बागेतून ताटात - प्रयोग १ : भोपळा 

१. भोपळ्याच्या फुलांची धिरडी :
सूप करू म्हणून हौसेनं बटरनट स्क्वाश लावला होता. वेल भरपूर तरारला, पसरला, पिवळी धम्मक फुलंपण पुष्कळ आली. परंतु फळ काही धरेना. मग गूगल करून भोपळ्याच्या नर-मादी फुलांबद्दल समजलं. माझ्या वेलीला बहुतेक अष्टसहस्त्रपुत्रा भव असा आशीर्वाद मिळाला असावा. आमच्याकडे सगळी नर फुलं आली. माझ्या मेक्सिकन मित्राकडे भोपळ्याच्या फुलांची भजी खातात. पण मला तळायला आवडत नाही ( अवांतर : तळलेलं खायला आवडतं ) म्हणून धिरडी केली. 
साहित्य :
डाळीचं पीठ , ओट्सचं पीठ, रवा,  तिखट किंवा हिरवी मिरची , हळद, मीठ, धणे- जिरे पावडर, १/२ चमचा तेल  आणि ५-१० भोपळ्याची फुलं. 
कृती : 

 1. डाळीचं पीठ आणि ओट्सचं पीठ समप्रमाणात, त्यांच्या अर्ध्या प्रमाणात रवा, चवीप्रमाणे हळद, मीठ, धणे- जिरे पावडर आणि तिखट घालून कमी पाण्यात भिजवून घेणे. कन्सिस्टंसी भजीच्या पिठाप्रमाणे असावी. 
 2. भोपळ्याची फुलं स्वच्छ धुवून, जास्तीचं पाणी टिपून कोरडी करून घेणे. ( काहीजण पराग काढून टाकतात, मी आळशी असल्याने तसलं काही करत बसले नाही.)
 3. थेंबभर तेलाचं बोट पुसून तवा गरम करून घेणे. 
 4. एक-एक फूल भाजीच्या पिठात घोळवून गरम तव्यावर टाकणे. एका बाजूने पूर्ण भाजलं गेलं की  पालटून दुसऱ्या बाजूने भाजणे. 

पिठात, मसाल्यांत भरपूर बदल करायला वाव असणारी रेसिपी. 

1

२. भोपळ्याच्या पानांची वडी :
अळूची वडी आवडते पण अळूला पानं फुटेपर्यंत धीर धरवत नव्हता आणि भोपळ्याची पानं (तोच तो बटरनट स्क्वाश) भरपूर पसरलेली होती. आई भोपळ्याच्या पानांची भाजी करते,  पण ती नेहमीचीच.  म्हणून मग  वडी करून बघितली. चांगली जमली, फायदा : घशाला खवखव नाही!
साहित्य :
नेहमी तुमच्या घरी अळूवडीसाठी जे वापरता ते ( डाळीचं पीठ, चिंच-गूळ, तिखट-मीठ, ओवा, तेल, मोहरी, कढीपत्ता ) आणि भोपळ्याची पानं. 
कृती :

 1. पानं स्वच्छ धुवून, पुसून कोरडी करून घेणे. ( त्यातल्या त्यांत, त्यांचे आकाराप्रमाणे ३ किंवा ४ चे गट करून ठेवणे.)
 2. बाकीचं साहित्य चवीप्रमाणे एकत्र करून लागेल तसे पाणी घालून भिजवणे. पीठ जास्त पातळसर झालं तर पानांवरुन पळून जातं, जास्त घट्ट झालं तर पसरवता येत नाही शिवाय आपल्याला पिठल्याची वडी करायची नसल्याने सरभरीत होईल असं, पण बेतात पाणी घालणे.  
 3. तीन किंवा चार पानांचा एक गट ताटात घेऊन 'एक पान उलट - त्यावर पिठाचा थर मग एक पान सुलट - त्यावर पिठाचा थर' असं नीट लावणे. 
 4. शेवटी त्या लावलेल्या पानांची नीट गुंडाळी करून बाजूला ठेवणे ( गुंडाळी उलगडत असेल तर टूथपिक लावणे). 
 5. अशा प्रकारे सगळ्या पानांच्या गुंडाळ्या झाल्या, की त्या कूकर मध्ये शिट्टी काढून ८-१० मिनिटे वाफलुन घेणे. 
 6. गार झाल्यावर कापून, कढीपत्त्याच्या फोडणीत परतणे. 

1

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

आम्ही हा भोपळा बरेचदा खातो; येत्या वर्षी तो लावण्याचा धीर आला आहे. ह्या वर्षी झुकिनीची अशी बरीच फुलं फुकट गेली होती.

'न'बा तुम्ही विचारता का मी विचारू? पराग नावाच्या इसमाला वगळून लोक हे प्रकार खातात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुलाच थँक्यू . 
आयुष्यात पहिल्यांदा रेसिपी लिहिली. आता सगळे प्रयोग लिहूनच शांत बसणार. 
हो बटरनट स्क्वाश छान क्रीमी असतो. आम्हीपण पुष्कळ आणतो आणि खातो. (म्हणूनच लावला होता. गेला बिचारा. म्हणजे मीच उपटला कंटाळून. )  

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि