टेक्सासात एका रविवारी
गेला महिनाभर मध्य टेक्ससच्या वाळवंटाला पावसाने झोडपून काढल्यावर आमच्या शहराला पाणी पुरवणाऱ्या एका तलावाची उंची ३८ फूटांनी वाढली. ते वाढलेलं पाणी बघणं हे करदात्या, परदेशी रहिवाश्याचं आद्य कर्तव्य समजून बऱ्या अर्ध्याने शुक्रवारी प्रस्ताव मांडला; "या रविवारी लेक ट्रॅव्हिसला जाऊया पाणी बघायला?" उनाडायचं म्हटल्यावर मी लगेचच होकार दिला, "पण सकाळी लवकर जाऊया. बारा वाजेपर्यंत परत आलेलं बरं."
जून महिन्यातल्या रविवारची टळटळीत दुपार. दुपारी बाराला घरी परत येण्याचा मुहूर्त टळून अर्धा तास झाला होता. एवढ्या उन्हात, जेवायच्या वेळेला पाणी बघायला जायचं माझ्या जीवावर आलं होतं. पण त्याने गरीब, बिचारा चेहेरा करून विचारल्यावर मी इमोसनल ब्लॅकमेल करवून घेतलं आणि होकार दिला. पुढच्या दोन मिनीटांत आम्ही घराबाहेर पडलो. डोक्यावरची भलीमोठी टोपी, डोळ्याला लावलेला भलामोठा काळा चष्मा, तडकफडक रंगांची शॉर्ट्स आणि खांद्याला अडकवलेली झोळी बघून कोणत्याही सुज्ञ अमेरिकनांचा गैरसमज होणं साहजिक होतं, ही बाई पोहायला तलावाकडे निघाली आहे. पाण्याबद्दल मला अजिबात आकस नाही. मला पाणी प्यायला आवडतं, शॉवरखाली तब्बल चार मिनीटं उभं रहायला माझी ना नसते, मला पाण्याबद्दल एवढं प्रेम आहे की खरंतर मला अधूनमधून आंघोळ 'येते'; उन्हाळ्याच्या दिवसांत तर दिवसातून दोन-चारदाही आंघोळ 'येते'. आंघोळ आली की मी लगेच करते. पाणी पहाटे आठ वाजता येणार असेल तर मी पहाटे पावणेआठला बिछान्यातून बाहेर येऊन आंघोळही आठ वाजता आणवते. हे तर काहीच नाही, लोकांना तलावांत, समुद्रांत डुंबताना पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकाला जात नाही. माझा एवढा उदारमतवाद आणि घराबाहेर पडताना तसलाच पुरोगामी गणवेश असला तरीही एवढ्यातेवढ्या कारणांमुळे मी पोहायला निघाले आहे असा गैरसमज करून घ्यायची गरज नाही.
जिन्यावरून बाहेर येते न येते तोच समोरून एक घासून गुळगुळीत दिसणारा, काही दिवसांचे खुंट वाढवलेला तिशीचा इसम समोर आला. आधीच उशीर झाला होता, त्यात आणखी उशीर करायची इच्छा मला नव्हती. मी आपलं नेहेमीचं "हाय" छाप हसले आणि पुढे निघणार तेवढ्यात ... धुळवडीच्या चार दिवस आधी, अनपेक्षितरित्या एखादा फुगा फस्सकन आपल्या तोंडावर येऊन फुटावा तसा हा इसम आपला फसफसणारा फ्रेंडलीपणा घेऊन माझ्यासमोर फुटला. त्याच्या बोटाला लगडलेलं पोर, फ्रॉक घातला होता म्हणजे बहुदा मुलगी असावी, दुसऱ्या दिशेला पळत सुटलं. माझा जीव भांड्यात पडला, आता हा पोरीच्या पाठी जाईल आणि माझी सुटका होईल. मी डोळ्यांनीच पोरीचा पाठलाग केला तेवढ्यात बऱ्या अर्ध्यालाही दोन स्त्रियांनी पकडलंय हे दिसलं. माझा पाठलाग संपून पुन्हा याच्यापर्यंत येईस्तोवर हा इसममात्र तसाच फसफसत दात काढत उभा होता. पोरगी निसटली हातची, असे भाव माझ्या चेहेऱ्यावर बघून तिच्या पाठी पळाला आणि तिला घेऊन आला.
मुलगी नुकतीच चालायला शिकली असावी, तिला पायरी चढता आली नाही. अंगात गुलाबी फ्रॉक - टूटू म्हणतात त्याला बहुतेक, त्याला कमरेच्या खाली बॅलेरिनांचे असतात तसला पांढऱ्या लेसचा मोठा घोळ, पांढरीधोप मुलगी, भुरे केस, केसांना गुलाबी हेअरबँड, त्यात एक पोलका डॉट्सचं गुलाबी फुलपाखरू ... किळस येईस्तोवर ती मुलगी क्यूट होती. "हाय, माझं नाव ... आणि ही माझी मुलगी ...." असं काहीतरी तो बोलला असावा. क्यूटपणाच्या किळसेमुळे आलेला काटा तोंडावर दिसू न देण्याच्या आत्यंतिक गरीब प्रयत्नांत मी होते, त्यामुळे तो काय बोलला हे नीट समजलं नाही. पांढरा शर्ट, सोनेरी-पिवळट रंगाच्या कापडावर गेरू रंगाचा प्रिंट असणारा टाय, केस व्यवस्थित कापलेले, बसवलेले, व्यवस्थित कापलेले चार दिवसांचे दाढीचे खुंट, चेहेऱ्याच्या दक्षिणेला दक्षिण भारतासारखा निमुळता, दाढीमुळे आणखी उठून दिसणारा आकार, चष्मा नाही, ताशीव नाक, गाल, भुरे केस, एवढ्या उन्हातही काळा चष्मा, टोपी काहीच नाही, सगळे रंग माफक, मध्यम, चेहेऱ्याला, केसांच्या रंगाला शोभून दिसणारे, आणि रोज सव्वासहा किलोमीटर धावत असेल असं वाटावीशी शरीरयष्टी. त्याच्या सुडौल, सुरेख, प्रमाणबद्ध बांधीवपणामुळे मला आणखीनच शिसारी आली.
"हाय, माझं नाव ... आणि ही माझी मुलगी ...." आणि त्याने हातही पुढे केला होता. मी पण हात पुढे केला. बरा अर्धा समोरच्या बायकांच्या घोळात अडकलेला दिसला. "किती वय झालंय तिचं?" मला स्वतःबद्दल घृणा वाटली. किळस आणि शिसारीचा माझ्यावर एवढा परिणाम मी होऊ दिला की मुलांबद्दलचे घृणास्पद प्रश्न मी अनोळखी लोकांना विचारायला सुरुवात केली! "अदिती, यावर काम करायला पाहिजे." पण आत्तापुरता बाण सुटला होता, त्याचे परिणाम भोगणं क्रमप्राप्त होतं. दुःखात सुख एवढंच की मी माझ्या टोपीच्या सावलीत होते.
"ती .... महिन्यांची आहे." आता मी हेतूपुरस्सर त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. "तुझं नाव काय?" नशीब तोसुद्धा मुलीत फार अडकला नाही. "ओह, हं. मला आहे नाव. अदिती." बोलताना ड आणि ट वापरलं असतं किंवा कागदोपत्री असलेलं नाव वापरलं असतं तर काय गेलं असतं का! त्याचा फ्रेंडलीपणा फसफसला तरी तो माझ्या अंगावर मी का सांडू द्यावा! "तो तुझा नवरा का?" त्याने बऱ्या अर्ध्याच्या दिशेला बोट वळवलं. "होय." खरंतर तो माझा कोणीही नसता तरी याला काय फरक पडणार होता. तो फक्त माझ्याबरोबर, किंवा मी त्याच्या बरोबर, किंवा आम्ही एकमेकांच्या फक्त बरोबर असून पुरणार नव्हतं का? लग्नाची गरजच काय?
"त्याने त्याचं नाव मला सांगितलं. पण मला नीट समजलं नाही. पुन्हा सांगतेस का?" अरे कर्मा! आता या ब्लाँडीला भ चा उच्चार, इथे उभं राहून शिकवायचा का? "त्याचं नाव अ बियर, एक बियर". बरा अर्धा नेहेमी जे सांगतो तेच मी आता डकवून दिलं. माझ्या नावाला असं काही गंमतीदार रूप का देता येत नाही! "खरंच?" त्याने माझ्या दंडावर उगाच एक हलके चापट मारली.
आता हे फारच झालं. फसफसणारा फ्रेंडलीपणा का फुसफुशीत फ्लर्टिंग याचा धड निर्णयही घेता न येणाऱ्या इसमाकडे टोकाचा आणि शिसारीयोग्य बांधीवपणा असून काय उपयोग! पण एवढी नामी संधी मी सोडणार नव्हते. मगाशी माझ्यावर उडलेले फ्रेंडलीपणाचे शिंतोडे आणि मनास झालेल्या किळसेच्या आंघोळीचा सूड उगवण्याची हीच ती नामी वेळ. "मुळात त्याचं नाव निराळं होतं. पण या देशात स्थलांतर करायचं ठरवल्यावर आम्ही त्याचं नाव बदलून त्यात एक 'भ' आणला. मुद्दामच. इथल्या स्थानिकांना भ म्हणता येत नाही ना; मग कसं सगळं एक्झॉटिक वाटतं." मगाशी स्वतःच विचारलेल्या घृणास्पद प्रश्नाने हौदभर घालवलेलं चेहेऱ्यावरच्या गूढगंभीर भावाच्या थेंबाने आणायचा प्रयत्न केला.
थेंबाचा फायदा झाला. "अरबी भाषेत अबीर असं मुलीचं नाव असतं." अच्छा, म्हणजे विकीपीडीयाछाप माहितीही आहे तर भुऱ्या केसांच्या आत. "आमच्या भाषेत तो निराळा शब्द आहे. कदाचित त्याचं मूळ अरबी भाषेतही असेल." मनातल्या मनात माझ्या पिक्सी कट केसांची शपथ घेतली, काय वाट्टेल ते झालं तरी आम्ही मूळचे कुठचे आहोत याचा पत्ता मी आता अजिबातच लागू देणार नव्हते. "तुम्ही याच काँप्लेक्समध्ये राहता का?" याचा इंटरव्ह्यू संपतच नव्हता. हवेत हात उडवून "तिथे तळमजल्यावर" असा पत्ता सांगून मी थांबले. "आम्ही तुमच्याच वर दुसऱ्या मजल्यावर राहतो. आमच्या पोरांच्या वस्तू कधीकधी तुमच्या बाल्कनीत पडतात. त्या दिवशी तू आमचा टॉवेल परत दिला होतास ना!" हे मात्र बरोबर होतं. मागे कधीतरी आमच्या बाल्कनीत टॉवेल आला होता. मी तो पिशवीत गुंडाळून पहिल्या मजल्यावर ठेवला होता. "आजकाल हवेचा काही भरवसा नाही. ग्लोबल वॉर्मिंग होतंय म्हणतात. टॉवेलांचा पाऊस पडायला लागलाय. सांभाळा." अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती. तो यांचा होता तर!
"हो, ती मीच." मी खेदाने मान्य केलं. ह्या टोकाच्या मैत्रीखोर लोकांचा टॉवेल आहे हे माहीत असतं तर परत दिला नसता, असा विचार करायचीही चोरी झाल्याचं माझ्या लक्षात आलं. घाईघाईने मी डोक्यातला विचारांचा विषय बदलला. आम्ही नवीन घरात बिऱ्हाड हलवायचं ठरवलं आहे आणि काही आठवड्यांत इथून निघू या निर्णयाचा मला कधी नव्हे तो आसुरी आनंद व्हायला लागला होता.
"सॉरी हं, तुम्हाला निष्कारण त्रास झाला." एरवी असं कोणी म्हटलं असतं तर "तुम्ही टॉवेलांत दगड बांधून ते वाळत घालत नाही तोपर्यंत मला त्रास नाही," असं म्हणून हसून थांबले असते. पण आता मी पण इरेस पडले होते. "काय करणार! ते हवामानबदल, ग्रीन हाऊस इफेक्ट असं काय काय म्हणतात. नक्की काहीतरी तथ्य असणार बघा त्यात!"
"चला, मला आता निघायला हवं. ही पोरगी झोपेला आल्ये." हुश्श! मी दबकतच सुटकेचा निश्वास टाकला. आता लगेच माझ्या चित्तवृत्तीही हवामानबदलावरून उन्हाळी हवामानाबद्दल बोलण्याइतपत उल्हसित झाल्या. "होय. आणि किती ऊन, उकाडा आहे ना. अशा हवेत पोरं दमणारच." त्याच्या पुढच्या वाक्यामुळे माझा उल्हास फाल्गुन मासातला असावा अशीही एक चोरटी शंका माझ्या मनात आली. त्याने माझं बोलणं अजिबातच ऐकलं नव्हतं. "सकाळी सकाळी उठून चर्चमध्ये जायला कुठलं पोरांना आवडायला!" आता मी आनंदाने उडी मारणंच बाकी होतं. हा घरी चाललाय. म्हणजे माझी सुटका होत्ये. "ठीक, ठीक. मुलगी फार लहान आहे. तिची उन्हापासून काळजी घ्या. बाय बाय." म्हणून मी निघालेच. एवढ्या आनंदात तो नक्की काय म्हणाला हे समजेस्तोवर वेळ लागला.
चार पावलं टाकून मी बऱ्या अर्ध्यापर्यंत पोहोचले. मला तिथे विजयी मुद्रेने कदमताल करत येताना बघून त्याला पकडलेल्या दोन स्त्रियांनीही आवरतं घेतलं. त्यांतली तरुण स्त्री माझ्याकडे वळून म्हणाली, "हाय, माझं नाव ...." मी हे ठरवूनच ऐकलं नाही. "तुला बघितलंय मी इथे. तू सकाळी धावायला जातेस ना?" आता मी चमचाभर पाणी शोधायला लागले. या बाईला कधीही बघितल्याचं मला आठवत नव्हतं. आनंदाच्या पुरात वाहवत जाऊन मी तिला प्रामाणिकपणे हे सांगून टाकलं, "मला नाही आठवत तुला कधी बघितल्याचंही." तिला त्याचं फार काही वाईट वाटलं नव्हतं; पण तिचा मुलगा तिला ओढायला लागला. "घरी जाऊया." ती निघाली. मी अतिशय आदबशीरपणे तिला आणि त्या मुलालाही बाय-बाय केलं.
एकही शब्द न बोलता मी आणि बरा अर्धा गाडीत बसलो. घरापासून दोन-पाच किलोमीटर लांब आल्यानंतर आम्ही कोणालातरी 'वाट चुकलेलं कोकरू' वाटलो याची भीती कमी थोडी झाली. मी त्याला म्हटलं, "कसा पर्फेक्ट सेटप होता पहा! सगळं कुटुंब नुकतंच फॅक्टरीतून बाहेर पडल्यासारखं प्रमाणबद्ध, बांधीव, क्यूट आणि व्यवस्थित कपड्यांमध्ये पॅकेजिंग करून आलेलं. पुरुषाच्या हातात मुलगी, बाईच्या हाताशी मुलगा. पुरुषानी मला पकडलं, बायकांनी तुला. सेक्शुअल टेंशन पुरेसं तयार झालं पाहिजे! आणि त्यांचे चेहेरे, कपडे, टाय, केशरचना सगळंसगळं कसलीही जाहिरात करायला चालतील असे होते." आणि गाडीत दोन सेकंद शांतता पसरली. नावडत्या गोष्टींबद्दल फार बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे.
"नास्तिक लोक किळस येण्याएवढे क्यूट आणि शिसारी येईल इतपत प्रेमळ असल्याचं आठवतंय का तुला?" त्याने मानेनीच नाही म्हटलं.
---
आठवड्यानंतर आम्ही घरातलं सामान हलवायला सुरुवात केली. मी घरात घालायचे कळकट कपडे घालून, सामान वाहत, शब्दशः घाम गाळत घर ते गाडी अशा फेऱ्या मारत होते. जिन्यातच त्यांतली तरुण बाई पुन्हा भेटली. हाय-हॅलोचे सोपस्कारही करण्याआधीच, "तुम्ही घर बदलताय?" असं दुःखी चेहऱ्याने मला विचारलं. पावसाळी हवा असताना टेलिस्कोप हलवायला नको होता. "हो. असे भास होताहेत खरे." एवढे शारीरिक कष्ट केल्यानंतर जितपत जमेल तितपत खवचटपणा मी केला. "आमच्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला नाही ना?" तिच्या चेहेऱ्यावरून, आवाजावरून तिला खरोखर दुःख झाल्याचं मला दिसत होतं.
पृथ्वीला केंद्र असलं तरी जगाला एकच-एक केंद्र नाही, विश्वाला तर मुळीच केंद्र नाही, असेलच तर प्रत्येक माणसाच्या विश्वाच्या केंद्रस्थानी आपण स्वतःच असतो, वगैरे माझी विचारमौक्तिकं मी इथे लिहिण्यासाठी सांभाळून ठेवली.
प्रतिक्रिया
अतिशय आवडले. आवडले कारण असा
अतिशय आवडले. आवडले कारण असा तुसडेपणा कोणात असू शकतो याचा प्रथमच साक्षात्कार झाला.
.
टाळ्या!!
.
असं काही समृद्ध करणारं वाचलं की मजा येते. अतिमिट्ट गोड खाल्ल्यावर तिखट चकली खाल्ल्यासारखे
.
ह्म्म्म! असू शकते.
_________
काल स्कायवॉकवर एकटी खालची गम्मत पहात उभी होते. एक म्हातारा येरझारा घालता घालता लाडात आला. इतकी भीती वाटली ना
लाडात म्हणजे विचित्रच होता तो. आता काय करणारेस्/कुठे जातेयस वगैरे म्हणत जवळ आला. मी जी पळाले. याइक्स!!! गलीच्छ असतात काही जणं.
काय लिहावं..
सुन्न करणारा अनुभव ..
~ त्या कुटूंबासाठी
==================
भूतकाळातील आस्वल्य.
असं का म्हणता अस्वलभाऊ?
असं का म्हणता अस्वलभाऊ? (आमच्यासारख्या) ज्या लोकांना मर्यादा (पर्सनल बाऊंड्रीज) कळत नाहीत त्यांना अशा चपराकीचीच आवश्यकता असते
अन तरी काहीजण लोचट असतातच असो 
!
..( खवचट होती हो कमेंट )..
==================
भूतकाळातील आस्वल्य.
:ड
माझ्या मते तु्म्ही त्यांच्यासाठी एक कार्ड लिहून पाठवा. मी त्यांच्या दारासमोर ते ठेवून देते. "अस्वलाकडून" असंही लिहिते हवं तर.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लोल!
लोल!
********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.
काहीही हं!
ही काहीही हं अदिती! तुसडे, नास्तिक हवे असतील तर टेक्सासात रहायला कशाला जावं म्हणते मी? आपल्या पुण्यात काही कमी आहेत का?
...अगदी विश्वाच्या केंद्रात नाही तर गेलाबाजार सायबाच्या देशात तरी रहायचं, चिक्कार भेटतील की तिकडे. हां आता आहे ते साजरं करायचं असेल तर त्या धार्मिक लोकांना मी ठार नास्तिक आहे म्हणून सांग आणि त्या पोरीला इव्होल्यूशन शिकवायला लाग...म्हणजे काट्याने काटा काढता येईल.
तुला ते जेहोवाचे साक्शिदार
तुला ते जेहोवाचे साक्शिदार भेट्लेत का कधी? मज्जेदार असतात.
तु. आणि तु.
ही तुच्छ आणि तुसडी शैली आवडली.
तु आणि तु हा वाक्प्रचारही ऐसीवर 'फडतूस' प्रमाणे अजरामर व्हावा.
आमेन! जसे हिहि तसे तुतु!
आमेन! जसे हिहि तसे तुतु!
लेखापेक्षाही
लेखापेक्षाही काही वाक्ये विशेष आवडली.
खरंतर मला अधूनमधून आंघोळ 'येते';
किळस येईस्तोवर ती मुलगी क्यूट होती.
आणि हा मास्टरस्ट्रोक
"नास्तिक लोक किळस येण्याएवढे क्यूट आणि शिसारी येईल इतपत प्रेमळ असल्याचं आठवतंय का तुला?
चला, मलाही आता उघडपणे माझे नांव सार्थ करायला हरकत नाही.
:)
पहिले दोन परिच्छेद जास्त आवडले.
नास्तिक लोक किळस येण्याएवढे
"बरे झाले न्यूटना, नास्तिक केलो,

नायतर जोजोच्या टोमण्यांनीच असतो मेलो!!!!"
बापरे.. ललित लेखपण तिरकसपणाचा
बापरे.. ललित लेखपण तिरकसपणाचा अर्थ लावत लावत सावकाश वाचावा लागला !!
तुम्ही "रोजमेरी'ज् बेबी" हा
तुम्ही "रोजमेरी'ज् बेबी" हा सिनेमा पहिला आहे का? नसल्यास नक्की पहा. त्यातही काहीसे असेच शेजारी दाखवले आहेत. फरक एवढाच की तुमचे शेजारी आस्तिक, आणि त्या सिनेमातले सतानास्तिक (सतान / शैतान पूजक)! पण या दोन्ही प्रकारांची modus operendi एकच, समोरच्या माणसाला आपलंसं करू बघणे, उगाच भोचकपणा करणे, काहीही करून आपले विश्वास समोरच्या माणसाच्या गळ्यात मारणे, वगैरे…
what?? oh ... oh ok...
what?? oh ... oh ok... नाहि काही नाही, काही नाही. वरच्या वाक्यातली जोडाक्षरं वाचताना थोडा घोळ झाला. ".... सिनेमातले सतानास्तिक (सतान .. " ऐवजी मी चुकून ".... सिनेमातले स्तनास्तिक (स्तन पूजक)..... " असं वाचलं घाईत!
आणि एकंदरीत सिनेमे पहाता खरं म्हणजे त्या शब्दाने एव्हढं दचकायचं काही कारण नव्हतं !!
--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....
मी "सनातन" वाचले होते
मी "सनातन" वाचले होते
जो जे वांछिल तो ते लाहो….
जो जे वांछिल तो ते लाहो….
तिरसट शैली आवडली. मी मनातून
तिरसट शैली आवडली. मी मनातून अशी तुसडी आहे पण प्रत्यक्षात नाही वागता येत त्यामुळे थेट तिरसट वागू शकणार्^यांचा थोडा हेवाच वाटतो.
मी आस्तिक आहे की नास्तिक हे ठरवता येत नाही पण हे वाचल्यावर नास्तिक असावं, असं ठरवलय.
आपण एखाद्या रम्य संध्याकाळी
आपण एखाद्या रम्य संध्याकाळी जग किती सुंदर आहे हे पाहात बाहेर पडावं, तर आपल्या भविष्याची चिंता लागून राहिलेले काही प्रेमळ लोक आपल्याला गाठतात हा अनुभव अनेकदा आलेला आहे. मला वाटतं माझ्या चेहेऱ्यावर एक माणूसघाणेपणा स्पष्ट दिसतो. आणि अशा विशेष वेळी मी स्पेशल मेकप करून त्या माणूसघाणेपणाच्या रेषा ठळक करून घेतो. त्यामुळे अर्थातच सामान्य माणसं माझ्यापासून दूर जातात. आणि तसंही त्यांना त्यांचं त्यांचं जग असतंच की बघायला. पण या प्रेमळ लोकांना माझ्या मरणानंतर मी स्वर्गात जाणार की नरकात जाणार याची इतकी काळजी लागलेली असते, की कितीही डरावना मेकप असेल तरी ते आपलं भय मास्तर आपल्याकडे रोखून बघत असताना जितक्या श्रमाने आपण जांभई आवरतो तितक्या कष्टाने आवरत माझ्याकडे येतात. हवा बहुधा चांगलीच असते, त्यामुळे दोनचार वाक्यं आत्ता ती कशी छान आहे, चार दिवसांपूर्वी मात्र बाहेर बसायला आलेल्या स्त्रीप्रमाणे वाइट्ट होती आणि हा छानपणा अजून किती काळ टिकेल कोण जाणे वगैरे बोलण्यात खर्ची होतातच. मी माझे माणूसघाणेपणाचे भाव तीव्र केले तरी हे लोक दामटून विषय हळूहळू देव कित्ती कित्ती चांगला आहे. आणि विशेषतः त्याचा मुलगा, तो रे तो दाढीवाला, आपल्या सगळ्यांच्या पापांसाठी कसा निस्वार्थीपणाने सुळावर चढला वगैरे दिशेकडे वळवतात. मी नाठाळ तट्टासारखा त्या दिशेला न जाता 'छे हो, बाकीच्यांचं माहीत नाही, पण मी काही पापी वगैरे नाही. आणि आत्ता दिसतोय त्यावर जाऊ नका. जन्मलो तेव्हा मी तर क्यूट आणि निष्पाप वगैरे दिसायचोदेखील.' असं काहीतरी म्हणतो. पण यांच्या धंद्यात दोन गोष्टी शिकवलेल्या असतात. एक म्हणजे चेहेऱ्यावरचं गोग्गोड हसू आवरायचं नाही. कदाचित बोटॉक्स वगैरेसारखं इंजेेक्शन घेऊन त्यांनी ते स्नायू पर्मनंटली स्नेहाळू मोडमध्ये फ्रीझ केलेले असावेत. दुसरी गोष्ट शिकवलेली असते ती म्हणजे समोरचा काहीही बोलो, आपण आपलं म्हणणं म्हणायचंच. त्यामुळे ते पुन्हा 'या रविवारी हवं तर त्या एपिस्कोपल का बाप्टिस्ट का कुठल्याशा चर्चात ये' वगैरे सांगतात. मी त्यांना 'हवं तर' म्हटल्याबद्दल थ्यांकू म्हणतो आणि पुढे चालता होतो.
काहींना मात्र दुसरा धडा नीट पाठ झालेला नसतो. त्यामुळे ते माझ्या वाटेने दोन पावलं येऊन बघतात. आणि 'मग तुझा कोणावर विश्वास आहे?' असा 'तुझ्या बापाचा सिगार मोठा की माझ्या?' या विषयाकडे झुकणारा प्रश्न विचारतात. मग काही मी त्यांना सोडत नाही. डार्विन, उत्क्रांतीवाद, बिग बॅंग थियरी, वगैरे सगळं सांगून तुमच्या बापाने हे विश्व केलंच नाही, कारण तुमच्या बापाकडे सिगार नाहीच्चे असं सांगतो. माझं लेक्चर चांगलंच लांबतं, आणि दुर्दैवाने त्यांनी जर माझं म्हणणं खोडण्याचा प्रयत्न केला तर आणखीच जास्त लांबतं. त्यांच्या चेहेऱ्यावरच्या बोटॉक्सचा परिणाम हळूहळू विरायला लागतो. आणि मग घाईची लागलेली असूनही बॉसचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निघता येत नाही अशी त्यांची अवस्था होते. शेवटी आपलं हसू कसंबसं कायम राखत 'नाही, तरीपण येऊन बघच. ईश्वर सगळ्यांनाच माफ करतो' वगैरे काहीतरी म्हणून ते लोक काढता पाय घेतात.
एकदा कधीतरी असल्या लोकांच्या आपण जाळ्यात फसतो आहोत असं ढोंग करून पुढे काय होतं ते पाहायची इच्छा आहे. पण साला फार पेशन्स लागेल त्यासाठी. माणूसघाणेपणाचे भाव खोडून गरीब कोकरू भाव टिकवून ठेवण्यासाठी मलादेखील स्पेशल बोटॉक्स ट्रीटमेंट घ्यावी लागेल.
अमेरिकेत आल्यावर मी एकदा असा
अमेरिकेत आल्यावर मी एकदा असा 'वाट चुकलेलं कोकरू' बनायचा प्रयत्न केला होता. पण ते काही फार जमेना.
एकदा कधीतरी बायबलातला कोणतातरी धडा वाचला. त्यावर "आपण विनम्र असावं. सगळ्यांचा आदर करावा. प्रभू आपल्याला मार्ग दाखवतो" वगैरे सांगायला लागले. त्यावर माझा बांध फुटला. "का म्हणून? मला काही गोष्टी व्यवस्थित समजतात आणि येतात. त्या समजाव्यात यासाठी मी अभ्यास, मेहेनत केल्ये आणि करते. सगळे लोक तसं काही करतातच असं नाही. जे कष्ट करत नाहीत असल्या यडपटांना मी नाही भाव देत आणि देणार. मला बुद्धी आहे आणि मला माझा विचार करता येतो. चूक केली तर निदान ती माझी मीच केलेली असेन. बायबलात काही का लिहिलेलं असेना!" असं मी म्हटलं. त्यावर त्या मेंढपाळ गडबडल्या. मी त्यांना विचारलं, "भारतीय संस्कृतीबद्दल तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहित्ये असा तुमचा दावा आहे का? मग त्याबद्दल बोलतानाही मी तुमच्यासमोर विनम्र-से रहायचं का?"
तेव्हापासून मला भाव देणं त्या सगळ्यांनी बंद केलं. येशूच्या सुपरमार्केटची एक गिऱ्हाईक कमी झाली, याचा साक्षात्कार त्या कोकरांना यथावकाश झालाच. मेहेनत वाया जात नाही, ती ही अशी.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुम्हा दोघांना
आकाशातला बाप तुम्हा दोघांना माफ करो, त्याचं तुमच्यावर सुद्धा प्रेम आहे.
-Nile
अहाहा! कसं पोटभर खवचट आहे!
अहाहा! कसं पोटभर खवचट आहे! रविवार सकाळ वसूल झाली आस्तिकांची पुरेशी नालस्ती वाचून.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ते सगळं ठीक आहे, पण यांपैकी
ते सगळं ठीक आहे, पण यांपैकी किती लोकांनी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना म्हणा, आत्मचिंतन म्हणा केलंय याविषयी मी साशंक आहे. बहुतेक नुसती फुकटचीच बोंबाबोंब....
मी आजवर कॅथलिक, बॅप्टिस्ट आणि लॅटर डे सेन्ट्स च्या चर्चमध्ये जाऊन आत्मचिंतन केलंय (मी नास्तिक असल्याने प्रार्थना ही माझ्यासाठी नाही)
ते सुंदर अनुभव होते.....
जर शांतपणे आत्मचिंतन करायचं असेल तर चर्च ही एक फार सुंदर जागा आहे, त्यांच्या प्रार्थेनेच्या वेळा सोडून!
देवळांपेक्षा अनेकपटीने शांत आणि स्वच्छ!!!!!
ओ पिडाकाका, आमच्या देशामधेही
ओ पिडाकाका, आमच्या देशामधेही शांतपणे आत्मचिंतन करायचं तर खेड्यापाड्यातली आडबाजूची छोटी देवळं पण बरी असतात. विशेषतः तळकोकण आणि गोव्यातली. शांत, कुणी येत जात नाही, आजूबाजूला कितीही उन्हाचा कडाका असला तरी कोब्याची जमीन आणि सावलीमुळे गार असतं आणि स्वच्छ असतात.
- नी
अगदी अगदी. कोकणातली देवळं,
अगदी अगदी. कोकणातली देवळं, त्यामधल्या लाल पांढरी फुलं ल्यायलेल्या , मोठ्या डोळ्यांनी आपल्याकडे बघणार्या मूर्ती आठवल्या. आत्मचिंतन वैगेरे जाउ देत तिथली शांतता आपल्याला शांत करते. सौंदर्य आपल्याला 'मी' विसरायला लावते. खुप छान वाटतं. तिथे कोणी तुम्हाला हात जोडा म्हणत नाही की रांगेत उभं रहा, हे असं करा, तसं करु नका म्ह्णून सांगत नाही.
माझे मूर्तीकडे क्वचित लक्ष
माझे मूर्तीकडे क्वचित लक्ष जाते. मंडपात स्थानिक चित्रकला असल्यास मी बघायचे टाळते अन्यथा माझ्या हसण्याने तिथली शांतता भंग पावायची...
- नी
+१
खेड्यापाड्यांतली अंमळ आडबाजूची देवळं खरंच छान असतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
+१
कोकणातली, गोव्यातली देवळं एकदम मस्त असतात.
देवही अजिबात बिझी नसतो, त्यामुळे अगदी १:१ संवाद साधता येतो.
आमच्या कुलदैवतेच्या देवळात तर देवळाची चावी आपणच घ्यायची, देऊळ उघडायचं, काय ते हाय-हेलो करायचं आणि मग पाहिजे तर एक झोप काढून चावी परत द्यायची.
शिवाय छोट्या देवळातले देव जास्त सुसंस्कृत असतात, त्यांना भेटायला एजंट लागत नाहीत.
==================
भूतकाळातील आस्वल्य.
हम्म्!
बिनावजह छुरेको हात डालनेकी जरूरत नही है, ज्युनियर!
मी जेंव्हा चर्चेस आणि देवळं याविषयी लिहिलं तेंव्हा 'आमच्या देशातली' की आणखी कुठल्या देशातली हा विचारही माझ्या मनात नव्हता. कदाचित माझी कौटुंबिक पार्श्वभूमी गोंयकार असल्यामुळे असेल. गोंयकार फॅमिलीज देवळं आनि इगर्जी (चर्च) मध्ये उपासनेचं ठिकाण म्हणून फारसा भेदभाव करत नाहीत....
मान्य, पण असं आडबाजूचं खेडं शोधून काढून त्यातलं शांत देऊळ शोधून काढून तिथे जाणं हे शहरातल्या माणसासाठी नेहमीच प्रॅक्टिकल नसतं. मुंबईकर माणसाला तर मुंबईच्या बाहेर पडेपर्यंतच अर्धा दिवस निघून जातो. मुंबईतली देवळं पार टिटवाळा आणि अंबरनाथपर्यंत, ही शांतता उपलब्ध करून देण्यात असमर्थ आहेत. त्यातुलनेने, माहीम चर्च, दादरचं पोर्तुगीज चर्च इथे जास्त शांतता मिळते. फार काय साक्षात दक्षिण मुंबईमध्ये असलेल्या आमच्या सेंट झेवियर कॉलेजातला प्रार्थना हॉलदेखील विलक्षण शांत असतो. मी त्यादृष्टीने म्हणत होतो.
आणि याबद्दल रागावून जायचं काही कारण नाहीये. आपली संस्कृतीच मुळात देवळात गेल्यावर पहिल्यांना ठाण्णकन घंटा वाजवून देवाला (आणि परिसराला!!) जाग आणण्याची आहे. जितके जास्त भक्त तितका अधिक घंटानाद! अशा परिस्थीतीत देवळं शांत रहातील कशी? म्हणूनच आपले तपस्वी लोकं देवळांत बसून तप करत नव्हते, लांब कुठेतरी जंगलांत जाऊन कुटी किंवा आश्रम उभारून तिथे तपश्चर्या करीत होते. त्यामानाने बौद्ध उपासनास्थळं किंवा ख्रिस्ती चर्चेस (त्यांच्या मासच्या वेळा सोडून) अतिशय शांत असतात ही वस्तुस्थीती आहे.
बाकी माझ्या अनुभवात सगळ्यात शांत तपोस्थळं कुठली असतील तर ती विपश्यना केंद्रं! भारतातलं माहिती नाही पण अमेरिकेत मला मॅसेच्युसेटस, उत्तर कॅलिफोर्निया आणि दक्षिण कॅलिफोर्निया इथल्या विपश्यना केंद्रांचा अनुभव आहे. ती इतकी जंगलात असतात की भली मोठ्ठी मेट्रॉपोलिस शहर नजीक असूनही त्यांचा वारा वा उजेडदेखील या केंद्रांना अजिबात लागत नाही. शिवाय खुद्द केंद्रांमध्ये साधकांना एकमेकांशी बोलायची बंदी असते दॅट अल्सो हेल्प्स!!!!
बिनावजह छुरेको हात डालनेकी
बिनावजह छुरेको हात डालनेकी जरूरत नही है, ज्युनियर! <<
सॉरी शक्तिमान... उप्स सॉरी सिनियर!!!
मुंबईकर माणसाला शांतता कुठेच मिळत नाही. चर्चेस वगैरे आतून छान असतात, त्यांची त्यांची शांतता ठेवलेली असते हे खरे पण मुंबईचे काय करायचे? ती कधी शांत असते?
एन सी पी ए च्या लायब्ररीत मस्त शांत असतं. कलिना कॅम्पसच्या लायब्ररीतही शांत असतं.
असो आता आदिती हानंल अवांतराबद्दल त्यामुळे र्हावद्या!
- नी
पण मुंबईचे काय करायचे? ती कधी
आता तेला आमी काय करनार? ती शांतता काय आमी खिशात घालून थोडीच घेऊन पळालो?
होय. तसं युडीसीटीच्या किंवा आयाय्टीच्या लायब्ररीमध्येही शांत असतं. पण इथे आपल्याला मांडी घालून साधना करायला बसता येतं थोडंच?
बाकी अदितीच्या टेक्सासात विज्ञानविषयक कुठल्याही कार्यक्रमाला जा...
स्मशानशांतता असते म्हणे!!!!
जर शांतपणे आत्मचिंतन करायचं
टेक्सासमध्ये मी गुरुद्वारामध्ये जात असे.
मी चर्च मधे क्वचितच गेलोय पण
मी चर्च मधे क्वचितच गेलोय पण मला चर्च खुपखुप आवडतात कारण तिथे पादत्राणे काढावे लागत नाही
खूप वर्षांपूर्वी पाँडीचेरी ला गेलो असतांना तिथे पहिल्यांदा चर्च मधे गेलो, आत जाण्याआधी 'चला अता काढा शुज' असा वैतागी-विचार येतो-न-येतो तोच लक्षात आलं.. अर्रे हे तर चर्च, इथे असं काही करावं लागत नाही - त्या विचारानेच काय मज्जा आली
मग सगळेच चर्च मनापासून पाहिले (नंतर गोव्यातही)!
शिवाय कधी कधी खूप उग्र धुप-उदबत्ती-फुलं-अष्टगंध असं असेल तर त्या संमिश्र वासाने मळमळायलं होतं, तसंही नसतं चर्चात हे एक छानच. हिंदू बुवांचे मठ बाकी छान असतात असा एक अनुभव. प्रशस्त, शांत, स्वच्छ आणि बहुतांशी निसर्गरम्य. पुण्यात पुरंदर जवळचं कानिफनाथ मंदिर-कम-मठ फार शांत नी सुंदर आहे (७-८ वर्षांपुर्वी पाहिलाय, अता तसा असेल ह्याची खात्री नाही).
पाषाण ला भर वस्तीत दत्ताचं एक मंदिर आहे, फार शांत आणि प्रसन्न आहे. तिथे ध्यान-मंदिर ही आहे, त्याची वेगळी जागा पण नुसत्या मंदिरातही नेहमी एक प्रसन्न-शांतता असते, ना कसले उग्र दर्प.
लेख आवडला.
लेख आवडला.
बहाई लोकांच्या लोटस टेंपल ला
बहाई लोकांच्या लोटस टेंपल ला (https://en.wikipedia.org/wiki/Lotus_Temple) देखील गेले होते. अतोनात शांत असते.
मीही काही वर्षांमागे गेलो
मीही काही वर्षांमागे गेलो होतो. तिथली एक व्हॉलंटियर मुलगी छान होती ते बाकी लक्षात राहिलेले आहे. बोलायला विषय काहीतरी पाहिजे म्हणून पंथाची माहिती विचारत बसलो, तेवढीच मजा आली.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
हाहाहा. मी लहानपणी (४-५ वीत)
हाहाहा. मी लहानपणी (४-५ वीत) गेले होते. कळत नव्हतं पण टेंपल व आतील शांतता/स्वच्छता नीट आठवतेय.
घोर निराशा!
शिर्षक वाचून काय आशेनं धागा उघडला होता! वाटलं काय अदितीला पेरीकाका तर भेटले नसतील, काय मुलाखत बिलाखत तर घेतली नसेल तिने! का 'ओपन कॅरी'वाल्यांबरोबर अदितीने चिक-फिल-ए मध्ये लंच बिंच केला असेल, का एखादी मोटरसायकल गँग शुटआऊट बघायला गेली होती. का प्लान्ड पॅरेंटहूडच्या टेक्सासातील शेवटच्या हाफिससमोरील दंग्यात अदितीने भाग घेतला असेल. किंवा ब्रांच द्रविडीयनांच्या एखाद्या काँप्लेक्सात जाऊन अदितीने गोंधळ वगैरे घातला असेल. नाहीतर कन्फेडरेट असेम्ब्लित वगैरे जाऊन आली असेल. छ्या! कित्ती शक्यता होत्या. या असल्या सर्वसामान्य गोष्टी तर अगदी आमच्या गरीब अन अतिसामान्य राज्यातही होतात!
-Nile
माझी एवढी स्वच्छ-सुंदर
माझी एवढी स्वच्छ-सुंदर प्रतिमा सर्वद्वेष्ट्याच्याही मनात आहे हे वाचून मला अगदी भरून आलं; धाग्याचं सार्थक झालं.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
धागा वर काढते आहे.
धागा वर काढते आहे.
एके काळी मी किती खवचट होते नै
एके काळी मी किती खवचट होते नै!
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.