अमरत्वाचे स्वप्न
अलीकडेच वाट्सअॅपमधील हा फॉर्वर्ड वाचण्यात आलाः
ब्रायन जॉन्सन हा अमेरिकेतील एक उद्योजक. त्याला मरायचं नाही. हो, तुम्ही बरोबर वाचलंय: त्याला अमर व्हायचंय. सध्या त्याचं वय 48.
आपला सर्व दिवस तो वैज्ञानिक पध्दतीने जगायचा प्रयत्न करतो. सर्व काही काटेकोर. आठ तास 34 मिनीटे झोपतो. उशीवर डोकं ठेवलं की दोन ते तीन मिनिटांत तो निद्राधीन होतो.त्याचे झोपेवर 94 टक्के प्रभुत्व आहे. म्हणजे मध्येच जाग आली असे त्याचे रात्रीत क्वचित एकदाच होते पण तो लगेच झोपू शकतो. उठल्यावर कानाच्या अंतर्गत भागाचे तापमान घेतो. केसाना आणि कवटीला एक सिरम लावतो. केस वाढीसाठी सिलीकॉन स्क्रॅबरने डोके घासतो. शॉवर घेऊन एक तास व्यायाम करतो. लाल प्रकाशाची थेरपी घेतो. मग हायपरबॅरीक ऑक्सिजन थेरपी. नंतर दिवसाच्या कामाला तयार. रोज ब्लड टेस्ट , युरीन टेस्ट, सीटी स्कॅन, निरनिराळ्या गोळ्या. मधूनमधून एम आर आय हे तर चालूच असतं.
दुपारी बारा वाजता तो जेवतो ते दिवसातले शेवटचे. झोपताना भुकेले झोपायची सवय झाली आहे त्याला. रात्री पचनसंस्थेवर ताण नको हे कारण असावे. त्याला विचारले हे सगळे घड्याळाच्या ताब्यात जगणे त्याला कसे आवडते ?
तो म्हणाला : "दिवसातील बारीकसारीक निर्णय घेण्यात आपली शक्ती वाया कशाला घालवायची? जर ते स्वयंचलित करता येतात ? ती मेंदूची वाचलेली उर्जा मी "मानवजातीच्या भवितव्य काय" यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांना देईन ."
पुढे तो म्हणतो : " कुणाला खाण्याचे व्यसन असते, कुणाला टिव्हीचे. कुणाला सोशल मिडीयाचे तर कुणाला कामाचे. मेंदूची रचनाच अशी आहे की व्यसन हे टाळताच येत नाही. मला दिर्घायुष्याचे व्यसन आहे. माझे आतापर्यंतचे सगळे अनुभव, संवाद, विचार मी माझ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या ब्रायन प्रतिकृतीमध्ये अपडेट करत असतो."
त्यांचे इन्स्टाग्रामवर वीस लाख फालोअर्स आहेत. “अजून दोनशे वर्ष मला मरण नाही.” असा त्याचा दावा आहे.
कदाचित अशा प्रकारचे दीर्घायुष्याचे /अमरत्वाचे वेड असलेले जगभरात हजारो-लाखो लोक असतील. काही जण उघडपणे तर काही जण मनातल्या मनात.
मानवी प्राण्याला अत्यंत प्राचीन काळापासून अमर व्हावेसे वाटत आले आहे. आपल्या हिंदू धर्माच्या पुराण कथेत अश्वत्थामा, बली, व्यासऋषी, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, परशुराम (व मार्कंडेय ऋषी) या अमरत्व मिळविलेल्या पुराणपुरुषांचे नित्यनेमाने स्मरण केल्यास मृत्युमुक्त होत नसलो तरी आपण रोगमुक्त होऊ शकतो अशी गॅरंटी दिलेली आहे. मृत्युच्या गूढतेबद्दल नेहमीच उत्सुकता असते. कठोपनिषदातील नचिकेत व यमराज यांच्यातील संवाद या कथेत मृत्यु का होतो? मृत्युमुळे कुणाला त्रास होत नाही? इत्यादी प्रश्नांच्या उत्तरांचा उल्लेख आहे. ख्रिश्चन धर्मग्रंथामध्येसुद्धा अमरत्वासाठीच्या अमृताऐवजी होली ग्रिल वा तसलेच कुठले तरी पेय पिऊन अमरत्व साध्य करून घेतल्याचे उल्लेख सापडतील. प्राचीन काळात कदाचित अरण्यात तपस्या करणारे अमरत्वासाठी जडी-बूटी शोधत असावेत. परंतु त्याच्या शोधात ते यशस्वी न झाल्यामुळे हे अमरत्व अजूनही मृगजळ ठरलेले असून कुणाच्याही हाती लागले नसावे.
माणसाचे आयुष्य वाढलेले आहे यावरून भगवान शंकरानी मृत्यु देवता, यमराजाची काही कारणास्तव हकालपट्टी केल्यामुळे या पृथ्वीवरील मृत्युचे प्रमाण कमी होत आहे की काय अशी पुसटशी शंका मनात येईल. महाभारतातील यक्ष-युधिष्ठिर यांच्या संवादात यक्ष “जगात सर्वात मोठी आश्चर्यजनक गोष्ट कोणती असेल?” असे धर्मराजाला विचारतो. “दररोज किती तरी प्राणी यमसदनी जातात. हे माहित असून देखील तरीही जे जिवंत असतात ते मात्र दररोज जगण्याची इच्छा ठेवतात. यापेक्षा दुसरे आश्चर्य काय असेल?” असे धर्म उत्तर देतो.
२१व्या शतकातील जनुकशास्त्र, नॅनो तंत्रज्ञान, रोबोटिक्स व कृत्रिम बुद्धिमत्ता इत्यादींच्या प्रगत व अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे व मृत्युबद्दलचे गूढ उकलले असे वाटत असल्यामुळे अमरत्वाच्या संशोधनासाठी (पुन्हा) एकदा प्रयत्न केले जात आहेत. अपघाती मृत्यु व निसर्ग संकटातून होणारी जीवितहानी यांचा अपवाद वगळता गंभीर आजार व वृद्धत्वामुळे होणाऱ्या मृत्युवर मात करणे शक्य आहे असे या विषयातील अभ्यासकांना वाटत आहे. शरीरातील पेशींना पुनर्जिवीत केल्यास व जनुकांची पुनर्रचना करणे शक्य झाल्यास मृत्युवर मात करता येईल असे अभ्यासकांचे मत आहे. आजारपणामुळे आपल्या शरीरातील कुठल्याही अवयवाला इजा झाल्यास वा वय वाढत गेल्यामुळे अवयव निकामी होत असल्यास त्याची आपोआप दुरुस्ती करण्याची यंत्रणा शरीरात असल्यास आपण जास्तीत जास्त काळ आरोग्यमय जीवन जगत मृत्युला टाळू शकतो, असेही अभ्यासकांना वाटत आहे. गूगल कंपनीचे इंजिनियर व फ्युचरालॉजीचे अभ्यासक, रे कुर्झवेल यानी तर पुढील सात-आठ वर्षात आपण मृत्युवर मात करू शकू अशी भविष्यवाणी वर्तविली आहे. मृत्युवर मात करण्यासाठीच्या संशोधनाला आर्थिक बळ पुरविणाऱ्यात अमेझॉनच्या सर्वेसर्वा जेफ बेझोज, गूगलचे सहव्यवस्थापक, सेर्जाइ ब्रिन, पेपालचे पीटर थीअल व रशियातील अनेक अनामधेय नवश्रीमंत आहेत. आणि या संशोधनात चीनही मागे नाही.
काही अभ्यासकांच्या मते अमरत्व हे एकाच वेळी वरदानही आहे व शापही आहे. मृत्यु नसल्यास एवढ्या तोंडांना खायला अन्न कुठून आणायचे? माणसाबरोबरच इतर प्राणीवर्गही अमर राहील का? पुढील काही दशकात प्रत्येक घराघरात आजोबा, पणजोबा, आजी, आजीची आजीसकट सर्व गोतावळा एकाच (वा वेगवेगळ्या) ठिकाणी राहू लागल्यास रहायला जागा आणायचे कुठून? उपलब्ध संसाधनासाठी भविष्यातील तरुण पिढीबरोबर वृद्ध स्पर्धा करत राहतील का? खायला अन्नाचा तुटवडा पडल्यास भुकेने व्याकूळ झालेल्या माणसांना मृत्युही येत नसल्यामुळे त्यांनी नेमके काय करावे? (कदाचित विज्ञान-तंत्रज्ञान माणसासाठी फोटोसिंथेसिसची प्रक्रिया शोधू शकेल.)
हे अमरत्व नैतिकता व कायदा-सुव्यवस्था यांच्यावर काय परिणाम करू शकेल? जर मृत्युचीच जीवनातून हकालपट्टी झाल्यास जीवन निरर्थक ठरणार नाही का? आधुनिक जीवन पद्धती इतक्या वेगाने पळत आहे की प्रत्येक जण काही ना काही तरी करत असतो परंतु त्यातून काही निष्पन्न होत नाही. जर आपल्या आयुष्यात वेळच वेळ असल्यास त्या वेळेचे करायचे काय? मोबाइलवरील रील्स बघत वा वाट्सअॅप विद्यापीठातील बाष्कळ मेसेजेस वाचत आपण आयुष्य काढणार आहोत का? आपल्याला माहित असलेल्यांचे व माहित नसलेल्यांचे मेसेजेस फॉर्वर्ड करण्यातच आयुष्य ढकलणार आहोत का?
याच प्रमाणे या पृथ्वीवरील संघटित धर्म-व्यवहाराचे काय होणार? मुळात प्रत्येक धर्म मृत्युनंतरच्या ऐष-आरामी जीवनाचे गाजर दाखवत तगून आहेत. त्यातून मृत्युलाच वजा केल्यास देव-प्रेषित-धर्म-पाप-पुण्य-स्वर्ग-नरक-आत्मा-अध्यात्म इत्यादींचे काय होणार? खरे पाहता या पृथ्वीतलावरील माणसाचा वावर हजारो वर्षापूर्वीचा आहे. त्या तुलनेने धर्माचा उदय फार फार तर हजार-दोन हजार वर्षापूर्वी झाला आहे. त्यामुळे जर विज्ञान-तंत्रज्ञानामुळे माणसाला अमरत्व मिळाल्यास आता असलेल्या धर्माची हकालपट्टी होऊन एखाद्या नवीन धर्माचा उदय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अमरत्वाचे स्वप्न पाहणाऱ्या मानवाला मृत्यूच्या बरोबरच्या झोंबाझोंबीत अजूनही म्हणावे तसे यश मिळालेले नाही. उलट हा लढा माणसाला गोत्यात आणतो की काय असे वाटत आहे. त्यामुळे अजून तरी अमरत्व हे दुःस्वप्नच ठरत आहे. तरीसुद्धा भविष्यात कधी तरी माणूस मुत्युवर मात करू शकेल, हेही आपल्याला नाकारता येत नाही.
>>>याच प्रमाणे या पृथ्वीवरील…
>>>याच प्रमाणे या पृथ्वीवरील संघटित धर्म-व्यवहाराचे काय होणार? मुळात प्रत्येक धर्म मृत्युनंतरच्या ऐष-आरामी जीवनाचे गाजर दाखवत तगून आहेत. त्यातून मृत्युलाच वजा केल्यास देव-प्रेषित-धर्म-पाप-पुण्य-स्वर्ग-नरक-आत्मा-अध्यात्म इत्यादींचे काय होणार?
तद्दन बिनडोक आणि बेअक्कल तारे कसे तोंडावेत ते नानावटीकडून शिकावे
जोवर निव्वळ वेगवेगळी रसायने…
जोवर निव्वळ वेगवेगळी रसायने वगैरे वापरून प्रयोगशाळेत एक अख्खा प्रगत सजीव उदा. मानवप्राणी निर्माण करता येत नाही तोवर शुद्ध अमरत्त्व हे एक दिवास्वप्नच राहील.
बाकी सध्या अस्तित्त्वात असलेल्या धर्म-रूढी-परंपरा इत्यादींना सहजासहजी विस्मृतीत जाण्याचा पूर्वीइतका धोका नाही. याचे कारण माहितीचा प्रचंड विस्फोट, माहितीचे अविरत पारेषण आणि माहितीची प्रचंड प्रमाणात वाढलेली जीवनमर्यादा. सध्या प्रचलित असलेल्या धार्मिक समजुती ह्या गेल्या पाच ते एक हजार वर्षांतीलच असल्या तरी त्या त्यांच्याआधीच्या आता अज्ञातात गेलेल्या समजुतींच्या तुलनेत जास्त खोलवर रुजलेल्या आहेत.
…
जोवर निव्वळ वेगवेगळी रसायने वगैरे वापरून प्रयोगशाळेत एक अख्खा प्रगत सजीव उदा. मानवप्राणी निर्माण करता येत नाही तोवर शुद्ध अमरत्त्व हे एक दिवास्वप्नच राहील.
(अंशतः इंग्रजीतील प्रतिसादाबद्दल क्षमस्व.)
Suppose, a couple conceives, quite naturally, while inside a laboratory. (Well, if a child can be conceived in the backseat of a car, then why not inside a laboratory?) Let us further suppose that the female among the couple stays in the laboratory throughout her pregnancy, and delivers right inside the laboratory.
वरील scenario आपल्या सर्व अटी पाळत नाही काय? (‘निव्वळ वेगवेगळी रसायने वापरून’ ही अट तत्त्वतः पाळली गेली, असा दावा करता येईलच. Conception प्रक्रियेत जी कामी आली, ती ‘रसायने’ नव्हती, असे छातीठोकपणे म्हणता येईल काय? तसेही, प्रयोगशाळेतलीच रसायने वापरली पाहिजेत, अशी अट काही तुम्ही घातलेली नाहीत. आणि, तशी अट जरी घातली, तरीही, वापरली तेव्हा ती रसायने प्रयोगशाळेतलीच होती, असाही प्रतिवाद त्यावर करता येईलच.)
आता, असा प्रयोग एखाद्या मानवी जोडीवर कोणी कधी केला आहे की नाही, याबद्दल मला कल्पना नाही. (तत्त्वतः, करता येणे शक्य आहे. परंतु, ते तूर्तास असो.) मात्र, (उदाहरणादाखल) पांढऱ्या उंदरांच्या बाबतीत वगैरे असे काही असंख्य वेळा घडलेले असणे अशक्य नाही.
मग आजवर एखाद्या अमर पांढऱ्या उंदराबद्दल आपल्याला काहीच कसे ऐकू आले नाही, असा प्रश्न पडतो. असो चालायचेच.
.
ब्रायन जॉन्सन हा अमेरिकेतील एक उद्योजक. त्याला मरायचं नाही. हो, तुम्ही बरोबर वाचलंय: त्याला अमर व्हायचंय. सध्या त्याचं वय 48.
पुढे तो म्हणतो : " कुणाला खाण्याचे व्यसन असते, कुणाला टिव्हीचे. कुणाला सोशल मिडीयाचे तर कुणाला कामाचे. मेंदूची रचनाच अशी आहे की व्यसन हे टाळताच येत नाही. मला दिर्घायुष्याचे व्यसन आहे. माझे आतापर्यंतचे सगळे अनुभव, संवाद, विचार मी माझ्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या ब्रायन प्रतिकृतीमध्ये अपडेट करत असतो."
त्यांचे इन्स्टाग्रामवर वीस लाख फालोअर्स आहेत. “अजून दोनशे वर्ष मला मरण नाही.” असा त्याचा दावा आहे.
प्रस्तुत सद्गृहस्थ हा अमेरिकेत राहतो, नव्हे काय? (मला वाटते, सुरुवातीस तसे कायसेसे लिहिलेले आहे. चूभूद्याघ्या.)
नाही म्हणजे, सद्गृहस्था, तू ते काय ते तथाकथित "वैज्ञानिक" पद्धतीने वगैरे जगशील, सर्व काही काटेकोरपणे करशील, दुपारनंतर जेवणार नाहीस, नि काय त्या सगळ्या गोळ्या खाशील नि थेरप्या घेशील नि काय काय, ते सर्व ठीक आहे, परंतु...
अमेरिकेत राहातोस ना, शिंच्या? मग उद्या आलानीत् एखादा येडा, नि एआर-१५चे नाहीतर एके-४७चे आख्खे म्यागझीन तुझ्यात रिते केलेनीत्, तर काय करणारेस?
नि मग दोनशे वर्षे नक्की कसा जगणारेस म्हणे?
बरे, ते एआर-१५ वगैरे मरू दे. उद्या आंघोळ करताना तुझा पाय घसरला, नि टाळके नको तेथे आदळल्यामुळे गचकलास, तर? ते होऊ नये म्हणून आंघोळ करायची सोडून देणारेस काय? की उभे आयुष्य फक्त स्पाँजिंगवर काढशील?
वेळ काय सांगून येत नसते. किंवा, कोणीतरी म्हटलेलेच आहे, त्याप्रमाणे, "मौत और टट्टी, किसी को भी, कहीं भी, और कभी भी आ सकती है।"
विचार करण्यासारखे वाक्य आहे हे!
असो चालायचेच.
ह्या ब्रह्माण्ड मध्ये ग्रह ताऱ्यांना, आकाश गंगा न पण मृत्यू आहे
#. विज्ञान वरील लेख वाचून त्याचा अर्थ सामान्य लोकांना कधीच समजत नाही समजा जिवशास्त्र मध्ये काही नवीन संशोधन झाले आहे आणि त्या वर internet वर शोध निबंध प्रसिद्ध झाला आहे.
त्या शोध निंबंध च अर्थ समजण्यासाठी जीव शास्त्र चे बेसिक ज्ञान असणे गरजेचे असते.
शब्ध शहा अर्थ कोणत्या च शोध निंबंध च घ्यायचा नसतो आणि नेमके हेच घडते जिवशास्त्र च बैसिक ज्ञान नसणाऱ्या व्यक्ती नी तसें निम्नध वाचून तारे तोडू नयेत कारण अगदी उलटा अर्थ ही लोक काढतात, गैर समज पसरवतात आणि आधुनिक अंध श्रद्धा निर्माण करतात science ला बदनाम करतात.
# अमर तर ह्या जगात काहीच नाही. हे ब्रह्माण्ड पण अमर नाही.
त्या मुळे माणूस अमर होऊ शकतात असा दावा खरे संशोधक चुकून पण करणार नाहीत.
# बेसिक जिवशास्त्र च ज्ञान असले तरी सहज लक्षात येईल मानवी शरीर हे अतिशय क्लीष्ट असे जैविक यंत्र आहे.
लाखो पेशी रोज निर्माण होतात रोज मारतात त्या मध्ये एक लय आहे एक नियम आहे.
थोडी जरी गडबड झाली तरी मानवी शरीर योग्य काम करणार नाही कॅन्सर आणि अशा प्रकार च्या व्याधी होतील.
# रोज मानवी शरीराची हानी होत असते रोज ती हानी भरून काढली जाते ती कशी भरून काढायची ह्याची यंत्रणा शरीरात आहे आणि ती स्वयं चलित आहे.
जास्त. Detail लिहीत नाही.
# अनेक आजार, virus इन्फेकशन, bacteria इन्फेकशन, विषबाधा, अशा खूप गोष्टी रोज मानवी शरीरावर हल्ला करतात.
त्यांना डिफेन्ड करणारी शरीरात यंत्रणा आहे म्हणून आपल्याला त्ताची जाणीव पण होत नाही.
ह्या सर्व यंत्रणा मानवाच्या कंट्रोल मध्ये नाहीत त्या मानवाच्या कंट्रोल मध्ये येणे अशक्य आहे..
अगदी पृथ्वी च्या तापमाणात, पृथ्वी च्या वातावरणात, काही विपरीत बदल झाला तरी माणूस च काय पृथ्वी वरील जिवसृष्टी नष्ट होईल च पण मानव निर्मित सर्व आधुनिक यंत्र पण नष्ट होतील.
मानव मृत्यू वर विजय मिळवेल असा दावा खरा संशोधक कधीच करणार नाही.
मानव मृत्यू वर विजय मिळवेल असा विचार फक्त अशीच लोक करतात त्यांना जिवशास्त्र च बेसिक पण ज्ञान नाही आणि त्या मुळे शोध निबंध च चुकीचा अर्थ लावून स्वतःचा च गैर समज करून घेतात.
आणि लोकात पण गैर समज पसरवतात.
सर्वाना असे वाटत जे शिकलेले आहेत आणि इंटरनेट साक्षर आहेत त्यांना
काळ (time)
तापमान (heat).
गुरुत्व आकर्षण ( gravity).
वेग ( speed).
वीज ( electricity )
खूप सर्व सामान्य टर्म आहेत ह्या
ह्या गोष्टी च आम्हाला सर्व ज्ञान आहे.
पण ह्या एक एक टर्म वरती phd करावी लागेल इतकी एक एक टर्म सखोल समजायला कठीण आहे.
हजारो पाने एक एक टर्म वर लिहिवी लागतील इतके हे विषय कठीण आहेत.
आणि आपण internet वर प्रसिद्ध होणारे संशोधन चे शोध निंबंध वाचून आपल्याला त्या मधील सर्व कळाले असा गैर समज करून घेतो.
आणि मग आपण स्वतः च नको ते गैर शास्त्रीय दावे करतो
पुतिन, शी आणि किम
पुतिन, शी आणि किम यांच्यात नुकत्याच झालेल्या अमरत्वाबाबतच्या वार्तालापाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे -
https://edition.cnn.com/2025/09/03/world/video/putin-xi-hot-mic-immorta…