२०२६ दिवाळी अंकावरच्या प्रतिक्रिया
२०२६च्या दिवाळी अंकावरच्या प्रतिक्रियांसाठी हा धागा काढला आहे.
अंकातले सगळे धागे इथे बघता येतील.
होऊन जाऊ दे!
+१
>>की तुम्ही हिंदूंविषयी बोलता व त्यात मुस्लिमांचा उल्लेख नसतो, याचा अर्थ तुम्ही हिंदूद्रोही आणि मुस्लिमांचा अनुनय करणारे स्यूडो-सेक्युलर आहात. यात एक सुंदर बिनडोकपणा आहे, हे उघडच आहे. तरीही अशा कुतर्कवाद्यांसाठी येथे हे नमूद करून ठेवायला हवे, की –
विशेषत: या वाक्यातील सुंदर बिनडोकपणा हा शब्दप्रयोग फारच आवडला.
रवी आमले यांचा लेख आवडला.
वस्तुनिष्ठ आकडेवारी दिली हे फार आवडले. भाजपा आणि संघ दोन वेगळे आहेत की नाहीत हे आकडेवारी दाखवून समजणार नाही. संघ सामाजिक संघटना आहे भाजपा राजकीय पक्ष.
दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सामाजिक आणि राजकीय! हे व्यवस्थित समजून घेतले पाहिजे.
निवडणुकीत जनता भाजपाच्या नेत्यांची निवड करते मतदान करून ही राजकीय व्यवस्था झाली. जनता संघाचे नेते पदाधिकारी सरसंघचालक वगैरे जनता निवडते का? नाही. संघाचे जे कोणी असतील ते निवड करतात. जनतेवर सक्ती केली जाते का संघाचे स्वयंसेवक व्हावे म्हणून? जनतेचा चॉईस आहे भाजपा आणि जनतेकडे ऑप्शन आहे संघ!
सध्या सुगीचा काळ सुरू आहे त्यामुळे राजकीय फायद्यासाठी अठरा छत्तीस ताग्यातील पांढरा शर्ट, खाकी पॅंट, काळी टोपी घालून बरीचशी मंडळी फोटोशूट रील्सशूट वगैरे करतात.
जरी सुरवातीच्या काळात बरीच वर्षे संघाचे सदस्य असलेल्या मंडळींनी बरेचदा संघातून बाहेर पडून कायमचा राम राम ठोकला आहे. टिका टिप्पणी केली शिव्याशाप दिल्या आहेत संघाला! म्हणजे संघ ठोकून ठोकून सगळ्यांचेच मेंदू घडवत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना फक्त आणि फक्त हिंदू संघटन करणे हेच होते. कारण काय तर त्याकाळी हिंदू मुस्लिमांसारखा धर्माच्या नावावर हुकूमी एकजूट करत नव्हता आजही करत नाही भविष्यात पण करणार नाही!
मुस्लिम लीगला जसा मुस्लिमांचा राजकीय पाठिंबा मिळाला होता तसा हिंदू महासभेला मिळाला नाही. संघ तर हिंदू महासभा स्थापन झाल्यानंतर खूप वर्षांनी अस्तित्वात आला. मुस्लीम समाज राजकीयदृष्ट्या प्रगल्भ होता आहे आणि कायमस्वरूपी असणार आहे. तसा हिंदू समाज नाही हे ऐतिहासिक सत्य आहे. संघाचे समाजकारण इथे सुरू झाले. सर्वात आधी हिंदू म्हणून समाज संघटन करून घेतले तर हिंदू राष्ट्र म्हणून आपण पुढे जाऊ. आज शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत सगळेच हिंदू संघाचे समर्थक आहेत का? नाहीत! का नाही? कारण हिंदू धर्माला प्रमाण मानत नाही. त्यामुळे संघाला अभिप्रेत हिंदू राष्ट्र सहजासहजी होणार नाही.
मात्र सलगपणे तीन वेळा सत्तेत आल्यानंतर हिंदुत्ववादी राजकीय विचार म्हणून प्रभावी झाला हे मान्य केले पाहिजे का?
हा चर्चेचा मुद्दा आहे. भाजपाला राजकीय प्रभावशाली करण्यामागे संघाचे जेवढे योगदान आहे त्यापेक्षा जास्त योगदान इतर पक्षांचे सामाजिक संघटनांचे पण आहे. ढोंगीपणा आणि वैचारिक हाराकिरी ही सर्वात महत्त्वाची बाब! भारतीय राजकारणात सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जो सत्ताधारी परत परत सत्तेत टिकून राहतो आणि सत्ता टिकवून ठेवतो तोच प्रभावी असतो. कधीकाळी ही किमया कॉंग्रेसच्या नेत्यांनी केली होती आता भाजपाने केलेली आहे.
कॉंग्रेस सत्तेत असतानाच सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपा मजबूत झाला हे सर्वश्रुत आहे म्हणजे कॉंग्रेस नसेल तर सर्वात प्रभावी सत्ताधारी म्हणून जनतेने भाजपला निवडले होते नव्वदीनंतर. मात्र भाजपला तेव्हा सत्ता टिकवून ठेवता आली नाही ती संधी मिळाली मोदी शहांच्या भाजपाला गेल्या पंधरा वर्षांत!
“… दुसरीकडे भारतातून फुटून स्वतंत्र होऊ इच्छिणाऱ्या त्रावणकोर (केरळ) संस्थानला सावरकर आशीर्वाद देत होते, हे अखंड हिंदुस्थानच्या कोणत्या तत्त्वात बसते असा प्रश्नही विचारला जात नाही….”
या लेखातून सावरकरांचा उल्लेख आणि संदर्भ दिला आहे. त्याबद्दल थोडक्यात…
सावरकरांनी हिंदुत्व हा राजकीय विचार मांडला होता. त्याकाळी सावरकरांनी हिंदू महासभेची राजकीय बाजू मांडली होती. तत्कालीन जनतेने सावरकरांना किंवा हिंदू महासभेला झिडकारले होते आणि कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. असा पाठिंबा मुस्लिम लोकांनी कॉंग्रेसला दिला नाही मुस्लिम लीगला दिला होता हे कायमस्वरूपी लक्षात ठेवावे. त्यानंतर जुनागड भोपाळ आणि हैदराबादमध्ये असलेले नवाब निझाम यांना काउंटर करण्यासाठी सावरकरांना शस्त्रसज्ज हिंदू संस्थाने हवी होती. त्यासाठी सावरकरांनी १९४७ सालचे पत्रव्यवहार केले होते. त्यामागे असलेले धागे दोरे वेगळे होते. तशी राजकीय सामाजिक परिस्थिती निर्माण झाली होती. असो यावर वेगळा धागा काढावा लागेल चर्चेसाठी!
पण एक गोष्ट नक्की आहे की, सावरकरांच्या पाठीशी ना राजकीय कॅनव्हास होता ना धार्मिक एकजूट. राजकीय कॅनव्हास मिळाला कॉंग्रेसला तर धार्मिक एकजूट मिळाली मुस्लिम लीगला! बट्ट्याबोळ झाला तो इथेच!
असो!
लेखनविश्रांती!
©️भूषण वर्धेकर
२ नोव्हेंबर २०२६
.
आमलेंचा लेख आवडला. त्यांना जे काही नवीन मांडायचे आहे ते त्यांनी शेवटच्या दोन परिच्छेदांत, आणि खास करून शेवटच्या वाक्यात, मांडले आहे. कुजबूज आघाडी कशी चालते हे इतरत्र वाचून ऐकून साधारण माहीत होते. पण या लेखाच्या निमित्ताने रुची पाठकबद्दल थोडा शोध घेतला. मी ते वक्तव्य ऐकले होते. ती भाजयुमोची प्रमुख होती हे मात्र माहीत नव्हते. तिच्या आत्मविश्वासामागे आमलेंनी वर्णन केलेल्या कुजबूज आघाडीच्या कार्यपद्धतीचाही वाटा असू शकतो. त्या मुलीने आता सोशल माध्यमांपासून संन्यास घेतल्यासारखे दिसते. या सगळ्याबद्दल तिची आज भूमिका काय आहे? ती अपप्रचाराची बळी ठरली होती हे तिला समजले का? समजले असेल तर तिला व्यासपीठ देऊन बोलते केले पाहिजे. जसं "अमेरिका क्या कहता था?" या मुलाच्या बाबतीत झालं. काही महिन्यांपूर्वी त्याची मुलाखत पाहिली होती. आता त्याचे विचार पूर्ण वेगळे आहेत. बाकी "सुंदर बिनडोकपणा" करणाऱ्या "धूर्तांबरोबर" वाद घालण्यात अर्थ नसतो.
कुबेर सरांबरोबरची चर्चाही चांगली आहे. आताच्या परिस्थितीला काही प्रमाणात डाव्या वर्तुळातील "इंटेलेक्च्युअल टेररिझम" कारणीभूत आहे, या त्यांच्या म्हणण्यात तथ्य असावे असे वाटते. मात्र एका ठिकाणी त्यांनी समाजवादी, साम्यवादी आणि कम्युनिस्ट विचारधारांना एकाच गटात टाकल्यासारखे वाटले. शुद्ध साम्यवादाचे मॉडेल आजच्या जगात फारसे प्रभावी राहिलेले दिसत नाही. आणि थोड्याफार फरकाने पाहिले तर आजच्या घडीला कुठलीही राजकीय वा आर्थिक व्यवस्था १००% कॅपिटलिस्ट, १००% कम्युनिस्ट किंवा १००% सोशलिस्ट नाही. प्रत्येक व्यवस्थेमध्ये या तिन्ही प्रवाहांचे काही ना काही घटक आढळतात. अगदी विकसित देशांमध्येही बाजारव्यवस्था, सरकारी हस्तक्षेप आणि सामाजिक कल्याण या तिन्ही गोष्टी एकत्र नांदताना दिसतात. फरक इतकाच की काही देश तुलनेने अधिक कॅपिटलिस्ट असतात, तर काही अधिक सोशलिस्ट.
रुपयांवरचा लेख...
...आढावा म्हणून एकंदरीत चांगला आहे. फक्त एकच त्रुटी जाणवली (परंतु ती तितकीही गंभीर नाही).
म्हणजे, कंपनी सरकारच्या तथा त्यानंतरच्या ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयासोबतच एकसमयावच्छेदेकरून चलनात असलेल्या विविध (मोठ्या) संस्थानांच्या (अर्थात ब्रिटिशांनी चालू दिलेल्या) चलनांचाही जर ज़िक्र आहे (आणि, ते योग्यच आहे), तर त्यासोबत समकालीन (आणि समतुल्य) Portuguese Indian Rupia (तथा कदाचित नंतरच्या काळात Portuguese Indian Escudo?), झालेच तर French Indian Roupie यांचाही जर ज़िक्र होता, तर (१) तो औट-ऑफ-सिलॅबस न ठरता, तथा, (२) अधिक बहार येती.
(Portuguese Indian Escudoला प्रश्नांकित अशासाठी केले, की कदाचित त्याला ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाच्या समकालीन किंवा समतुल्य मानता येईल की नाही, याबाबत साशंक आहे, म्हणून. दोन कारणांसाठी. एक तर, ब्रिटिशांची राजवट हिंदुस्थानातून जातेवेळी Portuguese Indian Rupia हे पोर्तुगीज हिंदुस्थानातील चलन होते, तथा ते ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाच्या समतुल्य होते. त्यामुळे, त्यास ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाचे समकालीन तथा समतुल्य चलन मानता येईल. त्यानंतरही बरीच वर्षे ते पोर्तुगीज हिंदुस्थानातील चलन म्हणून चालू राहिले. मात्र, १९५०च्या दशकाच्या मध्याकडे कधीतरी (नक्की साल पाहावे लागेल, परंतु बहुधा १९५४-५५च्या सुमारास असावे. (चूभूद्याघ्या.)) ते बाद करून त्याऐवजी (मुख्यभूमी पोर्तुगालच्या चलनाशी मिळतेजुळते असे) Portuguese Indian Escudo हे चलन जारी करण्यात आले. (कदाचित, पोर्तुगीज हिंदुस्थानास स्वातंत्र्य देऊन त्याचे स्वतंत्र भारतात विलीनीकरण करण्याकरिता येणार्या भारत सरकारच्या दबावाच्या पार्श्वभूमीवर, 'Estado da India ही आमची वसाहत नसून, सातां समुद्रांपारची आमचीच भूमी आहे, यानी कि पोर्तुगालचे अटूट अंग आहे', असा कांगावा करता यावा, याकरिता ही चाल होती.) हे चलन (१९५४-५५च्या सुमारास म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या बर्याच नंतर जारी केलेले असल्यामुळे) ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाचे समकालीन तर अर्थातच म्हणता येणार नाही, परंतु, ते ब्रिटिश हिंदुस्थानी (वसाहती) रुपयाच्या (किंवा भारतीय रुपयाच्यासुद्धा) समतुल्यदेखील नव्हते. ते मुख्यभूमी पोर्तुगालच्या Portuguese Escudo या चलनाच्या समतुल्य होते. त्या वेळेस Portuguese Escudoचा भारताच्या रुपयाबरोबरचा विनिमय दर एका भारतीय रुपयास सहा एस्क्यूडो इतका होता, तर Portuguese Indian Rupia हा भारतीय रुपयाच्या समतुल्य होता. त्यामुळे, नवे चलन लागू करताना ते एका जुन्या Portuguese Indian Rupiaला सहा Portuguese Indian Escudos या दराने लागू करण्यात आले; इतकेच नव्हे, तर, चमत्कारिक गोष्ट म्हणजे, पूर्वी पोर्तुगीज हिंदुस्थानी वसाहतींत एक (पो. हिं.) रुपया, पाच रुपये, अशा प्रकारची मूल्ये असलेल्या चलनी नोटा असत, त्याऐवजी सहा एस्क्यूडोस, तीस एस्क्यूडोस, अशा प्रकारची (आडनिडी) मूल्ये असलेल्या चलनी नोटा जारी केल्या गेल्या. तर ते एक असो.)
का होतो चे उत्तर
असा टप्याटप्याने का प्रकाशित केला जातो
याचे कारण माझ्या मते असे असावे की एकेक लेख हा फार सघन,सखोल,प्रबंधसम असतो. ऐसी चे संपादक हे जाणून आहेत की एकदम विश्वरूप दर्शन सामान्य वाचक पचवू शकत नाही. त्यासाठी हा दिवाळ सणाचा हेवी बौद्धिक फराळ हा चमचा चमचा ने संपादक माऊली कडून भरवला जातो.
... कारण
पहिल्या वर्षी अख्खा अंक एकदम प्रकाशित केला. अनुभवांतून शिक्षण होतं, त्याचं हेही एक उदाहरण.
वाचकांची सोय होत असेल, हे एक गृहीतक. एका दिवशी ३०-३५ लेख लोक वाचत नसावेत. मी तरी वाचत नाही.
मुख्य कारण - मला एका दिवशी एवढं सगळं काम झेपणारं नाही. अंकासाठी लेखन मागवणं, आलेल्या लेखनाचं संपादन, मुद्रितशोधन वगैरे काम निराळं असतं आणि ते करायला बऱ्याच लोकांची मदत होते. प्रकाशन ही एकमेव काम फक्त मी एकटी करते. त्यासाठी लेख 'लावण्या'चं काम करायलाही वेळ लागतो; तरीही माझ्या हातून चुका राहतात, ते इतर लोक (मुख्यतः चिंतातुर जंतू) सुधारतात. स्वतःची सोय म्हणून हा मार्ग निवडला.
अंक एकदम प्रकाशित करणं ही छापील प्रकाशनांची मर्यादा आहे, असंही म्हणता येतं. काळानुसार, आणि तंत्रज्ञानानुसार आपणही बदलावं.
लक्षद्वीप
गोष्ट आणि एकूणच तिचे भारतीय रूपांतर आवडले. केबलिंग कामाचे तपशील, कामगारांचे जीवन, कोकण वगैरे सगळे बारकावे आवडले.
("खोसला का घोसला" आणि "जो जिता वही सिकंदर" हे चित्रपट परकीय चित्रपटांवर आधारित असूनही सांगितल्याशिवाय तसे वाटत नाहीत, तसेच इथेही वाटले नाही.)
मूळ कथा वाचलेली असूनही ही गोष्ट वाचताना डीटेलिंग मुळे वाचनात रस टिकून राहिला
राशीभविष्य विशेष आवडलंय
ग्रह स्वामी योग दशा महादशा वगैरे वर विशेष भर देऊन अभ्यासोनी प्रकटले आहेत लेखक महोदय! लै आवडलय!
हे राशिभविष्य वाचून उगीउगी रेशीमबागप्रेमी अंकीललोग दुखावण्याची जास्त शक्यता आहे लेखकानु!
बाकीचे लेख पण वाचनीय आहेत राजकीय शिक्षण वैचारिक हिंदुत्व वगैरे मांडलेले मुद्दे चर्चा करण्यासाठी उत्तम आहेत!
ताजा कलम: सक्काळी सक्काळी असं बौद्धिक खुराक म्हणजे दिवसभरात मेंदूत प्रतिक्रियाप्रसुती कळा वेदना यांना डांबून ठेवणं अवघड होत चाल्लंय गेले आठवडाभर!
वेळ मिळाल्यास आवडलेल्या आणि न आवडणाऱ्या मुद्द्यांवर अस्मादिकगुरूस्वामीद्वितत्वराशी लिहू म्हणतोय!
जाता जाता उगाचंच:
सगळ्या राशींमध्ये मग ती ब्बाई असो वा बाब्ब्या - संधी न मिळाल्याने आम्ही चारित्र्यवान आहोत अशी मर्दुमकी मिरवतात.
(न झेपलेला) बाहेरख्याली पणा ही असंस्कृत असंसदीय अनैतिक अनैसर्गिक प्रवृत्ती आहे म्हणून कांगावाखोर लोकांच्या राशीला कधीच जाऊ नये!
.
सुलक्षणा महाजन यांचा "डावे अर्थकारण, उजवे लाभार्थी" हा लेख चांगला आहे. शहराचे होत चाललेले बकालीकरण, खास करून मुंबई-ठाण्यात राहणाऱ्यांना, ओळखीचे वाटेल. पुनर्विकासाच्या नावाखाली खेटून खेटून उंच उंच इमारतींचे बांधकाम सध्या दक्षिण मुंबईपासून ठाण्यापर्यंत पाहायला मिळते. अलीकडेच एक बातमी वाचली की ठाणे महापालिकेने अतिरिक्त पाणी उपलब्ध होईपर्यंत नव्या इमारतींना पाणीपुरवठा न करण्याची भूमिका घेतली आहे. खाजगी वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. उपनगरातील एखाद्या भागातून शहराबाहेर नेणाऱ्या हमरस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठीसुद्धा आजकाल वाहतूक कोंडीतून जावे लागते. आमच्या लहानपणी जिथे स्टेशनबाहेर टॅक्सी उभ्या असायच्या, तिथे आज कुठलेही वाहन उभे राहू शकत नाही. त्यावर पर्याय म्हणून बाईक टॅक्सी वापरली जात आहे. जिथे आम्ही खेळू शकत होतो, तिथे आता बाईक आणि स्कूटरने जागा व्यापली आहे.
हा लेख वाचताना केळकर आणि अजय शाह यांच्या पुस्तकाचीच आठवण येत होती आणि लेखिकेने त्याचाच दाखला दिला आहे. ते पुस्तक खूप छान आहे. सक्रिय राजकारणात जाणाऱ्यांनी, तसेच धोरण विश्लेषण आणि धोरणनिर्मितीशी संबंधित लोकांनी ते जरूर वाचावे. ते खूपच मार्गदर्शक आहे. सामान्य माणूस इतका सखोल विचार करत नाही; तो अधिक भावनाप्रधान असतो.
दिवाळी अंकात उजवे सिनेमे, शिक्षण, कला यांवर लेख दिसले. एक लेख एच-पॉपवरही यायला पाहिजे होता. हिंदुत्ववादी पॉप संगीत ही एक मोठी इंडस्ट्री आहे. भडक आणि अनेकदा अक्षरशः शिवराळ (बीभत्स) भाषा वापरून केलेली ही गाणी उत्तर प्रदेशात, आणि मुंबईतसुद्धा, मोठ्या प्रमाणावर ऐकू येतात. या प्रवाहाला राजकीय आणि सामाजिक पाठबळही मिळत असल्याचे दिसते. अशा संगीतनिर्मात्यांच्या मुलाखती आणि या इंडस्ट्रीची माहिती "एच-पॉप" या पुस्तकात कुणाल पुरोहित यांनी मांडली आहे.
हा धागा (सवांतर)
दिवाळी अंकातील तमाम लेखांवरील प्रतिक्रियांकरिता प्रस्तुत धागा काढण्यात आलेला आहे. आणि, त्या अनुषंगाने, अंकातील कोठल्याही लेखावरील प्रतिक्रिया या थेट त्या लेखावर न देता या धाग्यावर दिल्या जाव्यात, अशी अपेक्षा आहे. (मला वाटते, याचा ज़िक्र इतरत्र कोठेतरी अगोदरच करण्यात आलेला आहे.)
ते ठीकच आहे. परंतु, त्या अनुषंगाने, धाग्यावर थेट प्रतिक्रिया देता येण्याची सुविधा अकार्यक्षम करताना, केवळ प्रतिक्रियेचा मुख्य मजकूर देता येण्याची सुविधा अकार्यक्षम करण्यात आलेली आहे. मात्र, प्रतिक्रियेचे शीर्षक देता येण्याची सुविधा अद्याप कार्यरत आहे.
यामुळे होते काय, की, थेट धाग्यावर प्रतिक्रिया देणे अपेक्षित नाही, हा इतरत्र केलेला ज़िक्र सगळ्यांनी वाचलेला असेलच, असे नाही. आता, आमच्यासारखा एखादा शहाणा असेल, तर तो (भले तो ज़िक्र वाचलेला असो वा नसो, परंतु) धाग्यावरील अर्धवट मोडकी प्रतिक्रियाव्यवस्था पाहून थेट धाग्यावर पचकता होणार नाही. मात्र, तो ज़िक्र न वाचलेल्यांपैकी अनेक महाभाग, अर्धवट मोडकी प्रतिक्रियाव्यवस्था पाहून, येथे थेट प्रतिसाद देणे कदाचित अपेक्षित नसावे, हा प्रकाश डोक्यात न पडल्यामुळे, ‘अर्धवट मोडकी तर अर्धवट मोडकी, प्रतिसादव्यवस्था तर दिसते आहे ना, मग भरून पाहू दिसेल त्या खिडकीत शक्य तेवढा मजकूर, नि पाहू या काय होते ते!’, असे म्हणत, शीर्षकाच्या खिडकीत शक्य तेवढा प्रतिसादाचा मजकूर कोंबून तो जागच्या जागी प्रकाशित करण्याचा दीडशहाणा जुगाडूपणा करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे दिसते.
परंतु, अर्थात, Indians will be Indians१, त्यामुळे, चालायचेच; दोष त्यांना देता येणार नाही. अंकातील धाग्यांवरील प्रतिक्रियाव्यवस्था व्यवस्थित नि संपूर्णपणे बंद कशी करता येईल, या दृष्टीने (अधिक नुकसान होण्यापूर्वी) व्यवस्थापनानेच काही प्रयत्न केल्यास उत्तम.
(सांगण्याचे काम मी केले. उर्वरित व्यवस्थापनाचे हाती.)
१ Attention to detail has never been known to be an Indian forte. (Neither, for that matter, has been a proper application of brain.) चालायचेच. (किंवा, चलता है, हिंदुस्तान है।)
दिवाळी अंक - ऋणनिर्देश
इथे असा धागा काढल्याचे लगेच लक्षात आले नाही. त्यामुळे ऋणनिर्देश वाचून तिथे प्रतिक्रिया कशी देता येईना म्हणून धडपडून (No subject) कमेंट save झाली. असो. आता इथे प्रतिसाद देतो. वैयक्तिकही पाठवला आहे. पण धागाकर्त्यानुसार इथेही देऊनच टाकतो प्रतिक्रिया :
ऋणनिर्देश नेहमीप्रमाणे मिश्किल झाला आहे. हलका-फुलका. आवडला. नेहमीप्रमाणे हे थोडे जास्तीच झाले. पण भावना काठोकाठ असल्याने तसेच ठेवतो.
दोन दोष
दिवाळी अंकात मला दिसलेल्या दोन दोषांबद्दल लिहितो.
(१) एक ‘संकल्पना’ ठरवून तिच्या भोवताली लेख गोळा करण्यामुळे फार तोचतोचपणा येतो. उदाहरणार्थ, ‘बहुजन/दलित तरुण पिढी आणि उजवेपणा’, ‘भारतातल्या शिक्षणसंस्था आणि उजवेपणा’, ‘रास्व संघ कसा वाईट्ट आहे’ या तिन्ही थीम्स बऱ्यांच लेखांत आलटून पालटून आल्या आहेत. त्या त्या ठिकाणी आलेल्या मुद्द्यांत तथ्य असेलही, पण सतत तेच ते चालू राहिलं की कुठे काय वाचलं हे लक्षात ठेवणं अवघड जातं, लेखांचं आपापलं जे काही वैशिष्ट्य असेल ते हरवतं आणि एकूणातच कंटाळा यायला लागतो. तुम्ही मिडल ईस्टर्न कॅफेत बसला असाल तर प्ले-लिस्टमधली सगळी लेबानीज प्रेमगीतं थोड्या वेळाने एकमेकांत मिसळून जातात तसं ते होतं.
‘आफ्रिका’ ह्या विषयावर तीन वर्षांपूर्वीच्या दिवाळी अंकात तब्बल तीस-बत्तीस लेख आले होते, तेव्हाही मला असं वाटलं होतंच. नंतर बघू असं तेव्हा म्हणूनही नंतर मी आजतागायत तिकडे बघितलेलं नाही. माझा संशय असा की असं होण्यामुळे लिहिलं गेलेलं वाचलं जायला हवं तितकं जात नाही आणि लोकांचे कष्ट फुकट जातात.
इतरांची अशीच प्रतिक्रिया होते की वेगळी होते याबद्दल जाणून घ्यायला मला अर्थातच आवडेल. पण माझा मुद्दा अगदीच पटत नसेल तर ‘मानवी जीवनातील एकसुरीपणाचे स्रोत’ अशीच संकल्पना पुढच्या दिवाळी अंकासाठी ठेवून त्यावर चौऱ्याण्णव लेख प्रसिद्ध करावेत म्हणजे पटेल.
(२) अनेक ठिकाणी संपादन कमी पडलेलं आहे. कित्येक लेखांतल्या कित्येक जागा अशा आहेत की तिथला मजकूर धूसर, क्लिष्ट किंवा शब्दबंबाळ झालेला आहे. लेखकांकडून ते सुधारून घेण्याची जरुरी होती, आणि काही कारणांनी ते होणार नसेल तर मन घट्ट करून लेख नाकारण्याची गरज होती. पण तसं कुणी केलेलं दिसत नाही. काही मोजकी उदाहरणं देतो:
ताम्हण्यांच्या लेखातली ही वाक्यं पाहा:
> गेल्या सुमारे शे-दीडशे वर्षांत पाश्चात्त्यांनी त्यांच्या आधुनिकतेचं रोपण भारतात केलं, त्यातून भारतीय विचारविश्वात मोठी घुसळण झाली. याच काळात भारतीय उजव्या विचारसरणीचीही वाटचाल समांतरपणे होत असताना, दृश्यकलेचं अख्खं क्षेत्र हे विचारसरणी-निष्ठच असतं हा आपला आणि पाश्चात्त्यांचाही इतिहास मात्र कमीअधिक प्रमाणात सारखाच होता! <
हे काही कळत नाही. आपला आणि पाश्चात्यांचा ‘इतिहास’ कुठल्या अर्थाने सारखा होता? इथे कसलीही उदाहरणं दिलेली नाहीत किंवा अमुक एक क्षेत्र ‘विचारसरणी-निष्ठ’ असणं म्हणजे काय हे सांगितलेलं नाही. ह्या इतिहासांची व्याप्ती काय ते सांगितलेलं नाही. म्हणजे ‘आपला’ इतिहास कुठून सुरू करायचा आणि ‘पाश्चात्यां’चा कुठून सुरू करायचा? जिथे हे प्रवाह एकत्र येतात (उदाहरणार्थ, गांधार-शिल्प) तिथे काय करायचं? हे सगळंच स्पष्टीकरण आम्ही वाचणाऱ्यांनी आमच्या वकूबानुसार जुळवून घ्यायचं का?
याच लेखात पुढे लिहिलं आहे की ‘सातवळेकरांनी १९६६ च्या ललित दिवाळी अंकात पिकासोवर केलेली आगपाखड स्मरणीय आहे’. याचंही कसलं स्पष्टीकरण पुढेमागे दिलेलं नाही. साठ वर्षांपूर्वीच्या एका दिवाळी अंकातल्या लेखाचा नुसता ओझरता उल्लेख केला तर सगळेजण एकमुखाने ‘अय्या, खरंच की!’ म्हणतील अशी लेखकाची अपेक्षा आहे का? असली विधानं म्हणजे नुसती फेकाफेकी वाटते. हे पटत नसेल तर १४ जून १९८३ च्या महाराष्ट्र टाईम्समधली सारस्वत सहकारी बॅँकेची जाहिरात आठवून बघा म्हणजे पटेल. (ही जाहिरात ‘स्मरणीय’ होती, त्यामुळे विस्मरणात गेली असेल तर दोष अर्थात तुमचा आहे.) दृश्यकला आणि तिचा इतिहास याबद्दल ताम्हण्यांना खूप माहिती आहे हे कबूल, पण आमच्यापर्यंत त्यातलं काहीच पोहोचत नसेल तर काय?
गिरीश कुबेरांशी मारलेल्या ‘गप्पा’ ह्या बोलून चालून ‘गप्पा’ असल्यामुळे विस्कळीत असणं साहजिक आहे. पण तरीही गप्पा ऐकणाऱ्या संपादकांनी मध्ये मध्ये बोलून शंका काढायला हरकत नव्हती. उदाहरणार्थ,
> इथेच मला उजवेपणाचं व्यवच्छेदक लक्षण सापडतं – स्वतःच्या प्रत्येक त्रुटीसाठी आणि अपयशासाठी तिसरा कोणीतरी खलनायक शोधणं. <
हे पटत नाही. स्त्रियांसमोरच्या (काही) समस्यांबद्दल पुरुषसत्ताक संस्कृतीला दोष देणं, भारतासमोरच्या (बऱ्याच) समस्यांबद्दल वसाहतवादाला दोष देणं, अवर्णांसमोरच्या (अनेक) समस्यांबद्दल सवर्णांना दोष देणं अशी ‘डावीकडून येणारी’ बरीच उदाहरणं देता येतील. असा दोष देणं सयुक्तिक आहे की नाही, याची चर्चा प्रत्येक उदाहरणाच्या संदर्भात वेगवेगळी करावी लागेल तो भाग वेगळा. पण ‘खलनायक शोधणं’ हे उजव्यांचं व्यवच्छेदक लक्षण वगैरे मुळीच नव्हे. ‘गप्पां’मध्ये अशा जागा बऱ्याच राहिलेल्या आहेत.
आबनाव्यांचा लेख म्हणजे अतोनात घोळ आहे. एक विधान - त्याचे तीन भाग - मग तिसरा भाग दुसऱ्यावर कसा अवलंबून आहे याची क्लिष्ट भाषेत चर्चा, कुठलं तरी लांबच लांब शब्दबंबाळ गृहीतक, मग ते बाबासाहेबांच्या मनात आहे की त्यांच्या संभाव्य वाचकाच्या मनात आहे याची आणखी क्लिष्ट भाषेत चर्चा, यापुढे कुठल्या मुद्द्यांची चर्चा येणार आहे यावर आत्ताच चर्चा, असं ते जंगल वाढत गेलेलं आहे. त्यातून रस्ता काढणं मला शक्य झालं नाही. असं लिहू नका, लिहिणारच असाल तर निदान आमच्याकडे प्रसिद्ध करू नका असं संपादकांपैकी कुणीतरी त्यांना खडसावून सांगायला हवं (होतं).
हे दोष कदाचित एकमेकांना पूरक असावेत. म्हणजे ठरवून ठेवलेल्या ‘संकल्पने’ वर जे लिहून येईल ते कसंही असलं तरी प्रसिद्ध केलंच पाहिजे असं प्रेशर, आणि दिवाळीचं डेडलाईन-प्रेशर यामुळे मग ‘संपादन’ बाजूला राहून लास्ट-मिनिट घुसवाघुसवीच जास्त होत असावी. असा आपला माझा एक तर्क. पण तो अंशत: जरी बरोबर असेल तर हे असं होणं इष्ट नाही. लेखन ही खरोखरीच ‘अक्षर’ वस्तू असते. चांगला लेख पुढे कित्येक वर्षं वाचला जातो. फारच चांगला झाला तर ‘स्मरणीय’ सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे प्रसिद्ध करण्याआधी त्यावर शक्य तितके कष्ट घेतलेले चांगले. तीन वर्षांपूर्वीचे आफ्रिकन लेख फावल्या वेळात सुधारून पुन्हा प्रसिद्ध केले असं कुणी करत नाही. एकदा ती संधी गेली की गेली.
जाता जाता एक टिपणी: एआय वापरून काढलेली चित्रं भिकार आहेत. ती self-parody आहे (म्हणजे आत्मभैकार्याची जाणीव कृबुमनात सतत तेवती ठेवूनच काढलेली आहेत) असं समजतो.
शब्दांकन या शब्दाशी जुनं हाडवैर आहे.
इथेच मला उजवेपणाचं व्यवच्छेदक लक्षण सापडतं – स्वतःच्या प्रत्येक त्रुटीसाठी आणि अपयशासाठी तिसरा कोणीतरी खलनायक शोधणं.
माझ्यासारखं इथे कोणीतरी अडखळला वाचून दिलासा मिळाला.
मी फार lonely फील करत होतो. इथे तर पूर्ण विधानचं विस्कळीत आहे.
माझ्यामते याच कारण शब्दांकन या शब्दात आहे. मी फार पूर्वी अभिनेते अभिनेत्रींची मुलाखत वाचायचो किंवा कुठल्याही मुलाखती जर शब्दांकन शब्द दिसला तर आवर्जून वाचणं टाळाय चो कारण असे की जिथं शब्दशः मुलाखत रेकॉर्ड करून तंतोतंत छापलेली आहे त्यातली raw authenticity फार आवडायची. त्यात भले कितीही ओबडधोबड पणा असो, जे तो बोलला ते मी वाचतो हे समाधान मोठं होत. आता शब्दांकन म्हटलं की दुसरा उतरला मध्ये तो काय घालेल काय काढेल माहित नाही. शब्दांकन करावे लागणे याची अनेक कारणे असतील मजबुरी असतील तर सर्व मान्यच आहे. पण जेव्हा जेव्हा नियम मोडून शब्दांकन वाचलं की खडा लागलाच.
यावेळेस सुद्धा reinforcement का काय म्हणतात ते झालं पुन्हा. आता नियम पाळणार म्हणजे पाळणार.
नक्षलवाद समजून घेताना..
नक्षलवाद समजून घेताना..
लेख आवडला. ग्राऊंड लेव्हलवर काम करणाऱ्यांनी लिहिलेला असल्याने प्रश्नांची व्यवस्थेतील समस्यांची प्रशासकीय जबाबदारी असल्याने मर्यादा आणि अगतिकता या सगळ्या बाबी मनाला भिडतात.
विशेष आवडले ते सिनेमांची यादी आणि पुस्तकनोंदी!
(यातील काही पाहीले/वाचले होते तर काहींची फक्त माहिती होती. नवीन पुस्तकांची आणि प्रादेशिक सिनेमांची माहिती मिळाली. शतशः आभार!)
यातील एक वाक्य फार मार्मिक आहे.. भिडते..,
……नक्षलवाद ही दीर्घ चालणारी लढाई आहे, विचारांचा संघर्ष आहे, आणि माणसे मारून विचारांची लढाई जिंकता येत नाही…..
ही मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगली गोष्ट आहे मात्र समोरची विचारसरणी जर कोणाच्या मक्तेदारी साठी बटीक झाली असेल तर हा आशावाद नक्कीच पोकळ ठरतो. एकीकडे मध्यममार्गी डावे लोकशाहीवादी असतात तर अतिडावे संविधान लोकशाही वगैरे काही मानत नाहीत आणि दोहोंचा फायदा आपल्याला कसा होईल हे जाणून वापर करणारी त्रयस्थ सुप्त समांतर व्यवस्था मक्तेदारी टिकवून ठेवण्यासाठी इंधन पुरवत असते हा मुद्दा नाकारता येणार नाही.
बाकी लेखात सगळ्या अँगलने नक्षलवादी समस्या आणि उपाय यावर केलेला काथ्याकूट आवडला.
जाता जाता…
नुकतीच एक बातमी वाचली
….
केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) सलग १२ महिने (३० ऑक्टोबर २०२५ ते ३० ऑक्टोबर २०२६) एकाही जवानाचा कर्तव्यावर असताना मृत्यू न होता एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
…..
नक्षलवादी हिंसाचार साम दाम दंड भेद करत संपवला आहे असे असल्याने हे घडले असावे.
कमालीचा प्रचारकी अंक झालेला आहे.
ऐसी अक्षरे हे डाव्या चळवळीला वाहून घेतलेलं अधिकृत संस्थळ आहे याची जाणीव आहे आणि त्यात डाव्या विचारधारेचा किंवा (अगदी जगातल्या कुठल्याही ism चा झेंडा फडकावणं) यातही खरोखर काहीही गैर अजिबातच नाही. फक्त त्यामुळे जो एकसुरीपणा,साचेबद्ध प्रचारकी लेखन येतं त्याला सहन कराव लागणं हे सुद्धा क्रमप्राप्तच आहे. एकदा विशिष्ट ism चे व्यासपीठ म्हटल्यावर तक्रारीचा प्रश्नच येत नाही त्याच प्रमाणे अपेक्षाभंगाचा नाही. वर चिपलकट्टी म्हणतात तो दोष नेहमी जाणवतो या वेळेस कळ गेल्याइतपत जाणवला.
विशेषतः आदुबाळ यांचे लेखन सुद्धा जे एरवी निष्कलंक फुलराणी कविते सारखे निष ism असते तेही जेव्हा थीमने काळवंडलेले आढळले तिथे कुठेतरी कळ जाणवली
बाकी असो तर आहेच
काहीसा असहमत/...
कमालीचा प्रचारकी अंक झालेला आहे.
अंकामागील intentबद्दल (त्यात काहीही सहभाग नसल्याकारणाने) व्यक्तिशः माहिती नसल्यामुळे छातीठोकपणे काहीही म्हणू इच्छीत नाही, परंतु, वरील आरोपामागे 'हे लेख लोक actually वाचतात' हे गृहीतक दडलेले नाही काय?
जंगलात समजा जर मोर नाचला, नि तो जर कोणी पाहिलाच नाही, तर मग (तो मोर नाचला काय, नि न नाचला काय, काय फरक, याहीपेक्षा) तो मोर नाचला तरी काय, हा प्रश्न उद्भवतो, नाही काय?
तद्वत, या अंकातले लेख भले (तुमच्या म्हणण्याप्रमाणे) प्रचाराने ओतप्रोत भरलेले असतीलही; परंतु, ते जर कोणी वाचलेच नाहीत, तर मग, प्रचार घडला काय? आणि, पर्यायाने, अंक प्रचारकी झाला काय?
('प्रचार' आणि 'अरण्यरुदित' यांच्यात माझ्या मते फरक आहे. पाहा विचार करून.)
(तरी बरे, (बायदवे फॉर्दॅट्मॅटर) मी स्वतःस बर्यापैकी कट्टर डावा समजतो. असो.)
(अर्थात, सगळ्याच लेखांबद्दल असे नाही म्हणणार मी. थोड्याफार वाचलेल्या लेखांपैकी एकदोन लेख बरे (आणि कदाचित प्रामाणिकसुद्धा) वाटले. (श्री. रवि आमले तथा श्री. हारून शेख यांच्या लेखांचा या निमित्ताने विशेष उल्लेख करावासा वाटतो. पैकी, श्री. हारून शेख यांचा लेख हा विशेषेकरून (भारतीय) मुसलमान समाजाच्या (or, should I say (भारतीय) मुसलमान समाजातील व्यक्तीच्या?) perspectiveमधून मांडलेला असला, तरीही, एकंदरीतच (जगातील कोठल्याही) minorityच्या perspectiveमधून पाहिला असता विशेष भावला. आपणही कोठे ना कोठे कोणाच्या ना कोणाच्या कोठल्या ना कोठल्या दृष्टिकोनातून minority ठरू शकतो, ही जाणीव प्रत्येकानेच जर बाळगली (आणि त्या जाणिवेतून जगाकडे (इतिहासाकडे तथा वर्तमानाकडे) जर पाहिले), तर फार बरे होईल. आणि, there is no such thing as a model minority. ती निव्वळ majorityने minority-minorityमध्ये फूट पाडण्यासाठी उठविलेली भूल असते. झालेच तर, majorityचे लांगूलचालन-चाटुकारिता करून minorityचे प्रश्न कधीच सुटत नाहीत. याचा अर्थ majorityशी सदैव पंगेच घेतले पाहिजेत, असा अर्थातच नव्हे. परंतु, assimilation वगैरे सगळे झूठ असते. एका दीर्घकालीन proud minorityच्या नजरेतून अनुभवाचे प्रामाणिक बोल आहेत हे. (आणि म्हणूनच, उजव्यांच्या DEIला विरोध, झालेच तर, 'इस देश में रहना होगा, तो वंदे मातरम कहना होगा' वगैरें प्रकारांना कडक विरोध आहे, तो यापायीच.) असो.))
बाकी, एकंदर दिवाळी अंक म्हटला, तर संपादनमंडळाच्या ओळखीतले/"पहुँच"मधले काही (इतरांना अनोळखी असे) लोक आहेत, त्यांनी स्वान्तसुखाय काहीतरी खरडले आहे, कोणी वाचले, तर वाचले, नाही वाचले, तर नाही वाचले, की फ़र्क पैंदा, असल्यातला प्रकार आहे सगळा. वाचकाच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाले, तर, a compendium of blog entries, that's all. (अर्थात, ही परंपराजन्य गतानुगतिकता असू शकेलही कदाचित; चूभूद्याघ्या. (अतिअवांतर: 'ऐसी'च्या सुरुवातीच्या काही वर्षांतले दिवाळी अंक, 'उच्च', 'भारी' वगैरे नसतीलही कदाचित, परंतु, वाचनीय तथा मनोरंजक असत, असे आठवते. गेऽले ते दिवस.))
बाकी, श्री. जयदीप चिपलकट्टी यांच्या प्रतिसादाबद्दल काय म्हणावे? खरे तर, त्यास उत्तर देण्याचा इरादा सुरुवातीस होता, परंतु, कशाकशाला उत्तर देणार, या पेचात पडलो. शिवाय, नव्व्याण्णव पूर्णांक नऊ नऊ नऊ प्रतिशत मुद्द्यांबद्दल जेथे सहमती आहे (आणि, शून्य पूर्णांक शून्य शून्य एक प्रतिशत मुद्द्यांविषयी यदाकदाचित मतभेद असलेच, तर ते दुर्लक्षणीय म्हणण्याइतके बिनमहत्त्वाचे आहेत), तेथे, त्यांच्या एक(से)एक मुद्द्यास केवळ माझी(ही) एक(एक) शेपूट जोडणे, याहून अधिक फारसे काहीच साध्य झाले नसते. त्यामुळे, "चोक्कस!" एवढेच लिहून खाली बसतो. (मी तरी अधिक लिहिण्याचे कष्ट कशासाठी घेऊ?)
असो चालायचेच.
हे वाक्य अतिशय मार्मिक आणि सुंदर आहे.
आपणही कोठे ना कोठे कोणाच्या ना कोणाच्या कोठल्या ना कोठल्या दृष्टिकोनातून minority ठरू शकतो, ही जाणीव प्रत्येकानेच जर बाळगली (आणि त्या जाणिवेतून जगाकडे (इतिहासाकडे तथा वर्तमानाकडे) जर पाहिले), तर फार बरे होईल
अत्यंत सहमत आहे या वाक्याशी. यावर बरेच लिहिता येईल यातही मायनॉरिटी तील majority पण त्या मायनॉरिटी बरोबर जे वर्तन करते ते बघण्यासारखे असते ते . सध्याचा पटकन आठवणारा संदर्भ म्हणजे नितीन चंदनशिवे या (बहुधा मातंग समाजातील चुकभूल देणेघेणे) कवीला त्याने उपवर्गीकरणा वरून घेतलेल्या भूमिकेवरून मुख्य प्रवाहातील sc कडून होत असलेला प्रखर विरोध. विशेष म्हणजे अगोदर कांबळे या कवितेसाठी आणि प्रखर भाषणांसाठी इतका कौतुकास पात्र झालेला कवी जेव्हा उपवर्गीकरण संदर्भात भूमिका घेतो त्याबरोबर मायनॉरिटी मधली majority (जी आता त्या छोट्या शोषित वर्तुळातील प्रस्थापित आहे ) एकदम तीव्र विरोध करते. ( उजव्या बाजूने उपवर्गीकरण हे उदार नसून फोडा आणि राज्य करा हे धोरण आहे असे जरी गृहीत धरले तरी) हा बदललेला पवित्रा रोचक आहे.
https://m.youtube.com/watch?v=7kLI5a1nthQ&pp=ygUNa2FtYmxlIGthdml0YQ%3D%…
काही लेखन वाचले आणि प्रतिसाद…
काही लेखन वाचले आणि प्रतिसाद देता येत नाहीत ही तक्रारही केली. पण नंतर कळले की तो सोय बाद केली आहे.
असो.
लक्षद्विप साप आणि अशाच बऱ्याच सीआइडी छाप कथांमध्ये ( तसेच वैज्ञानिक कथांमध्येही काहीतरी मोठी चूक /खोच असते तिकडे दुर्लक्ष करावे लागते.) परंतू परदेशी paperback स्वरूपात मिळणाऱ्या कथा अशाच असतात. रेल्वे प्लॅटफॉर्मवर विकत घ्यायच्या आणि बारा पंधरा तासांच्या प्रवासात वाचत वेळ काढण्यासाठी असतात.
पण भाषांतर रूपांतर नको. जीव जातो. माय फेअरलेडी असो वा द इन्स्पेक्टर जेनरल. कथा घडलेल्या मूळ स्थानाचा ढाचा आराखडा इकडे आणणे कठीण.
मग आपला प्रेमचंद बरा. किंवा अमिताव घोष.
अंकातले लेख आवडले. वाचतो आहे…
अंकातले लेख आवडले.
वाचतो आहे.
सई केसकरांनी अगोदरच सांगितले होते की {साहित्यीक} पाककृती येणार नाही. खरंतर मजा आली असती. अगदी तीन तारी पाक असतो. चकल्याही खमंग. यावर्षी आम्ही 'चोळाफळी' नामक चटपटीत तिखट पदार्थावर ताव मारत आहोत. गुजराती पदार्थ आहे. खाण्यासाठी तयार किंवा नंतर हवे तेवढे तळून खाण्याची पाकिटेही मिळतात. घरी संपूर्णपणे स्वत:ही करता येतो. चकणा म्हणता येईल इतका चांगला.
एआय वापर
सर्वप्रथम: दिवाळी अंकातल्या लेखांवर तिथे प्रतिक्रिया न देता इथे द्याव्या लागण्याचा प्रकार का केला आहे? आणि हा धागा शोधणं/सापडणं अवघड आहे. संपादकीयात किंवा ऋणनिर्देशात ह्या धाग्याचा उल्लेख नाही. ऐसीच्या मुखपृष्ठावर गेलं की आता दिवाळी अंकातले लेख दिसतात, ज्यात हा नाही! नवीन लेखन इथे क्लिक करून ह्या धाग्यावर यावं लागतं. हा सव्यापसव्य का केला आहे?
ऋणनिर्देशात एआय वापरल्याचा उल्लेख आहे, पण माझ्या मते हा तेवढाच ढोबळ उल्लेख पुरेसा नाही.
काहींनी एआयकडून लेख लिहून घेतलं आणि नंतर त्यातले "निश्चितच", "महत्त्वाचं म्हणजे" आणि लांबलचक एम-डॅश शोधून काढून टाकले.
एआयकडून लिहून घेतलेले लेख असतील तर त्याचा लेखात वर (किंवा शीर्षकातही) तसा स्पष्ट उल्लेख हवा, म्हणजे वाचक एआय-स्लॉप लेख सहजपणे टाळू शकतील! प्रत्येक लेखात एआय नक्की कुठल्या प्रकारे वापरलं आहे, म्हणजे मुद्रितशोधनासाठी वापरलं आहे, की हलक्या संपादनासाठी वापरलं आहे की आख्खा लेखच एआयने केला आहे, चित्रं एआयने बनवली आहेत ह्या सगळ्याचा प्रत्येक लेखात स्पष्ट उल्लेख हवा.
लेखांमध्ये वापरलेली एआयजनित चित्रं भिकार आहेत ह्या जयदीप चिपलकट्टींच्या मताशी पूर्ण सहमत आहे. मला अजूनही एखाद्या लेखात असं एआय चित्र टाकल्याने आशयात नक्की कोणती भर पडते हेच कळलेलं नाही आहे. पूर्वीच्या ऐसी दिवाळी अंकांत चित्रकारांनी काढलेली चित्रं पाहिल्याची आठवतात. जर ते ह्यावेळी शक्य झाले नसेल तर ही एआयजनित गुळगुळीत चित्रं त्याऐवजी आवश्यक आणि पुरेशी आहेत असं संपादक मंडळाला वाटतं का? संपादक मंडळाने, विशेषतः इथे दृश्यकलांबद्दल लिहिणारे चिंतातुर जंतू ह्यांनी ह्याबद्दलचे त्यांचे मत मांडावे अशी विनंती करतो.
बाकी लेखांबद्दलच्या प्रतिक्रिया वेगळ्या प्रतिसादात देईन.
खुलासा
माझं नाव असलेलं कोणतंही लेखन एआयनिर्मित नाही. पण शाहू पाटोळेंची मुलाखत झूमवर घेतली होती. त्याची ट्रान्स्क्रिप्ट एआय वापरून देवनागरीमध्ये तयार केली होती. पण ती तशीच्या तशी प्रकाशित करणं निव्वळ अशक्य होतं. त्यात बरेच संदर्भ मला शोधून काढून घालावे लागले. उदाहरणार्थ, मराठवाड्याचे ७० च्या दशकातले राजकारण मला माहिती नव्हते. आणि त्याचे उल्लेख थेट, पार्श्वभूमी न सांगता आले होते. त्यामुळे ती सगळी माहिती शोधून माझ्या शब्दांत तिथे लिहिलेली आहे. शिवाय, नंतर एकदा चिंतातुर जंतू यांनी पाटोळेंशी फोनवर संभाषण करून शेवटच्या काही प्रश्नांमध्ये झालेले गोंधळही निस्तरले. म्हणजे जरी ट्रान्स्क्रिप्ट एआय निर्मित असली तरी प्रत्यक्ष जे ऐकले होते आणि जे समजले होते ते ज्ञान वापरूनच शेवटी लेखन करावे लागले आहे.
Caravan चे भाषांतरही प्रत्यक्ष मासिक हातात घेऊन, मुद्दे काढून केलेले आहे. त्यात एआयचा कुठेही वापर नाही. त्या लेखाचे मुद्रितशोधनही अमुक आणि अदितीने केलेलं आहे आणि त्यातले वरचे चित्रं मासिकाचे मुखपृष्ठ आहे.
हा खुलासा करायचे कारण व्यक्तिगत आहे. माझा स्वतःचा एआय निर्मित लेखनाला विरोध आहे.
एक शक्यता
लेखांमध्ये वापरलेली एआयजनित चित्रं भिकार आहेत ह्या जयदीप चिपलकट्टींच्या मताशी पूर्ण सहमत आहे. मला अजूनही एखाद्या लेखात असं एआय चित्र टाकल्याने आशयात नक्की कोणती भर पडते हेच कळलेलं नाही आहे. पूर्वीच्या ऐसी दिवाळी अंकांत चित्रकारांनी काढलेली चित्रं पाहिल्याची आठवतात.
यूट्यूबवर, एआयने केलेल्या "व्हिडियों"चा कल आजकाल सर्रास आढळतो.
मला वाटते, काहीतरी "नॅरेटिव" (कसेही करून) ढकलायचे तर आहे, परंतु त्याकरिता व्हिडियो बनविण्याची औकात नाही, अशी कंटेंट क्रियेटरे असल्या उचापती करतात. (ते नॅरेटिवही अनेकदा यथायथाच असते, हा पूर्णपणे वेगळा मुद्दा. क्वचित ते बरेसुद्धा असू शकते. परंतु, बॉटमलाइन, कंटेंट क्रियेटराची व्हिडियो बनविण्याची औकात नसते.)
कदाचित इथे असलाच काही प्रकार होत असावा काय?
परंतु, मुळात, लिखित/छापील/टंकित मजकुराला चित्रांची जोड असलीच पाहिजे, हा अट्टाहास समजत नाही. मजकूर जर दमदार असेल, तर सोबत चित्र नसल्याने काऽहीऽहीऽ बिघडत नाही. (हं, सोबतचे चित्रही जर तितकेच चांगले असेल, तर मजकूर खुलू शकतो, हे खरेच. परंतु, आवश्यकता अशी नसते. उलट, भिकार चित्राने भल्याभल्या मजकुराचादेखील विचका होऊ शकतो. शिवाय, फुकटचे distraction पैदा होते, ते वेगळेच.) उलट, मजकूर जर भिकार असेल, तर सोबतचे चित्र चांगले असो वा भिकार असो, मजकुराच्या भिकारपणात काडीमात्र फरक पडत नाही.
मला वाटते, लेखासोबतच्या चित्रांना चेखॉव्हच्या बंदुकीसारखा काही नियम बनवावा काय? म्हणजे, चित्र जर मजकुरास खुलविणार असेल, तरच जोडावे, असे काही?
असो चालायचेच.
.
गरिबांच्या भल्यासाठी म्हणून केलेल्या काही डाव्या धोरणांचा प्रत्यक्षात फायदा उजव्या नफेखोरांच्या खिशात कसा गेला, ते सुलक्षणा महाजन नगरनियोजनाच्या चष्म्यातून दाखवून देतात. दुसरीकडे, आधुनिक भांडवलशाही आली की जातिव्यवस्था आपोआप गळून पडेल, हा आधुनिकतावाद्यांचा भाबडा विश्वास कसा फसला हे नीरज हातेकर स्पष्ट करतात. उजव्या विचारसरणीचं खरं यश केवळ निवडणुका जिंकण्यात नसून दुधात साखर विरघळून जावी त्या प्रकारे स्वतःचा सांस्कृतिक विचार समग्र समाजात विरघळून देण्यात आहे याकडे रवि आमले लक्ष वेधून घेतात. काँग्रेसच्या काळातही लोकशाही संस्थांचं नुकसान झालं होतं हे उर्विश कोठारी स्पष्ट करतात आणि तृणमूल काँग्रेसचं व्यक्तिकेंद्री असणंही दाखवतात; एकंदरीत, निर्ढावलेल्या सिनिकल राजकारणाची बीजं जरी आधीच्या काळात रुजली, तरी ते पीक आता किती फोफावलं आहे हे ते स्पष्ट करतात. गिरीश कुबेर तर पुरोगामी म्हणवणाऱ्या कोंडाळ्यातही जो बौद्धिक दहशतवाद आणि चलाखी बोकाळली होती तिची उदाहरणं देऊन त्यांनाही अस्वस्थ करणारा आरसा दाखवतात.
अंकातले सगळेच लेख अजून वाचलेले नाहीत. हळूहळू वेळ मिळेल तसा वाचेन. संकल्पना म्हटली की काही प्रमाणात तोचतोचपणा येतो, ही टीका मला रास्त वाटली. पण अंक प्रचारकी वाटला नाही. "डाव्या चळवळीला वाहून घेतलेला" तर मुळीच नाही. ते वर दिलेल्या संपादकीयातील उद्धरणावरूनही दिसून येते.
सध्याच्या वातावरणात उजव्यांवर केलेली टीका आवडली नाही म्हणून लगेच "डावे" असा शिक्का मारायचा असेल, तर त्याबद्दल माझी काही हरकत नाही. माझ्या मते, "सध्याच्या भारतातील" उजव्या राजकारणाचा बराचसा भाग उघडपणे किंवा सूचकपणे द्वेषाच्या राजकारणाशी जोडला गेलेला दिसतो. त्याच्या पार्श्वभूमीवर, डाव्या विचारसरणीतील विविध छटा आणि प्रवाह सोयीस्करपणे दुर्लक्षित करून जर स्वतःला नबांसारखे "डावे" म्हणवून घ्यायचे असेल, तर त्यात कमीपणा वाटण्याचे कारण मला दिसत नाही.
बघताय काय सामील व्हा!
सर्व प्रतिक्रियांचं स्वागत. काही प्रतिक्रियांमधल्या विवक्षित भागांना उत्तरं.
१. ए.आय.चा वापर
ए.आय. स्लॉप वाचायचं नसेल तर टू लेट. ऋणनिर्देशातले २-३ परिच्छेद क्लॉडनं लिहिले आहेत. बाकी सर्व लेखक-लेखिकांना श्रेय दिलेलं आहेच.
याशिवाय मुलाखतींचं ट्रान्सक्रिप्ट एआय वापरून काढलं. गिरीश कुबेर आणि उर्विश कोठारी यांच्या मुलाखतींचं सार आधी एआयनं काढलं; नंतर ते माणसांनी वाचून सुधारलं. गिरीश कुबेरांची शैली लोकसत्तामुळे परिचयाची आहेच; पण बोलताना ती फार कमी दिसली. सदर लेख हा लेखी स्वरूपात प्रकाशित होणार होता, म्हणून तो त्यांच्या लेखनाच्या शैलीशी जवळ असणारा ठेवला; बोलण्याची शैली ठेवली नाही. उर्विश कोठारींच्या मुलाखतीचं सार एआयनं काढून दिल्यावर बरेच बदल केले; हिंदीतून मराठी भाषांतर आधी क्लॉडनं केलं, मग ते माणसांनी तपासलं.
मकरंद साठ्यांचं पूर्ण नाटक क्लॉडनं टंकून दिलं. आस्की ते युनिकोड असा टंकातला बदल करायला इतर कुठलंही यंत्र/तंत्र चाललं नाही. क्लॉडनं यावर ढोबळ मुशोच्या चुकाही काढून दिल्या.
शेवटाकडे आलेल्या अनेक लेखांचं मुद्रितशोधन क्लॉडनं केलं. येत्या वर्षी त्यासाठी स्वतंत्र skill लिहून त्याच्या चाचण्या वगैरे करण्याचा बेत आहे. ते सगळं ओपन एआय किंवा open weight मॉडेलांवरही तपासून बघणं वगैरे प्रकार गमतीशीर असेल.
जे काम रटाळ आहे, तेचतेचपणाचं आहे; त्यातून काही नवीन शिकायला मिळणार नाही; आणि ते यंत्राला जमत असेल तर यंत्र वापरायला शिकण्यावर माझा भर असतो.
२. अंकाला डावी वाळवी लागली आणि/किंवा आणखी काही उपविषय हवे होते. माणसांनी काढलेली चित्रं हवीत.
यावर सोपा उपाय आहे. दिवाळी अंकाचं आवाहन प्रकाशनाच्या आणि डेडलायनींच्या किमान काही आठवडे आधी प्रकाशित होतं. तुम्हांला कुठले उपविषय हवे असतील, लेखक हवे असतील तर तसं कळवा. ह्या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी कळवा.
(मी स्वतः डावी आहे, असं मला वाटत नाही. मी उजवी नाही म्हणून डावी, असं म्हणत असाल तर ठीक.)
संपादक मंडळ म्हणजे मर्यादित २-४-६ लोक असण्याची गरज नाही; आणि चार (उप)विषय वा लेखक, तेही डेडलाईनच्या बऱ्याच आधी सुचवले म्हणून त्या सगळ्याची सगळी जबाबदारी आपल्यावरच पडली असं मानायचंही कारण नाही. ज्यांना मुद्रितशोधनात गती नाही, मात्र त्यासाठी एजन्ट किंवा स्किल लिहिण्यात गती आहे, त्यांना तशी मदत करता येईल. ज्यांना चित्रं काढायची आहेत, त्यांनी तशी मदत करावी. 'मला अंकात अमुक-एक-गोष्ट आवडली असती', तर ती अंक येण्याआधी संपादक मंडळापर्यंत पोहोचवली तर त्याबद्दल काही करता येईल.
हे काम समूहानं, टीममध्ये करण्याचं आहे. आपल्याला जी आणि जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याची सोय आहे. आणि ते हवीच आहे. आम्ही (आणि आपण) सगळे लोकशाही मानणारे लोक आहोत; माझंच पिच आणि माझीच बॅट म्हणून माझंच खरं असे प्रकार संपादक मंडळातल्या कुणालाही मान्य नाहीत.
(चित्रांबद्दल मोजकंच - मी माझ्या लेखात मांजरांचे फोटो वापरणार होते; पण चित्रं एवढी आवडली की फोटोच्या भानगडीत पडलेच नाही. एक चित्र माझ्या मूळ अनुभवापेक्षा निराळं असलं तरीही वापरलं.)
३. प्रतिक्रिया बंद करणं आणि प्रतिक्रियांचा धागा सहज न सापडणं
हे मुद्दाम केलेलं आहे. गेल्या काही वर्षांचा अनुभव असा की बाहेरच्या लेखिका/लेखकांना सळो-का-पळो करून सोडणाऱ्या प्रतिक्रिया देण्याची हौस काही सदस्यांना आहे. त्याची उदाहरणं ह्या धाग्यावरही आहेत. ह्या प्रतिक्रियांचा समाचार घेण्यासाठी, किमान ह्या पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी संपादकांपैकी कुणालाही वेळ नसतो. अशा प्रतिक्रिया पाहुण्यांना दिसू नयेत यासाठी प्रतिक्रिया बंद आहेत; आणि हा धागाही दिवाळी अंकाचा भाग ठेवलेला नाही. ज्यांना शोधायचं असेल त्यांना सापडेलच.
ह्या वर्षी पाहुण्यांच्या तक्रारी आलेल्या नाहीत हे पाहता, पुढच्या वर्षीही हेच सुरू ठेवावं, असा विचार मी करत होते. बाकी सगळ्या कामांमध्ये आणखी तेरावा महिना आणायची गरज नाही.
सदस्यांचे इतरही काही आक्षेप आहेत. त्या सगळ्यांबद्दल माझं एवढंच मत आहे -
तुम्हांला हे स्पष्ट दिसतंय की अंकात सुधारणा करता येईल. ते करण्यासाठी मदतीची गरज आहे, हे मलाही दिसतंय. (मी काल रात्री ९:३० तास झोपले आणि आज दुपारी तासभर सुट्टी घेऊन झोप काढेन, इतपत काम आणि जागरण मी गेला आठवडाभर केलं आहे. माझ्या डोक्यावरचं काम कमी झालं तर मला हवंच आहे. मला हौतात्म्याची हौस नाही.)
तेव्हा बघताय काय, सामील व्हा!
ताक - आता अंकाची पीडीएफ हवी, अशीही एखादी प्रतिक्रिया येईल. LibreOffice किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरून अंक सगळा चोप्य-पस्ते करा; मग तो पीडीएफ म्हणून त्यात एक्सपोर्ट करा. हे काम केलंत तर ती पीडीएफ मी ऐसीच्या सर्व्हरवर चढवून ठेवेन. पुन्हा एकदा, बघताय काय सामील व्हा!
चांगली कल्पना! / एक सुचवण
गेल्या काही वर्षांचा अनुभव असा की बाहेरच्या लेखिका/लेखकांना सळो-का-पळो करून सोडणाऱ्या प्रतिक्रिया देण्याची हौस काही सदस्यांना आहे. त्याची उदाहरणं ह्या धाग्यावरही आहेत. ह्या प्रतिक्रियांचा समाचार घेण्यासाठी, किमान ह्या पाहुण्यांची काळजी घेण्यासाठी संपादकांपैकी कुणालाही वेळ नसतो. अशा प्रतिक्रिया पाहुण्यांना दिसू नयेत यासाठी प्रतिक्रिया बंद आहेत; आणि हा धागाही दिवाळी अंकाचा भाग ठेवलेला नाही.
कल्पना चांगली आहे! किंबहुना, ती दिवाळी अंकापुरतीच मर्यादित न ठेवता, संपूर्ण संस्थळालाच लागू का केली जाऊ नये?
म्हणजे, धाग्यांवर प्रतिक्रिया देण्याची सुविधाच नको. सर्वच धाग्यांवर ज्या काही बर्यावाईट, उत्तेजक किंवा सळो की पळो करून सोडणार्या प्रतिक्रिया द्यायच्या, त्यांकरिता एकच वेगळा धागा काढावा, आणि तो धागाही 'ऐसीअक्षरे'चा भाग न ठेवता, अन्यत्र, दुसर्या कोठल्यातरी संस्थळावर ठेवावा. (aisipremi.blogspot.com?)
आफ्टर ऑल, केवळ बाहेरच्याच लेखिकांची/लेखकांची काळजी काय म्हणून घ्यायची? 'ऐसीअक्षरे'वरच्याच लेखिकांनी/लेखकांनी काय घोडे मारले आहे?
ज्यांना शोधायचं असेल त्यांना सापडेलच.
Bingo!
पाहा विचार करून.
आफ्टर ऑल, केवळ बाहेरच्याच…
आफ्टर ऑल, केवळ बाहेरच्याच लेखिकांची/लेखकांची काळजी काय म्हणून घ्यायची? 'ऐसीअक्षरे'वरच्याच लेखिकांनी/लेखकांनी काय घोडे मारले आहे?
"मारलंनीत" असं हवं ना?
बाकी, याची तुलना प्रेस कॉन्फरन्स टाळून टीव्हीवर एकतर्फी भाषण देण्याच्या स्ट्रॅटेजीशी करता येईल का?
;-)
आणखी एक गंमत...
दिवाळी अंकावरील प्रतिक्रिया अकार्यक्षम करण्याच्या भानगडीत, जुन्या दिवाळी अंकांमधील प्रतिक्रियासुद्धा अकार्यक्षम केल्या गेल्या / मिटविल्या गेल्या आहेत.
मराठीत, 'नवरा मेला, तरी चालेल, परंतु सवत रंडकी झाली पाहिजे', अशी एक ग्राम्य म्हण आहे, तिची या निमित्ताने आठवण झाली, इतकेच.
(अर्थात, जुने दिवाळी अंक — आणि, त्या अनुषंगाने, त्यातील प्रतिक्रिया — तसेही कोण वाचतो म्हणा? (चालू अंक वाचायची मारामार; जुने अंक वाचायला बसलेत!) त्यामुळे, की फ़र्क पैंदा? चलता है।)
न बा, बाय द वे, लोकसत्ताने…
न बा, बाय द वे, लोकसत्ताने खूप वर्षांपूर्वीच त्यांच्या कोणत्याही लेखांवर येणाऱ्या कॉमेंट्स बंद करून टाकल्या होत्या हे खूप बोलकं आहे. कारणे काही असोत. जर असंख्य ट्रोल किंवा चुकीच्या भाषेत व्यक्त होणारे खोडसाळ टीकाकार हे सरसकट प्रतिसाद सुविधाच बॅन करण्याचं कारण असेल तर CJP आंदोलनात देखील असे वाट्टेल त्या भाषेत व्यक्त होणारे लोक होतेच की. त्यांच्या भाषेची मात्र "नव्या पिढीची सडेतोड स्पष्ट भाषा" वगैरे भलामण केली गेली. लोकसत्ता आणि इथेही.
सरकारी संस्थळ
या निमित्तानं ऐसी अक्षरे हे सरकारी संस्थळ ठरणं आणि अंकाचा विषय, त्यातलं लेखन ही एक तुलना; सरकारनं घेतलेल्या निर्णयांविरोधात काही म्हणणं असणं आणि दिवाळी अंकातल्या कुठल्या लेखनाबद्दल नापसंती असणं ही एक तुलना; प्रतिक्रिया बंद करण्याबद्दल नाराजी करण्यासाठी प्रतिक्रियांचाच वापर ही एक न-तुलना ... प्रतिक्रिया बंद करण्यातून एवढी करमणूक अपेक्षित नव्हती.
पाहुण्यांची काळजी घेण्याची गरज नाही; वर ही करमणूक! The gift that just keep giving, ehh!
'न'बा, माझी झोप पूर्ण होईल आणि ऑफिसातली कामं कमी होतील तेव्हा जुन्या लेखांमधल्या प्रतिक्रिया परत आणेन.
डावं उजवं उजवं डावं वर्तुळ सुफळ संपूर्ण
डावं उजवं उजवं डावं वर्तुळ सुफळ संपूर्ण
कोणे एकेकाळी डाव्यांनी ठाण मांडून संस्कृती, भारतीयता, सभ्यता, कला, राजकारण आणि शिक्षण व्यवस्था भ्रष्ट केली वगैरे लेख उजवीकडून येत असत. तसे ऐसीचे यंदाचे लेख वाचून वर्तुळ पूर्ण झाले असे वाटते!
इतकी वर्षे डाव्यांच्या अधिपत्याखाली समजा शैक्षणिक व्यवस्था असेल असे जर मानले तर एकूण शिक्षण व्यवस्थेत अशी काय क्रांती झाली होती जी उजव्यांनी ताब्यात घेतली म्हणून संताप व्हावा? उजव्यांनी यंदा नवीन शिक्षण पद्धती आणली जी १९८६ साली कधीकाळी आलेली होती. काळानुसार ती बदलणं अपेक्षित होतं पण उजव्यांना ते जमलं. आयकेएस इंडियन नॉलेज सिस्टिम वर ऐसीच्या एक दोन लेखात आक्षेप घेतला गेला आहे. याबाबतीत काही मुद्दे - भारतीय दर्शन किंवा तत्त्वज्ञान वगैरे शाखा आधीपासूनच अस्तित्वात होत्या फक्त त्या शाळेत पोचल्या नव्हत्या आणि कॉलेजमध्ये ऐच्छिक होत्या. सध्या त्याबद्दल विद्यार्थ्यांना भारतीयांनी वैदिक पुरातन काळी काय काय दिवे लावले होते हे सांगण्यासाठी प्रयत्न केला आहे. यातून काय साध्य होणार ते भविष्यात कळेलच. (कधीकाळी मी शाळेत असताना मूल्यशिक्षण नावाचा वीस मिनिटांचा तास होत असे शाळा सुरू झाली की! दहा मुल्ये लिहून दिली होती आणि रोज एकेकाने छोटी बोधकथा वगैरे वाचायची असा दंडक होता! आता आहे काय माहिती नाही!) राजकारणात सत्ता आली की सगळ्यात आधी आपापल्या सोयीसाठी शैक्षणिक धोरण ठरवून राबवण्यात येते ही राष्ट्रीय समस्या आहे भारतात. कदाचित इकोसिस्टम तयार करायची पहिली पायरी असेल!
फ्रेंच राज्यक्रांतीनंतर डावं उजवं प्रमाण अधिक ठळकपणे अधोरेखित झालं वगैरे संदर्भ वाचायला मिळाले. हे खरं असलं तरी राजकीय सोयीसाठी तेच आपण वापरलं. बरेचदा इथले एतद्देशीय प्रश्न समस्या सोडवण्यासाठी, यशापयश मोजण्यासाठी डावी उजवी फूटपट्टी वापरली आहे. त्यामुळे भारतात काही ठिकाणी डाव्यांचे वर्चस्व निर्माण झाले काही काळापुरते. पण त्याचा प्रसार प्रचार चिरकाल वाढला नाही फक्त मर्यादित प्रमाणात टिकला!
सध्या नवडावे उदयास आले आहेत. दोन हाणा पण डावे म्हणा टाईपचे! यांना वंचित शोषित पिडित वगैरे तटागटात सामील व्हायचे नसते! मगे मध्येच अमेरिकेचे कौतुक करतात लोकशाही कशी तिकडची चांगली आहे वगैरे वर! मध्यममार्गी डावे हुशार प्रगल्भ विवेकी आणि प्रश्न समस्यांची उत्तम जाणीव असणारे असतात पण राजकीय कॅनव्हास मिळत नसतो. मिळाला तरी वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिरजोर वाढतो. नंतर येतात वाजतगाजत अतिडावे! “बिक गयी हय गोरमिंट” पासून सुरवात होते ते डायरेक्ट हिंसा हीच व्यवस्था उलथवण्यासाठी योग्य आहे वगैरे वर स्थिरस्थावर झालेले. हल्लीच ही मंडळी संविधान बचाव लोकशाही बचाव वगैरे कोल्हेकुई करू लागले आहेत!
उजव्यांना भरगच्च असा लोकानुनय मिळाला म्हणजे देश व्यवस्था आणि समाज लयाला गेला वगैरे वर बोलण्यात काहीच हशील नाही. कारण उजवे हे स्वकर्तृत्वाने मजबूत झाले नाहीत. डावे-अतिडावे-पुरोगामी वगैरे लोकांनीच राजकीय चिखल असा केला होता की कमळं उगवण्यासाठी वातावरण निर्माण झालं. हिंदुत्व हा राजकीय विचार आधीपासूनच अस्तित्वात होता मात्र त्याला जनाधार राजाश्रय वगैरे नव्हता बरीच दशके. डाव्यांची वैचारिक हाराकिरी आणि थुकरट राजकीय पुरोगाम्यांची दांभिकता हेच मूळ उजव्यांना पोषक ठरलंय.
बहुजनांचा हिंदुत्वाकडे वाढता आलेख याबाबतीतले निरीक्षणे एक दोन लेखात मांडलेली आहेत. बहुतांश बहुजन उजवीकडे सरकलाय म्हणजे उजवे लैभारी झाले आहेत असा गैरसमज करून घेऊ नये. विषमता ही अनुभवलेले होरपळलेले बरेच लोक हिंदुत्ववाद्यांकडे आकर्षित झाले कारण सर्वसमावेशक समरसता समता वगैरे नवा मुद्दा घेऊन वीररसयुक्त प्रचारक तयार झाले आहेत. कधीकाळची कट्टर हिंदू ही ओळख पुसून जातपातविरहीत हिंदू समाज ही भावना निर्माण करण्यासाठी हा बदल झाला आहे. कदाचित एकेरी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या लोकांचा बहुजनांना तिटकारा आला असावा. अभिजन बहुजन दलित शोषित पिडीत वंचित वनवासी आदिवासी मागास अतिमागास वगैरे समाजाला एकसूत्री एकछत्री बांधून ठेवण्यात उजवे सरसावले आहेत. अशी आयती मिळालेली सुवर्ण संधी उजवे नसलेल्या धुरिणांनी गमावली आहे.
बहुतांश बहुजन उजवीकडे गेले याची कारणमीमांसा गरजेची आहे जी बऱ्याच लेखात मला दिसली नाही. केवळ उजवी मंडळी वस्ताद आहेत आणि हवं ते करू शकतात हा खूपच सोयीस्करपणा वाटतो. वाड्या वस्त्या गाव तालुका जिल्हा पातळीवरील बरेच पुर्वाश्रमीचे राजकीय पुरोगामी भगवे उपरणे घालून मुंडासे बांधून उजवीकडे जाण्यासाठी रांगेत थांबलेले आहेत. काही भ्रष्ट राजकारणी वॉशिंग मशीन मध्ये कधी धुवून टाकतात याची वाट बघत आहेत. अशा वातावरणात जर बहुतांश बहुजन जो यांच्या पाठीशी उभा होता तोच सरळसरळ उजव्यांच्या छायाछत्राखाली आला असावा. दुसरा मुद्दा असा की गेल्या दहा बारा वर्षांत सरकारने योजनांच्या अंमलबजावणीत डायरेक्ट बेनेफिट ट्रांसफर चा वापर करून लाभार्थ्यांना एकरकमी अनुदान दिले आणि खेडोपाड्यात “सरकार म्हणजे भाजपा” हा समज दृढ होत गेला आहे. याचा निवडणुकीत भाजपला फायदा झाला आहे. ज्या काही निवडणुका झाल्या त्यात मागासलेल्या वंचित शोषित पिडीत वगैरे लाभार्थ्यांनी भाजपला मतदान केले आहे हे दिसून येते. सध्या उपवर्गीकरणाबद्दल समाजकारण घुसळून येत आहे. व्यवस्थेती सवर्णांविरोधात लढता लढता प्रस्थापित लाभार्थी मवर्ण तयार झाला. त्यामुळे संधी न मिळाल्याने आम्ही वंचित आहोत असा ठाम विश्वास तयार झाला आहे. उजवे यात पिवळा भगवा विरुद्ध निळा लाल फॅक्टर वर खिंड लढवत आहेत. या उपवर्गीकरण वगैरेंच्या ढिशूमढिशूम मध्ये मागासवर्गीयांमधील सुप्त असलेली जातीयता ही मुख्य प्रवाहात अनेकांना दिसून आली आहे.उपवर्गीकरण लागू होईल न होईल पण उजवे शिरोमणी चमकून जाणार हे नक्की!
अर्थव्यवस्था उदारीकरण डावे उजवे अर्थकारण वगैरे लेख वाचनीय आहेत. बरेच मुद्दे चर्चेसाठी उत्तम आहेत. काही मांडलेली निरीक्षणे नेहमीच्या पठडीतून आलेली वाटतात. उच्चवर्गीय डावे हे कायमस्वरूपी लाभार्थी आहेत कारण इकोसिस्टिमचे पाईक असल्याने त्यांनी दीर्घकालीन सत्ताधीशांशी जुळवून घेऊन आपापले बुरुज बराच काळ ढासळू दिले नाहीत. सर्वाधिक मुळात नव्वदीनंतरचा जागतिकीकरण उदारीकरण खाजगीकरण वगैरेंचा फायदा मध्यमवर्गीय (निम्न, उच्च आणि उच्चभ्रू) लोकांना झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकापर्यंत फायदा पोहोचायला बराच काळ लागला. ऐन पस्तीशीच्या वर्षांत मिड एज क्रायसिसमध्ये जागतिकीरणाचे चटके बसायला लागलेले आहेत. त्यामुळे फक्त उजवेच लाभार्थी आहेत असे निरीक्षण कन्व्हिन्सिंग वाचत नाही. बाकी आर्थिक राजकीय गणिते ही व्यवहारचतुर उद्योजक सांभाळतात कोणत्याही सत्ताधारी लोकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवून आपापले कार्यभाग साधतात. सत्ताधारी बदलतात लाभार्थी तेच राहतात. सध्या तरी ‘विकसित भारत’ रूपी दुभती गाय प्रत्येकाला आपापल्या गोठ्यात पाहीजे. मला कधी दोवून दूध मिळेल यावर सगळी आर्थिक गणिते अवलंबून आहेत. त्यामुळे डावं उजवं करून काहीही उपयोग नाही. पुर्वी जनता कोटीच्या कोटी उड्डाणे ऐकून खूष व्हायची आता हजारो लाखो कोटीच्या कोटी उड्डाणे झाली की खूष होतात. टक्केवारी कमिशनचे धंदे सुरूच राहणार आहेत.
आता हिंदुत्व हा विषय बऱ्याच लेखात डोकावला आहे. पण राजकीय पार्श्वभूमी बद्दल कुणी उहापोह केलेला नाही. राजकीय विचारधारा म्हणून हिंदुत्व भारतात रूजायला खूप दशके जावी लागली. सध्या सत्तेत राजकीय हिंदुत्ववादी आहेत. हिंदू महासभेचे सनातन्यांच्या तावडीत सापडलेल्ले हिंदुत्व, संघाचे हिंदुत्व, सावरकरांनी सांगितलेला हिंदुत्ववादी विचार, वैदिक लोकांचे हिंदुत्व, पंडित दिनदयाल उपाध्याय यांनी सांगितलेला एकात्म मानवतावाद, संघाशी फारकत घेऊन स ह देशपांडे यांनी सामाजिक आर्थिक दृष्ट्या मांडलेला हिंदुत्ववादी विचार आणि अगदी अलिकडच्या काळातील भागवतांनी सर्वसमावेशक समरसता हिंदू समाज संघटन वगैरे वर केलेली मांडणी याबाबतीत जर मुद्दे मांडले गेले असते किंवा चर्चिले गेले असते तर उजव्यांविषयीची बॅंडविथ वाढली असती. उजव्यांना सरधोपट एकाच साच्यात बसवून राजकीय सोय केली जातेय. एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवली पाहिजे की उजवे दीर्घकालीन सत्ता नसताना संघर्ष करत जनमानसावर आपला कमी अधिक प्रभाव टिकवत वाढवत चिकाटीने लढले आणि इथपर्यंत पोहोचले. रूतेन बसले! उजवे नसलेल्या सगळ्यांना आता सुवर्ण संधी आहे. कसलाही राजाश्रय नसताना विचारधारा, कार्यकर्ते, संघटना, नेते यांना टिकून राहण्यासाठी कमालीची मेहनत घ्यावी लागणार आहे. सत्ता असताना जनमानसात प्रचंड प्रभाव निर्माण करता येतो सत्ता हाती नसताना खरी वैचारिक लढाई राजकीय संघर्ष करावा लागतो.
कला साहित्य चित्रपट वगैरे विश्वात उजव्यांना प्रवेश मिळावा यासाठी विशेष काही प्रयत्न करावे लागले नाहीत. बॉलिवूड मध्ये तर जिथे पैसा मिळेल तिथे चित्रपट विषय सोयीनुसार हाताळले जातात. सध्या मस्क्युलिन अग्रेशन वर फोकस आहे शेकडो कोटी रुपयांची उलाढाल करण्यासाठी. दीर्घकाळ सत्ता हाती असताना हा उजव्यांचा चंचुप्रवेश ब्लॉकबस्टर झाल्याशिवाय राहील काय? साहित्य व्यवहार वगैरे आपापले अड्डे राखून असतात. कलाकार हा डावा असेल तर उजव्यांकडून हेटाळला जायचा आजकाल उजवा असेल एखादा कलाकार अभिनेता लेखक वगैरे तर डाव्यांकडून हेटाळला जातो. डाव्यांचा वरचष्मा असताना वैचारिक दारिद्र्य संपले नव्हते ते काय उजवे सरसावले म्हणून लगेचच संपणार आहे काय? मला जे बघायला, वाचायला, ऐकायला आवडेल असेच जर तुम्ही पुरवठा केला तरच तुमची कला श्रेष्ठ वरिष्ठ नाहीतर भिकार आणि ढ दर्जाची हा सुमार विचार आहे उजव्यांचा आणि डाव्यांचाही!
सरतेशेवटी एवढेच नमूद करावेसे वाटते की, उजवे दीर्घकाळ व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी धडपड पडझड करत राहणार आहेत. उजवे नसलेल्या लोकांना संस्थांना विचारांना चिरकाल संघर्ष करावा लागणार आहे.
तूर्तास एवढेच!
लेखनविश्रांती!!!
©️भूषण वर्धेकर
हारुन शेख यांनी लिहिलेल्या लेखाबद्दल
यातील काही मुद्दे संतुलित आहेत. काय करावं काय नाही हे स्पष्टपणे मांडलेले आहे. मात्र खुदा हाफीज म्हणत ते अल्लाह हाफिज म्हणे पर्यंतचा हा भारतीय मुस्लिमांचा बदलता काळ कशामुळे आला यावर अजून जास्त चर्चा झाली पाहिजे. मायनॉरिटी, मेजॉरिटी वगैरे निरीक्षणे चांगली आहेत.
…गेल्या शतकभरात हिंदुत्ववादी विचारसरणीनं साध्य केलेली गोष्ट म्हणजे मुस्लिम हे समान दर्जाचे भारतीय नागरिक नाहीत; त्यांना कनिष्ठ, दुय्यम स्थान आहे…
वरील वाक्याबद्दल माझा एक आक्षेप आहे-
सर्वप्रथम धर्माच्या नावाखाली देशाची फाळणी झाली ती हिंदुत्ववादी संघटनांमुळे झालेली नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या शतकापासून हिंदुत्ववादी विचारसरणी ही अत्यंत कृश होती ती गेल्या पंचवीस तीस वर्षांत सत्तेत आलेली आहे. अलिकडेच अगदी बारा वर्षं स्टॉन्च असे हिंदुत्ववादी सत्तेत ठाण मांडून बसले आहेत. “मुस्लिम समान दर्जाचे नागरिक नाहीत” हे वाक्य हास्यास्पद आहे. पुरोगामी लोकांना हे क धार्मिक शोषण वगैरे वाटेल पण ती एक राजकीय सोय असते. तब्बल साठ वर्षे सो कॉल्ड पुरोगामी सत्तेला चिकटून बसले होते तेव्हा मुस्लिम समाजाची भरभराट झाली होती का? का हिंदुत्ववादी सत्तेत आले आणि मुस्लिम समाजाची अधोगती सुरू झाली? अशी राजकीय पळवाट काढली की हिंदुत्ववादी लोकांना आरोपीच्या पिंजऱ्यात डांबले की पुरोगामी आत्मे सुखावतात.
भारतीय मुस्लिम राजकीय इस्लामच्या कवेत लगेचच येतो. हे ऐतिहासिक सत्य आहे. मुस्लीम लीग ने भारतीय मुस्लिम जनतेचा वापर केला आहे. नंतर सो कॉल्ड सेक्युलर पक्षांनी मुस्लीम फक्त व्होटबॅंकेसाठी वापरले. गेल्या वर्षी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला नाकारत स्थानिक मुस्लिम लोकांनी एम आय एम पक्षाच्या मागे आपली ताकद लावली. महाराष्ट्रात बाकीचे सेक्युलर पक्ष कुठे हरवले होते की तेलंगणाचे एम आय एम चे सेक्युलॅरिझम जवळचे वाटू लागले? थोडक्यात भारतीय मुस्लिम हा व्होटबॅंकेसाठी राखीव बळीचा बकरा बनला आहे. तसा भारतीय मुस्लिम राजकीयदृष्ट्या प्रचंड प्रगल्भ आहे. कोणाला मतदान करायचे नाही हे झुंडीने ठरवलेले असते. हे आजचे सत्य नाही गेल्या ऐंशी नव्वद वर्षांच्या काळात हेच दिसून आले आहे. मग “… त्यांना कनिष्ठ, दुय्यम स्थान आहे… “ असे वाक्य म्हणजे नेमके राजकीय मेलोड्रामाचा कळस आहे. गेल्या बारा वर्षात फक्त आणि फक्त मुस्लिम मते एकगठ्ठा मिळाली की सत्तेत टिकून राहायचे सोपे होते हे मिथक मेलेलं आहे. पुरोगामी पक्षांनी तर फक्त मुस्लिम व्होटबॅंक म्हणून कायमस्वरूपी वापरली. शिक्षण आरोग्य आर्थिक विकास झाला तर आपली आपल्याला मतदान कोण करणार? हा विचार असावा. किंवा नेहरू गांधी यांच्या सारख्या नेत्यांना मुस्लिम समाजमन बदलणे जमले नाही फाळणीच्या आधी तर आपल्याला काय जमणार हा कदाचित न्यूनगंड असावा. जे काही असेल ते असेल हक्काची मतं मिळण्याशी मतलब! अशी जर अवस्था गेल्या कैक दशकांपासून असेल मुस्लिम समाजाची तर हिंदुत्ववादी विचारसरणीला बोल लावून काय उपयोग?
एका गोष्टीचा विचार केला पाहिजे. 1857 चा उठाव झाला तेव्हा त्या काळचा हिंदू-मुस्लिम एकत्र लढत होता. त्या उठावाचा पाडाव केल्यानंतर ब्रिटिश लोकांनी कितीतरी मुस्लिम, विशेषतः राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना, मुल्ला-मौलवींना फासावर लटकवलं होतं उत्तर भारतात. याचे ऐतिहासिक दाखले आजही आहेत, अनेक लोक देतात. मग हा विचार करायचा, 1857 साली एकजुटीने लढणारा हिंदू-मुस्लिम 1947 पर्यंत एवढा का वेगळा झाला? त्याने देशाची फाळणी धर्माच्या आधारावर करण्यासाठी हिंसाचार कशासाठी केला? ही गोष्ट ऐतिहासिक दृष्ट्या जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच विवेकी पद्धतीने चर्चा करण्यासाठीही आहे. ह्या 90 वर्षाच्या कालखंडात असा नेमका काय बदल झाला की भारतीय मुस्लिमांना आपल्या स्वतःचं धर्माचं स्वतंत्र राष्ट्र हवं होतं? त्याची पेरणी ही कोणामुळे झाली? कशी झाली? कशाच्या आधारावर झाली? याचा जर अभ्यास केला तर लक्षात येतं, भारतीय मुस्लिम हा मुळातच अंतःप्रेरणेपेक्षा बाह्य प्रेरणेने स्वतःला वाहून घेतो.
धर्माची प्रेरणा तर लोकशाहीत सामाजिक आंधळेपणा आणते. काहीही गरज नव्हती कोण कुठला तुर्कस्तानमधला कोण तो खलिफा त्याच्यासाठी आपल्या देशात खिलाफत चळवळीला भरभक्कम पाठिंबा मिळत गेला. सुरुवातीच्या काळात हा मुख्य प्रवाहातील लढा ते भारताची फाळणी धर्माच्या नावावर करण्यासाठी मुस्लिम लीगला इथल्याच मुस्लिमांनी भरघोसपणे निवडून देणं या गोष्टी नेहमीच आत्मपरीक्षण करण्यासाठी! आम्हाला आमच्या धर्माधारित देशाचं स्वतंत्र राखीव अस्तित्व पाहिजे, धर्माशी निगडित असलेला देश पाहिजे ही भावना कशासाठी वाढली? का तेव्हा दुय्यम नागरिक म्हणून ब्रिटिश छळ करत होते की कमकुवत हिंदुत्ववादी? विनोदाचा भाग म्हणजे केरळमधील तत्कालीन मुस्लिम लोकांनी मुस्लिम लीगला पाठिंबा दिला आणि कॉंग्रेसचे पानिपत केले! म्हणजे थोडक्यात मुस्लिम समाज धर्माच्या कचाट्यात असा अडकलाय की कोणीही येतो वापरून फेकून जातोय. आधी मुस्लिम लीग, नंतर कॉंग्रेस. कालांतराने प्रादेशिक राजकीय पुरोगामी पक्षांनी पण घासून पुसून वापरले. आता एम आय एम मैदानात हातपाय पसरू लागलाय! आपला समाज ही राजकीय सोय आहे सत्ता मिळवण्यासाठी ही जाणीव होऊनही जर “… समान दर्जाचे भारतीय नागरिक नाहीत” ही भावना प्रबळ होत असेल तर याला जबाबदार कोण? गेल्या बारा वर्षात हिंदुत्ववादी पक्षांनी सरळसरळ एकरकमी हिंदू समाजाची एकजूट मतदार म्हणून करून दाखवली. आता सत्ता मिळवण्यासाठी मुस्लिम मते गरजेची आहेत ही राजकीय गरज संपलेली आहे. याची जाणीव कधी होणार?
याच लेखातून शर्जील इमाम आणि उमर खालीद यांचा उल्लेख आहे. मुस्लीम आहेत म्हणून तुरूंगात डांबून ठेवण्यात आलं हा युक्तिवाद सपक आहे. शर्जील इमाम चिकन नेक तोडण्यासाठी लाखो मुस्लीम एकत्र येण्याची गरज आहे वगैरे भाषणं ठोकतो हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसत असेल तर सरकार पण कायद्याच्या नावावर खच्चीकरण करणार! उमर खालीद कधीकाळी अतिरेकी अफजल गुरुची फाशी कशी कायदेशीर नाही वगैरे सांगत होता, जम्मू काश्मिर मधले अतिरेक्यांना मिलिटंट म्हणून स्वातंत्र्य योद्धे म्हणून सॉफ्ट कॉर्नर देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणाच्या आशीर्वादाने चालत होता? आणि सर्वात महत्वाचे हे कोणत्या संविधानाच्या चौकटीत बसतं? बुरहान वाणी असो वा अफजल गुरू असो यांना सहानुभूती कशासाठी? फक्त ते मुस्लिम आहेत म्हणून का? दिल्लीत झालेल्या दंगलीत उमर खालिद च्या विरोधात पुरावे आहेत म्हणून आरोपी म्हणून ताब्यात घेतलं आहे ना? अशा केसेस मध्ये सरकार हे कायम समोरच्याचे खच्चीकरण करण्यासाठी कायद्याचा वापर करतात. जेणेकरून कायद्याची भीती बसेल आणि पुन्हा कोणीही धजावणार नाही अशा मर्कटलीला करण्यासाठी! (जसं सर तय से जुदा होतं तेव्हा कसं एक धर्माचा धाक तयार होतो अगदी तसंच समजा हवं तर!) मुंबई बॉम्बस्फोटमधील कायदेशी प्रक्रिया पूर्ण होऊन शिक्षा झालेल्या सी ए उच्चशिक्षित असलेल्या याकूब मेनन च्या अंत्ययात्रेत लाखो मुस्लिम कशासाठी जमला होता? याची प्रेरणा येते कुठून? मग असे कैक डोळ्यांनी दिसेल असे धडाधड प्रसंग जर लोकांपर्यंत पोचले तर ध्रुवीकरण होईल तर काय होईल? सरतेशेवटी फक्त मुस्लिम आहोत म्हणून गुन्हेगार ठरवले गेले ही सरळसरळ राजकीय पुचाट पळवाट आहे. धार्मिक फिल्टर समोर करून नेमके काय साधायचं?
सत्ताधारी हे धुतल्या तांदळासारखं कधीच वागत नाहीत. आम्ही जे केलं ते सुरक्षेसाठी आवश्यक होतं हे कन्व्हीन्सिंगली पटवून देतात. सीएए एनआरसी वगैरे भारतीय मुस्लिम लोकांसाठी नव्हतेच. परकीय देशातून आलेल्या घुसखोरांना हाकलण्यासाठी केलेली संविधानिक तरतूद होती. भारतातील मुस्लिम लोकसंख्येला हाकलून लावण्यासाठी सी ए ए एन आर सी आणले होते का? मग आंदोलन कशासाठी करायचे? वापर करून देण्यासाठी? एक तर धर्माच्या नावावर देश मिळवला आणि भारतात कशासाठी घुसखोरी करतात बांग्लादेशी? आपला राजकीय वापर होत असेल तर पुन्हा पुन्हा कशासाठी वापरायला संधी द्यावी? (अशी ही बनवाबनवी सिनेमात तो लक्ष्याचा डायलॉग आहे.. “सारखं सारख त्याच झाडावर काय?” तसा मुस्लिम समाजाने तमाम पुरोगामी लोकांना विचारला पाहिजे) तसंही राजकीय पुरोगामी म्हणून सिद्ध व्हायचं असेल तर भारतात तरी मुस्लिम धर्मसुधारणासाठी कोणीही सामाजिक राजकीय करिअर संपवणार नाही. कारण गेल्या दीड हजार वर्षांत कोण्या एकाच अस्मानी किताबाच्या आदेशात काना मात्रा बदलण्याची शक्यता कमी आहे. प्रबोधनाचे प्रयत्न तर खूप दूरवरची गोष्ट! दुसरीकडे एकेरी प्रबोधनाचा ओव्हरडोस झाल्याने हिंदू समाजपण निगरगट्ट झाला आहे २०१४ नंतर. प्रत्येक वेळी केवळ हिंदुत्ववादी विचारसरणी आणि बहुसंख्यावादी राजकारण याला जर दोष द्यायचा असेल तर मुस्लिम बहुसंख्य झाले की काय होऊ शकते हे पण लोकांसमोर आहे! तेव्हा काय बोलणार? अल्पसंख्य असू तोवर विशेषाधिकार बहुसंख्य झालो की सर्वाधिकार ही राजकीय व्यवस्था कोणामुळे येते? आम्ही कायम वंचित शोषित पिडीत दुय्यम आहोत कारण अमुकतमुक मंडळींमुळे! हा फसवा तर्क आजच्या काळात अत्यंत बकवास आहे. याची भलामण करणारे अतिशय सुंदर अशुद्ध बिनडोक असतात. (जसे शुद्ध बिनडोक असतात जे आमच्या बद्दल का बोलता त्यांच्या बद्दल पण बोला की म्हणणारे)
या लेखातून शेवटच्या पॅराग्राफमध्ये आवडलेले वाक्य..
“… कोणत्याही राजकीय छावणीचा बौद्धिक बंदिवान न होता जगता आले पाहिजे. कारण शेवटी, माझी सर्वात मोठी ओळख मी कोणत्या धर्माचा आहे ही नसून, मी किती स्वतंत्रपणे विचार करू शकतो …”
हा विचार सर्वच नागरिकांनी करावा. आदर्शवाद म्हणून हे फारच आशादायक आहे. स्वतंत्रपणे विचार करा पण आमच्या धर्मात ढवळाढवळ करू नका हा वेडपट सुमारपणा सगळीकडे ठासून भरलेला आहे. बाकी लेखातून व्यक्त झालेली मतं बऱ्यापैकी विवेकी संतुलित आहेत. जे काही पटलं नाही त्याबद्दल मी लिहीले आहे.
©️भूषण वर्धेकर
१४ नोव्हेंबर २०२६
लक्षद्वीपावरचे साप
खास लक्षद्वीपावर पाठविण्याकरिताचे विशिष्ट जातीचे सर्वोत्कृष्ट तथा खात्रीलायक साप हे मुंबईतील ग्रांटरोड पुलाखालील चटर्जी नावाच्या गुजराती व्यापाऱ्याच्या दुकानी मिळतात, ही माहिती जगजाहीर असताना, स्वप्निल परबाने त्याकरिता रत्नागिरीतील कोठल्यातरी दुय्यम प्रतीच्या कॉलेजातील प्राणिशास्त्र विभागावर का अवलंबून राहावे, हे अनाकलनीय आहे. ठीक आहे, आतल्या ओळखीमुळे फुकटात मिळाला असेल, वगैरे, परंतु, दर्जा नावाचासुद्धा काही प्रकार असतो की नाही? विशेषतः, इतक्या चांगल्या कामासाठी इतका चिंगूसपणा करायचा, म्हणजे… शिवछत्रपतींचा वारस म्हणविणाऱ्यास शोभते का हे? घरच्या हलाखीचा कितीही आव आणला, तरी, खिशात चार पैसे खुळखुळू लागल्यावर (‘वातानुकूलित दुसऱ्या वर्गाच्या जागा उपलब्ध असतानासुद्धा’) रत्नागिरी ते कोची प्रवास पहिल्या वर्गाने करण्याची दौलतजादा करू शकणाऱ्याला रत्नागिरी ते मुंबईचे साधे एसटीच्या लालडब्याचे भाडे परवडले नसते, हे पटत नाही. (शिवाय, मुंबईत झाले, तरी, सापाची किंमत असूनअसून अशी कितीशी असणार? तरी बरे, कोची ते रत्नागिरी प्रवास जनरल बोगीतून करून पैसे वाचविलेच होते. कोकणातील आहोत, एवढे सिद्ध करायला तेवढे पुरेसे नव्हते काय? मग उधळले असते थोडे पैसे जरा बऱ्या ब्राण्डच्या सापावर, तर नक्की काय बिघडले असते?)
बाकी, रत्नागिरीच्या कॉलेजात आजकाल ‘सूरज’ नावाचे मित्र सर्रास भेटतात, म्हणायचे. तेही ठीकच, परंतु, हा ‘सूरज’ म्हणे आजकाल अलीबागला प्राणिमित्र संघटनेची कार्यकर्तागिरी करतो. रत्नागिरीत राहून हे करायचे म्हणजे रोज अपडाऊनमध्ये किती वेळ जात असेल, कोणास ठाऊक.
(शिवाय, मूळ कथेत — ती कितीही भिकार असली, तरी — (माझ्या आठवणीप्रमाणे) (१) कथानायक जेव्हा मालकाच्या खिशात साप सोडतो तेव्हा, झालेच तर, (२) साप जेव्हा मालकास चावतो तेव्हा, त्या घटनांना कोणीही साक्षीदार नसतो. किंबहुना, या सगळ्या भानगडीत सापाचे काही किरदार आहे, याची उपस्थितांपैकी (कथानायक वगळता) कोणाला कल्पनादेखील नसते. त्यामुळे (आणि त्याला ‘आयर्लंडात साप नाहीत’ या ‘सामान्यज्ञाना’ची जोड मिळून) कोणालाही कसलाही संशयदेखील येत नाही. इथे मात्र, मालकाच्या खिशात काहीतरी सोडलेले आहे याला (खुद्द मालकाव्यतिरिक्त) किमान एक साक्षीदार आहे. झालेच तर, ते जे काही आहे, ते सापसदृश आहे, हेदेखील त्या साक्षीदाराने पाहिलेले आहे; इतकेच नव्हे, तर त्या सापसदृश कशालातरी हाताळल्यावर काही तासांनी (!) मालकाचा मृत्यू ओढवतो, म्हटल्यावर, कितीही ‘लक्षद्वीपावर साप नाहीतच्च, मुळी!’ म्हणून कंठशोष जरी केला, तरीसुद्धा, त्या साक्षीदारास (दोन अधिक दोन मिळवून) कसला संशयही येऊ नये, म्हणजे तो साक्षीदार, आजकालच्या आयटीसेलच्या वात्सप्पी प्रचारावरसुद्धा डोळे झाकून विश्वास ठेवण्याइतका भोळसट असला पाहिजे. (फुरसे चावल्यानंतर माणूस तडकाफडकी मरतो, की काही तासांनंतर फुरसतीने (pun intended) मरतो. की अधलेमधले काही, याबद्दल मला (अनुभवाअभावी) काडीमात्र कल्पना नसल्याकारणाने, त्याबद्दल आपण अनुवादकास संशयाचा फायदा देऊ.))
तेही सोडून द्या. फ्रेडेरिक फोरसाइथने त्याच्या उभ्या आयुष्यात कितीतरी बऱ्यावाईट कथाकादंबऱ्या लिहिल्या असतील. पैकी, ‘द डे ऑफ द जॅकल’, झालेच तर. ‘द ओडेसा फाइल’. वगैरे कादंबऱ्या सुप्रसिद्ध तर आहेतच, परंतु उत्कृष्टसुद्धा आहेत. परंतु, भाषांतर करून दिवाळी अंकात छापण्याकरिता त्या अंमळ जास्तच दीर्घ आहेत, ही अडचण समजू शकतो. मात्र, त्याने अनेक लघुकथासुद्धा लिहिल्या असाव्यात. खुद्द प्रस्तुत कथा ज्या ‘नो कमबॅक्स’ या संग्रहातून घेतलेली आहे, त्यातसुद्धा इतर अनेक लघुकथा असतील, नि त्या कदाचित याहून बऱ्या असू शकतील. असे असताना, सन्जोप रावांना अनुवादाकरिता फ्रेडेरिक फोरसाइथची ही भिकारोत्तम कथाच तेवढी का निवडावीशी वाटली असेल, हेदेखील समजत नाही. ज्ञानेश्वरांचा वारसा सांगणाऱ्यास शोभते का हे?
थोडक्यात, एका (नावाजलेल्या लेखकाच्या, परंतु) भिकार मूळ कथेचा भिकार अनुवाद. अधिक काय लिहावे?
(एक वाइल्ड गेस: कदाचित, मूळ कथेतील अचाट अतार्किकपणा अनुवादात जसाच्या तसा जपून ठेवण्यासाठी सन्जोप रावांनी तितकाच अतार्किकपणा अनुवादित कथेत घुसडला असावा काय? Or, am I giving the translator too much credit?)