चार खंडांतील माझे जलतरणास्तित्व
जगात दोन प्रकारचे लोक असतात. व्यायाम करणारे किंवा व्यायाम न करणारे. (अधूनमधून करणारे/अधूनमधून न करणारे = करणारे) पण मी जे दोन टोकाचे गट म्हणते आहे ते म्हणजे काहीही झालं तरी व्यायाम करणारे आणि काहीही झालं तरी व्यायाम न करणारे. म्हणजे उन्हाळ्यात ऊन आहे म्हणून, पावसाळ्यात पाऊस आहे म्हणून आणि थंडीत थंडी आहे म्हणून व्यायाम न करणारे. त्याउलट, उन्हाळ्यात ऊन आहे म्हणून (त्याच्या नाकावर टिच्चून); पावसाळ्यात पाऊस आहे म्हणून (त्याच्या नाकावर टिच्चून) आणि थंडीत थंडी आहे म्हणून.... वगैरे वगरे..न चुकता रोज व्यायाम करणारे. व्यायाम चुकल्यावर खिन्न होण्याचा प्रश्नच येत नाही कारण व्यायाम कधी चुकतच नाही. तर अशा दोन व्यक्ती जेव्हा तुम्हाला तयार करतात तेव्हा तुमच्यावर कसे संस्कार होत असतील याचा अंदाज बांधता येईलच. अगदी लहानपणीची एक पुसटशी आठवण म्हणजे आमच्या वडिलांनी एकवीस वेळा पर्वतीच्या पायऱ्या चढून उतरल्याची आहे (याचं कालमापनही तेव्हाच्या अस्मार्ट तंत्रज्ञानानं केलं होतं). ही आठवण अजूनही माझ्या अंगावर शहारे आणते, अभिमानाचे नाही, या अशा आततायीपणाच्या जनुकांचा अर्धा भाग आपल्याला मिळाला आहे यामुळे. उरलेला अर्धाही यापेक्षा फार बरा नाहीच. तरीही मी काही स्वतःला अतिव्यायाम करणारी म्हणू शकत नाही. कारण माझं लग्न दुसऱ्या गटातल्या व्यक्तीशी झालं आहे. त्यामुळे हे दोन्हीही गट डोळ्यासमोर ठेवून सध्या माझं वैयक्तिक व्यायामायुष्य बरं चाललं आहे.
पण जलतरण हा माझा आवडता व्यायाम आहे याची आता मला खात्री पटली आहे. मागे वळून बघता, मी आयुष्याच्या सगळ्या सुखदुःखांमध्ये पोहलेले आहे. एकदा, मला स्पष्ट आठवतं, माझा कुठेतरी पाठवण्यासाठी पूर्ण झाला आहे असा विश्वास असलेला पेपर पाचशे पंचावन्न लाल खुणांनी भरून माझ्या मास्तराने परत पाठवला होता. तेव्हा मी पोहायला गेले आणि पोहता पोहता मला रडू येऊ लागले. त्या क्षणी हे किती सुंदर आहे - आपले अश्रू गॉगलमध्ये साठून आपल्याला दिसेनासे झाल्यावर थेट पाण्यात जात आहेत, आणि ते मगरीचे अश्रू नसून खरे खरे दुःखाश्रू आहेत याचं मला खूप कौतुक वाटलं होतं. ही आठवण ब्रिसबन, ऑस्ट्रेलियामधली. तिथल्या एका युनिव्हर्सिटीच्या ऑलिम्पिक पुलात पोहता पोहता मी हे मौल्यवान अश्रू ढाळले होते. पण व्यायाम करता करता सातत्यानं रडता येत नाही कारण बहुधा रडण्यासाठीही भरपूर प्राणवायू लागत असावा. त्यामुळे माझं रुदन लवकरच थांबल्याचंही स्पष्टपणे आठवतं आहे.
त्यावेळी आपल्या वनपीस स्पीडोमधून टू पीसमध्ये जायचं, आणि कमीत कमी लाल खुणा येतील असा पेपर लिहायचा एवढी दोनच ध्येयं होती. आणि या दोन ध्येयांचा एकमेकांवर ताण येऊन साधारण दोन्ही साध्य व्हायची नाहीत. त्यामुळे एक विचित्र समतोल साधून माझी बरीच वर्षं स्टेडी स्टेट मध्ये गेली. रुचिपालट म्हणून मी पळून बघितलं, वजनं उचलून बघितली, योगासनं केली. पैकी, योगासनं सोडून मला पोहण्याइतकं काहीच आवडलं नाही. तीही आवडली कारण भारतात योगासनं शिकून परदेशात क्लासला गेलं की लक्षात येतं की तिथल्या लोकांनी योगासनं करणं म्हणजे काहीतरी सेल्फ-हीलिंग, सुदींग, कामिन्ग वगैरे शब्दांशी जोडून तो एक अतिशय स्व-लाड करून घेण्याचा मार्ग केला आहे. मी भारतात पहिल्यांदा साग्रसंगीत योगासनं शिकले ते एका सर्टिफिकिट-धारक प्रोफेशनल योगविदद्या विशारदाकरून. आमच्या वर्गाच्या दुर्दैवानं ते त्याआधी बरीच वर्षं सैन्यात काम करत होते. त्यामुळे क्लासच्या वेळेपासून ते किती अंशाच्या कोनांत वाकायला हवं या सर्व बाबतीत ते अत्यंत काटेकोर होते. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र अर्धचंद्राकार पिळलेल्या मिशा आणि अति-सरळ पाठीचा कणा बघूनच त्यांची आधी भीती वाटायची. त्यात शवासन करताना ते सगळ्या वर्गात फिरत फिरत आपल्याला कमीत कमी श्वासात जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे असं जरा कमी, दरडावूनच सांगायचे. त्यामुळे श्वासही पेट्रोलसारखा वापरून विश्रांती भागिले श्वास असं काही गणित सोडवायचं आहे की काय या ताणात विश्रांतीच घेता यायची नाही. त्या मानाने ऑस्ट्रेलियात प्रत्येकच बाबतीत तुम्हाला जे सहज जमतं तीच तुमची पातळी असं सांगून थोड्या थोड्या दिवसांनी प्रगती करण्याची गोड आर्जवं करणाऱ्या टॅटूयुक्त तरुणी फारच आवडू लागल्या. कधीकधी मी जलतरण तलावाच्या काठावर सूर्यनमस्कार घालून मग पाण्यात उडी मारायचे. अतिशय आल्हाददायक असा तो काळ होता. पण काळाचं असंच असतं. जो काळ आत्ता आल्हाददायक वाटतो तो तेव्हा तीव्र चिंतेचा वाटायचा.
ऑस्ट्रेलियातील माझ्या वास्तव्यात माझा आधीच गहू वगैरे असलेला वर्ण पूर्णपणे बैंगणी झाला होता. पण तिथल्या लोकांच्या मनात अशा आधल्या मधल्या रंगाबद्दल कौतुक असल्यानं मला कधी कुणी, "बापरे तू किती काळी झालीस!" वगैरे भस्सकन बोललं नाही. ते सगळं भारतात आल्यावर घडायचं. पण त्याची काय आपल्याला सवय आहे.
जिथे ओझोनला भोक पडलं असं म्हणतात, आणि त्वचेच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे अशा खंडातून मी उत्तर अमेरिकेत मिशिगनला गेले. सुरुवातीचे काही महिने घर घेण्यात, लावण्यात आणि नंतर तिथे गेल्याबद्दल पस्तावण्यात गेल्यावर मला एक फ्रेंच मुलगी भेटली. आमची गट्टी झाली आणि आम्ही रूममेट्स झालो. ती फ्रान्सच्या उत्तरेकडील एका खेड्यातली होती आणि तिथे पीएचडी करून ती इथे माझ्यासारखीच पोस्टडॉकायला आली होती. ती स्वतःला 'स्पोर्टीफ' म्हणत असे. म्हणजे व्यायामपटू, खेळपटू इत्यादी. आणि तिच्या अनेक व्यायामांमध्ये जलतरण हाही एक महत्त्वाचा व्यायाम होता. त्यामुळे आम्ही दोघी पोहू लागलो. जशी थंडी वाढली आणि गुडघाभर बर्फ झालं तसे आम्ही तिथल्या उघड्या पुलातून, खोलीत असलेल्या बंद पुलात पोहू लागलो. मग आमच्याबरोबर आमचा एक मित्र येऊ लागला जो आयर्नमॅनसाठी तयारी करत होता. त्या दोघांच्या नादानं माझी फारच प्रगती झाली. एखाद्या शनिवारी आम्ही सहज अडीच किलोमीटर पोहून मग कुठेतरी सायकलवरून जायचो. शिवाय आम्हाला जवळच एक हॉट योगा स्टुडिओ सापडला. हॉट योगा म्हणजे एका खोलीचं तापमान ३५ - ४० डिग्री सेल्सियस आणि ४०-६० % आर्द्रता असं ठेवून तिथे वीस बावीस टाळकी जमून अतिशय तोकड्या कपड्यांत योगासनं करतात. तर आम्हाला भर हिवाळ्यात हा उपक्रम आकर्षक वाटून आम्ही तिथं जाऊ लागलो. त्या खोलीतून थेट उणे काहीतरी सेल्सियसमध्ये पाय ठेवणं हा एक अध्यात्मिक अनुभव असायचा. इथेही, भारतीय योगासनांपेक्षा मला मिशिगनच्या एका स्ट्रीप मॉलमधला हा स्टुडिओ अधिक आवडला. आजही त्याबद्दल मला काहीशी गतकातरता जाणवते. कारण तिथली एक टॅटूयुक्त तरुणी रॉक संगीतावर योगासनं करून घ्यायची. मला नेहमी रॉक संगीत ऐकू येऊ लागलं की आमचे मिशीवाले सैनिक आठवायचे. ते या थेरांना काय म्हणाले असते? पण ही गतकातरता केवळ त्या संगीतामुळे किंवा त्या तरुणीमुळे नाही. त्या काळात आपल्याला केवळ व्यायाम करायला म्हणून किती वेळ उपलब्ध होता याबद्दलही आहे. पण पुन्हा एकदा काळाचं असंच असतं. आपण एखाद्या काळात असतो तेव्हा त्या काळाचं सौंदर्य काय होतं ते दैनंदिन चितांमध्ये लक्षात येत नाही.
आता यापुढील खंड उगाचच आहे. केवळ चार हा आकडा गाठण्यासाठी ही खोगीरभरती. मुळात आधीच्या दोन खंडांमध्ये मी पोहून आले याबद्दलही कुणाला काही का वाटावं? म्हणून आता एवढी शायनिंग मारली आहेच तर अजून थोडी. तर आम्ही एका जुलैमध्ये फ्रान्सला गेलो. माझ्या मैत्रिणीच्या खेड्यात बहुधा पहिल्यांदा भारतीय व्यक्ती दाखल झाली होती. त्यामुळे मला "बघायला" काही लोक येऊन गेले. मी, ती आणि तिची शाळेतली मैत्रीण आधी पॅरिस वगैरे उच्चभ्रू ठिकाणी जाऊन आलो आणि मग त्या दोघींच्या गावी गेलो. त्यांच्या घरात एक चीज तयार करायची खोली होती. घराच्या मागे एक कबुतरखाना होता. तिचे वडील (ज्यांना शून्य इंग्रजी येतं), मी (जिला त्याकाळी शून्य फ्रेंच यायचं) आणि माझी मैत्रीण असे त्या कबुतरखान्यात गेलो. तिथे गेल्यावर आधी तिचे बाबा सावकाश काही सांगू लागले ज्याचं भाषांतर मैत्रीण करत होती. पण नंतर त्यांना इतका उत्साह आला की भाषांतर होण्याआधीच ते पुढे बोलू लागत. त्यांच्या एकूण हावभावांवरून ती कबुतरं त्यांना फार प्रिय होती आणि त्या रात्री आम्ही त्यांतील एक खाणार होतो एवढी माहिती मला मिळाली. मग ते कबुतर पकडून, मारून, स्वच्छ करून, कापून, बटरमध्ये नाजूकपणे शिजवण्यापर्यंत मी तिच्या बाबांची अप्रेन्टिसगिरी केली. त्या जोडीला मी (अर्थातच) गाजर हलवा केला. आणि आम्ही सगळ्यांनी कबुतर, वाईन, केशर घातलेला पुलाव आणि गाजर हलवा-आईस्क्रीम असं विचित्र पण उत्तम जेवण केलं. त्या दिवशी फ्रान्समध्ये उष्म्याची लाट होती. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी जवळच्या एका मोठ्या गावात पोहायला गेलो. किलोमीटरभर पोहलो आणि नंतर बियर प्यायला गेलो. बियर पिता पिता माझ्या मैत्रिणीला एकदम अस्तित्ववादी प्रश्न पडल्यानं तिनं जवळच्या एका पार्लरमध्ये जाऊन स्वतःचे केस ब्लॉन्ड करून त्यावर उत्तरं शोधली. मलाही काही प्रश्न पडले होते. पण माझा रंग बघता मी माझे केस ब्लॉन्ड केले नाहीत तो एक चांगला निर्णय ठरला. त्यानंतरच्या दिवशी आम्ही तिच्या शेतावर गेलो. तिथे साधारण शंभर गाई होत्या. आणि त्यांचं दूध न्यायला संध्याकाळी आपल्याकडे जसं दूध संकलन होतं तसा एक टँकर येऊन दूध घेऊन जायचा. आता पुन्हा, मागे वळून बघता हा एक अतिशय रम्य अनुभव होता. पण त्यावेळी त्याची तीव्रता कमी जाणवली.
आशिया खंडात, म्हणजे भारतात मी अगदी लहानपणापासून पोहते आहे. माझे आईबाबा सकाळी चारला उठून आपण व्यायाम करायला तर जायचेच. पण सहा वाजता मलाही कुठेतरी पाठवून द्यायचे. त्या पाठवून देण्याच्या जागांमध्ये एक चैतन्य हेल्थक्लब नावाची जागा होती. इथे मी पोहायला शिकले. नंतरच्या काळात ते बरंच कमी होऊन मग एरोबिक्स वगैरे प्रकारही करून बघितले. त्या काळी शर्वरी जमेनिस तिथे एरोबिक्स शिकवायला यायची. त्या बॅचला तुफान गर्दी असायची. म्हणून मीही जाऊ लागले आणि मला त्या व्यायाम प्रकाराचाही नाद लागला. भारतात (कायमची) परत आल्यावर काही गोष्टी मला अतिशय तीव्रतेने जाणवू लागल्या. त्या म्हणजे, आम्ही लहान होतो तेव्हा, आणि आता स्त्रियांच्या पोहण्याच्या पोषाखांत एकदम तालिबानी फरक पडला आहे. आमच्या लहानपणी आमच्या एकमेव स्त्री शिक्षिका व्यवस्थित आंतरराष्ट्रीय मानकांचा बिनबाह्यांचा स्पीडो घालत असत. आणि आम्हीही त्याच प्रकारचे कपडे घालत असू. पण आता भारतात स्त्रिया जवळपास स्कुबा डायव्हिंग सूटसदृश काहीतरी घालून तलावात उतरतात. मात्र, पुरुषांच्या पोषाखांत अजिबात फरक पडलेला नाही. अजूनही तितक्याच केसाळ ढेऱ्या बघायला मिळतात. पण आजूबाजूच्या बायकांचे टाचेपर्यंत येणारे कपडे बघून मीही पियर प्रेशरने वरती एक टीशर्ट घालून पोहू लागले आहे.पण मी टाचेपर्यंत कपडे कधीच घालणार नाही इतपत बंडखोरपणा मी अजूनही राखून आहे.
शिवाय, भारतात जशी ट्राफिकची गत आहे तशीच पोहण्याची. काही लोक उभे पोहतात (म्हणजे संबंध २५ मीटर सलग आणि परत) तर काही लोक आडवे पोहतात. शिकाऊ लोक आडवे पोहतात कारण त्यांना पूर्ण २५ मीटर पोहायचा दमसास नसतो. त्यामुळे पोहताना आपण एखाद्या पाणबुडीला धडकणार नाही याचं भान ठेवून पोहावं लागतं. याची सवय व्हायला काही काळ आणि मनस्ताप गेला. पण एक दिवस मी सरळ पोहत असताना एक माणूस मला आडवा आला. शिकाऊ असेल म्हणून मी पुढे गेले. तर परत येताना तो मला समांतर होता. हे काय प्रकरण आहे बघायला मी माझ्या लॅपनंतर उभी राहिले तेव्हा लक्षात आलं की तो चौकोनी पुलात गोल फेऱ्या मारत होता. ही पद्धत काही चुकीची नाही. पण आधीच्या तीनही खंडांत मी असं पोहणं कुठेही बघितलं नव्हतं.
एकतर गोल पोहणारे लोक अंतर कसं मोजत असतील? अंतर न मोजता पोहणं कसं काय जमू शकतं? बऱ्याचवेळा फेऱ्या मारताना आकडा विसरतो म्हणून मी खूप पैसे मोजून एक गार्मिन घेतलं. सुरुवातीला माझे आकडे आणि त्याचं मोजणं असा पडताळा करून बघतानाच लक्षात आलं की ते घड्याळ अंतर वाढीव दाखवतं आहे. मग ते किती मीटर अधिक दाखवतं आहे हे शोधून काढायला मी आणखीन काटेकोरपणे माझ्या फेऱ्या मोजू लागले. पण त्यात काही सिस्टिमॅटिक एरर नाही हे निदर्शनास आल्यावर आता मी घड्याळही घालते आणि आपणही मोजते. या सगळ्या उपक्रमामुळे माझा वेळ चांगला गेला (आणि त्याबद्दल इथे लिहून आणखीनच) आणि स्मरणशक्ती सुधारली. शिवाय रोज मला उगाचच जास्त पोहल्याबद्दल शाबासकी मिळते. असं असताना एखादा माणूस चौकोनी पुलात संथपणे गोल पोहताना बघितल्यावर मला त्याचा उगाच राग येऊ लागला. मग यावर काही लोकांशी चर्चा केल्यावर त्यांतल्या एकांनी असं सुचवलं की कदाचित तो विहिरीत पोहायला शिकला असेल. हे स्पष्टीकरण पटल्यानं आता मला त्या माणसाचा राग येत नाही. भारताचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पाऊण तासाची "बॅच" असते. वेळ संपली की एक कर्कश घंटा वाजते आणि सगळ्यांना गुमान बाहेर पडावं लागतं. त्यामुळे आपण केवळ या कर्कश घंटेच्या अभावी दोन आणि अडीच किलोमीटर पोहू शकायचो याचा साक्षात्कार मला भारतात आल्यानंतर झाला. त्यामुळे मी पाण्यात उतरल्यानंतर एकही क्षण वाया न घालवता सलग पोहू लागले. आधी पाचशे, मग आठशे आणि आता (माझ्या मोजणीप्रमाणे) बाराशे मीटरपर्यंत माझी प्रगती झाली आहे. त्यामुळे आता आमचे सैनिक शिक्षक कमीत कमी श्वासात जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे असं का म्हणायचे हे लक्षात येऊ लागलं आहे. पावसाळा आणि थंडीच्या दिवसांत मनसोक्त पोहता येतं. पण यावर्षी जानेवारीत एकदा मी पाण्यात उतरल्यावर असा काही धक्का बसला की घरी आल्यावर मी चॅटजीपीटीला "हायपोथर्मियाने मरण येण्यासाठी पाण्याचे तापमान किती असावे?" हा प्रश्न विचारला होता. त्यावर आलेलं उत्तर इतकं जटील होतं की मी काही दिवस पोहणं बंद केलं. पण जसा कसा उन्हाळा जवळ येतो तसं सैनिक सरांचं लॉजिक अजूनच पटायला लागतं. कमीतकमी जागेत, कमीतकमी वेळांत, आपल्याला जास्तीतजास्त पोहायचं आहे या एकाच निर्धारानं पाण्यात उतरावं लागतं. आणि मग त्या सगळ्या टॅटूयुक्त तरुणींचा हळुवार आणि सावकाशपणा कदाचित त्यांच्या देशातील लोकसंख्येचा परिणाम असावा अशी खात्री पटू लागते.
उरलेल्या तीनपैकी कोणत्याच खंडात पोहण्याचा अनुभव आता मिळेल किंवा नाही माहिती नाही. पण मिळाला तर हा लेख वाढवण्यात येईल.
काय भारी लेख आहे
मी मला स्विमिन्ग शिकवून आता साधारणपणे नऊ महिने झाले. मी इतक्या तीव्रतेने याच्या प्रेमात पडलोय की आता असं वाटतं की लेका हे आधीच का नाही केलंस ??
लहानपणी गोपाळ टँक नावाच्या अतिभयानक गलिच्छ आणि प्रचंड गर्दी असलेल्या ठिकाणी १-२ महिने गेल्याचं आठवतं. तिकडचे कोच लहान मुलांना उचलून खोल पाण्यात फेकून द्यायचे. त्याच्यामुळे आणि बेडका सारख्या पोहोण्याच्यामुळे मला स्विमिन्ग ची अनुक्रमे भीती बसली आणि चार्म नाही वाटला. अमेरिकेत युनिव्हर्सिटी मध्ये खरतर दृष्ट लागावी अशी जिम आणि पूल होता पण कधीच वापरला नाही. मग २-३ वर्षांपलीकडे पुन्हा एकदा भारत भेटीत एका महिन्यासाठी स्विमिन्ग शिकायचा (फ्री स्टाईल) प्रयत्न केला. कोच बायकांकडे ज्यास्त लक्ष द्यायचा. त्यामुळे तरंगता आणि २-३ हात मारता यायला लागलं पण काही विशेष प्रगती झाली नाही. मग सरते शेवटी मागल्या वर्षी महागडी जिम विथ पूल जॉईन केली जेणेकरून किमान पैसे वाया घालवतो आहे याची जाणीव होऊन तरी मी जाईन. सुरुवातीला एक-दोन सेशन्स ट्रेनर लावला पण तो बाबा प्रत्येक सेशन ला ७५ डॉलर्स लावायचा. म्हणलं हे प्रकरण काही आपल्याला झेपणार नाही. मग मीच युट्युब आणि रेडिट च्या मदतीने आणि इतरांना बघून स्विमिन्ग शिकायचा प्रयत्न करू लागलो. पहिले १.५ - २ महिने काही झेपत नव्हतं. म्हणजे तरंगता यायचं पण २-४ हात मारल्यावर पाय जमिनीला टेकायचेच. शेवटी २ एक महिन्यानंतर अर्ध्या पुलापर्यंत जाय इतकी प्रगती झाली. मी बारकाईनं इतरांना ऑबझर्व करायचो. होता होता मागील मे महिन्यात माझी १ पूर्ण (म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत) फेरी मारण्यातीतकी प्रगती झाली. तरी दुसऱ्या टोकाला पोहोचल्यावर भूभू सारखी हातभार लांब जीभ काढून पाच एक मिनिटे धापा टाकायचो. पहिल्यांदा जेव्हा मी एक पूर्ण फेरी मारली त्यावेळी माझी एक मैत्रीण जिने माझ्याबरोबरच शिकायला सुरुवात केलेली आणि मग कंटाळून सोडून दिलेले तिला अत्यानंदाने टेक्स्ट केल्याचं स्पष्ट आठवतंय की मी आज ना थांबता एक पूर्ण फेरी मारली. त्यानंतर मी अविश्वसनीय प्रगती केली. एकाच्या दोन ना थांबता फेऱ्या, हळू हळू पाच, मग दहा .. असे करता करता फक्त १ फेरी मारली त्यानंतर साधारण एका महिन्याने माझा वाढदिवस होता. त्यादिवशी स्वतःला भेट म्हणून १०० फेऱ्या मारायचे ठरवले. म्हणजे बघा हं कि एका महिन्यापूर्वी जेमतेम १ फेरी मारू शकणाऱ्या साठी किती अँबिशियस गोल ते. आश्चर्य म्हणजे मी १०० फेऱ्या मारू शकलो (खूपच हळू, २ तास लागले) आणि शेवटच्या ६० फेऱ्या न थांबता मारल्या :) :). माझ्यासाठी तरी ती व्हेरी बिग अचिएव्हमेन्ट होती. मग मी दर वेळी पाण्यात उतरलो कि ५० फेऱ्या मारायचोच. सुरुवातीला मी फक्त एका बाजूलाच डोकं बाहेर काढून श्वास घेऊ शकायचो, हळू हळू दोन्ही बाजूला श्वास घ्यायला स्वतःला शिकवलं. स्विमिन्ग ही अशी एक गोष्ट आहे जिच्यात तुम्ही सतत टेक्निक इम्प्रूव्ह करू शकता.
आता मी पाण्यात उतरतो तेव्हा पहिले २ फेऱ्या मारतो, मग एक मिनिट विश्रांती, ४ फेऱ्या पुन्हा एक मिनिट विश्रांती, अजून एकदा ४ फेऱ्या पुन्हा एक मिनिट विश्रांती (टोटल १०), मग १० फेऱ्या ना थांबता, २ मिनिटे विश्रांती आणि सरतेशेवटी ३० फेऱ्या न थांबता अशा ५० फेऱ्या साधारण ५०-५५ मिनिटात संपवतो आणि मग सौना मध्ये बसतो. अजून टाइम कमी करायचा आहे. लवकरच गारमीन घेईन. स्विमिन्ग करताना इतकं मस्त मेडिटेशन होतं ना. विविध विचार येतात. फ्लोटिंग चालू असल्याने अवकाशातील पोकळीत आहे असा भास होतो. मॅथ्स, ए आय, रिसर्च बद्दल ते डेली लाईफ मधल्या विविध गोष्टी ... अज्जिबात कंटाळा येत नाही.
व्यायामाच्या बाबतीत आधीपासून खूपच कंटाळा होता. आता लक्षात येतंय की एक्च्युली तो कंटाळा नसून माझ्या मेंदूची ऊर्जा सेव्ह करायची ट्रिक होती. अशक्तपणा मुळे आणि बाकीचे आजूबाजूला भारी भारी व्यायाम करणारे बघून खूपच कॉम्प्लेक्स यायचा. निव्वळ स्विमिन्ग मुळे आता तो सर्व कंटाळा निघून गेला. आता मी स्विमिन्ग आणि वेट्स दोन्ही करायाचा प्रयत्न करतो तरी अजून नियमितता आणायची आहे.
बाकी लेखातील इतर गोष्टींबद्दल
>> एकदा, मला स्पष्ट आठवतं, माझा कुठेतरी पाठवण्यासाठी पूर्ण झाला आहे असा विश्वास असलेला पेपर पाचशे पंचावन्न लाल खुणांनी भरून माझ्या मास्तराने परत पाठवला होता. तेव्हा मी पोहायला गेले आणि पोहता पोहता मला रडू येऊ लागले.
हा असा मला अनुभव आलेला आहे. मी एकदा स्वतःचा असा इंडिपेन्डन्ट रिसर्च करून एक पेपर लिहिला होता. पूर्ण आयडिया माझी, इम्प्लिमेंटेशन माझं, मास्तराने फक्त पेपर लिहायला मदत केलेली. पेपर सबमिट केला आणि मग कळलं की युरोप मधल्या दुसऱ्या एका लॅब ने तोच रिसर्च खूप प्रेस्टीजियस अशा कॉन्फरन्स मध्ये बरोब्बर १० दिवस आधी पब्लिश केलेला. इतकं फ्रस्ट फीलिंग आलेलं. वाटलं आता पी एच डी कधीच नाही होणार. आत्महत्येचे विचार वगैरे येऊ लागलेले (कारण तोवर मी पी एच डी मध्ये अथांग वेळ घालवलेला). आता वाटत तेव्हा जर स्विमिंग किंवा व्यायाम करत असतो तर कित्ती कित्ती बरं झालं असतं.
पण समरी म्हणजे या फिलिंगशी अगदीच रिलेटेश.
>> अतिशय आल्हाददायक असा तो काळ होता. पण काळाचं असंच असतं. जो काळ आत्ता आल्हाददायक वाटतो तो तेव्हा तीव्र चिंतेचा वाटायचा.
अगदी अगदी. अमेरिकन ऑफिस मध्ये अँडी बर्नार्ड म्हणून एक पात्र आहे. तो एकदा म्हणतो:
"I wish there was a way to know you're in the good old days before you've actually left them"
हे किती यथार्थ आहे ना ..
>> शिवाय आम्हाला जवळच एक हॉट योगा स्टुडिओ सापडला. हॉट योगा म्हणजे एका खोलीचं तापमान ३५ - ४० डिग्री सेल्सियस आणि ४०-६० % आर्द्रता असं ठेवून तिथे वीस बावीस टाळकी जमून अतिशय तोकड्या कपड्यांत योगासनं करतात.
दोनदा ट्राय केलंय पण नाही झेपलं.
>> त्या काळी शर्वरी जमेनिस तिथे एरोबिक्स शिकवायला यायची.
हे जरका आधी माहिती असतं तर व्यायामाची खूपच आधी "गोडी" लागली असती.
बाकी स्विमिन्ग करताना मध्ये मध्ये येणारी लोक खूपच मनस्ताप देतात. यातसुद्धा भारतीय लोकांना काही एटीकेट्स नसतात (बाकी गोष्टींप्रमाणेच) हे जाणवले आहे. मी स्वतः शिकत असताना या बाबती साठी खूपच कॉशस असायचो, विशेषतः जर बाईबरोबर लेन शेअर करत असेल तर. तिला टच पण न होऊन देण्याच्या नादात बरेचदा त्या लेन सेपरेटर वर हात किंवा पाय मारून घेऊन स्वतःला ब्रूझ करून घेतलंय. आता असं फार कमी वेळेला होतं.
>> बऱ्याचवेळा फेऱ्या मारताना आकडा विसरतो म्हणून मी खूप पैसे मोजून एक गार्मिन घेतलं.
हे मात्र माझं सहसा होतं नाही. मी इतर विचार जरी करत असलो तरी आकडा चालू राहतो.
>> त्यामुळे मी पाण्यात उतरल्यानंतर एकही क्षण वाया न घालवता सलग पोहू लागले. आधी पाचशे, मग आठशे आणि आता (माझ्या मोजणीप्रमाणे) बाराशे मीटरपर्यंत माझी प्रगती झाली आहे.
याय, मी सुद्धा :) :)
???
उरलेली तीन खंडे??? आफ्रिका आणि... तुम्ही दक्षिण अमेरिका हे उत्तर अमेरिकेहून वेगळे खंड मानता काय?
(तरीसुद्धा तीनचा हिशेब जमत नाही.)
हं, आता, अंटार्क्टिकात पोहण्याची जर का तुमची मनीषा असेल, तर मात्र आपला तुम्हाला सलाम!
(आणि वर,
हेही ठेवून दिलेय!
चालायचेच.)