गव्हाणी घुबडाच्या घरात.. समारोप..!! ..They are back..!!
"अब इसे मारना है की छोडना है, आपकी मर्जी. लेकिन ये खिडकी कभी नही खोलिये.. और उसका नाम मुह से बिलकुल मत बोलिये. हमारे यहां होता तो स्साला मार ही डालते थे तुरंत.."
खिडकी खाडकन बंद करत एसी टेक्निशियन म्हणाला.
नवीन फ्लॅट भाड्याने घेतला. मालकांनी बराच कचरा मागे सोडला होता. शिंकत खोकत मी ते घर राहण्यायोग्य बनवण्याचा प्रयत्न करत होतो.
एका बेडरुमच्या खिडकीत जुन्या विंडो एसीचं धूड चढवायचं होतं. ते काम करता करता असं दिसलं की सात अंडी खिडकीखालचा सज्जा की काय म्हणतात त्या वळचणीत पडलेल्या कचर्यात आणि डबरात पडलेली, की घातलेली म्हणा, दिसत होती.
घरटं वगैरे बांधण्याचे कष्ट घेतले नव्हते.
मुंबईत पेस्ट कंट्रोलचा विषय बनलेली कबुतरं माझ्याही आजूबाजूला पुरेशा संख्येने घुमत असल्याने त्यातलंच एक तिथे माझ्याआधी जागा बिनभाड्याने घेऊन बसलं आहे असं परिस्थितीजन्य पुराव्यावरुन दिसत होतं.
पण खिडकी मोकळी सोडली आणि जो काही प्रकार त्या अंड्यांवर येऊन बसला तो जरा अनपेक्षित होता.
तेच ते.. अपशकुनी, भयानक, रात्री संचार करणारं भुताळी घुबड...
मग घरात कामासाठी आलेल्या प्रत्येकाने, पक्षी प्लंबर, रंगारी, सुतार वगैरेंनी माझ्या पोराला भयंकर भयंकर कहाण्या सांगितल्या. सुरक्षिततेचे उपाय आणि शक्यतो ही बला मारुन टाका असं जनहितार्थ बजावूनच ते गेले.
आता मुळात म्हणजे हा पक्षी एकदम बिचाराच आहे.. अपशकुनी वगैरे तर जाऊदेच, लोक म्हणतात तसा खूंखार आणि आक्रमकही वाटला नाही. फोटो काढूया म्हणून मोबाईलचा कॅमेरा खिडकीबाहेर काढला तर चक्क घाबरुन उडाला आणि समोरच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. लक्ष मात्र प्राणपणाने अंड्यांकडे. खिडकी बंद केली की श्रीमती घुत्कर परत अंड्यांवर.
असं पुन्हापुन्हा झाल्यावर मग मात्र माझ्या लक्षात आलं की असे फोटो काढून त्याला उडवण्यात अर्थ नाही.
चारपाच दिवस असेच गेले. पण घुबडाला काही माझा भरोसा वाटेना. मग मी खिडकी उघडणं बंद केलं आणि गुप्तपणे त्याला कसं बघावं असा विचार करत बसलो.
घुबडाची जोडी आयुष्यभर, किमान सीझनपुरती एकनिष्ठ असते. त्यांची कोर्टशिप म्हणजे नराने मादीला घरट्याची जागा दाखवायची आणि उंदीरबिंदीर मारुन ऑफर करायचा. तिने तो घेतला आणि खाल्ला तर जमली जोडी. काश हमारा भी..
बरं.
तर मग त्याचं असंही आहे, की बरीचशी घुबडं आपल्या आयुष्यात एकदाही ब्रीडिंग करु शकत नाहीत. आणि जी घुबडं ते करु शकतात ती आयुष्यात एकदाच करु शकतात. त्यांचं आयुष्यच तितकं असतं. दोन तीन वर्षं. म्हणजे शरीराची क्षमता पंधरावीस वर्षं जगण्याची असूनही केवळ अत्यंत जास्त संख्येने असलेल्या संकटांमुळे आणि शत्रूंमुळे दोन वर्षंही जगायला मिळणं हे खूप ठरतं. कावळे आणि इतर पक्षी (शिकारी पक्षी) घुबडांची अंडी आणि पिल्लं खातात. माणसं हीसुद्धा मोठी शत्रूफळी.
आता आयुष्यात मिळून एकदा पिल्लं निर्माण करण्याची संधी त्याला मिळणार आणि त्यातही मी त्याची अंडी फेकून द्यायची हे काही बरोबर नव्हे.
अंडी घालताना ती दोनतीन दोनतीन दिवसाच्या अंतराने एकेक अशी घालतात. त्यामुळे अर्थातच पिल्लंही तशीच अंतरा अंतराने बाहेर येतात. शेवटचं पिल्लू बाहेर येईपर्यंत पहिलं चांगलंच मोठं झालेलं असतं. आणि त्यावेळी एकाच घरट्यात उतरंडीसारखी उंचीसे कतार म्हणावी अशी वेगवेगळ्या वयाची पिल्लं दिसतात.
त्यातली मोठी (अर्थात आधी जन्मलेली) एकदोन पिल्लं शक्तिमान असल्याने ती बापाने (हो बाप भरवतो सरपटणारे, धावणारे इत्यादि वेगळाले प्राणी मारुन. आई म्हणजे झेड सिक्युरिटीच्या ड्यूटीवर २४ तास) आणून दिलेलं अन्न बकाबका हिसकावतात. लहान पिल्लं जिवंत राहण्याची शक्यता नगण्य. अन्नपाण्याची ददात अगदीच नसेल तरच आठातली चारपाच जगतात.
मी दुकानात जाऊन एक वेबकॅम आणला. विशिष्ट रचना करुन तो खिडकीखाली लपवला. घुबड काही मूर्ख नसणार, त्याला नवीन वस्तू कळलीच असणार, पण त्याला हरकत दिसली नाही. कारण कॅमेरा काही फ्लॅश मारणं किंवा हालचाल करणं अशा गोष्टी करत नाही.
आता मोशन डिटेक्शन मोडमधे व्हिडीओज बनताहेत. मीही मोकळ्या वेळात समोर बसून लाईव्ह मॉनिटरिंग करतो आहे. प्रकार रोचक आहे. अधिक माहिती किंवा निबंध लिहीत नाही. व्हिडीओ WMV असल्याने ते इथे कसे द्यायचे कळत नाही. तोपर्यंत खूफिया कॅमेर्यातून येणार्या प्रतिमा आणि जे काही निरीक्षण नोंदवता येईल ते नोंदवत जाईन.
कालच कॅमेरा लपवला आहे. बघू काय होतं.. कोण जन्मतं आणि कोण जगतं.
नुसतीच अंडी. पक्षी नाहीच.

श्रीमती घुत्कर:

पहिला छोटू घुत्कर बाहेर आलेला आहे. कापसाचा थरथरता शुभ्र लालसर गोळा. वळवळ कम धडपड चालू आहे. बाकी सहाजण अभीतक अंडेमें.
म्हणजे शेवटी जगणारा लकी वन असण्याची याची शक्यता जास्त.

पहाटे घुबडं झोपतात असं म्हणायला हरकत नाही. पण अत्यंत सावध झोप.

अत्यंत तिखट कान असतात असं दिवसभरात दिसलं. दूरवरही कुठे खुट्ट झालं की दचकल्याप्रमाणे अंग काढून लगेच दक्ष पोझिशन घेते. फोडतेय कॅमेरा वाटतं:

बाकी सर्व लाईव्ह चालू आहे. काही वेगळं वाटलं की मधूनच अपडेट करीन.
आत्तापर्यंत दिसलेलं:
- एकच घुबड (लॉजिकली मादी) दिसली आहे. गेल्या पाच दिवसात अधूनमधून पाहात असतो तरी दोन घुबडं (नर आणि मादी) दिसले नाहीत. ही एकटी पडली आहे का अशी शंका आहे. व्हिडीओ कॅमेरा अर्थातच काय ते दाखवेलच यात शंका नाही.
- काल पहिलं पिल्लू जन्मल्यापासून मोशन डिटेक्ट व्हिडीओ आणि माझं मॉनिटरवर निरीक्षण यामधे पक्षी शांत आहे. पिसं साफ करतो. बसतो. झोपतो. रिलॅक्सही होतो. मधेच कावळा येतो मग घुबड त्याला पळवतं.
पण या सर्वामधे नवीन पिल्लाला खायला काहीही दिलेलं मी पाहिलं नाही. मध्यरात्री दिलं असेल तर माहीत नाही. पण वाचलेल्या माहितीनुसार दिवसातून दहावेळा तरी खाणं आणतात वडील. इथे मुळात वडीलच दिसत नाहीत.
काळानुसार उलगडा होईलच. व्हिडीओज जास्त रोचक असूनही इथे जोडता येत नाहीयेत.
बघत राहू..आत्ताच तर सुरुवात आहे.
सी यू सून.
२२ नोव्हेंबर.. सकाळची वेळ झोपण्याची..
मोठं पिल्लू आता खरोखर खूप मोठं झालं आहे. आजच्या या फोटोंमधे ते खाली बसून असल्याने उंची लक्षात येत नाहीये, पण आज सकाळी बघायला गेल्यावर ते उठून उभं राहिलं तेव्हा मला बर्याच दिवसांनी घुबडाईच येऊन बसली आहे असा भास झाला इतकं ते मोठं (उंचीला) झालं आहे.
त्याच्या पंखांमधे वाढत्या प्रमाणात अॅडल्ट घुबडाच्या रंगाची पिसं उगवली आहेत. फोटोंमधे खास हॅपनिंग काही नाही कारण ती पिल्लांची झोपण्याची वेळ आहे. आळसटलेली आहेत.
आजची खास बात म्हणजे संरक्षणार्थ कुकरशिट्टी वाजवणे, ख्याव ख्युव आवाज आणि पवित्रे घेणे ही सर्व कामं आता छोट्या पिल्लाने उत्साहाने स्वतःकडे घेतली आहेत. मोठे पिल्लू आसपास चाहूल लागली तरी फारसे काळजी करत नाही. बडा जो हो गया हूं.. असं असावं.. :)

बाजूला जमिनीवर मातृपितृकृपेने भक्ष्य येऊन पडलेलं दिसतंय. अर्धा स्वाहाकार झालेलाही दिसतोय.

सकाळच्या वेळी रोज झोप काढतात.. अर्थात सावध झोपच..

काही पृच्छा
- घुबडांची सरासरी लाइफ एक्स्पेक्टेशन किती? (नाही म्हणजे, हा सीझन साधारणतः किती एपिसोड्स लांब आहे, याचा अंदाज लावतोय.)
- हिंदी पिच्चरप्रमाणे घुबडबाळे मोठी होऊन त्यांचे लग्न होईपर्यंतच ही सीरीयल चालवणार, की शेवटपर्यंत?
- पुढील सीरीयलचा काय प्लान?
- ही सीरियल चांगली चालावी याकरिता, शुभचिन्ह म्हणून, या सीरियलचे नाव 'ग्गव्हाणी ग्घुबडाच्या ग्घरात - बाय ग्गवि' असे असावयास नको काय?
२५ नोव्हेंबर..

वाढता वाढता वाढे. लवकरच उडण्याचे पहिले धडे घेण्यासाठी मोठे पिल्लू तयार होईल असं दिसतंय. पाचव्या मजल्यावर वळचणीच्या जागेत उडायला कसं शिकवणार हा प्रश्नच आहे म्हणा..प्रॅक्टिसच्या काळात नाही जमलं तर थेट जमिनीवर गच्छंती..एरवी पिल्लू असं खाली पडलं तरी घुबड आईबाप त्याला तिथेच अन्न देतात, आणि एखादा मजला उंचीइतक्या गव्हाणीत परत यायला मदत करतात. पण पाच मजल्यांच्या उंचीवर ही सिस्टीम कशी चालेल माहीत नाही.
पण त्यांनी घर करण्यापूर्वीच हा विचार केला असेल असं म्हणू..
बाकी घरट्यात गुटख्याचे पाकीट दिसत असल्याने यांचे पिताश्री येतजात असावेत असं दिसतंय.. ;)
२७ नोव्हेंबर.....
काल रात्री पिल्लं दिसेचनात, म्हणून नीट शोधलं तर त्यांनी जन्मल्यास पहिल्यांदाच तो मानसिकरित्या ईअरमार्क केलेला दीड बाय दीड फुटाचा घरटं नावाचा चौकोन सोडून वळचणीत दुसर्या टोकाला भ्रमंती सुरु केली होती. सकाळी पाहिलं तेव्हा परत आली होती दोघंजणं.
माझ्या या कॅमेर्याचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे बर्याचदा उत्तम क्षण पकडण्याच्या कामी धोंड ठरतात. फोटो काढण्याचे बटण क्लिक केल्यावर कसलासा काउंटडाऊन सुरु होतो आणि तो अडकत अडकत कित्येक सेकंदांनी किंवा कधीकधी मिनिटभराने फोटो निघतो. मोक्याचा क्षण टिपला जात नाही.
तरीही आज पिल्लांची तुलनात्मक उंची, पिसं जोराजोरात साफ करणं, मानेचे व्यायाम :) असे बरेच फोटो मिळाले.
व्हिडीओमधे पिल्लांच्या माना किती लवलवतात ते दिसेल. एकदा मोठ्या पिल्लाने मान खांद्याच्याही खाली लटकेल इतकी खाली वळवली. दचकायलाच झालं, पण तो चमत्कारिक फोटो निघेपर्यंत पोज बदललेली. तरीही व्हिडीओत थोडी झलक दिसेल मानेच्या लवचिकतेची. इतक्या माना का वेळावतात कोण जाणे मधेच.. आवाज नीट ऐकू येण्यासाठी की खरंच मानेच्या लवचिकतेची प्रॅक्टिस? :)
व्हिडीओ शेवटपर्यंत बघा कारण, व्हिडीओच्या शेवटाकडे लहान पिल्लाने दिलेली खुन्नस कम मला घाबरवणारा पंख फुलवलेला पवित्रा लाजवाब.. आणि दोन्ही पिल्लांनी घसे फुग्यासारखे फुगवून सोडलेली हवा, यामुळे त्या कुकरशिट्टीचा उगम नेमका कुठे असतो ते आवाजासहित दिसेल. पूर्ण व्हिडीओ पहावा.
प्रतिमा:
मोठ्या पिल्लाच्या पंखांतली आणि पोटावरची जवळजवळ सर्व शुभ्र बालपिसं जाऊन त्याजागी प्रौढ घुबडाची मोठी रंगीत पिसं आली आहेत.



वेगवान पीससफाई:

३ डिसेंबर..
पिल्लं आता त्या वळचणीच्या एरियात मोकळेपणी बागडत असतात. मोठ्या पिल्लाने उडण्याचे काही धडे घेतलेत का हे कळलेलं नाही. सुटीच्या दिवशी अधिक काळ निरीक्षण केल्यानेच कळेल.
लहान पिल्लाच्या पंखातली पिसंही आता प्रौढ घुबडासारखी झाली आहेत. तेही लवकरच उडण्यासाठी तयार होईल असं दिसतं.
एका पायावर उभं राहणं हा दुसर्या पायाला विश्रांती देण्याचा प्रकार आहे की उगीच आपली स्टाईल हे माहीत नाही.


बाकी जबरदस्त इंटरेस्टिंग असा काही अपडेट नाही. घुबडाकडे पहायला मिळणारा वेळही कमी झालाय.
हैला.. ते घुबडाच्या अंगावरचं
हैला.. ते घुबडाच्या अंगावरचं ठिपक्यांचं टेक्श्चर कस्लं जबरा आहे!
सकाळ अगदी फ्रेश झाली!
बाकी, एक पायावरील चित्र बघून शाळेत शिकलेली बकान्योक्ती आठवली:
उभा राहे एके चरणि धरणीते धरुनीया
तपश्चर्या वाटे करित जणु डोळे मिटुनीया,
बका ऐशा ढोंगे तव अमति मासेच ठकती,
परि ज्ञाते तूझे कपट लवलाही उमजती .
कवी : कृष्णशास्त्री चिपळूणकर,
११ डिसेंबर.. धाकटाही मोठा झाला..
लहान पिल्लूही आता मोठ्याइतकेच मॅच्युअर झाल्यासारखं दिसतंय. उडण्याविषयी काय प्रगती ते मात्र कॅप्चर करणं शक्य झालेलं नाहीये. ही वळचण सोडून ते बाहेर उडाले तर फोटोग्राफीही अवघड आहे. मला वाटतं की दिवसा ते बाहेर पडणं शक्यच नाही कारण आसपासचे पक्षी त्यांना नुसते पाहूनही फारच कल्ला करतात. त्यामुळे तब्येतीत तपशीलवार उड्डाणशिक्षणाचा वर्ग घेण्याचा अवसर दिवसा त्यांना मिळेल असं वाटत नाही. आणि तसेही ते सिरियसली नॉक्टर्नल.. अर्थात पक्के निशाचर असल्याने रात्रीच शिकत असतील उडायला.. (अशी समजूत.)

दिसेनासे झाले की उडून गेले असं समजायचं.
मोठं पिल्लू उडालं..
२१ डिसें. - शनिवारपासून मोठं पिल्लू उडायला लागलं आहे. बराच काळ निघूनच गेलं होतं, धाकटं एकटंच राहिलं होतं.
त्यामुळे मोठं कायमचं उडून गेलं असं वाटलं. पण काल (२२ डिसें.) संध्याकाळी पाहिलं तर परत आलं होतं.
सध्या बहुधा उडण्याचा सराव चालू असल्याने विश्रांतीसाठी अधुनमधून परत येतंय असं दिसतं..
समोरच्या बागेत बरीच झाडं आहेत. प्रत्यक्ष उडणारं पिल्लू दिसत नसलं तरी त्या त्या झाडांच्या वर आकाशात भिरभिरत अखंड कावकाव करणार्या कावळ्यांच्या पिलासोबत भटकण्याच्या पॅटर्नवरुन पिल्लू कुठे आहे ते कळतं. उड्डाणाचे फोटो काढण्याची यंत्रणा आणि सुयोग्य परिसर नसल्याने ते करता येणार नाही.
पल्ला वाढला की मात्र पिल्लू परत न येण्यासाठी निघून जाईल. एनी डे नाउ.
आणि मी येते काही दिवस अनुपस्थित असणार. त्यामुळे बहुधा एकदोन आठवड्यांनी दोघेही निघून गेलेले आणि रिकामी झालेली जागाच थेट दिसणार मला बहुधा..
सध्यातरी घुबड आईबाप या उंचीवर पिल्लांना उडायला कसे शिकवणार हा प्रश्न निकालात निघाला आहे. ते त्यांनी व्यवस्थित तर्हेने साध्य केलेलं दिसतं आहे.
घुबडाचे कुटुंब
कळत नकळत या घुबडाच्या कुटुंबात सामिल झालो होतो. त्यांच्या अडचणी, त्यांची प्रगती, ती पिले जगतील, वाढतील की नाही याबद्दलची धाकधूक हे सगळे अनुभवताना स्वतःच एक घुबड असल्यासारखे वाटत होते. आता हे चक्र पूर्ण होताना 'पाडस' कादंबरीचे शेवटचे पान वाचताना होते तसे झाले आहे.
तुम्हाला शुभेच्छा, पिलांनो. माणसांच्या या अमानवी जगात सांभाळून राहा, सुरक्षित राहा. मोठे व्हा, शहाणे व्हा आणि आमची आजी म्हणायची तसे, म्हातारे व्हा.


एक प्रश्न
In reply to हेही फटू उत्तम. एक मजा म्हंजे by बॅटमॅन
माकडांना चोची असतात काय हो
तुमच्याततुमच्याकडे?