माझे पहिले क़्विल्ट

एक दिवस इंटरनेटवर असेच काहीबाही करता करता मला ‘क़्विल्ट’ या प्रकारचा शोध लागला. सुरवातीला ‘हा सगळा अमेरिकेतल्या ज्येष्ठ बायकांचा प्रांत, आपल्याला काय त्याचं?’ असं म्हणत मी मनात निर्माण होणारी आवड दाबून टाकत होते, पण जसजसे क़्विल्टचे वेगवेगळे पॅटर्न माझ्यासमोर उलगडू लागले, तसतशी मी या नव्या कलाप्रकारच्या प्रेमात पडू लागले. क़्विल्ट विषयीच्या वेगवेगळ्या साईट बघताना माझ्या लक्षात आले की क़्विल्टचे इथे अमेरिकेत ठिकठिकाणी क्लासेस असतात, फक्त क़्विल्टचेच सामान मिळेल अशी खास दुकाने असतात, त्यांचे आंतरराज्यीय स्तरावर प्रदर्शन आणि स्पर्धा होतात, टीव्हीवर शोज असतात. क़्विल्टची दुनिया म्हणजे भलताच समृद्ध कलाप्रकार निघाला. इंटरनेटवर तर क़्विल्टविषयी अगणित व्हिडीओ क्लिप्स, फोटोज आणि माहिती आहे. आता तर त्याचे ऑनलाईन क्लासेस देखील आहेत. संपूर्ण आयुष्यभर क़्विल्ट करणाऱ्या, त्यातच करीयर करणाऱ्या अनेक अमेरिकन स्त्रिया आहेत, ज्यांच्या स्वताच्या वेबसाईट आहेत.

हळूहळू मला ‘निदान एक तरी क़्विल्ट करावे’ असे वाटू लागले. दरम्यान माझी मुलगी कॉलेज शिक्षणाकरता परगावच्या युनिव्हर्सिटीमध्ये जाणार हे निश्चित झाले होते. तिला मायेची ऊब देणारे, घरची आठवण करून देणारे क़्विल्ट करायचं असे मी मनाशी पक्के ठरवले.

क़्विल्टचे आपले भारतीय रूप म्हणजे गोधडी. माझ्या आईला लहानपणी मी गोधडी करताना बघितलं होतं. ती आजीच्या मऊसूत साड्या घ्यायची, त्या एकावर ठेऊन त्याला हाताने धावदोरा घालायची. झाली गोधडी तयार! पण हा प्रकार थोडा वेगळा होता. माझ्या लवकरच लक्षात आलं की गोधडीच्या मानाने या क़्विल्टचे बरेच लाड करावे लागणार आहेत. यात काटेकोरपणा आणि चिकाटीची कसोटी लागणार आहे. आणि ते बरेच खर्चिक पण असणार आहे. म्हणतात ना हौसेला मोल नसते.

सगळ्यात पहिला प्रश्न होता कोणत्या डिझाईनचे,कोणत्या कापडाचे मी क़्विल्ट करणार आहे. क़्विल्ट करण्याकरता एखाद्या ठराविक थीमची कापडे विकत घेतली जातात. त्या त्या सिझनला त्या त्या थीमची कपडे क़्विल्टच्या दुकानात मिळतात. उदा. फॉलच्या सिझनला पिवळ्या, लाल फुलांची रंगसंगती असणारी, ख्रिसमसला स्नो, सांताक्लोज असे चित्र असणारी. तसेच लहान मुलांकरता वेगवेगळ्या खेळण्यांची,कार्टून्सची चित्रे असलेली कपडे मिळतात. जी गोष्ट थीमची तीच गोष्ट पॅटर्नची. क़्विल्ट करताना कापडाचे अनेक वेगवेगळ्या आकाराचे तुकडे करून, वेगवेगळ्या भौमितिक रचना करत परत ते तुकडे एकमेकांना जोडत वेगवेगळी डिझाईन्स केली जातात. मग याला मधले फिलिंग आणि मागून अस्तर लावून आधी हाताने आणि नंतर मशीनवर शिवण घातली जाते.

हा प्रांत माझ्याकरता नवा होता. म्हणून मग मी एखादा ऑनलाइन कोर्स मिळतो का याचा शोध घेतला. मला एक बेसिक कोर्स craftsy.com वर सापडला. माझी ऑनलाईन गुरु होती Jenny Doan. तो कोर्स मी अगदी मनोभावे पूर्ण केला. लेकीचे आवडते बाटिकचे कापड निवडले आणि परत एकदा इंटरनेटची मदत घेवून त्या कापडाला साजेसे डिझाईन निवडलं. माझे डिझाईन होते Herringbone Quilt. (Herringbone माश्याच्या हाडासारखे हे डिझाईन दिसते.) या डिझाईननुसार क़्विल्ट कसे बनवायचे याची मला एक व्हिडीओ लिंक मिळाली. https://www.youtube.com/watch?v=uMah6wsve7o

आता काम बरेच सोपे झाले होते. या लिंकच्या मदतीने मी माझे क़्विल्ट बेतले. आणि या डिझाईननुसार कोणती कापडं आणि किती लागतील त्याचा हिशोब सुरु केला. बरीच आकडेमोड आणि (दहावीनंतर पहिल्यांदा शाळेतल्या बाईंची आठवण काढत) भूमितीची सूत्रे आठवून किती लांबीचे प्रत्येक कापड लागले ते ठरवलं. मग सुरु झाली दुकानांची पायपीट. कुठे मनासारखा रंग मिळेना तर कुठे डिझाईन पसंत पडेना. दोन्ही आवडलं तर किंमत आवडेनाशी होई. मग शेवटी इंटरनेटवर आखूडशिंगी, बहुढंगी, माझ्या मनाला आणि खिश्याला आवडणारी कापडं मिळाली आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. कॉटनचे बॅटिंग(फिलिंग), अस्तर, रोटरी मॅट, रोटरी कटर, रुलर, खास क़्विल्टकरता वापरला जाणारा दोरा अश्या काही गोष्टी मी ऑनलाईन मागवल्या.

.

क़्विल्ट करण्यापूर्वी मी सगळी कापडे पाण्यातून काढली आणि त्यांना व्यवस्थित इस्त्री केली. माझ्या कोर्समध्ये क़्विल्ट करताना प्रत्येक स्टेपला इस्त्री करायची असते हे पक्के बिंबवले होते. इस्त्री केली की डिझाईनमध्ये टोके अचूकपणे जोडली जातात हे त्याचे मुख्य कारण होते. एकुणात मी इतके वेळा इस्त्री केली आहे न की बोलायलाच नको.

मी फूल साईझचे (60 इंच x 90 इंच) क़्विल्ट करणार होते. डिझाईन आणि क़्विल्टचा तयार साईझ यांचा हिशोब करून मी बाटीकच्या कापडाचे आणि फ्लोरल प्रिंटच्या कापडाचे कापले. नंतर एक फ्लोरल तुकडा आणि एक बाटीक तुकडा एकमेकांवर सुलट बाजू आत ठेऊन चारी बाजूनी शिवले.

.

नंतर त्या प्रत्येक चौकोनाचे त्रिकोणाच्या आकारात ४ तुकडे केले. ते तुकडे उघडून त्यांना परत एकदा इस्त्री केली. दर वेळेस हे तुकडे काळजीपूर्वक कापावे लागत होते, कारण अगदी काटेकोरपणे कापले तरच त्यांचा डायमंड आकार अचूक येणार होता. या आकाराच्या उभ्या भागात दर वेळेस पाव इंच शिवणीकरता जागा सोडायाची होती. हे जागा सोडण्याचं काम सोपं व्हावं या करता बाजारात एक ‘क्वार्टर इंच सीम’ नावाची शिवणाच्या मशीनला लावायची अटॅचमेंट मिळते, पण दुर्दैवाने ते माझ्या मशीनला बसले नाही. म्हणून मला दरवेळेस पेन्सिलने आखून घ्यायचा वेळखाऊ उपद्व्याप करायला लागला.

.

मग हे त्रिकोण एक वरच्या दिशेला आणि एक खालच्या दिशेला डायमंड आकार तयार होईल अश्या प्रकारे जोडले आणि त्या दोन चौकोनी पट्ट्या जोडून उभे आयत तयार केले. निम्म्या पट्ट्या होत्या वरच्या दिशेने जाणारे डायमंड्स आणि निम्म्या पट्ट्या होत्या खालच्या दिशेने जाणारे डायमंड्स.

.

ठरवलेल्या पॅटर्नप्रमाणे या तयार आयताकृती पट्ट्यांचे तुकडे उभे एकमेकांना जोडले. अश्या सर्व उभ्या पट्ट्यांना इस्त्री करून घेतली. मग एका पट्टीचे डायमंड वरच्या दिशेने आणि पुढच्या पट्टीचे डायमंड खालच्या दिशेने असे ठेवून त्या उभ्या पट्ट्या एकमेकांना आडव्या जोडल्या. आता क़्विल्टचा एक मोठा आयत तयार झाला. पुन्हा एकदा इस्त्री केली.

.

हे वरवर दिसायला सोपे दिसत असले तरी माझी बरेचदा त्रेधा तिरपीट उडाली आहे. मी बाटीकचे तुकडे जोडताना ते एकाच ठिकाणी एक रंग एकत्र येणार नाही याची काळजी घेत जोडले आहेत. त्यामुळे कधी एक तुकडा बदलावा लागला की पर्यायाने अजून २-४ तुकडे बदलायला लागायचे. शिवाय त्यांची दिशा वर आहे का खाली यामुळे पण बदल करताना विचार करायला लागायचा. क़्विल्ट करताना आकड्यांचा आणि दिशेचा इतके वेळा गोंधळ उडाला की बस. मला तर एकदम सुडोकू खेळल्यासारखे वाटायला लागले होते. बारकाईने पाहिल्यावर कळते की प्रत्येक डायमंड २ तुकड्यांचा आहे. त्यांची एकमेकांशी दिशा आणि त्यांची त्या क़्विल्टवर असणारी वर जाणारी अथवा खाली येणारी दिशा या सगळ्यांचा मेल घालणे हे खरेच एक चॅलेंज होता. एकदा तर मी चक्क पूर्णपणे उलट्या दिशेने जाणारी पट्टी तयार करून जोडली होती. ते सगळे उसवणे जीवावर आले होते. पण मुकाट्याने उसवायला सुरुवात केली.

मग याला फ्लोरल प्रिंट कापडाची चारी बाजूनी बोर्डर शिवली आणि परत एकदा इस्त्री करून घेतली.

कधी भूमिती तर कधी अंकगणित तर कधी चिकाटी या सगळ्यांची परीक्षा देत असले तरी मला हे क़्विल्ट बनवायला खूपच आनंद होत होता. रोज सकाळी उठल्यावर कधी एकदा माझा नवरा ऑफिसला जातोय, लेक शाळेत जातेय आणि मी क़्विल्ट करायला सुरुवात करतेय असे मला होत असे.

पुढचे कौशल्याचे काम होते बॅटिंग(कापसाची लादी/फिलिंग) आणि अस्तर जोडणे. जमिनीवर सगळ्यात आधी अस्तर (धुवून आणि इस्त्री करून घेतलेले )मग बॅटिंग आणि सगळ्यात वर क़्विल्ट अश्या प्रकारे रचून,त्यातल्या छोट्या मोठ्ठ्या सुरकुत्या काढत या तिन्ही कापडांना मिळून सगळीकडून सतराशे साठ सेफ्टी पिना लावून घेतल्या.
कोर्समध्ये सांगितल्याप्रमाणे घेताना बॅटिंग आणि अस्तरचे कापड क़्विल्टच्या कापडापेक्षा ४ इंचाने सगळीकडून जास्त घेतले होते. जे मी धावदोरा घालून झाल्यावर कापून टाकणार होते.

.

मग मी या तयार तीन पदरी कापडाला रंगीत दोऱ्याने काळजीपूर्वक उभे आणि आडवे धावदोरे घातले आणि जास्तीचे अस्तर आणि बॅटिंगचे कापड कापून टाकले.

.

आता शेवटचा भाग म्हणजे या क़्विल्टला पायपीन करायची होती. एकाच रंगाची पायपीन करण्यापेक्षा बाटीकच्या तुकड्यांची पायपीन केली तर क़्विल्ट अधिक उठून दिसणार याची मला खात्री होती. हे काम जास्त वेळखाऊ होणार होते, पण मला उत्साह होता. त्याकरता मी ८-१० वेगवेगळ्या बाटीकच्या कापडाच्या पट्ट्या कापून घेतल्या आणि त्या एकमेकांना जोडून एक लांबलचक पट्टी तयार केली. ही पट्टी आता या क़्विल्टला चारी बाजूनी शिवायची होती. हे पट्ट्या करण्याचे एक तंत्र मला माहीत होते. एक पट्टी दुसरीला जोडताना ती 45 अंशाच्या कोनात जोडायची असते आणि जादाचा भाग कापून टाकायचा असतो. असे केल्यामुळे जिथे जोड तयार होतो तिथे शिवण फुगत नाही आणि एकसलग पट्टी तयार होते आणि काम सुबक दिसते. ही लांबलचक पायपिन जोडण्यापूर्वी ती मध्यावर दुमडून इस्त्री करून घेतली.

.

आता ही पायपीन क़्विल्टला सुलट बाजूने शिवून घेतली आणि दुमडीवर घडी घालत उलट बाजूला हेम घालून घेतली. सुबक पायपीन लावण्याची दोन तंत्रे माझ्या ऑनलाईन कोर्स मध्ये शिकले होते. एक म्हणजे जोडताना चारी कॉर्नरला टोक कसे आले पाहिजे आणि दुसरे म्हणजे पायपीन बंद करताना सफाईदार कशी बंद करायची जेणेकरून ती कोठे बंद केली आहे त्याचा पत्ता पण लागणार नाही.आणि अर्थातच सगळ्यात शेवटी शेवटची इस्त्री केली.

अश्या प्रकारे माझे क़्विल्ट तयार झाले. रोज एक दोन तास काम करत मी एका महिन्यात हे क़्विल्ट पूर्ण केले. आयत्या वेळेस अजून एक गोष्ट सुचली. याला मँचिंग होईल असा उशीचा अभ्रा देखील मी तयार केला. आता माझ्याकरता आणि माझ्या लेकीकरता एक सुंदर आठवण तयार झाली होती.

.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान दिसतंय. बाटीक प्रिंट मलाही आवडतो. मला हे सगळं वर्णन वाचतानाच धाप लागली; प्रत्यक्ष करण्यासाठी फार कष्ट पडले असतील. आमच्या घरात एका मोकळ्या भिंतीवर एखादी उबदार गोधडी किंवा गालिचा लावावा, असा बेत बरेच दिवस माझ्या डोक्यात आहे.

काही वर्षांपूर्वी लबक (टेक्सस) मध्ये एका संग्रहालयात गोधड्यांच्या प्रदर्शनाची फक्त जाहिरात बघता आली. एकेकाळी, आयुष्य एवढं खडतर होतं की लोकांकडे फार सुविधा नसत; स्त्रियांना आपलं कला-कौशल्य दाखवण्यासाठी स्वयंपाक आणि गोधड्या असे पर्याय होते. त्यातला स्वयंपाक टिकणं शक्य नाही; पण गोधड्यांमधून त्यांचं तेव्हाचं आयुष्य, कष्ट ह्यांची कल्पना येते.

ते वाचेस्तोवर माझं मत 'ह्यॅ! गोधड्या काय बघायच्या' असं होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूप खूप सुंदर आहे ..तुम्ही मेहनत दिसते आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फार सुरेख आहे॥ तुम्ही दिलेली युट्युब लिंक-

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कसली गोड गोधडी आहे. सुंदरच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व प्रतिसाद देणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0