Skip to main content

ब्रोकोली सॅलॅड

पिझ्झासोबत आणि पास्त्यामध्येही खाताना ब्रोकोली मला प्रचंड आवडली. पण सॅलॅडमध्ये कच्चीच खायची तर अगदी कसंसंच झालं. आधीच ब्रोकोलीचा उग्र वास आणि मग त्यासोबत काय काय एकत्र जाईल ही एक शंका होतीच. थोड्या ट्रायल-एरर नंतर ही पाककृती सध्या बरी वाटतेय.

सर्वसाधारण स्वयंपाकात सतत तंतोतंत मापं असू शकत नाहीत. जिथे शक्य आहेत, तिथं दिली आहेत. नाहीत तिथं मात्र आपल्या आपल्या मगदुराप्रमाणं किती-काय-कसं हे थोडंसं आपलं आपणच उमजून घ्यावं हे उत्तम.

लागणारा वेळ
जास्तीत जास्त २० मिनिटे, भाज्या कापून तयार असल्यास पाच मिनिटांहूनही कमी.

साहित्य:-

  1. तर एक लहानसा ब्रोकोलीचा गड्डा. दुकानात मिळतो साधारण तेवढा एक. 
  2. एक ते दीड वाटी उभा चिरलेला कोबी
  3. एक वाटी ताज्या पनीरचे साधारण एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
  4. एक ते दीड वाटी गाजराचेही एक सेमीXएक सेमी आकाराचे तुकडे
  5. मूठभर पार्सली
  6. हवे असल्यास कोवळी पालकाची पाच-सहा पाने 
  7. दोन-तीन बदाम
  8. एक  बारीक कापलेली हिरवी मिरची
  9. पाच-सहा खजूरांचे उभे कापलेले तुकडे
  10. अर्धा चमचा तेल (शक्यतो ऑलिव्ह ऑईल)
  11. आठ-दहा मधोमध कापलेली काळी द्राक्षे/ मनुका (वैकल्पिक)

ड्रेसिंग

  1. एक वाटीभर टांगलेलं दही. (यासाठी रात्रभर टांगायचीही गरज नाही. स्वयंपाकास सुरूवात करण्याआधी एका चहाच्या गाळणीत दही ठेवून ते गाळणं एका वाटीभर ठेवून द्या. अतिरिक्त पाणी खाली वाटीत जमा होईल.)
  2. काळं मीठ
  3. अर्धा-पाऊण चहाचा चमचा साखर
  4. काळी मिरी
  5. मस्टर्ड सॉस

कृती-

  1.  ब्रोकोली सोडून इतर भाज्या, मिरची व खजूरचे तुकडे कापून तयार ठेवले.
  2. ब्रोकोली अशीच खायला चांगली लागत नाही. त्यामुळे मी सहसा ब्रोकोलीचे तुरे मायक्रोवेव्हमध्ये एक मिनिटभर ठेवून खायला घेते. या वेळेस अर्धा चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये गॅस हायफ्लेम वरती ठेवून दीडेक मिनिट चटचट भाजून घेतली व थंड होण्यासाठी बाजूला ठेवली.
  3. एका लहान कुंड्यात/बोलमध्ये पाणी काढलेले दही फेटून घेतले
  4. दह्यात मीठ+साखर+मस्टर्ड सॉस घातले*. त्यातच काळी मिरीची पावडर पेपर मिलमधून अगदी ताजी ताजी घातली. सर्व मिश्रण पुन्हा एकदा फेटून घेतले.
  5. थंड झालेली ब्रोकोली, पार्सली व इतर भाज्या+खजूर इ.वर हे ड्रेसिंग ओतले
  6. हलक्या हाताने भाज्या वरखाली करून सर्व ठिकाणी हे ड्रेसिंग नीट लागेल हे पाहिले.
  7. सलाद तयार.

     

 

टीप:-

  1. *दह्यात थोडीशी पुदीन्याची पाने देखील चुरून घालता येतील.
  2. द्राक्षे घातल्याने चव आणखीच वाढते. दाताखाली खजूर किंवा द्राक्ष आलं की मस्त वाटतं.
  3. फ्रीजध्ये साधारण एक तासभर ठेवल्यास सलाद चांगले मुरते व दही ड्रेसिंग+मिरचीची चव छान जमून येते.
  4. गॅस किंवा स्टोव्हशिवाय स्वयंपाक करायचा असल्यास हा प्रकार अगदी उत्तम. 
  5. दही आणि पनीरमधून  मिळणारे बी१२ हा या पाककृतीचा मुख्य घटक मानला जाऊ शकेल.
  6. शक्यतो ताजी मिरीपावडर वापरावी, चवीत नक्कीच फरक पडतो. त्यसाठी हे उपकरण उपयुक्त ठरावं.

आवड/नावड

नंदन Mon, 21/04/2014 - 19:26

सॅलड छान दिसतंय. निरनिराळे रंग, चव आणि पोत असणारे पदार्थ मिळून आलेत.
(गोट चीज हाही पनीरला एक उत्तम पर्याय ठरावा, असं वाटतं.)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 21/04/2014 - 19:31

सॅलड दिसतंय तर चांगलं ... उन्हाळ्यात खायला चांगला प्रकार आहे. उष्णतेच्या स्रोतासमोर उभं राहण्यापेक्षा असे काही पदार्थ खायला, त्या हवेत जास्तच सोयीचे वाटतात.

चिंतातुर जंतू Mon, 21/04/2014 - 19:34

उन्हाळ्यात संपूर्ण जेवण होऊ शकेल असं सॅलड! काही सुचवण्या -
आजकाल आपल्याकडे तयार क्रूताँ (croûton) मिळतात. ते ह्यात घालून पाहा.
नंदनच्या सुचवणीशी सहमती - गोट चीज किंवा फेटा चीज चांगलं लागेल.
खजूर-मनुका वगैरे गोड मेवा आवडत असेल तर सफरचंद-अक्रोड घालून वॉलडॉर्फच्या जवळही जाऊन पाहा.

मस्त कलंदर Mon, 21/04/2014 - 19:56

सध्या संध्याकाळचं खाणं म्हणून तीनेक आठवड्यांपासून सॅलड खातेय. त्यामुळे वेगवेगळे प्रयोग चालले आहेत. एकदोनदा चीज/अक्रोड घालून प्रयोग केले आहेत. तयार क्रूताँ हा पर्याय आवडला. एक शंका- ही ब्रेड असल्याने पाच-सहा तास रेफ्रिजरेट केल्यास चवीत फरक पडेल का? (पोत बदलेल)

मन Mon, 21/04/2014 - 20:07

कोबीसारखीच दिसणारी ब्रोकोली खूपच आवडते.
पण भारतात बाजारामध्ये,मंडईत वगैरे ब्रोकोली कुठे असते ?
मला ब्रोकोली खायची असेल तर sub way वगैरे सँडविच - सॅलड ह्यांचा आश्रय घ्यावा लागतो.

मस्त कलंदर Mon, 21/04/2014 - 20:15

In reply to by मन

आमच्याकडे छोटेखानी लोकल सुपरमार्केटात मिळते. अगदी चेंबूरमधल्या भाजी बाजारात देखील आव्हाकॅडो/किवी/ब्रोकोली/रंगीत भोपळ्या मिरच्या हे सगळंच मिळतं.

जंतू-क्रूताँ बद्दल धन्यवाद.

अमुक Tue, 22/04/2014 - 03:40

In reply to by मन

कोबीसारखीच दिसणारी ब्रोकोली
............यावर 'न'वी बाजूंच्या शेर्‍यांची वाट पाहत आहे. :)
(हलकेच घ्या हो मनोबा.)

धनंजय Tue, 22/04/2014 - 04:41

In reply to by मन

पानकोबी (इंग्रजीत कॅबेज), फूलकोबी (इंग्रजीत कॉलीफ्लावर), नवलकोल/गाठगोभी (इंग्रजीत कोलराबी) ब्रोकोली (इंग्रजीत ब्रॉकोली), हाक-पालेभाजी (इंग्रजीत कॉलर्डग्रीन्स), करमसाग (इंग्रजीत केल),आणि ब्रसेल्स स्प्राउट्स) या सर्व भाज्या एकमेकांच्या जवळच्या नात्यातल्या आहेत. या सर्व भाज्यांना एकच "स्पीशीज् नाव" आहे : Brassica oleracea. या वनस्पती एकमेकांसह सुफळ अपत्ये प्रसवू शकतात. या सर्व बागायती उपप्रजातींची मातृप्रजाती एकच.

यातील बहुतेक भाज्यांमध्ये पाने, किंवा पानांचे घट्ट गड्डे भाजी म्हणून वापरतात. अपवाद फूलकोबी, ब्रोकोली, आणि नवलकोल. ब्रोकोली म्हणजे फुलांच्या कळ्यांचा गुच्छ. फूलकोबी म्हणजे ज्यातून कळ्या उत्पन्न होऊ शकतील असे बुंध्याचे टोक (या प्रजातीत हे टोक खूपच सुजते/वाढते). नवलकोलाचा गड्डा म्हणजे सुजलेला/वाढलेला बुंधा. नवलकोलाची पानेसुद्धा पालेभाजी म्हणून छानच लागतात.

पाककृतीसाठी ही माहिती अवांतर आहे. पण उगाच "माहितीपूर्ण" शेरे गोळा करण्यासाठी हा प्रतिसाद दिलेला आहे. परंतु हा प्रतिसाद देण्याचे निमित्त (कुरापत), म्हणून बीजदोष सदस्य मन यांचा आहे. त्यांनी "ब्रोकोली कोबीसारखीच दिसते" म्हटले नसते, तर हा फाटा फोडायला अवसरच नव्हता.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 22/04/2014 - 08:07

In reply to by धनंजय

आणखी थोडे कूल पॉईंट्स मिळवण्यासाठी कोलराबी (नवलकोलच, पण आपण भारतात राहत नाही याची जाहिरात नको करायला!) च्या पाकृ लिहाव्यात अशी विनंती.

घनु Tue, 22/04/2014 - 10:32

In reply to by अनुप ढेरे

हा हा हा @ अवदसा

पण मलाही नवलकोल च्या रेसपीज हव्या आहेत. मी रोज ऑफिसहून येताना हायवे वर एक जण सगळ्या पालेभाज्या आणि कंदमुळं (बीट, सुरण) विकत बसलेला असतो, त्याच्याकडे अगदी ताजे नवलकोल भरपुर प्रमाणात असतात - घ्यायचा मोह होतो पण नवलकोल कधीच खाल्लं नसल्याने आणि त्याची पाकृ माहित नसल्याने घ्यावं वाटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 22/04/2014 - 19:12

In reply to by अनुप ढेरे

१. मला अवदसा सोडून दुसरं काय आठवणार?
२. बाजारात मिळतं म्हणून.
३. विचारलं, ते ही धनंजयला कूल पॉईंट्स मिळवण्याची संधी मिळावी म्हणून. खाणार असं वचन थोडीच दिलंय!

अनुप ढेरे Wed, 23/04/2014 - 13:54

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१. मला अवदसा सोडून दुसरं काय आठवणार?

असं कसं? तुम्हाला स्त्रीवाद पण आठवतो की कधी कधी. आता तुम्हाला अवदसा सोडून बाकी काही आठवत नाही आणि तुम्हाला स्त्रीवाद आठवतो. याचं '२+२' केल्यास जे कंक्लूजन निघतं त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? ;-)

२. बाजारात मिळतं म्हणून.

बाजारात गवत पण मिळतं.

३. विचारलं, ते ही धनंजयला कूल पॉईंट्स मिळवण्याची संधी मिळावी म्हणून. खाणार असं वचन थोडीच दिलंय!

धनंजयरावांना अजून कूल पॉईट्स मिळवायची गरज आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/04/2014 - 01:47

In reply to by अनुप ढेरे

१. अर्थातच. स्त्रीवाद्यांची तीच तर प्रतिमा बनवली गेली आहे. नसेल तर अजूनही प्रयत्न होतो. (उदाहरणं इथे नकोत. धुणी धुवायची तर घाटावर जाऊ या.) :-)

२. कोणी माहिती देणार असेल गवताचाही विषय काढता येईल. (नवलकोल टाईप कोणी सोपी पाकृ देणार असेल गवतही खाईन म्हणते.)अ, आ ते खाऊन माझं वजन वाढलं नाही की झालं.

३. पैसे किती पुरणार हे सांगता येतं का? तसं अगदी धनंजय असेल तरीही, कूल पॉईंट्स किती पुरतील ते सांगता येतं का? (इथे अगदीच फाल्तू फिल्मी वाक्य सुचलं होतं. पण ते फारच फालतू असल्यामुळे राहूदेत.)

---

अ. त्यावरून आठवलं. पुण्याच्या आमच्या हाफिसात अधूनमधून शेपूची भाजी करायचे. बाकी कोणतीही पाकृ कितीही बिघडवली तरी शेपूची भाजी बिघडवणं फारच कठीण. (ती मलाही जमते.) तिथेही चांगली असायची. पण शेपू न आवडणाऱ्या काही (#$%^&*) मित्रांचा सिद्धांत असा होता की आवारातलं गवत कापलं की दुसऱ्या दिवशी दुपारी शेपूची भाजी कँटीनमध्ये असते. सुरूवातीला मी उडवून लावलं. पण त्यानंतर त्यांनी दोन विदाबिंदू दाखवल्यावर, मी पण एखाद्या अनुभवी खगोलाभ्यासकाप्रमाणे हा सिद्धांत मान्य केला. आता ना राहिलं कँटीन, ना राहिलं गवत. (म्हणजे मीच 'छोड आये वो गलियां'.) तर आता सरळ शेपूच्या जुड्या विकत आणते आणि खाते. निदान मनाची खात्री पटते की हे इमारतीसमोरचं कापलेलं गवत नाही.

आ. गाजराचा पाला खरोखर तसाच लागतो. बेचव आणि गवती. तो पण मी खाल्ला आहे. त्यापेक्षा वाईट म्हणजे रंगीत स्विस शार्डचा पाला. त्यातल्या एका जातीला ऱ्हूबार्ब समजून मी त्याचा क्रंबल केला होता आणि वर इथे ट्यँवट्यँव करत पाकृही लिहीली होती.

---

अतिअवांतर - मस्त कलंदर, सॉरी.

ॲमी Thu, 24/04/2014 - 09:50

In reply to by ऋषिकेश

+१
:-D तळटिपा देऊन आपण 'न'वा पक्षमधे सामिल होत असल्याच अदितीने जाहीर केलं आहे. आणि ऐसीभारत ज्या दोन पक्षात होणार होते ते दोन्ही पक्ष फुटले आहेत.

धनंजय Tue, 22/04/2014 - 19:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

(सर्व मापे अंदाजाप्रमाणे)
१. मुगाची किंवा चण्याची डाळ भिजायला टाकावी (मुगाची २०-एक मिनिटे, चण्याची ~१ तास)
२.अ नवलकोलाचा गड्डा कोवळा असेल, तर (हवा असल्यास) सोलून) ~१-इंच (~२.५ सेमी) आकाराचे चौकोनी/घनचौरस तुकडे करावेत.
२.आ गड्डा जून असेल, तर सोलून किसून घ्यावा. किसल्या नाही जात अशा शिरा मग टाकून देता येतात.
३. तेलात मोहरी, हळद, हिंग, (आवडत असल्यास कढिलिंब) यांची फोडणी करावी. लाल तिखट घालावे, भिजलेली-निथळलेली डाळ टाकावी, आणि मग फोडी/कीस परतायला टाकावा.
४. फोडी असल्यास रस हवा त्या मानाने पाणी घालावे, कीस असल्यास खाली लागू नये इतपत थोडेसे पाणी घालावे. उकळी/वाफ आल्यावर पाणी असलेले झाकण ठेवून १० मिनिटे मंद आचेवर भाजी शिजू द्यावी.
५. भाजी शिजत आल्यावर (आवडत असल्यास गूळ आणि) चवीनुसार मीठ घालावे.
६. आचेवरून उतरवल्यावर (आवडत असल्यास खोवलेले खोबरे आणि) चिरलेली कोथिंबीर घालावी.

पाने कोवळी असल्यास अख्खी पाने (किंवा शिरा काढून जितपत कोवळा भाग आहे, तेवढा ठेवून) अशीच वापरता येतात. पानांच्या भाजीत लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरच्या चांगल्या लागतात.

पाककृतीसाठी धन्यवाद. पण कांदा-लसूण अजिबात नाही ?
साधारणतः फोडणीच्या पालेभाज्यांत लसूण आणि/किंवा कांदा (बरेचदा इतर उग्र वास कमी करण्यासाठी) असतात म्हणून विचारतो आहे.

धनंजय Wed, 23/04/2014 - 20:18

In reply to by अमुक

वास थोडा उग्र असतो, खरे. पण हा उग्र वास मला आवडतो.
----
या प्रतिसादाला अवांतर, मूळ पककृतीकरिता पुरवण्या :
१. नवलकोलाचा कीस न करता ते खोवताही येते.
२. नवलकोलाच्या किसाची भाजी असेल, तर फोडणीत डाळ टाकण्याऐवजी नंतर चण्याच्या डाळीचे पीठ पेरता येते. पीठ पेरलेली भाजी भरपूर तेल पीते.
---
(पुन्हा लसूण)
ऑलिव्ह ऑईल, लसूण मंद परतून, त्यात नवलकोल पाने व कीस कीस घालून, मग शिजल्यावर मिरपूड, मीठ, व्हिनिगर घालूनही भाजी चांगली लागेलसे वाटते. नवलकोलाच्या पानांची अशी भाजी मी केलेली आहे.

अतिशहाणा Wed, 23/04/2014 - 20:02

In reply to by धनंजय

साधारण अशीच रेसिपी वापरुन (पाणी न वापरता केवळ वाफेवर व हिरव्या मिरच्यांची फोडणी) अरुगुला, केल, स्विस चार्ड वगैरेंच्याही पालेभाज्या केल्या आहेत. मेथी-शेपूऐवजी चवबदल म्हणून चांगल्या वाटल्या. प्रयोग यशस्वी झाल्यावर अनेकदा आवडीने केल्या आहेत. जिज्ञासूंनी स्वतःच्या हिमतीवर करुन पाहाव्यात. स्विसचार्ड व अरुगुला या भाज्या शिजवल्यावर मेथी/पालकाप्रमाणे आकसून जातात. केलचे आकारमान साधारण तेवढेच राहते त्यानुसार कितपत भाजी शिजवायची याचा अंदाज घेता येईल.

घनु Tue, 22/04/2014 - 10:42

In reply to by मन

@मनोबा - तुला ब्रोकोली हवी असेल तर मॉल मधल्याभाजी बाजारत तर मिळेलच पण नाहीतर त्या मारवाडी लोकांच्या टिपीकल सुपरमार्केट किराणा दुकानांमधेही मिळेल (आय होप मकी ने तेच सुचवलं आहे बाय सेइंग छोटेखानी सुपरमार्केट). त्यांच्या कडे ब्रोकोली, बेबीकॉर्न, त्या रंगीबेरंगी सिमला मिरच्या, मशरुम, टोफू असं बरंच काही मिळतं. पण बर्‍याचदा त्यांच्याकडे फ्रेश नसतं असा अनुभव आहे. त्यामूळे मॉल मधल्या भाजीबाजारातून आणण्याला प्राधान्य देतो, ओशन मधे छान मिळतात भाज्या. मंडई किंवा तत्सम भाजीबाजारात ही हमखास मिळतं.
(अता एवढं सांगतिलं आणि टाइपलं आहे तुझ्यासाठी तर एक ब्रोकोलीची रेसेपी येऊ दे मनोबा तुझ्याकडुन ;))

राजेश घासकडवी Mon, 21/04/2014 - 20:16

सॅलड छान दिसतंय. पण ब्रोकोलीविषयी फार प्रेम नसल्यामुळे हे सॅलड ब्रोकोलीशिवाय केलं तर? असा प्रश्न मनात आला.

धनंजय Tue, 22/04/2014 - 00:53

In reply to by राजेश घासकडवी

"अंडे न घालता ही पाककृती करता येईल का?" या शाश्वत यक्षप्रश्नाची या निमित्ताने आठवण झाली :-)

तिरशिंगराव Wed, 23/04/2014 - 13:48

In reply to by 'न'वी बाजू

टुक्सेडो या इंग्रजी सिनेमात असंच काहीतरी दाखवलंय! म्हणजे कसले तरी जंतु मिश्रित पाणी प्यायलं की सगळ्या शरीराचंच डिहायड्रेशन होतं म्हणे! आपला जॅकी चॅन वाला हो!

बॅटमॅन Wed, 23/04/2014 - 15:37

In reply to by तिरशिंगराव

आयला तिर्शिङ्ग्राव, टक्सीडो हा कुठल्या जमान्यातला पिच्चर तुम्हांस अजून आठवतो म्हंजे कमालच आहे! आम्हांस तर त्यातील क्याथरीनतै झीटा जोन्सच तेवढ्या अजून आठवताहेत. बाकी स्मरण गेले कुठल्या कुठे.

मी Wed, 23/04/2014 - 15:55

In reply to by बॅटमॅन

त्यामधे कॅथरीन नव्हे जेनिफर लौ हेविट बाई होत्या, अमळ जुना असल्याने विस्मृती झाली असावी किंवा आय सिज व्हॉट माइंड वॉन्ट्स टू सी असे असावे. :)

मन Tue, 22/04/2014 - 07:11

In reply to by मेघना भुस्कुटे

उपोषण नावाची पाकृ बारीक होण्यासाठी उपयुक्त होय.
शिवाय काही न बनवणे, आणि काही न खाणे हीच त्या पाकृ ची महत्वाची अंगे असल्याने करण्यासही सोपी!
स्वतःच्या जबाबदारीवर निदान काही महिने तरी करुन पहावी ;)

मस्त कलंदर Wed, 23/04/2014 - 20:20

अवांतरः आता इथे पाककृतींची चर्चा चाललीच आहे तर मीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेते. रविवारी एका मैत्रीणीने एक सुकेळी आणली होती आणि तिचं काय करायचं असतं हे तिलाही ठाऊक नव्हतं. तर तिच्या आणि माझ्या भल्यासाठी सुकेळीचं नक्की काय करतात, नुसतीच खातात की तिची वेगळी पाकृ असते हे सांगा.

मिसळपाव Thu, 24/04/2014 - 15:37

In reply to by मस्त कलंदर

म्हणजे दुसरं काही करत असतील लोकं पण आम्ही तरी नुसतंच खातो. तुकडे करून 'टूटी-फ्रूटी' सारखे आईसक्रीममधे किंवा सॅलड मधे घालता येतील कदाचित.

"एक सुकेळी आणली होती" यामुळे तू दुसरं काही म्हणतेयस का काय अशी शंका वाटत्येय. सुकेळं = वाळवलेलं राजेळी केळं. एका पॅकात निदान सहा असतात.

अवांतरः "या सुकेळ्यांपेक्षा मला त्यांचं ते प्याकिंगच अधिक आवडतं" - पु.ल.

मस्त कलंदर Fri, 25/04/2014 - 11:27

In reply to by मिसळपाव

मी वरचा प्रतिसाद लिहिल्यानंतर ते पॅकिंग उघडलं. एक सुकेळी म्हणजे एक पॅक होता आणि आकारावरून आत एक मोठं केळच असेल असं वाटलं होतं.

नंदन Fri, 25/04/2014 - 11:46

In reply to by मस्त कलंदर

मीही बर्‍याचदा नुसतीच खाल्ली आहेत. वसईला एका मित्राकडे तुपावर परतून किंचित कॅरॅमलाईज्ड् केलेला पदार्थ खाल्लेला आठवतो, पण ती बहुधा राजेळी होती - सुकेळी नव्हेत.

एक निराळी रेसिपी सापडली इथे - http://maharashtratimes.indiatimes.com/lifestyle/food/articleshow/41149…? (तांदूळ बहुधा 'उसंडु'न आलेत या पाकृत).

मिसळपाव Sat, 26/04/2014 - 00:03

In reply to by नंदन

अरे ती तर भरली केळी. मी वर्षभर फोटो जपून ठेवलेत पा.कॄ. टाकायला! एकदा जमवतोच आता.

त्या लिंकवरची रेसिपी पाहिली. मका आणि सुकेळ्याची मिरची/कोथिंबीर घालून खिचडी??? 'ब्लू-मंडे' ला केल्येय का काय? ;-)