Skip to main content

‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास' - किरण येले ह्यांच्या साहित्यकृतींवर आधारित नाट्यप्रयोग...

‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’

ठाणे आर्ट गिल्ड (टॅग)ने ‘नाट्यगंध’ ह्या उपक्रमाअंतर्गत सादर केलेला, नाट्यसंचित निर्मित ‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’ हा नाट्यप्रयोग नुकताच बघितला. किरण येले ह्यांच्या कविता आणि कथा यांचा एकत्रित नाट्याविष्कार असलेला हा अनोखा प्रयोग आवडला. लेखक म्हणून त्यांची साहित्यकृतींतून झालेली ओळख अधिक ठळक झाली. ह्यासाठी निर्माते भूषण तेलंग, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि कलाकार परी तेलंग व संचित वर्तक यांचे आणि टॅगचे मन:पूर्वक आभार.

‘बाई, अमिबा आणि स्टील ग्लास’ नाट्यप्रयोगातील पहिल्या अंकात ‘बाईच्या कविता’ ह्या कवितासंग्रहातील निवडक कवितांचं वाचन आणि दुसर्‍या अंकात ‘मोराची बायको’ हा कथासंग्रहातील ‘अमिबा आणि स्टील ग्लास’ ह्या कथेचं नाट्यरुपांतर.. ह्या दोन्हींतील एकजिनसीपणामुळे पुस्तकं वाचली होती त्यावेळी जे निसटलं होतं त्याची कसर नाटकामुळे भरून निघाली.

‘बाईच्या कविता’ मधली पहिलीच कविता --

‘आत अन् बाहेर
बाई म्हणजे गुंता
कधी तिचा तिनंच केलेला
कधी दुसर्‍यांनी बनवलेला

तिचा तिलाच
न सुटलेला
पुरुषाला
न कळलेला.’

ही कविता जेव्हा ८-९ वर्षांपूर्वी पहिल्यांदा वाचली तेव्हा ती फक्त स्त्रीविषयी आहे असं वाटलं, त्यावेळेपुरतं पटलंदेखील! पण आताच्या बदललेल्या ‘मी’ने नाटकातल्या पहिल्या अंकात जेव्हा रंगमंचावर वाचताना तीच काविता बघितली-ऐकली त्यावेळी ती स्त्री-पुरुष दोघांविषयीचीही आहे असं लक्षात आलं. दुसरा अंक बघितल्यानंतर तर खात्रीच पटली -- `माणूस हाच एकंदरीत गुंता आहे!

समाजानं स्त्री-पुरुष असा भेद करून दोघांवरही अन्याय केला आहे. आपल्या मनातील असुरक्षितता लपविण्यासाठी पुरूष स्त्रीला दुय्यम ठरवून सत्ताधारीपणाचं कवच स्वत:भोवती उभं करतो. पण सगळे पुरूष सारखे नसतात. काही पुरुषांची पंचाईत अशी होते की त्यांना त्यांच्या आत दडलेली असुरक्षितता बाहेर दाखवता येत नाही. तो स्त्रीसाठी हावी असला तरी गरजू आहे असं ‘दिसून’ चालत नाही.

नाटकातील नायक सत्ताधारी नसलेला पुरूष आहे. त्या त्या वयात वाटणारी स्त्रीची त्या त्या रुपातली गरज त्याला लपवता येत नाही. जेव्हा जेव्हा तो ती उघडपणे सांगतो तेव्हा तेव्हा त्याच्या वाट्याला नकार येत राहतात. नायकाच्या बालमैत्रीणीची आई त्यांच्यातली कोवळ्या वयातली मैत्री संपवते. शाळेतल्या लाडक्या बाईंच्या शाळा सोडून जाण्याने तो अस्वस्थ होतो आणि हे घरी सांगतो तेव्हा तर त्याची मोठी बहीण त्याला हसते. उरते फक्त आई, त्याला मायेने समजून घेणारी.
नाटकात हे बाहुल्यांच्या अनोख्या माध्यमातून आणि परी तेलंग ह्यांच्या समर्थ अभिनयातून उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे.

ह्या नायकाची एक मैत्रीण असते. त्यांचं लग्न होत नाही. आधीच्या मैत्रीत अनुभवलेले त्यांचे एकत्र क्षण तिच्या मनात कायम असतात आणि विवाहानंतरही ती त्याला भेटत रहाते. तिच्या ह्या मोकळेपणाचं त्याला आश्चर्य वाटतं. आपल्यातलं नातं नक्की काय आहे? आपण एकमेकांचे कोण आहोत? मित्र की प्रियकर-प्रेयसी? तिला मैत्रीतील शारीरिकताही मान्य आहे आणि नवर्‍याची प्रतारणा करतोय हेही डाचतंय म्हणजे नक्की कोणती बाजू खरी आहे?
त्यांच्यातील मैत्री, नातं, त्यातील शारीरिकता, प्रासंगिकता ह्याविषयी ती त्याला समजावत राहते. ती म्हणते, `अमिबा जसा आपल्यात झालेली वाढ स्वत:पासून वेगळी करून त्याला नवा जन्म देतो आणि मोकळं सोडून देतो, तसं मैत्रीत वाढलेलं नवं रूप वेगळं काढून त्याला मोकळं सोडून देता यायला हवं.' त्यांच्यात घडून गेलेल्या निरनिराळ्या प्रसंगांच्या संदर्भासहित ती त्याला त्यांचं नातं समजावून सांगते.
ती म्हणते, ‘प्रासंगिकता ही प्रासंगिकच असायला हवी. तू गुंतू नकोस त्यात.’
त्याचं म्हणणं असतं की ‘कोणतंही रिलेशन कॅज्युअल नसतं, नसावं. त्यात ऊब असायला हवी.’
ती म्हणते, ‘तू प्रत्येक संबंधात प्रेम शोधत राहतोस, ऊब शोधत राहतोस. तशी ती प्रत्येक संबंधात मिळणं शक्य नाही. धिस अक्चुअली इज युअर प्रॉब्लेम, यु हॅव टू फाईंड आऊट अ सोल्युशन.’
आणि तो सोल्युशन शोधायला लागतो.

तो एका वारांगनेकडे जातो. वारांगनाच का? एकावेळी अनेक पुरूषांसोबत केवळ व्यावसायिक गरजेपोटी शरीरसंबंध राखणार्‍या स्त्रिया स्त्री-पुरुष नात्यांचा, त्यातील प्रेमाचा-ऊबेचा विचार कसा करत असतील? तिला भेटण्याचा त्याचा हेतू `सोल्युशन' शोधणं हा असतो. तिला मात्र तो नेहमीच्या गिऱ्हाईकासारखाच आहे असं वाटतं आणि एका बंद खोलीत सवयीने ती त्याच्यासमोर साडी फेडून उभी रहाते. तरीही त्याला स्त्रीची भुरळ पडत नाही यामुळे आश्चर्यचकित होते. शारीरिक आकर्षणाचा लवलेशही नसलेल्या ह्या पुरूषाशी बोलता-बोलता तिला तो अधिक समजत राहतो. त्याच्या मनातील गोंधळ तिच्या लक्षात येतो. तिच्या परिने त्याला समजावताना स्टीलच्या ग्लासचं उदाहरण ती त्याला देते. आणि त्या ग्लासकडे बघता बघता, ती देत असलेल्या स्पष्टीकरणाने त्याच्या मनातला गोंधळ नाहीसा होतो. ‘बाई’विषयी, ती नात्यांकडे कसं बघते याविषयी त्याला अधिक स्पष्टता येते.

परी तेलंग ह्यांनी वारांगनेची भूमिका ज्या धिटाईने आणि सफाईने केली आहे त्याला तोड नाही. चित्रपटातल्या पडद्यावर असे प्रसंग बघणं आणि रंगमंचावर थेट बघणं ह्यातला फरक लख्खपणे जाणवतो, कारण नकळत आपला श्वास रोखला गेलेला असतो. संचित वर्तक ह्यांनी गोंधळलेल्या मन:स्थितीतला, तसंच वारांगनेसमोर अवघडलेल्या शरीराने वावरणारा पुरूषही उत्तम सादर केला आहे.
एक मात्र खरं की ही कथा वाचली होती तेव्हा हा भाग काहीसा पसरट झाला आहे असं वाटत होतं आणि बघतानाही तसंच वाटलं.

माणसाला अन्न-वस्त्र-निवार्‍याइतकीच मूलभूत आवश्यक असते ती नात्यांतील ऊब-सुरक्षितता. ती जर नसेल तर जगणं अवघड होतं. एकदा का त्या नात्याची, त्यातील निश्चिततेची, सुरक्षिततेची खात्री पटली की माणसांना आश्वस्त वाटतं. ह्या टप्प्यापर्यंत स्त्री-पुरूष असा भेद नाही. फरक कुठे पडतो? कोणत्या नात्यातून ती मिळू शकेल आणि कोणत्या नाही हे समजून घेण्याच्या स्त्री आणि पुरूष यांच्या पध्दतीत! ज्या वेगाने स्त्री स्वत:ला सुरक्षित करून घेते तो वेग पुरूषाला अजूनही साध्य झालेला नाही. म्हणूनच ईमरोज म्हणतात ते लगेच पटतं, ‘आदमी औरत के साथ सोता है, जागता क्यौं नही?’

चित्रा राजेन्द्र जोशी, ठाणे
११.६.१९

समीक्षेचा विषय निवडा

'न'वी बाजू Fri, 02/08/2019 - 17:24

...या तीन असंबद्ध गोष्टींमध्ये ओढूनताणून संबंध जोडण्याचा निष्फळ (परंतु तितकाच रोचक) प्रयत्न.

अशी त्रिकूटे जुळवून पाहिली पाहिजेत. छंद (टाइमपास) म्हणून.

('इडली, ऑर्किड आणि मी' एवढे एकच चटकन आठवते. तेही माझे नव्हेच. मेबी आय ॲम नॉट गूड ॲट इट.)

कोणाला काही सुचतेय?

अस्वल Sat, 03/08/2019 - 00:04

In reply to by 'न'वी बाजू

परी कासव आणि {आणखी काहीतरी} अशी एक रत्नाकर मतकरींची गोष्ट होती असं आठवतं.
पण काहीही असू शकतं-
बाबा रामदेव, कुत्रा आणि चेर्नोबिल.
अंगण, तूप आणि पिस्तूल.
इ.इ.

'न'वी बाजू Sat, 03/08/2019 - 01:10

In reply to by अस्वल

बाबा रामदेव, कुत्रा आणि चेर्नोबिल

ठीक आहे, अगदीच वाईट नाही, परंतु यातले चेर्नोबिल हे जरी अगदीच विजातीय असले, तरी बाबा रामदेव आणि कुत्रा यांचा काहीतरी (साधासोपा) संबंध जुळविता येणे अगदीच कल्पनातीत नाही. याहून थोडे असंबद्ध करता आले, तर मजा येईल.

अंगण, तूप आणि पिस्तूल.

हं, हे छान आहे.

'न'वी बाजू Sat, 03/08/2019 - 01:58

एरंडेल, रेल्वे जंक्शन आणि हॅम्लेटच्या बापाचे भूत.
पोलीस, टमरेल आणि दातांचा दवाखाना.
पेट्रोलपंप, वावटळ आणि डालड्याच्या डब्यातली तुळस.
शेपूट तुटलेला कोल्हा, पिरॅमिड आणि सुधीर फडके.
बर्फ, कांगारू आणि ओसामा बिन लादेन.
खारीक, पाणबुडी आणि तिरक्या चालीचा उंट.
ब्रेक, शिंक आणि पायमोज्यातले भोक.
बहिरीससाणा, मोरारजी आणि स्टीरियो.
चाक, नाकपुडी आणि कारखान्यातला भोंगा.
पेपरवेट, साबूदाणा आणि तिरुवनंतपुरम.

गवि Sat, 03/08/2019 - 02:15

In reply to by 'न'वी बाजू

सिंह, तवा आणि कढीलिंब.

बाय द वे, एका दुकान कम घराबाहेर (असं अर्थातच कोंकणात असतं) "येथे देव^, कोळसा आणि पॅन्ट चेन्स* मिळतील" असं लिहिलेलं होतं.

आजपर्यंत याला बीट करणारं काहीं मिळालं नाही.

^ देवाच्या मूर्ती, आय गेस
*पॅन्टची स्पेअर झिप

'न'वी बाजू Sat, 03/08/2019 - 03:58

In reply to by गवि

...असे लिहिणार होतो, परंतु तेवढ्यात तुमची एंट्री आली. बऱ्यापैकी सिमिलर आहे. चालायचेच. ग्रेट माइंड्ज़ थिंक अलाइक / कारण शेवटी आम्ही भटेच.

बाकी, पुण्यात 'येथे सायकल आणि स्टोव्ह रिपेअर करून मिळेल' अशी पाटी अतिसामान्य गणली जाते. मात्र, देव, कोळसा आणि पँट चेन्स हे काँबिनेशन अत्युच्च आहे. मानले!

'न'वी बाजू Fri, 09/08/2019 - 13:29

In reply to by मनीषा

आवडले.

(खास करून पहिले. दुसरेही चांगले आहे, परंतु उगाचच गहनगंभीर वाटते. उलटपक्षी, ज्याच्यावरून हे सगळे सुरू झाले, ते 'बाई, अमीबा आणि स्टीलचा ग्लास' मुळीच गहनगंभीर वाटत नाही; रादर, थिल्लर वाटते. नाही, डोंट गेट मी राँग, 'सुंदरी, किल्ली आणि संध्याछाया'सुद्धा ऑन इट्स ओन मेरिट उत्तमच आहे, परंतु त्याची जॉन्र किंचित वेगळी आहे. असो.)

गवि Fri, 09/08/2019 - 14:01

In reply to by 'न'वी बाजू

सुंदरी, किल्ली आणि संध्याछाया'सुद्धा ऑन इट्स ओन मेरिट उत्तमच आहे, परंतु त्याची जॉन्र किंचित वेगळी आहे.

हेच म्हणायचे होते. सुंदरी, किल्ली आणि संध्याछाया या त्रयीने अनेक (सुसंगत) प्रसंग सूचित होऊ शकतात..

सामो Fri, 09/08/2019 - 22:23

In reply to by गवि

धन्यवाद गवि. :) तुम्हाला माझ्यातर्फे हे गाणे भेट. काल पहील्यांदा ऐकले. विनोदी आहे. -

गवि Fri, 09/08/2019 - 22:41

In reply to by सामो

मस्त.

त्याच्याच बनाना बोट सॉंगचा भास होतो मधेच. अर्थात सिग्नेचर असणारच.

याच माणसाचं जमैका फेअरवेलदेखील खूप खूप गोड आहे.

सामो Fri, 09/08/2019 - 23:06

In reply to by गवि

+१
होय जमैका फेअरवेल .... सुमधुरेस्ट आहे!!!!
+१
होय बनाना बोट गाण्याचा भास होतो.

'न'वी बाजू Sat, 10/08/2019 - 17:22

In reply to by गवि

नाही म्हणजे, एंट्री सुबक आहे, मनापासून आवडली. त्याबद्दल वाद नाही. परंतु...

...तूर्तास मी 'सुपर्ब!!!' एवढेच म्हणून खाली बसेन. 'विनर..!!!' म्हणून पारी घोषित करण्याची इतक्यातच घाई करणार नाही. काय आहे, की आत्ताआत्ता कोठे या खेळात मजा येऊ लागली आहे; आणखी कोणाकोणाला खेळात सामील व्हायचे असेल, तर त्यांना त्यापासून वंचित काय म्हणून करायचे?

'आता बास!' असे आडून सुचविल्याबद्दल गविंचा कडक निषेध! आणि त्याकरिता सामोंच्या खांद्याचा वापर (त्यांना पत्ताही लागू न देता) आडून वार करण्याकरिता परस्पर केल्याबद्दल तर डबल निषेध!!

(अर्थात, सामोंनी ड्यू डिलिजन्स करायला पाहिजे होता, हे खरेच. परंतु म्हणून घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य कमी होत नाही, हेही तितकेच खरे. असो चालायचेच.)

'न'वी बाजू Sat, 10/08/2019 - 19:57

In reply to by सामो

तुमच्याबद्दल शंका नाही. फक्त, तुम्हाला 'विनर' म्हणून घोषित करून गविंनी अप्रत्यक्षरीत्या 'आता बास!' म्हणून सुचविले, त्याचा निषेध केला, इतकेच.

'न'वी बाजू Sat, 10/08/2019 - 22:31

In reply to by सामो

शंकराची पिंड - डंबेल - कबूतर

हे तितकेसे जमत नाही. बोले तो, गविंनी सुस्पष्ट केलेल्या निकषाप्रमाणे (त्याबद्दल गविंचे आभार.), शंकराची पिंड, डंबेल आणि कबूतर या त्रयीने किमान एक तरी (सुसंगत) प्रसंग सूचित होऊ शकतो. (निदान, मला तरी होतो.)

बोले तो, शंकराच्या पिंडीवर कबूतर हगत होते, त्याच्या टाळक्यात डंबेल घातली.

त्यामुळे, ही एंट्री (माझ्याकडून) बाद. (पुढल्या प्रयत्नास अर्थात माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी (भित्यापाठच्या ब्रह्मराक्षसाप्रमाणे) आहेतच.)

..........

अवांतर: यावरून एक ऑफबीट विनोद आठवला.

युरोपातल्या कोठल्याश्या मध्ययुगीन नगरातली ही कथा आहे. नगराच्या कोठल्याश्या चौकात, एका कोपऱ्यात एका पुरुषाचा, तर विरुद्ध कोपऱ्यात एका स्त्रीचा, असे दोन दगडी नग्नपुतळे, एकमेकांकडे आर्तपणे टक लावून पाहात आहेत, अशा पोझमध्ये उभारलेले असतात. अगदी रतिमदनाची जोडी म्हणा ना! आत्यंतिक कलात्मक शिल्प असते ते. अनेक शतके चौकाची - आणि नगराची शोभा वाढवीत उभे असते.

एकदा काय होते, नगरावरून एक देवदूत रात्रीचा उडत चाललेला असतो, तो चौकावरून उडत असताना त्याच्या दृष्टीस हे शिल्पद्वय पडते, आणि त्याला त्या शिल्पद्वयातील युगुलाची दया येऊन त्याचे हृदय द्रवते. एवढे सुंदर, होतकरू युगुल, परंतु दगडी शिल्पात शतकानुशतके अडकून पडल्यामुळे त्यांना केवळ एकमेकांकडे आर्तपणे पाहात बसण्यापलीकडे अधिक काही करता येऊ नये ना! केवढा हा दैवदुर्विलास! कित्तीकित्ती अरमान दडून राहिलेले असतील, उचंबळून येत असतील त्यांच्या दिलांतून! त्यांना थोड्या वेळाकरिता का होईना, पण जिवंत होऊन आपली कामनापूर्ती करता आली तर?

असा विचार येण्याचाच काय तो अवकाश, देवदूत ताबडतोब चौकात उतरतो, नि चौकाच्या मध्यभागी उभा राहून आपली जादूची कांडी फिरवितो. दोन्ही पुतळे लगेच जिवंत होऊन आपापल्या पेडेस्टलांवरून खाली उतरून त्याच्यासमोर उभे राहतात, नि त्याला वंदन करतात. त्यांना उद्देशून तो म्हणतो, "बाळांनो, तुम्हाला मी वर दिलेला आहे. पुढील तासाभराकरिता तुम्हाला मी जिवंत केलेले आहे. दुर्दैवाने, त्याहून अधिक काळाकरिता (किंवा कायमचे) तुम्हाला जिवंत करण्याची आम्हाला पॉवर नाही. तेव्हा, बरोबर एका तासानंतर तुम्ही पुन्हा दगडी पुतळे बनून आपापल्या पेडेस्टलावर जाऊन आपल्या पूर्वीच्या पोझमध्ये शतकानुशतके उभे राहाल. तेव्हा, लक्षात ठेवा, तुमच्याजवळ बरोबर एक तास आहे. तेवढ्या तासाभरात तुमच्या ज्या इच्छा, कामना वगैरे असतील, त्या पूर्ण करून घ्या. गो, युअर टाइम स्टार्ट्स नाव!" असे म्हणून देवदूत पुन्हा उडत आपली मार्गक्रमणा करू लागतो.

इकडे शिल्पद्वयातला पुरुष शिल्पद्वयातल्या स्त्रीला म्हणतो, "हे बघ, मौका तर चांगला चालून आलेला आहे, पण वेळ आपल्याकडे फारच थोडा आहे. तेव्हा, आलटूनपालटून, आळीपाळीने केले, तरच आपले काम होण्यासारखे आहे. असे करू या, पहिला अर्धा तास तू सर्व कबूतरांना जमिनीवर दाबून धर, नि मी त्यांच्यावर हगतो; त्यानंतर मग उरलेला अर्धा तास... पण बदला तो आज हम दोनों ले कर ही रहेंगे! अशी संधी पुन्हा किती शतकांनंतर चालून येईल, कोणास ठाऊक? तेव्हा, चल; आता एक क्षणही वाया न घालविता त्वरित कामाला लागू या."

सामो Sun, 11/08/2019 - 11:23

In reply to by गवि

सहज शक्य दृश्य डोळ्यासमोर येत असल्याने नापास.

अगदी अगदी.
ट्च! ट्च!! नबांनी अगदी फुल टॉसच टाकला. की कोणी हाफ-चड्डीतलं पोरही संबंध दाखवु शकेल.
काय हे नबा ;)

'न'वी बाजू Sun, 11/08/2019 - 21:44

In reply to by सामो

हाफ-चड्डीतलं पोर

यात आरेसेसचा काय संबंध?

उगाच राजकारण मध्ये आणू नका!!!

'न'वी बाजू Sun, 11/08/2019 - 22:25

In reply to by गवि

'न'वी बाजू एका हाताने माश्या हाकलत कळफलक बडवीत बसले आहेत हे सहज शक्य दृश्य

अधोरेखिताबद्दल आक्षेप आहे.

उपरोल्लेखित कसरत ही साधारणतः एक हात (स्वतःच्या) पोटावरून फिरवीत असताना एकसमयावच्छेदेकरून दुसऱ्या हाताने (स्वतःचेच) टाळके थोपटण्याच्या कोटीतली कसबाची, कौशल्याची चीज आहे. (कौशल्यावाचून एक तर टाळक्यावरून हात तरी फिरविला जातो, नाहीतर पोट तरी थोपटले जाते. विश्वास नसल्यास हे स्वतः करून पाहा.)

अशा परिस्थितीत, प्रस्तुत कौशल्यपूर्ण कसरतीच्या आविष्कारास निव्वळ 'सहज शक्य दृश्य' असे संबोधून तिच्या अवमूल्यनाचे कारस्थान हे केवळ गर्हणीय आहे.

की, 'रा. 'न'वी बाजू यांस हे कौशल्य अवगत आहे, इतके की, त्यांच्याकरिता हा हातचा मळ आहे; तस्मात्, रा. 'न'वी बाजू यांच्या संदर्भात हे एक सहज शक्य दृश्य आहे' असे काही यातून सुचवावयाचे आहे?

इन विच केस, मे आय टेक इट टू बी अ काँप्लिमेंट? (ॲन अनडिज़र्व्ड काँप्लिमेंट, परहॅप्स, बट नेवरदलेस अ काँप्लिमेंट?)

गवि Mon, 12/08/2019 - 07:53

In reply to by 'न'वी बाजू

दृश्य सुचून दिसायला सोपे आहे असे म्हटले. उभे करणे अवघड असू शकते हे मान्य. पुन्हा जिथे राहता तिथे माश्यांचे दुर्भिक्ष्य असल्यास त्या कुठूनतरी उत्पन्न करणे हेही कठीणच हे मान्य.

सामो Sun, 11/08/2019 - 17:18

साय-साखर - चाणक्य - काटा
केशर - शिवणयंत्र - चांदणी
चुंबन - भाकरी- लगोरी
मेतकूट - दव - दक्षिणा
पादुका - पाकीट - कार्ले
________
हे लक्षात आलेले आहे की वैश्विक किंबहुना विस्तारीत का होइना, ज्या घटकाची पोच आहे, असा घटक घेतला की मग अवघड होउन बसते. उदाहरणार्थ चांदणी घेतली तर मग बरेच शब्द बाद होउन जातात. मोती शब्द घेतला तर मोत्याचा पाणी या विस्तीर्ण पोच असलेल्या घटकाशी संबंध असल्याने मग काहीच सापडत नाही.
.
बाई अमीबा व स्टील ग्लास हे आद्य उदाहरणही या ला अपवाद नाही. 'बाई' शब्दाला वैश्विक अपील, विस्तार असल्याने, मग कोणताच विसंगत शब्द सापडत नाही.
उदा - बाईने स्टिल ग्लास मधी अमीबा जीवाणूयुक्त पाणी प्याले.
_____________

सिंह-तवा-कढीलिंब ........................ तवा व कढीलिंब दोन्ही स्वयंपाकघरात नांदतात तेव्हा त्यांच्या संबंध आहेच.
एरंडेल, रेल्वे जंक्शन आणि हॅम्लेटच्या बापाचे भूत. ...................... एरंडेल व रेल्वे जंक्श्नन ऑब्विअस संबंध आहे.
पोलीस, टमरेल आणि दातांचा दवाखाना............................. पोलिस व दातांचा दवाखाना यातही.
पेट्रोलपंप, वावटळ आणि डालड्याच्या डब्यातली तुळस................................. वावटळीत तुळस भिरभिर भरकटून तिची वाट लागली.
शेपूट तुटलेला कोल्हा, पिरॅमिड आणि सुधीर फडके. ................. सुधीर फडके व गदिमा आणि त्यावरुन गदिमा व एक कोल्हा बहु भुकेला हे गाणे
बर्फ, कांगारू आणि ओसामा बिन लादेन. .......................... कांगारु सापडणार्ञा ऑस्ट्रेलियात बर्फ पडतो का?
खारीक, पाणबुडी आणि तिरक्या चालीचा उंट. ............................उंट व वाळवंट/ वाळवंटी प्रदेश व खजूर/खजूर-खारीक
ब्रेक, शिंक आणि पायमोज्यातले भोक................................ शिंक आल्याने, गाडीला कचकन ब्रेक लागला
बहिरीससाणा, मोरारजी आणि स्टीरियो. .......................... मोरारजी बहीरी ससाण्यासारखे सावध असत. वगैरे गुंडाळता येते.
चाक, नाकपुडी आणि कारखान्यातला भोंगा. ................... अरेरे!!!
पेपरवेट, साबूदाणा आणि तिरुवनंतपुरम....................तिरुवनंतपुरम/ देऊळ - देउळ-उपास /उपास-सा खि.. वगैरे वगैरे
.
एकंदर आयडीया आली असेल.
_________________________
डिमेन्शिआ होउअ नये म्हणून असे खेळ खेळायला हवेत. मेंदूला व्यायाम होतो आहे.

बिटकॉइनजी बाळा Mon, 12/08/2019 - 12:23

In reply to by सामो

तुम्ही तुमचं "ज्योतिष, रद्दड गाणी आणि बंडल फोटो" एवढंच करत होतात तेच ठीक होतं.

'न'वी बाजू Fri, 10/01/2025 - 00:26

(धागा वर आणण्याकरिता तथा जुने प्रतिसाद दृश्य करण्याकरिता.)