Skip to main content

बागेतून ताटात - प्रयोग ४ : टोमॅटो, बेसिल

बागेतून ताटात - प्रयोग १ : भोपळा
बागेतून ताटात - प्रयोग २ : पालेभाज्या
बागेतून ताटात - प्रयोग ३ : मायक्रो -ग्रीन्स

१. कच्च्या टोमॅटोची चटणी :
टोमॅटो तर आपला नेहमीच हक्काचा शिलेदार. ४-५ वर्षांपूर्वी माझ्या खाणेबल बागकामाची सुरुवातच टोमॅटोने झाली होती. तेव्हा कुंडीत असूनसुद्धा भरपूर फळं धरली होती.  तर ह्यावेळेस जमिनीत बिनधास्त येईल म्हणून १ बिग बॉय आणि एक बाजारातून आणलेल्या टोमॅटोचं बी पेरलं. फेब- मार्च मध्ये पेरायला हवं होतं खरंतर पण उशीर झाला - मेमध्ये पेरलं. दोन्ही रोपं मस्त वाढली. सुरुवातीला फुलं गळून गेली, नंतर फळं धरली पण दोन्ही झाडांत मिळून फक्त २०-२५ टोमॅटो मिळाले. बिग बॉय अजून आहे, फुलं येतात पण गेल्या महिन्याभरात एखादंच फळ मिळालंय. बघू. 
तर गम्मत अशी झाली, जेव्हा बिग बॉयला पाहिलं फळ धरलं तेव्हा रोज उठून ते पिकलंय का बघत होतो. गणपतीचे दिवस होते, म्हटलं पहिल्या फळाचा नैवेद्य दाखवू गणपतीला. एके दिवशी सकाळी फळ पिकलेलं दिसलं पण ते आमच्या आधी पक्ष्याला दिसलं होतं. अर्धा टोमॅटो पक्ष्याने खाऊन टाकलेला. म्हटलं किती छान - निसर्गाला नैवेद्य दाखवला गेला. 
पण मग असं वारंवार होऊ लागलं - टोमॅटो जरा केशरी/ लाल होऊ घातला की पक्षी खाऊन टाकायचे. म्हणून टोमॅटो कच्चे असतानाच काढले आणि कच्च्या टोमॅटोची चटणी केली. 
साहित्य :
कच्चे टोमॅटो, भाजलेल्या तीळाचं कूट, मिरची, मीठ, गूळ, तेल.
कृती:

  1. थोड्याशा तेलावर मिरची आणि कच्च्या टोमॅटोच्या फोडी परतून घेणे. 
  2. परतलेले मिश्रण तीळकूट, मीठ आणि गूळ घालून मिक्सरवरून वाटून घेणे. 
  3. आवडीनुसार किंवा उपलब्धतेनुसार कोथिंबीर घालणे. 

ही चटणी पोळीबरोबर किंवा नुसतीच इटुक-मिटुक चाटून खायला छान लागते. नंतर आमच्या बागेत येणारे पक्षी टोमॅटो खाऊन कंटाळले बहुतेक. झाडावर पिकलेले लाल टोमॅटो आमच्या घरातल्या छोट्या माणसाने आवडीने खाल्ले.  
1

२. बेसिलची चटणी - सॅण्डविच : 
ट्रेडर जोज् नावाच्या वाणसामान मिळणाऱ्या दुकानात बेसिलच्या कुंड्यापण विकतात. तिथून आणलेला बेसिल चांगला तग धरून आहे. आठवड्यातून एकदा त्याची पाने खुडते आणि सलाड किंवा सँडविचमध्ये वापरते. 
पेस्तोच्या मूळ रेसिपीत पाईन नट्स, ऑलिव्ह ऑइल वापरतात. हे माझं व्हर्जन : ताजाच करून ब्रेडला लावून खाल्ला जातो. 
साहित्य : 
१ कप बेसिलची पाने धुवून, २ मोट्ठे चमचे लसणाच्या पाकळ्या सोलून, अर्धी वाटी बदाम , मीठ, मिरीपूड, पाणी.  
कृती : 

  1. वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये एकसारखं वाटून घेणे. 
  2. हव्या त्या ब्रेडचे ( मला सावरडो आवडतो ) स्लाइस करून त्यावर पेस्तो, टोमॅटो, बेसिलची पाने, अवकाडो, चीज इत्यादी रचून खाणे. 

2