, शेवटी फाशीच्या कैद्याला घालतात तसा तोंड बंद करणारा कपडा घालून मारुन टाकते........अगम्य वाटतंय? मलाही वाटलं!
6 नाटकात सुरुवातीपासूनच "नै. तुमी काय भूमिका घेणार नै"
"प्रमोद महाजन मोदी अमित शाह.... ह्यांची नावे कै आमी घेणार नै बरं का" म्हणत मोठ्या आवाजात ती नावे घेत अजून मोठ्याने "ही नावे घेतली तर अर्बन नक्षल म्हणाल अर्बन नक्षल" असे समेवर येत हरघडी मुख्य पात्र सुव्रत (अन क्वचित गिरीजा ओक) म्हणते.
एकुणात प्रेक्षकांकडे रोखून बघत सूचक बोलतोय बरं का आम्ही सूचक, असे मुख्य पात्रे विशेषतः गिरिजा ओक सतत म्हणत/ सुचवत राहतात. पण..... त्या छान दिसतात. मला आवडतात. ( एक सिने जाणकार, कला अभ्यासक म्हणाले होते ते आठवलं. सिनेमा, कथा ह्यामध्ये पहिल्या पाच दहा मिनिटांत गोरी स्त्री समोर दिसली पाहिजे. स्त्री आहे तर नागरी संस्कृती आहे. आपली उन्नत संस्कृती आहे. हे मनाच्या कोपऱ्यात असते. ती आकर्षून घेते. मनुष्य तिकडे आपसूक लक्ष देतो. तशा प्रकारे गिरिजा ओक ह्यांचे पात्र रचले असावे. मला त्यांचे छान दिसणे , डोळे, तुकतुकीत त्वचा, एकूणच बांधा आवडतो. तसे पुष्कळ लोकांना आवडत असणार. )
7 1946ला कोटणीस की अमर कहानी सिनेमात किती भारी होतं. म्हणत चिन चिन चुक गाण्यावर आकर्षक गिरीजा ओक नाचते.
8 1967च्या आई की मम्मी अशा कुठल्यातरी वात्सल्यपूर्ण प्रसिद्ध सिनेमाचा रेफरन्स येतो अन पडद्यावर प्रेमळ सुलोचना ताईचे गाणे लागते. सुरेल गिरीजा ते सोबतीला गात असते.
9 कसं ना, किती भारी केलं 1976ला म्हणत भारी भारीच भूमिका घेतली वा वा वा. म्हणत शाब्दिक गौरव होतो.
10 सुमन कल्याणपूर "बाबूजी" ह्यांचा गहिरवरून टाकणारा काळ संपला. अन 1990s खा उ जा L P G आलं. भयंकर झालं. सर्वत्र चिनी माल आला. म्हणून तीव्र दुःख व्यक्त केलं जातं. (Liberalisation, Pricatisation, Globalisation खाजगीकरण उदारीकरण जागतिकीकरण LPG खा उ जा)
11 पुन्हा पुन्हा मोठ्याने 2014 ला संपलं सगळं. गेलं सारं मातीत 2014ला. असा सूर लावला जातो. प्रत्यक्षत तो उपहास करण्याच्या सुरातून आलेला असतो
12 पाच दहा सेकंद चार्ली चॅप्लिनच्या प्रसिद्ध सिनेमाची क्लिप देखील दिसते की यंत्रयुगात माणसाचं माणूसपण कसं हरवलं आहे सांगणारी.
आफ्रिका, साऊथ अमेरिका अन ठाण्याजवळचे वारली ह्यांच्या भाषेतली करदोटा विषयावरची गाणी वाजतात
13.1 इंटरनेटवर सापडणारी प्राचीन ऐतिहासिक गोष्टींची चित्रे घेऊन त्यावर करदोटा चिटकवलेला दाखवतात. इजिप्त अलेक्झांडर पर्शियन सम्राट सायरस ते अगदी मुघल... सगळ्यांच्या चित्रावर चिटकवून दाखवतात
13.2 दरम्यान lock downचा संदर्भ येतो. सगळंच कसं बंद बंद आहे असं पात्र म्हणतं. नवीन तंत्रज्ञान अन AI मुळे अख्खी दुनिया तुरुंग झाली आहे असं सुचवतं. "जग हे बंदिशाळा असं कृष्णधवल गाणं वाजायला लागतं.
14 वरती मी साचा, template म्हणालो, ते काय आहे? तर देकार्त, डांटे, नित्शे, गटे, रुसो, डोस्तोवस्की , ब्रेख्त (की बेकेट?) ते अगदी झिझेक ह्यांची कैक अवतरणे, उद्धरणे असतात. संधी मिळताच ती जागोजागी पेरली जातात. जशाला तशी! मुख्य म्हणजे ती तत्वज्ञानाचे विद्यार्थी, प्राध्यापक किंवा नाट्य-कला टाइप ह्या लोकांसाठी असल्यानं बर्यापैकी अमूर्त, abstract असतात. माझ्यासारख्याला अगम्य वाटतात. अकादमीक विश्वात ज्या चर्चा, वाद होतात, त्यातून ती आलेली असतात.
15 वरच्या मुद्द्याचा उपमुद्दा :
1984च्या आसपास आलेल्या party सिनेमातली पात्र अशी तत्वज्ञानात्मक चर्चा करतात. (अर्थात अंशतः ते खपून जाते. कारण त्यातल्या निम्म्या पात्रांची पार्श्वभूमीच चळवळी, कार्यकर्ते, क्रांती, अभिनेते, अभ्यासक अशा टाईपची आहे. पण एरवीही ह्या गटाचे हे चाललेले असते. ह्यातला परमबिंदू म्हणजे एलकुंचवार. (त्यांचे उदाहरण नंतर कधी सांगेन)
Party सिनेमातल्या दृश्याची लिंक इथं देतोय. क्लासरुम मधून बाहेर पडून सारा syllabus नाट्य , सिनेमा, तत्वद्न्यान ह्याच्या विद्यार्थांनी लिहून काढावा तसे झाले आहे
https://youtu.be/j-kdJQtEutc?feature=shared
16 नाटकाचा एकूण सूर "सारं काही (विशेषतः 2014नंतर) संपलंय" "कशात काही नाही" "भूमिका घ्या. भूमिका घ्या" असा वाटला.
1991 खा उ जा पूर्व काळाला थोर म्हटल्यासारखं वाटतंय. बहुतेक लेखकाला ह्यापैकी कुठल्या गोष्टीचे चटके 90पूर्व काळात बसले नसावेत. त्यामुळं त्याबद्दल romanticism असावा --
तुपाच्या नावाखाली डालडा वापरणे, घरात गॅस नसून स्टोव्ह सर्रास असणं, जगभर रंगीत टीव्ही नॉर्म होऊनही आपल्याकडे केवळ कृष्ण धवलच सार्वत्रिक असणे, निवडणूक प्रचार अन इतरत्र घाणेरडे स्पीकर असणे, त्यातून आवाज शब्द न कळणे/पोचणे पण जबरदस्त गोंगाट अन कानठळ्या बसवणारा आवाज होणे, घासलेटसाठी रांगा लावणे, साध्या साध्या कागदपत्रांसाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या पाया पडणे, रोजवापराच्या आपल्या आयुष्य आज सुसह्य करणाऱ्या अगणित गोष्टी मार्केट मध्ये अस्तित्वातच नसणे (जसं की विविध प्रकार, आकाराचे डबे, फोन, चांगली स्वयंचलित घड्याळे, चारचाकी)
may be. त्यांना तो काळ फार उत्तम वाटतोय. मला चिंता वेगळीच वाटते. जे चाललंय ते चुकीचं आहे; असं वाटत असेल तर त्या चुकीबद्दल येणारा प्रतिसाद बघून लेखक उमजतो.
"च्यायला. ऐकून काय घेताय? तुम्हाला लाज कशी वाटत नाही?" असा असू शकतो. घाशीराम कोतवाल चा तो होता.
पण ह्यांचा सूर "आता सगळं सगळं संपलंय" स्टाईल आहे ह्यावेळेस. हे आसपासच्या परिस्थितीबद्दल कमी अन लेखकबद्दल जास्त आज स्टेटमेंट. "आता सगळं संपलंय" हे वाटतं म्हणजे बेसिकली लेखक संपलेला असण्याची शक्यता आहे. हे मी एकटा म्हणत नाही. मला नीट आठवत असेल तर विजय तेंडुलकरांनी वागळेला शेवटच्या काळात एक प्रदीर्घ मुलाखत दिली होती 2008च्या आसपास. त्यात त्यांनीही म्हटलं आहे.
( "सारं काही संपलंय" हा सूर अगदी हिंदूंच्या पुराणात देखील आहे. कारण मगध मधील शिशुनाग घराण्याच्या सम्राटाला मारुन तेव्हा तोवर त्याचा न्हावी म्हणून काम करणाऱ्या अन तथाकथित शूद्र जातीच्या महानंद ह्याने सत्ता ताब्यात घेतली. क्षत्रिय घराणे गेले. आपल्या तथाकथित संस्कृतीचे काय होणार, क्षत्रिय-ब्राम्हण construct चे काय होणार? असे ते रुदन आहे. प्रत्यक्षात मगध पुढच्या काळात अजूनच मोठे साम्राज्य बनले. वृद्धिंगत झाले. नव्या येणाऱ्या राजघराणे आणि सम्राटांनी तथाकथित थोर संस्कृती अंगिकारली. त्या constructने ह्यांना accomodate केले अन स्वतः टिकून राहिले. प्रत्यक्षात बुडाले कोण? तर रुदन करणारे त्या constructचे वाहक, इक्का दुक्का आधीच्या सत्तेचे लाभधारी.)
.
सहमत आहे. आजच्या राजकीय परिस्थितीवर टीकात्मक भाष्य आहे म्हणून अनेकांनी हे नाटक उचलून धरलं. भारतातली राजकीय परिस्थिती वाईट आहे आणि त्यावर टीका व्हायला हवी, बोलायला हवं हे खरंच आहे. पण हे नाटक वाईट आहे. गिरिजाचा तार सप्तकातला गोड आवाज आणि नाटकी (नाटकच आहे म्हणा! पण तरी!) संवादफेक असह्य होतात. नाटकच असह्य होतं.
हे नाटक बघितलेलं नाही
तुम्ही नाटकाचा परिचय उत्तम करून दिलात. तुमची सूक्ष्म निरीक्षणे आवडली.
सतीश आळेकर उत्कृष्ठ नाटककार आहेत. मात्र त्यांची उत्तरकालीन नाटके उत्तरोत्तर घसरत गेलेली आहेत.असे.माझे मत आहे.
राजकीय विशेषतः भाष्य असलेली नाटके तर फारच एकांगी आणि संताप व्यक्त करण्यासाठी केवळ लिहिलेली दिसतात.
पूर्वकालीन आळेकर ग्रेट आहेत. बेगम बर्वे, मेमसाहेब, महानिर्वाण हा बहुधा त्यांचा peak होता.
पिढीजात आणि इतर कचरा नाटके आहेत. हे वरील नाटक पाहायला जाण्याची उत्सुकता या लेखामुळे संपली.
तुमच्या पोतडीत अजून सफरचंदे असावी असे दिसते.
जमल्यास अजून लिहा.
धन्यवाद
(समांतर नाटकांची पण एक परंपरा बनते हे अगदी खरं आहे तुम्ही मजेदार निरीक्षणे नोंदवलीत 70 च्या दशकातील समांतर हिंदी सिनेमांचा सुद्धा असाच एक predictable साचा बनलेला आठवला आणि आळेकर यांनी वेटींग फॉर गोदो चा प्रभाव घेतला असेल कदाचित )
अरे बापरे
ऍडम, मस्त पिसं काढली आहेत तुम्ही. मी एकुंचवारांची नाटके पाहिली नाहीत. मात्र एलकुंचवार आणि त्यांचे ते ललित लेखन फारच डोक्यात जातं. काय प्रीटेन्शस प्रकार आहे तो सगळा. ते त्यांचे यथा काष्टं का काय असं मोहित टाकळकराने केलेले अभिवाचन एकदा ऐकले होते त्यानंतर एलकुंचवारांच्या वाट्याला मी गेलो नाही. भयंकर आहे ते सगळंच.
या लेखाबद्दल तुम्हाला आता एका बंद इंटिमेट थिएटर मधे एकटं डांबून CRD हा चित्रपट *पुन्हा* पाहण्याची सजा द्यायला पाहिजे.
https://youtu.be/XNmq6cji_wc?si=C4XUbjj1tanr0Kys
(तुम्ही आधीच तो पाहिला आहे हे तपासलं आणि पुन्हा हा शब्द वरील वाक्यात add केला)
?
लेखाच्या विषयाशी यत्किंचितही परिचित नसल्याकारणाने, त्याबद्दल आपला पास. परंतु,
- लेखाचे मूळ शीर्षक बदलून आता ते टिंबांकित का केले आहे बरे?
- झालेच तर, हे लेखन मनोबाचे आहे, असे कळते. अशा परिस्थितीत, adam नावाच्या भलत्याच कोणाचे तरी नाव शीर्षकस्थानी का दिसत आहे बरे? (या नामांतराचे प्रयोजन काय?)
(दोन्हीं प्रश्नांचे उत्तर अर्थात 'लेखकाची मर्जी' या दोन शब्दांत देता येईलही. आणि, अर्थातच, ते उत्तर वैधदेखील आहे. परंतु, तरीही... कुतूहल मांजर मारते म्हणतात, ते असे!)
एलकुंचवार
वरती पंधराव्या मुद्द्यांत एलकुंचवार ह्यांचा उल्लेख त्यांच्या मुख्य दोन चार नाटकांबद्दल आहे.
"यातनाघर" ही एकांकिका त्रिनाट्यधारेतली वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत अशा नाटकांचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे ती त्यातली लांबलचक स्वगतं. ती त्यातली विद्वत्तापूर्ण, जगभरचे तत्वज्ञान ठासून भरलेली भाषा. त्यांची साधी पात्रही ऑक्सफर्ड केम्ब्रिज मॉस्को पासून ते जगभरच्या सगळ्या नामांकित विद्यापीठात सर्व भाषेतलं साहित्य तत्वज्ञान शिकून पचवून बसलेली असल्यासारखी बोलतात.
.
"गती नियतीला प्रारब्धाचं कोंदण असतं कुठं. भयव्याकुळ मग्न तळ्याकाठी शोधीन मी माझ्याच आत मधलं अंतर" असं काहीतरी मग्न तळ्याकाठी मधलं एक पात्र बोलतं. त्यातली मुंबई मधली लोअर मिडलक्लास पात्रं आणि गावाकडची ब्राम्हण पण अल्पशिक्षित, कायम गावात राहिलेली आदरवाईज फारसा व्यासंग वगैरे नसलेली पात्रंसुद्धा असलं काहीतरी बोलतात. शेवटच्या प्रसंगात तो कथानायकाला अटक करायला आलेला पोलीस आता भागवद्गीतेचं सार सांगतो की काय असं वाटत होतं. ते प्रवचन ऐकून मी चिपळ्या वाजवायच्या तयारीत होतो. पण तो येऊन निव्वळ अटक करून निघून जातो! हीच एक जागा का सोडली असेल लेखकानं? तिथंही भरायचं की काहीतरी अजून.