मोबाईल फोनच्या वापराने कर्करोग होतो का नाही ? भयंकर पेचात टाकणारा हा प्रश्न ! आजकाल प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा कारण जगातील बहुसंख्य लोक आता ‘मोबाईलधारी’ झालेले आहेत. मग काय आहे या त्रस्त करणाऱ्या प्रश्नाचे उत्तर ? जरा थांबा. न्यायालयात उलट तपासणी घेणारा वकील जेव्हा गुळूमुळू किंवा मोघम उत्तर देणाऱ्या साक्षीदाराला ‘हो’ का ‘नाही’ असे खडसावून विचारतो तसे मला किंवा शास्त्रज्ञांना विचारू नका ! कारण, आजच्या घडीला तरी या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ आणि ‘नाही’ या दोन पर्यायांच्या मध्ये कुठेतरी आहे.
उत्तर समजण्यासाठी जगात आजपावेतो झालेल्या संबंधित संशोधनाचा थोडक्यात आढावा घेतो. या लेखातील माहिती ही अधिकृत वैद्यकीय संस्थळावरून घेतलेली आहे, वृत्तपत्रातील बातम्यांवरून नाही. लेखासाठी वापरलेला शेवटचा संदर्भ ऑगस्ट २०१६ चा आहे.
या विषयावर १९९० पासून आजपर्यंत अनेक देशांत ३० मान्यताप्राप्त संशोधन अभ्यास झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष अगदी टोकाचे उलट सुलट आहेत. त्यामुळे आपणच काय पण शास्त्रज्ञ सुद्धा अगदी गोंधळात पडले आहेत, हे नक्की. वाचकांचा कमीत कमी गोंधळ व्हावा असा प्रयत्न करत या विषयाचे थोडक्यात खालील मुद्दे मांडतो.
१) मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या लहरी या ‘ RF रेडिएशन’ प्रकारच्या असतात.
२) या लहरींमुळे होऊ शकणाऱ्या कर्करोगाच्या संशोधनाचा मुख्य झोत आपला मेंदू व लाळग्रंथी यांवर आहे.
३) मोबाईल प्रचंड प्रमाणात वापरणाऱ्या लोकात मेंदूचा ‘ glioma’ हा रोग होण्याची शक्यता खूप आहे.
४) बरेचसे अभ्यास हे 2G फोन लहरींच्या संदर्भातले आहेत. काही अभ्यासामध्ये प्रयोगशाळेत ‘सेल कल्चर’ चा वापर झाला तर काहींमध्ये प्राण्यांवर प्रयोग झाले.
५) या फोनलहरी कर्करोगकारक (carcinogenic) आहेत की कर्करोगसहाय्यक (cocarcinogenic) या बाबतीत संशोधकांमध्ये खूप मतभेद आहेत. दोन्ही गट आपापल्या मतावर ठाम आहेत. अगदी आस्तिक व नास्तिक याप्रमाणे !
६) मोबाईलच्या शोधापूर्वी कर्करोग होण्याची जी कारणे प्रस्थापित झाली आहेत त्यामध्ये जनुकीय बदल (mutations) व अनेक प्रकारच्या रसायनांशी जवळचा व दीर्घकालीन संपर्क आणि विविध प्रकारची रेडीएशन ही महत्वाची आहेत. तंबाकूचे सेवन हे त्यापैकी एक उदाहरण.
७) त्यामुळे, शरीरात अयोग्य जनुकीय बदल झालेल्या एखादा माणूस जर दीर्घकाळ तंबाकूचे सेवन करीत असेल( किंवा अन्य रेडीएशन च्या संपर्कात असेल) आणि जोडीला त्याला मोबाईलचेही व्यसन जडले असेल तर त्याला कर्करोग होण्याची शक्यता अधिक आहे यावर बऱ्याच संशोधकांचे एकमत दिसते.
८) ‘मोबाईल मुळे कर्करोग होतो’ या विधानापेक्षा ‘ शरीरात अगोदरच असलेली कर्करोगपूरक परिस्थिती मोबाईलमुळे अधिक रोगपूरक होते’ हे विधान अधिक मान्य होण्यासारखे आहे.
९) असे संशोधन प्राण्यांपेक्षा अधिकाधिक प्रमाणात थेट माणसांवर होणे आवश्यक आहे. परंतु, सध्या त्याला एका कारणाने मर्यादा येत आहेत.
संशोधन करताना माणसांचे २ गट करावे लागतात. एक गट अति मोबाइलचा वापर करणाऱ्यांचा तर दुसरा अजिबात मोबाईल न वापरणाऱ्यांचा. आता बघा, पहिला गट मिळणे अगदी सोपे आहे कारण सध्या ‘मोबाईल-अतिरेकी’ अगदी पोत्याने सापडतील. पण, अजिबात मोबाईल न वापरणारी माणसे खरेच दुर्मिळ आहेत ! प्रयोगापुरती तयार करायची म्हटली तरी त्याना दीर्घकाळ ( १०-२० वर्षे !) मोबाईलविना जगावे लागेल.
अहो, माणूस एकवेळ दारू-सिगरेट सोडेल हो, पण मोबाईल, छे काहीतरीच काय !
१०) तेव्हा सध्या एवढे करता येईल की ज्या व्यक्ती कर्करोगजन्य घटकांच्या संपर्कात आहेत (उदा. तंबाकू किंवा अन्य रेडीएशन) आणि मोबाईलचा अतिरेकी वापर करीत आहेत त्यांच्यावर दीर्घकाळ देखरेख व संशोधन करावे लागेल कारण गाठी तयार करणाऱ्या कर्करोगाची (solid tumors) वाढ ही संथ असते.
तर वाचकहो, अशी आहे ‘मोबाईल व कर्करोग’ या वादग्रस्त गृहीतकाबाबतची आजची परिस्थिती. समाजात यावर मतांतरे असणारच. शास्त्रीय वादविवादही झडत राहणार. कुठलाही ठोस निष्कर्ष काढणे सोपे नसणार. पण, मोबाईलचे व्यसन लागू न देता त्याचा मर्यादित वापर करणे आपल्या सगळ्यांच्याच हिताचे आहे यात शंका नाही.
********************************************************