जंटलमन्स गेम - ९ - किम ह्यूज.. द गोल्डन बॉय

क्रिकेटच्या खेळात वैयक्तिक कौशल्याला महत्वं असलं तरी अखेर क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे असं नेहमी म्हटलं जातं. अनेकदा वैयक्तीक कामगिरीपेक्षाही संघातील सर्वांची मिळून कामगिरी कशी होते यावर मॅचच्या जयापराजयाचं पारडं झुकत असतं. अर्थात यालाही अपवाद आहेतच! चटकन आठवणारं उदाहरण म्हणजे १९७५ च्या वर्ल्डकपमधली 'गॅरी गिल्मोर मॅच' म्हणून ओळखली जाणारी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड सेमी-फायनल! एखादा खेळाडू एकहाती मॅच कशी जिंकतो याचं हे उत्कृष्टं उदाहरण! आणखीन एक उदाहरण म्हणजे १९८३ च्या वर्ल्डकपमधली भारत-झिंबाब्वे मॅच आणि त्यातली कपिलदेवची १७५ रन्सची इनिंग्ज! मात्रं अनेकदा एक-दोन खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी ही इतरांच्या खराब कामगिरीमुळे संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरते. भारतीय संघाबाबत तर असं अनेकदा दिसून येतं. बॅट्समनच्या मेहनतीवर पाणी फिरवण्याचं काम बॉलर्स इमानेइतबारे करत असतात!

फुटबॉल किंवा हॉकीसारख्या सांघिक खेळांच्या तुलनेत क्रिकेटमध्ये अत्यंत महत्वाचा असतो तो कॅप्टन! क्रिकेट कॅप्टनला प्रत्यक्षं मॅचच्या दरम्यान मैदानावर अनेक निर्णय घ्यावे लागतात. बॉलिंग चेंज, फिल्ड प्लेसमेंट याबद्द्लचे निर्णय मॅचवर दूरगामी परिणाम करत असल्याने क्रिकेटच्या खेळाची आकलनशक्ती ज्याला 'रिडींग द गेम' म्हणतात ती आणि चाणाक्षपणा हे उत्कृष्टं कॅप्टनचे दोन महत्वाचे गुण असतात. त्याबरोबरच कॅप्टनच्या ठायी अत्यावश्यक असणारा महत्वाचा गुण म्हणजे आपल्या सहकार्‍यांकडून उत्कृष्टं कामगिरी करुन घेणं! एखादा कॅप्टन आपल्या संघाकडून किती उत्कृष्टं कामगिरी करुन घेऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे १९९२ च्या वर्ल्डकपमधील इमरान खान! वकार युनुससारखा बॉलर दुखापतीमुळे नसताना आणि पहिल्या चार मॅचेसमध्ये दारुण पराभव पत्करावा लागलेला असतानाही अखेर इमरान पाकिस्तानला विश्वविजेते बनवू शकला ते याच गुणामुळे!

ऑस्ट्रेलियन टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात नजर टाकली तर इमरानप्रमाणेच, कदाचित इमरानपेक्षाही काकणभर सरस कॅप्टन म्हणजे इयन चॅपल! १९७१ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये बिल लॉरीची हकालपट्टी झाल्यावर इयन चॅपलकडे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी आली. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या रांगडेपणाचा आणि आक्रमकतेचा पुरेपूर वापर करत त्याने ऑस्ट्रेलियाचा संघ घडवला होता. प्रतिस्पर्धी खेळाडूंबद्द्ल आदर न बाळगणं आणि बहुदा कमालीची तुच्छता बाळगण्याची वृत्ती ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अंगात पुरेपूर मुरण्यास चॅपलच कारणीभूत होता!

चॅपलच्या नेतृत्वात खेळणार्‍या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आणखीन एक 'कला' पराकोटीच्या उत्कर्षाला नेली होती ती म्हणजे स्लेजिंग! कोणत्याही परिस्थितीत मॅच जिंकणं हेच परमकर्तव्य आहे हे प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या मनावर त्याने ठाकून-ठोकून बिंबवलं होतं! आपला संघ 'अग्ली ऑस्ट्रेलियन्स' म्हणून ओळखला जातो याची त्याला यत्किंचीतही पर्वा नव्हती! डेनिस लिली, रॉडनी मार्श, डग वॉल्टर्स, ग्रेग चॅपल, जेफ थॉमसन, गॅरी गिल्मोर, इयन रेडपाथ, अ‍ॅश्ली मॅलेट अशा संपूर्णपणे भिन्न स्वभावाच्या खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरी करुन घेण्यात चॅपल यशस्वी झाला याचं मुख्यं कारण म्हणजे तो स्वत:ही या सर्वांइतकाच मोकळा-ढाकळा आणि लढाऊ वृत्तीचा होता!

१९७५ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या शेफील्ड शिल्ड स्पर्धेत वेस्टर्न ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया यांच्यात मॅच सुरु होती. चौथ्या इनिंग्जमध्ये विजयासाठी १५० रन्सची आवश्यकता असताना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची अवस्था ६२ / ६ अशी झाली होती. मॅलेट आणि टेरी जेनरसारखे स्पिनर्स असताना अ‍ॅडलेडच्या स्पिनिंग विकेटवर उरलेल्या चार विकेट्स काढून आपण आरामात मॅच जिंकू अशी इयन चॅपलची खात्री होती! वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे सर्व प्रमुख बॅट्समन आऊट झाले होते, पण २१ वर्षांचा एक तरुण बॅट्समन मात्रं मॅलेट आणि जेनरला दाद देत नव्हता! उलट स्वीपचा मुक्तहस्ताने वापर करत त्यांना फटकावून काढण्याचा त्याने सपाटा लावला होता! स्लिपमध्ये उभ्या असलेल्या चॅपलला स्वीपचा शॉट निव्वळ आत्मघातकी वाटत होता. मॅलेट आणि जेनरचे बॉल त्याला 'आऊट ऑफ द हँड' ओळखता येत नसावे आणि कोणत्याही क्षणी तो कॅच आऊट होईल असा चॅपलचा कयास होता, परंतु त्या बॅट्समनने मारलेला एकही स्वीप हवेत गेला नाही! वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने आरामात मॅच जिंकली!

हा तरुण बॅट्समन होता किंबर्ली जॉन 'किम' ह्यूज!

इयन चॅपलचं प्रथमदर्शनी मत होतं,
"I was left with the impression that here was a young man who didn't lack confidencein his own ability."

न्यू साऊथ वेल्सविरुद्ध त्याच मोसमात किमने फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या पदार्पणात शतक फटकावलं होतं. न्यू साऊथ वेल्सचे फास्ट बॉलर्स गॅरी गिल्मोर, लेन पास्को, डेव्हीड कॉली यांना स्पिनर्स असावे अशा थाटात क्रीजमधून पुढे येत त्याने फटकावलं होतं! गॅरी गिल्मोरच्या बंपर्सच्या मार्‍यावर त्याने हूक-पूलच्या लागोपाठ तीन बाऊंड्री मारल्यावर गिल्मोरला बंपर्स आवरते घ्यावे लागले होते! कॅप्टन डग वॉल्टर्स, केरी ओक्कीफ, डेव्हीड हॉर्न कोणालाही त्याला रोखणं शक्यं होत नव्हतं! हॉर्न आणि ओक्कीफचे बॉल पिचवर पडण्याअगोदर फुलटॉस घेऊन फटकावण्याचं धोरण किमने अवलंबलं होतं!

हॉर्न म्हणतो,
"We couldn't believe the way he was playing! He was running down the wicket to Lenny, Gilmour and Colley. I'd never seen anyone do that. With fast bowlers, you always stay in your crease. He was the first bloke I'd seen who jumped down!

Kim was the hardest bloke I ever had to bowl to. Easily the hardest. He was intimidating! I bowled against Greg a couple of times and Ian three or four times. I was always far more nervous and pumped up bowling to Kim. I played against Barry Richards once and he got 178, but he tended to play each ball on its merit rather than jumping down. With Kim, every ball was a challenge! A day of bowling to him left me mentally and physically drained. I'd bowl quick as I could, just to keep him in the crease. There was no way in the world you would throw ball up as it would go for four or six, mostly six!"

१९७७ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अ‍ॅशेस सिरीजसाठी इंग्लंडच्या दौर्‍यावर जाण्याच्या तयारीत असतानाच ऑस्ट्रेलियन आणि एकूणच जागतिक क्रिकेटला ढवळून काढणार्‍या एका प्रकरणाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती!

वर्ल्ड सिरीज क्रिकेट! पॅकर सर्कस!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटमधील ऑस्ट्रेलियन संघाचा कॅप्टन होता इयन चॅपल! वर्ल्ड सिरीजच्या ऑस्ट्रेलियन संघात इयन चॅपलच्या पसंतीस उतरणार्‍या खेळाडूंचीच निवड होणार होती! इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार्‍या ऑस्ट्रेलियन संघातील १७ पैकी १३ जणांशी केरी पॅकरचा एजंट ऑस्टीन रॉबर्ट्सनने आधीच करार केले होते. ज्या चार खेळाडूंशी रॉबर्ट्सनने संपर्क साधला नव्हता ते होते गॅरी कोझियर, क्रेग सार्जंट, जेफ डिमॉक आणि किम ह्यूज! इयन चॅपलच्या मते त्याच्या संघातून वर्ल्ड सिरीज क्रिकेट खेळण्याची या चौघांची लायकी नव्हती!
वास्तविक गॅरी कोझियर एक चांगल्यापैकी टेस्ट क्रिकेटर म्हणून नावारुपाला आलेला होता. सार्जंट, डिमॉक आणि ह्यूज हे शेफील्ड शिल्डमधल्या यशस्वी खेळाडूंपैकी होते. विशेषतः ज्या आक्रमक आणि आकर्षक खेळाची पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटसाठी नितांत आवश्यकता होती ती आक्रमकता किम ह्यूजमध्ये पुरेपूर मुरलेली होती. इयन चॅपलने निवड केलेल्या मार्टीन केंट, ग्रॅहॅम वॉटसन, रॉबी लँगर यांच्यापेक्षा तो कितीतरी पटीने सरस बॅट्समन होता. ट्रेव्हर चॅपल तर दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या संघातही पक्कं स्थान मिळववू शकत नव्हता! केवळ इयन आणि ग्रेगचा सख्खा भाऊ म्हणून त्याची वर्णी लागली होती! परंतु ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट संघात स्थान मिळवलेल्या किम ह्यूजला मात्रं इयन चॅपलने कटाक्षाने वर्ल्ड सिरीजपासून दूर ठेवलं!

ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर असतानाच ९ मे १९७७ ला वर्ल्ड सिरीज क्रिकेटचा बाँब फुटला!

आपल्याला वर्ल्ड सिरीजमध्ये खेळण्यासाठी विचारणा झाली होती, परंतु आपण नकार दिला असा किमने नंतर दावा केला, परंतु तो केवळ इतरांच्या तुलनेत आपण कमी नाही हे स्वतःलाच समजावण्याच्या भूमिकेतून केला असावा असं मानण्यास वाव आहे! पॅकरचा एजंट असलेला ऑस्टीन रॉबर्ट्सन आणि ग्रेग चॅपलच्या मते किमच्या नावाची चर्चा झाली, पण त्याच्याजागी इतरांची निवड करण्यात आली!

ग्रेग चॅपल म्हणतो,
"I was asked about my opinion and I said he was not ready. There were other players we would suggest before him. Kim's been quoted as saying he was offered contract and turned it down. That is not true and I know it for a fact."

डेनिस लिली म्हणतो,
"If he was approached, it was done by someone who had no authority. I was close enough to WSC to know that the three captains chose their own sides and Ian Chappell did not pick Kim Hughes at any stage of operation. Hughes was given a big miss."

वर्ल्ड सिरीज क्रिकेटबद्दलची चर्चा आणि त्यामुळे होत असलेल्या टीकेमुळे ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या कामगिरीवर याचा परिणाम होणं अपरिहार्य होतंच! लॉर्ड्सची पहिली टेस्ट ड्रॉ झाल्यावर ओल्ड ट्रॅफर्ड, ट्रेंट ब्रिज आणि हेडींग्ली इथल्या तिन्ही टेस्ट्स जिंकून इंग्लंडने अ‍ॅशेस सिरीज जिंकली होती! त्यातच हेडींग्ली टेस्टमध्ये खेळलेले सर्वच्या सर्व ११ खेळाडू वर्ल्ड सिरीज क्रिकेटशी करारबद्ध असल्यामुळे पत्रकारांनी चॅपलवर टीकेची झोड उठवली होती!

इंग्लंडच्या दौर्‍याच्या सुरवातीपासून ग्रेग चॅपलने किम ह्यूजला अगदीच कमी मॅचेसमध्ये खेळण्याची संधी दिली होती. पहिल्या चारही टेस्ट मॅचेस तर सोडाच, पण अगदी इंग्लंडच्या कौंटी संघांविरुद्धच्या मॅचेसमध्येही त्याला बर्‍याचदा बाहेर बसवण्यात आलं होतं. साहजिकच किमच्या खेळावर याचा परिणाम झाला होता. अशा परिस्थितीत चौथ्या टेस्टमधील सिलेक्शनवरुन झालेल्या गदारोळानंतर ग्रेग चॅपलने किमला पाचव्या टेस्टमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला! टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाल्याबद्द्ल पत्रकार नॉर्म टास्करने अभिनंदन केल्यावर तो विशादाने उद्गारला,

"Those pricks, know they have made me part of their failure!"

ओव्हलवरच्या आपल्या पहिल्या टेस्टमध्ये तासाभरात आणि ३७ बॉलमध्ये अवघी १ रन केल्यावर माईक हेंड्रीकच्या बॉलवर बॉब विलीसने किम ह्यूजचा कॅच घेतला!

वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये खेळणार्‍या खेळाडूंवर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने बंदी घातली होती. भारताविरुद्धच्या सिरीजसाठी दहा वर्षांपूर्वी रिटायर झालेल्या बॉबी सिंप्सनला पुन्हा पाचारण करण्यात आलं! ही सिरीज सुरु होण्यापूर्वी किमने एक पत्रंक प्रसिद्धं केलं. त्यात तो म्हणाला,

"It is completely understandable that players approaching retirement or even past players should avail themselves of an opportunity to capitalise on their skills. It is rather like a person looking for a good form of business to enter. I sincerely wish each of the players concerned in the new cricketing venture well.. The necessity for all young players - and we do have some brilliant ones knocking the door - is to dedicate, train long and hard... This is what I propose to do. That is exactly where I stand."

किमचं हे वक्तव्याचा वर्ल्ड सिरीजमधल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी विशेषतः लिली, मार्श आणि खुद्दं ग्रेग चॅपल यांनी पक्कं लक्षात ठेवलं होतं! किमला या वक्तव्याचा त्यांनी कधीच विसर पडू दिला नाही!

भारताविरुद्धच्या सिरीजमध्ये दोन टेस्ट्समध्ये किमच्या हाती फारसं काही लागलं नाही. त्यानंतर वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर गेलेला असताना पहिल्याच मॅचमध्ये त्याचा अपेंडीक्सचा आजार बळावल्याने त्याच्यावर ऑपरेशन करण्यात आलं. ही जखम चिघळल्यामुळे त्याला फारशा मॅचेसमध्ये भाग घेता आला नाही. पाचपैकी एकाही टेस्टमध्ये सिंप्सनने त्याची निवड केली नाही! किमची दुखापत हे एक कारण असलं तरी त्याची निवड न होण्याचं मुख्यं कारण म्हणजे त्याची आक्रमक आणि काहीशी बेदरकारपणाकडे झुकणारी बॅटींग जुन्याजाणत्या सिंप्सनच्या पसंतीस उतरणारी नव्हती!

टोनी कोझीयर म्हणतो,
"Kim Hughes is the most frustrated, disillusioned young man in the West Indies today and with good reason. Never, at any stage, has Simpson considered Hughes a Test prospect."

माईक ब्रिअर्लीच्या इंग्लिश संघाविरुद्ध अ‍ॅशेस सिरीजच्या पहिल्या टेस्टमध्ये किमने आपलं पहिलं शतक झळकावलं! या इनिंग्जमध्येही किमच्या फटकेबाजीची चुणूक दिसलीच! बॉब विलीसचा बंपर त्याने ब्रिस्बेनच्या जॉगिंग ट्रॅकमध्ये हूक केला! ब्रिअर्लीने आणखीन एक फिल्डर तिथे ठेवताच मात्रं चाणाक्षपणे त्याने हूकचा शॉट म्यान केला! परंतु बोथमने बंपर टाकण्याचा प्रयत्न केल्याबरोबर किमने मारलेला हूक फाईनलेग बाऊंड्रीवर असलेल्या जेफ बॉयकॉटपासून अवघ्या बारा यार्डांवरुन बाऊंड्रीबाहेर असलेल्या बोर्डावर दाणकन आदळला!

बॉयकॉट म्हणतो,
"I could hear it whistling like a shell coming at me! Had I got in the way, it would have taken me with it!"

परंतु ब्रिस्बेनच्या पहिल्या टेस्टनंतर मोक्याच्या क्षणी फटकेबाजीच्या नादात आऊट होण्याच्या त्याच्या जुन्या सवयीने पुन्हा डोकं वर काढलं! पुढच्या तीनही टेस्ट्समध्ये - मेलबर्न (४८), सिडनी (४८), अ‍ॅडलेड (४६) व्यवस्थित सेट झालेला असताना आक्रमकपणाच्या नादात त्याने स्वतःची विकेट फेकली! ऑस्ट्रेलियाचा ५-१ असा धुव्वा उडवत इंग्लंडने अ‍ॅशेस सिरीज जिंकली! याच सिरीजमध्ये मेलबर्नच्या टेस्टमध्ये पुढे 'कॅप्टन ग्रंपी' म्हणून गाजलेल्या अ‍ॅलन बॉर्डरने टेस्टमध्ये पदार्पण केलं!

अ‍ॅशेसनंतर पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आला होता. पॅकरशी करारबद्ध असलेल्या सर्व खेळाडूंची पाकिस्तानने आपल्या संघात निवड केल्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांमध्ये आधीच कडवटपणा पसरला होता. पहिल्या टेस्टमध्ये चौथ्या इनिंग्जमध्ये जिंकण्यासाठी ३८२ रन्सचा पाठलाग करताना ३०५ / ३ अशा सुस्थितीतून सर्फराज नवाजच्या ३३ बॉलमधल्या १ रनच्या मोबदल्यात ७ विकेट्सच्या स्पेलमुळे ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज ३१० रन्समध्ये आटपली!

दुसर्‍या टेस्टच्या आधी क्लब क्रिकेट खेळताना ग्रॅहॅम यालपला दुखापत झाल्यामुळे त्याने दुसर्‍या टेस्टमधून माघार घेतली. ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सनी यालपच्या जागी कॅप्टन म्हणून नेमणूक केली अवघ्या दहा टेस्ट्सचा अनुभव असलेल्या किम ह्यूजची!

किमची प्रतिक्रीया होती,
"A new era!"

ऑस्ट्रेलियाचं नेतृत्वं करणं हे क्रिकेट खेळायला लागल्यापासून किमचं स्वप्नं होतं!
अनेकदा त्याने तसं आपल्या सहकार्‍यांजवळ स्पष्टपणे बोलूनही दाखवलं होतं!

पाकिस्तानविरुद्धची दुसरी टेस्ट जिंकून किमने आपल्या कॅप्टनपदाच्या कारकिर्दीचा शुभारंभ केला, पण या मॅचमध्ये अ‍ॅलन हर्स्टने सिकंदर बख्तला 'मंकडींग' केल्यामुळे आणि सर्फराज नवाजने अँड्र्यू हिल्डीचविरुद्धं हँडलिंग द बॉल चं यशस्वी अपिल केल्यामुळे ही मॅच वादग्रस्तंच ठरली! अ‍ॅलन हर्स्टचं समर्थन करताना "It was just part of cricket!" म्हणणार्‍या किमने सर्फराजवर मात्रं "It just wasn't cricket!" असा अखिलाडूपणाचा आरोप केला!

१९७९ मध्ये वर्ल्ड सिरीज क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डात करार झाल्यावर पॅकरशी करारबद्ध असलेले सर्व खेळाडू पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यास पात्रं ठरले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मात्रं १९७९ च्या वर्ल्डकपसाठी यापैकी एकाही खेळाडूची निवड केली नाही! वर्ल्डकपमध्ये अपेक्षेप्रमाणे ऑस्ट्रेलियाचं आव्हान अपेक्षेप्रमाणेच ग्रूपमध्येच संपुष्टात आलं. वर्ल्डकपनंतर लगेचच असलेल्या भारताचा दौराही ऑस्ट्रेलियाला निराशाजनकच गेला. कानपूर आणि कलकत्त्याच्या दोन टेस्ट जिंकून भारताने ही सिरीज २-० अशी जिंकली. कॅप्टन म्हणून ह्यूज अपयशी ठरला असला तरी सहा टेस्ट्समध्ये त्याने ५९४ रन्स फटकावल्या होत्या! मद्रासच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याने अ‍ॅलन बॉर्डरसह २२२ रन्सची पार्टनरशीप करताना शतक फटकावलं होतं. या दौर्‍याचा मुख्य परिणाम म्हणजे बॉर्डर आणि ह्यूज दोघांच्याही स्पिन बॉलिंगला खेळण्याच्या क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली होती!

वर्ल्ड सिरीजमध्ये समावेश असलेल्या खेळाडूंची वर्ल्ड कप आणि भारताच्या दौर्‍यावर निवड न केल्याबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर टीकेचा भडीमार झाला होता. पॅकरशी करार झाल्यावर या सर्व खेळाडूंची पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात निवड होणार हे स्पष्टंच होतं. भारताच्या दौर्‍यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आता ऑस्ट्रेलियाच्या आणि फर्स्ट क्लास संघात स्थान मिळवण्यासाठीही झगडावं लागणार होतं. इयन चॅपल तर ऑस्ट्रेलियन संघात किमलाही स्थान मिळू नये या मताचा होता.

"Frankly, I can't even see a spot in the Australian squad for Hughes!"

त्याचवेळी ट्रेव्हर चॅपलची ऑस्ट्रेलियन संघात वर्णी लागावी असं त्याचं मत होतं!

भारताच्या दौर्‍यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघातील ह्यूज, बॉर्डर आणि हॉग या तिघांची १९७९-८० च्या मोसमासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड झाली. वर्ल्ड सिरीज क्रिकेटपूर्वी कॅप्टन असलेल्या ग्रेग चॅपलचीच पुन्हा कॅप्टन म्हणून नेमणूक करण्यात आली असली तरी त्याचा व्हाईसकॅप्टन होता किम ह्यूज! परंतु राष्ट्रीय संघासाठी व्हाईस कॅप्टन असलेल्या किमला वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संघात मात्रं रॉडनी मार्शच्या नेतृत्वाखाली खेळावं लागलं!

१९७९-८० मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्याविरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या आलटून-पालटून टेस्ट मॅचेस होत्या. इंग्लंडविरुद्धच्या या मॅचेस अ‍ॅशेस सिरीजमध्ये मोडत नव्हत्या. वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया १७२ रन्सनी मागे असताना दुसर्‍या इनिंग्जमध्ये किमने १३० रन्स फटकावत ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळला! त्याच्या १८ पैकी १० बाऊंड्री या गार्नर, होल्डींग आणि रॉबर्ट्स यांच्या बंपर्सवर मारलेल्या हूकच्या होत्या! पाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये ९९ वर डेरेक अंडरवूडला सिक्स मारण्याच्या नादात बाऊंड्रीवर माईक ब्रिअर्लीने त्याचा कॅच घेतला! वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसर्‍या टेस्टच्या दुसर्‍या इनिंग्जमध्येही त्याने ७० रन्स काढल्या पण तो ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळू शकला नाही. उरलेल्या तीन टेस्ट्समध्ये मात्रं त्याच्या हाताला फारसं काही लागलं नाही! १९८० मध्ये पाकिस्तानच्या दौर्‍यावरही कराची आणि फैसलाबादच्या टेस्ट्समध्ये दोन वेळा तो ८५ ते ९० च्या दरम्यान पाकिस्तानी स्पिनर तौसिफ अहमदला फटकावण्याच्या नादात तो आऊट झाला!

१९८० मध्ये लॉर्ड्सवरच्या शतकमहोत्सवी टेस्टमध्ये पावसामुळे बराच वेळ वाया गेला असला तरी किमने पहिल्या इनिंग्जमध्ये ११७ आणि दुसर्‍या इनिंग्जमध्ये ८४ रन्स फटकावल्या! टेस्टच्या पाचही दिवशी बॅटींग करताना प्रत्येक दिवशी सिक्स मारण्याचा पराक्रम त्याच्या नावावर नोंदला गेला! दुसर्‍या इनिंग्जमध्ये अर्धशतक पूर्ण करताना क्रिस ओल्डला त्याने मारलेली सिक्स तर अनेकांच्या मनावर कायमची कोरली गेली!

किमच्या या शॉटच्या वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये नेमकं कोण असावं तर नॉर्मन मे आणि कीथ मिलर!

"Down the ground again! Thats a six! We'll nearly catch that. A magnificent hit! That almost finished in our broadcast box! Keith, have you seen a better hit at Lords than that one?"

"Well," मिलर उत्तरला, "I hit couple up there myself Norm, oddly enough. But not many have! Its one of the biggest hits I have seen for many many a year! On top of the balcony!"

गबी अ‍ॅलन म्हणतो,
"I can not recall a more remarkable straight hit. It was just amazing!"

ऑस्ट्रेलियन पत्रकार रिचर्ड व्हिटींग्टन म्हणतो,
"Kim's innings was the nearest approach to Stan McCabe in full flurry! The shot he hit of Old, the ball was still rising when it hit the top of Lord's pavilion!"

१९८० च्या मोसमासाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने रॉडनी मार्शच्या ऐवजी किमची कॅप्टन म्हणून नेमणूक केली. किम ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाचा व्हाईस कॅप्टन असल्याने ही नेमणूक तर्कसंगत असली तरी रॉडनी मार्श आणि डेनिस लिली यांना मात्रं ते अजिबात रुचलं नाही! मार्श आणि लिली दोघंही ह्यूजला बरेच सिनीयर होते. मार्शच्या मते वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनपदावर त्याचा अधिकार होता! मार्शचं हे मत लिलीला पूर्णपणे मान्यं होतं! वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा व्हाईस कॅप्टन म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास मार्श आणि लिली दोघांनीही ठाम नकार दिला!

व्हिक्टोरियाविरुद्धच्या मॅचच्या पूर्वसंध्येला टीम मिटींगमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंविरुद्ध व्यूव्हरचना करण्याची चर्चा सुरु असताना किमने रॉडनी मार्शचा सल्ला विचारला,

"What do you think Rod?"
"You are the captain, you control the meeting!" मार्श खेकसला!

मार्श आणि लिली यांना ह्यूजशी असहकार्याचाच पवित्रा घेतला होता. व्हाईस कॅप्टनची जबाबदारी दोघांनीही नाकारल्यावर ही माळ ब्रूस लेअर्डच्या गळ्यात पडली. दोघांही सिनीयर खेळाडूंना वेळप्रसंगी खडसावण्याचं अवघड काम त्याच्या शिरावर आलं! खमक्या लेअर्डने ते व्यवस्थित पार पाडलं! मार्शने काहीही सल्ला देण्याचं नाकारल्यावर एकदा लेअर्डने सुनावलं,

"Listen mate! Pull your head in. All these young blokes, they don't know what they should be doing!"

न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत किम अपयशी ठरल्यावर आणि भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही त्याच्या हाती काही न लागल्यावर इयन चॅपलने पुन्हा आपली तलवार परजली! दुसर्‍या टेस्टमध्ये ह्यूज बॅटींगला आल्यावर कॉमेंट्री करताना चॅपल उद्गारला,

"Hughes really does need to build up a big score here. People are starting to talk about him being dropped."

चॅपलच्या या टीकेला बॅटनेच उत्तर देण्याचं किमने बहुधा ठरवलं असावं!
कपिल, करसन घावरी, दिलीप दोशी, शिवलाल यादव यांची पद्धतशीरपणे धुलाई करत ३०१ बॉलमध्ये २१ बाऊंड्री मारत किमने २१३ रन्स ठोकल्या!

दुसर्‍या इनिंग्जमध्येही किमने आकर्षक आणि आक्रमक ५३ रन्स फटकावल्या, परंतु मेलबर्नच्या तिसर्‍या टेस्टमध्ये मोक्याच्या क्षणी आऊट होण्याची त्याची सवय पुन्हा एकदा उफाळून वर आली! लंचपूर्वीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये दिलीप दोशीला फटकावण्याच्या नादात चेतन चौहानने त्याचा कॅच घेतला!

चॅनल नाईनसाठी कॉमेंट्री करत असलेला बिल लॉरी म्हणला,
"Last over before lunch! That's unbelieveable, Kim Hughes! Chauhan took the catch. But charging before lunch! Greg Chappell storms off. And you should hit the ground Kim Hughes. Far too often we have seen this!"

ह्यूज, मार्श आणि लिली यांच्यातील वाद पराकोटीला गेला तो १९८१ च्या अ‍ॅशेस सिरीजमध्ये!

१९८१ मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ अ‍ॅशेस सिरीजसाठी इंग्लंडच्या दौर्‍यावर जाणार होता. या दौर्‍यापूर्वी दोन आठवडे ग्रेग चॅपलने आपण यापुढे कोणत्याही दौर्‍यावर जाण्यासाठी उपलब्ध नाही असं जाहीर केलं! ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड इथे होणार्‍या सर्व मॅचेसमध्ये खेळण्यास तो तयार होता, परंतु इतर कोणत्याही दौर्‍यावर जाण्यास मात्रं त्याने असमर्थता दर्शवली! व्यावसायिक आणि कौटुंबिक कारणामुळे आपण हा निर्णय घेतल्याचं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला कळवलं!

ग्रेगच्या या निर्णयामुळे अ‍ॅशेस सिरीजसाठी कॅप्टनची निवडणूक करण्याची नवीन जबाबदारी ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सवर येऊन पडली! शेवटच्या क्षणी त्यांच्यासमोर एकच पर्याय होता तो म्हणजे व्हाईस कॅप्टन किम ह्यूज! किमला कॅप्टन म्हणून प्रमोशन मिळाल्यावर व्हाईस कॅप्टन म्हणून नेमणूक झाली ती रॉडनी मार्शची! गंमत म्हणजे वेस्टर्न ऑस्ट्रेलियन संघात किमचा व्हाईस कॅप्टन होण्यास नकार देणार्‍या मार्शने ऑस्ट्रेलियन संघात ही जबाबदारी हसत हसत स्वीकारली! ग्रेग नसला तरी जणू चॅपल घराण्याचा प्रतिनिधी म्हणून ट्रेव्हर चॅपलचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश होता!

मार्शच्या आणि त्याचा खास मित्रं असलेल्या डेनिस लिलीच्या मते किमच्या ऐवजी मार्शचीच कॅप्टन म्हणून निवड होणं योग्यं होतं! किमची नेमणूक झाल्यावर डेनिसने नाराजी व्यक्तं केलीच, पण नेट प्रॅक्टीसमध्येही किमवर बंपर्सचा मारा आरंभला!

जेफ लॉसन म्हणतो,
"If it was once, he might be doing it for good cricket reason. But it happened number of times. Often Dennis would wait to see which net Kim was going to bat in and then go and bowl at him. He might have been bowling line and length at Allan Border. Then Kim would come in and it would be a different kettle of fish! It didn't server any positive purpose for Kim and the team didn't think it was positive. But no one dared to say, 'Dennis, you shouldn't do that.' He was Dennis and did what he wanted. Only person who could and should have stopped Dennis was Rod, and he didn't do it!"

अर्थात लिलीने किमवर बंपर्सचा मारा करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती! पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटपूर्वी १९७७ च्या इंग्लंड दौर्‍यातही एकही टेस्ट खेळण्यापूर्वी लिलीने त्याला अशीच ट्रीटमेंट दिलेली होती! त्यामागचं लिलीचं कारण अगदी मासलेवाईक होतं.

"He needs to learn! He's going to get bounced in the match!"

मार्शच्या जागी किमची कॅप्टन म्हणून नेमणूक झाल्यावर तर नेटमध्ये लिलीच्या बंपर्सना जास्तंच धार चढली. एकदा तर नेट प्रॅक्टीसमध्ये त्याने किमला सलग बावीस बंपर्स टाकले. एक बंपर किमने डक केल्यावर बॉल उचलत लिली म्हणाला,

"Sorry!"
"Oh, that's ok!" किम अगदी सहजपणे उत्तरला!
"Sorry, I didn't fucking hit ya!" लिली गुरकावला!

लिलीप्रमाणे मार्शला नेटमध्ये किमवर आक्रमण करता येत नसलं तरी त्याने वेगळा मार्ग शोधून काढला होता. मार्शचा अनुभव किमपेक्षा कित्येक पटीने जास्तं असल्याने आणि वर्षानुवर्ष इयन आणि ग्रेग चॅपल आणि डेनिस लिलीबरोबर खेळल्याने विकेट्स घेण्यासाठी फिल्डींग प्लेसमेंट तो कोळून प्यायला होता. एखाद्या बॅट्समनला बॉल कसा आणि कुठे टाकावा याची अनेकदा तो लिलीला सूचना देत असे आणि त्याप्रमाणे बॉलिंग केल्यावर लिलीला हमखास विकेट मिळत असे!

किमच्या फिल्डींग प्लेसमेंटबद्दल नाराजी व्यक्तं करण्याची त्याची खास पद्धत म्हणजे एका ग्लोव्हने अर्धा चेहरा झाकून घेणं आणि मग हळूच शीळ घालत आपल्याला योग्य वाटेल त्या पद्धतीने फिल्डर्सना पोझीशन करणं! कॅप्टन म्हणून किमचा असलेला अधिकार धुडकावून लावण्याचाच हा प्रकार होता, परंतु आपल्या खेळकर स्वभावाला अनुसरुन किमने ते कधीच मनावर घेतलं नाही! मार्श आणि लिलीकडून मॅच जिंकण्यासाठी आपल्याला सहकार्य मिळत आहे हे त्याच्यादृष्टीने जास्तं महत्वाचं होतं!

ट्रेंट ब्रि़ज, नॉटींगहॅमशायरच्या पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकल्यावर किमने फिल्डींगचा निर्णय घेतलाच, पण रॉडनी हॉग, जेफ लॉसन हे संघात असतानाही डेनिस लिलीच्या जोडीला नवा बॉल हाती दिला तो टेस्टमध्ये पदार्पण करणार्‍या टेरी आल्डरमनच्या हाती! किमची ही चाल अचूक ठरली. लिलीने ८ तर आल्डरमनने ९ विकेट्स घेत इंग्लंडला दोन्ही इनिंग्जमध्ये दोनशेच्या आत गुंडाळलं! चौथ्या इनिंग्जमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार्‍या रन्स काढणारा बॅट्समन होता ट्रेव्हर चॅपल!

लॉर्ड्सच्या दुसर्‍या टेस्टमध्येही टॉस जिंकल्यावर ह्यूजने पुन्हा फिल्डींग घेतली! मात्रं यावेळेस इंग्लंडने ३०० च्या पार मजल मारली. इंग्लंडच्या पहिल्या इनिंग्जच्या शेवटी बॉब विलीस बॅटींगला आला असताना ह्यूजच्या फिल्ड प्लेसमेंटवर नाराज असलेल्या मार्शने स्टार्ट घेण्याच्या बेतात असलेल्या लिलीला थांबण्याची खूण केली.

"You have got all the angles buggered up!" मार्शने किमला सुनावलं.
"Oh! What do you want?"

मार्शने फिल्डींगमध्ये किंचीतसा बदल करत कव्हर पॉईंटला असलेल्या फिल्डरला थर्डमॅनच्या दिशेने सुमारे पंचवीस यार्ड खाली सरकावलं. विलीसने लिलीचा बॉल खेळून काढला, पण लॉसनच्या पुढच्याच ओव्हरमध्ये त्याच पोझीशनमध्ये असलेल्या ग्रॅहॅम वूडने विलीसचा कॅच घेतला! दिवसभराचा खेळ संपल्यावर हॉटेलवर परतल्यानंतर किम मॅनेजर पीटर फिलपॉटला आनंदाने म्हणाला,

"I'm hardly a captain at all! But Hughes, Marsh and Lillee is a bloody good captain!"

लॉर्ड्सच्या टेस्टमध्ये दोन्ही इनिंग्जमध्ये एकही रन न काढू शकलेल्या इयन बोथमने इंग्लंडच्या कॅप्टनपदाचा राजीनामा दिला. त्याच्या जागी कॅप्टन म्हणून नेमणूक झाली ती 'मास्टर टॅ़क्टीशियन' माईक ब्रिअर्लीची! ऑस्ट्रेलियाने पहिली टेस्ट जरी जिंकली असली आणि लॉर्ड्सला इंग्लंडला पावसाने वाचवलं असलं तरी कॅप्टन म्हणून किमला मदतीची आवश्यकता असल्याचं पीटर फिलपॉटच्या ध्यानात आलं होतं. हेडींग्लीच्या तिसर्‍या टेस्टच्या आधी त्याने किमला मदत करण्याची मार्शला सूचना केली,

"Rodney, we've got to try to help him!" फिलपॉट म्हणाला.
"He's got the job! He's a big boy. Let him stew in it!" मार्शने फटकारलं!

फिलपॉट म्हणतो,
"It wasn't pleasant relationship between Kim and the other two. They thought he was a soft boy. They were battle hardened men and didn't have much respect for him. They respected his batting abilities, but not his captaincy and him as a human being. They never treated him as a man and they didn't hide that! In fact, they allowed themselves to do just the opposite. They threw the boy to the wolves! Threw him to the wolves and did not throw out a line to help him! Captaincy was the main volcano of contention. Dennis thought Rodney should be in charge, so did Rodney himself! Very much similar to 1957-58 tour of South Africa when Neil Harvey and Richie Benaud were left flabbergasted when young Ian Craig was appointed captain. They both gave him total support, that didn't happen with Kim in 81!"

हेडींग्लीच्या तिसर्‍या टेस्टच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये इंग्लंडची अवस्था ४१ / ४ अशी झाली असताना बॉयकॉटच्या जोडीला पीटर विली बॅटींगला आला. विलीची स्लीप आणि गलीच्या मधून शॉट मारण्याची सवय लिली आणि मार्शच्या चांगल्याच परिचयाची होती. विली बॅटींगला येताच लिलीने किमला तिसरी स्लीप आणि गली याच्या मध्ये 'फ्लाय स्लीप' लावण्याची मागणी केली. किमने नकार दिला!
विलीने नेमक्या त्याच गॅपमधून दोन बाऊंड्री मारल्यावर लिलीने घुश्श्यातच किमला विचारलं,

"Can I have one now?"
"You may not!"
"Sheesh, There it goes again!"

पुन्हा दोनदा विलीने त्याच गॅपमध्ये बाऊंड्री मारल्यावर लिलीचा पारा शीगेला पोहोचला. मार्शला त्याची अचूक कल्पना आली होती. त्याने ह्यूजला गाठलं.

"We need a fucking fly slip there!" मार्श गरजला!

किमने यावेळी मार्शची सूचना मानली! मोजून दुसर्‍या बॉलला तिथेच जॉन डायसनने विलीचा कॅच घेतला! विकेट मिळाल्याबद्दल किमने लिलीचं अभिनंदन केलं तेव्हा लिलीने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही! 'मूर्ख माणसा, हे आधीच करायला हवं होतं!' असे भाव त्याच्या चेहर्‍यावर स्पष्टं दिसत होते!

इंग्लंडने मॅच जिंकण्यावर ५००-१ असा सट्टा लावण्यात आल्याचे आकडे मैदानावरच्या स्क्रीनवर झळकले! लिली आणि मार्श दोघांनी सहज म्हणून अनुक्रमे १० आणि ५ पौंडाची बेट इंग्लंडच्या बाजूने लावली!

एड्रीयन मॅक्ग्रेगर म्हणतो,
"That bloody bet! Had Greg been captain, they'd have never done it! If they would, it would be a big joke and Greg wouldn't be happy. He'd have thought it disloyal!"

बोथमने ड्राईव्ह,कट, पुल, हूकचा मनसोक्तं वापर करत लिली, आल्डरमन, लॉसन आणि रे ब्राईट यांची धुलाई करण्यास सुरवात केली! ग्रॅहॅम डीलीसह ११७ आणि क्रिस ओल्डसह ६७ रन्सची पार्टनरशीप करत त्याने ऑस्ट्रेलियासमोर मॅच जिंकण्यासाठी १३० रन्सचं टार्गेट ठेवलं! १४८ बॉलमध्ये २७ बाऊंड्री आणि १ सिक्स याच्या जोरावर बोथमने १४९ रन्स फटकावून काढल्या होत्या! बॉब विलीसने ४३ रन्समध्ये ८ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज १११ मध्ये गुंडाळली! इंग्लंडने १८ रन्सनी मॅच जिंकली!

बोथमच्या इनिंग्जबद्दल बोलताना डेनिस लिली म्हणाला,
"Bloody lucky innings! I expected to get him virtually every ball!"

किम नंतर म्हणाला,
"The magic of Both! What else can you do?"

एजबॅस्टनच्या चौथ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १५१ रन्सचं टार्गेट होतं. पहिल्या दोन विकेट लवकर गेलेल्या असताना विलीसला हूक मारण्याच्या नादात एम्बुरीने लाँगलेगला किमचा कॅच घेतला! बीबीसीवर कॉमेंट्री करताना माईक स्मिथ म्हणाला,

"Ah! Beautiful shot.. But straight down that man's throat!"

ऑस्ट्रेलिया १०५ / ५ अशा स्थितीत असताना २८ बॉलमध्ये १ रन देत बोथमने शेवटच्या ५ विकेट्स उडवल्या! इंग्लंडने २९ रन्सनी मॅच जिंकली!

रिची बेनॉ म्हणाला,
"Hughes there, looking like he's just been sandbagged!"

बॉब टेलर म्हणाला,
"He looked like a shell-shocked soldier... Not for the first time I found myself wondering how much respect he was given by the former Packer players!"

रॉडनी मार्शने ड्रेसिंगरुमच्या एकांतात दारुच्या बाटलीत स्वतःला बुडवून घेतलं. तो म्हणाला,

"I reflected on Australian batsmen! If Hughes had not played that stupid hook shot when the Poms had two men stationed out in the deep!Christ, a captain is supposed to lead by example!"

ह्यूजवर मार्शने केलेला बेजबाबदारपणाचा आरोप फारसा चुकीचा नसला तरी हेडींग्ली आणि एजबॅस्टनच्या दोन्ही टेस्टमध्ये स्वतः मार्शने काय वेगळं केलं होतं?

ओल्ड ट्रॅफर्डच्या पाचव्या टेस्टमध्येही बोथमने दोन तासात १०२ बॉलमध्ये ११८ रन्स झोडपून काढत ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी ५०६ रन्सचं टार्गेट दिलं! एका बाजूने बोथम बॉलर्सची धुलाई करत असताना क्रिस टावरेने ७८ रन्ससाठी सात तास आणि २८९ बॉल विकेटवर मुक्काम ठोकत ऑस्ट्रेलियाची दमछाक करुन टाकली! यालप (११४), बॉर्डर (१२३*), मार्श (४७) आणि किम ह्यूज (४३) यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४०२ पर्यंत मजल मारली पण इंग्लंडने अखेर १०३ रन्सनी मॅच जिंकली!

माईक व्हिटनीची ती पहिलीच टेस्ट होती. तो म्हणतो,
"Kim would make a field change and Rodney will shake his head for several seconds before letting out a bigh sigh. Thats heavy shit on the field! Its like, hang on, Rodney does not agree! Once field was set, he'd sometimes whistle and move the guy five meters back! Now that's completely usurping the captain's authority!"

इंग्लंडच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये किमने लिलीला विश्रांती देण्याच्या हेतूने व्हिटनीला बॉलिंगला आणण्याचा निर्णय घेतला. लिलीच्या चेहर्‍यावरचे रागीट भाव पाहून व्हिटनी अक्षरशः टरकला होता!

"I could imagine Dennis saying, 'Fuck that, I am not going off! I'll get a fucking wicket here. Gimme back the ball!' It was as if you can't tell me when to stop. I don't care who the fuck you are! I am DK!"

ओव्हलची सहावी टेस्ट ड्रॉ झाली पण या टेस्टमध्ये व्यवस्थित सेट झालेला असताना पुन्हा एकदा किम बोथमच्या बॉलवर हिट विकेट झाला! इंग्लंडने अ‍ॅशेस सिरीज ३-१ अशी जिंकली!

ऑस्ट्रेलियाची दौर्‍यावरची शेवटची मॅच होती ती ग्लॉस्टरशायरविरुद्ध. या मॅचनंतर सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू बारमध्ये दारु ढोसत असताना लिली आणि ह्यूज यांच्यातलं भांडण इतकं विकोपाला गेलं की दोघांनी एकमेकाचे कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली!

लॉसन म्हणतो,
"We all went for a drink. Kim and Dennis tore the clothes of each other in a public bar! It was bizzare. It was quite physical, yet no one hit anyone! They just tore each other's clothes, tore shirts off and Kim walked back two hundred yards to the hotel in his jocks! It was really Kim saying Dennis, 'I don't care what the fuck you do to me, I am going to do it back to you!' It was a maintain your ego, maintain your status, maintain your self esteem thing. They did a bit of wrestling but didn't throw any punches, didn't do anything nasty. It was really incredible!"

ऑस्ट्रेलियात परतल्यावर १९८१-८२ च्या मोसमात पाकिस्तान आणि वेस्ट इंडीजचे संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आले होते. किमच्या जागी कॅप्टन म्हणून ग्रेग चॅपलचं पुनरागमन झालं होतं. पर्थच्या पहिल्या टेस्टमध्ये आपल्या होम ग्राऊंडवर खेळताना दुसर्‍या इनिंग्जमध्ये इमरान, सर्फराज, सिकंदर बख्त, इक्बाल कासिम यांची धुलाई करत किमने १०६ रन्स फटकावल्या! परंतु ब्रिस्बेन आणि मेलबर्नच्या बाकीच्या दोन्ही टेस्टमध्ये मात्रं त्याच्या हाती फारसं काही लागलं नाही! पर्थच्या टेस्टमध्येच डेनिस लिली आणि जावेद मियांदाद यांची मैदानावर जुंपली होती!

पाकिस्तानविरुद्धच्या सिरीजनंतर सिडनीच्या मैदानावर वेस्ट इंडीजविरुद्धच्या वन डे मध्ये किमने ६२ रन्स फटकावत ब्रूस लेअर्डच्या जोडीने ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकून दिली! या मॅचचं वैशिष्ट्यं म्हणजे नेहमी चार फास्ट बॉलर्ससह खेळणार्‍या लॉईडने या मॅचमध्ये रॉबर्ट्स, होल्डींग, गार्नर, क्रॉफ्ट आणि मार्शल हे पाच फास्ट बॉलर्स खेळवले! वेस्ट इंडीजकडून पाच फास्ट बॉलर्स खेळण्याची ही एकमेव वेळ!
वेस्ट इंडीजविरुद्ध पहिली टेस्ट होती ती मेलबर्नच्या मैदानात!

बॉक्सींग डे टेस्ट!

मेलबर्नची ती विकेट म्हणजे बॅटींगच्या दृष्टीने निव्वळ अशक्यं कोटीतली होती! त्या विकेटवर बॉल विचित्रपणे बाऊंस होत होते किंवा जमिनीलगत शूट होत होते! ग्रेग चॅपलने या विकेटबद्द्ल संपूर्ण मोसमात अनेकदा आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती! अशा परिस्थितीत वेस्ट इंडीजसारख्या संघाविरुद्ध टॉस जिंकल्यावर बॅटींग करणं म्हणजे खरंतर आत्महत्या करण्यातला प्रकार होता! ग्रेगने नेमकं तेच करण्याचा निर्णय घेतला!

टेरी आल्डरमन म्हणतो,
It was a shocking wicket. If you get a bouncer halfway down the wicket, on a normal wicket you duck under it but on that MCG wicket you weren't sure whether it was going to fly over your head or cannon into you!"

वेस्ट इंडीजच्या संघात रॉबर्ट्स, होल्डींग, गार्नर, क्रॉफ्ट असे चार फास्ट बॉलर्स होते! त्यांचं वर्णन करताना किम म्हणतो,
"Holding was the Rolls-Royce, fast and sleek. Roberts was the closest I've seen to Lillee, bending missiles through the air! He never said a word, but you knew Andy didn't like batsmen! Big Joel's hands were scarier than Big Joel himself! He once told me, 'You know Kim, I never dropped a catch in my life!' and I said, 'Why would ya? You've got baseball mitts for hands!' Croft was toughest, unsmiling, unspeaking, unnerving, unflagging! Hit him with an axe and he'll still get up! All Lloyd had to do was wind him up, point in the correct direction and say, 'Skitch'em!'"

अशा बॉलिंग अ‍ॅटॅकविरुद्ध आणि मेलबर्नच्या विकेटवर बॅटींग करताना काय होणार हे वेगळं सांगायला ज्योतिषाची गरज नव्हती! किम बॅटींगला आला तेव्हा होल्डींग आणि रॉबर्ट्स यांनी ऑस्ट्रेलियाची अवस्था ८ / ३ अशी केली होती! लेअर्ड, वुड आणि पहिल्याच बॉलला आऊट झालेला ग्रेग चॅपल पॅव्हेलियनमध्ये परतले होते! किम आणि बॉर्डर यांनी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर २६ पर्यंत नेल्यावर होल्डींगच्या बॉलवर विकेटकिपर मरेने बॉर्डरचा कॅच घेतला!

बॉर्डर आऊट झाल्यावर डर्क वेल्हॅमसह किमने ३३ रन्स जोडल्या. अँडी रॉबर्ट्सचा एक बॉल त्याने आरामात हूक करत बाऊंड्री वसूल केली, पण पुढच्याच बंपरवर पुन्हा हूक मारण्याचा त्याचा प्रयत्न पार फसला! रॉबर्ट्सचा तो बंपर नेहमीपेक्षा बराच जास्तं वेगाने आला होता! किम म्हणतो,

"I got one bumper away from Roberts and tried to go after another one. It came couple of yards quicker and almost knowcked my head off! Roberts gave me a cold look that seemed to say, 'Don't get too clever!'"

वेल्हॅम आऊट झाल्यावर किमने मारलेला एक स्क्वेअरकट गलीत असलेल्या गार्नरच्या हाती जाण्यापासून अवघ्या काही इंचाने वाचला! वैतागलेल्या गार्नरने ग्राऊंडवर जोरात आपटलेल्या हाताने अख्खं ग्राऊंड हादरल्याचा किमला भास झाला! एव्हाना किमच्या एक गोष्टं पक्की ध्यानात आली होती ती म्हणजे या विकेटवर बचावात्मक पवित्रा घेऊन खेळण्यात काहीच अर्थ नव्हता! बाऊंस इतका विचित्रं होता की कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकत होतं! त्याच्यादृष्टीने एकच मार्ग उरला होता तो म्हणजे जास्तीत जास्तं शॉटस मारुन बॉलर्सचं लक्षं विचलित करणे!

होल्डींग, गार्नर, रॉबर्टस, क्रॉफ्ट यांच्यावर त्याने बिनदिक्कतपणे प्रतिहल्ला चढवला!

हूक, पुल, कट आणि ड्राईव्हजच्या शॉट्सची बरसात सुरु झाली! रॉबर्ट्सला त्याने एकाच ओव्हरमध्ये फ्लिक आणि नंतर स्ट्रेट ड्राईव्ह्च्या बाऊंड्री मारल्या. गार्नरसारख्या बॉलरला क्रीजमधून पुढे सरसावत त्याने कव्हरड्राईव्हची बाऊंड्री मारल्यावर नॉनस्ट्रायकर असलेला रॉडनी मार्शशी आ SS वासून पाहत राहिला! होल्डींग आणि क्रॉफ्टने किंचीतही शॉर्टपीच बॉल टाकला की तो हूक-पुल तरी करत होता किंवा कट मारत होता! रॉडनी मार्शसह ५६ रन्सची पार्टनरशीप केल्यावर ब्रूस यार्डलीसह त्याने ३४ रन्स जोडल्या!

दरवेळेस शॉट मारून झाल्यावर तो स्वत:ला बजावत होता,
"Concentrate!"

यार्डली परतल्यावर होल्डींगने लिली आणि लॉसनला झटपट गुंडाळलं. शेवटचा बॅट्समन टेरी आल्डरमन बॅटींगला आला तेव्हा किम ७१ वर होता. आल्डरमन टिपीकल लास्टमन होता. आपली पहिली रन काढण्यासाठी त्याने नऊ फर्स्टक्लास इनिंग्ज खर्ची घातल्या होत्या!

आल्डरमन म्हणतो,
"When I went out, Kim was on 70 odd. I told him, I might not be able to hang around too long with the way the wicket is and the way they are bowling, so you better get after them!"

किमने पुन्हा गार्नरला पुढे सरसावत पुलची बाऊंड्री तडकावली! पाठोपाठ ऑफस्टंपच्या बाहेर आलेल्या शॉर्टपीच बॉलवर कट मारण्यात त्याने अजिबात कसूर केली नाही! आल्डरमनही ह्यूजला खमकेपणे साथ देत गार्नरचा बंपर त्याच्या हेल्मेटवर आणि कोपरावर आदळल्यावरही ठामपणे क्रीजवर उभा होता! किमलाही अनेकदा बॉलचा प्रसाद मिळाला होता, पण त्याचा आक्रमकपणा यत्किंचितही कमी झाला नाही!

गार्नरलाच खणखणीत स्क्वेअरकट मारत किम ह्यूजने शतक पूर्ण केलं!
२०० बॉलमध्ये ११ बाऊंड्री तडकावत त्याने १०० रन्स फटकावल्या!

कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला रिची बेनॉ म्हणाला,
"You would see many hundreds in test cricket, but not a gutsier than this one!"

किमचं शतक पूर्ण झाल्यावर पुढच्याच ओव्हरमध्ये क्रॉफ्टच्या बॉलवर आल्डरमन आऊट झाला! ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज १९८ मध्ये आटपली! किमच्या १०० च्या खालोखाल सगळ्यात जास्तं रन्स होत्या त्या मार्शच्या २१!

ड्रेसिंग रुममध्ये परत येत असताना कॉलिन क्रॉफ्ट ताडताड पावलं टाकत आपल्या दिशेने येत असल्याचं किमच्या दृष्टीस पडलं! पहिला विचार त्याच्या मनात आला तो म्हणजे भितीचा,
"He's been trying to get me all day. Maybe now he's going to thump me!"

पण कधी नाही तो क्रॉफ्ट बोलला,
"Well played man! Well played!"

कॉलिन क्रॉफ्टसारख्या प्रतिस्पर्ध्यालाही किमच्या इनिंग्जचं मनापासून कौतुक करावंस वाटलं यातच सर्व काही आलं!

अ‍ॅंडी रॉबर्ट्स म्हणाला,
"Kim batted very well and played a lot of shots, unlike other batsmen. He played all of them - he hooked, he cut, he pulled and never gave up! He took up the challenge and it paid off for him! It was a great innings! You don't find a batsman playing that sort of innings on more than one occassion. That was just his day! He could have done anything!"

किमच्या या अफलातून इनिंग्जमुळे पेटून उठलेल्या लिली-आल्डरमन यांनी दिवसाअखेरीस वेस्ट इंडीजची अवस्था १० / ४ अशी केली! लिलीने रिचर्ड्सला दिवसाच्या शेवटच्या बॉलवर बोल्ड केलं! वेस्ट इंडीजने पहिल्या इनिंग्जमध्ये ३ रन्सचा लीड घेतला असला तरी लिली-आल्डरमन-यार्डली यांच्यापुढे दुसर्‍या इनिंग्जमध्ये त्यांची अजिबात मात्रा चालली नाही! ऑस्ट्रेलियाने ५८ रन्सनी मॅच जिंकली!
अ‍ॅडलेडच्या तिसर्‍या टेस्टमध्येही किमने ८४ रन्स फटकावल्या, पण यावेळी मात्रं तो ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळू शकला नाही. चौथ्या इनिंग्जमध्ये २३६ रन्सचं टार्गेट सहज पार करत वेस्ट इंडीजने मॅच जिंकली! वेस्ट इंडीजनंतरच्या न्यूझीलंडच्या दौर्‍यात मात्रं किम साफ अपयशी ठरला! तीन टेस्टमध्ये तीन इनिंग्जमध्ये त्याने २९ रन्स काढल्या!

१९८२ मध्ये डेनिस लिलीचं My life in Cricket आणि रॉडनी मार्शचं The Gloves of Irony ही दोन्ही पुस्तकं प्रकाशित झाली! दोघांनीही किमच्या कॅप्टनसीवर सडकून टीका केली होती!

The Gloves of Irony मध्ये मार्शने किमबद्द्ल लिहीलं होतं,
"He was thrown in at the deep end - and that was well over his depth!"
"The man - or should I say young man - wasn't fully prepared."

१९८२ मध्येच ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौर्‍यावर जाणार होता. ग्रेग चॅपल या दौर्‍यासाठी उपलब्ध नसल्याने कॅप्टन म्हणून कोणाची निवड करावी हा ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्स समोरचा प्रश्न होता. त्यांच्यासमोर असलेले दोन पर्याय म्हणजे ह्यूज आणि रॉडनी मार्श! ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या १४ अधिकार्‍यांमध्ये चक्कं मतदान झालं आणि ८ - ६ अशा निसटत्या फरकाने किमची कॅप्टन म्हणून नेमणूक झाली! पूर्वीप्रमाणेच मार्शने पुन्हा एकदा व्हाईस कॅप्टन होण्यास नकार दिला! लिलीने तर चॅपलप्रमाणेच या दौर्‍यातूनच माघार घेतली!

दौर्‍यावर जाण्यापूर्वी प्लेबॉय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत मार्श म्हणाला,
Kim is a bloody good company, but he's always liable to do silly things, whether he has a bat, golf club or cards in his hand.. That's not the sort of thing you need if you're a captain. Kim suffers a lot by comparison with the Chappells, Inverarity and Lock.

I don't agree with some of decisions he makes and I feel it's my duty to tell him. He listens, but doesn't overcome the real problem. You tell him something, but a week later he's doing same things again. I don't think he resents the advice. In many ways he's very naive person, and like most of us he works on adrenalin. When his adrenalin is pumping, he makes decision that aren't calculated. I'm very proud to be playing for Australia and I will play under anyone, but I honestly would prefer to play under several other players who I think would do a better job than Kim!

अब्दुल कादीरची लेगस्पिन बॉलिंग आणि मुख्यं म्हणजे त्याला साथ देणारे खिजर हयात, शकूर राणा असे अंपायर्स असल्यावर पाकिस्तानने ही सिरीज ३-० अशी जिंकावी यात काहीच आश्चर्य नव्हतं! या दौर्‍यातही किम आणि मार्श यांच्यातील वाद अनेकदा टोकाला गेला होता. ऑस्ट्रेलियात परतल्यावर प्लेबॉय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत कधी नाही तो किम वैतागून म्हणाला,

"If I've got team mates like that, I wonder what would I do for enemies! I am not a Greg or Ian Chappell, I am Kim Hughes!"

महिन्याभरातच क्रिकेटर मासिकात ग्रेग चॅपलची मुलाखत छापून आली! ग्रेग म्हणाला,
"I am a better captain now than five years ago! I am better captain now than twelve months ago. I think, last summer as captain I did a good job.. In a head to head contest between myself and Kim, I am a better captain!"

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांची चॅपलची कॅप्टन म्हणून नेमणूक करण्याची इच्छा नव्हती! याला कारणीभूत होता तो न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये ट्रेव्हर चॅपलने ग्रेगच्या सल्ल्यावरुन टाकलेला अंडरआर्म बॉल! परंतु इयन चॅपलने पडद्यामागून बर्‍याच खटपटी केल्यावर १९८२-८३ चा अ‍ॅशेस सिरीजपूर्वी आठ दिवस पुन्हा ग्रेग चॅपलचीच कॅप्टन म्हणून नेमणूक करण्यात आली!

किम काहीसा निराश झाला असला तरी त्याला हे फारसं अनपेक्षीत नव्हतं! लिली आणि मार्श यांना आगामी दौर्‍यावर कशा पद्धतीने हाताळावं याबद्द्ल योग्यं सल्ला देऊ शकणारी एकच व्यक्ती त्याच्या डोळ्यासमोर होती ती म्हणजे ब्रॅडमन! ब्रॅडमनने किमचं अगत्याने स्वागत केलं आणि कीथ मिलरसारख्या हरहुन्नरी खेळाडूकडून योग्य ती कामगिरी करुन घेण्याबद्दलचा आपला अनुभव त्याला सांगितला! अर्थात त्यावेळी ब्रॅडमन कॅप्टन होता आणि त्याच्या नावाला असलेलं वजन ह्यूजच्या नावाला नव्हतं हा भाग वेगळा!

अ‍ॅशेस सिरीजच्या पूर्वसंध्येला डेनिस लिलीने नेटमध्ये किमवर पुन्हा आपल्या बंपर्सचा हल्ला चढवला! लिलीचा एक बंपर किमच्या कोपरावर आदळल्यावर त्याला एक्स रे काढावा लागला!

लॉसन म्हणतो,
Dennis nearly broke Kim's arm! Just ran in and bowled lightning quick. Kim got hit on forearm and had to go for an X-ray. Not exactly the moral booster needed ahead of an Ashes summer!"

अ‍ॅशेस सिरीजमधल्या पर्थच्या पहिल्या टेस्टमध्ये किमने ६२ रन्स फटकावल्या, पण ही मॅच ड्रॉ झाली. ब्रिस्बेनच्या दुसर्‍या टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये तो खातंही न खोलता परतला, पण दुसर्‍या इनिंग्जमध्ये डेव्हीड हूक्ससह ११३ रन्सची पार्टनरशीप करत त्याने ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. अ‍ॅडलेडच्या तिसर्‍या टेस्टमध्ये त्याने फटकेबाज ८८ रन्स काढल्या, परंतु बॉर्डरबरोबर झालेल्या गोंधळामुळे तो रनआऊट झाला! परंतु बॉर्डरला कोणताही दोष न देता तो परतला! मेलबर्नच्या चौथ्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये ६६ रन्स काढ्ल्यावर दुसर्‍या इनिंग्जमध्ये २९२ रन्सचा पाठलाग करताना त्याने ४८ रन्स फटकावत हूक्ससह १०० रन्सची पार्टनरशीप रचली. अ‍ॅलन बॉर्डर आणि जेफ थॉमसन यांनी शेवटच्या विकेटसाठी ७० रन्सची पार्टनरशीप केली, पण अखेर ३ रन्सनी इंग्लडने मॅच जिंकली!

सिडनीच्या पाचव्या टेस्टमध्ये दुसर्‍या इनिंग्जमध्ये तो बॅटींगला आला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा लीड होता फक्तं १९०! सिडनीच्या मैदानावर अगदी शेफील्ड शिल्डमध्येही त्याला पन्नाशी पार करता आली नव्हती. त्यातच सिडनीच्या स्पिनला पूर्णपणे अनुकूल विकेटवर हेमिंग्ज आणि मिलरला खेळणं जिकीरीचंच होतं! अ‍ॅलन बॉर्डरचा अपवाद वगळता त्याच्या जोडीला एकही बॅट्समन शिल्लक नव्हता! बॉर्डरबरोबर १४९ रन्सची पार्टनरशीप केल्यावर रॉडनी मार्शसह ८८ रन्सची पार्टनरशीप करुन त्याने टेस्ट आणि अ‍ॅशेस इंग्लंडच्या आवाक्याबाहेर नेऊन ठेवल्या! एडी हेमिंग्जच्या बॉलवर अखेर बोथमने त्याचा कॅच घेतला तेव्हा किमने १३७ रन्स फटकावल्या होत्या!

दुसर्‍या दिवशी सिड्नी मॉर्निंग हेराल्डच्या पहिल्या पानावर बिल ओ रेलीच्या रिपोर्टचं हेडींग होतं,
Kim Hughes, Australia's Mr. Reliable!

किमचा कडवा टीकाकार असलेल्या इयन चॅपलनेही किमच्या पाच टेस्ट्समधल्या ४६९ रन्सबद्द्ल त्याची पाठ थोपटली. वृत्तपत्रातल्या आपल्या कॉलममध्ये चॅपलने लिहीलं,
"After this series, not only should Hughes conscience be clear, but his slate clean in regard to the 1981 disaster!"

अ‍ॅशेस सिरीज संपताच ग्रेग चॅपलने ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनपदाचा राजीनामा दिला! तो ऑस्ट्रेलियाकडून खेळण्यास तयार होता, पण एक साधा खेळाडू म्हणून! ऑस्ट्रेलियाच्या वन डे कॅप्टनपदाची जबाबदारी साहजिकच किमच्या गळ्यात पडली! १९८२ च्या बेन्सन हेजेस वन डे स्पर्धेत दोन्ही फायनल्स जिंकून किमने वन डे कप्तानपदाच्या कारकिर्दीचीही विजयी सुरवात केली!

१९८३ च्या वर्ल्डकप स्पर्धेसाठीही ऑस्ट्रेलिया सोडण्यापूर्वी तीन दिवस ग्रेग चॅपलने मान आखडल्यामुळे वर्ल्डकपमधून माघार घेतली! किमने चॅपलची बरीच मनधरणी करण्याचा प्रयत्न केला, पण चॅपल बधला नाही! तो म्हणाला,

"I am 65 percent fit and that no where near good enough!"

वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये नवख्या झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला १३ रन्सनी हादरवलं! केपलर वेसल्स (७६) आणि रॉडनी मार्श (५०) यांना झिंबाब्वेच्या २३९ रन्सचं टार्गेट गाठण्यात अपयश आलं! किम डंकन फ्लेचरच्या बॉलवर खातंही न खोलता आऊट झाला होता! वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्‍या मॅचमध्येही ऑस्ट्रेलियाच्या पदरी पराभवच पडला परंतु या मॅचमध्ये किम आणि वेन डॅनियलमधली जुगलबंदी चांगलीच रंगली! डॅनियलचे पहिले दोन बंपर्स सोडून दिल्यावर पुढच्या दोन बंपर्सवर किमने हूकच्या दोन सिक्स मारल्या! डॅनियल रागाने धुमसत असताना किम मजेत म्हणाला,

"You've got to bowl better than that to stop me hitting you for six!"

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली ती ट्रेव्हर चॅपल (११०) आणि केन मॅकले (६/३९) या दोघांच्याही करीअरमधल्या एकमेव पराक्रमाच्या जोरावर! दुसर्‍या राऊंडच्या पहिल्या मॅचमध्ये झिंबाब्वेला सहजपणे हरवल्यावर वेस्ट इंडीजने पुन्हा ऑस्ट्रेलियावर मात केली! सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारताविरुद्धची मॅच जिंकणं आता ऑस्ट्रेलियासाठी अत्यावश्य़ंक होतं!

वर्ल्डकपच्या आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये डेनिस लिलीची कामगिरी यथातथाच होती. भारताविरुद्धच्या या मॅचमधून त्याला ड्रॉप करण्याचा किमने निर्णय घेतला. मॅचच्या दिवशी सकाळी स्वतः किम मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे खेळण्यास असमर्थ ठरला! रॉडनी मार्शने व्हाईस कॅप्टन पदाची जबाबदारी नाकारलेली असल्याने किमच्या जागी कॅप्टन म्हणून डेव्हीड हूक्सवर जबाबदारी आली!

भारताने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर २४७ पर्यंत मजल मारली. ड्रेसिंगरुममधून मॅच पाहणार्‍या किमने हूक्सच्या फिल्डींग प्लेसमेंटमध्ये सुधारणेच्या दृष्टीने १२ वा खेळाडू असलेल्या केपलर वेसल्सबरोबर निरोप पाठवला.

रॉडनी मार्श खेकसला,
"Tell fucking Kim Hughes that if he wants to captain the fucking side, fucking play!"

रॉजर बिन्नी आणि मदनलाल दोघांनी ४-४ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला १२९ मध्ये गुंडाळलं!
ऑस्ट्रेलियाचा वर्ल्डकप ग्रूपमध्येच संपुष्टात आला!

मार्श म्हणाला,
"A few guys were talking behind his back about what they'd like to do to him if they caught him in an alley on a dark night!"

रॉडनी हॉगने मात्रं मार्शचा हा दावा खोडून काढला. हॉग म्हणतो,
"I wouldn't even go down that path of talking like that. Australian cricket was crying out for a coach. It wasn't Kim's fault!"

भारताविरुद्धच्या मॅचमध्ये लिलीला ड्रॉप करण्याच्या किमच्या निर्णयावरही मार्शने टीका केली होती. मात्रं लिलीची एकूण कामगिरी आणि थकलेल्या शरीराकडे मार्शने सोईस्कर काणाडोळा केला होता. कितीही झालं तरी लिली त्याचा खास मित्रं होता! आपल्या मित्राची पाठराखण करणं हे त्याला आपलं परमकर्तव्यं वाटत असावं!

जेफ लॉसन म्हणतो,
"Dropping Dennis was a proof of Kim's strength! Everyone agreed Dennis shouldn't be playing. He was the greatest bowler I've ever seen. Pain was no issue and he wanted to get out there and play, but he was physically not capable of doing so! What I heard from others was like 'Oh God! Dennis is dropped! He's not going to be happy!', he wasn't but it was the right thing. We wanted to make the final!"

ऑस्ट्रेलियात परतल्यावर मार्शचं Inside Edge हे पुस्तक बाजारात आलं! किमच्या नेतृत्वावर आणि वर्ल्डकपमध्ये डेनिस लिलीला ड्रॉप करण्यावरुन मार्शने किमवर खरपूस टीका केली होती! जेफ थॉमसन एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना म्हणाला,

"The leadership wasn't terribly inspiring. Marsh must be disappointed not to be captain. I'd like to see him there! Put it that way!"

अ‍ॅडलेडमध्ये केन कनिंगहॅमच्या शोमध्ये डेव्हीड हूक्स म्हणाला,
"Maybe, Kim's got to be an apprentice to somebody everybody respects!"

मार्श आणि थॉमसनच्या टीकेला किमने काही प्रत्युत्तर दिलं नव्हतं, पण हूक्सच्या वक्तव्याचा समाचार घेत त्याने सुनावलं,

"It's nice to know the Australian captain has got the support of his vice-captain!"

किमने ऑस्ट्रेलियन कॅप्टनपद सोडावं म्हणून ग्रेग चॅपलने त्याचं मन वळवण्याचा प्रयत्नं करण्याचं ठरवलं. किमने आपल्या बॅटींगवर पूर्णपणे लक्षं द्यावं असं चॅपलचं प्रामाणिक मत होतं. ब्रेकफास्टच्या वेळेला किमची भेट घेऊन चॅपलने त्याच्याशी तपशीलवारपणे चर्चा केली. टीममधील दुफळीकडे त्याने किमचं लक्षं वेधलंं. बहुतेकांची कॅप्टन म्हणून मार्शला पसंती होती. चॅपलने मार्शच्या जोडीला अ‍ॅलन बोर्डरचंही नाव बोलून दाखवलं! किमने कॅप्टनपदाचा अट्टाहास धरला तर त्याच्या खेळावर त्याचा परिणाम होईल आणि अखेर त्याची परिणीती एक खेळाडू म्हणूनही त्याची निवड न होण्यात होईल असं चॅपलने त्याला स्पष्टपणे सांगितलं!

चॅपल म्हणतो,
"Christ! I wasn't a counsellor! I was a bloody cricketer. I cared for individuals. I could give them only advice from my heart and experiences in life. What I told Kim was he needed help! Get away from cricket for sometime, get professional help and resurrect himself and his career!"

किमने ग्रेग चॅपलचं बोलणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं, पण कोणतीही प्रतिक्रीया व्यक्तं केली नाही! किमचा जवळचा मित्रं असलेला डॅरील फोस्टर आणि सॅम गॅनन यांनीही चॅपलप्रमाणेच किमची भेट घेऊन त्याला हाच सल्ला दिला. फोस्टर म्हणतो,

"We virtually had him convinced ti stand down as captain!"

त्याच रात्री बॉब मेरीमान, फ्रँक पेरी आणि रॉब पेरी यांनी किमची गाठ घेऊन त्याच्याशी चर्चा केली. पेरी पिता-पुत्रांची किमशी अनेक वर्षांपासूनची मैत्री होती. त्यांच्याशी तपशीलवारपणे चर्चा केल्यावर किमने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांच्या नावे लिहीलेल्या पत्रात नमूद केलं,

"Do not consider me for captaincy this season!"

किमचं पत्रं घेऊन मेरीमान निघून गेला. सकाळी सहाच्या सुमाराला किमचा त्याला फोन आला. किम म्हणाला,

"I will be captain of Australia! My family says I will be captain of Australia. My family includes my friends over here. I will continue as captain of Australia!"

किमच्या या बदललेल्या निर्णयाने मेरीमानलाही आश्चर्य वाटलं!

१९८३-८४ च्या मोसमात पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर येणार होता. या सिरीजसाठी कॅप्टनची नेमणूक करण्यासाठी पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांसमोर किम आणि मार्श हे दोनच पर्याय होते. पुन्हा एकदा मतदान झालं आणि पूर्वीप्रमाणेच ८ - ६ अशा निसटत्या बहुमताने किमची कॅप्टन म्हणून निवड झाली! त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होण्याची रॉडनी मार्शची आशा संपुष्टात आली!

किमची कॅप्टन म्हणून नेमणूक झाल्यावर ग्रेग चॅपलने अ‍ॅलन बॉर्डरचं मन वळवण्यास सुरवात केली! किमला कॅप्टनपदाची जबाबदारी फारकाळ झेपणार नाही याची ग्रेगला खात्री होती! कॅप्टनपदाची जबाबदारी स्वीकारण्यास असलेला बॉर्डरचा नकार सर्वश्रृतच होता! क्वीन्सलँडचा कॅप्टन म्हणूनही आपली नेमणूक करु नये असं त्याने क्वीन्सलँड बोर्डाच्या अधिकार्‍यांना कळवून टाकलं होतं! परंतु ग्रेग चॅपलपुढे त्याची मात्रा चालणं कठीणच होतं! ग्रेगने हळूहळू बॉर्डरचं मन वळवण्यात यश मिळवलं! क्वीन्सलँडच्या कॅप्टनपदाचा त्याने राजिनामा दिल्यावर त्याच्याजागी कॅप्टन म्हणून बॉर्डरची नेमणूक झाली होती!

पाकिस्तानविरुद्धची सिरीज ही चॅपल, लिली आणि मार्श तिघांचाही समावेश असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व करण्याची किमची ही पहिलीच सिरीज होती! पर्थच्या पहिल्याच टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये ऑस्ट्रेलियान ४३६ रन्स केल्यावर कार्ल रॅकमनच्या ११ विकेट्समुळे ऑस्ट्रेलियाने इनिंग्ज आणि ९ रन्सनी मॅच जिंकली! ब्रिस्बेनच्या दुसर्‍या टेस्टमध्ये पाकिस्तानला वाचवलं ते पावसाने! अ‍ॅडलेड्च्या तिसर्‍या टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये पाकिस्तानने १५९ रन्सचा लीड घेतल्यावर किमने दुसर्‍या इनिंग्जमध्ये मोक्याच्या क्षणी १०६ रन्स फटकावत मॅच ड्रॉ होईल याची काळजी घेतली! कादीरच्या लेगस्पिनचा समर्थपणे मुकाबला करत त्याने तब्बल साडेचार तास खेळून काढले होते! मेलबर्नच्या चौथ्या टेस्टमध्येही किमने ९४ रन्स फटकावल्या, पण अझिम हफीजच्या बॉलवर एलबीडब्ल्यू झाल्यामुळे त्याला शतकाने हुलकावणी दिली!

सिडनीची पाचवी टेस्ट ही मार्श, लिली आणि चॅपल यांची अखेरची टेस्ट असणार होती! या शेवटच्या टेस्टच्या आधीही नेटमध्ये बॉलिंग करताना लिलीने किमवर बंपर्सचा मारा करण्याचं सत्रं सुरुच ठेवलं होतं!

मरे बेनेट म्हणतो,
"Every ball was short! I thought there's something missing here! Kim was fantastic! He hooked them off his nose or ducked. Then he picked up the ball, threw it back to Dennis and didn't say a word!"

या टेस्टमध्ये अनेक विक्रम चॅपल, मार्श आणि लिली यांच्या नजरेसमोर होते! पहिल्या इनिंग्जमध्ये चॅपलने लॉसनच्या बॉलवर मुदस्सर नजरचा कॅच घेत कॉलिन कौड्रीच्या १२० कॅचेसची बरोबरी केली तेव्हा त्याला अत्यानंदाने सर्वात आधी मिठी मारणारा किमच होता! ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंग्जमध्ये ग्रेग चॅपलने ओव्हरथ्रोवर तिसरी रन काढत डॉन ब्रॅडमनचा ६९९६ रन्सचा विक्रम मोडला तेव्हा त्याच्याबरोबर खेळत असलेला दुसरा बॅट्समन होता किम ह्यूज! तिसरी रन घेताना किमनेच इतक्या आनंदाने चित्कार काढत उडी मारली की ब्रॅडमनचा विक्रम नक्की कोणी मोडला आहे असा पाहणार्‍याला प्रश्नं पडावा! चॅपलने सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी किमच्या आनंदाला सीमा नव्हती! तो अव्याहतपणे टाळ्या वाजवत होता!

शेवटच्या दिवशी सकाळी फिल्डींगला येताना किमने आपल्या सहकार्‍यांना दुतर्फा उभं करुन चॅपल, लिली आणि मार्श यांना गार्ड ऑफ ऑनर दिला! शेवटच्या टेस्टमध्ये पाकिस्तानवर दहा विकेट्सनी विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने सिरीज २-० अशी जिंकली!

माईक व्हिटनीने चॅपल, लिली आणि मार्श यांचं वर्णन "Fucking Royalty!" अशा शब्दांत केलं आहे! चॅपल आणि लिलीचा रिटायर होण्याचा निर्णय आधीच झाला होता, पण ग्रॅहॅम वूडच्या मते मार्शची कॅप्टन म्हणून नेमणूक झाली असती तर तो निश्चितच वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर गेला असता! इतकंच नव्हे तर वेस्ट इंडीजविरुद्धची ऑस्ट्रेलियातल्या सिरीजमध्ये तो खेळण्याचीही शक्यता नाकारता येत नव्हती, परंतु किमची कॅप्टन म्हणून नेमणूक झाल्यावर मार्शने निवृत्ती स्वीकारणं पसंत केलं!

ग्रेग चॅपल, लिली आणि मार्श यांच्या निवृत्तीनंतर इयन चॅपलने किमचं खच्चीकरण करण्याचा आपला एककलमी कार्यक्रम राबवण्यास सुरवात केली! रॉडनी मार्शच्या सन्मानार्थ देण्यात आलेल्या एका मेजवानीत इयन चॅपल म्हणाला,

"Hughes got the goldmine and Marsh got the shaft!"

इतकंच करुन चॅपल थांबल नाही तर वन डे सिरीजमध्ये जवळपास प्रत्येक मॅचच्या टॉसच्या वेळी इंटरव्ह्यू घेताना किमला सतत टीकात्मक आणि प्रसंगी अपमानास्पद प्रश्नं विचारण्याचा त्याने सपाटा लावला! किमचा हूक शॉट, फास्ट बॉलर्सना पुढे सरसावत फटकावण्याच्या त्याच्या पवित्र्यापासून ते प्रसंगी त्याच्या वैयक्तीक आणि कौटुंबिक गोष्टींबद्दलही प्रश्नं विचारण्यास इयन चॅपलने कमी केलं नाही! चॅपलच्या या कायमच्या उलटतपासणीने किम इतका वैतागला होता की ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन इयन चॅपलने आपला इंटरव्ह्यू घेऊ नये अशी त्याने बोर्डाच्या अधिकार्‍यांना विनंती केली! परंतु ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचा चॅनल नाईनशी करार असल्यामुळे क्रिकेटच्या प्रसारणाच्या दृष्टीने हे बंधनकारक असल्याचं किमला सांगण्यात आलं! इयन चॅपल याच परिस्थितीचा फायदा घेत होता!

पाकिस्तानविरुद्धच्या सिरीजनंतर ऑस्ट्रेलियन संघ वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर जाणार होता. आतापर्यंतच्या ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या पद्धतीप्रमाणे दौर्‍यावर जाणार्‍या खेळाडूंना सामान्यतः अडीच महिन्याच्या दौर्‍यासाठी १५००० डॉलर्स देण्यात येत असत! परंतु वेस्ट इंडीजच्या दौर्‍यावर जाणार्‍या खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एक नवीन काँट्रॅक्ट तयार केलं होतं. या काँट्रॅ़क्टप्रमाणे वृत्तपत्रांना मुलाखती देणं, बायकोला टूरवर न नेणं अशी अनेक बंधनं खेळाडूंवर घालण्यात आली होती! परंतु सर्वात महत्वाचं आणि आक्षेपार्ह असलेलं २४ वं कलम म्हणजे वेस्ट इंडीजचा दौरा १९८४ च्या मे मध्येच संपणार असला तरी या काँट्रॅक्टची मुदत आणखीन वर्षभर - १९८५ च्या मे महिन्यापर्यंत होती! या वर्षाभराच्या कालावधीत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मान्यता दिलेल्या स्पर्धांमध्येच भाग घेण्याची खेळाडूंना परवानगी मिळणार होती, पण त्याबद्दल त्यांना जास्तीचा छदामही मिळणार नव्हता!

किमने ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या या काँट्रॅ़क्टला ठाम विरोध केला!

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या या काँट्रॅक्टवर आपला एकही खेळाडू सही करणार नाही असं त्याने बोर्डाच्या अधिकार्‍यांना ठणकावलं! ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या अधिकार्‍यांना किमचा हा पवित्रा अनपेक्षीत असला तरी एकूण एक खेळाडूंचा त्याला पूर्ण पाठींबा होता. उघडपणे बंडखोरीची किंवा स्ट्राईक करण्याची जरी त्याने बोर्डाला धमकी दिली नाही तरी खेळाडूंना योग्य तो आर्थिक मोबदला मिळण्याबद्दल तो आग्रही होता!

किमच्या ठाम पवित्र्यापुढे अखेर ऑस्ट्रेलियन बोर्डाला माघार घ्यावी लागली. पूर्वीप्रमाणेच १९८५ च्या मे महिन्यापर्यंत काँट्रॅक्ट करण्याच्या मोबदल्यात खेळाडूंना आर्थिक सुरक्षेची हमी देण्यास बोर्डाने मान्यता दिली. खेळाडूंचा अनुभव आणि ज्येष्ठता याप्रमाणे त्यांना ४०००, ८००० आणि १२००० डॉलर्स देण्याची बोर्डाने तयारी दर्शवली. खेळाडू जखमी झाल्यामुळे खेळण्यास असमर्थ ठरल्यास किंवा त्याची संघात निवड न झाल्यासही ही रक्कम त्यांना मिळणार होती! इतकंच नव्हे तर खेळाडूंसाठी वार्षिक काँट्रॅक्ट्सची पद्धत सुरु करण्यासही बोर्डाने मान्यता दिली! आज ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये प्रचलित असलेल्या सेंट्रल काँट्रॅक्ट पद्धतीचा प्रणेता किम ह्यूज!

किमच्या ऑस्ट्रेलियन संघाला वेस्ट इंडीजचा दौरा खडतर जाणार याची जवळपास प्रत्येकाला कल्पना होती. त्यातच दौर्‍यावर जाण्यापूर्वीच पायाला झालेल्या दुखापतीमुळे ग्रॅहॅम यालपने माघार घेतली! दौर्‍याच्या दरम्यानही ऑस्ट्रेलियन संघाचा दुखापतींनी पिच्छा पुरवला होता. वूड, वेसल्स, स्टीव्ह स्मिथ, रॉडनी हॉग, कार्ल रॅकमन हे वेळोवेळी झालेल्या दुखापतींमुळे सर्व मॅचेसमध्ये खेळू शकले नाहीत!

बॉबी सिंप्सन म्हणतो,
"The saddest and hardest lot for any captain is taking over the remnants of a once-great team. I wouldn't be in Hughes' shoes for quids."

गयानाच्या पहिल्या टेस्टमध्ये टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था १८२ / ९ अशी चाली होती, पण टॉम होगन आणि रॉडनी हॉग यांनी अनपेक्षीतपणे ९७ रन्सची पार्टनरशीप फटकावल्याने ऑस्ट्रेलियाने २७९ पर्यंत मजल मारली! होगान आणि लॉसननी वेस्ट इंडीजला २३० मध्ये गुंडाळल्यावर ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या इनिंग्जमध्ये २३ रन्स फटकावल्या, पण ग्रिनीज आणि हेन्स दोघांनी २५० रन्सची नॉटआऊट पार्टनरशीप केल्याने मॅच ड्रॉ झाली!

पहिल्या टेस्टनंतर त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाची मॅच होती. त्रिनिदादने पहिल्या इनिंग्जमध्ये ३३६ रन्स केल्यावर ऑस्ट्रेलियाने ३७० पर्यंत मजल मारली. त्रिनिदादचा कॅप्टन रँगी नॅनन याने शेवटच्या दिवशी दुसरी इनिंग्ज डिक्लेअर न करता शेवटची विकेट पडेपर्यंत बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. त्रिनिदादची दुसरी इनिंग्ज संपली तेव्हा ऑस्ट्रेलियाला मॅच जिंकण्यासाठी २४ ओव्हर्समध्ये १८९ रन्सचं टार्गेट होतं! नॅनन किमला म्हणाला,

"Go for it man! Let the crowd have some entertainment!"

किमच्या मते हे नॅननचं हे आव्हान खिलाडूवृत्तीला धरून नव्हतं! त्याने इनिंग्ज डिक्लेअर केली असती तर ऑस्टेर्लियाने मॅच जिंकण्याच निश्चित प्रयत्न केला असता. पण ही निव्वळ कुचेष्टा होती. अर्थात किम त्यावेळी काहीच बोलला नाही. त्याने निषेधाचा वेगळाच मार्ग अवलंबला!

ग्रेग मॅथ्यूजबरोबर स्वत: किम ओपनिंगला आला. त्रिनिदादच्या बॉलर्सनी टाकलेला प्रत्येक बॉल केवळ डिफेंड करण्याचं त्याने सत्रं आरंभलं! मॅथ्युजने मारलेल्या शॉटवर एक रन काढण्यासही त्याने नकार दिला! दह ओव्हर्समध्ये अगदी हाफ व्हॉलीही डिफेंड केल्यावर अकराव्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर त्याने सिक्स मारली! दरम्यान मॅथ्यूज आऊट झाल्यावर बॅटींगला आलेल्या वेन फिलीप्सनेही किमचाच कित्ता गिरवण्यास सुरवात केली! दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी अर्धा तास अंपायर्सनी दोन्ही कॅप्टन्ससमोर मॅच ड्रॉ म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला, पण किमने याला चक्कं नकार दिला! त्याने पूर्ण २४ ओव्हर्स खेळून काढल्या आणि शेवटच्या बॉलवर बाऊंड्री मारली! २४ ओव्हर्स बॅटींग करुन १० रन्स काढून किम नॉटआऊट राहिला!

किमच्या या बॅटींगमुळे वैतागलेल्या प्रेक्षकांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. मॅच संपल्यावर किम आणि फिलीप्स पोलिसांच्या संरक्षणात ड्रेसिंगरुममध्ये परतले! मॅचनंतर पत्रकार परिषदेत किमने सुनावलं,

"The welfare of Trinidadian Cricket is none of my bloody business!"

किमच्या या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियातही टीकेची झोड उठली! यात सर्वात पुढे होता अर्थातच इयन चॅपल! ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डालाही किमचा हा पवित्रा नापसंत होता! त्यांनी किमला २०० डॉलर्सचा दंड ठोठावला!

पोर्ट ऑफ स्पेनच्या दुसर्‍या टेस्टमध्ये वेस्ट इंडीजने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटींगला पाचारण केलं, पण पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ सुरु झाला तो टी-टाईम नंतर! ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंग्जमध्ये २५५ पर्यंत मजल मारली. तिसर्‍या दिवशी सकाळी वेस्ट इंडीजची बॅटींग सुरु असताना...

रॉडनी हॉग जीव खाऊन बॉलिंग करत होता. ग्रिनिज आणी हेन्स त्याला आरामात खेळून काढत होते. वैतागलेल्या हॉगने किमकडे स्लिप किंवा थर्डमॅनला फिल्डर ठेवण्याची मागणी केली!

"Give me one more fucking slip!"
"Nah.. I can't!"

रागाने धुमसत हॉगने पुढच्या ओव्हरमध्ये पुन्हा किमकडे तीच मागणी केली, पण किमचा नकार कायम होता! लागोपाठ तिसर्‍यांदा किमने नकार दिल्यावर हॉगच्या रागाचा कडेलोट झाला!

नेमका त्याचवेळी वेन फिलीप्सने हॉगच्या बॉलवर ग्रिनिजचा कॅच घेतला!
विकेट मिळाल्याबद्द्ल किम हॉगचं अभिनंदन करण्यासाठी येत असतानाच...

"You fucking idiot!" हॉग गरजला...
... आणि पाठोपाठ मूठ आवळून त्याने किमच्या दिशेने एक ठोसा लगावला!

किमच्या सुदैवाने तो वेळीच मागे झाल्यामुळे बचावला! रॉग इतका भडकला होता की त्याच्या कपाळावरची शीर तडकेल अशी बॉर्डरला भिती वाटली! ग्रेग रिचीने हॉगला अक्षरशः हाताला धरून बाजूला नेलं आणि शांत केलं!

दिवसाचा खेळ संपल्यावर मात्रं किम आणि हॉग गळ्यात गळा घालून फिरताना आढळले! ग्रिनीजची विकेट मिळाल्यामुळे हॉग उत्तेजित झाला होता आणि त्या आनंदाच्या भरात त्याने ठोसा मारल्याची किमने सारवासारव केली!

हॉग सारवासारव करताना म्हणाला,
"Sure, I nearly knocked his head off, but my eyes were spinning. I didn't know who it was! It is a case of photograph telling a lie! I was pretty annoyed because I didn't have a third man. I kept getting snicked through there and they kept getting runs. Then I got Greenidge out and was pretty fired up and he's come to congratulate me and I'm throwing a punch at the same time. So... It as a good photo. A very good photo!"

वेस्ट इंडीजने पहिल्या इनिंग्जमध्ये २१३ रन्सचा लीड घेतल्यावर ऑस्ट्रेलियाची अवस्था २३८ / ९ अशी झाली होती. अद्याप शेवटचे पावणेदोन तास बाकी होते आणि शेवटची विकेट उडवल्यावर वेस्ट इंडी़जला मॅच आरामात जिंकता आली असती, परंतु वेस्ट इंडीजला ही शेवटची विकेट घेता आली नाही! टेरी आल्डरमनने पावणेदोन बॉर्डरला साथ देत टेस्ट वाचवण्यात यश मिळवलं! पहिल्या इनिंग्जमध्ये ९८ वर नॉटआऊट राहिलेल्या बॉर्डरने दुसर्‍या इनिंग्जमध्ये मात्रं शतक पूर्ण केलं!

किम म्हणाला,
"I have seen some inspirational events, but this was the greatest!"

पहिल्या दोन्ही टेस्ट ड्रॉ झाल्या असल्या तरी बार्बाडोस, अँटीगा आणि जमेका इथल्या उरलेल्या तीन टेस्टमध्ये मात्र वेस्ट इंडी़जने ऑस्ट्रेलियाची पार वाताहात करुन टाकली. संपूर्ण सिरीजमध्ये वेस्ट इंडीजने दुसर्‍या इनिंग्जमध्ये एकही विकेट गमावली नाही! किमने दहा इनिंग्जमध्ये २१५ रन्स काढल्या! दरवेळी व्यवस्थित सेट झालेला असताना तो आऊट झाला होता!

किमचा ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर असतानाच, खरंतर त्याच्याही कितीतरी आधी - १९८३ च्या वर्ल्डकपपासूनच एक वेगळंच प्रकरण शिजत होतं...

दक्षिण आफ्रीकेच्या डॉ. अली बाकरने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची गाठ घेऊन दक्षिण आफ्रीकेचा दौरा करण्याबाबत त्यांची मनधरणी करण्यास सुरवात केली होती. १९६८-६९ च्या डॉलिव्हिएरा अफेअर मुळे वर्णद्वेषी दक्षिण आफ्रीकेवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास बंदी आलेली होती. कोणताही आंतरराष्ट्रीय संघ दक्षिण आफ्रीकेत येत नसल्याने अली बाकरने 'रेबल टूर्स' आयोजित करण्यावर भर दिला होता! ऑस्ट्रेलियन खेळाडूंना दोन वर्ष दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावर येण्यासाठी प्रत्येकी दोन लाख डॉलर्स देण्याची अली बाकरने तयारी दर्शवली होती! कॅप्टन किम, व्हाईसकॅप्टन बॉर्डर, मॅनेजर बॉब मेरीमान आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांना अजिबात कुणकूण लागू न देता तेरा ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी होकार दिला होता! ऑस्ट्रेलियन संघातील यालप, स्टीव्ह स्मिथ, वूड, फिलीप्स, वेल्हॅम, डायसन, हिल्डीच, आल्डरमन, रॅकमन, हॉग, होगन,बेनेट, रिक्सन अशा बहुसंख्य खेळाडूंचा यात समावेश होता!

दरम्यान निवृत्तीनंतरही किमवर टीका करण्याचं लिली आणि मार्शचं सत्रं सुरुच होतं! १९८४ मध्ये लिलीचं Over and Out आणि मार्शचं Gloves, Sweat & Tears ही पुस्तकं प्रकाशित झाली होती. दोघांनीही किमवर टीकेचा भडीमार केला होत!

Over and Out मध्ये लिलीने लिहीलं,
"I didn't like Hughes as captain! I don't think he was even close to being a good captain. A very mediocre leader of men. I thought him to be poor captain, and I was no orphan. I had very little respect for him. His lack of interest in what you would say was bordering on the astonishing. He would burst into print about how he should get the job. How stupid was that? I didn't really give a dead prawn what he thought about me."

Gloves, Sweat & Tears मध्ये मार्शने तर कॅप्टन म्हणून किम कसा चुकीचा होता हे सिद्ध करण्यासाठी आकडे घालून मुद्दे मांडले होते!

ऑस्ट्रेलियात परतल्यावर किम एवढंच म्हणाला,
"What I've gone through over the past five or six years is more than nearly any cricketer has gone through!"

ऑस्ट्रेलियाच्या वेस्ट इंडीज दौर्‍यानंतर लगेच वेस्ट इंडीजचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर येणार होता! वर्ल्ड सिरीज क्रिकेटला सुरवात झाल्यापासून वेस्ट इंडीजचा सात वर्षांतला पाचवा ऑस्ट्रेलियन दौरा होता! अर्थात यामागे केरी पॅकरचा मोठा हात होता! पॅकरच्या चॅनल नाईनला क्रिकेटसाठी प्रेक्षकवर्ग हवा होता आणि त्यासाठी आक्रमक वेस्ट इंडीज हे सर्वात मोठं आकर्षण होतं! १९७९ मध्ये वर्ल्ड सिरीज क्रिकेट आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या दरम्यान झालेल्या कराराच्यावेळी पॅकरने वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सिरीजसाठी होकार देण्यास बोर्डाला भाग पाडलं होतं!

किमला वेस्ट इंडीजवर मात करण्याची पूर्ण खात्री वाटत होती! मार्शल आणि गार्नरला नीट खेळून काढलं की अर्धं काम झालं! होल्डींगचा स्पीड पूर्वीपेक्षा कमी झाला आहे आणि वेस्ट इंडीजची बॅटींग फारशी भक्कम नाही असं त्याने प्रतिपाद्न केलं! अ‍ॅलन बॉर्डरने तर त्याच्याहीपुढे जाऊन ऑस्ट्रेलियन क्रिकेटर या वृत्तपत्रात लिहीलं,

"We are thinking of beating them! Laugh all you want..."

वेस्ट इंडीजमध्ये हूक मारताना आऊट झाल्याने पहिल्या टेस्टच्या आधी किमने जाहीर केलं,
"I wont be hooking at the WACA unless it is a second inngins, I am 150 and we are 3-330."

पर्थच्या पहिल्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये वेस्ट इंडीजने ४१६ पर्यंत मजल मारली ती मुख्यतः गोम्स आणि दुजाँ यांच्या शतकांमुळे. होल्डींगने ऑस्ट्रेलियाची पहिली इनिंग्ज ७६ रन्समध्ये उखडली! किमने पाऊण तासात ३१ बॉलमध्ये ४ रन्स काढल्या, पण होल्डींगच्या बॉलवर मार्शलने त्याचा कॅच घेतला तो हूक मारताना! दुसर्‍या इनिंग्जमध्ये किमने ३७ रन्स फटकावल्या, पण मार्शलचा बॉल सोडून देण्याचा त्याचा अंदाज चुकला आणि तो एलबीडब्ल्यू झाला! वेस्ट इंडीजने इनिंग्ज आणि ११२ रन्सनी मॅच जिंकली!

इयन चॅपलने किमवर टीकेची झोड उठवली! किमच्या ऐवजी बॉर्डरची कॅप्टन म्हणून नेमणूक करावी असं त्याने आपल्या कॉलममध्ये नमूद केलं! चॅनल नाईनवरुन कॉमेंट्री करताना चॅपल म्हणाला,

"It is time for Hughes to stop talking about using a psychologist in the dressing room.. To stop talking about the 'new professionalism.. To stop talking about not hooking.. To stop talking."

चॅपलच्या सततच्या टीकेच्या भडीमाराला वैतागून किमने ब्रिस्बेनच्या दुसर्‍या टेस्टच्या आधी टॉसच्या वेळेस चॅपलशी बोलण्यास नकार देण्याचा निर्णय घेतला. आपला हा निर्णय त्याने बॉब मेरीमानला कळवल्यावर मेरीमानने त्याला काँट्रॅक्टप्रमाणे इंटरव्ह्यू टाळता येणार नाही याची जाणीव करुन दिली. इयन मॅक्डॉनाल्डने चॅपलची गाठ घेऊन किमवरची टीका आवरती घेण्याची सूचना केली. चॅपल उत्तरला,

"He's captain of Australia. He's gotta be able to take it"

मॅक्डोनाल्ड आणि मेरीमान यांच्या मनधरणीमुळे किम चॅपलशी बोलण्यास तयार झाला! टॉसनंतर चॅपलने पहिलाच प्रश्न केला,

"Three months ago, you claimed Australia possessed no test worthy leg-spinner. So what is Bob Holand doing in the team?"

वास्तविक हा प्रश्न सिलेक्टर्सना विचारणं योग्यं ठरलं असतं, पण किमला पिडण्याची संधी सोडेल तर तो चॅपल कसला? किम भडकला होता परंतु कसाबसा त्याने स्वतःवर संयम ठेवला. चॅपलचा पुढचा प्रश्न होता,

"You've got a problem with hook shot. Are you going to continue hooking this time around too?"

आता मात्रं किमची सहनशक्ती संपली! चॅपलच्या प्रश्नाला कोणतंही उत्तर न देता रागाने धुमसत तो मैदानावरुन बाहेर पडला. मेरीमान आणि मॅक्डॉनाल्डकडे पाहून तो गरजला,

"I'll never do it again!"

ऑस्ट्रेलियाची अवस्था ३३ / ३ अशी असताना किम बॅटींगला आला तेव्हा ब्रिस्बेनच्या प्रेक्षकांनी त्याची हुर्यो उडवली! किमला हे असह्यं झालं होतं. ३७ बॉलमध्ये ५ बाऊंड्री मारत त्याने ३४ रन्स फटकावल्या पण गार्नरने बंपर टाकल्यावर त्याची नैसर्गिक प्रतिक्रीया होती ती हूक मारण्याची! लाँगलेगला पुन्हा एकदा मार्शलने त्याचा कॅच घेतला!

गार्नर म्हणतो,
"It was little depressing, when it led to the total demoralaisation if a player with Kim's talents. I felt bad for him!"

इयन चॅपलची तलवार किमच्या डोक्यावर लटकत होतीच! त्यातच दुसर्‍या दिवशी सकाळी किमने सोडलेल्या कॅचचा फायदा घेत रिची रिचर्ड्सनने १३८ रन्स फटकावल्या! दुसर्‍या इनिंग्जमध्ये जेमतेम ४ रन्स केल्यावर होल्डींगच्या बॉलवर किम एलबीड्ब्ल्यू झाला!
मॅचच्या चौथ्या दिवशी सकाळी किमने बॉब मेरीमानला फोन केला.

"I want to quit as Australian Captain!"

"Do you really want.. " मेरीमान उडालाच, "Is that really where you want to go?"

"Bob, I don't want any advice from you. I don't want to hear it. I have made my mind up. All I need you to do is get hold of Greg Chappell!"

मेरीमानने ग्रेग चॅपलला फोन करुन बोलावून घेतलं. चॅपलला साधारण अंदाज आलाच होता. किमने आपला निर्णय त्याच्या कानावर घातला.

चॅपल म्हणतो,
"I felt relief and mostly sadness. Quitting was sensible, I told him. I can't say it was worst day of my life, but certainly one of my worst days in cricket. Until that point, I thought Kim hoped things would change. But he had no more fight left and no more hope left."

आपला हा निर्णय ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला कळवण्याचं किमने सूचित केलं. मेरीमानने त्याला मॅच संपेपर्यंत थांबण्याची आणि बोर्डाच्या अधिकार्‍यांना कळवल्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण कॅप्टनपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर करण्याची सूचना केली. ग्रेग चॅपलच्या मदतीने किमने आपलं राजीनामापत्रं लिहून तयार केलं! मेरीमानने सुचवलेल्या एक-दोन दुरुस्त्या करुन झाल्यावर किमने ड्रेसिंगरुममध्ये बॉर्डरची गाठ घेतली. किमचा राजिनामा पाहून बॉर्डर चक्रावला.

"Mate, what are you doing? You don't need to. This is ridiculous. We are playing a very good team. It's not your fault!"

किम उत्तरला,
"Mate, I've had enough. It's not working."

वेस्ट इंडीजने मॅच जिंकल्यावर प्रेस कॉन्फरन्सपूर्वी किमने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्‍यांना आपला निर्णय कळवला. प्रेस कॉन्फरन्समध्ये नेहमीप्रमाणे प्रश्नांची उत्तरं दिल्यावर शेवटी किम म्हणाला,

"Gentlemen, before you go, I have something to read."

आपल्या खिशातून कागद काढून किमने वाचण्यास सुरवात केली,

"The Australian Cricket captaincy is something that I've held very dear to me. However playing the game with total enjoyment has always been of greatest importance. The constant speculation, criticism and inuendo by former players and sections of media over the past 4-5 years have finally taken their toll..."

एव्हाना किमच्या डोळ्यात पाणी जमा होऊ लागलं होतं. त्याचा आवाजही जड झाला होता.

"It is in the interest of the team,.."
"Go on." मेरीमान किमच्या बाजूला झुकत म्हणाला.
"Australian Cricket.."

एवढा वेळ कसेबसे थोपवून धरलेले अश्रू आता किमच्या गालावर ओघळले! त्याला पुढे वाचणं अशक्यं झालं. मेरीमानपुढे कागद ठेवून तो कसंबसं म्हणाला,

"You read it.."

.... आणि दुसर्‍याच क्षणी प्रेस कॉन्फरन्समधून बाहेर पडला!

मेरीमानने पुढे वाचण्यास सुरवात केली,
"The statement continues gentleman....

It is in the interest of the team, Australian cricket and myself that I have informed ACB of my decision to stand down as Australian Captain. I look forward to continuing my career in whatever capacity the selectors and board seem fit with the same integrity and credability I have displayed as Australian captain.

Gentlemen, I wish not to discuss this any further and I will not be available to answer any further questions.

Kim Hughes."

प्रेस कॉन्फरन्समधून बाहेर पडलेला किम ड्रेसिंग रुममध्ये गेला. मरे बेनेट आणि हॉग यांच्यामध्ये बसून त्याने डोळ्यातील अश्रूंना मोकळी वाट करुन दिली! त्याला सावरण्यास सुमारे तासभर लागला!

प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याबद्दलही किमवर टीकेची झोड उठवण्यात आली!
रेडीओ ब्रॉडकास्टर अ‍ॅलन मॅकगिल्व्ह्ररे म्हणाला,
"Hughes is a little boy who has not yet grown up."

बॅरी हॅम्पशायर आणि लेन पॅटरसन म्हणाले,
"Wondered if Kim's cricket box was on too tight! A real Australian in that situation would simply chunder!"

मॅकफार्लेन म्हणाला,
"Kim Hughes did not give up his beloved Australian captaincy voluntarily. He was pushed into the painful announcement!"

भूतपूर्व ऑस्ट्रेलियन कॅप्टन बिल लॉरीने मात्रं किमबद्द्ल सहानुभूती व्यक्तं केली. लॉरी म्हणाला,
"The demise of Kim Hughes in Brisbane in a manner equal to be being dragged down like a dingo in the pack and devoured by your own, within and without, was a disgrace! If the Australian captain is not performing, you do what Sir Donald Bradman did to me in 1971 and you drop the captain. You do not pull him down from within."

किमच्या जागी ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सनी अ‍ॅलन बॉर्डरची कॅप्टन म्हणून नेमणूक केली! बॅट्समन म्हणून मात्रं किम ऑस्ट्रेलियन संघात कायम होता!

अ‍ॅडलेडच्या टेस्टमध्ये पहिल्या इनिंग्जमध्ये किम पहिल्या बॉलवर आऊट झाला! दुसर्‍या इनिंग्जमध्ये त्याने जेमतेम २ रन्स केल्यावर मार्शलने त्याची दांडी उडवली! ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सनी किमला आणखी एक संधी देण्याच्या हेतूने मेलबर्नच्या चौथ्या टेस्टमध्ये त्याचा समावेश केला. व्हिव्ह रिचर्ड्सने पहिल्या इनिंग्जमध्ये ऑस्ट्रेलियन बॉलिंगची धुलाई करत २०८ रन्स फटकावल्यावर तिसर्‍या दिवशी किम बॅटींगला आला तेव्हा मैदानात एक मोठा बॅनर झळकत होता..

IF VIV CAN DO IT, SO CAN YOU KIM!

कॉर्टनी वॉल्शचा दुसराच बॉल ड्राईव्ह करण्याच्या नादात दुजाँने किमचा कॅच घेतला! पाचव्या दिवशी सकाळी लॉईडने वेस्ट इंडीजची इनिंग्ज डिक्लेअर केली तेव्हा टेस्ट वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियला साडेपाच तास खेळून काढणं आवश्यंक होतं. गार्नरने एकाच ओव्हरमध्ये वूड आणि वेसल्स यांना गुंडाळल्याने ऑस्ट्रेलियाची अवस्था १७ अशी झाली!

पुढच्याच बॉलवर गार्नरच्या इनस्विंगरवर किम एलबीडब्ल्यू झाला!

किमच्या दुर्दैवाने त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये होता इयन चॅपल!
"Garner really charging in. And its out! First ball. He's got him LBW!"

दोन्ही इनिंग्जमध्ये किमला एकही रन काढता आली नाही!
कॅप्टनपदाचा राजिनाम दिल्यावर चार इनिंग्जमध्ये मिळून त्याने २ रन्स काढल्या होत्या!
ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सना किमला ड्रॉप करण्यावाचून पर्यायच उरला नाही!

दक्षिण ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेफील्ड शिल्डमध्ये १११ रन्स फटकवल्यावर किमची वन डे साठी ऑस्ट्रेलियन संघात निवड करण्यात आली. इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये किम आणि रॉबी कर यांच्यात झालेल्या गोंधळाची परिणीती किम रनआऊट होण्यात झाली! पाकिस्तानविरुद्ध वासिम अक्रमला हूक करण्याच्या प्रयत्नात किम आऊट झाला!

दरम्यान डॉ.अली बाकरने किमची गाठ घेऊन दक्षिण आफ्रीकेच्या दौर्याबद्दल चर्चा केली होती. किमला दक्षिण आफ्रीकेत जाण्यात अजिबात रस नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर ऑस्ट्रेलियाचा अॅशेस दौरा होता. अॅशेस सिरीजसाठी किमची ऑस्ट्रेलियन संघात निवड होणार याची जवळजवळ सगळ्यांनाच अपेक्षा होती. किमने नकार दिल्यावर अली बाकरने विचारलं,

"Can we leave the door open?"
"You can leave the door open mate, but I am not coming through it!" किम उत्तरला!

ऑस्ट्रेलियन सिलेक्टर्सनी १९८५ च्या अ‍ॅशेस सिरीजसाठी इंग्लंड दौर्‍यावर जाणार्‍या संघातून किमला ड्रॉप केलं! ऑस्ट्रेलियाच्या नवीन सिलेक्शन कमिटीचे सदस्यं होते लॉरी सॉल, रिक मॅक्कॉस्कर आणि ग्रेग चॅपल! या तिघांपैकी मॅक्कॉस्कर आणि चॅपल दोघंही पॅकरच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये खेळलेले असल्याने त्यांनी मुद्दामच किमला डच्चू दिला अशी किमसकट बर्‍याच जणांची खात्री झाली होती!
किमला ड्रॉप करण्यात आल्याचं जाहीर झाल्यावर द्क्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यासाठी होकार दिलेल्या अनेक खेळाडूंनी त्याची गाठ घेऊन आपण दक्षिण आफ्रीकेत जात असल्याचं त्याच्या कानावर घातलं. अ‍ॅशेस सिरीजसाठी ऑस्ट्रेलियन संघात निवड झालेल्या खेळाडूंपैकी मरे बेनेट, ग्रॅहॅम वूड, डर्क वेल्हॅम आणि वेन फिलीप्स यांनीही दक्षिण आफ्रीकेत जाण्यासाठी अली बाकरबरोबर करार केला होता. परंतु या चौघांपैकी मरे बेनेट अद्यापही द्विधा मनस्थितीत होता. अखेर त्याने दक्षिण आफ्रीकेत न जाता ऑस्ट्रेलियन संघाबरोबर इंग्लंडच्या दौर्‍यावर जाण्याचा निर्णय घेतला!

दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍याची बातमी षटकर्णी होताच ऑस्ट्रेलियन संघात निवड झालेल्या उरलेल्या खेळाडूंनी वूड, वेल्हॅम आणि फिलीप्स यांना वगळण्याची मागणी केली! किमला हे कळताच त्याने बॉब मेरीमानला फोन करुन आपण ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळण्यास तयार असल्याचं ग्रेग चॅपलला कळवण्याची सूचना दिली! दरम्यान केरी पॅकरला ही बातमी कळताच त्याने वूड, वेल्हॅम आणि फिलीप्स यांना दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर मिळणार्‍या पैशांपेक्षा जास्तं पैसे आणि वेल्हॅमला तर आपल्या पीबीएल कंपनीत सेल्स मॅनेजरची नोकरीही देऊ केली! अ‍ॅलन बॉर्डर आणि इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी वेल्हॅम, वूड आणि फिलीप्स यांची चांगलीच खरडपट्टी काढली, पण अखेरीस हे तिघंही इतरांबरोबर इंग्लंडच्या दौर्‍यावर रवाना झाले!

केरी पॅकरने दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर जाण्यापासून स्टीव्ह स्मिथलाही पैशांचं आमिष दाखवून फोडण्याचा प्रयत्न केला, पण स्मिथ बधला नाही. दक्षिण आफ्रीकेत जाणार्‍या इतर खेळाडूंना फोडण्याचेही त्याचे प्रयत्न सुरु होते. इतकंच नव्हे तर शेफील्ड शिल्डमधल्या इतर पाच उदयोन्मुख खेळाडूंनाही दक्षिण आफ्रीकेत जाण्याचा मोह होऊ नये म्हणून पॅकरने वर्षाला १५००० डॉलर्स देण्याचा करार केला.
दरम्यान रॉडनी मार्श वेस्टर्न ऑस्ट्रेलियन सिलेक्शन कमिटीचा चेअरमन म्हणून निवडून आल्यावर तर किमला वेस्टर्न ऑस्ट्रेलियन संघातील आपल्या जागेबद्द्ल शाश्वती वाटेनाशी झाली.

बॉब मेरीमान आणि डेव्हीड रिचर्ड्सशी बोलताना तो म्हणाला,
"Kerry Packer runs the game. He's not going to be doing me any favours. Who's going to look after me? What assurances have I got?"

किम म्हणतो,
"After the involvement of Kerry Packer and ACB's attempt of bribing out South African rebels.. Well, I always took great pride playing for Australia, but did not expect ACB to stoop down to this level! I was gutted! Absolutely gutted!"

किमने डॉ.अली बाकरला फोन करुन आपण दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर जाण्यास तयार असल्याचं त्याच्या कानावर घातलं! अली बाकरशी करार करणारा तो अखेरचा ऑस्ट्रेलियन खेळाडू होता! दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर जाणार्‍या ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कॅप्टन म्हणून त्याने जबाबदारी घेण्यास त्याने होकार दिला! दौर्‍याची घोषणा झाल्यावर प्रेस कॉन्फरन्समध्ये तो म्हणाला,

"I am going to South Africa with an open, and I hope, intelligent mind. I believe I have the ability to judge right and wrong. I also believe I will be able to comment and suggest ways the situation can be improved. When I stand up in front of schoolchildren and business groups I will be in a better position to let the people at home know how the rest of the world lives!"

दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर जाण्याच्या किमच्या निर्णयावरुन पुन्हा एकदा त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला. खुद्दं ऑस्ट्रेलियान पंतप्रधान बॉब हॉक यांनी किमवर तो वर्णद्वेषी धोरणाचा पुरस्कर्ता असल्याचा आरोप केला. किम विषादाने म्हणाला,

"People think I'm a racist! Well, thats as worst as I could imagine!"

१९८५-८६ आणि ८६-८७ च्या दक्षिण आफ्रीकन दौर्‍यांनंतर किम पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतला. वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्याला क्लब क्रिकेट खेळण्यास प्रतिबंध केल्यावर किमने त्यांना कोर्टात खेचलं! वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने केस तर गमावलीच वर हजारो डॉलर्सचं आर्थिक नुकसानही त्यांच्या पदरी आलं! १९८७-८८ च्या मोसमात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संघात ओपनिंग बॅट्समन होता किम ह्यूज! मात्रं एव्हाना ३४ वर्षांच्या किमला वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या संघातली जागा टिकवणं कठीणच जाणार होतं! १९८९ मध्ये किमने दक्षिण आफ्रीकेत नातालच्या संघाशी करार केला. पण त्याची कामगिरी सुमारच होती! १९९१ मध्ये नातालच्या दुय्यम संघातूनही त्याला ड्रॉप करण्यात आल्यावर तो फर्स्ट क्लास क्रिकेटमधून रिटायर झाला!

नातालकडून खेळताना किम अपयशी ठरला असला तरी त्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा दोन दक्षिण आफ्रीकन खेळाडूंवर फार मोठा प्रभाव पडला होता. हे दोन खेळाडू म्हणजे अँड्र्यू हड्सन आणि जाँटी र्‍होड्स!

हडसन म्हणतो,
"Kim installed a positiveness and a self-belief in me."

जाँटी र्‍होड्स म्हणतो,
"There are too many robots ... Kim was emotional because he cared. I wanted to be the same. I always wanted to play the game with same passion as Kim!"

किम ह्यूजच्या करीअरचा विचार करताना एक गोष्टं प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी फर्स्टक्लास क्रिकेटमध्ये पदार्पणापासून दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर जाईपर्यंत इयन आणि ग्रेग चॅपल, रॉडनी मार्श आणि डेनिस लिली यांचा त्याच्या कारकिर्दीवर बराच परिणाम झाला! १९७५ मध्ये किमने वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केलं तेव्हा मार्श वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन होता, तर लिली ऑस्ट्रेलियाचा प्रमुख बॉलर होता! सुरवातीच्या काळात लिली आणि मार्शचं किमबद्दलचं मत अनुकूल होतं. त्याच्या बॅटींगच्या टॅलेंटबद्दल त्यांना कधीच शंका नव्हती, पण त्याच्या उताविळपणाबद्द्ल मात्रं मार्श आणि इन्व्हॅरॅरिटीनेही त्याचा अनेकदा खरपूस समाचार घेतला होता!
वर्ल्ड सिरीज क्रिकेटनंतर मात्रं हे सगळंच चित्रं पालटून गेलं. इयन चॅपल आणि केरी पॅकरने किमला वर्ल्ड सिरीज क्रिकेटपासून दूर ठेवल्याने आणि भारताविरुद्धच्या सिरीजपूर्वीच्या किमच्या वक्तव्याने मार्श आणि लिलीच्या मनात किमबद्दल आढी निर्माण झाली. त्यातच वर्ल्ड सिरीजनंतर मार्शच्या आधी कॅप्टनपदाची माळ किमच्या गळ्यात पडल्यावर तर दोघांची नाराजी पार टोकाला गेली आणि त्यांनी त्याच्याशी असहकार्याचाच पवित्रा घेतला.

ग्रेग चॅपल मात्रं मार्श आणि लिलीचं समर्थन करताना वेगळीच भूमिका मांडतो. तो म्हणतो,
"Rod and Dennis cared for him a lot. Those too guys bloody did a lot of work behind the scenes trying to help Kim. Sometimes, when you love someone, you've got to be tough with them. It's not just about being nice and friendly!"

ग्रेग चॅपलचा हा दावा फारसा पटण्यासारखा नाही. त्याचं हे वक्तंव्य म्हणजे एकेकाळच्या आपल्या सहकार्‍यांसाठी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असावा असं मानण्यास वाव आहे. लिली आणि मार्श यांनी किमच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघातून खेळत असताना आपापल्या पुस्तकांतून त्याच्यावर टीकेचा जो भडीमार केला होता तो केवळ असमर्थनीय होता.

डेनिस लिलीने तर किमवर बंपर्सचा मारा करण्याचं आपलं धोरण निवृत्तीनंतरही सुरु ठेवलं होतं! किम आणि लिली रिटायर झाल्यानंतर अनेक वर्षांनी एका चॅरीटी मॅचमध्ये खेळताना इतर बॅट्समनना मिडीयम पेसने लाईन आणि लेंग्थवर बॉलिंग टाकणार्‍या लिलीने किम बॅटींगला येताच त्याच्या डोक्यावर बॉल शेकवणं हीच आयुष्याची इतिकर्तव्यता असल्यागत शक्यं तितक्या ताकदीने त्याच्यावर बंपर्सचा मारा आरंभला!

पंचेचाळीसाव्या वर्षीही किमने लिलीच्या प्रत्येक बंपरवर हूकची बाऊंड्री वसूल केली!

इयन चॅपलची तर किमवर सुरवातीपासूनच वक्रदृष्टी होती. वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये किमच्या तुलनेत अगदी सामान्य असलेल्या खेळाडूंची इयनने ऑस्ट्रेलियन संघात निवड केली, पण किमला मात्रं कटाक्षाने दूर ठेवलं. पुढे किम कॅप्टन झाल्यावर कॉमेंट्री करताना आणि मैदानात इंटरव्ह्यू घेताना सतत त्याचा तेजोभंग करण्याचं काम इयन चॅपलने इमानेइतबारे पार पाडलं! किमच्या ऐवजी ट्रेव्हर चॅपलची ऑस्ट्रेलियन संघात निवड होणं जास्तं योग्यं ठरलं असतं असं चॅपलचं ठाम मत होतं!

ग्रेग चॅपलने सिलेक्टर म्हणून निवडलेल्या पहिल्याच संघातून किमला डच्चू दिला. आपल्या निर्णयाचं समर्थन करताना तो म्हणतो,
"I spoke strongly in favour of leaving Kim out. I'd been witness to his mental state probably more than anyone. He needed time to regroup his emotions and his mental state. In England, Kim could not have sat quitely in corner and probably still have had some supporters in the group. That would have made it very hard for AB as captain. Kim wouldn't have led anything, but to send him to England was going to destroy him as a player. Unfortunately he could not understand the decision and took the path to South Africa!"

ग्रेग चॅपलने १९८३ मध्ये किमच्या कॅप्टनपदाबद्द्ल केलेलं भाकीत मात्रं तंतोतंत खरं ठरलं! किमच्या कॅप्टनपदाचा आणि सततच्या टीकेचा, खासकरुन इयन चॅपलच्या टीकेच्या भडीमाराचा त्याच्या बॅटींगवर परिणाम झालाच!

किमच्या करीअरचा विचार करता कॅप्टन म्हणून त्याच्या कामगिरीचा आढाव घेणं अत्यावश्यक ठरतं. अर्थात केवळ जिंकलेल्या टेस्ट मॅचेसच्या संख्येवरुन कॅप्टन म्हणून त्याचं मूल्यमापन करणं हे किमवर अन्याय करण्यासारखंच ठरेल. किमच्या नेतृत्वात खेळलेल्या २८ टेस्ट्सपैकी केवळ ४ मॅचेस ऑस्ट्रेलियाने जिंकल्या असल्या तरी त्या २८ टेस्ट्सपैकी केवळ ८ टेस्ट मॅचेस ऑस्ट्रेलियात झाल्या होत्या हे नजरेआड करुन चालणार नाही! ग्रेग चॅपलचा दौर्‍यावर न जाता केवळ ऑस्ट्रेलियातच खेळण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने खपवून घेतला आणि ऑस्ट्रेलियातील सर्व मॅचेसमध्ये त्याची कॅप्टन म्हणून नेमणूकही केली! परिणामी किमच्या नशिबी केवळ दौर्‍यावर जाणार्‍या संघाचं नेतृत्वं आलं! आणि हे दौरेही कोणते तर १९८१ चा अ‍ॅशेस दौरा ज्यात बोथमने एकामागोमाग एक अविश्वसनीय कामगिरीचा सपाटा लावला होता, कादीरची करामत आणि त्याला अनुकूल असलेला पाकिस्तानचा दौरा आणि चॅपल, मार्श आणि लिली रिटायर झाल्यावर वेस्ट इंडीजसारख्या दादा संघाविरुद्धचा दौरा! किमच्या जागी कोणीही कॅप्टन असता तरी कितपत फरक पडला असता हा संशोधनाचा विषय!

अर्थात कॅप्टन म्हणून किममध्ये अनेक दोष होतेच! सामन्याची परिस्थिती समजून घेण्यात ज्याला 'रिडींग द गेम' म्हणतात त्यात तो अनेकदा कमी पडत असे. अनेकदा त्याची फिल्डींग प्लेसमेंट अगम्यं असे. इतकंच नव्हे तर बॉलरने मागितलेली फिल्डींग त्याला न देण्याचीही त्याला खोड होती. कित्येक वेळा एखाद्या विशिष्ट गॅपमधून खोर्‍याने रन्स केल्यावरही त्या जागी फिल्डर लावण्यास त्याचा नकार ठरलेला असे! त्याच्या तुलनेत मार्श निश्चितच सरस कॅप्टन ठरला असता हे नि:संशय!

निव्वळ बॅट्समन म्हणून मात्रं किम मार्शच काय पण अनेक बाबतीत ग्रेग आणि इयन चॅपलच्या तुलनेतही वरचढ होता. त्याच्या बॅटींगमधली आक्रमकता, जिद्द, धडाडी आणि झुंजारपणा केवळ अप्रतिम होता. अगदी वेस्ट इंडीजच्या भितीदायक फास्ट बॉलर्सनाही क्रीजमधून पुढे सरसावत फटकावण्याचा बेदरकारपणा केवळ किमच दाखवू शकत होता! हूक आणि पूलच्या शॉटसवर कमालिची हुकूमत असल्याने त्याला बंपर्स टाकूनही फायदा होण्यासारखा नव्हता आणि स्पिनर्स हे केवळ बडवले जाण्यासाठीच जन्माला आलेले असतात असं वीरेंद्र सेहवागप्रमाणेच त्याचं प्रामाणिक मत होतं! बॅटींग करताना स्वतःला सतत "Concentrate!" म्हणून बजावण्याची आणि अचूक बसलेल्या शॉटचं स्वतःशीच "Shot, Claggy!" असं कौतुक करण्याची त्याची सवयही खासच होती!

परंतु या सगळ्याबरोबरच त्याच्या बॅटींगमध्ये कमालीचा उताविळपणा होता! बंपरला हूक करणं ही त्याची इतकी नैसर्गिक प्रतिक्रीया होती की हूकच्या शॉटवर आपण वारंवार आऊट होतो याची कल्पना आल्यावरही तो शॉट आवरणं त्याला जमलं नाही! त्याचबरोबर त्याची आणखीन एक वाईट खोड म्हणजे नेमक्या नको त्या वेळी विकेट फेकण्याची त्याची घातक सवय! आदल्या दिवशी नॉटआऊट असल्यास दिवसाच्या पहिल्या-दुसर्‍या ओव्हरमध्ये, लंच,टी किंवा दिवसाचा खेळ संपण्यास जेमतेम काही मिनीटं बाकी असताना किंवा अगदी अखेरच्या ओव्हरमध्ये, एखाद्या बॉलरच्या स्पेलच्या पहिल्याच ओव्हरमध्ये किंवा शेवटच्या ओव्हरमध्ये, शतकाच्या उंबरठ्यावर असताना स्पिनर्सना फटकावण्याच्या आणि बाऊंड्री किंवा सिक्स मारुन शतक पूर्ण करण्याच्या नादात किम अनेकदा आऊट झालेला आढळून येईल! स्वत:मधल्या आक्रमकतेला त्याने आवश्यक ती मुरड घातली असती आणि थोडासा संयम दाखवला असता तर तर तो ऑस्ट्रेलियन आणि जागतिक क्रिकेटमधला एक महान बॅट्समन म्हणून गणला गेला असता. ७० टेस्ट्समध्ये ३७ च्या अ‍ॅव्हरेजने ४४१५ रन्स आणि ९ शतकं हे आकडे बॅट्समन किम ह्यूजवर अन्याय करणारे आहेत!

किमच्या टेस्टमधल्या ९ शतकांपैकी बहुतेक सर्व शतकं ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत असताना काढलेली आहेत! १९८१ च्या मेलबर्नच्या बॉक्सिंग डे टेस्टमधलं शतक हा त्याच्या टेस्ट करीअरचा कळसाध्याय! किमच्या यच्चयावत सहकार्‍यांनी, प्रतिस्पर्धी खेळाडूंनीही आणि अगदी इयन चॅपलसारख्या कट्टर टीकाकारांनीही या शतकाबद्द्ल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे!

इयन चॅपल सुमारे तीस वर्षांनी त्याच्या इनिंग्जबद्द्ल बोलताना म्हणतो,
"I did not liked Kim's habit of pre-empting bowler's deliveries. But on this occassion, I sensed that he was reading their minds impeccably! In fact, Hughes seemed to have the bowlers in tune wit his thought process! The more he hooked, pulled and cut, the shorted they pitched. The harder he hammered the ball, the harder they ran in! It probably is the best post war innings by an Australian batsman! The only comparison could be Stan McCabe's 187 during the Bodyline series or Bradman's 334!"

आपण पाहिलेल्या सर्वोत्कृष्टं शतकांमध्ये इयन चॅपलने किमच्या या इनिंग्जचा समावेश केलेला आहे!

किमच्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या शतकाचा ही मॅच टीव्हीवर पाहणार्‍या सात वर्षांच्या एका मुलावर फार मोठा प्रभाव पडला! पुढे अनेक वर्षांनी आपली गाजलेली करीअर संपवून निवृत्त झाल्यावर त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहीलं,

“Kim Hughes was my first hero in Test cricket, a batsman who, when he was on, was unstoppable. I remember him taking on the West Indies at the MCG the week after my seventh birthday, their fast bowlers aiming at his chest and head, him hooking and pulling fearlessly. That knock stays burned in my memory and probably set the standard for the sort of cricketer I wanted to become.”

हा सात वर्षांचा मुलगा म्हणजे रिकी पाँटींग!

अर्थत किमची क्रिकेट खेळण्यामागची मुख्य भूमिकाच खेळाचा आनंद लुटण्याची आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याची होती! आपल्या या भूमिकेपासून तो अखेरपर्यंत ढळला नाही! कॅप्टन म्हणून आणि एक खेळाडू म्हणूनही त्याच्या संघातील खेळाडूंचा तो आवडता सहकारी होता! अपवादच करायचा झाला तर वर्ल्ड सिरीज मध्ये खेळलेल्या काही खेळाडूंचा!

जॉन इन्व्हॅरॅरिटी म्हणतो,
"Kim was well loved. He had a generous heart and was a great optimist. He was fun loving and fun seeking and easily excitable."

चॅपल बंधू, मार्श आणि लिली यांनी अनेकदा त्याच्यावर कडवी टीका केली असली आणि त्यांच्यामुळे अनेकदा त्याला खडतर परिस्थितीचा सामना करावा लागला असला तरी किमच्या मनात त्यांच्याबद्दल अजिबात कटुता नाही! इयन आणि ग्रेग चॅपल, मार्श आणि लिली आज त्याचे जिगरी दोस्तं आहेत!

ग्रेग चॅपल म्हणतो,
“I don’t say this about a lot of blokes, but I love Kim Hughes. I admire what he’s been through because my life’s been very easy compared with Kim Hughes’s life, and I think most of us could say that!”

दुर्दैवाने आजही किम ह्यूज म्हटल्यावर अनेकांना प्रेस कॉन्फरन्समध्ये भावनावश झालेला ऑस्ट्रेलियन कॅप्टन दिसतो, पण वेस्ट इंडी़जच्या बॉलर्सना पुढे सरसावत फटकारणारा जबरदस्तं आक्रमक आणि धाडसी बॅट्समन नाही!

किम ह्यूजच्या करीअरची ही सगळ्यात मोठी शोकांतिका!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मला तो कर्णधार असतानाचा भारतातला दौरा आठवतो. त्या भारतीय मा-याविरूद्ध कोणी फॉर्मात नसलेला फलंदाजही फॉर्मात येईल असा तो मारा होता. म्हणूनच असे कमकुवत संघ असूनही भारत पाच-सहापैकी केवळ एक की दोन सामने जिकू शकला होता. मला वाटते कालीचरण व तो कप्तान असलेले दौरे लागोपाठ झाले होते.
चॅपेल बंधूचे उद्योग एव्हाना ब-याच जणांना माहित झाले आहेत. आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उघडपणे बोलू लागले आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0