गावाकडच्या आठवणी अन पावसाचा सांगावा .....

उन्हाळा जसजसा संपत यायचा तसे कधी कधी आभाळ दाटून येई अन वडिलांची ओढ त्या आभाळाकडे असे. थोडे जरी झाकाळून आले तरी ते गावाकडे शेतात असणाऱ्या गडयाला फोन करत. तिकडे काय हालहवाल आहे याची चौकशी करत. पण त्यातूनही त्यांना समाधान मिळत नसे. मग ते गावाकडे असणाऱ्या त्यांच्या लहान भावंडाना म्हणजे सदाशिव काका किंवा नेताजी बाबा नाहीतर क्वचित बापूकाकांकडेही ते विचारणा करत. शेतातला गडी नानू राठोड हा अक्कलकोट तालुक्यातल्या कडबगावचा होता, त्याचं मराठी अगदी तिखट शेंगाचटणी सारखं तरतरीत आणि लवंगी फटाक्यासारखं कुरकुरीत होतं. सोलापुरात थोडा जरी पाऊस झाला तरी वडील त्याला विचारत,"काय नानू पाऊस आहे का रे गावाकडे ?". थोडाफार पाऊस जर झालेला असेल तर त्याचे उत्तर असे - "तात्या ह्यो कसला वो पाऊस ? पाखराची पखं सुद्धा भिजली नाहीत बगा !", आमचं सारं घरदार, गणगोत अन गाव शिवार माझ्या वडिलांना तात्या या नावानेच हाक मारी. पण नानूचं 'ताsत्याss' असं हाक मारणं म्हणजे कानडी बाईने मराठीत मुरके घेतल्यासारखे भासे.

नानूशी वडिलांचा संवाद अगदी ह्रदय असे, ते कशावरही बोलत आणि तो तिकडून यांचा प्रत्येक चेंडू सीमापार भिरकावून देई. एकदा शेतातील मुरूम दगड उपसण्याचे काम सुरु होते. वडील त्याला विचारत होते, "कुठपर्यंत काम आलेय ? इतका का वेळ लागतोय ? किती दिवस लागतील ? फार दगडधोंडे आहेत का ?"
त्यावर त्यानं जे उत्तर दिलं ते अद्भुत होतं - "अवो तात्या, म्हशीइतके मोठाले धोंडे हायेत,येळ तर लाग्णारच की !" धोंड्यांच्या आकारांची म्हशीशी केलेली तुलना आवाक्याबाहेरची होती. पण डोळ्यापुढे त्याने चित्र उभे केले की किती आणि कसे दगड असतील.

एकदा नानूचा भाऊ आणि नानू घरी आले होते. नानूच्या भावाबरोबर त्याच्या गावातला कोणीतरी नातलग असावा. कारण ते एकमेकाशी अगदी आस्थेवाईक पद्धतीने बोलत होते. त्या सदगृहस्थाबरोबर त्याची तिशीतली पत्नी होती. अगदी टिपिकल लमाणी वेश तिनं परिधान केला होता. त्यावर जागोजागी कलाकुसर केलेली होती. चलनी नाण्यांची अन नक्षीची कलाकुसर केलेल्या त्या घागरा चोळीवर रंगतदार वेलबुट्टी खुलून दिसत होती. घट्ट आणि एकरेषीय भांगेत तिनं केस विंचरलेले होते, तिच्या केसांना चांदीची आभूषणं लटकत होती. कपाळावरचं पदक खुलून दिसत होतं, मात्र तिची सारी नजर जमिनीकडे होती अन वारंवार मागे सरकणारा पदर ती थेट नाकापर्यंत खाली ओढत होती. तिच्या बरोबर असणारी तिची पाचसहा मुले काही केल्या एका जागी शांत बसत नव्हती. त्यातलं एक तिच्या मांडीवर होतं अन एक पाठीला टेकून उभं होतं तर दोघे तिच्या पदराचे टोक धरून उभे होते. दुसऱ्या दोघातलं एक अगदी दटावून सांगून आणलेलं असावं. ते अंग चोरून अन तोंडाचा चंबू करून बसलं होतं. एक इरसाल पोरगं मात्र तिच्या आणि तिच्या नवऱ्याचा भोज्जा करून इकडून तिकडं पळत होतं, शेवटी त्याच्या बापानं पुढं जाऊन त्याला अडवलं अन धोतराच्या सोग्यात गुंडाळलं तसं ते पोरगं आतून ढूसण्या देऊ लागलं. मग इतका वेळ वडिलांशी बोलत असणारा नानू पुढं झाला न त्याने त्या पोराच्या बखोटयाला धरून घराबाहेर ओढतच नेले. इतका वेळ ह्या सर्वांचे बारकाईने निरीक्षण करणारे वडील त्याला ओरडून म्हणाले, "अरे अरे काय करतोस ? पोराला का ओढतोस ?"
त्या सरशी नानू उत्तरला - ह्ये अमोशेचं हाय, ह्येला असंच करावं लाग्त मंग ते सरळ हुतंय !"
वडील काय बोलतात ते ऐकत बसलं की प्वार अजून रंग उधळत राहणार हे त्यानं ताडलं होतं म्हणून त्याची वळकटी आवळून त्याला घराबाहेर नेलं होतं. वडील बोलता बोलता पुढे आले त्यांनी त्या बाईच्या पाठीशी रेलून उभ्या असलेल्या पोराला उचलून कवेत घेतले. ते पुढे त्या नवरा बायकोकडे बघत नानुला म्हणाले - " पोर अमोशेचं आहे असं हिणवून का बोलतोस ? त्यात काय असतं रे ? आणि इतकी पोरं रे कशी यांनी होऊ दिली ? बिरोबाला काही नवस बिवास बोलला होता की काय ?"
या प्रश्नाची नानू जणू वाटच बघत होता. तो त्या दोघांकडे बघत आपण फार शहाणे असल्याचा अविर्भाव चेहऱ्यावर आणत उत्तरला - "ह्या दोघांना अक्कल असती तर असं झालं असतं का ?शेळीच्या लेंड्या पडाव्यात तशी पटापटा लेकरं झाली नसती यांना !"
नानूच्या या उत्तराने सारा संवाद खाडकन बंद झाला !

वडिलांनी कवेत घेतलेल्या मुलाचे नाक साफ केले, जवळच्या हातरुमालाने त्याचा चेहरा स्वच्छ केला. त्यांना स्वच्छतेचा भारी सोस होता. आमच्या लहानपणी सगळ्या भावंडांची नखे कापणे, वारकाकडून हजामत करून घेणे, दगड घेऊन खसखसून अंघोळ घालणे आणि जंताचे तांबूस गोड औषध पाजणे ही कामे त्यांच्या आवडीची असत अन आमच्या अत्यंत नावडत्या बाबीत ही कामे सर्वोच्च स्थानी होती.

नानू वडिलांना भेटायला येताना बहुतांश वेळी एकटा सडा साटाच यायचा, त्याच्या पत्नीला तो कधीच आणत नसे.एकदा वडील म्हणाले, "एकटा कसा येतो रे ? बायकोला का आणत नाहीस बरोबर ? तिलाही जग बघायला मिळेल, चार गोष्टी शिकता येतील !"
त्या सरशी नानू उत्तरला - "तिला काय आणायचं ? बाभळीत अन तिच्यात काय फरक ? ना आकार ना वकार. ना रूप ना गुण !"
नानूच्या उत्तराने वडील चपापले. ते त्याला म्हणाले, "अरे बिन पाण्याचे कुठल्याही दुष्काळात जगणारे झाड आहे ते, त्याला ना रोग ना किडा ! बारमाही उन्ह पावसात उभी असते बाभळ. बोरी बाभळी शिवाय बांधाला शोभा येत नाही अन चाफा मोगरा खाऊन जनावरं जगत नाहीत पण निदान शेळ्या मेंढ्या बाभळीवर जगू शकतात ! बाभूळ जळाली तरी तिचे लाकूड कामाला येते, तिच्या काटयाचा सल तिच्याच वेदना सांगतो, उगाच तिचा काटा मोठा असत नाही ! कोणतीही सबब न सांगता पुढच्या वेळेला तिला घेऊन ये !"
वडिलांच्या आज्ञेसमोर त्याचे काही चालले नाही. पुढच्या वेळेस येताना तो सपत्नीक आला तेन्व्हा आईने त्याच्या बायकोला चोळी बांगडी केली तेंव्हा तिच्यापेक्षा जास्त आनंद त्याच्या चेहऱ्यावर विलसत होता. बहुधा त्याला बाभळीचे मोल कळाले असावे...

नानू असो वा गावाकडील शेतातले इतर गडी असो त्यांचं सर्वांचच बोलणं असच अघळपघळ होतं. बारीक पाऊस पडून गेला तर, 'एव्हढूसं भूरंगट पडून गेलंय पाय दिकून ओल्ला झालं न्हाईत तिथं मातीचं काय घेऊन बस्लासा' असं ऐकायला मिळे. कितीही पाऊस पडो यांचं एकच पालुपद असे, "रान अजून हडकलेलंच हाय !", तरीदेखील दरसाली ते सगळेच जण 'औंदा बक्कळ पाऊस होणार' असं म्हणत. मात्र असं म्हणतच पावसाळा निघून जायचा अन हे सारे निराश न होता एकमेकाची समजूत घालायचे. मग सदाशिव काका म्हणायचे, "माणसाची नियत बदललीय तिथं निसर्गानं का बदलू नये. आपण ज्या हाताने देतो त्याच हाताने आपल्याला घ्यावं लागतं."

आमचं घराणे वारकरी भागवत धर्माचे, १९७२च्या दुष्काळात आजोबांनी पिके जाळून सारं पाणी गावाला अन मुक्या जनावरांना दिलं होतं. तोच वसा जपणारे माझे हे काका आजही वाडवडिलांच्या आठवणींने भारून जातात, तेही हाडाचे वारकरी आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटणे साहजिक आहे की मनुष्य जे निसर्गाला देतो तेच निसर्ग परत देतो. साधंसोपं तत्वज्ञान ते आणखी सुलभ शब्दात मांडतात. माझे दुसरे चुलते त्यामामानाने कमी बोलतात मात्र जेंव्हा कधी बोलतात तेंव्हा अगदी मार्मिक बोलतात. "वर जाऊन तूच सांगावा धाड म्हणजे पाऊसबी मोठ्ठा होईल अन इथलं वज्ज कमी होईल, खायला कहार अन भुईला भार" असं शेलक्या शब्दात ते समोरच्याला सुनावत.

माझ्या बालपणी आजीला मदतीसाठी गावातील काही अन नात्यातल्या काही बायका राबायच्या. त्यातच एक होती अनुसया, गालावर भली मोठी काळी म्हैस असणारया सडपातळ अनुसयेचा आवाज मात्र अगदी पहाडी होता. "गाबडयांनो व्हता का न्हाई बाहेर !" असा तिने इशारा जरी दिला आमच्या सर्व बहिणभावंडाना पळता भुई थोडी व्हायची. तिच्या तोंडात अनेक गावंढळ शब्द अन शिव्या असत. केरसुणे, भवाने, हेकणी, सोकाळ, चादड, गतकाळे, दातवाशी, माकडतोंडे, वकटया, वाणमाऱ्या, टवाळ, चाटळ अशी ढीगभर विशेषणे ती मुक्त हस्ते वापरत असे अन त्याच बरोबर हात देखील चालवत असे. तिचा वाळून गेलेला हात अंगावर नक्की वळ उमटवत असे, अनुसया मायेची होती. मात्र तिचे वरवरचे वागणे असं एखाद्या खविसासारखं असायचं. तिच्या तोंडात एक शिवी कायम असायची - 'ढालगज भवानी' !

मी एम.ए.ला असताना कुतूहलाने या शब्दाचा अर्थ जाणून घेतला तेंव्हा फार रंजक माहिती मिळाली. भवानी नावाची एक हत्तीण पेशव्यांच्या पदरी होती. त्यांच्या स्वारीत तिला अग्रस्थान असे. तिच्या गंडस्थळावर विशाल ढाल असे अन तिला मस्तपैकी सजवलेले असे, मोठ्या रुबाबात ही ढाल धारण करणारी भवानी हत्तीण (गज) पुढे चाले अन तिच्या मागुन फौज जाई. पुढं पुढं करणाऱ्या बाईला उद्देशून हा शब्द वापरला जातो असे कळल्यावर मला काही क्षण वाटले की अशिक्षित अनुसया पेशव्यांच्या सेवेतून आमच्या आजीकडे आली असावी !

गावातली माणसे असले कोणतेही शब्द वापरत असली तरी त्यांची मने शुध्द असतात, त्यात छक्केपंजे नसतात. विठठलाच्या अबीर बुक्क्याचा अद्भुत गंध त्यात असतो, त्याच्या चिरमुऱ्याच्या प्रसादासारखा साधेपणा त्यात असतो, बत्ताशा सारखी गोडी त्यात असते, त्याच्या दर्शनातल्या दुर्दम्य ओढीसारखी ओढ त्यात असते, त्याच्या चेहरयासारखा सात्विकपणा त्यात असतो अन सरते शेवटी त्याच्या भक्तीसारखा सच्चेपणा त्यात असतो. त्यात शब्दश्रुगांराची आरास नसते, नाटकीपणा नसतो अन आत्मप्रौढीही नसते. गावाकडची साधी भोळी माणसे आजही माझ्या चुलत्या काक्यांच्या रूपाने आजूबाजूला वावरत असतात. मी हे माझ्या गतजन्माच्या पुण्याचे संचितच समजतो.

बोराटीचा पाला पडावा तशा आठवणींच्या सरी कोसळत राहतात. काही वर्षांपूर्वी घर बांधताना नंतर घेतलेले शेत वडिलांनी विकले अन टोलेजंग घर बांधले. मात्र वडिलोपार्जित शेत वाट्यास असल्याने त्यांची शेतीची हौस पूर्ण होई. जेंव्हा कधी आभाळात मेघांनी दाटी केली की ते हमखास गावाकडे फोन लावतच. आता वडीलही नाहीत अन नानू राठोड त्याच्या गावी गेला आहे. आता आभाळही पूर्वीसारखे भरून येत नाही. मी मात्र बसल्या बसल्या आभाळाकडे पाहत असतो. कधी एखाद दुसरा ढग काळा झाला तर हात फोनकडे जातो मात्र पुढचे बोलवत नाही. आता आमचे शेत खंडाने करायला दिले आहे. काका आणि भाऊ तिकडे अधून मधून चक्कर मारतात अन तिथली हालहवा सांगतात. पावसाचा विषय निघाल्यावर शेवटी काकाच सांगतात, "बापू पाऊस चांगला झाला बरं का ! पांडुरंगाने आपलं गाऱ्हाणं ऐकलं बर का !"
ते प्रसन्न वदनाने पावसाचा वृत्तांत सांगत असतात अन आभाळात मला वडिलांच्या चेहऱ्याचा भास होत राहतो ......

शेवटी पाऊस म्हणजे तरी काय असतो, वाडवडिलांचा सांगावा आभाळातून घेऊन येणारा तो आपलाच एक भाऊबंद असतो, त्यांच्या आनंदाश्रूंचाच एक खारट थेंब असतो !!

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/05/blog-post_92.html

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

छान आहे लेख.गावाकडच्या आठवणी कायम रम्य असतात. मी माझ्या गावाकडच्या आठवणी येथे लिहिले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com