" Silence used to grow around him....."

1

कवी रायनर मारीया रिल्के ची पहीली भेट झाली कवी ग्रेस यांच्या ललित लेखनाच्या वाचनांतुन. तेव्हापासुन त्याच आकर्षण वाटु लागलं, त्याच्या काही कविता मिळवुन वाचल्या पण पहिल्या वाचनातुन काहीच गवसलं नाही, सर्व डोक्यावरुन गेलं. मात्र अगदि कवी ग्रेस च्या कविता वाचतांना बहुतेकदा होतं तसच झाल, कळत नाही पण त्या कविता हुरहुर लावुन जातात खुप कुठेतरी मनाच्या आत खोलवर रुतुन बसतात व नंतरच्या वाचनात अगदी सावकाश हळुहळु कुठेतरी अर्थाचा पडदा किंचीतसा उघडतो. पण म्हणुनच त्या जास्त आवडतात कदाचित. नंतर रिल्केची दहा पत्रं हे नितांतसुंदर पुस्तक एका जवळच्या मैत्रिणी ने दिलं आणि वेडावल्यासारखं झालं. कवितेतुन निसटलेला रिल्के पत्रांतुन थोडासा गवसला, मग कविता पत्रे आलटुन पालटुन वाचत राहण्याचा एक सुंदर एपिसोड आला. त्यात मग त्याच्या कवितांचा ही अर्थ पुर्वीपेक्षा अधिक स्पष्ट होत गेला. अर्थातच अजुनहि रिल्के एक्स्प्लोअर करणं चालु च आहे तो पुर्ण समजेल कधी अस काही वाटत नाही व त्याची गरज ही नाही, यशवंत देव ग्रेस साठी म्हणतात तस त्याची गुढता पांघरुन घ्यावीशी वाटते, रिल्के कलावंताच्या एकांता विषयी लिहीतो तेव्हा अजुन एक मनस्वी कलावंत डोळ्यासमोर उभा राहतो केकी मुस. ४० वर्ष स्वत:च्या घरात स्वत:हुन सीमाबद्ध झालेला ४० गांव चा केकी मुस. यांच्या वर बनवलेलं एक सुंदर कॅलेंडर ज्यात त्यांची फ़ोटोग्राफ़ी इ. होत. त्यातले फ़ोटोज अप्रतिम होते एक फ़ोटोग्राफ़ी चा प्रकार दाखवला होता टेबलटॉप का काहीतरी नेमक आठवत नाही स्टुडिओतच बसुन एका हिमप्रदेशाचा जिवंत अविष्कार केलेला पाहुन थक्क व्हायला झाल.त्यांना त्या काळात जागतिक फ़ोटोग्राफ़ी स्पर्धेत अवॉर्ड मिळाला होता. त्यांच एक म्युझियम ही आहे, औरंगाबादच्या एका कंपनीत काही कामानिमीत्त गेलो असतांना तिथे हे कॅलेंडर पाहिल होत घाइघाइत ते चाळता आल फ़क्त. नेटवर ही फ़ारशी माहीती मिळत नाही त्यांची कुणाला कॅलेंडर मिळाल तर थोड शेअर करा हि विनंती, तर रिल्के हा एकांता बरोबरच कलावंताच्या इमानाला, फ़ार महत्व देतो. त्याची पत्रं म्हणजे कविताच आहेत. रिल्के कलात्मक तडजोड न स्वीकारणारा आत्मशोधाच्या वाटेवरला पथिक आहे. रिल्के जीवनवादी सौंदर्यवादी आहे तो प्रामाणिक नितळ अभिव्यक्तीला महत्व देतो.

अनिल कुसुरकर यांनी या पुस्तकात रिल्केच्या दहा पत्रांचा अप्रतिम असा अनुवाद केलेला आहे. त्याला त्यांनी भाषांतर असे न म्हणता ह्रदयांतर असे सार्थ नाव दिलेल आहे. या पुस्तकाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाळ ठाकुर यांनी अतिशय सुंदर अशा स्केचेस ने हे पुस्तक सजवलेलं आहे या पुस्तकाचा आकार हि युनिक आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला एक प्रकरण आहे. "रिल्केबद्दल थोडंसं " नावाचं हे प्रकरण अत्यंत सुंदर माहीतीपुर्ण व रिल्केच्या कवितेचा, माणुसपणाचा गाभा दाखवणारं वर्णन आहे. जे मुळातुन वाचण्यासारख आहे. आपण रिल्केविषयी अनभि‍ज्ञ असाल तर याहुन सुंदर सुरुवात रिल्के वाचण्यासाठी असु शकत नाही. ही प्रस्तावना वाचल्यानंतर मला अनिल कुसुरकर आवडु लागले. हि तुम्ही तर मुळातुनच वाचायला हवी. या प्रकरणाचा शेवट कुसुरकर असा करतात
रिल्केला १९२३ पासुन कॅन्सर होता; पण तो नक्की झाला १९२६ मध्ये......
आणि तो लगेचच विझुन गेला;
अचानक गावातील सर्व दिवे जावेत तसा.

या पुस्तकाची अर्पण पत्रिका पण मला आवडली ती अशी
सतु, (सतीश सोळांकुरकर )
रविवारी
मुंबईचे रस्ते डबलडेकरमधून
निरुद्देश गिरवतांना
तु माझ्या कानांशी निरंतर
अभिजात कवितेबद्दल बोलत राहायचास;
ते सारं
हेच तर नव्हतं?.... .
वर दिलेलं लेखाच शिर्षक " सायलेन्स युज्ड टु ग्रो अराउंड हीम " हे रिल्के च्या आठवणी सांगतांना त्याच्या एका मित्राने काढलेले रिल्के विषयीचे उदगार आहेत.
तर खाली अगदि मोजकेच उतारे रिल्के च्या निरनिराळ्या नवोदित कवीला लिहीलेल्या पत्रांतील देत आहे. यावरुन रिल्के च्या भावविश्वाची विचारांची थोडी कल्पना येइल असे वाटते.

१-
स्वत:मध्ये प्रवेश कर. आपल्याला लिहावंसं का वाटतय ? याचा शोध घे प्रथम. ह्या प्रश्नाची अंतर्गत तपासणी कसुन कर. स्वत:शी क्रुरपणे वागायला अशा वेळी कचरु नये: अन्यथा: खूप उशिरा कुठेतरी दारूण कपाळमोक्ष हा अटळ आहे. तुला जी कवितालेखनाची उर्मी आलेली आहे, तिचा मुलस्त्रोत शोध. तिची मुळे कुठे कुठे आणि किती खोलवर पोचलेली आहेत ते पाहा. एखादी मुळांगुली तरी थेट ह्रदयात रुतलेली आहे ना, ह्याची खात्री करुन घे. आणि विचार स्वत:ला
कलेच्या अविष्कारावर बंदी किंवा स्वत:चा मृत्यु ह्यांतलं अधिक सुसह्य काय आहे ?
जर ह्या प्रश्नाच उत्तर अगदी नि:शंकपणे "मृत्यु" असं येत असेल तर मग समज की तुला तुझ्या आयुष्याचा मध्यबिंदु गवसला आहे. आयुष्याचा चिरेबंदी राजवाडा त्या मध्यबिंदुभोवती उभारण्यास सुरुवात कर. ते बांधकाम हेच तुझ जिवीतकार्य असेल. इतिहासातल्या कुठल्याही थोर कलावंताच्या जीवनपटावर नजर टाक: तुला एकाच बिंदुभोवती फ़िरणारया त्यांच्या पाउलखुणांचे मोर्चे आढळतील.

२-
आज मी तुला फ़क्त एक दोन गोष्टी सांगतो. एक आहे "विरोधाभास" ही. ज्या वेळी तुझा निर्मीतीचा वारा पडलेला असेल- तु शुन्य असशील, अशा वेळी स्वत:मधला विरोधाभास तुला डंख मारु लागेल. पण तु त्या डंखाच्या विषबाधेपासुन स्वत:ला मुक्त ठेवण्याचा प्रयत्न कर. विरोधाभासाचे जहरी आत्मक्लेश देणारे प्रश्न "उद्या" साठी राखुन ठेव. उद्या वारं सुटेल, तुझी शिडं हवेन गर्भार होतील तेव्हा तु अस्तन्या सावरुन ह्या प्रश्नांना हाळी दे. झगड त्यांच्याशी. त्या समरातुन तुझी जगण्यावरची पकड घट्ट होइल. विरोधाभासाची शरम ती का वाटावी ?.... विरोधाभास औषधासारखा गुणकारी असतो. पण विरोधाभास जर तुझ्यावर मात करायला लागले तर युद्धातुन तात्पूरता पळ काढ. मनाला सुख होइल असं काहितरी उकरुन काढ. त्या सुखापुढे हे दु:ख ठेंगण होउन जाईल.
माणुस काय किंवा वस्तुमात्र काय, प्रत्येकजण बुरखे पांघरुन उभं असतं. तु मुळ रुपाचा शोध घे; आणि ह्या शोधातुन तु जेव्हा उंच उंच जाशील, तेव्हा तिथुन तू एकदा सिंहावलोकन कर. स्वत:ला विचार , कि तु ज्या मुक्कामी आला आहेस , तिथे येण, ही तुझी मुलभुत गरज होती काय ? कधी कधी आपण संभ्रमित असतो आणि चुकीच्या मुक्कामी दाखल झालेलो असतो अनेकजण आपल्या मनात काही ना काही भरवत असतात. आपलं स्वत:च काय आणि त्यांनी घुसडलेलं काय हेच कळेनासं होत. पण आपण जी यातायात केलेली असते. ती जर केवळ आपल्या आत्म्याच्या गरजेतुन घडलेली असेल, तर मात्र आपल्या हाती लखलखीत शस्त्रं आलेली असतात. त्या दिव्यास्त्रांचा वापर तु तुझ्या कलानिर्मीतीसाठी कर. तुझी कलाकृती स्वयंप्रकाशी होतील.पण जर तु भरकटत एखाद्या ठिकाणी पोचलेला असशील तर मात्र तिथे तुझं स्वत:च अस काहीच असणार नाही. तुझा भाता रिता असेल. तुझ्या कलाकृती रोगट, पिंगट असतील.पण दुर्देवाने तस घडल तरी सारं आकाश कोसळल अस नाही. तुला पुन्हा मुळगावी परतण्याचा आणि तिथुन केवळ स्वत:च्या अशा गंतव्यस्थानी प्रस्थान करण्याचा पर्याय तुझ्याजवळ नेहमी बाकी असेल. कलेच्या साधनेत आणि स्व-शोधात उशिरा किंवा लवकर अस काही नसतं. ती काही शर्यत नव्हे.

३-
आता," नील लिबने" ह्या कादंबरीचंच बघ. ती तुझ्यासाठी आकाशाची उंच उंच दारं आणि खोल खोल गुहांपुढच्या शिला उघडत जाईल. तु जसाजसा ही कादंबरी पुन:पुन्हा वाचत जाशील तसतशी तुला त्या आकाशांमधील तारकामंडळं आणि गुहांमधली रत्नं नवनव्या रंगात झगमजुन उठतांना दिसु लागतील. आणि तुला हेही जाणवेल, कि तु जे पाहतो आहेस ते तुझ्या बाहेरच नसुन आतलचं आहे ! तुझ्या लक्षात येईल की आत काय आणि बाहेर काय..... सारं एकच विश्व आहे. त्यात अगम्य, दुर्बोध असं काहीही नाही. अस होणं हे स्वत:चे नेत्र उघडले गेल्याच लक्षण आहे. तुला जाणवेल, की कुठलीही अनुभूती- मग ती किती का छोटी असेना- क्षुद्र नसते. ‍ज्ञानाचा दोर हा असंख्य तंतुंच्या पिळातुन निर्माण झालेला असतो. आणि त्या प्रत्येक तंतुला पुन्हा उपतंतु असतात.
अनुभवांची समृद्धी ही ह्यासाठी महत्वाची असते. अनुभव म्हणजे बघेगिरी नव्हे; ती चिंतनाची फ़लश्रुती असते. पहिल्या वाचनात तुला लाभलेला कुलीन संतोष पुढील प्रत्येक वाचनात गडद होत जाईल. तुला तुझे प्रश्न अधिक सहजतेनं सुटायला लागतील. तुझी श्रद्धा सबळ होत जाईल. तु आनंदाकडुन विश्रब्धतेकडे जात राहशील.

४-
वनश्री आणि प्राणिजगाच्या सौंदर्याच कारण त्यांच हे निसर्ग प्रामाण्य असतं. मानवेतर सृष्टी ही कशावरही आसक्त होत नाही; प्रत्येक आनंदाचा उपभोग घेउनही ती अनासक्तच राहते. विश्वाला व्यापुन राहिलेलं हे एवढस उघड गुपित जर मानवजात जाणु शकली, ते पचवु शकली ते सहन करु शकली तर तिच्या अंतरंगाचं उत्थान होईल. कारण भावनांची आंदोलनं ही अखेरीस शरीराच्या मातीत उगम पावलेली असतात.मन हे शरीराचं सहावं, अस तरल इंद्रीय आहे. निर्मीतीच्या प्रक्रीयेत ही जाण गृहीत असते. प्राणी आणि वनस्पती यांची वंशवृद्धी मानवाल ज्ञात नसलेल्या काळापासुन चाललेली आहे. आणि म्हणुन ह्या जीवसृष्टीच निसर्गाशी असलेलं नातं तितकचं प्राचीन आहे. इतक्या दिर्घ काळाचं हे नातं एखाद्या तकलादू पायावर आधारित असु शकत नाही. हा पाया केवळ एकात्मतेचा असु शकतो.
ती एकात्मता तु जाण; म्हणजे तुझ्या लक्षात येईल, की निर्मीतीचा एक क्षण हा हजारो प्राचीन अनुभुतींचा घनदाट असा उच्चार असतो; आणी म्हणुनच प्रत्ययदायी तेज त्याला लाभलेलं असतं निर्मीती म्हणजे चांद्रनृत्य. अद्रुश्याचा द्रुश्यरुप जन्म. भविष्याचे वर्तमान अविष्करण हे महामार्गावरील अंधा‍र्‍या बोगद्याच्या, जेमतेम टिंबभर भासणा‍र्‍या, प्रवेशमुखासारखं असतं. पण ती दुर्बोधता एखाद्या गुप्त पत्रावरील लखोट्यासारखी असते. कालांतरानं लखोटा अंतर्धान पावतो आणि पत्रांतले संदेश माणसांना सुबोध वाटु लागतात.
जगाच्या विविधतेनं तु संभ्रमित होऊ नकोस. कारण ह्या सा‌‍र्‍या वैविध्याची माता ही एकच असते.

५-
अभिजात कलाकृती मानवाच्या अंतरंगात अशी एक ज्योत प्रज्वलित करते, की जिच्या तेजात त्याचं जन्मांधत्वही विरुन जातं. त्याला स्वत:ची भेट घडवतं. स्वत:ला होणा‍र्‍या स्वत:च्या भेटीइतकं पौष्टीक दुसरं काय असु शकतं ?
कलाकार म्हणुन तु जेव्हा स्वत:ला घडवत असशील, तेव्हा तुझ्यावर प्रेम करणारे आईवडील कदाचित तुला " घडवण्याचा " प्रयत्न करत असतील. त्यांच्या या यातायातीमागचं प्रेमं तु समजुन घे. त्यांना फ़क्त प्रेम देत राहा, वाद घालु नकोस आणि जेव्हा तुझ्या मुलांना त्यांचे असे ( व तुझ्याहुन वेगळे ) अनुभव येत असतील तेव्हा त्यांनाही समजुन घे. त्यांच्यावर प्रेम कर. वेगळेपणं हे पौष्टीक असतं. त्यामुळे प्रेमात व्यत्यय येऊ नये. वादंग करुन कुणाला काही पटवुन देण्याचा प्रयत्न करु नकोस. तुझी कलाकृती जितकी जास्त श्रेष्ठ, तितका ती जनमानसात रुजण्याचा कालावधी दिर्घ असेल हे तु समजुन घे. निर्मीती संपते तिथे तुझी भुमिका संपते. पुढची उठाठेव तु करु नकोस.

६-
तुला पुन्हा एक विनंती करावीशी वाटते, की साहित्यसमीक्षेतुन मुक्त हो. त्यात काही अर्थ नाही. कोण्या एखाद्या पंडितान तोडलेले ते तारे असतात... काय फ़ायदा ते वेचुन ?
कलाकृती ही केवळ स्वयंभु असते. कलाकृतीचा आस्वाद हाच तिच्या गाभ्याशी जाण्याचा राजरस्ता असु शकतो. टीका, समीक्षा ह्या चार वाटा झाल्या. त्या गाभ्याची विकृत ओढाताण करतात. त्यांच्याविना तुझ काहीही अडणार नाही. हजार समीक्षक एखाद्या कलाकृतीला डोक्यावर घेवोत वा पायदळी तुडवोत, आपलं वैयक्तिक मत हेच प्रमाण मानायला हवं, स्वप्रामाण्यापेक्षा परप्रामाण्य तुला अधिक सोयीचं वाटत असेल तर तुझ्यात काहीतरी गंभीर खोट आहे हे नक्की समज. स्वत;ची मतं आतल्या आत उमलू देत. फ़ुलांना जबरदस्तीन उमलवता येत नाही. स्वत:वरती तशी जबरदस्ती करु नये. शॉर्टकट शोधु नये. कलाकृती ही आपल्यात हळुहळु विरघळत जाणारी गोष्ट असते. ती आपला भागच बनुन राहणार असते. उर्वरीत आयुष्यात. तिचे संदर्भ आपल्याला ठायी ठायी मार्गदर्शन करणार असतात आणि हे सारं नकळत होणार असत. सार काही आपल्या बटबटीत जाणिवेच्या आवाक्यातलं असत असंही नाही आणि त्यात गैर ते काय ?

७-
धीर धर सारं धीरान घे. मुल नऊ महीने पोटात धीर धरुन असत. मगच एक पुर्ण मनुष्य म्हणुन जगात येतं, साक्षात्काराचंही नेमक तस असतं. कलेच्या गर्भात झटपट आणि रेडीमेड असं काही असत नाही, कलेची उपासना असो वा आस्वाद, "धीर" हाच एक मंत्र दोन्हीला लागु आहे. एखाद्या गोष्टीची आराधना करण्यात दहा वर्षच काय, पण सारी हयात निघुन गेली तरी विषाद वाटण्यांच काही कारण नाही. कारण आराधना ही एक सुंदरी असते. तिच्या सानिध्यात तुम्ही स्वर्गात असता. " अंतिम प्राप्ती " नावाचं काही नसतं. कलेची उपासना ही अव्याहत गोष्ट आहे; आणि म्हणुन तिथे दंभाला स्थान नाही. स्थान आहे ते फ़क्त प्रेमाला. प्रेम आणि कला ह्या अविभाज्य गोष्टी आहेत. कलावंत स्वत:ला ऊन्हाळ्यात पोळुन घेतात, हिवाळ्यात गारठवुन घेतात आणि मग पावसाळ्यात चिंब होऊन वृक्षाप्रमाणे फ़ोफ़ावत राहतात. कलावंत होणं म्हणजे सोसणं, वाढत राहणं, आणि कलाकृतींची भरदार फ़ळं निर्हेतुकपणे देत राहणं, आपल्याला फ़ळं येतील की नाही ह्याची चिंता कुठलाही वृक्ष करत नाही. तो फ़क्त वाढत राहतो. फ़ळ येणार हि त्याची अविचल श्रद्धा असते.ती त्याची आशा नसते. मित्रा मी आयुष्याच्या शाळेवर विश्वास ठेवतो तिथे फ़ी असते ती फ़क्त तुमच्या धीराची, धीर म्हणजे सर्व काही.

८-
कलाकाराचं घर उन्हातच असतं. जस प्रेमिकाचं. प्रेम-आराधना आणि कलोपासना ह्यांतील वेदना आणि आनंद हयांची उत्कटता समांतर असते.जणु प्रणय आणि कलानिर्मीती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजु असतात. रिचर्ड डेहेमलचं कवित्व हे प्रणयभावनेइतकचं नैसर्गिक आहे. ते डुलतं हेलकावतं, लवथवतं, आणि मग ज्वालामुखीतुन लाव्हा उसळावा तसं तेजाळ ओघळत येतं.
९-
प्रेम तुझ्या प्रश्नांवर कर. अस समज कि त्या बंद अशा खोल्या आहेत. किंवा समज की ती अज्ञात भाषेत लिहीलेली पुस्तक आहेत. त्या खोल्यांची कुलुपं अद्याप बंद आहेत त्याच कारण, त्या खोल्यांमधल्या तुझ्या प्रवेशाची वेळ अद्याप झालेली नाही. त्या पुस्तकांची लिपी अद्याप तुला ज्ञात नाही. तु जेव्हा हे प्रश्न जगायला सुरुवात करशील, तेव्हा तु सशक्त होत जाशील आणि सारी कुलुप आपोआप गळुन पडतील. तुला ज्ञात नाही अशी एकही लिपी तेव्हा ह्या जगात असणार नाही. तु विशुद्ध जीवनाचरण करत राहा. तुझी वाट केवळ तुझी असल्यानं ती इतरांच्या पावलांनी बोथटलेली मळलेली नसेल; आणि म्हणुन तुला प्रत्येक काट्याचा, प्रत्येक धोंड्याचा सामना करावा लागेल. तू कळवळशील, कोसळशील; पण पुन्हा उभा राहशील. काटे तुझ्यापुढे नम्र होतील.धोंडे तुझ्या पायांना कुरवाळु लागतील. तु कुठल्याही अडचणींचा , संकंटांचा द्वेष करु नकोस; म्हणजे अडचणी आणि संकंट तुझ्यावर प्रेम करु लागतील. तुझ्या मार्गातुन स्वेच्छेन दुर होतील. प्रेम अशक्यप्राय अवघड आहे.
पण कलाकार तडजोड जाणत नाही हेही तितकच सत्य आहे.तशी तर प्रत्येक गोष्ट अवघड असते. कितीतरी शिल्पकारांसमोर पाषाणांनी मान तुकवलेली तु पाहिली असशील. रंगकर्त्यांसमोर रंगांनी शरणागती पत्करलेली तु पाहीली असशील. आणि हे जर तु जाणत असशील; तर तुझ्या मार्गावरुन तुला कोणीही भ्रष्ट करु शकणार नाही.

१०-
माझ्याजवळ असा एकही शब्द नाही, ज्यानं तुझं सांत्वन होऊ शकेल. सांत्वनावर माझा विश्वास नाही; इतकंच नव्हे तर सांत्वन हे एक वेदनाशामकासारख फ़सवं औषध आहे अस मी मानतो. वेदनाशामकामुळे होतं काय की आपला आजार आपल्यापासुन दडवला जातो. वेदनाशामकाचा परीणाम संपला की आजार अधिक अक्राळविक्राळ रुपात साकार होतो. मधल्या बधिर काळात तो विकृतपणे आतल्या आत फ़ोफ़ावलेला असतो. सांत्वनामुळेही नेमकं ते होतं, तुम्ही तुमच्या भोगवट्यांना पारखे होता. सुखाच्या कालखंडात जशी आपण सुखं उपभोगुन संपवतो तसंच दु:खाच्या काळात दु:खं भोगुन संपवायला हवीत,
दु:खांचे भोग औषधीच नव्हे तर दिव्योषधी असतात ! दु:खाला आपल्या अस्तित्वातुन आरपार जाऊ द्यावं. त्याला बगल देण्याचा प्रयत्न करु नये. ह्याच्या त्याच्याकडे जाऊन, दु:खाच गार्‍हाणं गाऊन त्याचा निचरा करु नये. विलापकाळातं एकांतात जावं. तिथे दु:खाला मिठीत घ्यावं. त्याचे घाव झेलावेत. जखमा होऊ द्याव्यात. ओरखडे उठु द्यावेत. हे सार जेव्हा घडत असत. हे बाहेरुन येतं नसतं, तर आतच सुप्तावस्थेत असलेल्या बियांच अंकुरुन येणं असतं. दु:खाच्या ओलाव्यात त्यांना अंकुर फ़ुटत असतो. त्यांचा वृक्ष आपल्या अस्तित्वात वाढत राहतो. त्या वृक्षाची पुर्ण वाढ झाली की आपल दु:ख संपत,
आपण बरे होतो.
आपण बदललेले असतो; नवे असतो.

११-
एकांताबद्दल मी अनेकदा तुझ्याशी बोललो आहे; पण ख‍र्या अर्थान म्हणशील तर एकांताची निवड ही आपल्या हातातील गोष्टच नसते. आपण एकटे येतो आणि एकटे जातो इतकंच खर नसतं, तर एकटेच जगतो हेच अधिक खर असत. ह्या बंदिशाळेत प्रत्येकजण पोरका आहे. आपण दुकटे आहोत अशी बतावणी फ़क्त आपण करत राहतो आयुष्यभर. क्षणभराच्या एकटेपणातही आपलं पोरकेपण आपल्याला स्पर्शुन जात असतं, पण आपण त्याला गोंजारत नाही, त्याच आतिथ्य करत नाही. त्याला घाबरुन पळत राहतो.
पण ते स्वत:च्या सावली पासुन पळत राहणं असतं. खुप खुप पळाल्यावर आपण तिच्यापासुन कितीसे दुर येतो ?
आपण स्वत:ला जगाशी इतकं घट्ट बांधुन घेतलेलं असत, कि आपलं वेगळेपणच हरवुन जाव, अनोळखी व्हाव. पण जर अचानक एखाद्याला डोंगरसुळक्यावर नेऊन ठेवलं किंवा सागरतळाशी नेऊन ठेवलं तर त्याला जी असह्य अशी स्वत:च्या एकटेपणाची जाणीव होईल ती जर तो उघड्या डोळ्यांनी भोगु शकला, तर नक्कीच एक वेगळा, उत्क्रांत माणुस म्हणुन तो परतु शकेल.दु:ख हे काहीस त्या अनुभवासारख असत. ते भोगण्यात समज आहे. दुस‍र्या कशात तरी मन रमवण्याचा प्रयत्न करुन; भोगापासुन पलायन करण आत्मघाताचं आहे. दु:ख ही एक संधी असते !. ती फ़ार वेळा लाभत नाही. जेव्हा लाभते तेव्हा तिचा पुर्ण लाभ उठवायला हवा. दु:ख हे सत्याच प्रखर अस रुप असतं, आपली प्रवृत्ती त्या तेजापुढे डोळे मिटुन घेण्याची असते. ते फ़ार घातक आहे. सत्यांच जितकं प्रखर रुप आपण डोळ्यांत साठवु तितके आपण उत्क्रांत होतो.
आणि कला साधना म्हणजे उत्क्रांत होणं.
सत्याला नजर न देऊ शकणारा कधीच कलाकार होऊ शकत नाही. कलाकृती म्हणजे सत्याचा अविष्कार. तो सुखाचा किंवा दु:खाचा नसतो त्या पलीकडिल सत्याचा असतो.

१२-
काही शंका तेजस्वी असतात . त्या आपल्या मुलभुत गुहितांना धक्का लावतात. पण म्हणुन काही त्या वाईट नसतात. अशा शंकांनी आपण भयभीत होतो पायांखालची मातीच सरकल्याचा भास होतो. पण लक्षात घे की जी माती भुसभुशीत असते तीच सरकते ! तिला खुशाल सरकु दे. हळुहळु तुझे पाय एका नव्या भक्कम ठिकाणी स्थिर होतील ह्यावर श्रद्धा ठेव. शंका जितकी अधिक तेजस्वी तेवढी ती अधिक वेदनादायक असते हे खरं. पण तिच्या पोटी जन्म होतो तो तितक्याच तेजस्वी ज्ञानाचा. अशा शंका ह्या उत्कर्षाच्या मार्गातील भव्य पाय‍र्या असतात. त्या ओलांडण्यासाठी आपल्याला आपली ऊंची वाढवण्याला पर्याय राहत नाही.

१३-
जो प्रवासी ज्ञात ठिकाणी पुर्वनियोजीत हेतुनं निघालेला असतो, त्यालाच फ़क्त अपयशाचं भय वाटु शकतं. जो मुळात नाविन्याच्या शुद्धतेच्या सत्याच्या म्हण्जेच ... जे जे मार्गात गवसेल त्याच्या च शोधात निघाला आहे त्याल भय कसलं ?
येणारं प्रत्येक संकट, दु:ख वेदना जर तुला एक एक नवं सत्य बहाल करत असेल, तर तुझा प्रवास सरळ रेषेत झाला कि वक्ररेषेत, ह्याला काय अर्थ उरतो ? तु तुझ्या मुक्कामाला कधी पोचलास ह्याला काय अर्थ उरतो? आणि मुक्काम या शब्दाला तरी काय अर्थ उरतो ? प्रवास हाच मुक्काम नव्हे काय ?
प्रवास हेच सुख. प्रवास म्हणजे दु:ख आणि म्हणुनच प्रवास हेच सत्य. मुक्काम हा भ्रम !
कलाकाराचं यश म्हणजे लोकप्रियता नव्हे. यश म्हणजे एखाद्या अजरामर कलाकृतीची निर्मीती नव्हे. यश म्हणजे भौतिक सुखांची चळत नव्हे. यश म्हणजे उत्क्रांती ... आत्म्याची उत्क्रांती...उत्क्रांती अंतहीन असते. आणि म्हणुनच
ती एकांती..... सुखद........... उत्कट असते. उत्क्रांतीच्या मार्गावरच प्रत्येक पाऊल हे ( त्या काल्पनिक ) अखेरच्या पावलाइतकं सुखद, रम्य व अंतिम असतं. म्हणुनच आता किती पावलं बाकी ? हा प्रश्न उपयोगहीन, अर्थहीन ठरतो. कुणी कीती पावलं टाकली हेही मोजमापं व्यर्थ असतं.
आत्मरंगी रंगलेला कलाकार असली गणितं मांडत नसतो.

रिल्के च्या माझ्या काही अत्यंत आवडत्या कविता

Fall

The leaves are falling, falling as from far
Where distant with'ring gardens grace the skies,
Theyr'e falling with a gesture that denies.

And in the nights the heavy earth falls by
Into the loneliness, from a far star.

We all are falling. This hand falls, as it extends.
And take a look at others. It's in them all.

And yet there's One, holding this fall
With endless gentleness in both his hands.


Love-Song

How shall I hold my soul so it does not

touch on yours. How shall I lift it

over you to other things?

Ah, willingly I’d store it away

with some lost thing in the dark,

in some strange still place, that

does not tremble when your depths tremble.

But all that touches us, you and me,

takes us, together, like the stroke of a bow,

that draws one chord out of the two strings.

On what instrument are we strung?

And what artist has us in their hand?

O sweet song.
३-
Black Cat

A ghost, though invisible, still is like a place
your sight can knock on, echoing; but here
within this thick black pelt, your strongest gaze
will be absorbed and utterly disappear:

just as a raving madman, when nothing else
can ease him, charges into his dark night
howling, pounds on the padded wall, and feels
the rage being taken in and pacified.

She seems to hide all looks that have ever fallen
into her, so that, like an audience,
she can look them over, menacing and sullen,
and curl to sleep with them. But all at once

as if awakened, she turns her face to yours;
and with a shock, you see yourself, tiny,
inside the golden amber of her eyeballs
suspended, like a prehistoric fly.

४-
What Survives

Who says that all must vanish?
Who knows, perhaps the flight
of the bird you wound remains,
and perhaps flowers survive
caresses in us, in their ground.

It isn't the gesture that lasts,
but it dresses you again in gold
armor --from breast to knees--
and the battle was so pure
an Angel wears it after you.

संबंधित लिंक्स
१- http://www.lettersofnote.com/2012/07/letter-to-young-poet.html
२ -https://en.wikipedia.org/wiki/Rainer_Maria_Rilke

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

या कविचे नाव माहीत आहे परंतु वाचलेला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0