Skip to main content

ते सर्व!

बांधावरती उभे रहातात,

एकमेकांना खेटुन,

ते सर्व!

त्यांचं त्यांनाच कळत नाही

हळुहळु ते स्वतःच होऊन जातात बांध.

आणि मनातला किंवा मनाबाहेरचा अंधार

थोपवत रहातात, उद्याच्या आशेने.

पण एकमेकांना खेटुन,डोळे गच्च मिटुन

आणि लाटेकडे पाठ फिरवुन

प्रश्न सुटत नसतात.

मग अंधारपोकळीचं अवकाश होतं.

शरिरं भरडतात,

मनं उध्वस्त होतात.

रक्त, हिंसा आणि आरोळ्यानी

सारं काही भरलेलं असताना,

अन्यायी राजा नी शुर प्रजा

गोष्टींमधुन तुच्छ हसतात.

दंगलीत मेलेल्या कुणाचं तरी शव

असंच पडुन रहातं मार्गात,

कोल्हेकुत्रांच्या भयासकट.

मृत जखमांच्या जिवंत प्रेतांशिवाय,

उरलेली नगरें ध्वस्त होत रहातात.

मग ते सारे जमतात सुद्न्यपणे

काही झालंच नाही अशा मनाने.

वाळवी उखडुन टाकली जाते,

अंधार लिहीला जातो,

इतिहासाच्या सुवर्णाक्षरात.

मिटवला जातो

प्रश्नांसकट

व्रणांसकट

पण नुसतं लिहुन अंधार संपतच नाही

अंधार संपण्यासाठी नसतोच मुळी

आणि बांध सुद्धा तुटण्यासाठी बनवले जातायत

शतकानुशतकें.....

............सा… Wed, 01/02/2012 - 12:43

पहील्या ५/६ ओळी वाचून एक "एकजिनसी कुटुंब" डोळ्यांसमोर उभे रहाते. मग कविता वाचता वाचता पेपरातील बातमी आठवते - कुटुंबाची वीष खाऊन आत्महत्या किंवा तत्सम.

अंधार संपण्यासाठी नसतोच मुळी
आणि बांध सुद्धा तुटण्यासाठी बनवले जातायत

हरवलेल्या जहाज… Wed, 01/02/2012 - 12:59

In reply to by ............सा…

सारिका, तुम्ही मुद्दा बरोबर पकडलात. पण विषय मोठा आहे. अराजकाकडे दुर्लक्ष करुन जगत रहाणारा सामान्य माणुस मुळात पेटुन कधी उठतच नाहीये. अन्याय सहन करण्याची सवय झालेली बथ्थड मनं, कधी चित्कारतील की नेहमी हेच होत रहाणार? असा प्रश्न केला गेला आहे.

............सा… Wed, 01/02/2012 - 19:56

In reply to by हरवलेल्या जहाज…

होय कप्तान, मला ते कळले होते -

अंधार लिहीला जातो,
इतिहासाच्या सुवर्णाक्षरात.

या ओळींवरून पण मी माझ्यापुरता तीच संकल्पना कोती करून "करुणेची ऐश" करून घेतली.