चित्रपट रसग्रहण कार्यशाळा- एक अनुभव !

सिनेमा हे भारतीय समाजाचे अभिन्न अंग आहे.सिनेसंगीत तर दुधात साखर विरघळावी तसे आपल्या रोजच्या जीवनात एकरूप झाले आहे. असे असूनही आपण सिनेमा या व्यवसायाकडे पुरेशा गांभीर्याने बघत नाही.टीव्हीवर सर्रास रोज सिनेमे दिसायला लागेपर्यंत सिनेमागृहात जाऊन ते बघण्याला पर्याय नव्हता. आता एचबीओ, स्टार मूव्हीज, वर्ल्ड मूव्हीज अश्या अनेक वाहिन्यांमुळे भरपूर इंग्रजी आणि इतर भाषिक सिनेमे घरबसल्या सहज बघता आल्याने,बऱ्याच हिंदी सिनेमांंच्या मूळ प्रेरणांचं आकलन झालं. केबलवर बरेच सिनेमे पाठांतराला लावल्यासारखे कायम उपलब्ध असतात. चॅनल सर्फिंग करताना ते टाळून चांगले पर्याय शोधणे अखंड सुरु असते,पण बहुतेकवेळा निराशा होते.२००९ साली माझी फेस्टिव्हलवाल्या वर्ल्ड सिनेमाशी ओळख झाली आणि मला सिने मोंटाज या फिल्म सोसायटीबद्दल माहिती मिळाली. दर रविवारी सातत्याने वर्ल्ड सिनेमाचे स्क्रीनिंग करणारी नागपुरातली पहिली आणि एकमेव 'सिने मोंटाज' ही फिल्म सोसायटी तेंव्हापासून मी जॉईन केली आहे. जगातले अनेक अफलातून आणि अविस्मरणीय सिनेमे पाहण्याची संधी इथे लाभल्याने, एका नव्याच अदभूत दुनियेशी माझा परिचय झाला.मी इथे अॅबसर्डिटी, आभास, स्वप्न आणि वास्तव यांचा चकित करणारा खेळ पाहिला. आत्महत्या करायला निघालेले लव्हसिक गाढव, एका पिकून जर्दाळू झालेल्या गोड म्हाताऱ्यानं केलेलं उंटिणीचं बाळंतपण, स्वप्नातल्या स्वप्नात सांगितलेल्या इंद्रजाल कथा, तसंच हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या अद्भुत जलाशयात तरंगत्या मोनॅस्ट्रीमधे शिष्यासह राहणाऱ्या बौद्ध माँकची कथा अशा अनेक अलौकिक नजराण्यांमुळे मंत्रमुग्ध झाले. अशा प्रकारच्या स्मरणीय सिनेमांच्या शोधात मी होते हे आकलन झाल्यानं, आता हे आगळेवेगळे सिनेमे मला चिकाटीनं जाणून घ्यायचे आहेत.

सिनेमाच्या विविध पैलूंबद्दल तपशीलात जाणून घेण्यासाठी एखादी तरी चित्रपट रसग्रहण कार्यशाळा करावी असा विचार गेले काही वर्ष सुरु होता.माझ्या पुण्यातील मित्राने फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित होणाऱ्या एक महिन्याच्या आणि नंतर एकदा सात दिवसांच्या कार्यशाळेची माहिती तेंव्हा दिली होती.कार्यालयातून एक महिना सुट्टी घेऊन जाणे शक्य नव्हते.सहसा अशा कार्यशाळा मुंबई आणि पुणे इथेच आयोजित होत असल्याने जाणे शक्य झाले नाही.

येत्या जानेवारी महिन्यात ऑरेंजसिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नागपुरात आयोजित करण्यात येतो आहे.या निमित्ताने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या चित्रपट रसग्रहण कार्यशाळेने या महोत्सवाचा शुभारंभ झाला.कार्यशाळेसाठी आलेल्या सिनेरसिकांनी, रविवारी सकाळी पर्सिस्टंट कंपनीचे अत्याधुनिक सभागृह खच्चून भरले होते. सुप्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अधिष्ठाता आणि प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक, निर्माते प्रा. समर नखाते यांच्यासारख्या बहुआयामी गुरूंनी, सिनेनिर्मिती प्रक्रियेचे तत्वज्ञान अत्यंत बहारदार पद्धतीने उलगडून नागपुरकर सिनेरसिकांना मंत्रमुग्ध केले.

सिनेमाचा चालता बोलता ज्ञानकोश प्रा. समर नखाते यांनी, रंगमंचीय अवकाशाचा सहज आणि संपूर्ण उपयोग करून, सिनेमातील दृश्य चौकट, दिग्दर्शन,संगीत,अवकाश आणि कॅमेऱ्याचा उपयोग या विविध पैलूंचे साभिनय सादरीकरण करून चटकदार आणि पौष्टिक मेजवानीच दिली.विषयाचं सखोल ज्ञान आणि ज्ञानदानातल्या लालित्यामुळे या फिल्म गुरूंनी नागपूरकरांना जिंकलं. शब्द ही साहित्याची, तर प्रतिमा ही चित्रपटांची भाषा असते.एक चांगली कलाकृती तुम्हाला उत्तम मानव होण्यास मदत करते असे त्यांनी सांगितले.कथा आणि अभिनय यापेक्षा अनेक प्रतीकात्मक पैलू प्रतिभावान दिग्दर्शकाच्या सिनेमातून बघायचे असतात.सिनेमा या माध्यमात काळ आणि अवकाश यांचा मनोहर खेळ सुरु असतो. सिनेमाच्या शीर्षकापासून शेवटच्या श्रेयनामावलीपर्यंत अतिशय मेहेनत घेऊन केलेल्या चित्रपटाला, प्रेक्षक गांभीर्याने पाहून न्याय देत नाही अशी तक्रार त्यांनी केली. सिनेमा थिएटरमध्ये पॉपकॉर्न खाणे, मोबाईलवर बोलणे आणि निव्वळ मनोरंजन आणि गॉसिपचे साधन म्हणून चित्रपटसृष्टीकडे पहाणे, या पलीकडे आपण भारतीय सिनेमाला फारसे महत्व देत नाही. कुठल्याही सिनेमाचा आस्वाद घेताना त्याची प्रसिद्धी , रेटिंग आणि पूर्वग्रह यांचे गाठोडे बाजूला ठेवून एक कलाकृती आणि आस्वादक या नात्याने त्याचा आनंद घ्या असे ते म्हणाले.
मानवाला दोन डोळे आहेत.कॅमेरा या तिसऱ्या डोळ्याने दाखवली जाणारी दुनिया आपण चित्रपटांच्या माध्यमातून पाहतो. कॅमेऱ्याचा डोळा मुक्त आहे. कॅमेरा अँगल्स , एडिटिंग, लाइटिंग या घटकांची ओळख करून देताना त्यांनी, डोंबिवली फास्ट’, स्वदेस’ सायको, शिंडलर्स लिस्ट आणि टायटॅनिक सारख्या चित्रपटांचे व्हिडीओ दाखविले.सायको सिनेमातल्या एका खुनाच्या फक्त ४५ सेकंदाच्या दृश्याची परिणामकता वाढविण्यासाठी हिचकॉकने तब्बल ७८ दृश्यचौकटी वापरल्या होत्या हे जाणून थक्क झाले.यु ट्यूब आणि टोरेंटद्वारा वर्ल्ड सिनेमाचा खजिना आता इंटरनेटकृपेने किती सहज हाताशी आला आहे हे अजूनही मला अविश्वसनीय वाटतं. मोबाईलवर चित्रपट पहाणे किंवा ‘टोरेंट’सारख्या साइटवरून चित्रपट डाऊनलोड करण्यापेक्षा थेट चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे यालाच सुसंस्कृतपणाचे लक्षण म्हणता येईल, असे मत प्रा. समर नखाते यांनी मांडले.

डॉ. जब्बार पटेल यांनी चित्रिकरणाच्या वेळी एकेक शॉट घेताना उदभवणारी संकटे,चित्रपटासाठी वापरण्यात येणारे फिल्मचे प्रकार आणि चित्रपटाची प्रकाशयोजना या विषयी रंजक आणि उदबोधक माहिती दिली.डिजिटल क्रांतीमुळे फिल्मवर चित्रपट रेकॉर्ड करणे बंदच झाले असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.दिलीपकुमार यांच्या अंडर प्ले या अभिनय शैलीचा उगम कसा झाला याची साभिनय झलक सादर करून धमाल उडवून दिली.भारतीय सिनेमाचे जनक स्व.दादासाहेब फाळके यांनी सिनेमा हा विषय शाळेपासूनच विद्यार्थ्यांना शिकवला पाहिजे असे म्हटले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. डॉ.जब्बार पटेल आणि प्रा. समर नखाते यांनी विद्यार्थ्यांना कॅमेराशॉट संबंधी तांत्रिक माहिती दिली.

चित्रपट ही करमणुकीसोबतच एक अभ्यासपूर्ण ,सामुहिक कलासाधना आहे.कुरोसावा, इंगमार बर्गमन आणि तारकोव्हस्की, असे अनेक बुद्धिमान दिग्दर्शक समजून घेणे अवघड आहे, पण माझा प्रयत्न सुरू आहे. जफर पनाही, किस्लोवस्की, केस्तुरिका, माजिदी आणि कोरियन दिग्दर्शक किम की दुक याच्यासह काही जपानी, चिनी दिग्दर्शकांचे विस्मयचकित करणारे सिनेमे बघितले आणि आजन्म त्यांच्या ऋणात बांधली गेले. या अथांग सिनेसागरातून माझ्या ओंजळीत जे काही आले ते अनमोल आहे. असीम शांती, इंद्रधनुष्यी स्वप्ने, स्वर्गीय संगीत, अलौकिक प्रतिभा, अद्भुत कथा आणि अनुपम अभिनय यांच्या गारुडाने मला या रोमांचक कलेच्या विळख्यात बंदिस्त केले आहे.चित्रपट या विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे हे माध्यम समजून घेण्यासाठी सातत्याने अशा प्रकारच्या कार्यशाळा होणे आवश्यक आहे. उत्कृष्ट आयोजनाची साथ लाभलेल्या या एक दिवसीय कार्यशाळेतून मला चित्रपटविषयक जाणिवा समृद्ध करण्याची एक बहुमोल संधी मिळाली.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेख आवडला. तुम्ही पाहिलेल्या काही अविस्मरणीय चित्रपटांची इथे ओळख करुन द्यावी, अशी विनंती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोठे लेख लिहायचा कण्टाळा असल्याने शिवाय कसलाही फारसा अभ्यास नसल्याने , 'अलिकडे काय पाहिलत ' मधे एखादा चित्रपट आवडला किंवा अगदीच बकवास असला तर एखादा परिच्छेद लिहिण्याची सोय माननीय सम्पादकांनी करून ठेवल्याने मी आजन्म उपकृत झाले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या "उसंत सखु" शैलीत चित्रपट कथा वाचायला मजा वाटेल.

लेख फारसा मोठा नसला तरी चालेल. आणि आभ्यास असायलाच हवा असा काही आग्रह नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

अनुमोदन. (तिरशिंगराव यांच्या प्रतिसादाला )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सदर कार्यशाळेला मीही सदेह उपस्थित होतो. आपण म्हटल्याप्रमाणे कार्यशाळेचा कार्यक्रमही उत्तमच झाला. आपण मुरलेले प्रेक्षक आहात असे वाटते परंतु नवीन लोकांच्या दृष्टीने जरा तो क्रॅश कोर्स झाला. असो.

बाकी उत्कृष्ट लेखन !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

उसंत सखू या आयडीकडून असल्या प्रामाणिक लेखाची अपेक्षा नव्हती. लेख सुरू झाल्यानंतरही बराच वेळ "आता हशिवनार, हां, हशिवनार" असा विचार करत यात नक्की तिरकसपणा कुठे आहे, आणि असल्यास तो किती लघुकोनी आहे का वगैरे विचार करत होतो. पण तो काही सापडला नाही. असो.

आता त्या अपेक्षाभंगाच्या पलिकडे जाऊन असं म्हणता येतं की मुंबै-पुणे या महाराष्ट्राच्या डाव्या बाजूच्या छोट्याशा डबक्यात सांस्कृतिक लाटा उमटण्याऐवजी आता महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याही केंद्रात असलेल्या नागपुरात या लहरी उत्पन्न व्हायला लागल्या हे पाहून बरं वाटलं. दोन वर्षांपूर्वी झालेल्या सत्ताबदलाचा हा परिणाम असेल-नसेल, पण केंद्रस्थानी निर्माण झालेल्या लहरी भारतभर पसरतील ही आशा आहे.

अवांतर - समर नखाते काहीतरी बोलले आणि ऐकणारांना ते समजलं यामुळे नखातेंबद्दलचा आदर कमी व्हावा की उसंत सखूंबद्दलचा आदर वाढावा या समरप्रसंगात मी सापडलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संपूर्ण रंगमंचावर लीलया वावरणारी त्यांची लहानशी मूर्ती,त्यांचा उपहास, नाट्य,किंचित नृत्य आदी साभिनय शिकवणे लाजवाब आहे . हॅटस् ऑफ टू सिने गुरुजी समर नखाते.
टीप : ललित लेखन विनोदी नसलं तरी चालतंय की हो राजेश्राव Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सायको सिनेमातल्या एका खुनाच्या फक्त ४५ सेकंदाच्या दृश्याची परिणामकता वाढविण्यासाठी हिचकॉकने तब्बल ७८ दृश्यचौकटी वापरल्या होत्या ...

माहितीचे छोटेछोटे गोळे इकडेतिकडे सरकवून आपण फार हुशार, ज्ञानी आहोत असं दाखवण्याची फॅशन नवीन आहे असं वाटत नाही; पण त्या माहितीला योग्य चौकट असेल तर ती चारचौघांवर इंप्रेशन मारण्यासारखा ट्रिव्हीया न राहता, माहितीचा आकलनसाठी उपयोग होतो. ह्याचं उदाहरण अनुभवताना तुम्हाला मजा आली असेल ह्याबद्दल शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१११११११

कदाचित नंतर हिचकॉक ची कॉपी म्हणुन ( कींवा स्वता हिचकॉक स्वताच्याच प्रेमात पडुन ) ८० फ्रेम वापरल्या असतील. पण १ आहेत का,१० आहेत का ८० फ्रेम आहेत ह्यानी त्यातली मजा आणि दर्जा ठरत असता तर फारच सोप्पे झाले असते ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0