Skip to main content

स्टंट डबल

2 minutes

"काय भेंजो, काल होतास कुठे? फोनपण उचलत नव्हतास!"

"अरे शूटला गेलो होतो."

"म्हणजे जिम कॉर्बेटसारखं? कसली शिकार केलीस? नरभक्षक बिबळ्याची?"

"गप भेंजो. वेब सिरीजच्या शूटला. निकिताला कंपनी द्यायला म्हणून."

"निकिता वेब सिरीजमधे काम करतेय? म्हणजे, ती फोटोजेनिक वगैरे आहे, पण शाळेत गॅदरिंगच्या नाटकातही कधी नसायची."

"निकिता नाही रे. पॅराबोला काम करतोय."

"म्हणजे निकिताचा डाॅगी? त्याला ॲक्टींग येते?"

"ल्हासा ॲप्सो हवा होता त्यांना. ज्यां पाॅलनी मला फोन केला होता. मग पॅराबोला घरचाच आहे. म्हणजे, घरचाच होईल ना.."

"तू लाजतोयस हे फोनवरपण कळतंय. होईल होईल, पॅराबोला घरचाच होईल. पण शूटचं काय सांगत होतास?"

"वेब सिरीजमधली हिराॅईन तिच्या ल्हासा ॲप्सोबरोबर खेळतेय असा सीन होता. पण तिकडे गंमतच झाली."

"काय?"

"अरे हिराॅईन घाबरली. बाकी सगळे ॲक्टर्स होते. क्रू होता. म मग शूट फुकट जाऊ नये म्हणून स्टंट डबल वापरायचं ठरलं."

"आणि निकिताला संधी मिळाली? सही! पॅराबोलाबरोबर खेळायचं म्हणजे तिच्या डाव्या हाताचा खेळ."

"अरे पूर्ण ऐक. एक सेलेब्रेटी ल्हासा ॲप्सो आहे म्हणे. उरूमशी नावाची."

"उरूमशी? उर्वशी असेल भेंजो."

"नाही रे. उरूमशी म्हणून चीनमधे शहर आहे. ल्हासा ॲप्सोचं नाव ल्हासा कसं ठेवणार, म्हणून उरूमशी ठेवलंय. म्हणजे हे सगळं मला कालच कळलं."

"ओके. पण उरूमशीचं काय?"

"अरे काल तिचा मूड नव्हता भेंजो. खूप भुंकत होती. दात दाखवत होती. मग हिराॅईन घाबरली. काम करणार नाही म्हणाली."

"आणि मग निकिताला संधी मिळाली!"

"नाही रे. उरूमशीसाठी स्टंट डबल आणायचं ठरलं. मग मला ज्यां पाॅलनी फोन केला."

"म्हणजे पॅराबोला उरूमशीचा स्टंट डबल झाला? भले!"

"हो. पण क्रेडिट्समधे उल्लेख असणार आहे, त्याला गुडी बॅग मिळाली, आणि, आणि..."

"गोलमालमधल्या बिंदिया गोस्वामीसारखा लाजतोयस काय भेंजो! आणि काय?"

"उरूमशीच्या मालकिणीशी निकिताचं बोलणं झालं. उरूमशीसुद्धा घरचीच होईल कदाचित."

Node read time
2 minutes

'न'वी बाजू Fri, 29/05/2026 - 23:33

काय मालक, आज बऱ्याच दिवसांनी? (आणि, भरपाई म्हणून एकदम तीनतीन?)

'न'वी बाजू Fri, 29/05/2026 - 23:33

"उरूमशीच्या मालकिणीशी निकिताचं बोलणं झालं. उरूमशीसुद्धा घरचीच होईल कदाचित."

म्हणजे? समजले नाही. मह्याचे आता (निकिताबरोबरच) उरूमशीच्या मालकिणीबरोबर(सुद्धा)?

(Ménage à trois?)