राकुगो

मध्ये काही कारणामुळे मला, पुण्यात मी पाहिलेल्या एका जपानी कार्यक्रमाची, आठवण झाली. मी काही वर्षांपूर्वी(२००४) पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून भारतविद्या(Indology) शिकत होतो. त्यावेळेस समजले की तेथे जपानी भाषेचे अभ्यासक्रम आहेत. अगदी BA, MA वगैरे देखील आहेत. पुणे आणि जपान मध्ये, भाषेच्या निमित्ताने म्हणा, ओद्योगिक क्षेत्रातील सहकार्यामुळे म्हणा, बरीच देवाणघेवाण होत असते. त्यामुळे जपा संबंधित प्रदर्शने, किंवा इतर कार्यक्रम नेहमीच होत असतात. २०११ मध्ये आमच्या ग्रुप मध्ये एक निरोप आला की जपानी कलाकाराचा एक कार्यक्रम होणार आहे. तो कार्यक्रम होता जपानच्या परराष्ट्रखात्याच्या मुंबईतील दुतावासातर्फे(Japan Consulate), पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात, आयोजित केला होता. निमित्त होते, जपान आणि भारत यांच्यात राजकीय संबंध प्रस्थापित होवून ६० वर्षे झाली होती. मी तो कार्यक्रम पाहायला गेलो होतो. आज त्याबद्दल लिहायचे आहे.

आपल्याकडे जसा एकपात्री कथाकथनाच प्रयोग असतो तसा हा कार्यक्रम होता. अमेरिकेत किंवा इतर पाश्चात्य देशात जसे one man stand-up show असतात त्याच धर्तीवर. कार्यक्रमाचे नाव होते राकुगो(Rakugo) आणि सादर करणार होते उताझो कात्सुरा(Utazo Katsura) हे कलाकार. खरे पहिले तर राकुगो हे कलाप्रकारचे नाव आहे. आम्हाला त्या कार्यक्रमाची माहिती देणारे एक पत्रक देण्यात आले. पत्रकावरून मला असे समजले होते, तो एक कथाकथनाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम सुरु झाला. हा कलाप्रकार प्रामुख्याने जपानी भाषेत सादर करतात. पण तो त्या दिवशी इंग्रजी मध्ये सादर करण्यात आला, कारण उघड आहे. पुण्यातील जपानी शिकणारी विद्यार्थी, किंवा जपानी जाणणारे जे आले होते, पण ते मोजकेच होते. सामान्य लोकांना ह्या जपानी कथाकथनाच्या शैलीची माहिती होण्यास त्यांनी इंग्रजी मध्ये तो ठेवला होता. एकूण तीन कथा, किंवा किस्से विनोदी पद्धतीने कथन केले जाणार होते. सुरुवातीला राकुगो म्हणजे काय आणि तो सादर करणाऱ्या कलाकाराची ओळख करून देण्यात आली. राकुगो म्हणजे, विशिष्ट्य पद्धतीने(वज्रासनासारखे आसन) जमिनीवर बसून केले कथाकथन, आणि विनोदाची झालरही असते. हा एक पारंपारिक जपानी कलाप्रकार(Japanese sit-down comedy show) आहे. तुलनाच करायची असेल, तर आपल्याकडे प्रा. लक्ष्मण देशपांडे यांनी जसे ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ सादर करत तसे काहीसे म्हणता येईल. उताझो कात्सुरा हे Rakugo Master आहेत आणि १९९१ पासून ते हा कलाप्रकार जगभर सादर करतात. उताझो कात्सुरा यांनी किमोनो(kimono) सारखे जपानी वेशभूषा परिधान केला होता. हातात एक हात-पंख, आणि हात-रुमालासारखे वस्त्र होते.

त्या दिवशी तीन कथा सादर करण्यात आले. पहिल्या कथेचे नाव होते तोकीसोबा(Tokosoba). त्यात एका भोळ्या विक्रेत्याची कहाणी गोष्ट त्यांनी अतिशय खुमासदार रीतीने सांगितली. त्यानंतर गोन्सुके झकाना(Gonsuke Zakana) नावाची कथा होती, ज्यात नवऱ्यावर सारखा संशय घेणाऱ्या बायकोची गोष्ट होती(संशयकल्लोळ आठवले ना?). तिसरी कथा आता आठवत नाही. साधारण तासभर हा कार्यक्रम चालला. उताझो कात्सुरा हे मोठ्या उत्साहात, वेगवेगळे अविर्भाव, आवाजात चढ उतार, वेगवेगळया पात्रांच्या तोंडचे संवाद म्हणत, हातवारे करत, आणि चेहऱ्यावर वेगवेगळे भाव-भावना, या सगळ्यातून समोर ती गोष्ट करत होते. तेच ह्या कलाप्रकारचे वैशिट्य आहे.

मानवी स्वभावाचे पैलू उलगडणाऱ्या, आणि त्याची वैश्विक सत्यता पटवून सांगणाऱ्या ह्या गोष्टी ज्या तऱ्हेने सांगितल्या जातात, ते पाहून मजा येते. आपल्याकडील कीर्तनात अश्या छोट्या छोट्या गोष्टीत, प्रामुख्याने प्रबोधनपर सांगितल्या जातात. इथेही तेच उद्दिष्ट सुरुवातीला तरी होते, पण कालांतराने मनोरंजन हे उद्दिष्ट राहिले. हा पारंपारिक कलाप्रकार, मोठा इतिहास असलेला आहे. पण जपान मध्ये नवीन कलाकार पुढे जितके यायला हवे आहेत, तितके येत नाहीत. त्यामुळे परंपरेच्या अस्तित्वाचा प्रश्न पुढे राहतो. जपानी ललित कला, जसे की नाटक, लोकनाट्य, चित्रपट, नृत्य इत्यादी यांचे प्रयोग पुण्यात आणखी व्हायला हवेत. पुण्यात नाही म्हणायला जपानी चित्रपट महोत्सव होत असतात अधून मधून. जपानी समाज, जपानी संस्कृती समजावून घेण्यास असे कलाप्रकार नक्कीच मदत करतात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

छान!

मानवी स्वभावाचे पैलू उलगडणाऱ्या, आणि त्याची वैश्विक सत्यता पटवून सांगणाऱ्या ह्या गोष्टी ज्या तऱ्हेने सांगितल्या जातात, ते पाहून मजा येते.

नक्कीच रोचक असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0