Skip to main content

किंवा असंही असेल

मी डोअरबेल वाजवली आणि पाहिलं की एक डोळा
संशयानं पाहतो आहे माझ्याकडे काहीवेळ स्तब्ध आतून
मला वाटलं की मी चुकीच्या दाराशी आलेय

मी वळत असताना उघडलं दार तर प्लास्टिकचा चेहरा होता
सुंदर सुरकुत्या गमावलेला मला घरात बोलावणारा
रेकॉर्डेड मेसेज सारख्या आवाजात
वाटलं की मी चुकीच्या घरात आलेय

पाणी पिऊन निघाले न जाणे कोणती झाडं होती कडेला
काही रिकामे फास लटकत होते वार्‍यावर आणि काही
फासांच्या गळ्यांत माणसं होती अजून न उतरवलेली मृत
की मी चुकीच्या रस्त्यावर आलेय

मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते सगळे आकार
रक्त आणि चिखल आणि घाणीने भरलेले
ऐकत होते कानांनी सगळे मोठे आणि सूक्ष्म आवाज
कुजबूज आणि किंकाळ्या लिहिताना मला वाटलं की
मी चुकीच्या भाषेत आलेय

किंवा असंही असेल
अचूक जगात अचूक काळात मी जन्मलेय एका
चुकीसारखी.

धनंजय Thu, 18/07/2013 - 23:21

हे आठवले :

Southern trees bear a strange fruit,
Blood on the leaves and blood at the root,
Black bodies swinging in the southern breeze,
Strange fruit hanging from the poplar trees.

*शेवटचे अतिस्पष्टीकरणात्मक किंवा बाळबोध आत्मपरीक्षणाचे कडवे उगाच खुपते आहे.*

राजेश घासकडवी Sun, 21/07/2013 - 02:51

कविता आवडली, विशेषतः 'फासांच्या गळ्यांत माणसं होती' सारखे शब्दप्रयोग.

मात्र ती दोन वेगळ्या पातळ्यांवर दुभंगलेली आहे असं वाटलं. प्लास्टिकी चेहरा आणि प्लास्टिकी जग यांचा किंकाळ्यांशी आणि मृतांशी नसलेला संबंध तितका स्पष्ट होत नाही.