Skip to main content

चार खंडांतील माझे जलतरणास्तित्व

9 minutes

जगात दोन प्रकारचे लोक असतात. व्यायाम करणारे किंवा व्यायाम न करणारे. (अधूनमधून करणारे/अधूनमधून न करणारे = करणारे) पण मी जे दोन टोकाचे गट म्हणते आहे ते म्हणजे काहीही झालं तरी व्यायाम करणारे आणि काहीही झालं तरी व्यायाम न करणारे. म्हणजे उन्हाळ्यात ऊन आहे म्हणून, पावसाळ्यात पाऊस आहे म्हणून आणि थंडीत थंडी आहे म्हणून व्यायाम न करणारे. त्याउलट, उन्हाळ्यात ऊन आहे म्हणून (त्याच्या नाकावर टिच्चून); पावसाळ्यात पाऊस आहे म्हणून (त्याच्या नाकावर टिच्चून) आणि थंडीत थंडी आहे म्हणून.... वगैरे वगरे..न चुकता रोज व्यायाम करणारे. व्यायाम चुकल्यावर खिन्न होण्याचा प्रश्नच येत नाही कारण व्यायाम कधी चुकतच नाही. तर अशा दोन व्यक्ती जेव्हा तुम्हाला तयार करतात तेव्हा तुमच्यावर कसे संस्कार होत असतील याचा अंदाज बांधता येईलच. अगदी लहानपणीची एक पुसटशी आठवण म्हणजे आमच्या वडिलांनी एकवीस वेळा पर्वतीच्या पायऱ्या चढून उतरल्याची आहे (याचं कालमापनही तेव्हाच्या अस्मार्ट तंत्रज्ञानानं केलं होतं). ही आठवण अजूनही माझ्या अंगावर शहारे आणते, अभिमानाचे नाही, या अशा आततायीपणाच्या जनुकांचा अर्धा भाग आपल्याला मिळाला आहे यामुळे. उरलेला अर्धाही यापेक्षा फार बरा नाहीच. तरीही मी काही स्वतःला अतिव्यायाम करणारी म्हणू शकत नाही. कारण माझं लग्न दुसऱ्या गटातल्या व्यक्तीशी झालं आहे. त्यामुळे हे दोन्हीही गट डोळ्यासमोर ठेवून सध्या माझं वैयक्तिक व्यायामायुष्य बरं चाललं आहे.

पण जलतरण हा माझा आवडता व्यायाम आहे याची आता मला खात्री पटली आहे. मागे वळून बघता, मी आयुष्याच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये पोहलेले आहे. एकदा, मला स्पष्ट आठवतं, माझा कुठेतरी पाठवण्यासाठी पूर्ण झाला आहे असा विश्वास असलेला पेपर पाचशे पंचावन्न लाल खुणांनी भरून माझ्या मास्तराने परत पाठवला होता. तेव्हा मी पोहायला गेले आणि पोहता पोहता मला रडू येऊ लागले. त्या क्षणी हे किती सुंदर आहे - आपले अश्रू गॉगलमध्ये साठून आपल्याला दिसेनासे झाल्यावर थेट पाण्यात जात आहेत, आणि ते मगरीचे अश्रू नसून खरे खरे दुःखाश्रू आहेत याचं मला खूप कौतुक वाटलं होतं. ही आठवण ब्रिसबन, ऑस्ट्रेलियामधली. तिथल्या एका युनिव्हर्सिटीच्या ऑलिम्पिक पुलात पोहता पोहता मी हे मौल्यवान अश्रू ढाळले होते. पण व्यायाम करता करता सातत्यानं रडता येत नाही कारण बहुधा रडण्यासाठीही भरपूर प्राणवायू लागत असावा. त्यामुळे माझं रुदन लवकरच थांबल्याचंही स्पष्टपणे आठवतं आहे.

त्यावेळी आपल्या वनपीस स्पीडोमधून टू पीसमध्ये जायचं, आणि कमीत कमी लाल खुणा येतील असा पेपर लिहायचा एवढी दोनच ध्येयं होती. आणि या दोन ध्येयांचा एकमेकांवर ताण येऊन साधारण दोन्ही साध्य व्हायची नाहीत. त्यामुळे एक विचित्र समतोल साधून माझी बरीच वर्षं स्टेडी स्टेट मध्ये गेली. रुचिपालट म्हणून मी पळून बघितलं, वजनं उचलून बघितली, योगासनं केली. पैकी, योगासनं सोडून मला पोहण्याइतकं काहीच आवडलं नाही. तीही आवडली कारण भारतात योगासनं शिकून परदेशात क्लासला गेलं की लक्षात येतं की तिथल्या लोकांनी योगासनं करणं म्हणजे काहीतरी सेल्फ-हीलिंग, सुदींग, कामिन्ग वगैरे शब्दांशी जोडून तो एक अतिशय स्व-लाड करून घेण्याचा मार्ग केला आहे. मी भारतात पहिल्यांदा साग्रसंगीत योगासनं शिकले ते एका सर्टिफिकिट-धारक प्रोफेशनल योगविदद्या विशारदाकरून. आमच्या वर्गाच्या दुर्दैवानं ते त्याआधी बरीच वर्षं सैन्यात काम करत होते. त्यामुळे क्लासच्या वेळेपासून ते किती अंशाच्या कोनांत वाकायला हवं या सर्व बाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र अर्धचंद्राकार पिळलेल्या मिशा आणि अति-सरळ पाठीचा कणा बघूनच त्यांची आधी भीती वाटायची. त्यात शवासन करताना ते सगळ्या वर्गात फिरत फिरत आपल्याला कमीत कमी श्वासात जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे असं जरा कमी, दरडावूनच सांगायचे. त्यामुळे श्वासही पेट्रोलसारखा वापरून विश्रांती भागिले श्वास असं काही गणित सोडवायचं आहे की काय या ताणात विश्रांतीच घेता यायची नाही. त्या मानाने ऑस्ट्रेलियात प्रत्येकच बाबतीत तुम्हाला जे सहज जमतं तीच तुमची पातळी असं सांगून थोड्या थोड्या दिवसांनी प्रगती करण्याची गोड आर्जवं करणाऱ्या टॅटूयुक्त तरुणी फारच आवडू लागल्या. कधीकधी मी जलतरण तलावाच्या काठावर सूर्यनमस्कार घालून मग पाण्यात उडी मारायचे. अतिशय आल्हाददायक असा तो काळ होता. पण काळाचं असंच असतं. जो काळ आत्ता आल्हाददायक वाटतो तो तेव्हा तीव्र चिंतेचा वाटायचा.

ऑस्ट्रेलियातील माझ्या वास्तव्यात माझा आधीच गहू वगैरे असलेला वर्ण पूर्णपणे बैंगणी झाला होता. पण तिथल्या लोकांच्या मनात अशा आधल्या मधल्या रंगाबद्दल कौतुक असल्यानं मला कधी कुणी, "बापरे तू किती काळी झालीस!" वगैरे भस्सकन बोललं नाही. ते सगळं भारतात आल्यावर घडायचं. पण त्याची काय आपल्याला सवय आहे.

जिथे ओझोनला भोक पडलं असं म्हणतात, आणि त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे अशा खंडातून मी उत्तर अमेरिकेत मिशिगनला गेले. सुरुवातीचे काही महिने घर घेण्यात, लावण्यात आणि नंतर तिथे गेल्याबद्दल पस्तावण्यात गेल्यावर मला एक फ्रेंच मुलगी भेटली. आमची गट्टी झाली आणि आम्ही रूममेट्स झालो. ती फ्रान्सच्या उत्तरेकडील एका खेड्यातली होती आणि तिथे पीएचडी करून ती इथे माझ्यासारखीच पोस्टडॉकायला आली होती. ती स्वतःला 'स्पोर्टीफ' म्हणत असे. म्हणजे व्यायामपटू, खेळपटू इत्यादी. आणि तिच्या अनेक व्यायामांमध्ये जलतरण हाही एक महत्त्वाचा व्यायाम होता. त्यामुळे आम्ही दोघी पोहू लागलो. जशी थंडी वाढली आणि गुडघाभर बर्फ झालं तसे आम्ही तिथल्या उघड्या पुलातून, खोलीत असलेल्या बंद पुलात पोहू लागलो. मग आमच्याबरोबर आमचा एक मित्र येऊ लागला जो आयर्नमॅनसाठी तयारी करत होता. त्या दोघांच्या नादानं माझी फारच प्रगती झाली. एखाद्या शनिवारी आम्ही सहज अडीच किलोमीटर पोहून मग कुठेतरी सायकलवरून जायचो. शिवाय आम्हाला जवळच एक हॉट योगा स्टुडिओ सापडला. हॉट योगा म्हणजे एका खोलीचं तापमान ३५ - ४० डिग्री सेल्सियस आणि ४०-६० % आर्द्रता असं ठेवून तिथे वीस बावीस टाळकी जमून अतिशय तोकड्या कपड्यांत योगासनं करतात. तर आम्हाला भर हिवाळ्यात हा उपक्रम आकर्षक वाटून आम्ही तिथं जाऊ लागलो. त्या खोलीतून थेट उणे काहीतरी सेल्सियसमध्ये पाय ठेवणं हा एक अध्यात्मिक अनुभव असायचा. इथेही, भारतीय योगासनांपेक्षा मला मिशिगनच्या एका स्ट्रीप मॉलमधला हा स्टुडिओ अधिक आवडला. आजही त्याबद्दल मला काहीशी गतकातरता जाणवते. कारण तिथली एक टॅटूयुक्त तरुणी रॉक संगीतावर योगासनं करून घ्यायची. मला नेहमी रॉक संगीत ऐकू येऊ लागलं की आमचे मिशीवाले सैनिक आठवायचे. ते या थेरांना काय म्हणाले असते? पण ही गतकातरता केवळ त्या संगीतामुळे किंवा त्या तरुणीमुळे नाही. त्या काळात आपल्याला केवळ व्यायाम करायला म्हणून किती वेळ उपलब्ध होता याबद्दलही आहे. पण पुन्हा एकदा काळाचं असंच असतं. आपण एखाद्या काळात असतो तेव्हा त्या काळाचं सौंदर्य काय होतं ते दैनंदिन चितांमध्ये लक्षात येत नाही.

आता यापुढील खंड उगाचच आहे. केवळ चार हा आकडा गाठण्यासाठी ही खोगीरभरती. मुळात आधीच्या दोन खंडांमध्ये मी पोहून आले याबद्दलही कुणाला काही का वाटावं? म्हणून आता एवढी शायनिंग मारली आहेच तर अजून थोडी. तर आम्ही एका जुलैमध्ये फ्रान्सला गेलो. माझ्या मैत्रिणीच्या खेड्यात बहुधा पहिल्यांदा भारतीय व्यक्ती दाखल झाली होती. त्यामुळे मला "बघायला" काही लोक येऊन गेले. मी, ती आणि तिची शाळेतली मैत्रीण आधी पॅरिस वगैरे उच्चभ्रू ठिकाणी जाऊन आलो आणि मग त्या दोघींच्या गावी गेलो. त्यांच्या घरात एक चीज तयार करायची खोली होती. घराच्या मागे एक कबुतरखाना होता. तिचे वडील (ज्यांना शून्य इंग्रजी येतं), मी (जिला त्याकाळी शून्य फ्रेंच यायचं) आणि माझी मैत्रीण असे त्या कबुतरखान्यात गेलो. तिथे गेल्यावर आधी तिचे बाबा सावकाश काही सांगू लागले ज्याचं भाषांतर मैत्रीण करत होती. पण नंतर त्यांना इतका उत्साह आला की भाषांतर होण्याआधीच ते पुढे बोलू लागत. त्यांच्या एकूण हावभावांवरून ती कबुतरं त्यांना फार प्रिय होती आणि त्या रात्री आम्ही त्यांतील एक खाणार होतो एवढी माहिती मला मिळाली. मग ते कबुतर पकडून, मारून, स्वच्छ करून, कापून, बटरमध्ये नाजूकपणे शिजवण्यापर्यंत मी तिच्या बाबांची अप्रेन्टिसगिरी केली. त्या जोडीला मी (अर्थातच) गाजर हलवा केला. आणि आम्ही सगळ्यांनी कबुतर, वाईन, केशर घातलेला पुलाव आणि गाजर हलवा-आईस्क्रीम असं विचित्र पण उत्तम जेवण केलं. त्या दिवशी फ्रान्समध्ये उष्म्याची लाट होती. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी जवळच्या एका मोठ्या गावात पोहायला गेलो. किलोमीटरभर पोहलो आणि नंतर बियर प्यायला गेलो. बियर पिता पिता माझ्या मैत्रिणीला एकदम अस्तित्ववादी प्रश्न पडल्यानं तिनं जवळच्या एका पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे केस ब्लॉन्ड करून त्यावर उत्तरं शोधली. मलाही काही प्रश्न पडले होते. पण माझा रंग बघता मी माझे केस ब्लॉन्ड केले नाहीत तो एक चांगला निर्णय ठरला. त्यानंतरच्या दिवशी आम्ही तिच्या शेतावर गेलो. तिथे साधारण शंभर गाई होत्या. आणि त्यांचं दूध न्यायला संध्याकाळी आपल्याकडे जसं दूध संकलन होतं तसा एक टँकर येऊन दूध घेऊन जायचा. आता पुन्हा, मागे वळून बघता हा एक अतिशय रम्य अनुभव होता. पण त्यावेळी त्याची तीव्रता कमी जाणवली.

आशिया खंडात, म्हणजे भारतात मी अगदी लहानपणापासून पोहते आहे. माझे आईबाबा सकाळी चारला उठून आपण व्यायाम करायला तर जायचेच. पण सहा वाजता मलाही कुठेतरी पाठवून द्यायचे. त्या पाठवून देण्याच्या जागांमध्ये एक चैतन्य हेल्थक्लब नावाची जागा होती. इथे मी पोहायला शिकले. नंतरच्या काळात ते बरंच कमी होऊन मग एरोबिक्स वगैरे प्रकारही करून बघितले. त्या काळी शर्वरी जमेनिस तिथे एरोबिक्स शिकवायला यायची. त्या बॅचला तुफान गर्दी असायची. म्हणून मीही जाऊ लागले आणि मला त्या व्यायाम प्रकाराचाही नाद लागला. भारतात (कायमची) परत आल्यावर काही गोष्टी मला अतिशय तीव्रतेने जाणवू लागल्या. त्या म्हणजे, आम्ही लहान होतो तेव्हा, आणि आता स्त्रियांच्या पोहण्याच्या पोषाखांत एकदम तालिबानी फरक पडला आहे. आमच्या लहानपणी आमच्या एकमेव स्त्री शिक्षिका व्यवस्थित आंतरराष्ट्रीय मानकांचा बिनबाह्यांचा स्पीडो घालत असत. आणि आम्हीही त्याच प्रकारचे कपडे घालत असू. पण आता भारतात स्त्रिया जवळपास स्कुबा डायव्हिंग सूटसदृश काहीतरी घालून तलावात उतरतात. मात्र, पुरुषांच्या पोषाखांत अजिबात फरक पडलेला नाही. अजूनही तितक्याच केसाळ ढेऱ्या बघायला मिळतात. पण आजूबाजूच्या बायकांचे टाचेपर्यंत येणारे कपडे बघून मीही पियर प्रेशरने वरती एक टीशर्ट घालून पोहू लागले आहे.पण मी टाचेपर्यंत कपडे कधीच घालणार नाही इतपत बंडखोरपणा मी अजूनही राखून आहे.
शिवाय, भारतात जशी ट्राफिकची गत आहे तशीच पोहण्याची. काही लोक उभे पोहतात (म्हणजे संबंध २५ मीटर सलग आणि परत) तर काही लोक आडवे पोहतात. शिकाऊ लोक आडवे पोहतात कारण त्यांना पूर्ण २५ मीटर पोहायचा दमसास नसतो. त्यामुळे पोहताना आपण एखाद्या पाणबुडीला धडकणार नाही याचं भान ठेवून पोहावं लागतं. याची सवय व्हायला काही काळ आणि मनस्ताप गेला. पण एक दिवस मी सरळ पोहत असताना एक माणूस मला आडवा आला. शिकाऊ असेल म्हणून मी पुढे गेले. तर परत येताना तो मला समांतर होता. हे काय प्रकरण आहे बघायला मी माझ्या लॅपनंतर उभी राहिले तेव्हा लक्षात आलं की तो चौकोनी पुलात गोल फेऱ्या मारत होता. ही पद्धत काही चुकीची नाही. पण आधीच्या तीनही खंडांत मी असं पोहणं कुठेही बघितलं नव्हतं.

एकतर गोल पोहणारे लोक अंतर कसं मोजत असतील? अंतर न मोजता पोहणं कसं काय जमू शकतं? बऱ्याचवेळा फेऱ्या मारताना आकडा विसरतो म्हणून मी खूप पैसे मोजून एक गार्मिन घेतलं. सुरुवातीला माझे आकडे आणि त्याचं मोजणं असा पडताळा करून बघतानाच लक्षात आलं की ते घड्याळ अंतर वाढीव दाखवतं आहे. मग ते किती मीटर अधिक दाखवतं आहे हे शोधून काढायला मी आणखीन काटेकोरपणे माझ्या फेऱ्या मोजू लागले. पण त्यात काही सिस्टिमॅटिक एरर नाही हे निदर्शनास आल्यावर आता मी घड्याळही घालते आणि आपणही मोजते. या सगळ्या उपक्रमामुळे माझा वेळ चांगला गेला (आणि त्याबद्दल इथे लिहून आणखीनच) आणि स्मरणशक्ती सुधारली. शिवाय रोज मला उगाचच जास्त पोहल्याबद्दल शाबासकी मिळते. असं असताना एखादा माणूस चौकोनी पुलात संथपणे गोल पोहताना बघितल्यावर मला त्याचा उगाच राग येऊ लागला. मग यावर काही लोकांशी चर्चा केल्यावर त्यांतल्या एकांनी असं सुचवलं की कदाचित तो विहिरीत पोहायला शिकला असेल. हे स्पष्टीकरण पटल्यानं आता मला त्या माणसाचा राग येत नाही. भारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पाऊण तासाची "बॅच" असते. वेळ संपली की एक कर्कश घंटा वाजते आणि सगळ्यांना गुमान बाहेर पडावं लागतं. त्यामुळे आपण केवळ या कर्कश घंटेच्या अभावी दोन आणि अडीच किलोमीटर पोहू शकायचो याचा साक्षात्कार मला भारतात आल्यानंतर झाला. त्यामुळे मी पाण्यात उतरल्यानंतर एकही क्षण वाया न घालवता सलग पोहू लागले. आधी पाचशे, मग आठशे आणि आता (माझ्या मोजणीप्रमाणे) बाराशे मीटरपर्यंत माझी प्रगती झाली आहे. त्यामुळे आता आमचे सैनिक शिक्षक कमीत कमी श्वासात जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे असं का म्हणायचे हे लक्षात येऊ लागलं आहे. पावसाळा आणि थंडीच्या दिवसांत मनसोक्त पोहता येतं. पण यावर्षी जानेवारीत एकदा मी पाण्यात उतरल्यावर असा काही धक्का बसला की घरी आल्यावर मी चॅटजीपीटीला "हायपोथर्मियाने मरण येण्यासाठी पाण्याचे तापमान किती असावे?" हा प्रश्न विचारला होता. त्यावर आलेलं उत्तर इतकं जटील होतं की मी काही दिवस पोहणं बंद केलं. पण जसा कसा उन्हाळा जवळ येतो तसं सैनिक सरांचं लॉजिक अजूनच पटायला लागतं. कमीतकमी जागेत, कमीतकमी वेळांत, आपल्याला जास्तीतजास्त पोहायचं आहे या एकाच निर्धारानं पाण्यात उतरावं लागतं. आणि मग त्या सगळ्या टॅटूयुक्त तरुणींचा हळुवार आणि सावकाशपणा कदाचित त्यांच्या देशातील लोकसंख्येचा परिणाम असावा अशी खात्री पटू लागते.

उरलेल्या तीनपैकी कोणत्याच खंडात पोहण्याचा अनुभव आता मिळेल किंवा नाही माहिती नाही. पण मिळाला तर हा लेख वाढवण्यात येईल.

Node read time
9 minutes

'न'वी बाजू Mon, 09/03/2026 - 20:47

उरलेल्या तीनपैकी कोणत्याच खंडात पोहण्याचा अनुभव आता मिळेल किंवा नाही माहिती नाही.

उरलेली तीन खंडे??? आफ्रिका आणि... तुम्ही दक्षिण अमेरिका हे उत्तर अमेरिकेहून वेगळे खंड मानता काय?

(तरीसुद्धा तीनचा हिशेब जमत नाही.)

हं, आता, अंटार्क्टिकात पोहण्याची जर का तुमची मनीषा असेल, तर मात्र आपला तुम्हाला सलाम!

(आणि वर,

पण मिळाला तर हा लेख वाढवण्यात येईल.

हेही ठेवून दिलेय!

चालायचेच.)

Nile Mon, 30/03/2026 - 20:50

In reply to by 'न'वी बाजू

दक्षिण अमेरिकेत राह्यलानंतर जाणवलं की जगभरातल्या शालेय अभ्यासक्रमात जगात एकूण पाच, सहा किंवा सात खंड आहेत असे शिकवले जाते. दक्षिण अमेरिकेतल्या समवयीन लोकांना सहा खंड आहेत असे शिकवलेले गेल्याचे आढळले. यु. स्टे. ऑफ अमेरिकेत बहुसंख्यांना सात आणि काहींना सहा. फ्रान्समधील काही वयस्कर लोकांना पाच पण समवयीन लोकांना सहसा सात किंवा सहा असे शिकवले गेल्याचे आढळले. भारतात आम्हाला तरी सात खंड असल्याचे शिकवल्याची खात्री आहे. Wiki संदर्भ. 

 तेव्हा तुम्हाला किती शिकवले गेले होते याबद्दल उत्सुकता आहे.

गोगोल Mon, 09/03/2026 - 21:30

.

गोगोल Mon, 09/03/2026 - 22:28

.

सई केसकर Tue, 10/03/2026 - 09:56

>>"I wish there was a way to know you're in the good old days before you've actually left them"

हे किती यथार्थ आहे ना ..

अगदी!
पण याचा अर्थ असाही होतो ही आत्ताचा काळही मागे वळून बघितल्यावर रम्य वाटणार आहे.
अलीकडे मी जुलिअन बार्न्सचं डिपार्चर्स नावाचं पुस्तक वाचलं. त्यात त्यानं आपली स्मरणशक्ती आपल्याला जे हवं ते कसं जतन करून ठेवते याबद्दल बरंच लिहिलं आहे. ते वाचताना लक्षात आलं, की एखादा वाईट अनुभव आला तरी पुरेसा वेळ गेल्यानंतर त्यातलं काहीतरी छान आठवतं. असं होण्याला बरेच दिवस जावे लागतात. पण अचानक कुठूनतरी आठवण येते आणि लक्षात येतं, की आपण तेव्हा या आठवणीबद्दल आत्ता आहोत तितके आनंदी नव्हतो.
असो, चालायचेच. पण मुद्दा असा की स्मरणशक्तीला अनेक गाळणी आणि चाळणी असतात यावर आता माझा विश्वास बसला आहे. :)

अण्वस्त्रधारी हत्ती Tue, 10/03/2026 - 16:49

छान लेख. आम्ही पोहायला उतरलो तर जगात त्सुनामी येते त्यामुळे आम्ही पोहायच्या फंदात पडत नाही. तरीही हा लेख आवडला.

सई केसकर Sat, 28/03/2026 - 05:13

In reply to by अस्वल

म्हणूनच युरोप उगाच घुसवावा लागला.
आणि सुरुवात वुडहाउसच्या एका वाक्यावरून प्रेरित आहे (जे नारळीकर नेहमी सांगायचे)
There are two types of people in this world. Those who like papayas and those who do not like papayas.

,>>लेख त्यांच्या आत्मचरित्रापेक्षा वाचनीय आहे.
हे वाक्य कॉम्प्लीमेंट म्हणून घेण्याचे धाडस होत नाही. केवळ त्या पुस्तकापेक्षा कमी रटाळ आहे यावर समाधान मानते.

'न'वी बाजू Sat, 28/03/2026 - 09:18

In reply to by सई केसकर

आणि सुरुवात वुडहाउसच्या एका वाक्यावरून प्रेरित आहे (जे नारळीकर नेहमी सांगायचे)
There are two types of people in this world. Those who like papayas and those who do not like papayas.

हे वुड्डहौससाहेबाने नक्की कोठे नि कोठल्या संदर्भात म्हटले आहे म्हणे?

(अर्थात, हा प्रश्न निरर्थक आहे — आणि, किमान दोन कारणांकरिता निरर्थक आहे — हे आगाऊ मान्य आहे. एक म्हणजे, वुड्डहौससाहेबाची ही असली क़ातलाना वाक्ये जी असतात, ती वाक्ये म्हणून सहसा (मागल्यापुढल्या संदर्भाविना) आयुष्यभर लक्षात राहतात,  परंतु, नंतर त्यांचा आगापिछा सांगणे हे दस्तुरखुद्द वुड्डहौससाहेबाला तरी त्याच्या हयातीत जमले असते की नाही, याबद्दल साशंक आहे. दुसरे म्हणजे, अनेकदा, वुड्डहौससाहेबाने तीच वाक्ये एकाहून अधिक ठिकाणी फेकलेली असू शकतात.

परंतु, तरीसुद्धा प्रश्न उपस्थित करण्याचे कारण म्हणजे, उपरोक्त वाक्य माझ्या नजरेखालून कधी गेल्याचे स्मरणात नाही. अर्थात, माझा काही वुड्डहौससाहेब अथपासून इतिपर्यंत वाचलेला असण्याचा दावा नाही, परंतु तरीसुद्धा, एके काळी (नि एका वयात) पुष्कळसा डोळ्यांखालून गेलेला आहे (नि अधाश्यासारखा वाचलेला आहे). त्यामुळे, उपरोक्त वाक्य हे माझ्या नजरेतून सुटलेले असणे हे (तत्त्वतः अशक्य जरी नसले, तरीही) विस्मयकारक आहे. (शिवाय, याचा स्रोत जर कधी माझ्या वाचनातून सुटला असेल, तर जमल्यास पुढेमागे कधीतरी तो वाचायची स्वतःशीच नोंद करण्याची एक संधी, इतकेच.)

अर्थात, वुड्डहौससाहेबाने उपरोक्त वाक्य लिहिल्याचा दावा नारळीकर जर करीत असतील, तर वुड्डहौससाहेबाने ते कोठेतरी खरोखरच लिहिले असले पाहिजे. (नारळीकर कशाला ठोकून देतील?) त्याबद्दल शंका उपस्थित करण्याचा हेतू नाही. फक्त, कोठे लिहिले आहे, याबद्दल कुतूहल आहे, इतकेच. तेवढेच कधीतरी स्वतः वाचता आल्यास… असो.)


वुड्डहौससाहेबाची अशीच आयुष्यभर लक्षात राहिलेली काही खतरनाक वाक्ये (शब्दरचना जरी अगदी हुबेहूब मुळाबरहुकूम नसली, तरीही) म्हणजे, ‘It’s like Shakespeare. Sounds impressive, but does not mean a thing.’ किंवा, ‘Have you considered the homœopathic treatment? If one girl appears to be the cause of the heartbreak, apply another girl?’ आता, या वाक्यांचा नक्की स्रोत आणि/किंवा आगापिछा — शोधून काढणे हे तत्त्वतः अशक्य जरी नसले, तरीही — सांगणे हे माझ्याच्याने जमणार नाही. असो.

सई केसकर Sat, 28/03/2026 - 09:32

जालावर बघितल्यास असं थेट वाक्य सापडत नाही. पण आर्थर शॉपेनहावरने असं म्हणलेलं आढळलं:
There are two kinds of people in this world. Avoid both of them.
हा सल्ला घ्यायला काही हरकत नाही.
माझाही wodehouse व्यासंग बेताचा आहे आणि त्यात मला काहीही लक्षात राहत नाही. त्यामुळे सात ते पंधरा वर्षांची असताना दोन चार वेळा ऐकलेले हे वाक्य कदाचित मीच चुकीचे लक्षात ठेवले असू शकते.

पण wodehouse ची पिवळ्या बुटांची गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आहे. ती पुन्हा वाचायला हवी.

हे वाक्य बंटी आणि बबली या सिनेमात अमिताभच्या तोंडीही आहे.
इस वर्ल्ड में दो तरह के लोग होते है
एक जो [विसरले]
और दूसरे जो एक ही जिंदगी में कई जिंदगियां जीते है

'न'वी बाजू Sat, 28/03/2026 - 21:26

In reply to by सई केसकर

जालावर बघितल्यास असं थेट वाक्य सापडत नाही.

वुड्डहौससाहेबाचे असले (डायकॉटमी-टैप्स) (माझ्या) आठवणीतले एकमेव वाक्य बोले तो:

It is a good rule in life never to apologise. The right sort of people do not want apologies, and the wrong sort take a mean advantage of them.

किंबहुना, वुड्डहौससाहेबाला त्याच्या आख्ख्या लेखनकारकीर्दीत पपईसंबंधी काही विधान करण्याचे काही प्रयोजन आले नसेलच, असे सांगता येत नाही, परंतु तरीही, असे प्रयोजन लक्षात येत नाही.

(अर्थात, मी (वुड्डहौस-)सर्वज्ञ असण्याचा दावा करीत नाहीच.)

पण wodehouse ची पिवळ्या बुटांची गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आहे. ती पुन्हा वाचायला हवी.

ही गोष्टदेखील माझ्या वाचनातून निसटलेली दिसते. (कोठली गोष्ट?)

अधिक गूगलशोधाअंती, ही बहुधा Mr. Mulliner Speaking या संग्रहातील The Story of Cedric असावी, असे वाटते. (चूभूद्याघ्या./बरोबर का?)

दुर्दैवाने, Mr. Mulliner मालिका मी (एका संग्रहापलीकडे) फारशी वाचलेली नाही. आणि, त्यातही, हा विशिष्ट संग्रह आणि त्यातली ही विशिष्ट गोष्ट माझ्या वाचनात आलेली नाही.

पुस्तक मागविलेले आहे. त्रुटीची परिपूर्ती त्वरित करण्यात येईल. अनेक आभार.

(बाकी,

There are two kinds of people in this world. Avoid both of them.

शॉपेनहावरचे हे तथाकथित उद्धृत आम्हां माणूसघाण्यांचे ब्रीदवाक्य म्हणून स्वीकारण्यास प्रत्यवाय नसावा. असो.)


तरीसुद्धा, त्यातील जे काही थोडेफार वाचलेले आहे, त्यापैकी, “जगात जो काही असंतोष आहे, त्याचे मूळ कारण भूक हे आहे. आता हिंदुस्थानचेच पाहा ना! तिकडे तो गांधी (उपास करण्याऐवजी) समोर एखादा रसरशीत ष्टेक घेऊन हादडायला जर बसला, तर तो सविनय कायदेभंग वगैरे निरर्थक प्रकार ताबडतोब बंद होईल!” अशा अर्थाचे Mr. Mullinerचे वक्तव्य वाचून, अगोदर Mr. Mullinerला नि त्यानंतर (त्याचा मानसपिता असलेल्या) वुड्डहौससाहेबाला (मनोमन) साष्टांग प्रणिपात घातला होता! (चालायचेच.)

सई केसकर Sun, 29/03/2026 - 00:03

In reply to by 'न'वी बाजू

>>ही गोष्टदेखील माझ्या वाचनातून निसटलेली दिसते. (कोठली गोष्ट?)

त्यातल्या नायकाला काही कारणाने पिवळेजर्द बूट घालून चारचौघात वावरावे लागते. आणि त्याला या बुटांत ओळखीच्या कुणीतरी बघू नये यासाठी तो पराकोटीचे कष्ट घेतो.

अजून एक अशीच कधीही न विसरणारी गोष्ट म्हणजे जेरोम के जेरोम यांच्या थ्री मेन इन अ बोट या पुस्तकातली चीजची गोष्ट. त्यातल्या एकाला कुणीतरी चांगलं ऐन बहरात असलेलं चीझ घेऊन लंडनला पाठवतं. तर तो गाडीच्या डब्यात चढल्या चढल्या गर्दी पांगते आणि डबा मोकळा होतो. ज्या माणसाच्या बायकोला ते चीझ देण्यात येतं ती शेवटी ते कुठेतरी पुरून टाकते.

Nile Mon, 30/03/2026 - 20:42

मिशिगनमध्ये असताना, प्रसिद्ध असलेली, मॅकिनॅक बेटाभोवती पोहण्याच्या शर्यतीत भाग घेतला होता का नाही? कधीतरी करावं म्हणतो. https://www.swimaroundmac.com/

नविन देशी गेलो, आणि जर त्या देशात समुद्र असेल, तर तो देश 'पोहण्याच्या यादीत' आपोआप जातो. अंटार्क्टिकासहीत पाच खंड पोहून झालेल्या यादीत आहेत. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया उरले आहेत.