Skip to main content

खरडफळा

द्रुपालच्या नव्या आवृत्तीत खरडफळा नसल्याने रिकामटेकड्या गप्पा मारण्याची सुविधा नाहीशी झाली.अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आता मोडून काढण्यासाठी हा खरडफळा हा धागा म्हणून काढलाय!!
मंडळी , रिकामटेकड्या गप्पा मारायला या . खरडफळ्याचे गतवैभव परत आणा.
नबा यांच्याशी गप्पा झाल्या नाहीत बऱ्याच दिवसात ..

फक्त हत्ती क्षमस्व !!
बाकी सगळे या
चालक मालक मंडळी - एवढे चालवून घ्या आमचे !!

चिमणराव Thu, 26/03/2026 - 12:42

In reply to by सुधीर

तसं नाही.
१. कारण त्या बाबाने पत्रकारांचे प्रश्न त्यांच्यावरच उलटवले हे दुसऱ्या एका विडिओमध्ये आहे. तो मी पाहिला.
२. मी अजून त्यांच्याकडे जाऊन प्रत्यक्ष भेटलो नाही पण तो जी काही औषधे देतो ती आयुर्वेदिक आहेत.
३. रुग्णाच्या डोक्यावर एक दगड ठेवून त्याचे बीपी, शुगर सांगतो. आता ती काही विद्या असेलही परंतू औषधे मात्र आयुर्वेदिकच असतात.
४. माझ्या काकांना(८०) पोटात दुखत होतं आणि लघवीचा प्रॉब्लेम झाला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की प्रोस्टेटचं ओपरेशन करावं लागेल पण तुमचं वय आणि प्रकृती पाहून करता येत नाही. काका गेले या खापरीवाला बाबाकडे( मुंबईहून एका ठिकाणाहून इथे जाणाऱ्या रुग्णांसाठी बस जाते. तिकडे सर्वांचं निदान आणि औषधं झाल्यावर परत येते. त्या बाबाने त्यांना दोन तीन मुठी चूर्ण दिलं काढा करून प्यायला.( पैसे नाही घेतले) महिन्याने बरे झाले. ध** चूर्ण होतं.
५.मेडिकल रजिस्ट्रेशन नाही म्हणून त्यांच्यावर( प्रॅक्टिस करण्यावर) बंदी आणली. पण बाबाने नंतर दोन डॉक्टर ठेवले आणि औषधांच्या प्रिस्क्रिप्शनवर ते सही करून देऊ लागले. त्यामुळे कायदेशीर प्रश्न बाद झाला. याचबद्दल पत्रकारांनी बाबाला छेडलं होतं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं " आम्हाला ( ते आदिवासी म्हणवतात) तुम्ही शाळेत जाऊन शिकू दिलं नाही आणि तुमचे औषधोपचार खर्च परवडत नाहीत. आमचे आदिवासी पूर्वज जे उपाय करत होते आमच्या लोकांसाठी तेच मी करत आहे". या उत्तराने पत्रकार गुपचूप निघून गेले.
६. त्याला निदान कसे समजते ते अनुभवांवर असेल. उपचार मात्र आयुर्वेदिक जडीबुटीचे योग्यच देतो. मंत्रतंत्र अजिबात नाही. त्यामुळे अनिसवाले काही करू शकत नाहीत.

[ सुधीर यांच्या प्रतिसादास२५_०३_२०२६] उप प्रतिसाद.

सुधीर Thu, 26/03/2026 - 20:58

In reply to by चिमणराव

आदिवासी परंपरा सांगणारे (जडीबुटीवाले) वैद्याप्रमाणे आयुर्वेदीक औषधेही देऊ शकतात, यात नवल वाटत नाही का? ("शाळेत जाऊन शिकू दिलं नाही" म्हणून आयुर्वेद हा विरोधाभास नाही का?) 

उपचार घेणारे केवळ आदिवासी असतील आणि आदिवासी पाड्यांवरच उपचार होत असतील, तर ते समजण्यासारखे आहे आणि बाबाचा युक्तिवाद एकवेळ मान्य करता आला असता. पण नाशिकसारख्या शहरात बाबाकडे येणारे लोक केवळ आदिवासी नसावेत. "चमत्काराच्या प्रचारामुळे" भुललेल्यांचा (आलेल्या अनुभवांचा तोंडी प्रचार, पण संख्याशास्त्रीय दृष्ट्या कोणतीही ठोस माहिती नसलेला) आणि आधुनिक उपचारपद्धती परवडत नसलेल्यांचा भरणा अधिक असावा, असे मला वाटते.

चिमणराव Fri, 27/03/2026 - 04:22

In reply to by सुधीर

आयुर्वेदीक औषधे-
१.तयार औषधे देत नाही. वनस्पतींचे मूळ, फळ वगैरे.
(तयार औषधांत योग्य प्रमाणात आणि काही आयूर्वेदिक ग्रंथातील सिद्ध कृती नुसार एकत्र केलेली वनस्पतींचे अर्क चूर्ण असतात.)
२. गूण येतो म्हटल्यावर कोणीही जातो. शहरातील रुग्ण इतर वैद्यकीय पद्धतीची औषधे घेऊन उतार न पडलेले जातात.
३. >> "चमत्काराच्या प्रचारामुळे" भुललेल्यांचा (आलेल्या अनुभवांचा तोंडी प्रचार, पण संख्याशास्त्रीय दृष्ट्या कोणतीही ठोस माहिती नसलेला) आणि आधुनिक उपचारपद्धती परवडत नसलेल्यांचा भरणा अधिक असावा, असे मला वाटते.>>----
आजाराने बेजार झालेले, औषधं खाऊन थकलेले, आधुनिक उपचारपद्धतीत तपासण्या करण्यातच बरेच पैसे घालवलेले रुग्ण उपाय शोधत असतात.

सई केसकर Tue, 24/03/2026 - 19:05

आज कर्वेनगरमधून परत येत असताना एका काकांनी I love SG असा टीशर्ट घातला होता. घरी येईपर्यंत मी विचार केला की SG कोणत्या अमेरिकन राज्याचे लघुरूप आहे. सॅनफ्रॅन, सॅनहोजे, सॅन अमुक सॅन तमुक असा डोक्याला खूप ताण दिल्यावर घरी येऊन नेटवर बघितलं तर SG= Singapore.
पुढे कधी कुणाला असा टीशर्ट घातलेला कुणी दिसला तर त्रास नको.
यातलं स्टिरिओटिपिकल गृहीतक:
कर्वेनगर म्हणजे काका अमेरिकेतच गेलेले असणार!

'न'वी बाजू Tue, 24/03/2026 - 20:57

In reply to by सई केसकर

घरी येईपर्यंत मी विचार केला की SG कोणत्या अमेरिकन राज्याचे लघुरूप आहे.

तात्यांचा बस चले तो उद्या सिंगापूरसुद्धा अमेरिकेचे राज्य बनून जाईल. आहे काय नि नाही काय?

सॅनफ्रॅन, सॅनहोजे, सॅन अमुक सॅन तमुक असा डोक्याला खूप ताण दिल्यावर...

१. यांपैकी कोठलेही अमेरिकन राज्य नाही.

२. 'संतसंतिणींचा मेळावा' म्हणणार होतो, परंतु, उगाच काही शाळकरी पौगंडी अश्लील संकेत आठवून गेले, नि आळंदीच्या वाटेच्या आठवणींनी गहिवरून आले. (संदर्भ समजला नसल्यास सोडून द्या.)

यातलं स्टिरिओटिपिकल गृहीतक:
कर्वेनगर म्हणजे काका अमेरिकेतच गेलेले असणार!

मी सांगतो तुम्हाला, काका विशाल कोथरुडाबाहेर कोठेही गेलेले नसणार म्हणून.

आमच्या लहानपणी (जेव्हा नेहरूंच्या वंशावळीच्या दुष्ट सोशालिस्ट राजवटीचे सावट भारतावर असे, वगैरे वगैरे) किनई, पुण्यात (कोठल्या फूटपाथवर, कोण जाणे, परंतु) लालनिळेपांढरे चट्टेरीपट्टेरी टीशर्ट मिळायचे. पैकी पांढर्‍या पट्ट्यावर 'दुबई' नाहीतर 'सिंगापूर' नाहीतर 'न्यूयॉर्क' असे काहीबाही (रोमन अक्षरांतून) लिहिलेले असायचे. आमच्या वेळची शायनर मंडळी तसले टीशर्ट घालून गावभर हिंडत.

झालेच तर, लक्ष्मी रोडच्या फूटपाथवर जीनचे स्कूलबॅगवजा बॅकपॅक मिळत. त्यावर पुढच्या बाजूस 'जपान', 'ऑस्ट्रेलिया', 'ब्रिटन' असे काहीबाही लिहिलेले (आणि त्याबरोबर लिहिलेल्या देशाचा झेंडा) असले लोगो असत. (पैकी, 'ब्रिटन' असे लिहिलेल्या आवृत्तीत त्या यूनियन जॅकच्या लाल आणि निळ्या रंगांची हमखास आलटापालट झालेली असे; परंतु ते सोडून देऊ.)

शिवाय, 'मेड अ‍ॅज़ जपान:४४४' की कायसेसे लिहिलेला नाडीने तोंड आवळणार्‍या नायलॉन बॅगचाही एक प्रकार त्याच फूटपाथवर मिळे. (पैकी, 'मेड इन'ऐवजी 'मेड अ‍ॅज़'मागील भावना एक वेळ समजू शकतो, परंतु, ४४४चा सिग्निफिकन्स मला आजतागायत समजलेला नाही. चालायचेच.)

गेऽले ते दिवस!

तर सांगण्याचा मतलब, काकांच्या ग्लोबट्रॉटरगिरीची मर्यादा लक्षात आली असेलच. (लक्ष्मी रोडच्या फूटपाथवर आजकाल असल्या चिजा मिळतात की नाही, ठाऊक नाही; झालेच तर, हाँगकाँग गल्लीत हल्ली मोबाइल प्रावरणे सोडून काहीच मिळत नाही. परंतु, काकांनी घातला होता तसल्या टीशर्टास पुण्यात कोठेतरी 'औटलेट' असणारच!)

असो चालायचेच.


सान फ्रान्सिस्को, सान होसे, सान आंतोनियो वगैरेंमधील 'सान' बोले तो (स्पॅनिशमध्ये) 'संत', तर सांता क्लारा, सांता मोनिका, सांता बार्बरा वगैरेंमधील 'सांता' बोले तो (स्पॅनिशमध्ये) 'संतीण' (किंवा, 'स्त्री संत', if you will).

सई केसकर Wed, 25/03/2026 - 06:04

In reply to by 'न'वी बाजू

>>यांपैकी कोठलेही अमेरिकन राज्य नाही.
माय बॅड. राज्य आणि शहर असा गोंधळ झाला.

>>तात्यांचा बस चले तो उद्या सिंगापूरसुद्धा अमेरिकेचे राज्य बनून जाईल. आहे काय नि नाही काय?
तात्यांवरून आठवलं. अलीकडे काँग्रेसचे दोन प्रवक्ते: सुप्रिया श्रीनेत आणि पवन खेडा, दर दोनेक दिवसांनी युट्यूबवर पत्रकार परिषद घेतात. आता ती त्यांना तिथे का घ्यावी लागते याचं कारण उघड आहे. पण या प्रेस्कॉन मी न चुकता बघते कारण (काँग्रेसही "तसलंच" असलं तरी) आजच्या घडीची वक्तृत्वाची पातळी किती घसरली आहे ते बघता, स्वच्छ हिंदीत (हिंदीत का असेना!), राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्दे मांडणारं काही भारतात ऐकायला मिळतं. ज्यात हे सर्व मुद्दे भारताच्या दृष्टिकोनातून मांडलेले असतात. बघायला काय बीबीसी किंवा सीएनएन देखील बघता येतंच. पण मोदीजी त्यांच्या दृष्टीने इतके महत्वाचे नाहीत.
तर तर, परवा खेडा यांनी साहब बीबी और गुलाम हा गुरुदत्तचा सिनेमा वापरून एक प्रेस्कॉन केली. साहेब = तात्या बीबी=बीबी आणि गुलाम=ओळखा..
https://www.youtube.com/live/QdrSqkAtAcE?si=Q40lsOqrIowQkjpi

अर्थात याबद्दल मतमतांतरे असणारच. पण मुख्य प्रवाहातील मीडिया हे न दाखवून नक्कीच TRP गमावतो आहे. हल्ली मराठी वृत्तवाहिन्या एखाद्या घरातली भोचक आत्याबाई (मला इथे आत्याबाई शब्द वापरताना खूप त्रास होतो आहे कारण हे सगळं करणारे पुरुष पत्रकारच असतात) असल्यासारख्या बातम्या देतात.
एखादा राणे कुणाबद्दल तरी काहीतरी अत्यंत हीन वक्तव्य करतो. मग हे सगळे माईक घेऊन त्याच्याकडे जाऊन त्याला सांगतात (वास्तविक ते त्यानं टीव्हीवर बघितलेलं असतं!) आणि त्याला विचारतात "तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे?" मग तो त्याहून हीन असं काही बोलतो की लगेच हे माईक घेऊन राणेकडे जातात. असं २४ तास करत बसणं म्हणजे बातम्या.
सुप्रिया श्रीनेत यांचं भाषण ऐकताना सुषमा स्वराज यांची आठवण होते. पण ते मोदींबद्दल वाईट बोलत नाहीत असं नाही. ते फक्त सिद्ध हिंदीत बोलतात म्हणून ते वाईट वाटत नाही. उदाहरणार्थ मोदींचे परराष्ट्र धोरण म्हणजे सगळीकडे जाऊन "खी खी खी" हसणे हे वर्णन मला फार आवडलं.
असो.
गुरुदत्तच्या सिनेमात तात्या नेतन्याहु आणि मोदींना बसवणे ही करमणूक भोचक अत्याबाईपेक्षा मला जास्त आवडते.

>>लक्ष्मी रोडच्या फूटपाथवर आजकाल असल्या चिजा मिळतात की नाही, ठाऊक नाही;
मिळतात! आम्ही लहान होतो तेव्हा सारसबागेबाहेर एका बाजूला Adidas आणि दुसऱ्या बाजूला nike यांचे लोगो असलेला एकच बूट (म्हणजे अशी जोडी) मिळायची! आता काय.मिळतं याचा सर्व्हे घ्यायला हवा या निमित्ताने. पण सध्या देशप्रेम फार बोकाळले असल्याने सगळीकडे पैठणीचे ड्रेस दिसतात. फारच डोक्यात जातात ते. खरी पैठणीसुद्धा आता नेसावीशी वाटत नाही.

प्रभुदेसाई Thu, 26/03/2026 - 13:35

मनपिशाच
ह्या सिनेमा बद्दल इथे कोणी लिहिले आहे कि नाही, मला कल्पना नाही, असेल तर पुढे वाचू नका.
राही अनिल बर्वे तुंबाड फेम ह्यांनी दिग्दर्शित मनपिशाच film बघितली. ह्या सिनेमाचे वैशिष्ट्य म्हणजे एक तास वीस मिनिटांचा सिनेमा केवळ रुपये ३३००० मध्ये बनवला आहे, अजून एक म्हणजे AI, फोटोशॉप, आफ्टर इफेक्ट चा वापर. पण ही अनिमेशन film नाहीये. सायाकॉलॉजीकल हॉरार प्रकारातील आहे, जबरदस्त वातावरण उभे केले आहे. बाकी तुम्हीच ठरवा. बघायची असेल तर ही घ्या लिंक.
https://www.youtube.com/watch?v=RjphBAgLwKo
ह्यावरून मला माझ्या एका कथेची आठवण झाली.
ती मला ऐसी च्या २०२५ दिवाळी अंकात प्रसिद्ध करायची होती. पण नंतर विचार केला नको दिवाळी अंकात ही कथा नको. आता मी इथेच लिहीन. पण त्या आधी ही film पहाच,

प्रभुदेसाई Thu, 26/03/2026 - 16:14

मनपिशाच बघितल्यावर मग पुन्हा एकदा भयकथा वाचायला घेतल्या. स्टीफन किंग चे पुस्तक वाचायला घेतले. समोर पहिलीच कथा आली ती वाचली.
स्टीफन किंग हा माझा आवडता लेखक आहे. काल रात्री जागून त्याची "1408" दीर्घकथा वाचून संपवली.
"1408" हा डॉल्फिन हॉटेल मधल्या १४व्या मजल्यावरील खोलीचा क्रमाक आहे. ह्या हॉटेलला १३वा मजला नाही. तसेच 1408 आकड्यांची बेरिज १३ येते. हे लेखक जेव्हा सांगतो तेव्हाच डोक्यात शिरते.
माईक एन्स्लीन हा कथेचा नायक व्यवसायाने लेखक आहे. त्याचे वैशिष्ट्य हे कि तो पछादलेल्या जागी एक रात्र काढायची आणि आलेल्या अनुभवांची नोंद करून मग पुस्तकरूपाने प्रकाशित करायचे. रूम "1408" ही भुताळी रूम आहे, त्या रूम मध्ये एक रात्र त्याला काढायची आहे.
पण हॉटेलचा मॅनेजर त्याला परावृत्त करायचा आटोकाट प्रयत्न करतो. त्या खोलीत गेस्टना आलेले अनुभव त्याला सांगतो, पण नायकही आता हट्टाला पेटलेला असतो. शेवटी हॉटेलच्या मॅनेजरला त्या खोलीची किल्ली त्याच्या हवाली करावी लागते.
पुढे काय होते? मूळातूनच वाचावे.
ही एक मनोवैज्ञानिक भीती कथा आहे, किंगने लिहिलेल्या "on writing" ह्या पुस्तकात "कथा कशी लिहिली जाते" त्याचे उदाहरण म्हणून ही कथा लिहिली होती.
ह्याच नावाचा कथेवर आधारित सिनेमाही तुम्ही बघू शकता. नेटफ्लिक्स वर आहे.
ही माझ्या मते भूताटकीची कथा नाही, कारण भूत म्हणजे कुणातरी माणसाचे वा प्राण्याचे असायला पाहिजे. त्या रूम मध्ये जे काही होते THE THING ते स्वयंभू अमानवीय होते.

सुधीर Thu, 26/03/2026 - 21:08

In reply to by प्रभुदेसाई

मनपिशाच फास्ट फॉर्वर्ड करून २ दिवसांपूर्वी पाहिला होता. तंत्रज्ञान कुठवर आलंय ते पहायला. चांगला वाटला. हे तंत्रज्ञान अजून पुढे गेले की, भविष्यात चित्रपट, एकंदर मनोरंजन आणि जाहिरात इंडस्ट्रीचे स्वरूपच बदलून जाईल.
१४०८ चं ट्रेलर आवडलं.

'न'वी बाजू Sat, 11/04/2026 - 04:54

In reply to by प्रभुदेसाई

"1408" हा डॉल्फिन हॉटेल मधल्या १४व्या मजल्यावरील खोलीचा क्रमाक आहे. ह्या हॉटेलला १३वा मजला नाही. तसेच 1408 आकड्यांची बेरिज १३ येते. हे लेखक जेव्हा सांगतो तेव्हाच डोक्यात शिरते.

यात विशेष ते काय सांगितलेत?

किंबहुना, अमेरिकेत १३वा मजला असलेले कुठले हॉटेलच कशाला, परंतु १३वा मजला असलेली कुठलीही इमारत (विशेषेकरून commercial इमारत) दाखवाच, म्हणतो मी. च्यायलेंज आहे आपले!

It’s not a bug; it’s a feature. And a pretty commonplace feature, at that.

(म्हणजे, हॅरी पॉटर इंग्लंडात होता, म्हणून तो हॉगवर्ट्सला जाण्याकरिता पावणेदहा क्रमांकाच्या फलाटावरून सुटणारी झुकझुकगाडी पकडीत असे. (पावणेदहा क्रमांकाच्या फलाटावर जाण्यासाठी नऊ आणि दहा क्रमांकांच्या फलाटांच्या मधील भिंतीतून आरपार जावे लागे. तर ते एक असो.) अमेरिकेत जर असता, तर त्याने बहुधा एखाद्या गगनचुंबी इमारतीतील तेराव्या मजल्यावर स्कूल अटेंड केली असती. (त्याकरिता त्याला बाराव्या आणि चौदाव्या मजल्यांच्या मधील छपरातून/फरशीतून आरपार जावे लागले असते.) असो चालायचेच.)

प्रभुदेसाई Sat, 11/04/2026 - 08:14

In reply to by 'न'वी बाजू

माहिती बद्दल आभार.
आता बहुतेक "१४०८" क्रमांकाची रूमही कुठल्याही हॉटेलमध्ये नसणार. किबहुना ज्या आकड्यांची बेरीज १३ येते अश्या क्रमांकाची रूमही नसणार! उदा ९०४!
एकूण काय तर या बाबतीत अमेरिकन आणि भारतीय पंलिकमध्ये खूप साम्य आहे असे दिसते. आन्ही पण लहानपणी तिचे मिळून कुठल्याही कामाला बाहेर जायची वेळ आली तर खिशात एक दगड ठेवत असू, का तर तीन तिघाडा काम बिघाडा.
मला वाटत कि प्रत्येक समाजात असे काही डेंजर नंबर असावेत. कुणाला काही माहिती आहे का?

सई केसकर Sat, 11/04/2026 - 19:40

In reply to by 'न'वी बाजू

आम्ही अलीकडेच नवीन घर घेतलं जे आता बांधकामाच्या स्थितीत आहे. तर आम्ही तेराव्या मजल्यावरील तिसरा फ्लॅट घेतला. ती माझ्या आजीची जन्मतारीख आहे. पण आपल्या आजीची जन्मतारीख असलेला फ्लॅट घेऊन आपण आपल्या नवऱ्याला तर दुखवणार नाही ना असा विचार करून त्याला मी १३ दिवसांचा वेळ दिला. पण तो सगळा वेळ घेऊन विचार करून एक रोमांचक आठवण तयार न करता तो लगेच १३०३ ला हो म्हणाला.
लोकांना वाटतं की तेराव्या मजल्यावर फ्लॅट घेतला म्हणजे मी एकदम अँटी अंधश्रद्धा आहे. पण मी एक आजीच्या आठवणीत रमलेली आण्टी आहे फक्त.

सई केसकर Mon, 30/03/2026 - 13:28

काल आईकडे जात असताना, रामबाग कॉलनीत एक साधारण माझ्याच वयाचा काका
अस्त
व्यस्त
मस्त
असा देवनागरीत लिहिलेले शब्द असलेला टीशर्ट घालून चालला होता.
यावरून मला पडलेले प्रश्न
कशाचा अस्त?
कशाचे प्रमाण व्यस्त?
काय मस्त?

हल्ली पुण्याच्या काही मोहल्ल्यांमध्ये असे मराठीत काहीतरी लिहिलेले कपडे घालायची पद्धत आहे. यापैकी एक
हिला विचारून सांगतो
असा टीशर्ट मला माझ्याच नवऱ्यासाठी घ्यायचा आहे.

अबापट Wed, 01/04/2026 - 15:59

इथे फारसे कुणी क्रिकेट आवडणारे असतील असे वाटत नाही. (मला आवडतं )
इथे IPL नावाचे 'नक्रिकेट' बघणारे आहेत का कुणी ? ( मी बघत नाही. बघवतनाही)

सई केसकर Wed, 01/04/2026 - 16:32

In reply to by अबापट

मला पोरामुळे सक्तीने बघावं लागतं. मला ट्वेन्टी ट्वेन्टी किंवा आयपीएल काहीच आवडत नाही.
पण अलीकडे पर्याय नसतो. मग आम्ही त्याला सांगतो, आमच्यावेळी क्रिकेटच्या मॅच पाच पाच दिवस चालत असत. किमान संबंध दिवस तरी.
आमच्यावेळी आगरकर नावाचा एक खेळाडू होता जो मला खूप आवडायचा. मग एक दिवस त्यानं आत्ताच्या आगरकरकडे बोट दाखवून, हा बघ आई तुझा आगरकर असे उद्गार काढले.

'न'वी बाजू Thu, 02/04/2026 - 07:01

In reply to by अबापट

…इथे नास्तिकांच्या मेळाव्याबद्दल तुम्ही काही विचार मांडले होतेत, ती प्रतिक्रिया काढून का घेतलीत, म्हणे? (कशी काढून घेतलीत, हा वेगळा प्रश्न.) त्यावर हातभर उत्तर लिहायला घेतले, ते सुपूर्द करेपर्यंत तुमचा मूळ प्रतिसाद गायब झाला. चालायचेच.

सई केसकर Wed, 08/04/2026 - 17:49

कुळथाचं पिठलं दोन जणांसाठी -
जिन्नस:
१. १/३ कप (अमेरिकी प्रमाण) कुळथाचं पीठ
२. ५ लसूण पाकळ्या. अर्ध्या कापून हळू ठेचायच्या. पिठल्यातून बोटानी तुकडा बाजूला काढता आला पाहिजे इतपत.
३. १-१/२ टेस्पू तेल
४. १ टीस्पू मोहरी
५. १/२ टीस्पू हळद
६. १/२ टीस्पू हिंग
७. २ सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे
८. ४-१/२ कप पाणी
९. ५ आमसुलं
१०. मीठ
११. बारीक चिरलेली कोथिंबीर
१२. १-१/२ टेस्पू ओलं खोबरं

कृती:
. पिठी + १/२ कप हळूहळू पाणी. सरबरीत. गुठळ्या नको. बाजूस ठेवावे.
. तेल + मो-हिं-ह + लाल मिरच्या + लसूण फोडणी. लसूण जेमतेम परतवायचा तांबूस न होऊ देता.
. लगेच उरलेलं ४ कप पाणी (मी गरम पाणी वापरतो) + आमसोलं -> उकळी.
. + सरबरीत पिठी + मीठ -> १ उकळी.
. भातावर ओतून कालवता येईल असं, रटरटतं हवं. आमटीसारखं पातळ नव्हे. फार घट्ट वाटलं तर पाणी घालून वाढवायचं. फार पातळ वाटलं तर आटवायचं.
. वरून कोथिंबीर + ओलं खोबरं.

(एआय गुरुजींचा धागा (अजून) भरकटायला नको म्हणून इथे)

मूळ पृच्छकाने (बोले तो, अबापटांनी) त्या धाग्यावर “ती पाककृती इथे द्याल काय ?” असे विचारले होते. (संदर्भ.)

तसेही, (एआयगुरुजींचा) धागा (अजून) भरकटणे हे ‘एआयसीअक्षरे’चे बग नसून फीचर नव्हे काय? बोले तो, आपल्या सर्वांचे (एआयगुरुजी इन्क्लूडेड) ते उद्दिष्ट असावयास नको काय?

(निदान माझे तरी ते आहे, हे मी कधीच लपविलेले नाही. आणि, केवळ एआयगुरुजींच्या धाग्याच्याच बाबतीत नव्हे; कोठल्याही धाग्याच्या बाबतीत. तसा मी पक्षपाती नाही.)

तर मग प्रश्न असा आहे, की हा अतिचांगुलपणा (मराठीत: चोंबडेपणा) करून तुम्ही नक्की काय मिळविलेत?

पाहा: तुम्ही उत्तर इथे दिलेत, म्हणून मूळ पृच्छकाला (पक्षी: अबापटांना) तुमचे आभार इथे (पक्षी: या धाग्यावर) मानावे लागले. हे सर्व सुखेनैव त्या धाग्यावर घडू शकले नसते काय?

(छ्याः! सगळी मजा घालविलीत!)

असो चालायचेच.

सई केसकर Sat, 11/04/2026 - 19:36

In reply to by 'न'वी बाजू

>>तसेही, (एआयगुरुजींचा) धागा (अजून) भरकटणे हे ‘एआयसीअक्षरे’चे बग नसून फीचर नव्हे काय?

हे खरेच आहे. पण कभी कभी मेरे दिल में खयाल आता है की असे धागे भरकटवणे आपल्याला मान्य असले तरी ते लिहिणाऱ्याला मान्य असेलच असे नाही. मग उगाच त्यांना वाईट वाटायला नको.

आणि खरडफळा हत्तीफळ्याच्या पुढे जावा म्हणूनही माझे प्रयत्न चालू आहेत. म्हणजे सुरुवातीला मी तिथे खूपच टाईमपास केला. पण तो इथेही चालला असता.

'न'वी बाजू Sat, 11/04/2026 - 19:45

In reply to by सई केसकर

या प्रतिसादातील मुद्द्यामुद्द्यावर प्रतिवाद करण्यासारखा आहे. परंतु, तूर्तास माझ्या हाती तेवढा वेळ नाही. सबब, सवडीने पुन्हा कधीतरी. जागा राखून ठेवतो.

आभार.

प्रभुदेसाई Sat, 11/04/2026 - 00:06

आज हे वाचनात आले,
"Idiosyncratic take on the Second Law of Thermodynamics
Kipple is useless objects. When nobody’s around, kipple reproduces itself. It always gets more and more. No one can win against kipple, except temporarily and maybe in one spot, like in my apartment. But eventually I’ll die or go away, and then the kipple will again take over. It’s a universal principle operating throughout the universe; the entire universe is moving...toward a final state of total, absolute kipple-ization."
हे जणू जगाच्या सद्यपरीस्थितीचे यथार्थ वर्णन आहे असे वाटले.

'न'वी बाजू Sat, 11/04/2026 - 19:36

In reply to by प्रभुदेसाई

When nobody’s around, kipple reproduces itself.

Sexually, or asexually?

नाही, sexual reproduction ही तशी एक प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आहे, म्हणून विचारले. Kippleचे अंतिम उद्दिष्ट जर साध्य व्हावयाचे असेल, तर the only way around is to go nuclear; asexual reproductionला पर्याय नाही!

असो चालायचेच!


किंबहुना, sexual reproduction हे मुळात भारतातल्या वाढत्या लोकसंख्येच्या समस्येला आळा घालण्यासाठी तोडगा म्हणून सुचविण्यात आले असावे, अशी माझी धारणा आहे. भारतीय जर asexually reproduce करीत असते, तर ही समस्या आणखी किती बिकट झाली असती, याचा विचार करा!

शिवाय, Kipple२अ जर sexually reproduce करू लागले, तर आवाज किती होईल (आणि, पर्यायाने, ध्वनिप्रदूषण किती वाढेल), याचाही विचार अवश्य करा.२ब

२अ वाक्याच्या मधले capitalization माझे. (कितीही झाले, तरी Kipple हे विशेषनाम आहे. त्याचा योग्य तो आदर झालाच पाहिजे.)

२ब आमच्या तारुण्यात जे असंख्य “height of” jokes लोकप्रिय होते (नव्हे, ज्यांचा सुळसुळाट तथा प्रादुर्भाव झाला होता), त्यांपैकी Height of Noiseची व्याख्या अजूनही आठवते: Two skeletons making love on a tin roof.

'न'वी बाजू Mon, 13/04/2026 - 05:27

In reply to by 'न'वी बाजू

… sexual reproduction ही तशी एक प्रचंड वेळखाऊ प्रक्रिया आहे…

किंबहुना, तिची संभावना कोणी एक आत्यंतिक bureaucratic प्रक्रिया अशी केल्यास प्रत्यवाय नसावा.

(अगोदर अर्ज करा, मग महिनोन् महिने घोंगडे भिजत पडणार, नि सरतेशेवटी काम होईल, याची शाश्वती नाहीच. लाल फितीचा याहून उत्तम नमुना इतरत्र कोठे सापडावा? अगदी भारतीय (विशेषेकरून सरकारी) बँकासुद्धा या बाबतीत तिच्याशी स्पर्धा करू शकणार नाहीत.)

(त्याउलट asexual reproduction पाहा. झट् तक़सीम, पट् आबादी! एक घाव नि दोन तुकडे, मामला खतम!)

(पण लक्षात कोण घेतो?)

सई केसकर Mon, 13/04/2026 - 07:28

In reply to by 'न'वी बाजू

>>(त्याउलट asexual reproduction पाहा. झट् तक़सीम, पट् आबादी! एक घाव नि दोन तुकडे, मामला खतम!)

पण याचा अर्थ असा होतो की प्रत्येकच व्यक्ती प्रजनन करायला तयार झाली की प्रजनन होणार! मग लोकसंख्या चेन रिऍक्शनसारखी वाढली असती!

शिवाय, प्रियराधन, मग मामुली भांडणं, मध्येच एखादा अफेअरचा तेढ, प्रेमभंग, मग काहींचे लग्न, काहींचे लिव्ह इन, काहींचे लिव्हिन नंतर ब्रेकअप, काहींचे डिव्होर्स, असं सगळं वैविध्य कसं आलं असतं? मुळात पुरुष श्रेष्ठ की स्त्री असा वाद घालायला सोशल मिडियाला मिळालाच नसता.

शिवाय मेहदी हसन, गुलाम अली वगैरे लोकांना धंदे चालूच करता आले नसते.
आपलेच दोन मेहदी हसन होत असताना कुणी "आ फिर से मुझे छोड़ के जाने के लिए आ" वगैरे आळवत का बसेल?
किती कविता कॅन्सल झाल्या असत्या!
शिवाय सगळी स्पर्धाच नाहीशी झाली असती. त्यामुळे सुंदर दिसायचे काय इन्सेन्टिव्ह? मॅक, मेबिलिन, लॅक्मे वगैरे लोकांचे धंदेही बंद झाले असते.
शिवाय Durex!! भांडवलशाहीचे खूप नुकसान झाले असते.
असो

पुंबा Sun, 12/04/2026 - 10:08

धर्म म्हणजे केवळ कर्मकांडच असते. तत्वज्ञान किंवा देव यांचा धर्माशी कसलाच संबंध नसतो. यच्चयावत सगळे धर्म कर्मकांडामुळेच जगले आहेत.

'न'वी बाजू Sun, 12/04/2026 - 21:27

In reply to by पुंबा

मुद्दा विचार करण्याजोगा आहे.

कदाचित, सगळे धर्म हे कोठले ना कोठले तत्त्वज्ञान (नावापुरते) पुढे करून त्या त्या तत्त्वज्ञानाच्या नावावर चालवलेले कल्ट आहेत, असे म्हणता येईल काय?

(येशू जातो जिवानिशी…)

तर्कतीर्थ Sun, 19/04/2026 - 10:08

माणसांना मारून विचार संपत नाहीत असे म्हणतात...

जसे की गांधीना मारून गांधी संपले नाहीत
...
...
...

तसेच नथुरामला मारून नथुराम पण संपला नाही
की गांधीद्वेष संपला नाही.

'न'वी बाजू Sun, 19/04/2026 - 10:31

In reply to by तर्कतीर्थ

मुळात नथुरामला मारण्यामागे नथुरामची विचारसरणी संपवणे हे उद्दिष्ट होते, म्हणून कोणी सांगितले?

दफ़ा ३०२करिता भारतीय दंडविधानात फाशीची शिक्षा लिहून ठेवलेली आहे, इतका साधा हिशेब होता तो.

गृहीतक गंडलेले आहे.


(गांधींना मारण्यातसुद्धा नथुरामचे उद्दिष्ट गांधींची विचारसरणी संपवावी हे असावे, याबद्दल साशंक आहे. (गांधींना मारण्याने गांधींची विचारसरणी संपेल, असे मानण्याइतका दूधखुळा बहुधा तोदेखील नसावा. (त्याचे हँडलर/मेंटोर (जे कोणी असतील ते) तर नसावेतच नसावेत.) (चूभूद्याघ्या.))

असो चालायचेच.)


गांधींचे सोडा. हिटलरने स्वतःला संपवून घेतल्याने जगातला नाझीवाद संपुष्टात आला काय?

'न'वी बाजू Sun, 19/04/2026 - 11:27

In reply to by तर्कतीर्थ

ते macro levelवर झाले. प्रत्येक फाशीच्या (किंवा, फॉर्दॅट्मॅटर, कोठल्याही कायदेशीर शिक्षेच्या) वेळेस ‘यातून समाज काय धडा घेईल’ याचा विचार नव्याने होत असतो काय?

तर्कतीर्थ Mon, 27/04/2026 - 15:49

एकेरी उल्लेख

मला आता कोडे पडले आहे की आता एकेरी उल्लेख असलेल्या पोवाड्यांचे आता काय करायचं?

चौक १
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा । छत्रपती शिवाजीचा ॥ध्रु०॥
लंगोटयांस देई जानवीं पोषींदा कूणब्याचा । काल तो असे यवनांचा ॥
शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा । असे तो डौल जहागिरीचा ॥
पंधराशें एकूणपन्नास साल फळलें । जुन्नर तें उदयासी आलें ॥

https://marathi.webdunia.com/article/marathi-current-news/chhatrapati-s…

चिमणराव Thu, 30/04/2026 - 07:46

In reply to by 'न'वी बाजू

खरडफळा किंवा खरडवहीसाठी कोड बदलून सुधारून वाढवून काम झाले. पण व्यनि हे इमेलमार्फत संपर्क करतात आणि इमेल सिक्युरिटीबद्दल फारच सावधान झालेल्या आहेत साइट्स त्यामुळे त्यात अडथळे असावेत.( माझे मत).

प्रभुदेसाई Wed, 13/05/2026 - 13:34

तुमची भाषा तुमची जात दाखवते काय?
हे वाचा. पुणेरी ब्राह्मणाना आरसा दाखवणारा हा लेख आणि त्याला उत्तर.
https://scroll.in/article/1092462/how-the-nasal-na-insists-on-marathis-…

How the hard ‘na’ insists on Marathi’s caste hierarchy

https://scroll.in/article/1092616/rejoinder-the-retroflex-like-the-mara…
Rejoinder: The retroflex, like the Marathi ‘na’, has little do with caste

सई केसकर Wed, 13/05/2026 - 14:52

In reply to by प्रभुदेसाई

लेखिकेचा रोख बोली भाषेकडे आहे. बोलताना ण ऐवजी न वापरल्यावर तुच्छ लेखलं जातं हे खरं आहे. प्रमाण मराठी भाषा म्हणजे पुण्याची बोली भाषा असा समज रूढ आहे ही खरी गोष्ट आहे. प्रतिवादामध्ये केवळ ण ळ वगैरे कसे सगळ्याच भारतीय भाषांमध्ये आहेत हे सांगून ते बोलण्यात येत नसल्याने होणारा भेदभाव निघून जात नाही. पाठ्य पुस्तकांतून अजूनही प्रमाण मराठीच मुलांना शिकवली जाते. महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना ती शिकवली जाते. त्यामुळे लेखी भाषेतून ण ळ गायब होण्याची वेळ अजून तरी आलेली नाही.
याउलट आपल्या कुटुंबातले सगळे सदस्य चुकीचे मराठी बोलतात आणि केवळ चुकीचे नाही तर "हीन" मराठी बोलतात हा धक्का लहान मुलांना अधिक खोलवर बसतो. त्यामुळे काही ठराविक बंडखोर लोक सोडल्यास सर्वसामान्य लोकांचा कल चारचौघात मान्य होईल अशीच भाषा बोलण्याकडे असतो. घरी असताना लोक वेगळ्या भाषेत बोलतात आणि कामाच्या ठिकाणी किंवा जिथे असा भेदभाव होऊ शकतो तिथे शक्य तितकं "शुद्ध" मराठी बोलायचा प्रयत्न करतात.
लेखी आणि बोली भाषेत सगळीकडेच फरक असतात. सीमेवरच्या गावा शहरांत हा फरक अजून प्रकर्षाने जाणवतो.
प्रमाण भाषा सगळ्या बोली भाषांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निर्माण झाली आहे. पण तिचा उपयोग लोक कसे बोलतात त्याची परीक्षा घेऊन भेदभाव करण्यासाठी होऊ नये. अहवाल लिहिणे, पाठ्य पुस्तकं लिहिणे, मराठीतून गणित विज्ञान वगैरे लिहिणे यासाठी ती उपयुक्त आहे. पण साहित्यात लेखी भाषेतही बोली भाषा असतेच. आणि ती असावीच. त्याशिवाय मराठी टिकणार नाही. मराठी जगवणे म्हणजे मराठी प्रमाण भाषा जगवणे असं एक गृहितक झालं आहे. उद्या समजा फडणवीसांना कुणी पुण्याच्या माणसाने अतिशय शुद्ध मराठीत एखादा अहवाल लिहून दिला जो त्यांना स्पेनमध्ये सादर करायचा आहे. तर तो त्या भाषेत अनुवादित करायला लागेलच ना? एकमेकांची मतं आणि त्यांच्या भावना समजून घेणं हा भाषेचा मूळ उपयोग आहे. तो साध्य होत असेल तर कोण कसं बोलतं किंवा बोलत नाही याचा विचार करायची काहीच गरज नाही.
याउलट एखाद्या माणसाचं मराठी इंग्रजाळलेलं असेल तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ण ला न म्हणणाऱ्या लोकांकडे असतो तितका तुच्छ असतो का? फार क्वचित.
माझ्या ओळखीत अनेक भाषा बोलणारी काही मुलं आहेत. म्हणजे आई हिंदी बाबा मराठी. आई मराठी बाबा गुजराती. ही मुलं भाषा लेगोच्या तुकड्यांसारखी वापरतात. त्यांना जे व्यक्त करायचं आहे ते करण्यासाठी त्या क्षणी त्यांना ज्या भाषेतला शब्द आठवेल तो वापरून ती पुढे जातात. आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मित्रांना त्यांचं म्हणणं व्यवस्थित कळतं. याकडे त्यांची भाषा अशुद्ध आहे अशा दृष्टीकोनानेही बघता येईल किंवा त्यांचा मेंदू पटकन व्यक्त होण्यासाठी त्यांच्याकडे असलेली शब्दसंपदा efficiently वापरतो आहे असंही बघता येईल. मला दुसरा दृष्टिकोन अधिक साजेसा वाटतो. संभाषण सतत पुढे नेईल ती भाषा अधिक प्रवाही की एक एक शब्द आठवून आठवून शुद्ध बोलायचा यत्न करणारी भाषा अधिक प्रवाही?
नंतर सुचलेले काही मुद्दे
मी काही भाषातज्ञ (शब्द चुकीचा उमटला आहे) नाही. पण काही निरीक्षणे
१. भारताबाहेर युरोपियन लोकांना भेटले तेव्हा लक्षात आलं की जर्मन लोक जर्मनमध्ये अभियांत्रिकी शिकतात. फ्रेंच लोक फ्रेंचमध्ये अभियांत्रिकी शिकतात. त्यांचा इंग्रजीशी संघर्ष ते केवळ त्यांच्या देशाबाहेर पडले तरच सुरू होतो. आता भारतात हे शक्य आहे का? मराठीत अभियांत्रिकी शिकलेला माणूस गुजरातीत अभियांत्रिकी शिकलेल्या माणसाबरोबर कसे काम करणार? जर उच्चशिक्षण एका भाषेत मिळालं नाही तर व्यावसायिक उपक्रम कसे राबवले जाणार? आणि भारतीयांना तर तंत्रज्ञानाची फार ओढ! विशेषकरून पुण्यातील ब्राम्हणांना केवळ नाईलाजाने कॅलिफोर्नियात नोकरी मिळेपर्यंत पुण्यात राहावं लागतं. यांपैकी एखाद्या मुलाने जर मी मराठीत एमए करणार असा हट्ट केला तर मुसलमान बायको केल्यावर बसेल त्याहीपेक्षा मोठा धक्का कुटुंबाला बसेल. पण जर तंत्रद्न्यान मराठीतून शिकता येत नसेल तर मराठी जगवण्याचा उपाय काय? साहित्य! ते किती जण वाचतात?
२. हल्ली लहान मुलांच्या मराठीवर केवळ इंग्रजीचे अतिक्रमण होते असे नाही. हिंदी आणि कोरियन भाषादेखील त्यात येतात. त्याचं काय करायचं? जेव्हा जग बंदिस्त होतं. कुठेही जाहीर व्यक्त होण्यासाठी (भाषण, लेखन, संगीत, साहित्य) एक प्रकारचं गेटकीपिंग असायचं. ते बहुतेक करून ब्राह्मणांनीच चालवलेलं असायचं. आता सोशल मीडियाच्या काळात त्याचं महत्त्व कमी झाल्यानं भाषा अशुद्ध होत चालली आहे ही खदखद अधिक वाढली आहे का? मला याचं उत्तर हो असं वाटतं..
ज्यांच्या बालपणात सागरगोटे, विटी दांडू, पुस्तकं हीच विरंगुळ्याची साधनं होती, त्यांना आजचा जगाच्या गोंधळाचा अंदाज कसा काय येणार? जे त्या जगात मोठे होत आहेत, उत्तरं त्यांच्याकडूनच येतील.

तर्कतीर्थ Wed, 13/05/2026 - 16:19

In reply to by सई केसकर

>>>संभाषण सतत पुढे नेईल ती भाषा अधिक प्रवाही की एक एक शब्द आठवून आठवून शुद्ध बोलायचा यत्न करणारी भाषा अधिक प्रवाही?

शुद्ध बोलण्याची क्षमता मेंदूच्या भाषा विषयक ग्रहण क्षमतेशी, तसेच आजुबाजुच्या भाषिक वातावरणाशी संबंधित असते, हे जीवशास्त्र का बेदखल केले जाते? त्याचा भाषेचा प्रवाहीपणाशी संबंध जोडणे मला पटत नाही.

'न'वी बाजू Fri, 15/05/2026 - 01:11

In reply to by सई केसकर

बोलताना ण ऐवजी न वापरल्यावर तुच्छ लेखलं जातं हे खरं आहे.

हे अर्धसत्य आहे!

बोले तो, (बोलताना) 'ण'-ऐवजी 'न' वापरल्यावर तुच्छ लेखले जाते, हे (काही अंशी) खरेच आहे. परंतु, ही केवळ एक बाजू झाली. उलटपक्षी, 'न'-ऐवजी 'ण' वापरणारे महाभागही असतात. आणि, त्यांनाही तितकेच तुच्छ लेखले जाते.

(बाकी, 'ण'-ऐवजी 'न' असा उल्लेख जेव्हा तुम्ही करता, तेव्हा, (त्या ठिकाणी) 'ण' हा उच्चार प्रमाण आहे, असे तुम्हीही मानता ना? बोले तो, भारतीय रेल्वेच्या गाड्या ज्या पक्षी कधीच वेळापत्रकानुसार धावत नाहीत, त्या पक्षी मुळात वेळापत्रके हवीतच कशाला, नि ती छापण्याचा खर्च फ़िज़ूल नव्हे काय, या प्रश्नांचे उत्तर जेणेकरून 'आज अमूकअमूक गाडी लेट आहे' असे म्हणण्याकरिता काही संदर्भ हवा, म्हणून, असे देता येते, तद्वत प्रमाणभाषेचे आहे. चालायचेच.)

(व्यक्तिशः बोलायचे झाले, तर 'ण'-ऐवजी 'न' म्हणणारे, 'न'-ऐवजी 'ण' म्हणणारे, अथवा 'ण' तथा 'न' जागच्या जागी म्हणणारे, यांपैकी कोणालाच मी (निदान या कारणावरून तरी) तुच्छ लेखत नाही. स्थानिक/सामूहिक/प्रादेशिक बोलीभाषा म्हणून त्यात्या उच्चारवैशिष्ट्यांचा आदर मी करू शकतो.

मात्र, (उदाहरणादाखल) एखाद्या नाटकात अथवा सीर्यलीत 'कानेटकर' असे कुटुंबनाम धारण करणारी पात्रे आपल्या संवादांत 'ण'-ऐवजी 'न' असा उच्चार जर सर्रास करताना दिसू लागली, तर ते अंगावरून झुरळ गेल्यासारखे प्रचंड औटऑफप्लेस वाटू लागते.

(आणि, माझे असे वाटणे जर चुकीचे असेल, तर कृपया अवश्य सांगावे. त्या परिस्थितीत, उद्या एखाद्या नाटकात (पुन्हा, उदाहरणादाखल) एखाद्या पंडितजीचे पात्र आपल्या संवादांत जर 'हाय अल्लाह!', 'हे परवरदिगार!', 'तौबा तौबा!', अथवा 'अल्लाह हाफ़िज़' वगैरेंची मनसोक्त पखरण करू लागले, तर तेही स्वीकारायला मी तयार आहे. (म्हणजे, त्यात काही गैर आहे, असे नाही, परंतु तरीही, माझ्या लिबरल कानांनासुद्धा ते खटकते खरे.) असो.)

प्रतिवादामध्ये केवळ ण ळ वगैरे कसे सगळ्याच भारतीय भाषांमध्ये आहेत...

हेही तितकेसे खरे नाही.

बोले तो, (उदाहरणादाखल) प्रमाण हिंदीत (आणि कदाचित बनारसछाप बोलीत) 'ण' असेलही (नव्हे, आहेच), परंतु, बोली हिंदीत (तथा हिंदीच्या अनेक बोलीभाषांत) त्याचा हमखास 'न' होतोच. (आणि, त्याबद्दल कोणालाही काहीही गैर वाटल्याचे (निदान माझ्या तरी) ऐकिवात नाही. परंतु, तो वेगळा मुद्दा.)

'ळ'-बद्दल म्हणाल, तर वैदिक संस्कृतात तो होता, याकरिता एकदोन दाखले देण्यात येतात खरे, परंतु, नंतरच्या पाणिनीय संस्कृतापर्यंत तो लोप पावला असावा. सद्यकालीन आर्योद्भव भारतीय भाषांपैकी पश्चिमेकडील काही तुरळक भाषांत तथा बोलींत (जसे, मराठी, कोंकणी, गुजराती, राजस्थानी, हरयाणवी.) 'ळ' आहे. (खुद्द प्रमाण हिंदीत तो नाही.) द्रविडीय भाषांपैकी कन्नड तथा तेलुगुत 'ळ' आहे; कदाचित त्या प्रदेशातल्या इतरही काही बोलींत तो असू शकेल. तमिळ आणि मलयालममध्ये 'ळ' आहे किंवा नाही याबद्दल किंचित साशंक आहे. मात्र, वर उल्लेखिल्याप्रमाणे काही मूठभर भाषा तथा बोली वगळल्यास बहुतांश भारतीय भाषांमध्ये 'ळ' हा ध्वनी नसावा.

(याव्यतिरिक्त, दंततालव्य (चमच्यातला) 'च' हा ध्वनी (माझ्या माहितीत तरी) मराठी आणि कश्मीरी यांव्यतिरिक्त कोठल्याही भारतीय भाषेत बहुधा नसावा. (चूभूद्याघ्या.) परंतु, तेही असो.)

परंतु, ते जाऊ द्यात.

१. 'श' आणि 'ष' अशी दोन वेगवेगळी चिन्हे देवनागरीत आहेत, याचे कारण त्यांचा अपेक्षित उच्चार वेगवेगळा आहे, हे तथाकथित प्रमाणभाषाभिमान्यांपैकीसुद्धा कितीश्या जणांच्या गावीसुद्धा असते? (मी तरी 'ष'चा 'प्रॉपर' उच्चार फारच कमी लोकांच्या तोंडून ऐकलेला आहे. अगदी ४११०३०मध्येसुद्धा! बाकी, बंगाली लोक 'श', 'ष', आणि 'स' या तिन्हीं व्यंजनांचा उच्चार एकसारखा करतात, हे बहुधा सर्वश्रुत असावे.)

२. 'संस्कृत'चा 'सौंस्क्रुत' असा उच्चार हा 'सन्माननीय' समजावा, की 'तुच्छ'? (झालेच तर 'ज्ञान'चा 'द्न्यान' (किंवा, पर्यायाने, 'ग्यान') असा उच्चार?)

सांगण्याचा मतलब, उच्चारपद्धतींत भेद असू शकतात, परंतु त्यांत उच्च-नीच-सन्माननीय-तुच्छ असे काही नसते. (किंवा, किमान, असू नये.) बाकी, ठरलेल्या/ठरविलेल्या/(अगदी लादलेल्यासुद्धा!) 'प्रमाणा'पासून फारकत असू शकेलही. प्रमाणभाषेचे महत्त्व (विशेषेकरून, बोलीभाषेची भिन्न मानके असणार्‍या भिन्न गटांच्या परस्परसंवादाकरिता) समजण्यासारखे आहे, परंतु, ते (तथाकथित) उच्चनीचतेचे मानक ठरू नये.

पाठ्य पुस्तकांतून अजूनही प्रमाण मराठीच मुलांना शिकवली जाते. महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना ती शिकवली जाते. त्यामुळे लेखी भाषेतून ण ळ गायब होण्याची वेळ अजून तरी आलेली नाही.

मराठी (लेखी अथवा बोली) भाषेतून 'ण' अथवा 'ळ' गायब होण्याची भीती तशीही कधीच नव्हती, परंतु त्याचे कारण तुम्ही म्हणता, ते नव्हे. एकंदरीत, बोली मराठीत या दोन्हीं ध्वनींचे स्वतंत्र अस्तित्व भक्कमपणे उभे ठाकलेले आहे, हे त्यामागील कारण होय.

उलटपक्षी, (वर निर्देशिल्याप्रमाणे) लेखी मराठीतून 'ष' अथवा 'ज्ञ' गायब झालेले नाहीत, यामागे कदाचित तुम्ही म्हणता, ते कारण असू शकेलही. (चूभूद्याघ्या.)

याउलट आपल्या कुटुंबातले सगळे सदस्य चुकीचे मराठी बोलतात आणि केवळ चुकीचे नाही तर "हीन" मराठी बोलतात हा धक्का लहान मुलांना अधिक खोलवर बसतो. त्यामुळे काही ठराविक बंडखोर लोक सोडल्यास सर्वसामान्य लोकांचा कल चारचौघात मान्य होईल अशीच भाषा बोलण्याकडे असतो.

तुम्ही म्हणता, त्यात काही अंशी तथ्य असावे.

परंतु, तेवढे एकच कारण नसावे. चारचौघांत (विशेषतः, 'फॉर्मल' वातावरणांत) प्रमाण भाषा वापरण्याचे फायदे असू शकतात.

माझ्या ओळखीत अनेक भाषा बोलणारी काही मुलं आहेत. म्हणजे आई हिंदी बाबा मराठी. आई मराठी बाबा गुजराती. ही मुलं भाषा लेगोच्या तुकड्यांसारखी वापरतात. त्यांना जे व्यक्त करायचं आहे ते करण्यासाठी त्या क्षणी त्यांना ज्या भाषेतला शब्द आठवेल तो वापरून ती पुढे जातात. आणि त्यांच्या आजूबाजूला असलेल्या मित्रांना त्यांचं म्हणणं व्यवस्थित कळतं. याकडे त्यांची भाषा अशुद्ध आहे अशा दृष्टीकोनानेही बघता येईल किंवा त्यांचा मेंदू पटकन व्यक्त होण्यासाठी त्यांच्याकडे असलेली शब्दसंपदा efficiently वापरतो आहे असंही बघता येईल. मला दुसरा दृष्टिकोन अधिक साजेसा वाटतो. संभाषण सतत पुढे नेईल ती भाषा अधिक प्रवाही की एक एक शब्द आठवून आठवून शुद्ध बोलायचा यत्न करणारी भाषा अधिक प्रवाही?

प्रमाण भाषा ही शेवटी एक convenience आहे. त्याऐवजी एखाद्या परिस्थितीत दुसरे काही जर convenient ठरत असेल, तर त्यात उणेअधिक ते काय (नि काय म्हणून) करावे?

मराठी जगवणे म्हणजे मराठी प्रमाण भाषा जगवणे असं एक गृहितक झालं आहे.

उलटपक्षी, भाषेचे (सामायिक व्यवहारांत जितपत गरज आहे, त्याहून अधिक, अथवा त्याबाहेरचे) अति-(अथवा फाजील, वाह्यात) प्रमाणीकरण हेच भाषेच्या र्‍हासास तथा तदानुवर्ती मृत्यूस कारणीभूत ठरत नसावे काय?

उद्या समजा फडणवीसांना कुणी पुण्याच्या माणसाने अतिशय शुद्ध मराठीत एखादा अहवाल लिहून दिला जो त्यांना स्पेनमध्ये सादर करायचा आहे.

इथेच... इथेच सगळी गोची आहे!

पुण्याच्या माणसाला आपला (अतिशय शुद्ध मराठीत लिहिलेला!) अहवाल स्पेनमध्ये सादर करण्याची गरज आजही भासते. माद्रिदमधल्या माणसाला आपला (पराकोटीच्या शुद्ध एस्पान्योलमध्ये लिहिलेला) अहवाल पुण्यात (किंवा अगदी मुंबईतसुद्धा!) सादर करण्याची गरज कधी भासणार?

याउलट एखाद्या माणसाचं मराठी इंग्रजाळलेलं असेल तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ण ला न म्हणणाऱ्या लोकांकडे असतो तितका तुच्छ असतो का? फार क्वचित.

याबद्दल साशंक आहे. अशा मनुष्याकडे 'झग्यातून पडलाय/पडलीय काय?' अशा भावनेतून पाहणारे लोकही पुष्कळ असतात.

(मराठी माणसाचा अंगभूत तथा मूलभूत न्यूनगंड याला कारणीभूत असावा.

आणि, नेटिविस्ट/अस्मितावादी पक्ष नेमक्या याचाच फायदा घेतात. न्यूनगंडाने पछाडलेल्या मनुष्यास चिथावणे हे अत्यंत सोपे असते. आणि, (स्वकल्पित) गांडू मनुष्याइतका उत्कृष्ट उमेदवार-गुंड त्रिभुवनांत दुसरा नसावा.)

बाकी,

प्रमाण मराठी भाषा म्हणजे पुण्याची बोली भाषा असा समज रूढ आहे ही खरी गोष्ट आहे.

असा समज रूढ असेलही. आणि, ऐतिहासिकदृष्ट्या, त्यात बरेचसे तथ्य असू शकेलही.

मराठी भाषेच्या प्रमाणीकरणाच्या आद्य प्रयत्नांत पुण्याच्या (विशेषेकरून) ब्राह्मणवर्गाचा वाजवीहून अधिक प्रमाणात हातभार तथा वर्चस्व असू शकेलही. आणि त्यामुळे, या वर्गाच्या (विशेषेकरून पुणेरी चित्पावनांच्या) बोलीभाषेचा प्रभाव 'प्रमाण' ठरविल्या गेलेल्या भाषेवर वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात पडला असू शकेलही.

मात्र, 'पुण्याची/पुणेरी ब्राह्मणांची/पुणेरी चित्पावनांची बोलीभाषा' म्हणजे प्रमाण मराठी भाषा नव्हे!

तसे जर असते, तर भर सदाशिव पेठेतल्या आमच्या मराठी माध्यमाच्या शाळेतल्या मराठी विषयाच्या (बहुतांशी ब्राह्मण) शिक्षकांना, आमच्या (बहुतांशी नव्हे, तरी बहुसंख्य) ब्राह्मण विद्यार्थ्यांच्या भाषिक प्रयोगांचे तोंडी वाभाडे काढण्याकरिता (झालेच तर, लेखी पेपरांतून मार्क कापण्याकरिता) साधनच उरले नसते! (कारण, आमची भाषा बाय डीफॉल्ट 'प्रमाण' ठरली असती.)

तेही सोडून द्या. पुणेरी/सदाशिवपेठी बोली मराठीतसुद्धा अशी अनेक colloquialisms सापडतील, ज्यांना 'प्रमाण भाषे'चा भाग मानता येणार नाही. (साधे 'उच्च' या शब्दाचे उदाहरण घ्या. वास्तविक, हा शब्द प्रमाण मराठीत आहे, असा दावा करता येईलही. परंतु, सदाशिव पेठेत तो ज्या अर्थाने वापरला जातो, तशा अर्थाने तो इतरत्र वापरला जात नसावा, आणि 'प्रमाण मराठी'त तर नाहीच नाही. (त्याच्याच 'वाईट उच्च' या पुढील आवृत्तीस तर प्रमाण मराठीत स्थान नसावे.))

त्यामुळे, पुण्याची/पुणेरी ब्राह्मणांची/पुणेरी चित्पावनांची बोलीभाषा ही 'प्रमाण मराठी'च्या त्यातल्या त्यात अधिक जवळची असू शकेलही, (फार कशाला, पुण्याच्या बोलीभाषेचा 'प्रमाण मराठी'वर अवाजवी प्रभाव असू शकेलही,) परंतु, प्रमाण मराठी भाषा म्हणजे पुण्याची बोलीभाषा खचितच नव्हे!

मी काही भाषातज्ञ (शब्द चुकीचा उमटला आहे) नाही. पण काही निरीक्षणे

('तज्ज्ञ'. परंतु, ते असो.)

निरीक्षणांत उहापोह करण्यालायक अनेक मुद्दे आहेत. (काही पटण्यासारखे, काही कदाचित न पटण्यासारखे.) परंतु, त्यांबद्दल (सवडीने तथा जमल्यास) पुन्हा कधीतरी.

असो.


तळटीपा:

एखाद्या मुल्लाच्या पात्राने 'हे भगवान!' म्हटल्याससुद्धा ते बहुधा तितकेच खटकावे.

या दोन भाषांत 'ळ'-सदृश एक ध्वनी आहे, ज्याचे रोमन लिप्यंकन सामान्यतः 'zh' असे केले जाते. मात्र, त्या ध्वनीत आणि 'ळ'-मध्ये थोडा फरक आहे. त्याव्यतिरिक्त, प्रत्यक्ष 'ळ' या दोन भाषांत आहे किंवा नाही, याबद्दल मला खात्रीलायक माहिती नाही; चूभूद्याघ्या.

Deepu Fri, 15/05/2026 - 10:00

In reply to by 'न'वी बाजू

मल्याळम मधे 'ळ' आहे आणि तुम्ही म्हणता ते ळ-सदृश उच्चार असणारे अक्षरही आहे. केरळम्मधे ळ आहे आणि कोळिकोड मधे ते दुसरे अक्षर आहे . 

  माझ्यामते त्याचा उच्चार ळ आणि इ च्या मधला आहे१अ.

 Kerala: കേരളം (Keralam)

 Kozhikode: കോഴിക്കോട് (Kozhikode) 

ही प्रतिक्रिया द्यायची काही आवश्यकता नव्हती, पण नबांना काही सांगायची सुवर्णसंधी मिळतेय तर ती हातची घालवेना. 

१अ अर्थात हे माझे मत लोकांचे बोलणे ऐकुन तयार झालेले आहे, ते प्रमाण मल्याळम१अअ असेलच असे नाही. कधीकधी मला तो उच्चार ळ आणि इ मिळून असलेला उच्चार वाटतो.

१अअ प्रमाण मल्याळम उच्चार ह्या लिंक मधे आहेत.

'न'वी बाजू Fri, 15/05/2026 - 17:45

In reply to by Deepu

माहितीबद्दल आभार.

बाकी,

ही प्रतिक्रिया द्यायची काही आवश्यकता नव्हती

तशी आयुष्यात कशाचीच काही आवश्यकता नसते.

परंतु, म्हणून काय झाले? म्हणून काय आयुष्यात कोणीच कधीच काहीच करूच नये की काय?

पण नबांना काही सांगायची सुवर्णसंधी मिळतेय तर ती हातची घालवेना.

हे नेहमी अस्सेच होते!

असो. स्वागत आहे. 'न'बा is always open to be told anything whatsoever, at any time.

('लेकाचा निमूटपणे ऐकून घेतो. (वाटले तर त्यावर आपलेही सुनावतो, परंतु (बॉटमलाइन), ऐकून घेतो.)' चालायचेच.)

१अअ

क्रमनामावली चुकली. ते १अ१ असे पाहिजे.

असो. चालू द्या.

'न'वी बाजू Fri, 15/05/2026 - 02:33

In reply to by प्रभुदेसाई

तुमची भाषा तुमची जात दाखवते काय?

असेलही. बरे मग?

माझी भाषा (आणि माझी जात), आहे ही अशी आहे.

म्हणून काय मी माझी भाषा बदलू काय? की, जात बदलू?

बदलत नाही, जा! (दोन्हीं!)

असो चालायचेच.

'न'वी बाजू Fri, 15/05/2026 - 07:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जात काय, किंवा (मातृ)भाषा काय, are set in stone. बदलता येत नाहीत.

देश (अगदी सहजगत्या नाही, तरी) बदलता येऊ शकतो.

तर्कतीर्थ Fri, 15/05/2026 - 11:22

In reply to by 'न'वी बाजू

मातृभाषेचा मुद्दा एकवेळ मान्य करता येण्यासारखा आहे. पण जातीबाबत-

० प्रथम जातीची व्याख्या करा आणि जातीच्या व्याख्येत बदलता न येण्यासारखं काय आहे, ते स्पष्ट करा. जात हा सोशल कन्स्ट्रक्ट आहे, आणि कोणताही वैज्ञानिक आधार नसलेला सोशल कन्स्ट्रक्ट चॅलेंज करता येतो. जातीला वैज्ञानिक आधार नाही. जो काही जनुकीय पुरावा पुढे केला जातो, तो पिढ्या आणि पिढ्यांच्या एण्डोगामीमुळे निर्माण झालेला आहे आणि अंतिमत: काही जातींचे इनब्रिडींग वाढवणारा असल्याने धोकादायकच आहे. हे सर्व समजायला पुरेशी भावनिक आणि बौद्धिक परिपक्वता लागते (जी ध्यानाने येते, ध्यानाने तुम्ही समाजाने निर्माण केलेल्या जोखडांना झुगारू शकता. पण तो मुद्दा वेगळा आहे).

० सध्याच्या काळात जात म्हणजे विशिष्ट श्रद्धा (कुलदैवत इ०), विशिष्ट चालीरिती (उभ्या गौरी, खड्यांच्या गौरी इ), विशिष्ट आहार विषयक पॅटर्न्स (ज्यात त्यात साखर, ज्यात त्यात लसूण इ०) , स्वभाव विशेष (चिकित्सक/सैल इ०), अभिमानाचे विषय इ०

० मानववंशशास्त्रज्ञ "ब्राह्मणीकरण" या सामाजिक उन्नयनदर्शक संज्ञेबद्दल बोलतात. सध्याच्या काळात हे "ब्राह्मणीकरण" सध्याच्या काळात थांबले आहे आणि त्यामुळे "ब्राह्मण/बामन" ही आता शिवी बनली आहे...

० थोडक्यात जात म्हणजे विचित्र नियमांनी तयार झालेले समूह/कळप, आणि कोणताही समूह/कळप त्याच्या सदस्यांना पुरेसे धैर्य असेल तर सोडता येतो.

अजुन बरेच लिहीता येण्यासारखे आहे...त्यामुळे जात बदलता येत नाही हा मानसिक भ्रम आहे...

'न'वी बाजू Fri, 15/05/2026 - 17:24

In reply to by तर्कतीर्थ

(नाही म्हणजे, बाकी तुम्ही जे म्हणताय ते बरेचसे ठीकच असावे, परंतु...)

...तुम्ही आपली जात बदलून 'डॉबरमन' नाहीतर 'ज़ाफ़राबादी' करून दाखवाच पाहू!

('डॉबरमन' नाहीतर 'ज़ाफ़राबादी' राहू द्यात. साधी 'पाठारे प्रभू' करून दाखवलीत, तरी मानेन.)


तुम्ही समजा 'मी जात मानत नाही; माझी कोणतीही जात नाही' असे म्हणालात, तर ते एक वेळ शक्य आहे. (तरीसुद्धा समाज ते बहुधा मानणार नाहीच, परंतु ते सोडून देऊ. पुरेसे धैर्य जर असेल, तर समाजाला तसेही कोण विचारतो, असा दावा त्या परिस्थितीत करता येणे शक्य आहे.)

परंतु, ज्या जातीशी तुमचा दूरान्वयानेदेखील जन्मसंबंध नाही, त्या जातीत स्वेच्छेने पदार्पण करणे अशक्य.

असो चालायचेच.

सई केसकर Fri, 15/05/2026 - 12:17

>>सध्याच्या काळात हे "ब्राह्मणीकरण" सध्याच्या काळात थांबले आहे आणि त्यामुळे "ब्राह्मण/बामन" ही आता शिवी बनली आहे...

हे आत्ताच झालं आहे असं काही नाही. हे पहा प्रमाण मराठीत बामणांची कशी खिल्ली उडवली आहे! :)
https://www.youtube.com/watch?v=VLfsqUHsiAc&list=RDVLfsqUHsiAc&start_ra…