Skip to main content

गीली पुच्ची (देवनागरी शीर्षकामुळे गोंधळात पडू नका)

"अजीब दास्तान्स" नामक चार कथांच्या मोटेतली ही एक फिल्म आहे. केवळ तीस मिनिटात ही छोटी फिल्म मोठा कॅन्व्हास दाखवते. भारती आणि प्रिया ह्या दोन बायांची गोष्ट. भारतीकडे रूप, जात, लैंगिक ओळख, एकलेपणा, आर्थिक वंचना या सगळ्यांची वजाबाकी होऊन उरलेली बुद्धी, कष्टाळूपणा आणि लढाऊपणा यांची शिल्लक आहे. तर प्रियाकडे खाऊन पिऊन सुखी कुटुंब, सवर्णता, शिक्षण आणि रूप असूनही काहीश्या निर्बुद्ध निरागसतेमुळे वाट्याला आलेली दया, पुरुषी आपुलकी, गृहित धरले जाणे आणि आयुष्याविषयी दुखरा संभ्रम आहे. भारतीला आपल्याला नेमकं काय साध्य करायचं आहे ते पुरेपूर माहिती आहे कारण त्याशिवाय जगात तिचा निभाव लागणं कठीण आहे, तर प्रियाला वरकरणी गोग्गोड आयुष्य मिळाल्यानंतरही होणाऱ्या घुसमटीचं कारण सापडत नाहीये. नोकरी तिच्यासाठी घरातल्या पारंपरिक आणि रटाळ आयुष्यातून काही काळ सुटकेचा मार्ग आहे. तिला स्वतःच्या प्रगतीची जराही आस नाही. जगावर रुष्ट असलेल्या भारतीच्या वाटची नोकरी मिळाल्यानंतरही प्रिया अंगभूत चांगुलपणामुळे तिची मैत्री पदरात पाडून घेते आणि तिचा आधार मिळवते. पण समाजाने केलेला भारतीचा अपमान प्रत्येकवेळी खालमानेने पाहात राहाते. भारतीच्या तिला प्रियाविषयी वाटणाऱ्या आपुलकीला (सम )लैंगिक कोन आहे हे लक्षात यायला वेळ लागत नाही. प्रिया एवीतेवी आपल्याला कधीही मिळणार नाही, हे सत्य तिला चांगलं माहित असतं आणि प्रियाच्या privileged आयुष्याविषयी सूप्त असूया आणि राग तिच्या मनात असतो. प्रिया आणि तिच्या कुटुंबाकडून एक प्रकारे ती स्वतःचा वापर होऊ देते, ते आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी. ती अत्यंत हुशारी आणि छुप्या कोरडेपणाने प्रियाला नवरा -चूल -मूल ह्यात बेमालूमपणे गुंतवते आणि तिची नोकरी स्वतः पटकवते. अशी एकंदर गोष्ट आहे. या गोष्टीला पुरुषप्रधानता, परंपराप्रियता, जातीयता, मूळ प्रवाहात नसलेल्यांना दुर्लक्षणे, एखाद्या स्त्रीचे स्त्रीत्व नाकारणे असे अनेक पदर आहेत. विचार करायला लावणारी कथा, दिग्दर्शन, वरच्या दर्जाचा अभिनय आणि आकार ह्या सगळ्या बाबतीत फिल्म उजवी ठरते.

समीक्षेचा विषय निवडा

'न'वी बाजू Wed, 05/05/2021 - 19:07

बायेनीचॅन्स, चित्रपटाच्या शीर्षकाचा मराठी तर्जुमा साधारणतः 'Wet Kiss' असा काहीसा व्हावा काय? (चित्रपटाचे शीर्षक हिंदीतील आहे, असे गृहीत धरतो आहे.)

कारण, शीर्षकातील (मराठी कानांस) अश्लील वाटू शकणारा जो शब्द आहे, त्याचा (विशेषतः उत्तरप्रदेशाकडील बाजूच्या) हिंदीतील अर्थ साधारणतः 'चुंबन' (विशेषतः लहान मुलाचे चुंबन, बोले तो, ज्याला आपण मराठीत 'पप्पी' म्हणतो, ते) असा होतो (इतका, की त्या शब्दाचा अन्य कोणता अर्थ अन्य कोणत्या भाषेत होऊ शकतो, हे त्या मंडळींच्या गावीही नसते - आणि, का असावे?), असा स्वल्पानुभव आहे.

============

तळटीप:

यावरून आठवले. मागे एकदा, पुष्कळ वर्षांपूर्वी, माझ्या (आता दिवंगत) मातुःश्री आमच्याकडे अमेरिकेत भेट देण्यास आल्या होत्या. तेव्हा, त्यांना बरोबर घेऊन एकदा एका मित्राच्या घरी आम्हा मित्रमंडळींची बैठक जमली होती. ज्याच्या घरी बैठक भरली होती, तो उत्तरप्रदेशी; उर्वरित क्राउड बहुतांशी मराठी.

बोलता बोलता गप्पांच्या ओघात विषयांचे सांधे बदलत बदलत 'पूर्वीच्या काळी आपल्या भारतीय समाजात वैद्यकीय बाबतींत कसे अज्ञानमूलक गैरसमज होते, नि तज्जन्य अंधश्रद्धा' या विषयावर परिसंवाद घडला, नि कधी नव्हे ते आमच्या मातुःश्रींनी तोंड उघडून (ते हिंदी क्रिकेट कमेंटेटर म्हणतात, तसे) 'आपले खाते खोलले'. "पूर्वीच्या काळी कोकणात कोणाला हार्ट अटॅक येऊन मेला, तरी लोकांना काय झाले, ते कळायचे नाही; कोणीतरी मूठ मारली, असे म्हणत असत." आता, त्यांच्या या स्वैर फलंदाजीमुळे (त्यांचे म्हणणे चुकीचे होते, असे म्हणू इच्छीत नाही, परंतु) त्यांच्या स्कोअरवर नक्की काय परिणाम झाला असावा, हे सांगणे कठीण आहे, परंतु, आमच्या उत्तरप्रदेशी होस्टची नि त्याच्या बायकोची मात्र निश्चित विकेट उडाली असावी!

(छे बुवा! भारतात प्रदेशांप्रदेशांतून एकमेकांबाबत किती मूलभूत अज्ञान आहे!)

shantadurga Fri, 07/05/2021 - 18:54

माझ्या लहानपणी गोट्या नावाची मालिका होती हे ऐकून लेकरांना अतीव हसू आलं होतं. भारतातल्या निरनिराळ्या प्रदेशांत कशाला, घरातही हे किस्से घडतात. तुमच्या मातुःश्रींचा षटकार थोरच होता.
चित्रपटाच्या शीर्षकाचा तुम्ही म्हणता तो मराठी तर्जुमा बरोबर आहे.

'न'वी बाजू Fri, 07/05/2021 - 21:26

In reply to by shantadurga

माझ्या लहानपणी गोट्या नावाची मालिका होती हे ऐकून लेकरांना अतीव हसू आलं होतं.

अतीव हसू येणे साहजिकच आहे, परंतु... आईच्या समोर खुलेआम हसण्याची जुर्रत करणे, म्हणजे... _/\_

(आमचे नसते ब्वॉ धाडस झाले त्या वयात... कालाय तस्मै नम:|)

राजन बापट Fri, 07/05/2021 - 21:09

In reply to by shantadurga

या गोट्या सिरियलची अनाउन्समेंट व्हायची :

"गोट्या! (इथे एखाद दोन सेकंद पॉझ) - प्रायोजक अमुक तमुक"

त्यावेळी आम्ही शाळकरी मुलं म्हणायचो "गोट्या ! कुणाच्या?!"

#आमचाकंट्रीविनोदहोजावईबापू

'न'वी बाजू Fri, 07/05/2021 - 21:14

In reply to by राजन बापट

बोले तो, 'गोट्या' सीरियलच्या वेळी तुम्ही शाळकरी होता???

(मला जर बरोबर आठवत असेल, तर... रंगीत दूरदर्शनवरची सीरियल होती ना ती?)

#आमच्याब्लॅकअँडव्हाइटच्याजमान्यात...

'न'वी बाजू Fri, 07/05/2021 - 21:22

In reply to by shantadurga

...हिंदीतसुद्धा, मी ऐकलाय त्याप्रमाणे, त्या शब्दाचा उच्चार (मग अर्थ भले वेगळा का होत असेना, परंतु) मराठीतल्यासारखाच दणकटपणे च ला च लावून होतो. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे, शीर्षकात हात आखडता घेण्यामागचे प्रयोजन समजले नाही.

वामन देशमुख Fri, 14/05/2021 - 15:07

In reply to by 'न'वी बाजू

या संदर्भात, या स्त्रीवादी (की स्त्रीमुक्तीवादी) संस्थळावर शीर्षकात सध्या असलेल्या स्वरूपाचे इंग्लिश स्पेलिंग आहे.

https://feminisminindia.com/2021/04/21/geeli-pucchi-film-review/

प्रतिसादात किंचित बदल केला आहे.

shantadurga Tue, 11/05/2021 - 20:08

शीर्षक दुरुस्ती केली आहे. आता फिल्म पाहायला हरकत नाही.

पर्स्पेक्टिव्ह Fri, 14/05/2021 - 05:52

समीक्षण सुंदर आहे. पण त्यातील कलाकारांची नावे, दिग्दर्शक, प्लॅटफॉर्म , संगीत, छायाचित्रण वगैरे वगैरे तसे अनावश्यक, पण उपयुक्त डिटेल्स दिले असते तर आमच्यासारख्या आळशी लोकांना किंचित फायदा झाला असता.

(याला मराठीत फलाट असे म्हणतात म्हणायचे एके काळी. आता ओटीटी प्लॅटफॉर्मला कसला फलाट म्हणायचं हाही एक प्रश्नच. असो.)

वामन देशमुख Fri, 14/05/2021 - 14:33

In reply to by पर्स्पेक्टिव्ह

बायदवे, हिंदीतील उपरोक्त शीर्षकास मराठीत 'गालगुच्चा' हा प्रतिशब्द होऊ शकेल काय?

बहुतेक नाही.

माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार, गालगुच्चा घेणे म्हणजे दोन्ही हातांच्या प्रत्येकी पाचही बोटांनी विशेषतः लहान मुलाच्या / मुलीच्या गालांना लाडाने ओढणे.

शीर्षकातील हिंदी शब्दप्रयोगाला मराठीत पप्पी / पापा हेच योग्य शब्द असावेत.

तथापि, गीली या शब्दाचा connotation लक्षात येत नाहीय.

अवांतर: साथिया या हिंदी चित्रपटातीळ एका गाण्यात मद्धम मद्धम तेरी गीली हँसी अशी एक ओळ आहे. तिथेही गीली या शब्दाचा नेमका अर्थ काय हा प्रश्न २००२ साली पडला होता. गोडगोड असा अर्थ असावा का? सदर धाग्याच्या शीर्षकातही तोच अर्थ अभिप्रेत असावा का?

वामन देशमुख Fri, 14/05/2021 - 15:00

In reply to by वामन देशमुख

अति अवांतर: साथिया चित्रपटावरून उगीचंच आठवलं, राणी मुखर्जीला पाहून, विशेषतः तिचा आवाज ऐकून, तिला गोडगोड हे विशेषण कोणत्याही कोनातून लागू पडणार नाही यावर समस्त ऐसीकरांचे एकमत होईल याबद्धल माझ्या मनात तिळमात्रही (म्हणजे, राणी मुखर्जीच्या उजव्या गालावर पडणाऱ्या खळीइतकीही) शंका नाही.

अति अति अवांतर: राणी मुखर्जीच्या आवाजावरून उगीचंच आठवलं, त्या काळी, म्हणजे इसवी सन २००० ते इसवी सन २००४ या काळात राणी मुखर्जीसारखाच आवाज (आणि रूपही) असलेली एका षोडशवर्षीय मुलगी आणि अस्मादिक एकमेकांच्या प्रेमात पडले होते. ती मुलगी, अगदी नायक सिनेमातल्या मंजिरी या नायिकेसारख्या, खर्जातल्या आवाजात बोलायची आणि त्यात अस्मादिकांना गुरफटून टाकायची. "तू त्या शिवाजी राव सारखा निळा शर्ट घातलास ना की काय माल दिसतोस" चक्क असं म्हणायची.

अति अति अति अवांतर: जाऊ द्या... गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी!

राजन बापट Fri, 14/05/2021 - 18:03

तुमचं हे परीक्षण (त्रोटक असलं तरी) आवडलं. सिनेमाही विशेष आवडलेला आहे.

इतर ३ फिल्म्स मात्र कंटाळवाण्या होत्या.

shantadurga Fri, 14/05/2021 - 23:18

फिल्म पाहून मत दिल्याबद्दल धन्यवाद.
इतर तीन फिल्म्स तुलनेने अगदीच सामान्य वाटतात.
कदाचित खोलात विचार करायला वेळ न घेता पटकन लिहिल्यामुळे समीक्षा अपूर्ण राहिली असेल. पण एक्साइटमेंट जिवंत असेतो लिहिलं तरच लिहून होतं माझ्याकडून. कोंकणा सेन शर्माने भारतीची भूमिका फार छान वठवली आहे.
एक प्रश्न: समीक्षा आणि परीक्षणात काय फरक असतो?

नगरीनिरंजन Sun, 23/05/2021 - 16:46

त्रोटक सारांश ह्या फिल्मला पुरेसा न्याय देत नसला तरी बहुतांशी अचूक आहे.
फक्त खालील वाक्य खटकले.

प्रिया एवीतेवी आपल्याला कधीही मिळणार नाही, हे सत्य तिला चांगलं माहित असतं

स्वत:ची पात्रता असूनही केवळ जातीमुळे मिळू न दिलेली नोकरी प्रियाला मिळाली हे पाहूनही प्रियाची निरागसता पाहून तिच्यात भारती गुंतु पाहते. आपलं समलैंगिक भावनांचं सत्य स्विकारलं पाहिजे असं सांगू पाहते. परंतु ती बॅनर्जी नसून मोंडाल आहे हे ऐकल्याबरोबर प्रियाच्या वागण्यात जो फरक पडतो त्या क्षणी भारतीला कळतं की प्रियात बंड करायची क्षमता व इच्छा दोन्हीही नाही.
तोपर्यंत जगाचे सगळे अनुभव विसरून परत आशा धरण्याचे पाप ती करतच असते.

shantadurga Wed, 26/05/2021 - 17:38

प्रिया एवीतेवी आपल्याला कधीही मिळणार नाही, हे सत्य तिला लवकरच कळून चुकतं, असं म्हणावं लागेल.
सविस्तर परीक्षण लिहून पाहायला पाहिजे पुढच्या वेळी.