शिक्षण
संध्याकाळी सूर्यास्ताची वेळ. मुंबई छशिट स्टेशनच्या बाहेर मी आणि मैत्रीण टाईमपास करत बसलो होतो. थोडा जास्त अंधार झाला की दिव्यांमध्ये झगमगणारी स्टेशनची इमारत बघायची आणि घरी परत जायचं असा बेत होता. रस्त्यावरून स्टेशनाकडे चालत येताना दोघी थबकलो. समोर हे दृश्य दिसलं. मावशींना विचारून फोटो काढले.
आमच्यात छोटासाच संवाद झाला. "मावशी, तुम्ही या पर्सेस विकता का?" मावशी हो म्हणाल्या. "याला अभ्यास करायला आवडतो का?" मैत्रिणीने हिंदीतून विचारलं. मला म्हणाली, "आकडे इंग्लिश नाहीत, मराठी आकडे आहेत." मावशी म्हणाल्या. "मी मराठीच आहे. ही आर्यनमध्ये शिकते." मुलगी विनतक्रार सगळा अभ्यास करत होती; मावशींना तिच्या अभ्यासात एवढं लक्ष देण्याची गरजच नव्हती असं वाटलं.
मावशींच्या परवानगीने काढलेले हे फोटो -
सध्या एका अमेरिकन स्त्रीवादी प्राध्यापिकेने लिहिलेले निबंध वाचत आहे. त्यात एक निबंध आहे आपल्याला असणाऱ्या privileges बद्दल. आपल्याला जे काही मिळतं त्यात नाखूष असणाऱ्या लोकांना टप्पल मारताना, ती स्वतःला मिळालेल्या फायद्यांबद्दलही बोलते. ती म्हणते, माझ्या आईवडलांना आम्हां भावंडांच्या शिक्षणाबद्दल प्रचंड आच होती. असा विचार करण्याइतपत ही पोरगी मोठी होवो अशी सदिच्छा.
तू Humans of New York
तू Humans of New York बघितलंयस का? त्या धर्तीवर 'मुंबईकर्स' बघायला आवडेल.
'मुंबईकर' ही कल्पनाही आवडली.
'मुंबईकर' ही कल्पनाही आवडली. असे बरेच फोटो काढलेही आहेत. ते फुरसतीत दाखवेनच.
पण या छोट्या संवादाला स्वतंत्र स्थान असावं असं वाटलं. आई मुलीला शिकवत्ये, तिच्याकडून अभ्यास करवून घेते हे दृष्य नवीन नाही. पण रस्त्यावर पर्सेस विकताविकता एकीकडे मुलीचा अभ्यास करवून घेणं, मुलीनेही अजिबात तक्रार न करता, इकडेतिकडे न बघता अभ्यास करणं, वहीवर लिहिलेलं होतं तसं फुटपाथवरही आकडे लिहिलेलं असणं ... हे पाहून नित्यनेमाने तक्रारी करणारे, बरेच मध्यमवर्गीय परिचित आठवले.
भले या गोष्टीचा जीव छोटा असेल पण त्यातली सकारात्मकता पसरवल्याशिवाय राहवेना. शिवाय एक चित्र म्हणजे हजार शब्द वगैरे आहेच.
किती गं गोड बाळ आहे. मोठी होऊ
किती गं गोड बाळ आहे. मोठी होऊ दे खरच!!! पांग फेडू देत आईच्या श्रमाचं. अन मुख्य सबळ होऊ देत.
धागा आवडला.