ग्लास टॉप, हॉब टॉप, फॅन्सी गॅस शेगडी - ग्राहकांच्या जिवाशी खेळ?


परिक्षा संपल्या, त्या परिक्षांचे निकाल लागले. सुट्ट्या सुरु झाल्या आणी संपल्या. लगेच संपल्या? हो... लगेच संपल्या. शाळेत SSC बोर्ड बदलून CBSE चे वारे वाहायला लागल्याने शाळा 4 एप्रिलला सुरुही झाल्या.

दोन्ही चिरंजीवांच्या शाळा सकाळी, त्यात धाकटा CBSE ला तर मोठा SSC बोर्डच्या 10 वीच्या वर्गात पदार्पण. एकाची बस 6.55 ची तर दुसऱ्याची 7.05 ला म्हणजे सकाळी 6.45 ला सर्व म्हणजे डबे - मोठा - पोळीभाजीचा, छोटा - स्नॅक्सचा, या डब्यांच्या बरोबरीने चहा, दूध, एखाद्या वेळेस पाणी नसेल, वीज नसेल तर गॅस च्या चूलीवर पाणी तापविणे - एक ना अनेक कामे फक्त दोन बर्नरच्या शेगडीवर. सगळी कामे एकाचवेळी मल्टीटास्कींग करुन करावी तर काही तरी पर्याय हवा म्हणून "चार बर्नरची शेगडी" असती तर? असा विचार मनात आला आणी आम्ही उभयतांनी - गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर खरेदी करु - असा विचार केला.

गुढीपाडवा आला पण दुपार पर्यंत बाजारात जाण्यास कामातून वेळच नाही मिळाला, पण मुहुर्त साधायचा म्हणून उन्हं कलताच दोघेही बाहेर पडलो. आता पहिला प्रश्न आला कोणत्या दुकानात जावे? मुंबई ग्राहक पंचायतीच्या "ग्राहक पंचायत पेठे" मध्ये प्रेस्टीज (टीटीके प्रॉडक्टस्) चा स्टॉल होता, त्यांचे सिंहगड रोडला कंपनी आऊटलेट आहे असे समजले होते म्हटले श्रीगणेशा तेथून करावा.

प्रेस्टीजच्या दुकानात शिरलो आणी चार बर्नरच्या गॅस शेगड्या दाखवा असे सांगितल्यावर विक्रेत्याने एकदम हॉब टॉप व ग्लास टॉप असे शेगड्यांचे प्रकार दाखवायला सुरुवात केली. आकर्षक असे प्लेटींग केलेले बर्नर, वर लावलेली हार्डन्ड/टफन्ड ग्लास, ऑटो इग्नीशनची सोय, ओट्यावर किंवा ओट्यामध्ये (हॉब असेल तर हॉबमध्ये) ठेवण्याची सोय, पाईप जोडण्याचे नोझल 360 डिग्रीमध्ये फिरणारे अशा एका ना अनेक सुविधा. या शेगड्यांपुढे घरची दोन बर्नरची शेगडी अगदीच छोटी वाटू लागली. या सगळ्या ग्लासटॉप शेगड्यांमधून शेवटी एक निवडली आणी खरेदी अंतिम टप्प्यात येण्यापूर्वी आमच्या दोघांच्याही डोक्यात या शेगड्यांना ISI (Indian Standard Institute) मार्क आहे का? असा प्रश्न आला. आम्ही त्या विक्रेत्याला लगेच ते विचारले आणी आम्हाला उत्तर ऐकून धक्काच बसला. त्याने सांगितले कोणत्याही ग्लास टॉप, हॉब टॉपला ISI मार्क येत नाही.

झालं! , त्या विक्रेत्याला ती शेगडी ठेवायला सांगुन आम्ही घरी परतलो, पण हा ISI चा मार्क डोक्यातूनही जाईना. मग विचार केला की आणखी एखाद्या दुकानात शेगड्या पहाव्यात. सिंहगड रोड वरचे गॅस शेगड्यांचे दुसरे शो-रुम ज्योती गॅस या ठिकाणी आम्ही मग दुसऱ्या दिवशी गेलो व त्यांच्या स्वतःच्या ब्रँडच्या शेगड्या पहायला सुरुवात केली पण यावेळी सुरुवातीलाच आम्ही आम्हाला ISI मार्क असलेलीच ग्लास टॉप किंवा हॉब टॉप दाखवा असे म्हटल्यावर एक आश्चर्यकारक उत्तर या शोरुम मधील विक्रेत्याकडून मिळाले ते म्हणजे या शेगड्यांना ISI मार्कची आवश्यकता नाही. आम्ही थोडेसे हबकूनच गेलो, कारण मुंबई ग्राहक पंचायती मार्फत मुंबईत BIS (Bureau of Indian Standards) च्या प्रशिक्षण शिबिरात घरगुती उपकरणांमध्ये गॅस, विजेची उपकरणे इत्यादींना ISI मार्क असलाच पाहिजे असे सांगितलेले होते इथे काही वेगळेच ऐकायला मिळत होते. याच शोरुम मध्ये इतर कंपन्यांच्याही शेगड्या होत्या व तेथील विक्री प्रतिनिधीने अशा कोणत्याही ब्रँडच्या ग्लास टॉप किंवा हॉब टॉप शेगड्यांना ISI मार्क येत नाही असे ठामपणे सांगितले. वर अशी ISI मार्क असलेली ग्लास टॉप किंवा हॉब टॉप शेगडी आम्हाला दाखवाच असे आव्हानही दिले. आम्ही ज्योती गॅसच्या व्हीजीटर बुक मध्ये आमचा नांव पत्ता नोंदवूनही आलो.

असा शेगडीचा शोध दोन, तीन ब्रँडस् पुरता मर्यादीत न ठेवता हाच शोध लक्ष्मी रोड, अप्पा बळवंत चौक इत्यादी शहराच्या मध्यवर्ती परिसरांतील दुकानांतून घेतला असता विविध ब्रँड्सच्या शेगड्यांचीही हिच परिस्थिती आढळून आली. काही ब्रँडच्या बाबतीत ते ब्रँड्स आंतरराष्ट्रीय (इटली, जर्मनी इ.) असल्याने ISI मार्कचे बंधन नाही असेही काही विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. तर काही विक्रेते ISO असल्याचे सागून ISI मार्कशी साधर्म्य असल्याचे दर्शवित होते. पण त्यांना ISI हा मार्क सुरक्षेचा असतो व ISO हे प्रशासनिक प्रमाणीकरण असते असे सांगितल्यावर, सदर विक्रेत्यांनाच ISI मार्क बद्दलची माहिती नसल्याचे किंवा अपुरी माहिती असल्याचे जाणवले. विक्रेत्यांकडे माहिती घेतली असता "शेगडीमुळे अजुनपर्यंत कोणतेही अपघात झालेले नाहीत" असाही एक शेरा एका विक्रेत्याकडून ऐकायला मिळाला. आमच्या मनात एक प्रश्न आला की जर गॅसला जोडलेले सिलंडर ISI मार्क असेलेले असायलाच हवे, त्या सिलेंडरला जोडलेला गॅस रेग्युलेटर ISI मार्क असलेला हवा, या रेग्युलेटरला जोडलेला रबरी/होज पाईपही ISI मार्क असलेला हवा, पण हे सगळं ज्या शेगडीला जोडायचे ती मात्र ISI मार्क नसलेली? हे काहिसे मनाला पटेना कारण गॅस शेगडीची पुर्ण व्यवस्थाच ISI प्रमाणित हवी, कारण अपघात या व्यवस्थेतील कोणत्या घटकामुळे होतील हे सांगता येत नाही.

हा ISI चा मार्क काही केल्या डोक्यातून जाईना, कारण आम्ही शोरुम्स मध्ये असे पर्यंत इतर ग्राहकांना अशा शेगड्यांची धडाक्यात विक्री सुरु होती.

शेगडीला ISI मार्क सक्तीचा आहे का नाही या करीता अंधेरी, मुंबई येथील BIS कार्यालयातील अधिकाऱ्यांना ई-मेल करुन विचारले असता त्यांनी तो ई-मेल संबंधित तांत्रिक विभागाला तो ई-मेल पाठविलेला आहे असे सांगितले. त्यानंतर या अधिकाऱ्यांना फोन लावून त्यांच्याजवळ चर्चा केली असता सदर शेगड्या ह्या सक्तीच्या 90 उपकरणांच्या यादीत नसून उत्पादकाने ISI मार्क घ्यायला हवा असे सांगितले. पण गॅस सिलेंडर, रेग्युलेटर, त्याला जोडणारा पाईप हे सक्तीच्या 90 उपकरणांच्या यादीत आहेत, पण गॅसची शेगडी मात्र नाही हे जरा अनाकलनीय वाटले. याच अधिकाऱ्यांनी ग्राहकांनी जर मोठ्या संख्येने BIS कडे अशी मागणी केल्यास BIS अशा यादीत हे उत्पादन जोडू शकते व उत्पादकांना ISI मार्क वापरणे सक्तीचे / बंधनकारक करु शकते असे सांगितले. परंतू सर्वसाधारण ग्राहकाचा विचार केला असता असे उपकरण अशा संस्थेने ग्राहकांकडून मागणी आल्यानंतर अशा सक्तीच्या यादीत जोडण्यापेक्षा ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता आपणहून या सक्तीच्या यादीत (Mandatory List) टाकायला हवे.

या सबंधी आणखी एक बाबही लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे काही ब्रँड्सच्या स्टीलच्या तीन, चार बर्नरच्या शेगड्या ISI मार्क असलेल्या होत्या शिवाय त्यांची किंमतही या हॉब टॉप, ग्लास टॉप शेगड्यांपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी होती, पण या हॉब टॉप, ग्लास टॉप दिसायला आकर्षक व त्यातील सोयीसुविधांमुळे सर्वसाधारण मध्यमवर्गीय ग्राहक या जास्त असलेल्या किंमतींकडे दुर्लक्ष करुन याच शेगड्या खरेदी करत असल्याचे दिसून येत होते.

घरगुती गॅस शेगड्यांकरीता IS:4246 हे मानक वापरले जाते जे सर्वसाधारणपणे स्टीलच्या दोन, तीन, चार बर्नरच्या शेगड्यांना वापरले जाते असे निदर्शनास आले आहे. या IS:4246 मानकाचे शेवटचे अद्यतन (Update) 2002 या वर्षी केलेले दिसत आहे. गेल्या 14 वर्षात बाजारात या उत्पादनात अनेक बदल झालेले दिसत आहेत. पण वर उल्लेख केलेले हॉब टॉप, ग्लास टॉप किंवा मल्टी बर्नर फॅन्सी कुक-टॉप्स गेले 8 ते 10 वर्षे बाजारात विना-सुरक्षा मानकीकरणाने विकले जात आहेत.

या संदर्भात काही मित्र, नातेवाईक, सहकारी यांच्याशी चर्चा / विचारणा करताना या ISI मार्क नसलेल्या शेगड्या किती धोकादायक आहेत याचाही अंदाज आला. शेगडीच्या नॉब मधून गॅस लिक होणे, बर्नरच्या कडेला नॉब बंद केलेला असतानाही बारीक गॅस जळत असणे, ग्लास टॉप शेगड्यांची काच शेगडी वापरल्यानंतर अतिशय तापल्याने लगेच स्वच्छ न करता येणे, हॉब टॉप शेगड्या ह्या ओट्यामध्ये बसविलेल्या असल्याने त्या शेगड्यांमध्ये गॅस मंद पेटणे, या शेगड्यांचे बर्नर आकर्षक दिसण्यासाठी प्लेटेड स्टील, अल्युमिनियम अलॉय अशा प्रकारचे असल्यानेही ज्योत नीट न येणे, ज्योत पेटताना आवाज येणे अशा अनेक समस्यांची यादीच समोर आली.

या सगळ्या बाबींचा विचार करता, सध्या असलेले ISI मार्कचे प्रमाणीकरण हे फक्त स्टीलच्या शेगड्यांपुरते मर्यादीत न ठेवता या हॉब टॉप्स, ग्लास-टॉप्स, कुकटॉप्सनाही किंवा सर्व प्रकारच्या गॅस शेगड्यांना सक्तीचे करावे असे वाटते कारण कोणत्याही प्रकारची गॅस शेगडी ही सिलेंडर, रेग्युलेटर, त्याला जोडलेला पाईप यांच्यासह एक व्यवस्था असते. बाजारात धडाक्याने विकणारे वितरक व उत्पादक,
ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करता याअनुषंगाने ग्राहकांच्या जास्त करुन स्त्री वर्गाच्या जिवाशी खेळ करीत आहेत का? असा प्रश्न पडतो. आणी समजा या प्रकारच्या शेगड्यांना ISI मानकाकरीता नोंदविण्यास काही समस्या असतील तर अशा शेगड्या ग्राहकांनी वापराव्यात की नाही? हे ठरविण्याची वेळ आलेली दिसते. ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील राजा असतो असे म्हणणारे खरंच ग्राहकाला अशी वागणूक देतात का? पण ग्राहकालाच या समस्यांची जाणीवच नसेल व तो जागृत नसेल तर बाजारात असे जिवाशी खेळ करणारे वितरक, उत्पादक अशी उत्पादने विकायला तयारच आहेत. त्यामुळे ग्राहकांनीच अशा उत्पादनांबाबत तक्रार, संबंधित नियामक संस्थांकडे करुन प्रमाणीकृत उत्पादनेच बाजारात येतील, विकली जातील याची काळजी घेतली पाहिजे. अशा चकचकीत दिसणाऱ्या किंवा भासणाऱ्या उत्पादनांपेक्षाही आपली स्वतःची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे, त्यामुळेच “काय भुललासी वरलिया रंगा” या प्रमाणे वरवरच्या अशा उत्पादनांच्या रंग रुपाला न भुलता ती उत्पादने वापरण्यास किती सुरक्षित आहेत हे प्रथम पहावे.

या संदर्भात तेल कंपन्या पुरवित असलेल्या विम्यासंदर्भात इंटरनेटवर शोध घेतला असता अशा उपकरणांना ISI मार्क असलाच पाहिजे असा उल्लेख आढळतो, पण उपकरणे म्हणून त्यात सिलेंडर, पाईप, शेगडी असा वेगवेगळा उल्लेख दिसत नाही. या संदर्भात एचपी गॅस तसेच भारत गॅस या कंपन्याच्या अधिकाऱ्यांनी विमा कंपनी जर गॅस शेगड्यांना ISI मार्क नसेल तर अशा प्रकरणांमध्ये विमा रक्कम देण्यास नकार देऊ शकतात असे सांगितले.

तसेच काही राज्यात व आपल्या राज्यातील नागपूर विभागात घरोघर जाऊन गॅस निरिक्षक गॅस उपकरणांची तपासणी करुन त्यात त्रूटी असतील तर त्या दूर करायला सांगतात किंवा गॅस संदर्भात काही अनधिकृत गोष्टी आढळल्या तर सदर गॅस जोडणीच रद्द करु शकतात अशीही माहिती या संदर्भात समोर आली आहे. या अनधिकृत गोष्टींमध्ये गॅस शेगडीचाही उल्लेख आहे, परंतू गॅस शेगडीला ISI मार्क अशा निरिक्षणांमध्ये असायलाच हवा कि नाही या संदर्भातही गॅस कंपन्यांकडून खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.

म्हणून अशा सर्व भूलभुलय्याच्या वातावरणात ग्राहकानेच म्हणजेच आपण सर्वांनी सजग राहून आपणच आपली सुरक्षितता ही सर्वोच्च आहे याची मनाशी खूणगाठ बांधून अशा व इतर उत्पादनांना ISI मार्क आहे ना याची खात्री करुनच अशी उत्पादने विकत घ्यावीत व वापरावीत. सदर लेखातील अनुभव हा फक्त गॅस शेगडीकरीता मर्यादीत न ठेवता विद्युत उपकरणे व इतर अशीच महत्वाची उपकरणे यांनाही तपासून पहावा याच करीता हा लेखन प्रपंच.

- सौ. स्नेहल मिलिंद चुटके,
मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (3 votes)

प्रतिक्रिया

अतिशय महत्त्वाचा लेख व मुद्दा!
घॠ आयएसाअय मार्क माली शेगडी (तीन बर्नरवाली, स्टीलची), पाईप वगैरे सगळं आहे.
---

यात सरकारने शक्य तितके कायदे वगैरे केले पाहिजेत हे खरच. पण प्रस्तुत लेखिकेप्रमाणे शेगडी घेईन तर ISI मार्क वालीच असा पुकारा केला आणि या ISI मार्क नसलेल्या शेगड्यांवर बहिष्कार घातला तर व्यावसायिकांना झक मारत ISI मार्क असलेल्या शेगड्या बाजारात आणाव्या लागतील!

हा लेख मी माझ्या वॉट्सअ‍ॅपवरून शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवत आहे. त्यानिमित्ताने अनेकांनी दुकानदारांना शेगडी घ्यायची नसली तरी उगाच जाऊन ISI मार्कवाली ग्लासची शेगडी द्या अशी विचारणा केली तरी योग्य तो मेसेज व्यावसयिकांपर्यंट पोचेल! मला शेगडी घ्यायची नाही पण दबाव यावा म्हणून मी शक्य तितक्या दुकानात जाऊन "ISI मार्क शेगडी नाही? हाड थू" असे करून येणार आहे! Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दबाव यावा म्हणून मी शक्य तितक्या दुकानात जाऊन "ISI मार्क शेगडी नाही? हाड थू" असे करून येणार आहे!

रेडीओवरच्या सरकारी जाहीरातीत करतात तसे .. "अरे गड्या, तुझ्या शेगडीवर आय एस आय मार्क नाही!" Tongue

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहितीपूर्ण लेखाबद्दल आभार. अशा लेखांमुळे ग्राहक निश्चितच डोळस होतील.
(लेख वाचल्यावर आधी घरच्या शेगडीवर आय एस आय मार्क आहे का बघून आले.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखाबद्दल अनेक आभार. आता घरची शेगडी चेकवणे आले. तरी नेहमीचीच आहे त्यामुळे बहुधा तो मार्क असावासं वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सदर शेगड्या ह्या सक्तीच्या 90 उपकरणांच्या यादीत

ह्याला काहीतरी कारण असेलच ना?

ISI मार्क नाही म्हणुन एकदम धोकादायक ठरवंणे माझ्या मते फार खेचणे आहे.
तुम्हीच लिहीले तसे उत्पादक घेउ शकतात ISI प्रमाणपत्र. पण उत्पादक आणि ग्राहकाला ते असण्याचे किंवा नसण्याचा चॉइस असायला काही हरकत नाही.

ISI मार्क नसलेल्या शेगड्या किती धोकादायक आहेत याचाही अंदाज आला. शेगडीच्या नॉब मधून गॅस लिक होणे, बर्नरच्या कडेला नॉब बंद केलेला असतानाही बारीक गॅस जळत असणे

ह्या गोष्टी ISI मार्क असलेल्या शेगड्यांमधे होतच नाहीत का? माझ्या मते होतात. काही वर्ष उत्पादन वापरल्यावर त्रुटी निर्माण होणारच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्नेहल चुटके मॅडम, प्रणाम.

(१) ISI मार्क नसलेल्या शेगड्या घेतल्या (चुकुन्/अनावधानाने) व त्याचा अपघात झाला तर शेगडी विक्रेत्याविरुद्ध तक्रार करता येते का ? सिद्ध झाले तर विक्रेत्याकडून नुकसानभरपाई मिळू शकते का ?
(२) जर ISI मार्क असलेली शेगडी विकत घेतली व त्या शेगडीचा अपघात झाला तर तक्रार कोणाविरुद्ध व कोणाकडे करायची ? त्या केस मधे नुकसानभरपाई मिळते का ? कोणाकडून मिळते ?

जाताजाता : आमच्या एका प्राध्यापिका बाईंनी या वेबसाईट बद्दल सांगितले होते. www.kidsindanger.org

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गब्बु - तू गंमत करतो आहेस का? जर शेगड्यांना ISI मार्क असणे मँडेटरीच नाहीये तर कसली तक्रार करतोयस आणि नुकसान भरपाई मागतोय्स?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साधारणपणे वॉरंटीच्या टर्म्स मध्ये खराब उपकरणामुळे होणार्‍या आनुषंगिक (कॉन्सिक्वेन्शिअल) नुकसानीची जबाबदारी घेतलेली नसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.