ऐसा अंक जैसा हल्क, मेळवीन
माझ्या समजुतीप्रमाणे ‘ऐसी अक्षरे’चा पहिला दिवाळी अंक २०१२ साली निघाला. पुढच्या दोनतीन वर्षांत संस्थळ म्हणून ते बऱ्यापैकी स्थिरावलेलं होतं. माझा मुख्य मुद्दा असा की, त्यानंतर मात्र, दर वर्षीचा दिवाळी अंक काढताना ‘अकॅडमिक जर्नल’ हे एक मॉडेल म्हणून वापरायला हरकत नव्हती. अजूनही नाही. अर्थात हा विचार शब्दश: न घेता एक रूपरेषा म्हणून अभिप्रेत आहे.

माझ्या मनात आहे ते असं. दिवाळी अंकासाठी कामसू आणि जबाबदार लोकांचं एक संपादक मंडळ असेल. समजा एखाद्या लेखकाने दिवाळी अंकासाठी मजकूर पाठवला. (इथे मजकूर म्हणजे वैचारिक लेख, लघुकथा, कविता, एकांकिका, कादंबरीची पहिली दहा पानं वगैरे काहीही असू शकेल.) तर यापुढे संपादक मंडळावरचे ‘अ’ आणि ‘ब’ असे कुणीतरी दोघेजण तो चिकित्सकपणे वाचून त्यावर सूचना करतील, आणि लेखक त्याप्रमाणे मजकूर सुधारून घेईल. पुनर्लेखनाचे असे दोनतीन राउंड्स झाल्यानंतर मजकूर स्वीकारला जाईल. (हे पुनर्लेखन कसं करायचं हा किरकोळ तांत्रिक प्रश्न आहे - सामुदायिक व्हिडिओ कॉल्स, गूगल डॉक्स - जे काही सोयीचं वाटेल ते.) मजकूर जर सुरवातीलाच टाकाऊ वाटला तर लेखकाला तसं साभार सांगून प्रश्न निकालात काढला जाईल. वेगवेगळ्या मजकुरासाठी वेगवेगळे (पण डेडिकेटेड) ‘अ-ब’ असल्यामुळे काम विभागलं जाईल. महत्त्वाचं म्हणजे पुनर्लेखन पुरं झालेलं नसेल तर मजकूर तसाच अंकात घुसवला जाणार नाही.
ह्या प्रोसीजरमध्ये तपशीलाचे बदल होऊ शकतील. दोनऐवजी तीन रिव्ह्यूअर्स असू शकतील, त्यांच्या सूचना निनावी असाव्यात का हे ठरवावं लागेल, रिव्ह्यूअर्समध्ये दुमत असेल तर काय करायचं याचं धोरण ठरवावं लागेल इत्यादि. पण बेसिक मुद्दा असा की असं केल्यामुळे क्वालिटी कंट्रोल पाळला जाईल आणि लेखनातले बरेच दोष (ढिसाळपणा, क्लिष्टपणा, निराधार मतांची फेकाफेकी) कमी होतील. शिवाय मजकूर सुधारण्यात लेखकाबरोबरच ‘अ’ आणि ‘ब’ यांनी व्यक्तिश: रस घेतल्यामुळे तो वाचनीय होण्याची शक्यता खूपच वाढेल. An extra pair of eyes is always helpful. Two extra pairs are even more helpful. इथे अर्थात दिवाळी अंक चष्मिष्ट किंवा ग्रांथिक करावा असं माझं म्हणणं मुळीच नाही. आर्टिकल सिलेक्शन + प्रॉसेसिंग करण्याची पद्धत अकॅडमिक जर्नलसारखी ठेवावी इतकंच आहे. तो कितीही हलकाफुलका किंवा तरल वगैरे झाला तरी माझा आक्षेप नाही.
क्वालिटी कंट्रोलचे दूरगामी फायदे खूप असतात. मजकूर तुम्ही तावून-सुलाखून घेत असल्यामुळे जास्त लोक तो रस घेऊन वाचतात, तुम्ही कचरा खपवून घेत नाही, अशी एकदा प्रसिद्धी झाली की येणाऱ्या मालाची क्वालिटी मुळातूनच आपोआप सुधारते. मुख्य म्हणजे ते तुमच्याकडे येतात, ‘लिखाण पाठवा’ असं तुम्ही त्यांना म्हणण्याची गरज उरत नाही. प्रतिष्ठित अकॅडमिक जर्नल्सच्या बाबतीत असं होतंच. त्यांच्याकडे पब्लिश करायला लोक धडपडतात. आमच्याकडे पेपर पाठवा असं त्यांना म्हणावं लागत नाही. जुन्या काळी ‘सत्यकथे’ची प्रतिष्ठा काहीशी तशी होती. हे धोरण जर नेट लावून दोनतीन वर्षं राबवलं तर लोकसत्तेतले लेख पुनर्मुद्रित करावे लागणार नाही. तुमचा लेख पुनर्मुद्रित करू का (प्लीज-प्लीज) असं लोकसत्ता तुम्हाला विचारेल.
सध्याच्या दिवाळी अंकातले अनेक दोष डेडलाईन प्रेशरमुळे उद्भवलेले आहेत हे उघड आहे. (सध्याच्या म्हणजे या वर्षीच्या इतकंच नव्हे. तेच ते दोष गेली कित्येक वर्षं दिसताहेत.) पण तसं पाहता हे कारण भ्रामक आहे. समजा मी एक लघुकथा पाठवली. ‘ऐसी’च्या ‘अ-ब’ ना ती बरी वाटली, पण त्यात सुधारणा करायला हव्या आहेत. दिवाळी जवळ आलेली असताना मला आत्ता तेवढी सवड नाही. ठीक आहे, समजा त्यावर सवडीने आणखी चार महिने मेहनत घेऊन ती पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकात आणली तर काय बिघडेल? चांगली झाली तर लोकांना आवडेलच. जीएंच्या अनेक उत्तम कथा एकेकाळी ‘सत्यकथे’त प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यातली अमुक एक ५५ साली झाली की ५७, यामुळे आत्ता ह्या क्षणी आपल्याला काहीतरी फरक पडतो का? तेव्हा जो काही विलंब झाला असेल-नसेल त्याचं नंतर काहीही महत्त्व उरत नाही. गुणवत्ता उरते. The point is general. It is entirely independent of whether you personally care for जीए or सत्यकथा.
वैचारिक लेखांनाही हे लागू होतं. समजा मला वाटलं की भारतातल्या शिक्षणसंस्थांत उजवे लोक फार शिरलेले आहेत आणि ही भयंकर काळजीची बाब आहे. पण मी यावर जास्त मेहनत घेऊन जास्त काळजीपूर्वक लेख लिहिला आणि परिणामी त्याला अंमळ उशीर होऊन या वर्षी न येता तो पुढच्या दिवाळी अंकात आला तर काय बिघडेल? राजकीय/सामाजिक विश्वातले मोठे प्रश्न असे एका वर्षात नाहीसे होत नसतात. तेव्हाही ती भयंकर काळजीचीच बाब असणार आहे.
याचंच आणखी एक उदाहरण. ह्या वर्षीच्या दिवाळी अंकातला धारूरकरांचा भाषाशास्त्रावरचा लेख पाहा. तो अगदी अगम्य जरी नसला तरी फार जडशीळ झाला आहे. संपादक मंडळातल्या कुणीतरी त्यांच्याशी बोलून याबद्दल काहीतरी करायला हवं होतं. हा लेख सध्या जो कसाबसा दोनचार लोकांसाठी वाचनीय आहे त्याऐवजी पाचपन्नास लोकांसाठी वाचनीय करता आला असता. प्रगती यालाच म्हणतात. समजा याच्यात थोडा वेळ गेला असता आणि तो आत्ता तयार न होता पुढच्या दिवाळीपर्यंत झाला असता तर काय बिघडलं असतं? संस्कृत आणि प्राकृत भाषा, तत्सम-तद्भव-देशी ही शब्दांची वर्गवारी अशा गोष्टींशी त्याचा संबंध आहे. ह्या सगळ्या संकल्पनांची मुळं शेकडो वर्षं मागे जातात. येत्या जानेवारीत वॉशिंग्टनमध्ये कुठलंतरी फालतू स्कॅन्डल होऊन हा संपूर्ण विषय कालबाह्य होईल अशी काहीही शक्यता नाही. Not everything is so utterly topical that it has to be rushed through at the last minute. पण संपादनात ह्या long-term thinking चा अभाव फार जाणवतो.
एकेका लेखावर जास्त कष्ट घ्यावे लागले तर एकूणात लेखांची संख्या कमी होईल हे मान्य, पण वास्तविक ते फार बरं होईल. ह्या वर्षीच्या अंकात (ऋणनिर्देश, संपादकीय वगैरे हिशेबात न धरता) चाळीस लेख झाले आहेत. (त्यातले अनेक अर्धेकच्चे आहेत हे तर झालंच.) इतकी कॉग्निटिव्ह कपॅसिटी कुणाची नसते. यांतल्या बहुतेकांवर नुसती नजर फिरवली जाते - कदाचित तेवढंही नाहीच. ही संख्या समजा एक-दीड डझनावर आणली तर त्यांतल्या प्रत्येकाला न्याय मिळेल. अर्थात मुद्दा आटोपशीरपणाचा आहे, नेमक्या आकड्याला महत्त्व नाही.
‘ऐसी’च्या संपादनात असलेले अनेकजण अकॅडेमियाशी संबंधित आहेत (किंवा होते), त्यातल्या अनेकांना डॉक्टरेट आहे. तेव्हा अशासारखं मॉडेल त्यांच्या परिचयाचं असणारच. पण गोष्टी वेगळ्या मार्गाने गेल्या. एकच एक ‘संकल्पना’ ठरवून वाचकांच्या संवेदनाक्षम मनांवर तिचं सॅच्युरेशन-बॉम्बिंग करणं हा प्रकार गेली कित्येक वर्षं चालू आहे. त्याचे दुष्परिणाम उघड आहेत. मुख्य म्हणजे क्वालिटी-कंट्रोल फार बेतासबात आहे. तो नसेल तर काय राहिलं?
—
‘ऐसी’च्या वाचकांना माझं नम्र आवाहन असं की गेल्या चारपाच वर्षांतले दिवाळी अंक ते अजून वाचतात का याबद्दल प्रतिसाद म्हणून काही लिहावं. म्हणजे समजा २०२२ सालचा अंक निघाला तेव्हा पुरता वाचायला वेळ नव्हता, पण नंतरच्या चार वर्षांत लोकांनी तो थोडा थोडा करत बहुतेक सगळा संपवला असं असेल तर उत्तमच आहे. तसं होत नसेल तर ते चिन्ह बरं नव्हे. अर्थात इतर जे काही लिहायचं ते लिहायला हरकत नाहीच, पण निदान यावर प्लीज काहीतरी लिहा.
का?
शीर्षक वाचून चार ओळी वाचल्या की तुम्हीच उद्धृत केलेले आत्मभैकार्य महाकाय रूप घेऊन चित्र रूपात उभे राहिले.
ज्याला शीर्षकातली हल्क संकल्पना समजते त्याला चित्रातला हा हल्क नसून थानोस आहे हेही समजते.
का? का? का ?