–US President Harry Truman, 12 March 1947
शहरात जवळपास ३०० लोकांची प्रेतं अस्ताव्यस्त पडलेली होती. हेच ते अभागी लोक होते ज्यांना मुसद्दिकच्या आणि पर्यायाने लोकशाहीच्या बचावासाठी आपल्या प्राणांना मुकावे लागले. ‘स्वातंत्र्याच्या आणि लोकशाहीच्या (स्वयंघोषित) रखवालदारांच्या कारस्थानाचे बळी’, यापेक्षा त्यांची आणखीन मोठी थट्टा होऊच शकणार नव्हती. इकडे शहरात झाहेदी आणि समर्थकांचा आनंदोत्सव सुरू झाला. झाहेदीचा मुलगा रूझवेल्टला घेऊन त्याच्याकडे आला. रूझवेल्टला पाहिल्याबरोबर झाहेदिचे समर्थक त्याच्या भोवती गोळा होऊ लागले. तो मोजक्याच लोकांना ओळखत असला तरी प्रत्येकजण त्याला त्यादिवशीच्या यशस्वी योजनेचा शिल्पकार म्हणून ओळखत होते. अनेकजण त्याला आलिंगन देऊ लागले, दोन्ही गालाची चुंबने घेऊ लागले. रूझवेल्ट जेव्हा जमावाला उद्देषित करण्यासाठी सरसावला तसा टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.
“ Friends, Persians, countrymen, lend me your ears!
I thank you for your warmth, your exuberance, your kindness. One thing must be clearly understood by all of us. That is that you owe me, the United States, the British, nothing at all. We will not, cannot, should not ask anything from you—except, if you would like to give them, brief thanks. Those I will accept on behalf of myself, my country and our ally most gratefully.”
झाहेदीने हळुहळू सत्तेवर पूर्ण काबु मिळवला. धुरळा खाली बसण्यास सुरुवात झालेली पाहून शहाचा रोमकडून परतीचा प्रवास सुरू झाला. फक्त सहा दिवसांपूर्वी जो माणूस आपल्या भविष्याची शाश्वती नाही पाहून बगदाद मधून पळून गेला तोच आज इराणमध्ये विजयी मुद्रेने परतणार होता. शहा परतल्यानंतर रूझवेल्ट, झाहेदी आणि शहा यांच्यात बरीच खलबते झाली. सरकारी यंत्रणा मार्गाला लावून रूझवेल्ट अमेरिकेला परतला. आता पुर्वीच्या सरकार समर्थकांवर खटले सुरू झाले. मुसद्दिक आणि इतर नेत्यांना ३ वर्षांची शिक्षा आणि नंतर नजरकैद ठोठावण्यात आली. राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली अनेक जणांना मृत्युदंड सुनावण्यात आला. राजकीय कैदी आणि त्यांच्या छळछावण्यांना इराण मध्ये ऊत आला. मात्र येणाऱ्या काळात देशाच्या राजकीय पडद्यावर या सर्व भूमिकांची अदलाबदल होणार होती.
झाहेदीला अमेरिकन सरकारकडून दरमहिना ५० दशलक्ष डॉलरची मदत देण्यात येत असे. इराण आणि ब्रिटनचे संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी अमेरिकेने घेतली. सत्तापालटाच्या खेळात ओतलेला पैसा आता वसूल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. इराणमधील तेलासाठी पुन्हा एकदा ब्रिटन, अमेरिका आणि इराण मध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. अमेरिकेला आता ब्रिटनच्या बरोबरीने किंबहुना जास्तच तेलाचा वाटा हवा होता. मुसद्दिकने सार्वजनिकिकरणानंतर NIOC(National Iranian Oil Company) च्या अंतर्गत तेल उद्योग एकवटला होता. अखेर करारानुसार NIOC कडे तेल उद्योगाच्या पायाभूत सुविधांची मालकी राहिली आणि एकूण तेल उत्पादनाच्या १२.५% तिच्या मालकीचे राहणार होते. तिकडे ब्रिटीश आणि अमेरिकन कंपन्यांचा नफ्यात ४०% वाटा कायम झाला. करारानंतर ब्रिटनच्या तेल उद्योगाला मात्र अमेरिकेकडून लगाम घालण्यात आला. करारानुसार IOC (Iranian Oil Consortium ) ची स्थापना करण्यात आली ज्यात मुख्यत्त्वे अमेरिकन कंपन्यांचा भरणा होता. इराणमध्ये ब्रिटनची स्थिती आता अमेरिकेच्या ताटाखालचे मांजर अशीच झाली. AIOC ला सुमारे पुर्वीच्या उत्पादनाच्या ६०% भाग इतर अमेरिकन कंपन्यांना द्यावा लागला. इराणमधील तेल सर्वेक्षणाचे अमर्याद अधिकार अमेरिकेला मिळाले जे कि पूर्वी AIOC कडे असायचे. अमेरिकन कंपन्यानी इराणमधील तेलउद्योगाच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात केली.
तेलाच्या बाबतीत इतके अधिकार आणि नियंत्रण मिळवल्यानंतर पर्यायाने अमेरिकेकडे इराणमधील सत्तेच्या नाड्या हाती लागल्या. शहाला सत्ता टिकवायची म्हणजे अमेरिकेचे सहकार्य गरजेचे होते. इराणमध्ये राजकीय विरोध मोडून काढण्यासाठी CIA च्या मदतीने शहाने सवाक (SAVAK) नावाची संघटना उघडली. तिच्यामार्फत सरकारविरोधी घटकांवर नजर ठेवण्याचे आणि कसलाही विरोध ठेचून काढण्याचे काम केले जात असे. सवाक दर महिन्याला सरासरी १५०० लोकांना विनावॉरंट कारागृहात पाठवत असे. लेखक, पत्रकार, राजकीय विरोधक अशा सर्वांवर पाळत ठेवली जाई. सरकारच्या नजरेखालून गेल्याशिवाय एकही कागद छापला जात नसे. केवळ मॅक्झिम गॉर्की, जॅक लंडन यांची पुस्तके वाचली म्हणून तुरुंगाची हवा खायला लागत असे. प्रधानमंत्री आणि संसदेला डावलून शहाने सगळी सत्ता आपल्या हातात एकवटली. शहाच्या मनात एकप्रकारची असुरक्षितता कायम झालेली होती त्यामुळे तो देशाबाहेर जाण्यास सुद्धा धजावत नसे.
तेलाच्या नफ्यातून मिळवलेल्या पैशातून शहाने अमेरिकेकडून भरमसाठ शस्त्रास्त्रे खरेदी केली. त्यावेळी इराणचे सैन्य क्षमतेच्या दृष्टीने जगात ५ व्या क्रमांकावर होते. शहा म्हणजे आर्थिक आघाडीवर अगदीच अविवेकी माणूस होता. खुद्द अमेरिकेच्या मते तो गरजेपेक्षा जास्त आणि गरज नसलेल्या बऱ्याच शस्त्रसामग्रित पैसा उधळीत असे. नुसत्याच शस्त्रास्त्रांच्या बाबतीतच नव्हे तर अन्नधान्य आणि इतर उपयोगी वस्तूंबाबत सुद्धा त्याचे धोरण अगदी ढिसाळ होते. बऱ्याचदा जहाजे भरून आलेले धान्य साठवणुकीच्या व वितरणाच्या अपुऱ्या सुविधांमुळे जाळून टाकले जात असे. १९७१ मध्ये त्याने इराणच्या राजेशाहीच्या २५व्या शताब्दी निमित्त एका नेत्रदीपक कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यासाठी पर्झीपोलीस (Persepolis) या प्राचीन जागेजवळ एक तम्बुंपासून उभारलेले शहर साकारण्यात आले. या कार्यक्रमात जवळपास १०० दशलक्ष डॉलर इतका पैसा ओतण्यात आला. शहा आपली जिराफाची मान घेऊन ढगात जगत राहिला आणि तिकडे जनता दारिद्र्यात आणखी खचत गेली.
खेडेगावात गरीब लोक गाईच्या बदली आपल्या मुलींचा व्यवहार करण्यापर्यंत हलाखीचे दिवस काढत होते. शाळांची संख्या १००,००० विद्यार्थ्यांमागे १ अशी होती. काही शहरात/गावात संपूर्ण लोकसंख्येसाठी अगदी १/२ स्नानगृहे असत आणि तीपण बहुतेकवेळा बंद पडलेल्या अवस्थेत. तेलाने आलेली समृद्धी काही मोजक्या घरांतच राहिली. इराण म्हणजे श्रीमंतांमधील श्रीमंत आणि गरिबांमधील गरीब लोकांचा देश अशी अवस्था राहिली. तरीही शहाचे म्हणणे होते कि येत्या काही वर्षात इराण मधील जीवनमान विकसित देशांच्या अवस्थेस पोहोचणार होते.
शहा आणि त्याला समर्थन देणाऱ्या अमेरिकेबद्दल इराणी जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात रोष होता. सत्तापालटामुळे किमान २५ वर्षे इराण अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांचे बाहुले बनून राहिला. परंतु येणाऱ्या काळात अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातल्या घोडचुका उघड करणारी साखळी मध्यपूर्वेत सुरु झाली. अमेरिका म्हणजे ताक फुंकून पिण्याचे प्रकरण, अमेरिका म्हणजे विश्वासघात हे समीकरण इराणी जनतेमध्ये पक्के रुजले. आणि त्याचे प्रत्युत्तर अमेरिकेला इराणमध्ये १९७९च्या आणखी एका उठावातून मिळाले.
“Defeat goes deeper into the human soul than victory”
–Albert Hourani
(समाप्त)
तिकडे ब्रिटीश आणि अमेरिकन
या सर्व घडामोडींतील हा सर्वात कळीचा वा मूळ बदल म्हणता येईल. जगावरील अनेक देशांत तोवर ब्रिटनची सत्ता संपली होतीच. आर्थिक आघाडीवर आणि तेल-आघाडीवर खांदेपालट करणारी ही घटना होतीच. आर्थिक बदलासोबत नैतिक धोरणांतही बदल ओघाने आलाच. अमेरिकेने 'सवाक' च्या माध्यमांतून केलेले उद्योग भावी असंतोषाचे बीज होतेच पण पुढे इराणमध्ये रुजलेल्या टोकाच्या अमेरिका द्वेषाची ती नांदी म्हणता यावी.
दुसर्या देशांतील राजकारणात व समाजकारणात किती हस्तक्षेप करावा वा करू नये याचे ज्ञान युरोपियन सत्तांना जितके होते तितके ते अनेकदा अमेरिकेला होते असे वाटत नाही. त्यामुळे अमेरिकेला युरोपियनांच्या तुलनेत तत्कालीन फायदे झाले असतीलही, मात्र दूरगामी परिणाम एकुणच अमेरिका द्वेष रुजवण्यात झाला. इंग्रजांनी वा इतरही युरोपिय शक्तींनी थेट राज्य केलेल्या देशांतही इतका 'द्वेष' रुजलेला दिसत नाही.
अजूनही इराणमध्ये छळछावण्या आहेत असे म्हटले जाते.
तेव्हा इराणमध्येही (अनेक राष्ट्रवादाने भारलेल्या देशांत जसे घडते तसेच) असे करणे हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक आहे हे जनतेवर बिंबण्यात राज्यकर्ते यशस्वी झाले होते. अजूनही अशा प्रकारचे कायदे बर्याच मुस्लिम देशांत आहेत. बुश काळात अमेरिकेतही याचा दुरूपयोग जगाने बघितला. आपल्याकडील पोटा वा तत्सम कायद्यांना विरोध करणार्यांवर कितीही टिका झाली तरी याला विरोध करणे सोडू नये ही शिकवण जगातील कित्येक देशांच्या इतिहासातून मिळत असते. पण राष्ट्रवाद ही धर्मापेक्षाही जालीम अफुची गोळी आहे हेच खरं!
====
तीनही भागांची लेखमाला अतिशय आवडली.
ऐसीवर असेच सकस लेखन वरचेवर येत रहावे असे मनोमन वाटते. मनःपूर्वक आभार!
इंग्रजांनी वा इतरही युरोपिय
तितका काळ अमेरिकेने कोणावरही "राज्य" केले नाही. मुळात दोन वेगळ्या कालखंडातल्या व दोन भिन्न परिस्थितीतल्या गोष्टींची सरळसरळ तुलना करणे अस्थानी वाटते.
कालखंड निश्चितच महत्त्वाचा आहे
यूरोपियन राज्यकर्त्यांच्या काळात राष्ट्रवादाची जाणीव बाल्यावस्थेत असण्याच्या शक्यतेमुळे आणि तीच जाणीव विसाव्या शतकात वाढीस लागल्यामुळे देखील हा फरक उद्भवला असेल.
अतिशय सुंदर लेखमाला. गेल्-एन
अतिशय सुंदर लेखमाला. गेल्-एन आय ओ सी च्या कराराची आठवण झाली.
लेखमाला आवडली. संदर्भदुवेही
लेखमाला आवडली. संदर्भदुवेही दिले असते तर अधिक चांगले वाटले असते.
छान लेख
छान लेख , अनेक नविन गोष्टी कळाल्या
लगे हाथ १९७९ च्या उठावाबद्दल पण लिहिलेत तर इतिहासची एक साखळी समजायला मदत होईल
नक्कीच...
लवकरच टाकतो.
धन्यवाद वाट बघतो आहोत
धन्यवाद
वाट बघतो आहोत
इराणच्या शहाची गच्छन्ती
लेखमालेमध्ये सावाक ही गुप्तचरसंस्था आणि इराणच्या शहाचा डामडौल, प्रचंड खर्च करून इराणमधील राज्यसंस्थेचा २५०० उत्सव करणे अशा गोष्टींचा उल्लेख आला आहेच.
इराण, अफगाणिस्तान अशा देशातील आम जनता इस्लामच्या पगडयाखाली असल्यामुळे राजघराण्याचा भपका, त्यांची पाश्चात्य राहणी (मद्यप्राशन, स्त्रियांनी केस, खांदे उघडे ठेवणे इ.इ.) ह्यामुळे सर्वसामान्य जनता आणि राजघराणे आणि तिची प्रभावळ ह्यांच्यामधील अंतर दुरावत गेले. ह्याचा परिणाम म्हणजे दोन्ही देशातील राजघराणी उखडली गेली आणि पुराणमतवादी सत्ता दोन्ही ठिकाणी येऊ शकल्या असे विश्लेषण वाचले होते ह्याची आठवण झाली. जनतेला पटल्याशिवाय देश मागून ढकलून आधुनिक होत नाही हे शहाला कधी जाणवलेच नाही.
जनतेला पटल्याशिवाय देश मागून
याच्या बरोबर उलट, सौदीमध्ये टेलिफोन, टीव्ही आणण्याआधी राजा फैजल याने मौलवींना आपल्या बाजूने वळवले अशी वर्णनं गिरीश कुबेरांच्या पुस्तकांमध्ये आहेत.
अमेय संजय, पुढच्या लेखमालेच्या प्रतीक्षेत.