फुसके बार – १७ जानेवारी २०१६ - साहित्य संमेलन कसले? – शोभेला दाखवण्यापुरते साहित्यिक, बाकी सगळा राजकारण्यांचा अड्डा

फुसके बार – १७ जानेवारी २०१६

साहित्य संमेलन कसले? – शोभेला दाखवण्यापुरते साहित्यिक, बाकी सगळा राजकारण्यांचा अड्डा

साहित्य संमलेनाच्या उद्घाटनाला व्यासपीठावर कोण असावेत अशी अपेक्षा आहे? उदाहरणार्थ पुढील नावे पहा. शरद पवार, देवेन्द्र फडणवीस, आढळराव, बारणे, जगताप, बापट, चाबुकस्वार, उल्हास पवार, महेश लांडगे, महापौर शकुंतला धराडे, महापौर धनकवडे, माजी राज्यपाल डी वाय पाटील, वगैरे. प्रमुख पाहुणे, उद्घाटक आणि महापौर यांच्याखेरीज तेथे बसलेल्यांना तरी प्रश्न पडायला हवा की नको का, की हे साहित्य संमेलनाचे व्यासपीठ आहे, आपण येथे का बसलेलो आहोत?

तीन-चार बिगरमराठी ज्ञानपीठ विजेत्यांना ठोंब्यासारखे व्यासपीठावर बसवले होते आणि त्यांचा दाखला देत हे संमेलन जणु काही आंतरभारती संमेलन आहे असा उदोउदो करून घेतला जात होता.

आपल्या खुसखुशीत वक्तव्याने सभा गाजवणारे पालकमंत्री अशी बापटांची ओळख करून देताच सगळीकडे हशा पिकला.

सबनीस हे केवळ नावापुरतेच अध्यक्ष आहेत असे वाटावे इतका स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांचा उदोउदो चालला होता. वर उल्लेख केलेल्या राजकारण्यांच्या पिलावळीचे सत्कार करताना मध्येच एक तरूण इसम येऊन फोटो काढण्यापुरता तेथे उभा रहायचा. पाटील परिवारापैकी कोणी असावा. असा केविलवाणा प्रकार चालू होता.

स्वागताध्यक्ष पी. डी. पाटील यांनी सहा-सात पानी भाषण वाचून दाखवले. एक पान संपले की दुसरे पान कोठे चालू होते हे लक्षात न आल्यामुळे वेळ जात होता. असो. हा सोपस्कार एकदाचा पार पडला. पैसे मोजायची तयारी ठेवून संमेलन मिळाले, म्हणजे स्वागताध्यक्षपद मिळाले की मग हे मिरवायला मोकळे असा साहित्याच्या नावाखाली किळसवाणा प्रकारचालू झाला आहे. घुमानलाही हाच प्रकार झाला होता. बिनकण्याचे साहित्य महामंडळ असल्यावर वेगळे काय होणार? पिंपरी चिंचवड ही ज्ञानोबा-तुकाराम यांची भूमी हा एक सर्व राजकारणी वक्त्यांचा आवडता मुद्दा.

पी. डी. पाटील यांनी वैयक्तिकपणे एक कोटी रूपयांचा धनादेश नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाउंडेशनला दिला, याचा साहित्य संमेलनाशी काही संबंध होता का?

शरद पवाराचे भाषण सुरू होताच सातआठ लोकांनी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांच्याकडचे बॅनर्स काढून घेतले. सलग चार संमेलनांना हजर राहण्याचा एक प्रकारचा विक्रम मी केला आहे असे पवार म्हणाले. तुमच्या उपकारापुढे उतराई होणारेच लोक असल्यावर तुम्हाला न बोलावून चालेल कसे, हा विचार त्यांना पडला कसा नाही? या न्यायाने ही चारच काय, पुढची आणखी दहा संमेलनेही त्यांच्या नावावर जमा होतील की! त्यांनीही ही संतभूमी असल्याचा दाखला दिला. हीच माझी कर्मभूमीही आहे असे ते म्हणाले. यांचे तेथील कर्म काय, तर पुतण्याच्या मदतीने तिथली महापालिका लुटून खिळखिळी करून टाकली. गुंडगिरी चालू केली.

सबनीसांना मी अध्यक्ष केले नाही. मी त्यांची निवड झाल्यावर त्यांना प्रथमच भेटलो. महाराष्ट्रात काहीही झाले, अगदी तो कोयनेचा किंवा किल्लारीचा भूकंप झाला तरी काही लोक ते मीच केले असे म्हणतात, असा पाचकळ विनोदही करून झाला. यावरून ते किती बदनाम झालेले आहेत हेदेखील त्यांच्या लक्षात आले नाही.

आम्ही राजकारणी मते कशी मिळवतो हे साहित्यिकांनी पाहू नये असा सल्ला शरद पवारांनी दिला. उपस्थित यावर खिदळले तरी यातून या राजकारण्यांचा निर्लज्जपणाच दिसून येतो, तेव्हा आपण काय बोलत आहोत हेही पवारांच्या लक्षात आले नाही. पाच माजी संमेलाध्यक्षांपैकी कोणाची समिती नेमून नवीन अध्यक्षाची निवड करावी व सध्याची मतदानाने करण्याची पद्धत बंद करावी असा सल्ला त्यांनी दिला. साहित्याच्या क्षेत्रात शुचिता हवी, पण यांच्या राजकारणाचे क्षेत्र यांनीच जे बाटवले, राज्य लुटण्याच्या अभिनव कल्पना तयार करून भ्रष्टाचाराचे नवनवीन विक्रम करणारी व गुंडांची मोट बांधणा-यांना साहित्य संमेलनात प्रवेश मिळतो, एवढेच नव्हे तर त्यांना व्यासपीठावर बसायला मिळते, आणि वर तेच साहित्यिकांना उपदेश करण्याची हिंमत करतात, यातही कोणाला काही वावगे वाटत नाही शिवाय उठसुट त्या देवी सरस्वतीचा अशा प्रसंगी जयघोष केला जातो, तिची विटंबना होते याचीही चाड कोणाला राहिलेली नाही.

डी. वाय. पाटील यांनी शरद पवारांनी त्यांना दोन कॉलेजेस कशी एका मिनिटात मंजूर करून दिली याची आठवण सांगितली. मध्ये पवारांनी दीनानाथ हॉस्पिटलचा भुखंड कसा असाच एका मिनिटात मंजूर केला होता याचीही कोणीतरी आठवण सांगितली होती. पवारांनी असे करून कोणाकोणाला मिंधे करून ठेवलेले आहे, म्हणूनच वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी आणखी दहा संमेलनाना सहज हजेरी लावू शकतील ते.

मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण मात्र प्रभावी झाले. सर्वांच्या भल्यासाठी सकारात्मकतेची गरज आहे असे ते म्हणाले. साहित्यात मतभेद झाले तरी त्यातून सकारात्मकता निर्माण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विवेकानंदांचे नाव त्यांनी घेताच ‘ब्रदर्स अँड सिस्टर्स’चा उल्लेख करतात की काय असे वाटले. मात्र ते म्हणाले, की एकच सत्य आहे असे प्रत्येक धर्म सांगतो. फक्त त्या सत्यापर्यंत नेण्याचा प्रत्येक धर्माचा मार्ग वेगवेगळा आहे तर मग त्यासाठी धर्माधर्मात संघर्ष कशासाठी? प्रत्येक संमेलनात आमची सीमावासियांशी बांधिलकी आहे हे बोलून दाखवायचे असे. तशी पद्धत आहे. मात्र नंतर त्याबाबतीत काही केले नाही तरी चालते हे सीमावासियांनाही माहित आहे व महाराष्ट्र सरकारलाही. त्यामुळे यावेळी मुख्यमंत्र्यांनीही त्याचा उल्लेख केला. पण त्याचे महत्त्व तेवढेच.

मुळात कार्यक्रम चालू होण्यास उशीर झाल्यामुळे व नंतरही हारतु-यांमध्येच भरपूर वेळ लागल्यानेच बहुधा मुख्यमंत्र्यांना अध्यक्षांचे भाषण होण्यापूर्वीच पूर्वनियोजीत कार्यक्रमापूर्वी निघावे लागले. मात्र त्यावरून मुख्यमंत्र्यांनी सबनिसांवरची नाराजी दाखवली असा प्रचार केला जात आहे.

संमेलनाच्या कार्यक्रमपत्रिकेवर नजर टाकली तर भरगच्च साहित्यिक कार्यक्रम वगैरे अजिबात दिसत नाहीत. अगदी तुरळक कार्यक्रम आहेत. तेव्हा चार दिवसांचे संमेलन असले तरी साहित्यिक देवाणघेवाण किती होते हा कळीचा मुद्दा राहतोच आणि तो कोणी विचारायचाच नाही असे दिसते. एवढेच नव्हे तर प्रेक्षकांमध्ये साहित्यिक किती हे तर कधी सांगितले जातच नाही. मधु मंगेश कर्णिक, विश्वास पाटील यांची नावे घेण्यापुरतीच उपस्थिती असावी असे वाटण्यासारखी परिस्थिती आसे.

थोडक्यात हे साहित्य संमलेन नाहीच. खरे तर सांस्कृतिक संमेलन व राजकारण्यांचे संमेलन आयोजित करून मध्येच एखादा साहित्यावरचा कार्यक्रम चुकून टाकला आहे की काय असे वाटावे.

नंतर मग स्वत: श्रीपाल सबनीस यांचे भाषण. ते शंभरपेक्षा अधिक पानांचे असल्याचे आधी वाचले होते, त्यामुळे खरे तर मनात धडकी भरली होती.

पण येथे तर त्यांचे उत्स्फूर्त भाषण होते. त्यांनी सुरूवातच इसिस वगैरेंच्या दहशतवादापासून केली. ते चुकीच्या जागी तर भाषण करत नाहीत ना असे क्षणभर वाटले. त्यांच्या बोलण्याचा सूरच रेकण्याचा होता. ते थोडेही शांत – निश्चिंत दिसत नव्हते. एवढेच नाही तर त्यांचे हात थरथरत होते. इतके की त्यांनी मधून पाणी पिले, पण थरथरत्या हातांमुळे त्यांना ते धड पिताही आलेही नाही. कदाचित अशा मोठ्या व्यासपीठावरून भाषण करण्याच्या कल्पनेमुळेच ते भांबावले असावेत.

संतांना जातीच्या चौकटीत बांधण्याचे उद्योग, सगळेच ब्राह्मण नथुरामी मनोवृत्तीचे असतात का. कितीतरी ब्राह्मणांनी चांगली कामे केली, तर त्यांनाही प्रस्थापितांमध्येच मोजणार का, वगैरे प्रश्न त्यांनी विचारले, पण मी म्हटले तसे ते अतिशय अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे त्यांच्या भाषणाला प्रभावी वगैरे म्हणता येणार नाही. त्यात आक्रस्ताळेपणा फार होता. त्यांनी अध्यक्षीय म्हणावे त्या भाषणाच्या प्रती वाटायला किंवा विकत घ्यायला ठेवल्या असल्याने हे धड ना अध्यक्षीय भाषण, ना काही असा थोडा प्रकार झाला.

भाषणाच्या सुरूवातीला पवारांना लोकनेता, जाणता राजा वगैरे विशेषणे लावून काही इतर अध्यक्षांपेक्षा आपण वेगळे नाही हेदेखील त्यांनी दाखवून दिले. बिनकण्याचे अध्यक्ष असले, की स्वागताध्यक्षांसारख्याचे फावते व त्यांना मोकळे रान मिळते हेच या व मागच्या संमेलनापासून दिसू लागले आहे.

नेमाडेंचे साहित्य संमेलनाचे मत सर्वांनाच परिचित आहे. या उदाहरणामुळे त्यांचे म्हणणे बरोबर आहे हे पटावे.

या सगळ्या दलदलीत एकच चांगली गोष्ट झाली ती म्हणजे गुलजार यांचे सुरूवातीचे भाषण व नंतरची अंबरीष मिश्र यांनी घेतलेली तेवढीच छान मुलाखत. गुलजार यांचा त्यांच्या कविता वाचण्याचा मुड होता. त्यामुळे खरोखर बहार आली. पण त्याबद्दल वेगळेच लिहायला हवे.

एवढे मात्र खरे, त्यांच्याकडून इतक्या कविता ऐकल्यावर असे झाले की परतताना समोर लेन कटिंग करणा-यासाठी गाडीचा हॉर्न वाजवण्याऐवजी त्यावरही कविता करावीशी वाटली. ती करता येत नाही ते वेगळे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

राकु - आवडलं.

कंपन्यांना कशी वर्षात दोन दिवस "ऑफसाईट" नेऊन टीम टीम नेटवर्किंग नेटवर्किंग खेळायची हुक्की येते/गरज भासते तसंच साहित्य संमेलन हे करियर साहित्यिकांचं ऑफसाईट.

ज्यांची पुस्तकं विकली जातात किंवा जे साहित्यक्षेत्रात मोलाची कामगिरी करतात ते या प्रकाराच्या वाऱ्याला उभे राहतात का हा प्रश्न आहे.

मसापचे टोट्टल मतदार बाराशे आहेत म्हणे. त्यापेक्षा जास्त लोक मसापसमोरच्या बसस्टॉपवरून येजा करत असावेत.

अवांतर: शीर्षक बदला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेखन आवडलं. आदूबाळाच्या अवांतराशी सहमत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0