सरकारी शाळांमधील घसरलेली गुणवत्ता

सरकारी प्राथमिक शाळांमध्ये शिक्षणाची गुणवत्ता नाही, अशी ओरड सतत होत राहते. यात तथ्यांश असल्याचेही काही गोष्टींवरून स्पष्ट होते. याला काही प्रमाणात शिक्षकांमध्ये शाळा व विद्यार्थीप्रति नसलेली आत्मियता, नसलेला एकोपा, त्याचबरोबर शिक्षकांमधला अहंगंड, एकमेकांविषयी असलेली असुया, राजकारण्यांच्या दबावाने दबलेली प्रशासन व्यवस्था आदी गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत. शाळा म्हणजे एक कुटूंब आहे, याचा लवलेशसुद्धा काही शाळांमध्ये दिसून येत नाही.
एका तालुक्याच्या ठिकाणच्या शाळेतला अनुभव पाहायला मिळाला. तिथे खटणार्‍या अनेक बाबी पाहावयास मिळाल्या. या शाळेतल्या शिक्षकांमध्ये विशेषतः शिक्षिकांमध्ये एकमेकांविषयी प्रचंड असुया असल्याचे जाणवले. आपण मुलांसाठी आहोत, त्यांच्यासाठीच एका कालमर्यादेत काम करणार आहोत. शिक्षकी पेशा ही एक सामाजिक बांधिलकी आहे, याचा तिथल्या शिक्षकांना विसर पडल्याचे जाणवत होते. उलट 'ती उशीरा येते, मग मी का लवकर येऊ? तिने आज रजा भोगली , उद्या मी रजेवर जाणार... तिचा वर्ग मी का सांभाळू ? ती कुठे माझा वर्ग सांभाळते? तो नुसताच फिरतो... त्याला तुम्ही काहीच का म्हणत नाही? असे एक ना धड अनेक प्रश्न घेऊन आपल्या वरिष्ठांशी सतत तंडताना पाहिले. प्रभावी अध्यापन अथवा सर्जनशीलतेच्या प्रभावी सोज्वळ दर्पापेक्षा पैशाचा दर्प त्यात डोकावत असल्याचे जाणवायचे. पालकांशी संपर्क ठेवताना प्रसंगी त्यांच्या दारापर्यंत जाणे ओघानेच आले. पण इथे मात्र मुलाला घरी पाठवून पालकालाच शाळेत बोलावण्याचा अट्टाहास! सभोवतालच्या सामान्य व उच्च मध्यमवर्गियांच्या कुटुंबांची मुले शाळेत नाहीतच. गावाबाहेरची, झोपडपट्टीतील रोज राबून खाणार्‍यांची मुलं या शाळेत होती. आपल्या परिसरातील मुलं आपल्या शाळेत यावीत, असा विचारही त्यांच्या मनाला शिवत असावा की नाही कोण जाणे! खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे आजूबाजूला पेव फुटले असताना शाळा अपात्र होण्याची आणि आपल्याच एखाददिवशी बोर्‍या-बिस्तरा दुसर्‍या शाळेत हलवावा लागणार, याची अजिबात भीती नसलेली मूर्दाड शिक्षक मंडळी पाहायला मिळाली.
अशी शिक्षकांची मानसिकता का झाली आहे, याचा विचार होण्याची गरज आहे. आपले कर्तव्य न पाळणारा आणि तो पाळत नाही म्हणून मी तरी का पाळावं, अशी मतलबी मानसिकता तयार झालेल्या शिक्षकांकडून कुठली अपेक्षा करायची? असे शिक्षक रोजच्या पाट्या टाकण्यापलिकडे दुसरे ते काय करणार? त्यांच्यात मुलांप्रती मायेचा ओलावा कसा बरे येणार? त्यांच्या समस्या , त्यांच्या गुणावगुणांचा थांगपत्ता कसा लागणार? मुलांमधील सर्जनशीलता, त्याच्या सर्जनशीलतेआड येणारी परिस्थिती अथवा अन्य काही समस्यांचा उकल कशी होणार? व त्यातून मुलाला बाहेर काढून शिक्षणाच्या प्रवाहात आणताना, त्यांच्यातील कलागुणांचा विकास तो कसा साधला जाणार? आज सर्वांगिण गुणवत्ता विकास आणि आनंददायी शिक्षणावर भर दिला जात असतानाच शिक्षणाचा अधिकार कायदा शाळांच्या उंबरठ्या आत आला आहे. असे असताना दांड्या मारणारा शिक्षक आणि त्याची असुया करत बसणार्‍या शिक्षकालासुद्धा शाळेत लवकर येण्याची चूक केली, असे का वाटावं? असा हा सवाल आहे.
राजकारण्यांच्या जीवावर नुसतीच शाळा करणार्‍या शिक्षकांमुळे खरोखरीच शाळा होईल, काय? असा प्रश्न आहे. शिक्षकांची कर्तव्ये, शिक्षणाचा अधिकार याविषयी पालक जागृत होत असताना शिक्षक मात्र स्वतःच्या मतलबात मश्गुल असावेत, हेच मोठे दुर्दैव आहे. शिक्षक स्वतःच आनंदापासून कोसो दूर असल्यावर मुलांना कुठले आनंददायी शिक्षण मिळणार? अशाने का नाही जाणार मुलं खासगी शाळांकडे? आज कामाच्या मागे धाव धाव धावणार्‍या पालकांना मुलांसाठी वेळ द्यायला सवड नाही. चांगली ट्यूशन, चांगली शाळा यासाठी पैसे मोजण्याची पालकांची तयारी असते. खासगी शाळांमध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या जात असल्याने तिथे खूप चांगले शिक्षण मिळते, असा पालकांना वाटत असते. वास्तविक आजच्या घडीला अभ्यासापेक्षा विविध उपक्रमांवर भर देण्याची आवश्यकता असल्याने पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे.
प्राथमिक शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानातून भौतिक सुविधा मिळाल्या आहेत. पण गुणवत्ता वाढली नाही. सरकारी शाळांमध्ये अपवाद सोडल्यास विविध उपक्रमांच्या नावाने ठणाणाच असतो. आपापसातील मतभेद, असुया , मी आणि माझा वर्ग अशा कोषात प्राथमिक शिक्षक अडकल्याने सरकारी शाळांमधील गुणवत्ता दिसत नाही. ओरडून विकणार्‍याच्या एरंडयाच्या बिया विकल्या जातात, मात्र गप बसणार्‍याचे गहूसुद्धा विकत नाहीत, असा आजचा जमाना आहे. त्यामुळे सरकारी शाळांमध्ये राबवलेल्या उपक्रमांना प्रसिद्धी मिळायला हवी. नव्हे प्रसिद्धीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत. आपापसातील मतभेद विसरून, शाळा एक कुटुंब आहे, असे समजून सेवावृत्तीने काम करीत राहिल्यास सरकारी शाळा पुढे गेल्यासशिवाय राहणार नाहीत.
सगळीकडे कामे करणार्‍यांचा व न करणार्‍यांचा गट असतो. न करणार्‍यांकडे कानाडोळा करून आपली जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. आपल्याला कामासाठी मोबदला पगाराच्यारुपाने मिळत असतोच, पण शिक्षक म्हणून आपले आणखी एक मोठे कर्तव्य आहे, याचे भान सतत ठेवायला हवे. देशाची भावी पिढी शिक्षकाच्या हाती आहे, त्यांना चांगला, सक्षम नागरिक बनवण्याची जबाबदारी शिक्षकाची आहे.
राजकारणाचा शिक्षण क्षेत्रात हस्तक्षेप वाढला आहे. त्यांना हाताशी धरून काही करता येऊ शकत असेल तर कशाला कामकरण्याची उसाभर करा, अशी मनोवृत्ती वाढली आहे. पैसे फेकले की राजकारण्यांच्या वरदहस्ताने पाहिजे तिथे सोयीस्कर अशी बदली करून घेता येते, ही मानसिकता तयार झाल्याने शाळांमध्ये निव्वळ पाट्या टाकण्याचा प्रकार वाढला आहे. त्यामुळे सरकारी शाळांमधील गुणवत्ता घसरल्याची, जी ओरड सुरू आहे, ती योग्यच आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

इथे झेपेल का हा चर्चा विषय?
फाऽर मूलगामी चर्चा आहे ही. नुसत्या सरकारी शाळा नाहीत. सगळ्याच शाळा.
We need to decide how exactly we want to educate our children. आजकाल सगळेच पोरांना परिक्षार्थी बनवताहेत. विद्यार्थी कधी बनतील ती मुलं? अन आजची मास्तरे?
देव माफ करो त्या मास्तर्/मास्तरणींना..
मी स्वतः मास्तराचा मुलगा. मीही मास्तरकी केली आहे. म्हणून पोटतिडिकीने हे वरचं लिहिलंय.
बघू.
लोकहो, आपले विचार लिहा. फार काही बोलण्यासारखं आहे इथे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

चर्चा विषय अनंत- अनादी आहे. शिक्षकीपेशाशी फार जवळून संबंध असल्याने, माझे एक पालक स्वतः शिक्षक असल्याने बरंच काहि लिहिता यावे.

मात्र, कोणतेही काम 'फायदा करून देणारा व्यवसाय', 'पोटापाण्यापुरता केलेला उद्योग' आणि 'आवडीचे/पोटतिडीकीने केलेले काम' यापैकी कोणत्याही स्वरूपात करता येते. मग तो शिक्षकी पेशा असो, सॉफ्टवेअर असो नाहितर डॉक्टरकी. पेशानुसार समाजाच्या अपेक्षा बदलत जातात. मात्र इतर करतात ते बर्‍याचदा त्यांच्या भुमिकेनुसार, परिस्थितीनुसार ठिकच असते. उगाच भावनिक / आदर्शवादी भुमिका घेऊन त्या त्या पेशातील लोकांना झोडपणे सोपे असले तरी त्यात मला काहि हशील वाटत नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला शालेय व महाविद्यालयीन जिवनात एकदोन शिक्षक सोडले तर कुणीही योग्य शिक्षक भेटलेले नव्हते त्यामुळे या विषयाच्या बाबतीत माझी मते अत्यंत त्रीव्र व टोकाची आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

हे असेच चालायचे. सरकार नावाच्या मंडळींच्या शिक्षण संस्था. त्यांच्याच नातेवाईकांची शिक्षक पदावर भरती. मग काय शिक्षणाचा उदो.. उदो... सरकारी शाळांमधला मास्तर काय आणि मास्तरीण काय सारे आला दिवस घालवायला बसले आहेत. पुढार्‍यांच्या मागे लागून पाहिजे तिथे बदली करून घेता येते. यात पुढार्‍यांचे भले मास्तरांचेही भले. भ्रष्टाचार असाच वाढत जातो. काम न करता पगार घेणे हासुद्धा भ्रष्टाचारच की! मच्छिंद्र ऐनापुरे यांनी 'ऐक्य, सातारा'च्या रविवार पुरवणीत शासन- प्रशासन यावर चांगलं लिहिलं आहे.( नेटवर मी हा लेख आताच पाहिला)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला वाटतं की एकंदरीतच जगभर शिक्षकी पेशाला मान असावा त्यापेक्षा खूपच कमी आहे. आपल्यापैकी किती जण मोठे होताना 'मी शिक्षक होणार' अशी महत्त्वाकांक्षा बाळगतात? जवळपास सगळेच जण डॉक्टर, इंजिनियर वगैरे होण्याची स्वप्नं बघतात. याचं कारण उघड आहे. शिक्षकाला पैसा फार मिळत नाही. ज्या पेशातून अत्यंत उत्कृष्ट समाज घडवण्याची संधी आहे, त्यापेशापेक्षा इतर पेशांना कितीतरी पट अधिक पैसे मिळतात. जर दर पिढीतले सर्वोत्तम विद्यार्थी शिक्षक बनण्यापासून परावृत्त होत असतील तर उत्तम शिक्षक तयार व्हावेत ही अपेक्षा कशी ठेवता येईल? प्रायव्हेट शाळांना निदान वेतनदर वाढवून चांगले शिक्षक आकृष्ट करण्याची सोय असते. सरकारी शाळांमध्ये जे वेतनदर असतात त्यांकडे उच्च शिक्षण घेतलेले तरुण तरुणी का आकर्षित व्हावेत?

मला वाटतं प्रश्न शिक्षकी पेशाचा किंवा तो करणाऱ्या व्यक्तींचा नसून व्यवस्थेचा आहे. कधी काळी सुबत्ता येईल तेव्हा शिक्षण आणि संस्कार यांना महत्त्व येईल. तेव्हा शिक्षकी पेशाला चांगले दिवस येतील. सध्या परिस्थिती आशादायक नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>प्रायव्हेट शाळांना निदान वेतनदर वाढवून चांगले शिक्षक आकृष्ट करण्याची सोय असते.

मला वाटते प्रायव्हेट शाळांना जास्त वेतनावर सह्या करून कमी वेतन घ्यायला तयार असणारे शिक्षक मिळवण्याची सोय असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला वाटते प्रायव्हेट शाळांना जास्त वेतनावर सह्या करून कमी वेतन घ्यायला तयार असणारे शिक्षक मिळवण्याची सोय असते.

(असे होत असल्यास) खाजगी शाळांना या सोयीतून नेमका काय फायदा होत असावा, ते समजू शकले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाळा चालकांना ते पैसे स्वतःच्या खिशात घालता येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मग शाळाचालक, शिक्षकांचे पगार वगैरे मध्ये न आणता, थेटच ते पैसे खिशात का घालू शकत नाहीत?

समजा, शिक्षकाचा (कागदोपत्री) पगार जर 'क्ष' असेल, तर शिक्षकाकडून 'क्ष'च्या रकमेवर सही घेऊन त्याला (उदा.) ०.७५'क्ष' इतकीच रक्कम देऊन उरलेली ०.२५'क्ष' रक्कम खिशात घालण्याऐवजी, शिक्षकाचा पगारच मुळात अधिकृतरीत्या ०.७५'क्ष' इतका ठेवून ०.२५'क्ष' इतकी रक्कम 'उद्योजकाचा नफा' म्हणून थेट खिशात घालायला खाजगी शाळाचालकाच्या नेमके काय आड येते?

सरकारी शाळेत समजा असे झाले तर एक वेळ समजू शकतो. (म्हणजे, समर्थन करत नाही; केवळ modus operandi समजू शकतो, इतकेच.) कारण तेथे, शिक्षकाची वेतनश्रेणी वगैरे प्रकार ठरवणारी मंडळी (आयोग वगैरे जे काही असेल ते) बहुधा वेगळी असावीत. आणि कागदोपत्री का होईना, पण त्या ठराविक वेतनश्रेणीने ठरवलेलाच पगार देण्यास अशी शिक्षणसंस्था (सरकारी नियमांनी) बांधील असावी. त्यामुळे शाळाचालकांस म्हणा किंवा पगाराचे वितरण करणार्‍या बाबूस म्हणा, खाबूगिरी करायचीच झाल्यास, शिक्षकाकडून वेतनश्रेणीप्रमाणे योग्य अशा रकमेवर सही घेऊन प्रत्यक्षात कमी रक्कम देऊन फरक खिशात घालण्याची पद्धत अवलंबणे भाग पडत असावे. (अर्थात, ही केवळ आमची अटकळ आहे; प्रत्यक्षात काय घडते याबद्दल कोणतीही प्रथमहस्त किंवा खात्रीलायक माहिती नाही. पण अटकळ ठोकून देतोच आहोत, म्हटले तर, अशी खाबूगिरी होत असल्यास, कदाचित या खाबूगिरीत खालपासून वरपर्यंत सर्वांचा हात असल्यास अथवा सर्वांना हिस्सा मिळत असल्यास कोणतेही आश्चर्य वाटणार नाही, अशीही पुस्ती जोडूनच ठोकतो. तर ते एक असो.)

पण खाजगी शिक्षणसंस्थांना असे नेमके कोणते कंपल्शन आड येत असावे, हे कळत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कागदोपत्री नफा न दाखवता रक्कम खिशात घालता येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी बरीच वर्षे खाजगी नोकरी करुन, ती सोडून, नंतर नव्याने शिक्षण घेऊन सध्या शिक्षक म्हणून काम करतो. माझ्या नोकरीत मी अत्यंत समाधानी आहे. स्वार्थी, मतलबी, खुजे सहकारी, संचालकांचे, मालकांचे अप्पलपोटे राजकारण, अत्यंत मद्दड, आसपासच्या परिस्थितीची जाणीव आणि पर्वा नसणारे विद्यार्थी, एकमेकांचे पाय ओढण्याची, मेलेल्याच्या टाळूवरील लोणी हडपण्याची, प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट शोधण्याची आणि 'परीक्षा आणि मार्क्स' हेच एकमेव ध्येय ठेवण्याची वृत्ती असणारा सगळा समाज - ही असली सगळी दलदल आजूबाजूला असतानाही मी माझ्या नोकरीत सुखी आहे. मला पैसे फारसे मिळत नाहीत, पण त्याचा तसाही सुखी असण्याशी काही संबंध नसतो असे खांडेकरांपासून सगळ्यांनी सांगितले आहे. ते खरेच असावे, असे मला आता वाटू लागले आहे.
वर्गात डेस्कवर कोपर किंवा हनुवटी ठेवणार्‍या, च्युईंगगम खाणार्‍या, शेजारच्या मुलाच्या किंवा मुलीच्या खांद्याभोवती हात गुरफटून बसणार्‍या, फोनवर एसेमेस बघणार्‍या मुलामुलींना - मग ती कितीही श्रीमंत बापाची असोत - माझ्या वर्गातून अपमानित होऊन बाहेर जावे लागते. 'मुलांच्या इंटर्नलचे मार्क जरा वाढवून द्या बरं का, सर!' अशी आदेशवजा धमकी देणार्‍या संचालकांच्या टेबलवर दुसर्‍या मिनिटाला राजिनामा फेकून मी बाहेर पडलो आहे. 'फ्रेशर्स पार्टी' ला 'मी येणार नाही' असे मी आमच्या संचालकांना तोंडावर सांगितले आहे. हे असले सगळे जळकट, जुनाट तत्ववादी विचार घेऊन जगणारा कधी लोकप्रिय होऊच शकत नाही. तसा मीही नाही. पण शिक्षकाने चांगला शिक्षक व्हावे, चांगला माणूस होण्यासाठी प्रयत्न करावे असे जुने, बुरसटलेले विचार घेऊन जगणार्‍याला लोकप्रियता नकोच असते. तशी ती मलाही नाही. पण आजवर विद्यार्थ्याने विचारलेल्या कोणत्याही शंकेला 'बघून सांगतो' असे उत्तर देण्याची माझ्यावर वेळ आलेली नाही. पाचशेत एखादा विद्यार्थी घरी येतो आणि वाचायला म्हणून अभ्यासाव्यतिरिक्त इतर कुठल्यातरी विषयावरची पुस्तके घेऊन जातो. कुठेतरी मॉलमध्ये एखादा अनोळखी माणूस वाकून नमस्कार करतो आणि 'सर, मी २००६ च्या बॅचमधला. तुमचे क्लासेस अजून लक्षात आहेत..' असे म्हणतो. पहिल्या सेमिस्टरला बावरलेली, गांगरलेली, जिच्या तोंडातून शब्द फुटत नाही अशी एखादी मुलगी शेवटच्या सेमिस्टरला फुललेल्या चेहर्‍याने समोर येते. 'सर, आपने बहोत कॉन्फिडन्स दिलाया, थँक यू, सर.मेरा प्लेसमेंट हो गया, सर..' असे म्हणते. हातात चॉकलेटची वडी ठेऊन नमस्कार करते.
हे सगळे आत्मस्तुतीपर भाराभार लिहिले एवढ्यासाठी की 'आम्ही तसे खूप आदर्शवादी आहोत, पण परिस्थिती हो, शेण खायला लावते बघा माणसाला!' असे म्हणणारे जसे सगळीकडे असतात, तसेच शिक्षकी पेशातही आहेत. त्यातूनच वाट काढत, ठेचकाळत, पडत पुढे जाणे शक्य आहे. अवघड आहे, पण शक्य आहे. सरकारी काय, किंवा खाजगी काय, सगळ्यांच ठिकाणी सुमारसद्दी आहे. त्याचा स्वतःवर परिणाम होऊ न देता आपल्याला जे योग्य वाटेल ते करत राहाणे आणि ते का करता येत नाही यासाठी कोणतीही कारणे न सांगणे हे शक्य आहे. अवघड आहे, पण शक्य आहे.
पण लोकांना अवघड काही नको असते. सगळे साधे, सोपे, प्रीडायजेस्टेड, सेरेलॅकसारखे हवे. मूळ प्रश्न मला वाटते हाच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

डेस्कवर कोपर ठेवण्यात चुकीचे काय आहे नक्की? शाळेतही काही शिक्षक ठेऊ द्यायचे नाहीत, तेव्हाही कारण समजले नव्हते आणि आजही समजलेले नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शिक्षकालासुद्धा आपल्या कामाचे कौतुक व्हावे असे वाट्त असते.पण भोवतालचा परिसर तसे होऊ देत नाही.शिक्षकाने मिळेल त्या भाजी भाकरीत सुखाने राहायला शिकले पाहिजे. समाधानी राहिले पाहिजे. हे तर योग्य आहेच. प्रत्येकाने आपल्या कामात समाधानी असायला हवे.पण आपल्या ज्ञानाचा अन्य प्रकारे( ट्यूशन वैगेरे नव्हे) उपयोग करून वरखर्चाचे पैसे मिळवायला काय हरकत आहे? समाज-समुदेशनाचा चांगला पर्याय त्यांच्यापुढे आहे. आपल्या विषयांत पारंगत असल्यास अन्य काही छंद बाळगायला काय हरकत आहे? त्यात अडकून पड्ल्याने समाजातले, स्टॉफमधल्या गलिच्छ वातावरणाकडे लक्ष जाणार नाही. आनंदी समाधानी राहता येईल. याचा परिणाम असा होईल की शिक्षक मंडळी मुलांसमोर हसतमुखाने राहतील, कामाचा कंटाळा येणार नाही. हेवेदावे ( किमान स्वतः पुरते तरी) राहणार नाहीत. आणखी एक असे की, शिक्षकांनी कामाच्या ठिकाणी आपला प्रपंच, आपली ऐट बाजूला ठेऊन काम करायला हवे. आजच्या जमान्यात शिक्षकीपेशा व्यावसायिक आहे, असे ग्रहीत धरून चालावे लागते. पण ही नोकरी अन्य नोकर्‍यांपेक्षा खूप वेगळी आहे. इथे शिक्षकाचे अनुकरण मुले करीत असतात. त्यामुळे मूल्ये इथे आपोआप चिकटतात. आदर्श समाज, आदर्श नागरिक बनविण्याची भाषा जेव्हा बोलली जाते. तेव्हा तिथे शिक्षकाच्या गुणावगुणाचा सम्बंध येतो. त्याच्या राहणीमानाची चर्चा होते. ही बाब अन्य कुठल्या खात्यात किंवा नोकरीत होत नाही. आज जो शिक्षकांपासून समाज दुरावला आहे, त्याला काही प्रमाणात शिक्षकसुद्धा जबाबदार आहे. उद्या शिक्षकाला चांगले दिवस येण्यासाठी शिक्षकाने स्वतःला बदलेले पाहिजे. आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार्‍या शिक्षकाला समाजात मान मिळतो. त्यासाठी जरूर प्रयत्न व्हायला हवेत. भोवतालचा सारा गलिच्छ परिसर टाळायचा म्हटले तर टाळू शकत नाही.
........या शिक्षकी पेशात चापलुसी, चमचेगिरी, उभा-आडवा हात मारल्याशिवाय काही मिळत नही. काम कमी आणि खळखळाट जास्त करणार्‍याच्या पदरात बरेच पडते. अशा गोष्टीसुद्धा न करता तोंडात साखर ठेऊन वागणारी मंडळी शिक्षक मंडळी आरामात जगताना दिसतात. कुणाशी वैर नको, कुणाशी जास्त सलगी नको. आपले काम आणि आपण भले अशा शिक्षकांच्या गोष्टी पटतात का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"आपापसातील मतभेद, असुया , मी आणि माझा वर्ग अशा कोषात प्राथमिक शिक्षक अडकल्याने सरकारी शाळांमधील गुणवत्ता दिसत नाही"
"'ती उशीरा येते, मग मी का लवकर येऊ? तिने आज रजा भोगली , उद्या मी रजेवर जाणार... तिचा वर्ग मी का सांभाळू ? ती कुठे माझा वर्ग सांभाळते? तो नुसताच फिरतो... त्याला तुम्ही काहीच का म्हणत नाही?"

~ या आणि अन्य काही वाक्यांच्या प्रयोजनामुळे श्री.ऐनापुरे यांच्या लेखाचा सिद्धांत असा होऊ शकतो की सरकारी शाळांमधील घसरलेल्या गुणवत्तेला फक्त "शिक्षक" हाच एकमेव घटक जबाबदार आहे. असे आरोप काहीवेळा वर्तमानपत्रातून आणि आजकाल जालीय फोरमवर होतात ते एकतर्फी असतात. त्याला अनुभवातून वा अधिकृत उत्तर द्यायचे झाल्यास ते फेटाळण्यासाठी पुरेशा अनुभवाच्या एखाद्या शिक्षकानेच [प्रा. ने नव्हे] अशा फोरमचे सदस्यत्व घेणे जरूरीचे असते, पण ते होत नसल्याने मग आरोपाचे गोंदण घट्ट होत जाते. "शिक्षक" या संकल्पनेभोवती 'आदर्शा' चा वेढा घातलेला असल्याने त्याचे वर्तन हे तसेच असणे हे खाते आणि समाज या दोघानाही अपेक्षित असते. त्या उलट सरकारी कचेरीतील 'बाबू' पैसे खाऊनच काम करतो अशीही मनोवृत्ती समाजात दृढ झाल्याने त्याने केलेल्या वरकड कमाईवर सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले जाते [पोलिस खात्यात तर "बाय डिफॉल्ट" खाल्लेच पाहिजेत असा समज], पण शिक्षकाने मिळत असलेल्या तुटपुंज्या पगारातच शिक्षणदानाचे (काय शब्द आहे, अगदी साने गुरुजींच्या टाकसाळीत तयार झाल्याप्रमाणे) ते पवित्र कार्य अहर्निश केले पाहिजे ही अपेक्षा. त्याला मिळत असलेल्या वेतनात तो २+२ या आकृतीबंधाचा तरी संसार चालवित असेल की नाही याची मंत्रालयातील कोणत्याही ए.सी.खोलीत बसलेल्या अधिकार्‍याला फिकिर नसते. पण दुसरीकडे त्या शिक्षकाने संसारासाठी चार जादाचे पैसे मिळावेत म्हणून घरी 'खाजगी शिकवणी' सुरू केली आहे असा एखादा अहवाल आला की त्याला दट्ट्या कसा लावायचा हे मात्र थेट शिक्षणाधिकारी नावाच्या प्राण्यापासून हे.मा. पर्यंत सार्‍यांना ठाऊक. मग अशा काहीशा नैराश्ययुक्त वातावरणात राहिलेल्या [सरकारी] शाळांतील शिक्षकाने 'पाट्या टाकण्या'चेच कामे कायम ठेवले तर त्याच्याकडून कसल्या गुणवत्तेची अपेक्षा ठेवायची ?

'सरकारी शाळा आणि गुणवत्ता' हा चिंतेचा विषय आजचा नसून थेट १९६५-६६ मध्ये नेमण्यात आलेल्या कोठारी कमिशनपुढेही हा विषय होताच. प्रचलित रूढ शिक्षणपद्धतीत तयार झालेले शिक्षक, नवनव्या कल्पनांना का सामोरे जाण्यास नाखूष असतात, वा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा वापर ते आपल्या नेहमीच्या शिक्षण प्रदान करण्याच्या पद्धतीत का वापर करू इच्छित नाहीत याकडे 'अधिकारी' नावाची व्यक्ती तर लक्ष देत नाहीत, पण शिक्षक मतदार संघातून 'आमदार' म्हणून निवडून गेलेला वाघ्याही मुंबईत गेल्यावर लक्ष देत नाही. त्याला [पक्षी : आमदार] "मी शिक्षकांसाठी नोकरीची शाश्वती, पगारवाढ, वेगवेगळे भत्ते, रजा, सुट्ट्या, मोफत प्रवास" यासाठीच किती 'कष्ट' केले याचीच पोपटपंची करण्यात स्वारस्य. एकाही शिक्षक आमदाराने सरकारी शाळातून घसरत गेलेल्या गुणवत्तेबद्दल विधानभवनातील पटलावर श्वेतपत्रिका प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न केलेला नसल्याचे सिद्ध होईल.

दुर्दैवाने राज्य शासन असो वा केन्द शासन असो, 'शिक्षण' खाते हे मंत्रिमंडळातील सर्वात दुर्लक्षित असे खाते आणि मुख्यमंत्र्याला नको असतानाही 'वरच्या' आदेशामुळे घ्यावे लागलेल्या व्यक्तीकडे ते खाते जात असल्याने तोही तितकाच उदास. प्रा.वसंत पुरके आणि प्रा.मुरलीमनोहर जोशी हे दोनच अशा खात्याचे मंत्री अनुक्रमे मुंबई आणि दिल्लीत होते की जे राजकारणात उतरण्यापूर्वी 'शिक्षक' होते. बाकी अन्यांनी शिक्षकाला प्रतिष्ठेच्या गुरुदेव पदावरून गिरणीतील कामगाराप्रमाणे "सरकारी नोकर" पदावर आणले आहे. शिक्षण व्यवस्थेचे हे सरकारीकरण टप्पा अनुदान पद्धतीमुळेही फार विचका झाल्यासारखे नासून गेले आहे. फक्त "बी.एड./एम.एड." झाला म्हणजे तो "शिक्षक" पदास पात्र ठरतो हे देखील शिक्षकाच्या यांत्रिकीकरणाचे एक कारण आहे. "बॅचलर ऑफ एज्युकेशन" च्या अभ्यासक्रमात 'विद्यार्थ्यांचे कॅटलॉग कसे भरावे' आणि 'त्यांची सरासरी हजेरी कशी काढावी' यावर धडे असतात. वास्तविक याचे "प्रात्यक्षिक' या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून या होऊ घातलेल्या भावी शिक्षकांना मिळणे आवश्यक आहे, पण आजमितीला केवळ त्याविषयीच्या वाचनावर हे शिक्षकविद्यार्थी 'तयार' झाले असे मानले जाते. कोणत्याही प्राथमिक शाळेत तुम्ही जा [अर्थात सरकारी....हा लेख 'सरकारी शाळातील गुणवत्तेशी' निगडित असल्याने प्रतिसादही त्या झोनपुरताच मर्यादित मी ठेवला आहे] आणि अगदी तीनचार वर्षे नोकरी केलेल्या शिक्षकाला त्याच्या वर्गावरील जानेवारी २०१२ ची विद्यार्थ्यांची 'सरासरी हजेरी' मागा. तो गोंधळून जातो. कारण ? कारण, त्याच्याकडे हेडमास्तरांनी वा पर्यवेक्षकाने तसे तेवढ्या कालावधीत मागितलेलेच नसते. त्याला हजेरीपत्रक भरता येईल, पण 'अ‍ॅव्हरेज अटेन्डन्स पर्सेन्टेज' ही टर्मही माहीत नसते. थातूरमातूर त्रैमासिक रीपोर्टस खात्याकडे पाठविले की झाले अशी हेमाची भूमिका त्याला हा शिक्षक तरी काय करेल.

शिक्षणकार्य तर लांबच, दर सोमवारी शाळेत जाण्यापूर्वी रविवारी या शिक्षकाला येत्या आठवड्यात शिक्षणाशिवाय जी कामे करावी लागणार आहेत त्याचा घरी आढावा घ्यावा लागतो. शासनातर्फे 'प्राथमिक शिक्षण घेणार्‍या मुलामुलींसाठी सवलती' या गोंडस नावाखाली वेळोवेळी जाहीर होणार्‍या योजनांचा पाठपुरावा अन्य कुणाला नाही तर या शिक्षकालाच करावा लागतो. यामध्ये सर्वात मोठे दुखणे कुठले असेल तर मध्यावधी भोजन. जरी या भोजन पुरवठ्याचे ठेके बाहेरच्या कंत्राटदाराला दिलेले असले तरी प्रत्यक्ष वर्गावर त्याचे वाटप वर्गशिक्षकांकडूनच करण्याची सक्ती असते. म्हणजे दुपारी १.३० वाजता ती पॅकेट्स आली, की सर्वप्रथम 'अ‍ॅट रॅन्डम' त्यातील एका पाकिटातील अन्नपदार्थाचे ग्रहण त्या शिक्षकाला वर्गातील सार्‍या मुलामुलीसमोर करावे लागते (हे सक्तीचे आहे). त्यानंतर मग वाटप, मग हळूहळू त्या मुलांचे मजेत खाणे, तिथेच उष्टान्न टाकणे, पाणी पिणे, ते सांडणे, कलकलाटातच हा भोजन कार्यक्रम कसाबसा संपला की मग सार्‍या मुलांना वर्गाबाहेर काढून तो वर्ग परत स्वच्छ करणे. शहरातील शाळांत शिपाई नावाचा प्राणी असतो तो कदाचित मदतील येऊ शकेल, पण जिथे तालुका पातळीवरील शाळेत नसतो शिपाई तर मग डोंगरी भागात वा खोलवरील प्रांतात असणे केवळ अशक्यप्राय गोष्ट. थोडक्यात ही साफसफाईची कामेही मग त्या सरकारी शाळेतील शिक्षकालाच करावी लागतात. उरलेल्या वेळेत काय आणि कसला उत्साह राहील शिकविण्याचा त्या शिक्षकाकडे ?

याशिवाय विद्यार्थी विमा, शैक्षणिक साहित्याच्यी मोजदाद, त्यांचे वेळोवेळी वाटप, खेळ, त्याच्या समित्या आदी अनेकविध चक्रातून भरडला जात असलेल्या या शिक्षकाचे चित्र खेदजनक आहे याची शासनाच्या संबंधित खात्याला फिकिर नाही. अधिकारी वर्गही संस्थाचालक, प्रशासक यांचेच हितसंबंध जपत असल्याने (त्याचीही अनेक कारणे आहेत) अशा चीड आणणार्‍या व्यवस्थेमुळे सरकारी शाळांमधून गुणवत्तेच्या दृष्टीने कसले प्रयत्न होतील हा संशोधनाचा विषय राहिलेला नाही. फक्त निवडणूक जाहीरनाम्यामध्ये "मुलामुलीसाठी मोफत शिक्षणाची सोय" देण्यापुरतेच त्याचे प्रयोजन आणि तितपतच शासनाचे कर्तव्य मानले गेले आहे.

अशोक पाटील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0