मभागौदि (#) ची कविता
अमृताशी पैजा जिंके माझी मायबोली
कळेना, क्यूँ माझ्याशी वो अंग्रेजी में बोली ?
वस्त्रे अभिजाततेची भर्जरी मिरवी
उपेक्षांच्या लक्तरांना खुबीने दडवी
औटघटकेची राणी आज सिंहासनी
भविष्यात असेल का तिला वाली कुणी?
मायमराठी गं तुझे कसे फेडू पांग?
प्लेस्कूलच्या प्रवेशाची सोडू कशी रांग?
येता जाता तुझ्या नावे आसवे ढाळीन
मिंग्लिशची कास घट्ट धरून ठेवीन
एक एक निशाणी ही मिटविण्या तुझी
निर्ढावली लेकरे गं कशामुळे तुझी?
अमृताशी पैज पुन्हा लावण्याच्या आधी...
सालोसाल पेरलेले उगवण्याआधी...
नक्राश्रूंचे तळे पार तुडुंबण्याआधी
तुझ्या साऱ्या बोलीभाषा मुक्या होण्याआधी...
शेवटाची सुरूवात वेग घेण्याआधी...
शेवटची शाळा तुझी बंद होण्याआधी...
.....सांग, फुटलेली पाटी सांधते का कधी?
~~~~~~~~~~~~~~~~~~~
(#) मराठी भाषा गौरव दिवस २७ फेब्रुवारी
गेऽले, ते दिन गेले!
तेच तर म्हणतोय ना! 'दिन गेले' आणि 'दिवस गेले' यांच्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. (कदाचित 'कुळकर्णी' आणि 'कुलकर्णी'पेक्षासुद्धा जास्त!)
(आणि, हो! पाचवीच्या हिंदी विषयाच्या मराठी बाईंना तेव्हा दिवस गेलेले नव्हते. (ते हि no दिवसा गता:।))
(मात्र, सातवीत की आठवीत असताना एकदा गणिताच्या बाईंनी आपले busy schedule वर्णिले होते, त्यात 'आणि मग दहावीच्या मुलांना शिकवताना कसे दिवस जातील, ते कळणारसुद्धा नाही' असले काही वाक्य टाकले होते. ते ऐकून मी आणि माझ्या एका समविचारी वर्गमित्राने तेव्हा फक्त नजरेस अर्थपूर्ण नजर मिळविली होती, एवढेच आठवते. चालायचेच.)
…
मुळात ‘मराठी भाषा गौरव दिवस’ हाच मराठीचा धडधडीत खून अत एव हिंदीचा मराठीवरील पाशवी बलात्कार नव्हे काय? (अगोदर बलात्कार, की अगोदर खून, की दोन्ही एकसमयावच्छेदेकरून, इतकाच काय तो प्रश्न आहे.) पण लक्षात कोण घेतो?
१. मराठीत ‘दिवस’ हा कोठलाही सामान्य दिवस असतो, तर ‘दिन’ हा विशेष दिवस असतो. हिंदीत याच्या बरोबर उलट असते. (आणि म्हणूनच, १५ ऑगस्ट हा मराठीत ‘स्वातंत्र्यदिन’ होतो, तर हिंदीत ‘स्वतंत्रता दिवस’. उलटपक्षी, मराठीतल्या ‘आजच्या दिवसा’चा हिंदीत ‘आज का दिन’ होतो.) हे आमच्या शाळेतल्या पाचवीच्या हिंदी विषयाच्या मराठी बाईंनी आमच्याकडून घोटवून घेतलेले आजही आठवते. पण लक्षात कोण घेतो?
(‘गर्व’ आणि ‘अभिमान’ यांचीही अशीच काहीतरी उलटापालट होते, म्हणे. चालायचेच.)
२. दुसरे म्हणजे, ‘गौरव दिवस’ हे हिंदीत ठीक आहे. मराठीत लिहिताना, असे दोन सुटे शब्द न लिहिता, ‘गौरवदिन’ असा एकच जोडशब्द लिहावयास हवा काय? (या विषयावर पंचमंडळ बहुधा अद्याप बाहेर असावे. कारण, १५ ऑगस्टसंबंधीचा शब्द लिहिताना तो ‘स्वातंत्र्यदिन’ असाच लिहिला जावा, याबद्दल माझ्या मनात कोणताही संदेह नाही. त्याचप्रमाणे, २६ जानेवारी तथा १ मे यांसंबंधीचे शब्द हे अनुक्रमे ‘प्रजासत्ताकदिन’ तथा ‘महाराष्ट्रदिन’ असे लिहिले जावेत, अशी माझी समजूत आहे. मात्र, हे शेवटचे दोन शब्द ‘प्रजासत्ताक दिन’ तथा ‘महाराष्ट्र दिन’ असे लिहिले गेलेले आज तर सर्रास पाहण्यात येतातच; परंतु, माझी स्मृती जर मला दगा देत नसेल, तर ‘आमच्या काळा’तसुद्धा क्वचित ते तसे लिहिले गेलेले पाहिल्यासारखे वाटते. (चूभूद्याघ्या.) हे बरोबर आहे, किंवा कसे, याबद्दल मला कल्पना नाही. परंतु, हे जर (तेव्हासुद्धा) स्वीकारार्ह समजले जात असेल, तर यास (हिंदीचा मराठीशी) बलात्काराच्या सवयीतून घडलेला विवाहसंबंध (‘बलात्काराने विवाह’? ‘राक्षसविवाह’?) समजावा काय?)
आणि आता म्हणे महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी अनिवार्य करणाराहेत! या निर्णयामागील प्रयोजन आम्हांस समजत नाही. वास्तविक, हिंदी भाषेस (भाषा म्हणून) आमचा यत्किंचितही विरोध नाही. (तसा आमचा कोठल्याच भाषेस विरोध नाही. ज्यानेत्याने अथवा जिनेतिने त्याला अथवा तिला ज्या वाटेल त्या भाषेतून बोलावे, शिकावे, खावे, प्यावे, हगावे, पादावे, झवावे, काय वाटेल ते करावे; आमचे काहीच म्हणणे नाही. तो सर्वस्वी त्याचा किंवा तिचा प्रश्न आहे.) आणि, तशीही, या निर्णयाअगोदरसुद्धा महाराष्ट्रात पाचवीपासून (कोठल्या ना कोठल्या पातळीवर) हिंदी अनिवार्य होतीच; त्या वेळेस उभ्या महाराष्ट्रातून कोणीही तिला विरोध केल्याचे स्मरणात नाही. त्यामुळे, प्रश्न हिंदीला विरोधाचा नाही.
प्रश्न असा आहे, की पहिलीपासून हिंदी अनिवार्य करून उपयोग काय? तसे केल्याने काय मुख्यमंत्र्यांच्या (पाचवीच्या ऐवजी) पहिलीच्या हिंदी विषयाच्या (मराठी!) बाई त्यांच्याकडून हिंदीतला विरुद्ध मराठीतला ‘दिन’ आणि ‘दिवस’ यांच्यातला (किंवा, ‘गर्व’ आणि ‘अभिमान’ यांच्यातला) फरक घोटवून घेणाराहेत?
पण लक्षात कोण घेतो?
म्हणा मग लेको हिंजवडीला ‘हिंजेवाडी’! (भले आम्ही पुण्यात वाढत असताना हिंजवडीच्या अस्तित्वासंबंधी आम्हांस गंधवार्तासुद्धा जरी नसली, तरीही!) आणि, ही असलीच मराठी बोलण्याचे ‘भाग्य’ आम्हाला लाभले, याचा ‘गर्व’ बाळगा, लेको!
आणि ‘मनवा’ मराठी भाषा गौरव ‘दिवस’! (मराठी भाषा मारू नाहीतरी घातलेलीच आहे; तिचे दिवससुद्धा घाला आता!)
असो चालायचेच.