Skip to main content

"Honey, it's not about money"

मागच्या आठवड्यात सलग ३ वेळा ३ वेगवेगळ्या लोकांकडुन तोच जुना डायलॉग ऐकला म्हणजे मला नाही ऐकवला कोणी. इन जनरल बोलण्याच्या ओघात मारला.
"पैशासाठी वेडी झालेली आहेत लोक हल्ली,
"पैशासाठी काहीही करतात , काय वाट्टेल ते,"
"पैसा जणु देवच झालाय आता, "
थोड्याफार फरकाने उन्नीस बीस इधर उधर पैशा संदर्भात तेच ते तेच ते
मनात विचारचक्र सुरु होण्यास इतकं trigger पुरे होतं.
खरचं ? लोक "पैशामागे" वेडी होतात ? पैशाने वेडी होतात ?
या सर्व मांडणीमध्ये काहीतरी गल्लत गफलत झालेली आहे असे मला वाटतेय. म्हणजे आपण सर्व मानवी समाज पैशाने संचालित होतोय असे म्हणणे थोडे चुकीचे खरे म्हणजे वरवरचे विधान आहे. माझा रोख आपल्या वर्तणुकीला संचालित पैसा करतोय का ?
मला असे वाटते की पैसा हे केवळ आणि केवळ साधन आहे. आपण सर्वांना हे मान्य करण्यास हरकत नसावी.
आपण मुलतः पैशाने नाही " भावनांनी" संचालित होत असतो.
एखाद्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा प्रियजनांनी अपमानित केलेले असेल तर तो त्याचा सुड उगवण्यासाठी त्यांच्याहुन जास्त पैसा मिळवुन तुमच्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ झालो आहे बघा या प्रेरणेतुन पैशाच्या मागे लागलेला असतो.
इथे वस्तुनिष्ठपणे बघितल्यास " पैसा " हा कुठे प्रेरणा देतोय ? त्यामागे असलेली असुया द्वेष ही भावना त्या माणसाला प्रेरीत संचालित करत आहे.
तसेच एखादा माणुस मुलतः भविष्यात संभाव्य कामधंदा गमावण्याच्या भितीने ग्रस्त असेल जी भिती अजुन खोल अशा उपासमारीने मरण्याची असेल त्याहुन मागे गेल्यास जगण्याची तीव्र इच्छा जी प्रत्येक सजीवात नैसर्गिक असते त्या प्रेरणेने असेल तर असा
मुलतः जगण्याच्या तीव्र लालसेने , मृत्युच्या तीव्र भितीच्या प्रेरणेने संचालित होत नाही का ? म्हणजे पैसा हे त्याचे जिवंत सुरक्षित उपासमार टाळण्याचे साधन आहे.
मुल प्रेरणा पैसा नसुन या सर्व वरील भावनाच आहेत नाही का ?
एक तुलना करुन बघण्याचा प्रयत्न करतो. समजा एक जगापासुन तुटलेला आयसोलेटेड आदिवासी टाइप समाज आहे एका बेटावर. जिथे आता पैसा हे विनिमयाचे साधन नाही मोरपीस हे साधन आहे किंवा मीठ किंवा शंख शिपले किंवा बकरी हे त्या समाजाने स्विकारलेले साधन आहे. आणि ज्याकडे हे जितके जास्त अधिक मोरपीस अधिक बकर्या इत्यादी ( हे सर्व वास्तवात करन्सी म्हणुन वापरले जात असत salary हा शब्द salt या currency वरुन आलेला आहे. ) तर असा झुलु बेटावरील मांडोरा नावाचा मुलगा मुखियाच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी वेडापिसा झालाय आणि म्हूणुन पिसं गोळा करतोय यात मोर पीस हे motivating factor नसुन मांडोरा चे पिझी वरील प्रेम हे खरे motivating factorआहे.
काही लोक बघा नुकतेच एक मुकेश अंबानी यांचे सहकारी प्रकाश शहा ज्यांचा वार्षिक पगार ७५ करोड होता त्यांनी सर्व काही सोडुन त्याग करुन संन्यासाचा मार्ग स्वीकारला. तर त्यांची प्रेरणा जी अगोदर बाह्य जगातील यशासाठी पैसा हे साधन वापरणारी होती ती आता आंतरजगतातील उर्मी साठी पैसा त्यागण्याची झाली.
म्हणजे आजपर्यंत वेगवेगळ्या करन्सीज वेगवेगळ्या समाजानी वापरल्या. म्हणजे वेगवेगळी साधने वापरली. पण साधन इटसेल्फ स्वतः हा मुव्हींग फॅक्टर असु शकत नाही.
कधीच नसतो. म्हणजे एखादा जीवनात इतर काही कारणाने निराश झालेला व्यक्ती किवा रागावलेला व्यक्ती उदा. आपल्या मुलावर रागावलेला सर्व पैसा कुठल्यातरी संस्थेला दान करुन देतो असे आपण बघतो.
तर मुद्दा साधा आहे माझा की money by itself हा मुव्हींग फॅक्टर नसतो किंवा मानवी इतिहासात कुठलीच करन्सी कधीही motivating factor नसते. तर मानवी मुलभुत भावना याच सर्व कृतींना संचालित करत असतात.
उदा. The Dark Knight मधला जोकर त्याच्या हिस्शाचे पैसे जाळायला घेतो तो सीन बघा जोकर म्हणतो.
"All you care about is money. This town, it deserves a better class of criminal, and I'm going to give it to them". The famous closing line from the scene is, "It's not about money, it's about sending a message. Everything burns".
काही मंडळी उदा. एखादा शेटजी पैसा जमवण्याच्या छंदात नादात वेडापिसा होतो. म्हणजे त्यात ही motivating factor ही त्याची greedकिंवा लालसा असते. इथे ही fear and greed या सारक्या मुलभुत मानवी भावनाच सर्व काही संचालित करत असतात.
समजा या सर्व भावनांची पुर्ती ते साधन अंमलात नसेल इतर असेल व त्याने होणार असेल तर ते त्या त्या साधनांचा वापर आपल्या भावनांचा पाठलाग करण्यासाठी करतील
मला असे काहीसे वाटते
तुम्हाला काय वाटते ? money by itself हे एक motivating factor आहे.
की मुलभुत मानवी भावना या खर्‍या या सनातन खेळामागे आहेत.
दुसर्‍या शब्दात विचारायचं तर ये सब पैसो का खेल है या भावनाओ का खेल है ?

सई केसकर Mon, 15/09/2025 - 07:54

कुणाला वेड कनकाचे
कुणाला कामिनी जाचे..

तुम्ही म्हणता ते खरेच आहे. पण पैशाच्या मागे लागतात तसे लोक इतर अनेक गोष्टींच्या मागे लागतात. काही लोकांना प्रसिद्धी हवी असते. काही लोकांना आणखीन काही. मग तुमचा प्रश्न रिफ्रेज करून असं विचारता येईल, की (काही) लोक पैशा(च्याच) मागे का लागतात?

बकरी, मोरपिस अशा पैशाच्या जागी म्हणून वापरल्या जाणाऱ्या गोष्टीचा ध्यास घेणं म्हणजे पैशाचा ध्यास घेणंच नव्हे का?

पण उदाहरणार्थ, काही लोकांना पैसे खर्च करायला अजिबात आवडत नाही. ते अधिक मिळावेत असं तीव्रतेने वाटत नसलं तरी आपला पैसा खर्च होऊ नये ही भावनिक गरज फार तीव्र असते. हे पैशाच्या मागे लागणं नाही, कदाचित पैशासमोर भिंत होऊन उभं राहणं आहे!

मारवा Mon, 15/09/2025 - 08:32

वरील लेखातील उदाहरणातला मुलगा मुळात प्रेम या भावनेने प्रेरित झालेला आहे. मुखिया ची अट अशी आहे की 100 मोरपीस जमवून देणारा जो असेल त्यालाच मुलगी देणार. या वरील मोरपीस चलनाऐवजी इथे जर मुखिया ची अट एक दणकट लाकडाचे घर बांधून देणारास आणि ताहिती बेटावरील 10 मधाची पोळ आणून देणे ही अट ठेवलेली असेल तर तो मुलगा मोरपीस या चलनाच्या नादी लागणारच नाही कारण
पिसी वरील प्रेम हे motivating factor इथे काम करत आहे. आता हा मुलगा घर बांधण्याच्या आणि पोळी जमवण्याचे कामास लागेल.
आता काही लोकं हे मोरपीस या चलनाच्या फक्त त्याच्याच नादी लागतात. म्हणजे त्या साधनांचे व्यसन त्यांना लागते. ते अधिकाधिक accumulate करण्याचे व्यसन लागते.
म्हणजे वेगवेगळ्या बासरीच जमा करण्याचे व्यसन लागते त्याचा उपयोग जो आहे संगीत निर्माण करण्याचा त्यात रसच नसतो.
पण पुन्हा अजून धांडोळा घेतला वरील दोन उदाहरणांचा
की कुठल्या मानवी भावना असतील या मागे ?
मुलगा कदाचित काम भावनेने प्रेरित असेल किंवा विशुद्ध प्रेम भावनेने
बासरी वाला कदाचित वेगवेगळ्या आकाराच्या कोरीव कामाच्या सौंदर्या ने मिळणाऱ्या आनंद भावनेच्या मुळे प्रेरित झालेला असेल.
पैसा या साधनाच्या च केवळ मागे काही लोक लागतात. त्यामागील भावना अनेकदा नकारात्मक आढळून येतात. उदा. भीती, असुरक्षितता कधी मूलभूत survival ची प्रेरणा काम करत असते. पैसा न वापरता एखादा समाज जर ब्रेड बटर ची व्यवस्था करत असेल तर काही लोकांच्या बाबतीत ती भय भावना राहत नाही.
अंधुकसे आठवते कुठलातरी रोमन राजा फ्री ब्रेड ची व्यवस्था करीत असे.

'न'वी बाजू Mon, 15/09/2025 - 16:51

In reply to by मारवा

वरील मोरपीस चलनाऐवजी इथे जर मुखिया ची अट एक दणकट लाकडाचे घर बांधून देणारास आणि ताहिती बेटावरील 10 मधाची पोळ आणून देणे ही अट ठेवलेली असेल तर तो मुलगा मोरपीस या चलनाच्या नादी लागणारच नाही कारण पिसी वरील प्रेम हे motivating factor इथे काम करत आहे. … आता काही लोकं हे मोरपीस या चलनाच्या फक्त त्याच्याच नादी लागतात. म्हणजे त्या साधनांचे व्यसन त्यांना लागते. ते अधिकाधिक accumulate करण्याचे व्यसन लागते. … मुलगा कदाचित काम भावनेने प्रेरित असेल…

Come to think of it, प्रस्तुत कामभावना काय, किंवा पिसीवरील प्रेम काय, किंवा दस्तुरखुद्द पिसी (Pissy… काय नाव आहे!) काय, हीसुद्धा अंतिमतः निव्वळ साधनेच नव्हेत काय? Propagation of species (किंवा, छोट्या scaleवर, of tribe, clan, etc.) या अंतिम ध्येयाप्रतिची ही निव्वळ साधने आहेत. परंतु अनेकदा लोकांना या साधनांचेच व्यसन लागते. म्हणजे, अंतिम ध्येय जाते बोंबलत, नि लोक कामभावनेच्या, नाहीतर प्रेमाच्या, नाहीतर एखाद्या ‘पिसी’च्याच नादी लागतात. चालायचेच.

पैसा या साधनाच्या च केवळ मागे काही लोक लागतात. त्यामागील भावना अनेकदा नकारात्मक आढळून येतात. उदा. भीती, असुरक्षितता कधी मूलभूत survival ची प्रेरणा काम करत असते. पैसा न वापरता एखादा समाज जर ब्रेड बटर ची व्यवस्था करत असेल तर काही लोकांच्या बाबतीत ती भय भावना राहत नाही.
अंधुकसे आठवते कुठलातरी रोमन राजा फ्री ब्रेड ची व्यवस्था करीत असे.

Panem et circenses… (इंग्रजीत: Bread and circuses.) एक तर, असे एखादा विशिष्ट रोमन राजा खरोखरच करीत असे, की रोमन राजांमध्ये अशी काही प्रथा खरोखरच होती, की असे केवळ एका रोमन कवीने आपल्या काव्यात लिहून ठेवले आहे, हे शंकास्पद आहे. (म्हणजे, ही ओळ एका रोमन कवीच्या काव्यातील आहे, हे निश्चित. प्रत्यक्षातल्याबद्दल म्हणतोय मी. असेलही, नसेलही. असो.)

तसेही, यामागची भूमिका ही प्रजेची अन्नअसुरक्षितता दूर होऊन त्यांना ते भय राहू नये, ही खचितच नव्हती. तर, प्रजेला अधूनमधून फुकटात भरपूर चांगले खायलाप्यायला घातले/मेजवान्या दिल्या/ सार्वजनिक जेवणावळी घातल्या (Panem) (Note that these could be periodic, and not necessarily a continuous, reliable, daily source of sustenance for the needy.), आणि भरपूर करमणुकीची साधने (Circenses) देऊन त्यांत गुंगवून ठेवले, की मग तुम्ही राज्यकारभारात काय वाटेल तो सावळागोंधळ जरी घातलात, तरी प्रजेचे त्याकडे लक्ष राहात नाही, नि प्रजा तुमच्या विरोधात उठत नाही.

(म्हणजे, भीती, असुरक्षितता, मूलभूत survivalची प्रेरणा तर खरीच, परंतु, ती प्रजेची नव्हे, तर राजाची. गल्ली अंमळ चुकली.)

मारवा Mon, 15/09/2025 - 22:27

In reply to by 'न'वी बाजू

Come to think of it, प्रस्तुत कामभावना काय, किंवा पिसीवरील प्रेम काय, किंवा दस्तुरखुद्द पिसी (Pissy… काय नाव आहे!) काय, हीसुद्धा अंतिमतः निव्वळ साधनेच नव्हेत काय? Propagation of species (किंवा, छोट्या scaleवर, of tribe, clan, etc.) या अंतिम ध्येयाप्रतिची ही निव्वळ साधने आहेत. परंतु अनेकदा लोकांना या साधनांचेच व्यसन लागते. म्हणजे, अंतिम ध्येय जाते बोंबलत, नि लोक कामभावनेच्या, नाहीतर प्रेमाच्या, नाहीतर एखाद्या ‘पिसी’च्याच नादी लागतात. चालायचेच.
सर्वप्रथम या वरील दमदार विचारासाठी मनापासुन कौतुक !!!!
तुम्ही केलेली वरील मांडणी खरोखर विचार करण्यासारखी अशीच आहे. मी माणुस हा बेस धरुन गृहीत धरुन लिहीत होतो. आणि माझी मांडणी पैशाच्या मागील प्रेरणेकडे अंगुलीनिर्देश करणे ही होती. तुम्ही त्याहुनही मागे जाऊन अजुन खोलवर उलगडा केला. यावरुन नुकतेच वाचलेले राजीव साने यांच्या स्फुर्तिवादी नितीशास्त्र या पुस्तकातील कांट वरील एक प्रकरण आठवले. त्यातील मांडणी या दिशेने आहे. म्हणुन मुद्दाम ते पुस्तक काढुन ते प्रकरण पुन्हा वाचले. हे खुपच रोचक आहे आणि विचारोत्तेजक असल्याने इथे देण्याचा मोह मला आवरत नाही.
यात एक प्रकरण आहे कर्तव्यवादावर कांट या फिलॉसॉफर ने जी मांडणी केलेली आहे त्या संदर्भात आहे. कांट चे ५ निकष त्यांनी मांडलेले आहेत. यातील कांट चा ५ वा निकष आपल्या विषयाशी संबंधित आहे सानेंच्या पुस्तकातील पृष्ठ क्र. २५ व २६ वरील उतारा हा असा आहे.
निकष क्र.५- पाचव्या निकषात कांट नुसत्या सार्विकीकरणावर थांबत नाही; तर मानवी जीवन "सु-नैतिक" बनविण्यासाठी एका मानवाने दुसर्‍या मानवाकडे कसे पाहीले पाहीजे हेही तो सांगतो. समजा आपण एका निरोप्याकडे एक बंद पाकिट दिले व ते उद्देशित व्यक्तीस पोहोचव असे सांगितले , तर तो, उदाहरणार्थ वेतन मिळते म्हणुन, म्हणजेच सोपाधिकपणे आपले काम करुन टाकेल. तो या प्रसंगापुरता तरी, आपल्या दृष्टीने साधनमात्र असेल. अर्थव्यवस्था, कार्यसंघटन अशा कित्येक बिनचेहर्याच्या व्यवस्थांमध्ये आपण एकमेकांचे साधन म्हणुन उपयोग करतच असतो व अशा व्यवस्था असण्याने बरीच कामे होउन जात असतात. काम व्यवस्थाजन्य असणे एवढ्यानेच कोणाला हीन भावनाही येत नाही. आपण विमा उतरवतो तेव्हा अनेक अनोळखी( संभाव्य संकटातील ) माणसांना मदत करत किंवा त्यांची मदत घेतही असतो . हे सहकार्याचेच नाते आहे पण समोरासमोर ओळखही नसते.
अशा अनोळखी व्यवस्थांना कांट निषीद्ध मानत नाही. तो असे सांगतो की " स्वतःतील व दुसर्‍यातील मानवत्वाला आपण अंशतः साधन म्हणुन बघितले , तरी "निव्वळ एक साधन " म्हणुन कधीच बघितले नाही पाहीजे; तर तो/ती हेही एक साध्ये/प्रयोजने उत्पन्न करु शकणारे स्वातंत्र्य आहे, हे कधीच दुर्लक्षित करता कामा नये "
यात कांट एकच व्यक्ती लक्षात न घेता व्यक्ती-व्यक्तीतील संबंधांच्या गुणवत्तेला सुद्धा मुल्य देतो आहे हे उघड आहे. यासाठी निकष क्रं. ५ मध्ये कांट स्वातंत्र्याची आंतरक्रिया तर विचारात घेतोच; पण इतरांबरोबर स्वतःतील मानवत्वालासुद्धा निव्वळ साधन मानुन वापरु नका, हे सांगतो. तो महत्वाकांक्षेमागे किंवा अगदी "मंगलमय" ध्येय्यामागेसुद्धा धावुन स्वतःची फरफट करणार्‍यांनाही कु-नैतिक ठरवतो.
एकून सर्वच ५ ही निकष वाचनीय आहेत पण हा वरील आपल्या विषयशी आणि चर्चेशी सुसंगत वाटला.
उत्कृष्ठ विचारप्रवर्तक प्रतिसादासाठी मनापासुन धन्यवाद !

'न'वी बाजू Mon, 15/09/2025 - 17:49

आपण मुलतः पैशाने नाही " भावनांनी" संचालित होत असतो. एखाद्याला त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी किंवा प्रियजनांनी अपमानित केलेले असेल तर तो त्याचा सुड उगवण्यासाठी त्यांच्याहुन जास्त पैसा मिळवुन तुमच्यापेक्षा मी कसा श्रेष्ठ झालो आहे बघा या प्रेरणेतुन पैशाच्या मागे लागलेला असतो.

“मेरे पास बिल्डिंगें हैं, प्रापर्टी है, बैंक बैलन्स है, बंगला है, गाड़ी है… क्या है तुम्हारे पास?”

“मेरे पास माँ है।”

थोडक्यात, यामागे आईविषयीची कोठलीही उदात्त प्रेमभावना वगैरे नसून, ‘माँ’ हे निव्वळ सांपत्तिक स्थितीच्या तुलनेतील एक चलन (किंवा, ‘तुझ्यापेक्षा-माझा-लांब’-छाप स्पर्धेतील मोजमापाचे एक एकक) आहे, म्हणायचे!

नाही म्हणजे, जगात आजवर मातृत्वावर कवने अनेकांनी रचली असतील, मातृत्वाचे पोवाडे अनेकांनी गायले असतील. (अमेरिकेत तर त्याची गणना ‘साक्षात अमेरिकनत्वाचे द्योतक’ अशी होऊन त्या अनुषंगाने त्याची तुलना अॅपल पायशी केली जाते.) मात्र, या संवादाइतके मातृत्वाचे अवमूल्यन करणारे जगात दुसरे काही पाहिले वा ऐकले नसेल. (अगदी एखादी आईवरून शिवीसुद्धा!)

चालायचेच.

'न'वी बाजू Mon, 15/09/2025 - 18:12

In reply to by 'न'वी बाजू

(किंबहुना, त्यापुढील संवाद जर पुढीलप्रमाणे लिहिला असता, तर तो अधिक सयुक्तिक ठरला असता:

“…और एक माँ।”

“च्यायलेंज!”

(शांतपणे) “उचलेंज।”

पण लक्षात कोण घेतो?)

सई केसकर Tue, 16/09/2025 - 06:09

तुमचा वरील प्रतिसाद आणि नबा यांचे प्रतिसाद वाचून मुद्दा स्पष्ट झाला. पण पैसा नेहमीच साधन असत नाही. कधीकधी ते साध्य असतं. म्हणजे केवळ पैसा असावा म्हणून त्याच्यामागे लोक धावतात. पण हीदेखील एक भावनाच आहे. संचय करून ठेवण्यामागे काहीतरी असुरक्षितता असते. अनेकदा वयस्कर लोक पैसे खर्च होतील म्हणून दवाखान्यात जात नाहीत. पण ते दवाखान्यात न जाता मेले तर त्यांच्या पैशांचा त्यांना काय उपयोग? असा साधा प्रश्न त्यांच्या मनात येत नाही.

पण याच्या उलट वर्तन करणं (म्हणजे कशाचाही मागे न लागणं) काहीसं बोरिंग नाही का? एवढं मोठं आयुष्य मिळालं आहे. मरेपर्यंत टाईमपास करायचा आहे. तर मग निर्मोही, निर्व्यसनी, निश्चल वगैरे राहून कंटाळा येणार नाही का? कशाच्यातरी मागे लागलं की वेळ चांगला जातो. प्रयोग फसला तर उपरती होते. त्यावर उपाय करता येतात. शहाणं झाल्याचा आभास निर्माण होतो. इतरांना सल्ले देता येतात. यातून बाकी काही साध्य होत नसलं तरी आपला स्वतःचा वेळ बरा जातो.
आपण कशाच्या मागे लागणार ते मात्र आपण किती रिस्क आव्हर्स आहोत त्यावरून ठरतं. प्रोफेश्वर वगैरे लोक त्यामुळेच ज्ञानाच्या वगैरे मागे लागतात. त्यातल्या त्यात सेफ ऑप्शन. आणि ज्यांची भूक जास्त आहे ते derivatives मध्ये पैसे गुंतवतात.

मारवा Tue, 16/09/2025 - 21:17

In reply to by सई केसकर

शहाणं झाल्याचा आभास निर्माण होतो. इतरांना सल्ले देता येतात. यातून बाकी काही साध्य होत नसलं तरी आपला स्वतःचा वेळ बरा जातो.

खरं आहे.कभी कभी यूँ भी हम ने अपने जी को बहलाया है
जिन बातों को ख़ुद नहीं समझे औरों को समझाया है

एवढ मोठं आयुष्य मिळालं आहे मरेपर्यंत टाईमपास करायचा आहे.

हे मला नक्की relate करता येतं. म्हणजे आयुष्यं हे मूलभूतपणे निरर्थक आहे यावर माझा ठाम विश्वास आहे. पण ते तसं भयावह नकारात्मक अशा अर्थाने वाटतं नाही. तर ते तटस्थ निर्विकार आहे अशा अर्थाने वाटत. म्हणजे वाट्याला आपल्या प्रत्येकाच्या एक clay आलेला आहे. त्याला आपल्याला हवा तो आकार देता येतो .म्हणजे तुम्ही चिपकून बसा काही तरी घेऊन कला,धर्म,आदर्श,हिंसा,त्याग, क्रौर्य, विकृती काहीही ....
पण मूलभूतपणे आयुष्य हे तटस्थ
बरसात का बादल तो दीवाना है क्या जाने
किस राह से बचना है किस छत को भिगोना है
तुम्ही clay चे काय खेळणे बनवतात काय आकार देतात काय मोडतात याच्याशी clay को कोई मतलब ही नाही.
By the way
मी गेले काही वर्षे derivatives मध्ये ट्रेडिंग करतो.
पण माझी भूक वगैरे जास्त नाही हो. म्हणजे derivatives ला drugs सारखं treat करतात काही लोकं.
पण तो मी नव्हेच.
थोड अजून अवांतर
महावीर great होते. त्यांना माहित होत की चलन महत्वाच नाहीये. त्यामागची त्यांच्यामते उपद्रव निर्माण करणारी वृत्ती त्यांनी नेमकी हेरली.आणि पंच महाव्रते सांगितली त्यातील एक जबरदस्त आहे. अपरिग्रह. कशाचाही संग्रह करू नका या अर्थाने केवळ धनाचा करून बोजा वाढवू नका तर विचारसरणींचा, नातेसंबंधांचा सर्वच प्रकारचा परिग्रह नको.
याच्याशी सहमत असणे नसणे बाजूला ठेवा एकवेळ.
पण काय depth आहे चिंतनाची काय खोलवर दृष्टी आहे. त्यांना माहित होत उद्या हे नाहीतर ते काही ना काही धरतील. म्हणून specific वस्तू इत्यादी न सांगता परिग्रह करण्याच्या वृत्तीला pinpoint करून त्याचा त्याग सांगितला.
असो

Rajesh188 Wed, 17/09/2025 - 15:13

अस्तित्व टिकवणे ही प्रत्येक साजिवा ची उपजत उर्मी असते अस्तित्व ला धोका निर्माण होत नसेल तर प्रभाव निर्माण करणे ही पण उपजत उर्मी च आहे.

प्रभाव निर्माण झाल्या वर प्रभुत्व निर्माण करण्यात अस्तित्व धोक्यात येऊ शकत त्या मुळे खूप कमी मानव प्राणी त्ता मार्गाने जातात.
हिटलर सारखे पण अशी लोक खूप दुर्मिळ असतात.

प्रभाव खूप पैसा असेल तर निर्माण होतो, कोणत्या सत्तेतील पदावर असेल तर निर्माण होतो हे व्हाईट कॉलर गुन्हेगारी चे रीतसर मार्ग आहेत.
किंवा.
हत्याराच्या गुंड प्रवृत्ती न पण प्रभाव निर्माण होतो.

ज्ञान आणि सरळ मार्गाने पण प्रभाव निर्माण होतो पण हा मार्ग खूप कठीण आहे.
ह्या तिन्ही phage मध्ये पैसा असणे फक्त एक गरज आहे अनेक गरजे मध्ये.

पण अस्तित्व टिकवणे ही मूळ उपजत उर्मी आहे.

माणूस प्रभुत्व निर्माण होणाऱ्या स्टेप वर जरी पोचला आणि त्याचे अस्तित्व धोक्यात येणारा क्षण आला तर तो सर्व, संपत्ती, पैसा ह्याचा त्याग करेल पण अस्तित्व टिकवेल.

पैशा साठी मानस काही पण करत नाहीत.

पण माणसांना वाटत पैशा मुळे माझं अस्तित्व टिकेल, पैशा मुळे माझा प्रभाव निर्माण होईल.
पैशाच्या जोरावर मी प्रभुत्व मिळविण.
पण प्रभुत्व मिळवण्याच्या नादात अस्तित्व संपेल ही मूळ भीती माणसात असते.
त्या मुळे माणूस प्रभाव निर्माण होणाऱ्या पायरी वर च थांबतो.
आणि प्रभुत्व निर्माण करण्याच्या भानगडीत पडत नाही.
प्रभुत्व निर्माण करणे म्हणजे अस्तित्व ला खूप मोठा धोका ही उपजत भावना.

आणि अस्तित्व नष्ट करणाऱ्या कोणत्या ही घटने पासुन माणूस लांब राहतो किती ही पैसा असेल तरी.

मारवा Wed, 17/09/2025 - 19:06

"पण अस्तित्व टिकवणे ही मूळ उपजत उर्मी आहे."
तुमचे म्हणणे बरोबरच आहे फक्त यात एक अपवाद आढळतो तो असा की काही लोकं जीवनाला किंवा स्पेसीफिक म्हणायचं तर त्यांच्या अस्तित्वालाच कंटाळतात किंवा त्याबद्दल निराश होतात आणि आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचलतात.
हे जे आत्महत्या करणारे आहेत ते त्यांच्या उपजत उर्मीच्या अगदी विरुद्ध टोकाला जाऊन टोकाच पाउलं उचलतात.
मला अशा माणसांचं कायम कुतुहल वाटतं म्हणजे त्यांच्या धाडसाचं
एरवी आत्महत्या केलेल्या लोकांविषयी तो दुबळा आहे तो घाबरला अशी विधानं सर्रास केली जातात.
खरे म्हणजे आत्महत्या करण्यास उपजत उर्मीच्या इतक्या विरोधात जाण्यास फार धाडसं लागतं.
तुमची पुर्ण सिस्टीम तुमच्या विरोधात असते तुम्ही त्याहुन अधिक तीव्रतेने निर्णय घेऊन कृती करतात.