Skip to main content

कृबु चिप्स विरुद्ध बटाटा चिप्स एक Thought Experiment.

प्रास्ताविक

सध्या सर्वत्र गाजत असलेल्या एन्व्हिडीया कंपनीचे जेन्सेन हुआंग चे "प्रकरण". याने माझ्या मनात एक विचारमालिका सुरु झाली, काही प्रश्न निर्माण झाले त्या कोलाहलाला सुसुत्र रुपात मांडणी करुन वाट करुन देण्यासाठी या लेखाचा प्रपंच. या निमित्ताने महानुभावांचे विचार, दृष्टीकोण इ. जाणुन घेता येइल ही सुद्धा आशा आहेच. तर या प्रकरणाला समाजातले विविध घटक कसे प्रतिसाद देत आहेत व नैतिकते संदर्भात हे प्रकरण कसे दिसत आहे प्रतिसादले जात आहेत या संदर्भात काही प्रश्न पडलेले आहेत. ते थोडे thought experiment मध्ये करतात तसे करुन बघतो.

तर जेन्सेन यांचे एका कथितरीत्या ( किंवा आहे समजा ) चिनी सुंदरी शी प्रेमप्रकरण जुळले. सदर सुंदरी सिंगापुर येथील एका कंपनीची मालकीण आहे. तिच्या कंपनीला जेन्सेन यांनी त्यांच्या एन्व्हिडीया या कंपनीच्या कृबु चिप्स पुरवल्यात. या चिप्स तिने तिच्या कंपनीमार्फत चिनला पाठवल्या असा सर्वसाधारण आरोप आहे. या चिप्स कृ.बु. साठी अत्यंत महत्वाच्या अशा आहेत. याचे तंत्रज्ञान चीन कडे नसुन ते मिळवण्यासाठी सुंदरी मार्फत चीनकडुन हा कट रचण्यात आला याला जेन्सेन बळी पडले. आणि आता हे सर्व प्रकरण उघड झाले. तपशिल सर्वांना माहीतच आहे त्यात फार काही शिरण्याची गरज नाही.

तर जेन्सेन गुन्हेगार ठरविण्यात आले आणि त्यांनी गुन्हा केला नैतिक दृष्ट्या ते भ्रष्ट झाले असे सध्या तरी चित्र निर्माण झालेले आहे. आणि त्यांची प्रथेप्रमाणे प्रचंड टवाळी सर्वत्र विशेषत: समाजमाध्यमांमध्ये उडवण्यात येत आहे. तर या केस मधील संबधित घटक आणि त्यांचा सध्या प्रदर्शित / निर्देशीत दृष्टीकोण असा आहे. गंमत म्हणुन जुना करार नवा करार शब्द वापरतोय बायबलशी काहीही संबंध नाही.

( जुना करार )

१- अमेरीकन सरकार व अमेरीकन देशभक्त नागरीक:-

देशाचे आर्थिक नुकसान झाले, चिप चे महत्वाचे तंत्रज्ञान चीन च्या हाती पडल्याने चीन त्याची चिप बनवेल जेणेकरुन अमेरीकेला स्पर्धा निर्माण करुन देशाचे आर्थिक नुकसान होइल. कृबु मध्ये अमेरीका मागे पडु शकेल इत्यादी म्हणून याला कारणीभुत असलेले जेन्सेन हे दोषी ठरतात.

२- अमेरीकन कायदा:-

देशाचा कायदा जो देशासाठी महत्वाच्या तंत्रज्ञानाचे रक्षण वगैरे करतो त्या दृष्टीने इथे कायदेभंग झालेला आहे .त्यासाठी त्यांची चौकशी सुद्धा होणार आहे. या संदर्भात ट्रंप यांना गुप्तचर यंत्रणांनी माहीती पुरवुनही कारवाई केली नाही असाही आरोप आहे तर जेन्सेन कायद्यानेही दोषी ठरतात.

३- कंपनीचे भागधारक:-

जेन्सेन यांच्या प्रकरणामुळे कंपनीची बदनामी आणि संभ्रम निर्माण झाल्याने त्याच्या शेअर्स चे भाव मोठ्या प्रमाणावर पडले. याने भागधारकांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले. आणि कंपनीचे आर्थिक भविष्य सुद्धा काही प्रमाणात अस्थिर झाले. तर जेन्सेन हे भागधारकांनुसार सुद्धा दोषी ठरतात.

४- पत्नी लोरी :-

जेन्सेन यांनी त्यांच्या पत्नी लोरी यांचा सुद्धा विवाह वचन मोडुन, त्यांना अंधारात ठेउन , फसवुन प्रेम प्रकरण केले. त्यामुळे जेन्सेन हे या पवित्र अशा वैवाहीक करारानुसार सुद्धा दोषी ठरतात.

आता वरील ४ प्रमाणेच इतरही संबधित घटक यात जोडता येतील व त्यांच्या अनुसार सुद्धा दोष सिद्ध करता येइल पण फापटपसारा नको म्हणुन तुर्तास आटोपशीर इतकेच घटक घेऊ या पण आपले लक्षात असु द्या.

आता या सर्व प्रकरणाचा मी केवळ नैतिकतेच्या दृष्टीकोणातुन विचार करतोय त्यामुळे या वर्तुळाबाहेर कृपया चर्चा नेऊ नका ही विनम्र विनंती.

तर मी या प्रकरणात आता काही काल्पनिक बदल करतो कृपया तसेच गृहीत धरावे.

स्टोरीत केलेले बदल

१-

एन्व्हिडीया समजा कृबु चिप बनवणारी कंपनी नसुन बटाटा चिप्स बनवणारी कंपनी आहे. त्याच प्रमाणे अमेरीकेत बटाट्याचे प्रचंड अतिरीक्त उत्पादन होते त्यामुळे बटाटा चिप्स जितके अधिक निर्यात होतील तितका अमेरीकेचा यात मोठा आर्थिक फायदा आहे.

२-

अमेरीकेतील कायदा उलट अमेरीकन बटाटा चिप्स निर्यातदारांना प्रोत्साहन देतो , करात सुट वगैरे देतो कारण याने अमेरीकेचा मोठाच आर्थिक फायदा आहे. दरवर्षी उदा. बटाटाकिंग हा शासकीय पुरस्कार सर्वात मोठ्या निर्यातदाराला दिला जातो.

३-

जेन्सेन आणि लोरी हे अति उच्चशिक्षीत आणि कमालीच्या मोकळ्या वातावरणात मोठे झालेले आहेत . तसेच त्यांनी दोघांनी तारुण्यात open marriage: A new life style for couples या George O'Neil , Nena O' Neil लिखीत त्यांच्या काळात प्रसिध्द ठरलेल्या ग्रंथाची सोबत पारायणे केलेली आहेत . आणि त्या ग्रंथातील विचारांनी / तत्वांनी भारावुन जाउन आपला विवाह हा open marriage ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . आणि आपण जोडीदाराला कामांकित न ठेवता प्रामाणिक मोकळा अवकाश वगैरे देऊ तत्सम अशा आणाभाका घेतल्या आहेत.

तर आता आपण अशी नविन पार्श्वभुमी निर्माण केली आता पुन्हा एकदा या नविन पार्श्वभुमी नुसार वरील ४ संबधित घटकांवर काय संभाव्य परीणाम होइल बघु या

(नवा करार )

१- अमेरीकन सरकार व अमेरीकन देशभक्त नागरीक:-

बटाटा चिप्स च्या निर्यातीने देशाचा मोठाच आर्थिक फायदा झाला. एकीकडे बटाट्याच्या अतिरीक्त उत्पादनाने एरवी पडले असते ते भाव वाढुन अमेरीकन शेतकऱ्याच्या पदरात ( जिन्सीत ) चांगला पैका आला. शिवाय देशाचा निर्यातीने मोठा आर्थिक विकास झाला त्यामुळे अमेरीकन सरकार व देशभक्त नागरीकांच्या दृष्टीने जेन्सेन एक महान उद्योजक म्हणुन कौतुकीले गेले.

२- अमेरीकन कायदा:-

अमेरीकन कायदा मुळात बटाटा चिप्स निर्यातीला तसेच एकुण शेतकी उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देतो . त्यामुळे जेन्सन यांना उलट कायद्यात असणारी करातली सुट वगैरे देण्यात आली इथेही जेन्सेन हे एक कायदेपाळु नागरीक म्हणुन समोर आले शाबासिले गेले.

३- कंपनीचे भागधारक:-

भागधारकांना या वर्षी फार मोठी विक्री झाल्याने आणि चांगले वार्षिक निकाल आल्याने त्यांचे शेअर्स चे भाव वधारले. या मुल्यवृद्धीने भागधारक आनंदुन जेन्सेनना दुवा देऊ लागले. शिवाय त्यांच्या विपणन कौशल्याचे ( बघा जेनु ने कशी एथनिसीटी encash केली कशी छान मोठी ऑर्डर मिळवली !) , नफा कमविला. वा वा काय दमदार नेतृत्व !

४-पत्नी लोरी :-

जेन्सेन घरी आल्यावर जेन्सेन व लोरी हे दोघे कमालीच्या आस्थेने एकमेकांची विचारपुस करीत, मोकळेपणाने आपल्या विवाहबाह्य कामानुभवांची चर्चा करत . आपण घेतलेला निर्णय वाचलेली पुस्तक आणि अंगिकारलेली तत्वेच किती चांगली होती योग्य होती या कृतार्थ भावनेने त्यांची मने भरुन येत व ते एकमेकांच्या कुशीत निरागस आनंदाने विसावले. आपल्या उत्कट सहजीवनातील प्रामाणिकता , खोली अशीच टीकुन राहो अशी कामना व्यक्त करत. Easy चे एपिसोड आपण कधीच मागे टाकले हे पाहुन विशेषत: जेन्सेन यांच्या गालावरील खळी ने अजुनच खुलुन हास्य उमटवले.

वरील उदाहरणात हा बदल कोणी केला का झाला याचे दोन प्रसिद्ध नैतिक विचारसरणी दावणीला बांधुन विश्लेषण करु या. तर त्या विचारसरणी म्हणजे moral relativism ( नैतिक सापेक्षतावाद चुकभुल देणे घेणे अनुवाद औकातीप्रमाणे ) आणि utilitarianism ( उपयुक्ततावाद ) या थेअरीची तत्वे आणि त्याचा परीणाम असा ही काही फार व्यामिश्र नसुन सामान्य ज्ञाना ला आकळणारे असे ते आहेत.

मात्र यातील उपयुक्ततावाद संदर्भात श्री राजीव साने यांचे आवडलेले प्रतिशब्द संदर्भातील विवेचन येथे देतो ( ग्रंथ- स्फुर्तिवादी नितीशास्त्र पृ.क्र.२९ )

अ- सुखे व दु:खे मोजता येतात ( त्यांत गुणात्मक फरक करु नये )

ब- सुखातुन दु:ख वजा केले, की वट्ट ( नेट !) सुख मोजले जाते.

क- सर्व व्यक्तींच्या वट्ट सुखांची बेरीज करता येते

ड- ज्या कृतीने वट्ट -सुख-सर्वबेरीज वाढेल, ती योग्य कृती आणि कमी होइल ती अयोग्य कृती !

हे पाहता उपयुक्तततावाद म्हणजे " वट्ट-सुख-सर्व-बेरीज-वर्धन-वाद" !

आहे की नाही दमदार शब्द ( मला त्यांची प्रतिशब्दे कितीही कठीण असली तरी खुप आवडतात असो )

तर एकेक तत्व घेऊन बघु

१- Morality depends on social and cultural norms

या विचारसरणीनुसार ( नैतिक सापेक्षतावाद ) नैतिकता ही मुलत: वस्तुनिष्ठ नसुन ती सापेक्ष आहे. आणी या तत्वानुसार नैतिकता ही नेहमीच सामाजिक आणि सांस्कृतिक संकेतांवर अवलंबुन असते. ती बदलली तर नैतिक निर्णय सुद्धा बदलतो. आपल्या उदाहरणात जुन्या करारात पारंपारीक ख्रिस्ती विवाह मुल्य चे संकेत गृहीतक होते. त्यामुळे जेन्सेन हा तिथे दोषी सिद्ध झाला नवा करार उदार समाज गृहीत धरतो. ज्यात open marriage प्रस्थापित आहे असे गृहीतक होते. या नव्या करारातील बदललेल्या संकेतानुसार जेन्सेन हे दोषी नसुन प्रामाणिक साथीदार सिद्ध झाले.

२. Morality depends on individual values and agreements

इथे दुसरा खरे म्हणजे वरील पहील्या तत्वाच्या विरोधात दुसरा आधार मिळतो. इथे लोरी आणि जेन्सेन यातील करार हा ख्रिस्ती विवाहाच्या पारंपारीक करारापेक्षा महत्वाचा ठरतो. त्यामुळे एकीकडे ख्रिस्ती पारंपारीक विवाह करार दुसरीकडे व्यक्तीगत open marriage चा करार असा बदल नैतिक निर्णयात महत्वाचा ठरतो.

३-Greatest happiness principle

यामध्ये कर्त्याची कृती जर सर्वाधिक लोकांचे सुख वाढवत असेल ( जरी काहींनी मार खाल्ला तरी ) तर अशी कृती ही उपयुक्तततावादानुसार योग्य नैतिक कृती मानली जाते. आपल्या नव्या करारात तर सर्व भागधारकांचे सुख वाढले, अमेरीकन जनतेचे सुख वाढले, शेतकऱ्यांचे वाढले (त्यामानाने खरे म्हणजे इथे कोणीच मार खाल्लेला दिसत नाही win win सारखी परीस्थिती ) त्यामुळे नव्या करारात जेन्सेन निर्दोष ठरले.

आठवा जुना करार ज्यात अमेरीकन जनता, भागधारक सगळ्यांचे अधिकाधिक दु:ख वाढुन एकट्या जेन्सेन ला व प्रेयसीला सुख लाभले होते.

त्यामुळे ते दोषी असणे योग्य च होते. ( इथे साम्यवादाची झलक/ आठवण हमखास येते )

४-Consequentialism

यात कृतीचे मुल्य हे तिच्या हेतु वरुन ठरविले जात नाही तर त्या केलेल्या कृतीचा परीणाम काय झाला आणि त्याने किती लोकांच्या सुखात किती प्रमाणात वृद्धी केली हे उपयुक्ततावादानुसार ठरविले जाते. म्हणजे वरील उदाहरणात जेन्सेन यांचा हेतु समजा ऑर्डर मिळविण्याचा होता त्यासाठी त्यांनी एक मार्केटींग चा प्रेमडाव टाकला की त्यांना खऱ्या रोमियो प्रमाणे तिचं ह्रद्य जिंकण्याची मनीषा होती या दोहोपैकी कुठलाही हेतु intent उपयुक्ततावादात महत्वाचा नाही. तर त्या कृतीचे प्रत्यक्षात काय परीणाम झाले ते महत्वाचे मानले जाते. तर जुन्या करारात हेतु कितीही उदात्त असो परीणाम भागधारकांच्या नुकसानीत व पत्नी च्या दु:ख वाढण्यात झाला नेट सुख घटले त्यामुळे पहील्या उदाहरणात भागधारक आणि देशभक्त अमेरीकन जेन्सेन यांना माफ करु शकले नाहीत सबब जेन्सन दोषी ठरले. मात्र नव्या करारात समजा जरी जेन्सन यांचा हेतु हा केवळ कामोपभोग किंवा कितीका वाईट असेना त्याचा परीणाम वट्ट सुख सर्व बेरीज वाढण्यात झाला म्हणून त्यांची कृती नव्या करारात नैतिक सिद्ध झाली.

आता हे पहील दोन नैतिक सापेक्षतावादाचे व दुसरे दोन उपयुक्ततावादाचे तत्व वापरुन आपण बघितले व परीणाम का बदलला असावा याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला . हे सर्व विवेचन एक सर्वसाधारण कल्पना येण्यासाठी व या दिशेने काही गवसेल का यासाठी. यात काही फार नाविन्य नाहीच आणि हे सामान्य ज्ञानाला ही आकलनात येते. तर ही पायाभरणी करुन झाल्यावर

आता पुढील भागात यातुन अधिक उत्तेजित करणारे प्रश्न या रॉ मटेरीयल मधुन कसे उपस्थित होतात किंवा काढता येतात ते बघु या. म्हणजे महत्वाकांक्षा आहेच !

लेख टंकन कंटाळा असल्याने प्रतिसादात चर्चे ला टंकण्यात जास्त मजा येइल

तर

तुम्हाला काय वाटते मित्रांनो ?

सई केसकर Sun, 15/11/2026 - 05:54

म्हणजे बरेचसे माझ्या डोक्यावरून गेले असले तरी. पण या विषयावर माझा एक विचार असा की रोज काय घालायचं? या प्रश्नाला डिसिजन फटिग असे नाव देऊन कुणी काळा पोलो शर्ट कुणी काळं लेदर जॅकेट घालणं बंद करावं. कारण त्या वाचलेल्या वेळातून ते नको ते क्रिएटिव्ह निर्णय घेतात. आता एक नाही तर त्याच्या दोन गर्लफ्रेंड आहेत हे समोर आलं आहे. दोन अख्ख्या गर्लफ्रेंड करून घेताना (शिवाय बायको) डिसिजन फटिग कसं नाही आलं? त्यामुळे छान रंगीबेरंगी वॉर्डरोब असावा. त्यात हिरवे पिवळे लाल शर्ट असावेत. आणि रोज आज काय घालावं म्हणून प्रत्येक सीइओ ने टॉवेल गुंडाळून कपाटासमोर बसलं पाहिजे.

तर्कतीर्थ Sun, 15/11/2026 - 07:28

प्रस्तुत लेखाचे मराठीत भाषांतर करण्याची व्यवस्था संपादकांनी करावी, अशी मी नम्र सूचना करतो. तसेच ऐन दिवाळीमध्ये लाईन स्पेसिंग गंडल्यामुळे इथल्या लेखनाची वाचनीयता कमी होते, याची पण नोंद घेण्यात यावी.

मारवा Sun, 15/11/2026 - 09:08

In reply to by तर्कतीर्थ

मराठी भाषांतर ?
मराठी संस्थळ आहे म्हणून जाणीवपूर्वक इंग्रजी शब्द टाळण्याचा प्रयत्न करत असतो. नाईलाजाने काही शब्द वापरावे लागतात किंवा सवय धोका देते. परंतु इतकं कठीण मराठी झालं याचा खेद वाटतो. (सानेंचा वरील paragraph फक्त की सगळाच लेख वाईट मराठीत झाला ? )
मराठी माझी मातृभाषा नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही चालवून घ्या मला सूट द्या किंवा वर कौतुक करा. पण तुम्ही थोडे नेमके उदाहरण देऊन सांगितलं तर मला कळेल की मी कुठे चुकतोय. आणि मी पुढील लेखात अधिक अचूक आणि प्रवाही लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच करेल.

लाइन स्पेसिंग ठळक करून तर मुद्दाम दिली कारण महत्वाचे मुद्दे सरमिसळ न होता वेगवेगळे ठळक दिसावेत. क्रमांक वगैरे सुद्धा त्याच स्पष्टता यावी या हेतूने दिले. यात काय गडबड झाली खरंच कळलं नाही.
धन्यवाद

तर्कतीर्थ Sun, 15/11/2026 - 09:30

In reply to by मारवा

श्री० मारवा,

माझ्या प्रतिसादाला सुमारे ३३ वर्षांपूर्वी घडलेल्या प्रसंगाची विनोदी पार्श्वभूमी आहे. मुंबैमध्ये एका परिसंवादामध्ये मी माझा १ला मराठी शोधनिबंध वाचला. माझ्या अगोदर माझ्या संस्थेत काम करत असलेल्या आमच्या विभाग प्रमुखांनी बीजभाषण करून सत्राचे उद्घाटन केले होते. सदर गृहस्थ आपल्या असंबंद्ध आणि निरर्थक बडबडीसाठी प्रसिद्ध होते.

आमचे त्या दिवशीचे सत्र संपल्यावर मी चहा पिण्यासाठी सुसाट वेगाने बाहेर आलो. माझ्या मागोमाग तितक्याच सुसाट वेगाने आणखी काही जण बाहेर आले. त्यात सचिन तेंडुलकरचे वडील प्रा० रमेश तेंडुलकर होते. एक प्रा० बाई आणि आमचे विभाग प्रमुख पण होते. प्रा० रमेश तेंडुलकरांनी धवत येउन माझ्याशी हस्तांदोलन केले आणि अभिनंदन करत म्हणाले,

"तुमचा निबंध समजाउन घेण्यासाठी मराठीतून मराठीत भाषांतर करायची गरज पडली नाही". हा माझ्या शेजारी उभ्या असलेल्या आमच्या विभाग-प्रमुखांना टोमणा होता.

मला त्या प्रसंगाची आज परत आठवण झाली. माझ्या मते राजीव साने असेच असंबंद्ध लिहीत असतात, ज्याची मराठीतून मराठीत भाषांतर गरज असते. त्यांनी अधिजनुक शास्त्राला छद्मविज्ञान म्हटले तेव्हा ते माझ्या मनातून पूर्ण उतरले...

तेव्हा जास्त मनाला लावून घेऊ नका आणि

"आत्मविरोधी कुतुहल धरा"...

anant_yaatree Sun, 15/11/2026 - 16:04

प्रेरणास्रोत असलेले "प्रकरण" बघता कृ बु चिप्स वि बटाटा चिप्स याऐवजी कृ बु चिप्स वि Banana chips ही तुलना योग्य ठरली असती असे उगाचच वाटून गेले.