इराण- अमेरिका संबंधांची पाळेमुळे - भाग २

(भाग १ पासुन पुढे)

तेलाच्या मुद्द्यावरून इराणमध्ये खळबळ वाढत गेली आणि मुसद्दिकचा रोख हळूहळू वाटाघाटिंकडे वळू लागला. थोडक्यात मुसद्दिक आपल्या पुर्वीच्या निर्णयापासून माघार घ्यायला निघालेला होता. पण आता विषय इतका गुंतागुंतीचा झालेला कि खुद्द मुसद्दिक समर्थकांमध्ये उघडउघड दोन गट पडले. एका गटाचे म्हणणे असे कि मुसद्दिकने अगदीच आदर्शवादी भुमिका घेण्याऐवजी दोन्ही पक्षांना इष्टतम पर्याय मान्य करावा आणि हा प्रश्न निकाली काढावा. तर दुसऱ्या गटाच्या मते कसलाही तोडगा काढणे म्हणजे जणू देश विकायला काढण्यासारखे होते (आणि मुसद्दिकच्या सल्लागारांत मुख्यत्वे याच गटातल्या लोकांचा समावेश होता). मुसद्दिकच्या कंपूत सुद्धा वैयक्तिक स्पर्धेमुळे वातावरण गढूळ झाले होते.

मुसद्दिकविरोधात समर्थक गोळा करण्याची मोहीमच जणू विरोधकांनी घेतलेली. इराणमध्ये सत्तापालटाचे वारे वेगाने वाहू लागले होते. या सर्व हालचालींचे पडद्यामागील सूत्रधार MI6 चे इराणमधील हेर आणि त्यांच्या साथीला CIA. जनरल झाहेदी आणि जनरल हेजाझी हे दोघे MI6 च्या मैदानावरील प्याद्यांची भुमिका चालवत होते. शहाला मुसद्दीकच्या जनसामर्थ्याबद्दल कसलीच शंका नव्हती. त्यामुळेच तो दिवसेंदिवस चालू असलेल्या हालचालींबद्दल आणखी संदिग्ध होत गेला. MI6 आतून मुसद्दीकला समर्थानसुद्धा देत असेल इथवर त्याला संशय येत असे. त्यामुळे ब्रिटन आणि अमेरिका कोंडीत पडल्यासारखे झाले. शहाला जोवर आपण कायमचं बोटीवर घेत नाही तोवर इकडे हालचालींना वेग येणे शक्य नाही हे त्यांना समजले होते.

कवामला सारून जेव्हा मुसद्दिक पुन्हा सत्तेवर आला तेव्हा त्याने संसदेकडून बरेचसे हुकमी अधिकार मिळवले. ‘इराणमध्ये स्थैर्य आणण्यासाठी हे अधिकार आवश्यकच आहेत अन्यथा आपण राजीनामा देण्यास तयार आहोत’, असा युक्तिवाद तो करीत असे. या अधिकारांमुळे त्याला बरचसे सुधारणावादी कायदे करण्याचे सामर्थ्य मिळाले. आणि सत्तेवर आल्याबरोबर त्याने सरकारविरोधी कारस्थाने करणाऱ्यांची धरपकड सुरु केली. जन. हेजाझी आणि जन. झाहेदी दोघांच्या हालचालींची खबर सरकारला होतीच आणि त्यामुळे जन. हेजाझीला अटक करण्यात आली मात्र जन. झाहेदीची सिनेटचा सभासद असल्याने संसदीय सुरक्षेमुळे अटक वाचली.

इराणच्या राजकीय पटलावर त्यावेळी एक कमकुवत प्रवाह होता- फिदायीन-ए-इस्लाम. हि एक भावनिक चळवळ होती आणि तिचा उद्देश देशात धार्मिक क्रांती घडवून आणण्याचा होता. राजकीय नेत्यांचा हत्येमध्ये प्रामुख्याने यांचा समावेश असे. जन. रझमाराची प्रधानमंत्री असताना हत्या करण्याचे काम यांनीच केलेले. मुसद्दिक प्रधानमंत्री होईस्तोवर फिदायीनचे समर्थन त्याला मिळाले परंतु त्याने कोणत्याही प्रकारच्या इस्लामिक क्रांतीची हमी दिली नव्हती. याच कारणामुळे तो सत्तेवर आल्यानंतर फिदायीन त्याच्या विरोधात गेली आणि अखेरीला सत्तांतराच्या कारस्थानात सहभागी झाली. फिदायीनकडून मुसद्दीकच्या गोटातल्या महत्त्वाच्या व्यक्तींची हत्या करण्यात आली.

शहाला पूर्णपणे आपल्या बाजूला वळविल्याशिवाय पुढे जायचे नाही हे अमेरिका व ब्रिटनने पक्के ठरवले होते. अमेरिका या सर्व भानगडीत पडण्याला तेलाशिवाय आणखी एक कारण होते. ते म्हणजे साम्यवादाचा प्रसार रोखण्याचे. मुसद्दीकने तेलाच्या सार्वजनिकीकरणाचे विधेयक आणल्यापासून इराणमध्ये प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या CIA च्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेची भीती अवास्तवरीत्या वाढवण्याचे काम केले. या विधेयाकानंतर रशियाचा टेकू असलेला तुदेह आणखीन सक्रीय झाला आणि इराणमध्ये राजकारण डावीकडे वळले असाच समज अमेरिकेचा झाला. आणि त्यावेळी अमेरिकेत नुकत्याच सत्तेवर आलेल्या राष्ट्राध्यक्ष आयझेनहॉवरच्या मते अमेरिकेला या कारवाईत पडण्याचा धोरणात्मक हेतू मिळाला.

फेब्रुवारी १९५३ मध्ये शहा आणि त्याची पत्नी वरकरणी वैद्यकीय कारणांसाठी (खरेतर मुसद्दीकसाठी येणाऱ्या काळात अडचणी निर्माण करण्यासाठी) युरोपला निघाले होते. तो देशाच्या बाहेर जाईपर्यंत हि गोष्ट गोपनीय ठेवण्याची ताकीद शहाने दिली. मुसद्दिक शहाला बाहेर जाण्याविरुद्ध सल्ला देत राहिला पण शेवटी त्याने बाहेर जाण्यास सहकार्य केले. मात्र मुसद्दीकला गोत्यात आणण्याचा हा एक नवीन प्रयत्न होता. शहा जाण्याआधीच हि खबर लोकांमध्ये फुटली आणि उजव्या मुस्लीम नेत्यांमध्ये संभ्रम पैदा करण्यात आला. मुसद्दिक शहाला देशाबाहेर घालवतोय आणि सगळी सत्ता स्वताकडे एकवटण्याचा प्रयत्न करतोय अशी हवा तयार झाली. इथून सरकारविरोधी मोर्चे, दंगली वाढण्यास सुरुवात झाली. एप्रिल १९५३ मध्ये इराणच्या पोलीसप्रमुखाची हत्या करण्यात आली. नंतर या कटात सहभागी असलेल्या संशियातांनी उजव्या गटातील सूत्रधारांची नावे उघड केली. एव्हाना शहाच्या गटातील लोक सरकारविरोधी हिंसक आणि शांततापूर्ण अशा दोन्ही मार्गाचा वापर करीत होते.

मे १९५३ मध्ये CIA आणि MI6 च्या उच्चाधिकाऱ्यांची सायप्रसमध्ये भेट झाली. दोघांनी सत्तांतरात सक्रीय असणाऱ्या आपापल्या हेरांची नावे एकमेकांसमोर उघड केली. अजून शहाचे मन पूर्णपणे वळवले नसताना CIA ने इराणमध्ये मुसद्दीकविरुद्ध प्रसारमाध्यमातून छुपा प्रचार चालू केला. मुसद्दिकवर संयुक्तिक टीका आणि कार्टून्स छापल्यामुळे सुरुवातीला याच्यामागे काही मोठा कट शिजत असेल अशी शंका येणे अवघड होते. शहा आणि जन. झाहेदी हि जोडी मुसद्दिक विरुद्ध वातावरण तापवू शकतात अशी दोघा हेरखात्यांची धारणा होती. एकदा सरकारविरोधात रस्त्यावर जमाव गोळा होऊ लागला आणि तेहरानमधील पुरेशा सैन्याने मुसाद्दीकच्या आज्ञा पाळल्या नाहीत तर झाहेदीला प्रधानमंत्री बनवता येईल असा आडाखा बांधला जात होता.

एव्हाना CIA ने खूप मोठी खेळी सुरु केली. तिच्या काही हेरांनी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचे ढोंग घेतले. या कार्यकर्त्यांकडून ‘जर मुसद्दीकला समर्थन दिले नाही तर क्रुर शिक्षा देण्यात येईल’ अशा तऱ्हेच्या धमक्या उजव्या मुस्लीम नेत्यांना दिल्या जाई. मुसद्दिकची प्रतिमा उदयास होऊ घातलेला हुकुमशहा अशी करण्यामागे हि मंडळी लागलेली. मुसाद्दीकने काटशह म्हणून ४ ऑगस्ट १९५३ ला इराणमध्ये सार्वमत घेतले आणि निकाल त्याच्या बाजूने लागतील याची पूर्ण व्यवस्था केली. संशयास्पद ९९% मतदान मुसद्दीकच्या बाजूने झाले आणि सूत्रधारांना त्याच्यावर हल्ला करण्यासाठी आणखीन एक मुद्दा मिळाला. निवडणुकीत अफरातफर करून मुसद्दिक हुकुमशहाची लक्षणे दाखवतोय असे रान उठवले गेले.

आता शहाला कटात पूर्णपणे सामील करून घेण्यासाठी आयझेनहॉवरच्या वतीने कर्मिट रूझवेल्ट (ज्यू.) त्याला सल्ले देण्याचे काम करू लागला. कर्मिट रूझवेल्ट (ज्यू.) (फ्रँकलिन रूझवेल्टचा नातू) हा CIA चा इराणमधील राजकीय अधिकारी होता. रूझवेल्ट आणि आयझेनहॉवर यांच्या प्रयत्नांना अखेरीस १३ ऑगस्ट १९५३ च्या दिवशी यश मिळाले. शहाने सरकारविरोधी फार्मानावर सही केली आणि हि गोष्ट सैन्यातल्या शहा समर्थकांत वणव्यासारखी पसरली. १५ ऑगस्ट १९५३ ला कारस्थानाचा अखेरचा अंक सुरु झाला. शहा समर्थक सैनिक तेहरानच्या रस्त्यांवर उच्छाद मांडू लागले. त्यांनी अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना अटक करून तुरुंगात टाकले. सरकार आणि सैन्यामधील संपर्काचे महत्त्वाचे साधन म्हणजे टेलिफोन सुद्धा बंद करण्यात आले. टेलिफोन एक्स्चेंज वर शहासमर्थकांनी ताबा मिळवला. त्या रात्री शहासमर्थक मुसद्दीकच्या घरी पोहोचले पण दुर्दैवाने त्यांच्या दृष्टीस पडले ते म्हणजे त्याच्या घराभोवती गस्त घालणारे रणगाडे आणि अजून सरकारप्रती निष्ठावान असणाऱ्या सैनिकांचा पहारा.

दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रीच्या अयशस्वी प्रयत्नाबद्दल तेहरान रेडीयो वरून वृत्त पसरवले गेले. मुसाद्दीकने सैन्यावरील पकड मजबूत करण्याची धडपड सुरु केली. त्या रात्रीच्या अयशस्वी प्रयत्नाबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या आणि खुद्द CIA ला संपूर्ण हालचालींची माहिती नव्हती. अशावेळी जन. झाहेदी तेहरानच्या उत्तर भागात होता आणि रूझवेल्टने त्याला त्यादिवशी गाठले. कट यशस्वी करण्यासाठी शहाचे स्वाक्षरी असलेले फर्मान सार्वजनिक करावे लागेल यावर दोघांचे एकमत झाले. शहाच्या फर्मानात मुसद्दीकला पायउतार करण्याचे आणि जन. झाहेदीला नवीन प्रधानमंत्री बनवण्याचे आदेश होते. परंतु या खेळीची खबर मुसद्दीकला लागताच त्याने ती मोडून काढण्यात वेळ दवडला नाही. प्रत्येक छापखान्यावर सरकारला समर्थन देणाऱ्या सैन्याचा पहारा होता. जन. झाहेदीला फर्मान लोकांपर्यंत पोहोचवणे अवघड गेले. तरीपण त्यावेळी फर्मानाबद्दल काही वृत्तपत्रांमधून बातम्या आल्या. CIA च्या हेरांचे अटकसत्र सुरु झाले. बरेचसे CIA चे हेर आणि अधिकारी इराणमधून पलायन करण्याच्या प्रयत्नात होते. तरी अजून रूझवेल्टला कटाबद्दल आशा राहिली होती.

या सर्व नाट्यमय घडामोडींमध्ये शहा बगदाद मध्ये वास्तव्याला होता. आणि रूझवेल्टच्या मते शहाने बगदाद रेडियोवरून फर्मानाबद्दल घोषणा केली आणि जन. झाहेदीने आक्रमक पवित्रा घेतला तर खेळ आपल्या बाजूस वळवता येऊ शकेल. शेवटी १७ ऑगस्ट १९५३ ला शहाने बगदाद रेडियो वरून फर्मानाबद्दल घोषणा करून टाकली. या निर्णायक वेळी मात्र मुसद्दिक सरकार ढिले पडले. शहाचे देशाबाहेर असणे आणि सरकारविरोधी असणाऱ्या काही अधिकाऱ्यांना अटक केल्यामुळे मुसाद्दीक पूर्वीपेक्षा कमी दक्ष झाला. परिणामी सरकाने शहर आणि परिसरात असणाऱ्या सैन्याच्या तुकड्यांना माघारी बोलावले. मुसद्दिकला वाटले आता धोका टळून गेला आहे.

त्याच रात्री जन. झाहेदी आणि इतर अधिकाऱ्यांना गुपचूप अमेरिकन दूतावासात आश्रय देण्यात आला. १९ ऑगस्ट ला पुन्हा सरकारवर हल्ला करण्याचा बेत ठरविण्यात आला. त्याचवेळी तेहारनमधून एक मौलवी कोमकडे (इराणमधील धार्मिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे शहर) निघाला. कोममधील इतर मौलवींच्यावतीने मुसाद्दीक्च्या साम्यवादी सरकारविरोधात धर्मयुद्ध सुरु करण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देश यामागे होता. (येणाऱ्या काळात हीच मंडळी इराणच्या राजकारणात काळाची चाके अमेरिकेच्या विरोधात फिरवणार होती.) इकडे लहरी शहा बगदाद सोडून रोमला निघून गेला आणि पुन्हा मुसद्दीकचे पारडे जड झाले. CIA चा शहामुळे भ्रमनिरास झालेला. CIA ला आपल्या सरकारविरोधी हालचाली तात्पुरत्या स्थगित करण्याचे वरून आदेश आले.

१९ ऑगस्ट च्या दिवशी तेहरानमधली हवा कायमची पलटून गेली. महत्त्वाच्या वृत्तपत्रांतून शहाच्या फर्मानाबद्दल बातम्या छापून आल्या. हळूहळू शहासमर्थकांनी तेहरानमधील रस्ते व्यापून टाकायला सुरुवात केली. सरकार समर्थक वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावण्यास जमावाला उद्युक्त करण्याचे काम एका पत्रकाराने केले जो कि CIA चा गुप्तहेर होता. दुसऱ्या एका हेराने मोर्चा तुदेह समर्थक वृत्तपत्रांकडे वळविला. रोशेदिन बंधू जमाव घेऊन मुसद्दीकच्या हवेलीवर चाल करून गेले. जे काही मिळेल त्याची लूट जमाव करत होता. एव्हाना तेहरानच्या प्रमुख चौकांत शहासमर्थक सैनिक जमा झाले होते. संसदच्या प्रांगणात आणि मुसद्दीकच्या घराजवळ आता रणगाडे आणि सैन्यातील ट्रक दिसू लागले. हळूहळू सरकारी यंत्रणेचा एक एक अवयव बळी पडू लागला. पहिल्यांदा तार(Telegraph) कार्यालयावर कब्जा करण्यात आला आणि विविध प्रांतांमध्ये शहासमर्थनार्थ उठावाचे आवाहन करण्यात आले. पोलीस मुख्यालय आणि शहासमर्थकांत चकमक झाली तेसुद्धा उठावाला बळी पडले. त्याचप्रकारे परराष्ट्र खात्यानेसुद्धा पांढरे निशाण फडकवले. एक महत्त्वाची शाखा शहासमर्थकांकडे येणे उरले होते. ती म्हणजे तेहरान रेडियो. सरकारचे भविष्य अंधुक दिसू लागले असताना, अगदी कालपर्यंत पेहलवी घराण्याची सत्ता संपली अशी घोषणा जिथून व्हायची तिथून आज महत्त्वाच्या वेळी कापसाच्या किंमतीवरच्या कार्यक्रमाचे प्रसारण चालू होते. अखेरीस तेहरान रेडियो सुद्धा शहसमर्थाकांला स्वाधीन झाला आणि मग सत्तांतराची अधिकृत घोषणा तेहरान रेडियोवरून करण्यात आली.

मुसद्दिकसह अनेक सरकारसमर्थक नेते आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. आता तेहरानच्या रस्त्यांवर जन. झाहेदीला उठावात साथ देणारे अधिकारी गस्त घालत होते. सगळ्या घडामोडी तुफान वेगाने घडत गेल्या. सत्तापालटाची बातमी कायम झाल्यावर अमेरिकेच्या दूतावासात आनंदाचे भरते आले होते. अगदी आदल्या दिवसापर्यंत दूतावासात घोर निराशेचे वातावरण राहिलेले. पुढे अमेरिका सरकारसमोर CIA ने सत्तांतरासाठी संपूर्ण श्रेय घेतले आणि एजन्सी परराष्ट्रात यशस्वीपणे सत्तांतर घडवून आणू शकते अशाप्रकारची हवा तयार करण्यात आली. अगदी पुढल्याचवर्षी CIA ने आणखी एका देशात सत्ता पालटवण्याचा डाव रचला.

वर्तमान स्थिर(?) करत असताना अमेरिकेने येणाऱ्या अस्वस्थ भविष्याची बीजे पेरण्याचे काम केले.

(पुढे चालू)

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

उत्तम आढावा.
---
'तेलाच्या सार्वजनिकीकरणाचे विधेयक' याबद्दल किंचित अधिक तपशील हवे होते असे वाटते.
मुसद्दीकविरुद्धच्या कारस्थानामागे हे महत्त्वाच्या कारणांपैकी एक मोठे कारण होते. एवरीथिंग इज ओकॉनॉमिक्स म्हणताना बंडामागे असलेली आर्थिक कारणे व आर्थिक लागेबांधे स्पष्ट झाल्यावर घडामोडींमागील उद्देश अधिक नेमका लक्षात येतो.
--

शेवटी क्रमशः दिसले नाही. आय होप पुढील भाग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखमाला पकड घेत आहे. अमेरिकेचा पाताळयंत्रीपणाच सगळ्या जगांत अशांतता फैलावत आहे. फक्त सद्यस्थितीत, इसिस ला फक्त तेच रोखू शकतील असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयसिसला मोठं करण्यात बशर-अल-असद याचा आणि खुद्द अमेरिकेचा सुद्धा हात असल्याचे ऐकिवात आहे. आणि विरोधाभास म्हणजे हे दोघे आयसिसचे क्रमांक १ चे शत्रु आहेत असे आयसिस म्हणते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्हायची असेल आमच्याकडून काही
चूकभुल द्यावी घ्यावी

अमेरिकेचा पाताळयंत्रीपणाच सगळ्या जगांत अशांतता फैलावत आहे

प्रत्येक दरीद्र्याला ( गब्बर बोलीत "फडतुसाला" ) श्रीमंत माणसे चोर्‍या, खून करुन श्रीमंत झाली असे वाटत असते.
आपल्याला जे हवेसे वाटते पण मिळवायला जमत नाही, ते दुसर्‍या कोणी करुन दाखवले की अशीच विशेषणे लावली जातात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखमाला रंजक पद्धतीने लिहित आहात. वाचत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.