अडगळीत गेलेल्या वस्तु आणि शब्द.
काळ पुढे जातो आणि नवनवीन संशोधनामधून नवनवीन चिजा बाजारात आणि वापरात येऊ लागतात. वागण्या-बोलण्याच्या रीती बदलतात. त्याबरोबरच जुन्या गोष्टी आणि शब्द अडगळीत आणि विस्मरणात जाऊन पडू लागतात. अशा चीजा, कल्पना, शब्द अशांची जर जंत्री केली तर ते मोठे मनोरंजक ठरेल. अशी जंत्री किती लांबेल आणि त्यामध्ये किती प्रकार आणि उपप्रकार असतील ह्याला काही मर्यादा नाही आणि कल्पक वाचक त्या जंत्रीमध्ये मोलाची भरहि घालू शकतील.
ह्या जंत्रीचा प्रारंभ म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये अदृश्य होऊ लागलेल्या काही गोष्टी मला सुचतात तशा लिहितो. (काहीजण मराठी भाषेचा येथे पहिल्याप्रथम उल्लेख व्हावा असे म्हणतील, पण मी इतक्या टोकाला जात नाही!) ही यादी मुख्यत: शहरी आयुष्याशी संबंधित आहेत कारण मला स्वत:ला तेच आयुष्य़ माहीत आहे.
गट १ वापरातील यान्त्रिक वस्तु - जुन्या प्रकारचे घडी घालून खिशामध्ये ठेवण्याचे सेलफोन्स, रोटरी फोन, प्रॉपेलरवर उडणारी प्रवासी विमाने, कोळशाच्या इंजिनांच्या आगगाडया, किल्ली द्यायला लागणारी गजराची घडयाळे, हाताच्या हालचालीवर चालणारी बिनकिल्ली-बॅटरीची घडयाळे, कोळशाच्या इस्त्र्या, कटथ्रोट वस्तरे, जिलेटसारखी ब्लेडस आणि ती घालण्याची खोरी, दाढीचा केकस्वरूपातील साबण आणि ब्रश.
गट २ वापरातील घरगुती वस्तु - स्वयंपाकघरातील अनेक भांडी (तांबे-पितळ्याची भांडी, वाटी, गडू, फुलपात्र, तांब्या, प्रवासासाठी फिरकीचा तांब्या, घागर, गुंड, आंघोळीचा बंब, तामली, सट, सतेले, ओघराळे, कावळा, बसायचे फुल्यांचे पाट, चौरंग, पूजेच्या वस्तु (पळी, ताम्हन, अडणीवरचा शंख, सहाण आणि गंधाचे खोड, रक्तचंदनाचे खोड, गंगेच्या पाण्याचे भांडे, पंचामृतस्नानाचे पंचपाळे, मुकटा.)
गट ३ कपडे - पुरुषांचे लंगोट आणि बायकांच्या बॉडया - झंपर, कोपर्या-अंगरखे-टापश्या-पगडया अशी वस्त्रे, बायकांच्या नायलॉन साडया आणि पुरुषांच्य़ा टेरिलिन पॅंटी, बुशकोट, सफारी, नऊवारी लुगडी आणि करवती धोतरे, अंग पुसण्याचे पंचे, मुलींची परकर-पोलकी.
गट ४ सामाजिक आचार - 'ती.बाबांचे चरणी बालके xxx चे कृ.सा.न.वि.वि' असले मायने आणि एकुणातच पोस्टाने पाठवायची पत्रे, तारा, 'गं.भा., वे.शा.सं.. ह.भ.प., चि.सौ.कां., रा.रा.' असले पत्रांमधले नावामागचे उल्लेख, 'लिप्ताचा स्वैपाक, धान्यफराळ, ऋषीचा स्वैपाक, निरसे दूध, अदमुरे दही, तीसतीन ब्राह्मण, अय्या-इश्श' अशा प्रकारचे विशेषतः बायकांच्या तोंडातील शब्द. जुन्या लग्नपत्रिका (सौ.बाईसाहेब ह्यांस असे डाव्या बाजूचे बायकांचे निमंत्रण, लेकीसुनांसह), शरीरसंबंध, चि.सौ.कां. इत्यादि, पानसुपारीचे समारंभ, सवाष्ण, मुंजा मुलगा जेवण्यास बोलावणे, गणपतीमध्ये आवाज चढवून म्हणायचे देवे, जेवणाआधी चित्राहुती आणि जेवणानंतर आपोष्णी.
गट ५ वजने, मापे, नाणी इत्यादि. - आणे, पै, पैसा, अधेली, चवली. पावली, गिन्नी अशी नाण्यांची नावे. खंडी, पल्ला, मण, पायली, पासरी, धडा, शेर, अदशेर, पावशेर, छटाक, रति, गुंज अशी वजने. गज, फर्लांग, कोस, वीत, हात ही लांबीची मापे. अडिसरी, पायली, रत्तल, अठवे, निठवे, चिपटे, मापटे, निळवे, कोळवे इत्यादि धान्यांची मापे. खण, चाहूर, बिघा अशी क्षेत्रफळाची मापे, पाउंड, स्टोन, हंड्रेडवेट ही इंग्रजी वजनी मापे.
असे गट आणि त्यातील वस्तूंच्या याद्या मारुतीच्या शेपटासारख्या कितीहि वाढविता येतील. ऐसीकरांनी यथास्मृति ह्यामध्ये भर घालावी हे विनंति. क.लो.अ.
आपला नम्र,
धागाकर्ता
माहितीमधल्या टर्म्स
माय टू सेन्टस!
गट १: पॉकेटवॉच, अॅटलस/हीरो सारखी साधी काळी बिनगियरची सायकल, सायकलच्या पॅडलमध्ये पायजमा/धोतर अडकू नये म्हणून मिळणार्याला त्या क्लिपा, पोलिसांच्या त्या पोटरीवर बांधायच्या पट्ट्या
गट २: पाटा-वरवंटा, खल-बत्ता, अडकित्ता
गट ३: बाराबंदी, पगडी, धोतरावर कोट घालायचा झाल्यास त्या कोटाच्या आतमध्ये घालायचे ते डगले, मलमलीची पैरण
गट ४: टांगे, पंगत, लहान मुलांचे बोरन्हाण, बायकांचे वाडी भरणे
गट ५: ढब्बू पैसा, चांदीचा रुपाया (ह्याला रुपया न म्हणता रुपाया असेच म्हणत असत!)
सायकलच्या पॅडलमध्ये
सायकलच्या पॅडलमध्ये पायजमा/धोतर/ट्राऊजर/जीन्स अडकू नये म्हणून वापरायच्या पिना गेल्या दशकात सायबाच्या देशात वापरल्या होत्या. मस्त फ्लोरोसंट हिरव्या रंगाच्या होत्या ... अंधारात दुसऱ्या सायकलवाल्यांच्या पोटऱ्या बघताना भूताच्या क्लिपा वाटायच्या.
(तीन-चार वर्षांपूर्वी थंडीत आमच्या घरात एकही धडकं चॅपस्टिक सापडेना. मग स्वतःवरच भडकून आम्ही सात-आठ चॅपस्टिक्स आणल्या आणि टीव्हीसमोर बसून घराच्या सगळ्या दिशेला त्या उधळून दिल्या. कुठेही बसलं तरी एक चॅपस्टिक हाताला लागली पाहिजे. तो प्रकार पाहून मला चॅपस्टिकन्हाण केल्यासारखं वाटलं.)
नऊवारी साडीला ह्याच क्लिपा
ह्या सायकलस्वारांच्या क्लिपा नऊवारी साडीतील बायका चालतांना पोटर्या उघडया पडू नयेत म्हणून पायावर वापरत असत अशी मला आठवण आहे. ही आठवण आणखी कोणाला आहे काय?
तसेच लाल आलवणातील पोलके न वापरणार्या विधवा आणि मागच्या दारी त्यांचे केस भादरणारे नापित आल्याचे कोणाच्या आठवणीत आहेत काय? माझ्या आहे म्हणून विचारतो. अशा वेळी आम्हा पोरासोरांना तिकडे जाण्याची बंदी असे.
'पोटिमा' ब्लाऊज - कमीतकमी हे वर्णन - कधी वापरातून गेले? का गेलेच नाही?
पोटिमा म्हणजे
पोटिमा म्हणजे पोट-दिसेल-न-दिसेल असा शिवला गेलेला - पक्षी: बघणाऱ्याची उत्सुकता वाढवणारा ब्लाउज.
(ही माहिती ऐकीव आहे. चुभू...)
त्यानंतर बहुदा ब्लाउजाची उंची आटत आटत सद्यपरिस्थितीप्रत पोचली असावी, आणि त्यामुळेच पोटिमा ब्लाउज आणि त्याचा हा usp कालबाह्य झाला असावा.
शंका
'सीसी' हा 'कार्बनकॉपी'चा संक्षेप आहे, की 'कॉपी' अशा अर्थीच्या 'सी' या संक्षेपाचे ल्याटिनष्टाइल अनेकवचन आहे? ('पेज' - ल्याटिनात बहुधा 'प्याजिना'/'पजायना'? चूभूद्याघ्या. - संक्षेप 'पी'; अनेकवचनी संक्षेप 'पीपी', तद्वत?)
(अवांतर: अनेकवचनांत संक्षिप्तरूपांच्या द्विरुक्तीची ही ल्याटिन परंपरा स्प्यानिशनेही पुढे चालू ठेवल्याचे आढळते. उदा., 'एस्तादोस उनिदोस' = 'ईई. यूयू.' (इंग्रजीत: 'यूएस').)
CC आणि BCC
CC म्हणजे Carbon Copy आणि BCC म्हणजे Blind Carbon Copy हे स्पष्टीकरण जालावर अनेक जागी सापडेल.
जुन्या जमान्यातील पत्रव्यवहारात Blind Carbon Copy हा प्रकार असल्याचे स्मरत नाही पण सर्व Copy मिळणार्यास मागमूस लागू न देता अन्य काहीजणास Copy पाठवायची एक पद्धत होती. 'Not on the Original (NOO)' असे लिहून त्याखाली अशा इतरांची नावे टाकली की तो शेरा असलेली Copy केवळ अशा इतरांकडेच जात असे आणि त्यांनाहि Copy मिळाली हे पहिल्या Copy मिळणार्यांस कळत नसे.
जेथे hierarchical protocol कटाक्षाने पाळला जात असे अशा कार्यालयांमध्ये वरिष्ठाला/ना पाठवायची Copy ही 'Copy submitted with respect to' अशा प्रस्तावनेसह जाई आणि अन्य ऐर्यागैर्यांना 'Copy to' ह्या अल्पाक्षरी प्रस्तावनेने जाई!
शब्द आणि वापर
'जानवे' हा शब्द चांगलाच अस्तित्व राखून आहे पण 'जानवे' या वस्तूचा वापर मात्र कमी कमी होतो आहे. तसाच 'मंगळसूत्र' हा शब्दही, साहित्यात दणकून पण प्रत्यक्षात कमीकमी.
पन्नाससाठ वर्षांपूर्वीची घरोघरच्या 'सांक्शी'त सापडणारी घरगुती पाळे/कांडे/बिया आज नाहीत. उदा. बेहडा, हरडा, बाळहरडी, मायफळ, कोष्ठकोलंजन, मुरुडशेंग, पिंपळी, सूतशेखरादि मात्रा, आंबेहळद, वेखंड, काटेकुंवर(कोरफड)
रिठे, शिकेकाई, गवलाकचरा, नागरमोथा, बावची, माका, ब्राह्मी.
अनेक भाज्या- केणी, कुरडू, अगस्ता, शेवग्याचा पाला, कोरळा, चंदन बटवा, भारंगी,अगदी करडई मोहरीसुद्धा.
ट्रान्झिस्टर रेडिओ, ट्रामगाड्या(मुंबईत), अँबॅसॅडर गाड्या, घरगुती डेस्क्टॉप् कंप्यूटर,वी.सी.आर्, टेप-रेकॉर्डर-प्लेयर, रेडिओग्रॅम, डिस्क्स, कॅसेट्स, पिवळ्या प्रकाशाचे बल्ब्ज़, पोर्सेलीन स्विचेस,
आणि, ग्रामीण भागात गेली काही वर्षे घराजवळ संडास बांधण्याच्या पद्धतीमुळे- मोठीमोठी बादलीसदृश टमरेले.
आदिवासी भागात बांबूची इरली,(आता प्लास्टिकचे खोपे) कणग्या, चकमक, शहरात सुपे, रोवळ्या, रव्या ( ब्लेंडर-मिक्सरमुळे), कोयते, विळे-विळ्या.
रानात कुर्हाडी,(मोठी झाडे यांत्रिक करवतीने कापतात, इंधनासाठी झाडे-झुडुपे वापरण्याचे प्रमाण कमी कमी होते आहे.)
शेतात मोट, रहाट, लाठ, या संबंधातले कितीतरी शब्द,
दिवल्या, चिमण्या, चूड, पलिते, मशाली. चूल, शेकोटी, कोलीत, किटाळे, विस्तव, अंगारे, निखारे, शेणी, गोवर्या, मशेरी.... बाभळीचे दातून, कडुलिंबाची टहाळी..
बेहडा, हरडा, बाळहरडी, मायफळ,
बेहडा, हरडा, बाळहरडी, मायफळ, कोष्ठकोलंजन, मुरुडशेंग, पिंपळी, सूतशेखरादि मात्रा, आंबेहळद, वेखंड, काटेकुंवर(कोरफड)
रिठे, शिकेकाई, गवलाकचरा, नागरमोथा, बावची, माका, ब्राह्मी.
या गोष्टी आयुर्वेदीक औषधांच्याच संदर्भात ऐकायला येतात. या कधी काळी घरोघरीही असंत हे माहित नव्हतं.
घरगुती डेस्क्टॉप् कंप्यूटर
ह्याचा अजूनहि एक उपयोग करता येतो आणि मी गेले ६ वर्षे तो करत आहे.
सहा वर्षांपूर्वी मी एक असा कंप्यूटर घेऊन त्याला मॉनिटर म्हणून मोठा 'एल् जी'चा फ्लॅट स्क्रीन टीवी RGB-PC कनेक्शनने जोडला. त्याच्यासाठी वायरलेस माऊस आणि कीबोर्ड घेतला (तसा तो HDMI वगैरेनीहि जोडता येतो.) दुसरीकडे केबल टीवीचे कनेक्शनहि त्याला दिले. कंप्यूटरमध्ये ४०० जीबी हार्डड्राइव आहे. ह्याखेरीज माझ्याकडे एक लॅपटॉपहि आहे.
हे दोन्ही कंप्यूटर्स मी कंप्यूटर्स म्हणून वापरतोच त्यामुळे माझ्या सर्व फाइल्स दोन्ही ठिकाणी आहेत. त्यामुळे बॅकअपचा प्रश्न सुटला मोठ्या स्क्रीनवर ७-८ फूट अंतरावरून आता मला यूट्यूब, नेटफ्लिक्स इत्यादि आरामात पाहता येतात. संध्याकाळच्या करमणुकीची ही उत्तम सोय आहे.
तास आणि किती वाजले.
असे बरेचसे शब्द आहेत की ज्यांचे अर्थच बदलले आहेत.
पूर्वी घड्याळात तासाचे टोले दिले जायचे. ज्या पितळेच्या गोलाकार जाड थाळीवर हे टोले दिले जायचे त्या थाळीला तास म्हणत.
हे "तास " कधीच इतिहास जमा झालेत. पण अजूनही आपण किती तास झाले किंवा कोणतीच घड्याळे सध्या वेळ वाजवून दाखवत नसली तरीही आपण किती वाजले असेच म्हणतो
या उलट
असाही एक धागा असावा की ज्यामध्ये गेल्या पन्नाससाठ वर्षांत वापरात आलेल्या वस्तू,रीतिरिवाज आणि आनुषंगिक शब्द यांची जंत्री असावी. उदा. बटाट/टा/टेवडा,'बर्मग्ठिव्का, तर्मग्ठिव्तो' वगैरे.
यात खूप मजा आहे. परवा एका बाईंकडून फुड्प्रोसेसरसाठी फुडप्रोसीजर शब्द ऐकला. एक आधुनिक पेहेरावातली तरुण मुलगी महागड्या सेल्-फोनवर मोठमोठ्याने बहिणीशी बोलताना वहिनीला शिव्या देत होती-' तिला काहीही सांगू नकोस. ती अगदी अकौंटंट नाही'.(अकाउंटेबल म्हणायचे असावे.)
पावभाजी हा शब्द आणि
पावभाजी हा शब्द आणि खाद्यप्रकार कसा आणि कधी जन्मला याबद्दल कोणाला माहिती अथवा आठवण आहे का?
साधारण तीसेक वर्षापूर्वी कोंकणातल्या लहान गावांमधे पावभाजी देणारी हॉटेल्स नव्यानेच सुरु झाल्याचं आठवतं. आत्ता जसे चायनीज प्रसिद्ध आणि कॉमन आहे तसे त्यावेळी पावभाजीचं झालं होतं. पाचदहा वर्षांमधे पावभाजी हा रेस्टॉरंटांतला अनिवार्य भाग झाला. केळकर आरोग्यभुवन (मुंबई व्हीटी.समोर.. हल्ली बहुधा कै.) या शुद्ध घरगुती टाईपच्या हाटेलासही ताक, साचिखि, डाळिंबीपुरी, थाल्पिठाच्या रांगेत पावभाजी लावणे भाग पडले होते असे आठवते.
असू शकेलही.मला असं म्हणायचंय
असू शकेलही.
मला असं म्हणायचंय की तीसेक वर्षापूर्वी मी कोंकणात होतो तेव्हा तिथे हे नाव हळूहळू नवीन पदार्थ म्हणून ऐकू यायला लागलं होतं. तोपर्यंत लोकांना माहीत नव्हतं.
म्हणजे कोंकणात त्याचा उगम आहे असं नव्हेच.. उलट कुठूनतरी सुरु होऊन ते पसरत पसरत तिथे कोंकणात पोचायला साधारण ८० च्या दशकाची सुरुवात उगवली होती असं मत आहे.
मुंबईत कधीपासून मिळते ?
मुख्य म्हणजे हा खरोखर नव्याने उद्भवलेला पदार्थ आहे की तो पुरीभाजी, थालिपिठाइतकाच प्राचीन आहे?
नव्याने सुरु झालेले चायनीजखेरीज अन्य पदार्थच आठवेनात म्हणून हे रोचक वाटलं.
उदा. खाद्यपदार्थांचे मुबलक
उदा. खाद्यपदार्थांचे मुबलक उल्लेख लिखाणात करणारे चिंवि, पुलं आदिंच्या लिखाणात पावभाजी असे आवर्जून कुठे लिहिलेले दिसले नाही.
पुलंच्या "खाद्यजीवन" मधे तर एकेका पदार्थाचा समाचार घेतला आहे. त्यातही "पातळभाजी-पाव" याचा उल्लेख आहे. पण "पावभाजी" असा नाही.
भाजीपाव आणि गोव्यातला उसळपाव किंवा "पुरी-पातळ भाजी" कॉम्बोमधली ती पातळ भाजी + पाव अश्या मूळ पदार्थातून आजची पावभाजी जन्मली असेल का? इम्प्रोवायझेशन ?
हां, तसा तर बटाटेवडाही
हां, तसा तर बटाटेवडाही अलीकडचा असणार. पेंडशांच्या 'एक होती आजी'मध्ये लंगोटे नामक हाटेलवाला मुंबई फ्याशनीनुसार बटाटेवडे नावाचा नवा प्रकार विकायला लागून लोकप्रिय होतो, असा एक उल्लेख आहे. नि मिसळ? तीही अलीकडचीच असणार.
बादवे, भैरप्पांच्या आत्मचरित्रात वाचलं होतं, त्यानुसार त्यांच्या लहानपणी मसाला डोसा हा अगदी बाजारू, सवंग, अनारोग्यकारक आणि उधळा (जुन्या मराठीत 'पावभिस्कुटं' कसा हेटाळणीनं वापरतात, तसा!) पदार्थ होता.
रोचक श्रेणी दिली आहे. कोणत्या
रोचक श्रेणी दिली आहे.
कोणत्या प्रदेशात मसाला डोसा अनारोग्यकारक, बाजारु समजला जात होता? मला वाटते "मसाला" डोसा (बटाटा भाजी भरलेला आणि जास्त कुरकुरीत केलेला डोश्याचा हा व्हेरियंटच) अनारोग्यकारक मानला गेला असावा. जाडसर घरगुती मऊ साधे डोसे, जे मला वाटते बर्यापैकी प्राचीन आहेत, ते मेनस्ट्रीम जेवणाचाच भाग होते असे वाटते.
वडा-पाव आणि पाव-भाजी
बटाटेवडा ही पेशव्यांच्या (नक्की कुठला पेशवा ते ठाऊक नाही) खानसाम्याची फाइन्ड आहे, असे कुठेसे वाचल्याचे आठवते. म्हणजे बटाटेवडा हा पदार्थ किमान दोनशे वर्षे तरी जुना आहे.
अर्थात, बटाटेवडा पावात घालून वडा-पाव हा पदार्थ ७० च्या दशकात मुंबईत तयार झाला, असे मानण्यात येते. जो पुढे शिवसेनेने पुरस्कृत केला.
पाव-भाजी हा प्रकार माझ्या मते तरी वडा-पावाच्या (नजिकच पण) नंतरचा.
ताडदेवच्या सरदाराची पाव-भाजी मी खाऊन बघीतली ती १९८८-८९ साली, मला काही खास वाटली नव्हती. त्यापेक्षा बोरीबंदरच्या कॅननची छान होती.
स्वातंत्र्यानंतर
पाश्चात्यांनी आणल्यामुळे पावाभोवती असणारं धार्मिक वलय धुसर नक्की कमी कधी व कसं झालं?
पंचहौद मिशन चा-बिस्कूट प्रकर्ण टिळकांच्या काळातीलच ना? म्हणजे तोवर तरी पावाला (हिंदू) समाजमान्यता नसावी. स्वातंत्र्यानंतर कधीतरी ती मिळाली असावी, असे वाटते.
तसेही आज पाव बनवणार्या बहुसंख्य बेकर्या मुस्लिम समाजाकडून चालवल्या जातात.
...
पाश्चात्यांनी आणल्यामुळे पावाभोवती असणारं धार्मिक वलय धुसर नक्की कमी कधी व कसं झालं?
यात पुन्हा एक गंमत अशी, की फिरंग्यांनी पावही आणला, नि बटाटाही आणला ('पाव' आणि 'बटाटा' दोन्हीं पोर्तुगीज भाषेतून आयात शब्द आहेत), परंतु पावाविरुद्ध जे धार्मिक वलय होते, त्या मानाने बटाट्याचा स्वीकार बराच झाला असावा. इतका, की बटाटे उपासालासुद्धा चालतात. इतकेच नव्हे, तर आम्हां भटुरड्यांना अंडीसुद्धा जेथे वर्ज्य, इतकी, की अंड्यांचे नावसुद्धा तोंडातून काढणे अब्रह्मण्यम्, तेथे अंड्यांचा उल्लेख चुकून करायची वेळ आलीच, तर 'पांढरे बटाटे' असा केला जात असे.
पावाविरुद्धची जी अस्वीकृती होती, ती केवळ तो पाश्चात्यांनी आणल्यामुळेच असावी काय? फिरंग्यांनी बाटविण्याकरिता विहिरीत पावाऐवजी बटाटे टाकले असते, तर (आणि तरच कदाचित) बटाट्यांविरुद्धही असा माहौल उठला असता काय? मुळात विहिरीत पाव टाकण्यामागेसुद्धा पावाचा ख्रिस्ताच्या मांसाशी संबंध जोडणारा ख्रिस्ती संकेत नसावा काय?
(बटाट्यांप्रमाणेच) रताळी, शेंगदाणे, मिरच्या याही मूळच्या अमेरिकेतल्या. कोलंबियन एक्स्चेंजमधून 'जुन्या जगा'त आलेल्या. त्याही बहुधा पाश्चात्यांनीच हिंदुस्थानात आणल्या असाव्यात. त्याही उपासाला चालतात.
पाव भाजी
जेव्हा जन्मला तेव्हा तो भाजी-पाव होता (पाव भाजी नव्हे).
हा प्रकार कनिष्ठ कामगारवर्गाचे जेवण म्हणून उदयास आला. दुसरी पाळी संपून कामगार घरी जात त्यावेळी ते हा भाजी-पाव खात असत.
ही भाजी स्वस्तात बनावी म्हणून कमी दर्जाच्या भाज्या घेऊन ती बनवली जाई. त्या कमी दर्जाच्या आहेत हे दिसू नये म्हणून त्या भाज्या पुरत्या स्मॅश करून टाकण्याची पद्धत आली.
त्या थोड्या खराब असण्याची शक्यता असल्याने त्या भाजीत खूप दरवळतील असे मसाले घातले जात.
अमूल बटरचे असोसिएशन भाजी-पावाशी नक्की केव्हा झाले हे ठाऊक नाही.
अवांतर
आता अखिल-मराठी-संकेस्थळसदस्यांनी या सार्या शब्दांचे आयडी धारण करून हा अस्तंगत होत चाललेला ठेवा पुन्हा वापरात आणावा/जतन करावा ऐसे ईप्सित.
उदा. 'ऐसी..'वरील माननीय सदस्य 'आडकित्ता' यांचा कित्ता गिरवावा. त्यांनी एकाच आयडीतून आड, कित्ता आणि आडकित्ता या तीन वस्तुरचनांचा वेध घेतला आहे. :)
पौण्डफर्लाङ्गादि...
पाउंड, स्टोन, हंड्रेडवेट ही इंग्रजी वजनी मापे.
पौण्ड यूएसएत जिवंत आहे हो, नव्हे चांगला लाथा घालतोय, थ्राइवतोय! (यूएसए आहे, तोवर पौण्डाला काय धाड भरलीय? यूएसएत व्यवहारात ज्या दिवशी मेट्रिक/एसआय पद्धत रुळेल, त्या दिवशी जगबुडी होईल, असे नोस्त्रोदामसने लिहून ठेवल्याचे जर आढळत नसेल, तर ते केवळ ती पाने पानशेतच्या पुरात वाहून गेल्याने, असे खुशाल समजावे!)
गज, फर्लांग, कोस, वीत, हात ही लांबीची मापे.
यूएसएत मैल जिवंत आहे, परंतु फर्लाङ्ग समजत नाही ('वन-एट्थ (ऑफ अ) माइल' म्हणून सांगावे लागते), हे एक आश्चर्य आहे.
अनेक गोष्टी अजूनही अस्तित्वात
१.
गट २ वापरातील घरगुती वस्तु - स्वयंपाकघरातील अनेक भांडी (तांबे-पितळ्याची भांडी, वाटी, गडू, फुलपात्र, तांब्या, प्रवासासाठी फिरकीचा तांब्या, घागर, गुंड, आंघोळीचा बंब, तामली, सट, सतेले, ओघराळे, कावळा, बसायचे फुल्यांचे पाट, चौरंग, पूजेच्या वस्तु (पळी, ताम्हन, अडणीवरचा शंख, सहाण आणि गंधाचे खोड, रक्तचंदनाचे खोड, गंगेच्या पाण्याचे भांडे, पंचामृतस्नानाचे पंचपाळे, मुकटा.)
पैकी सट, सतेले, पळी, ताम्हन, सहाण, गंगेच्या पाण्याचे भांडे वगैरे अजूनही बर्याच घरात सापडतात. लग्न झाल्यावर मुलगी सासरी जाताना तिच्या सोबत सहाण द्यायची पद्धत आहे. ज्या घरात अजूनही पूजा होते/गणपती बसतात/नवरात्र बसतात तिथे पूजेची उपरोल्लेखित भांडी असतातच असतात.
२. अंग पुसण्याचे पंचे - अजूनही फेयरली कॉमन
३.
लिप्ताचा स्वैपाक, धान्यफराळ, ऋषीचा स्वैपाक, निरसे दूध, अदमुरे दही, तीसतीन ब्राह्मण, अय्या-इश्श' अशा प्रकारचे विशेषतः बायकांच्या तोंडातील शब्द.
निरसे दूध, अदमुरे दही वगैरे अजूनही वापरात.
४.
चि.सौ.कां. इत्यादि, पानसुपारीचे समारंभ, सवाष्ण, मुंजा मुलगा जेवण्यास बोलावणे, गणपतीमध्ये आवाज चढवून म्हणायचे देवे
लग्नपत्रिका, इतर निमंत्रण पत्रिकांवर चि.सौ.कां., पानसुपारी वगैरे अजूनही अस्तित्वात आहे. पुनश्च, ज्या घरांत गौरी-गणपती/नवरात्र बसते त्या घरांत सवाष्ण-ब्राह्मण, मुंजा मुलगा इत्यादी अजूनही बोलावले जातात.
पावभाजी.
वर पावभाजीवर बरेच लिहिले आहे. त्यात थोडी भर.
सत्तर-ऐंशीच्या दशकात एका नातेवाईकांकडे गेट-टुगेदर होते तेव्हा जेवणाऐवजी चाट आणि पावभाजीचे स्टॉल्स ठेवले होते आणि हे काय वेगळे म्हणून पावभाजीकडे गर्दी होती. लोक पावभाजीवरच बोलत होते. आणि शेअरबाजारात (दलाल स्ट्रीट्वर) फारच छान पाव भाजी मिळते असेही रेकमेंडेशन होते. त्याच सुमारास मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला एका काकूंनी पावभाजी ठेवली तेव्हा घरात थोड्या असूयेने 'काय तरी नवे काढतात झाले. त्याला ना चव ना ढव. एकाने केले म्हणून दुसर्याने केले' अशी टीकाही झालेली आठवते. त्याआधी गुजराती शेजार्यांकडे बनलेला 'भाजीपांव' आमच्या घरी आला होता.
बादशाह मसाला-पाकिटावर' भाजीपाव मसाला' असेच लिहिलेले असते.
'सरदार'ची पावभाजी आवडत नाही. लोण्याचा गोळा जवळजवळ पावाएव्हढाच मोठा असतो. तोंड अगदी तुपट तुपट होऊन जाते. बटर कम म्हटले तरी 'इतना तो डालनाही पडेगा, नही तो टेस्ट नही आयेगा' अशी बोळवण केली जाते.
मराठी आं.जा.
मराठी आं.जा.वर मुंबईकर मराठी लोक फारसे दिसत नाहीत; दिसले तरी चर्चेत हिरिरीने भाग घेत नाहीत, त्यांची सुप्रसिद्ध नेमस्त वृत्ती जपत राहातात. यावरून काही प्रश्न उद्भवतात.
१)मराठी मुंबईकरांना मराठी आं.जा. फारसे महत्त्वाचे वाटत नसावे का?
२) इथे चर्चिल्या जाणार्या 'जागतिक' समस्यांशी त्यांना काहीच देणेघेणे नसावे का? उदा. ओबामांनी मोदींचे स्वागत करताना भगवा-तपकिरी कोट घालून हात जोडावे की कसे वगैरे.
३)त्यांना मराठी भाषेत लिहिता येत नसावे का?
४)जालावरचे मराठी त्यांना समजत नसावे का?
५)जन्मजात उदारपणानुसार मराठी आं.जा.वरची सर्व स्पेस त्यांनी पुणेकरांना आपणहून बहाल केली असावी का?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे,
६) मुंबईकरांच्या या अघोषित बहिष्कारामुळे मराठी आं.जालीय साहित्य थिटे थिटे आणि अपरे झाले आहे काय?
कापे गेली भोके राहिली ...
हे मुंबईबाबतच नव्हे तर, सर्वत्रच होते.
तलाव बुजवला आणि पर्यायाने त्याकाठचे धोबीदेखिल गेले. तरीही 'धोबी तलाव'* राहिलाच!
असेच अन्य जागांच्या बाबतीतही होत असावे.
अवांतर - ताडदेव ह्या शब्दाची फोड कशी होत असावी?
ताडांचा देव (ताड ह्या झाडाचा)
ताडांच्या वाडीतील देव
ताडासारखा (उंच) देव
ताडी पिणारा ताडगोळे खाणारा देव
...
...
* धोबी घाट ह्या नावाची एक जागा सिंगापुरातदेखिल आहे.
लँडमार्क शोधणे
या लँडमार्क शोधण्यावरून आठवलं.
वॉशिंग्टन डीसी शहराला भेट दिलेलं एक कुटुंब, शहरातलं सर्वाधिक प्रसिद्ध जागा "नॅशनल मॉल" सुमारे ३-४ तास शोधत बसलं होतं. नकाशांमधे सुमारे २ मैल गुणिले २ मैल इतपत मोठ्ठा दिसत असलेला मॉल त्यांना जंग जंग शोधून सापडेना.
कसा सापडणार ? "नॅशनल मॉल" म्हणजे व्हाईट हाऊस, वॉशिंग्टन मॉन्युमेंट, लिंकन मेमोरियल आणि कॅपिटॉल (लोकसभा) इमारत यांनी खुणा करता येतील असा, वॉशिंग्टन शहराचा (साधारण) आयताकृती मध्यवर्ती भाग. यात मग रस्ते, ऐतिहासिक इमारती, म्युझियम्स, सारं आलं.
अत्यंत निराश, हैराण अवस्थेमधे याबद्दलची माहिती विचारण्याकरता शेवटी त्यांचा जेव्हा आम्हाला फोन आला तेव्हा ते समजावून सांगताना हसूं आवरलं नाही खरं.
?
बोले तो, लहानपणी शिसपेन्सिलीचा एक प्रकार पाहिल्याचे आठवते, ज्याने नेहमीच्या शिसपेन्सिलीप्रमाणेसुद्धा लिहिता येई, परंतु शिशास थुंकी लावल्यास (ईईईईईई!) काही काळ सर्व जांभळेजांभळे उठे, तोच का हा?
आमची याददाश्त ठीक असेल, तर यास आम्ही बहुधा 'कार्बन पेन्सिल' म्हणून संबोधत असू, असे स्मरते.
या प्रकाराचे प्रयोजन मात्र कधीच समजले नाही.
...
पाव भाजी वरून आठवल बरेच जण भाजी पाव, पाव वडाही बोलतात.
आमच्या सदाशिव पेठेतल्या शाळेबाहेर हातगाडीवर मिळायचा त्याला पाववडा असेच म्हणत असत, असे स्मरते. (अवांतर: पाठ्यपुस्तकात 'तानाजीचा पोवाडा' की अशीच कायशीशी कविता होती, तिला आम्ही त्यावरून 'तानाजीचा पाववडा' म्हणून संबोधत असू, असेही स्मरते. रम्य ते बालपण. तेव्हा ब्रिगेड नव्हती.)
पुढे वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, वैट्ट्ट्ट्ट्ट, दुष्ष्ष्ष्ष्ष्ट!!!!!!! मुंबईकरांनी त्याचा वडापाव असा अपभ्रंश रूढ करून मराठी भाषा बिघडवली, अशी आमची अटकळ आहे.
शहरी भागात तरी होयसे
शहरी भागात तरी होयसे वाटते.
व्याही, विहीणी, पाहुणे (नातेवाईक या अर्थाने).
शिवाय कोल्हापूर साईडचा एक टावेलटोपी करणे किंवा टोपीटावेल करणे(मानपान करणे) अशा अर्थाचा शब्द आठवला. इतर कोणी ऐकला आहे का? तो ऑब्सोलीट नसेल, पण मोठ्या शहरात ऐकायला मिळत नाही.
मुख्यतः या सर्वच कन्सेप्ट्सबाबत मेट्रो, शहरी, निमशहरी आणि खेडेगाव अशी विभागणी केली पाहिजे. एका विभागात ऑब्सोलीट वाटणारी वस्तू किंवा शब्द दुसर्या विभागात प्रचलित असू शकतो. काही प्रथा शहराकडे फॅन्सी आयटेम म्हणून मायग्रेटही होत असाव्यात. उदा. गावाकडे कडकलक्ष्मी, वासुदेव आणि नंदीबैल कमी दिसायला लागले पण मुंबईत सोसायट्यांमधून रेग्युलर येतात.
कडकलक्ष्मीचा आसूड टोकाला खुला असतो (गाठ नसलेला). त्यामुळे तो मारल्यावर आवाज येत असला तरी त्यामानाने सिरियस वेदनादायक इम्पॅक्ट होण्यासारखा वजनबिंदू त्यात बनत नाही. पण समोरचा प्रेक्षक त्यामानाने बराच कळवळतो. प्रत्येक वेळी मारुन घेतल्यावर तो उलगडलेला पीळ परत परत गुंडाळत बसतो पण एकदाच गाठ मारुन टाकत नाही.
जालीय आत्मताडनासारखे एक्झॅक्टली.
माझा अनुभव
माझ्या पाहण्यात जे आले आहे त्यावरून असे वाटते की, मामंजी, वन्सं आणि जाऊबाई हे शब्द जवळपास हद्दपार झाल्यातच जमा आहेत. सासुबाई हा शब्द थेट हाक मारताना नसला तरी अपरोक्ष बोलताना अद्याप वापरला जातो. भावजी मात्र थेट हाक मारताना बर्याचदा ऐकला आहे - अगदी स्वानुभव!
सुनील (भावजी)
रेडिओच्या श्रुतिकांमधे "या या
रेडिओच्या श्रुतिकांमधे "या या या या या या" अश्या अत्यंत उत्साही यायानंतर हे भावजी येऊन आपल्या वहिनींना "वैनी चहा टाका बुवा" वगैरे ऑर्डर ठोकायचे किंवा "अरे वा वहिनी.. आज पोहे वाटतं" वगैरे बुभुक्षित उद्गार काढून ते अन्नघटक चापण्याच्या वेळेत एकीकडे झटपट "आज आपल्याकडे (स्टुडिओत) आलेल्या" शेती अथवा अर्थतज्ञाचे छापील बोजड भाषणाचे संपादित अंश प्रसारवून टाकायचे ते आठवलं.
अखंड सौभाग्यवती वज्रचूडेमंडीत
अखंड सौभाग्यवती वज्रचूडेमंडीत अमुक अमुक हा शब्द कालच शशी भागवत यांच्या पुस्तकात वाचला.
___
अदमुरे दही , निरसे दूध हे शब्द १००% अजुनही वापरात आहेत.
अन अय्या-इश्श्य हे शब्दही अजुनही वापरात आहेत. पैकी "अय्या" हा तर १००% नीट वापरात आहे. "इश्श्य" इतका जुना शब्द उघड म्हणायची आता थोडी लाज वाटते पण मनात म्हटला जातो ;)
___
निगरगट्ट व कोडगे हे शब्द मोठे झाल्यापासून ऐकले नाहीत ;)
चहाटळ, उलुसं, अष्ट्गंध, कळशी हे शब्दही तसेच, फारसे न वापरातले.
____